Karunadevi - 4 books and stories free download online pdf in Marathi

करुणादेवी - 4

करुणादेवी

पांडुरंग सदाशिव साने

४. राजधानीत

‘हेमा येतेस ना ?’ आदित्यनारायणांनी विचारले. ‘मी नाही येत !’ ती म्हणाली. ‘सा-या राज्यातील तरुण येथे जमले आहेत. तुला कोणता पसंत पडतो बघ. हेमा, तू आमची एकुलती एक मुलगी, तुझे सुख ते आमचे. तू नेहमी लग्न नको असे का म्हणतेस ? तू अशी विरक्त का ?’‘तुमच्यावर प्रेम आहे म्हणून. उद्या माझे लग्न झाले, म्हणजे मला थोडेच येथे राहाता येणार आहे ? तुमचा तर माझ्यावर जीव.’‘परंतु तुझ्या पतीला घरजावई करीन.’‘त्यांना न आवडले तर ? त्यांना त्यात मिंधेपणा वाटला तर ?’‘तुझ्या पतीला येथे मोठी नोकरी लावून देईन.’‘परंतु त्यांना नको असली तर नोकरी ? येथे राहणे नको असेल तर ?’‘हेमा, येथे जे तरुण आले आहेत, ते उगीच नाही आले. महत्त्वाकांक्षेने आले आहेत. त्यांना राजधानीत मोठी नोकरी मिळाली तर का आव़डणार नाही ? बुद्धीमान लोक महत्त्वाकांक्षी असतात. आपल्या बुद्धीची प्रभा सर्वत्र फाकावी असे त्यांना वाटते. मी तुला एक विचारु ?’‘काय ?’‘ह्या जमलेल्या तरुणांत जो पहिला येईल त्याच्याशी तू करशील का लग्न ? जो पहिला येईल त्याला राजा प्रधान करील. म्हणजेच मग तूही येथेच राहाशील. तुझी व आमची नेहमीच भेट होत जाईल. चालेल का ?’‘तुम्ही सांगाल ते मला मान्य आहे. तुमच्या सुखासाठी मी सारे करीन.’‘मग नाही का येत माझ्याबरोबर ?’‘नको. एखाद्या तरुणावर, समजा, माझे प्रेम जडले आणि तो बुद्धीमान नसला तर ? त्याला मग थोडेच येथे राहाता येईल ? ते नकोच, तुम्ही ज्याच्याशी लग्न लावाल त्याच्याशी मी आनंदाने संसार करीन.’‘हेमा मुलगी असावी तर तुझ्यासारखी. धन्य आहेस तू !’असे म्हणून आदित्यनारायण निघून गेले.

विद्यापिठाच्या वसतीगृहात राज्यातील वेचक तरुणांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचा विशिष्ट अभ्यास चालला होता. आदित्यनारायण मधून मधून ह्या वसतीगृहात येत व संशोधन करीत असत.आज ते वसतीगृहात आले, तो काही तरी तेथे गडबड होती. ‘काय आहे ? काय आहे ?’ आदित्यनारायण विचारत होते.‘रस्त्यात एक लहान मूल होते. तिक़डून एक मस्त हेला शिंगे उगारुन येत होता; परंतु येथील एक विद्यार्थी, शिरीष, विजेप्रमाणे धावत गेला व त्या मुलाला त्याने वाचवले. सारे त्याची स्तुती करीत आहेत.’ चालक म्हणाले.‘कोठे आहे तो तरुण ?’‘तो पाहा.’शिरीषला बोलावण्यात आले. सुंदर सुकुमार शिरीष तेथे नम्रपणे उभा होता. तो सुकुमार असून वीर होता. फुलाप्रमाणे दिसत होता, परंतु वज्रवृत्तीचाही होता. ‘शाबास तुमची. महाराजांच्या कानांवर घातले पाहिजे.’ आदित्यनारायण म्हणाले.‘महाराजांच्या कानांवर ह्यांची कीर्ती आधीच गेली आहे. ज्यांना खास दूत पाठवून आणण्यात आले, तेच हे शिरीष !’ चालकांनी सांगितले.आदित्यनारायण निघून गेले आणि थोड्या वेळाने त्यांची मुलगी हेमा त्या वसतीगृहात आली. सुवर्णासारखी तिची कांती होती. रेशमी बहुमोल वस्त्र ती नेसली होती. मोत्यांचे अलंकार तिच्या अंगावर होते. सारे तरुण तिच्याकडे पाहू लागले.चालक समोर आले.‘माझे बाबा इकडे आले होते ना ?’ तिने विचारले.‘ते तर गेले.’‘इतक्यात कसे गेले ? ह्या तरुणांची परीक्षा घ्यायला ते आले होते ना ?’‘तसे काही बोलले नाहीत.’‘बरे, मी जात्ये.’‘थांबा. नोकर गेला आहे. माळ्याकडून फुले आणायला गेला आहे. फुलांची भेट घेऊन जा.’

‘हे येथे इतके विद्यार्थी आहेत. त्यांना मी एक प्रश्न विचारू ?’‘विचारा.’‘तुम्ही सारे मोठी नोकरी मिळावी म्हणूनच आला आहात का ?’‘हो, हो !’ सारे म्हणाले.‘मला नको नोकरी !’ एक आवाज आला.‘कोण म्हणतो, नको नोकरी ?’ तिने विचारले.‘हा शिरीष !’ सारे हसून म्हणाले.‘तुम्हाला नको नोकरी ?’ तिने गंभीरपणे प्रश्न केला.‘नको !’ तो म्हणाला.‘का ?’‘मला खेड्यातच राहू दे. तेथे आईबापांची सेवा करु दे.’‘आईबापांना येथे आणा...’‘परंतु नकोच नोकरी नकोच.’हेमा निघून गेली. ते सारे तरुण विद्यार्थी शिरीषची थट्टा करु लागले.‘शिरीष, थोर आहे राजा तुझे नशीब.’‘राजाचा प्रधान होशील.’‘प्रधानाचा जावई होशील.’

अशी थट्टा चालली होती. परंतु शिरीष तेथे थांबला नाही. का नाही ?एके दिवशी हेमा शीतला नदीच्या तीरी मैत्रिणींसह हिंडत होती. शिरीषही नदीतीरी होता. शेकडो लोकांची जा-ये सुरु होती. शिरीष एकटाच नदीतीराने गेला व एका झाडाखाली बसला. तो शून्य दृष्टीने कोठे तरी पाहात होता. त्याला का आईबापांची आठवण येत होती? करुणेची आठवण येत होती ?ती पाहा हेमा पळत पळत येत आहे.‘काय झाले ? का पळता ?’ शिरीषने विचारले. ‘तुमच्याजवळ दोन शब्द बोलावे म्हणून.’‘त्यासाठी पळत येण्याची काय जरुरी ?’‘मैत्रिणींना चुकवण्यासाठी. हं, बोला. दोन शब्द बोला.’‘दहा शब्द झाले,’ तो म्हणाला.‘शब्दात पकडणे बरे नव्हे.’‘मग कशात पकडावे ?’‘प्रेमात पकडावे.’‘मला काही समजत नाही.’‘तुम्ही तर सर्वात हुशार असे सारे म्हणतात.’‘म्हणोत बिचारे.’‘तुम्ही दुःखी का ? तुम्हाला घरची आठवण येते ? आईबापांची येते. होय ना ?’

‘होय.’‘आणखी कोणाची ?’‘काय सांगू ? त्या पाहा तुमच्या मैत्रिणी आल्या.’‘हे घ्या तुम्हाला फुल. कसले आहे ओळखा.’‘माझ्या नावाचे.’‘तुमचे नाव शिरीष वाटते ?’‘विचारता कशाला ? तुम्हाला माहीतच आहे.’‘कोण म्हणतो माहीत आहे ?’‘मी म्हणतो. माझे नाव माहीत नसते, तर हे फूल तुम्ही आणलेच नसतेत आणि त्या दिवशी वसतीगृहात माझे नाव थोडेच लक्षात राहाते ?’‘त्या पाहा मैत्रिणी आल्या. झाडाआड लपा. गंमत होईल. लपा.’‘तुमच्याआ़ड लपते.’‘मी जातो. तुम्ही येथे लपा.’तो गेला. हेमा तेथे लपून राहिली. मैत्रिणी पाहात पाहात येत होत्या. ‘तुम्हाला इकडे मुख्य प्रधानाची मुलगी दिसली का ?’ एकीने विचारले.

‘मी माझ्या विचारात होतो. माझे लक्ष नव्हते. त्या हरवल्या वाटते ?’ त्याने विचारले.‘इकडे ती पळत आली.’‘उडी नाही ना घेतली नदीत ?’ त्याने गंभीरपणे म्हटले.‘तुम्ही पाहा हो आमच्यासाठी,’ मैत्रिणी म्हणाल्या.‘शोधतो हां.’शिरीष मागे वळला. इकडे तिकडे खोटेच शोधू लागला आणि तो त्या झाडाजवळ आला. त्याने टाळ्या वाजवल्या. मैत्रिणी धावतच आल्या.‘आहे का हो ?’‘ह्याच का बघा.’‘अहो हीच. हेमा, किती बाई शोधायचे तुला ? हे होते म्हणून सापडलीस.’‘जातो मी.’‘आभारी आहोत आम्ही.’शिरीष निघून गेला. हेमा पुन्हा पळणार होती, परंतु मैत्रिणींनी तिला बळकट धरले.‘धरता काय ? त्यांना काही द्यायला नको काय ? मी रस्ता चुकून घाबरुन उभी होत्ये. त्यांनी तुमची व माझी भेट करुन दिली. त्यांना काही द्यायला नको का ?’

‘काय द्यायचे ?’‘ही अंगठी देऊ ?’‘वेडी आहेस तू. चल आता घरी.’हेमा एकदम मुकी झाली. मैत्रिणींबरोबर ती घरी आली.हेमा अलीकडे देवीच्या देवळात जाऊ लागली. फुलांचे हार नेई. देवीच्या गळ्यात घाली. हात जोडून मनोभावे देवीची प्रार्थना करी. कसली प्रार्थना ? तिला काय कमी होते ?वर्ष संपत आले. त्या सर्व तरुण विद्यार्थांची परीक्षा झाली आणि परीक्षेत शिरीष पहिला आला. आपण उत्तीर्ण होऊ नये असे त्याला वाटे. आपण वेडीवाकडी उत्तरे देऊ असे त्याला पूर्वी वाटे, परंतु अलीकडे वाटत नसे, तो हुशार होताच. त्याने अभ्यास केला. त्याला फळ मिळाले.एके दिवशी पदवीदान-समारंभ झाला. स्वतः राजा य़शोधर आला होता. त्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांस पदव्या दिल्या. शिरीषला त्याने सुवर्णपदक दिले. राजाने सर्व उत्तीर्ण विद्यार्थांस उद्देशून उपदेशपर भाषण केले.‘उत्तीर्ण तरुणांनो, देशातील बुद्धीमत्ता हाती यावी, देशातील सदगुण हाती यावेत म्हणून ही परीक्षा होती. तुम्ही वर्षभर येथे होतात. तुमची वागणुक, तुमचे चारित्र्य येथे पाहिले जात होते. बौद्धिक गुणांबरोबर तुमच्या हृदयाच्या गुणांचीही येथे पारख केली जात होती. अनेकांचे डोळे तुमच्या वर्तनाकडे येथे होते. जे तुम्ही उत्तीर्ण झाला आहांत, त्यांना निरनिराळे कामांवर हळूहळू नेमले जाईल. लक्षात ठेवा की, तुम्हाला प्रजेची सेवा करायची आहे. जनता तुम्हाला पगार देणार, तुम्हास पोसणार. जनता तुम्हाला मान देईल, परंतु तुम्ही जनतेला मान द्या. ईश्वरासमोर एक दिवस झाडा द्यायचा आहे हे विसरू नका.’

समारंभ संपला. उत्तीर्ण तरुण आनंदात होते. राजधानीतील सुखे भोगीत होते. इकडे तिकडे हिंडत होते, फिरत होते; परंतु शिरीष कोठे आहे ?

समारंभ संपला. उत्तीर्ण तरुण आनंदात होते. राजधानीतील सुखे भोगीत होते. इकडे तिकडे हिंडत होते, फिरत होते; परंतु शिरीष कोठे आहे ? तो शीतला नदीच्या तीरी बसला होता.तो पाहा हेमा आली.‘तुम्ही पहिले आलेत, होय ना ?’‘हो, आलो.’‘तुम्हाला त्याचा आनंद नाही होत ?’‘माझ्या आईबापांना खरा आनंद होईल.’‘आणखी कोणाला होईल ?’‘आणखी कोणाला होईल ?’‘मला होईल. तुम्ही पहिले यावेत म्हणून मी जगदंबेची रोज पूजा करीत होते.’‘तुमचा माझा काय संबंध?’‘दुस-याचे कल्याण का इच्छू नये?’‘परंतु मीच पहिले यावे म्हणून का तुमचा नवस? इतर कोणासाठी का केला नाहीत?’‘मला नाही सांगता येत. मी जाते.’

‘मी तुमच्या नवसाने पहिला आलो की, माझ्या बुद्धिमत्तेने?’‘आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेने आला असलात, तरी ती कोणाची देणगी? त्याची ऐट तुम्हाला कशाला? बुद्धी हीसुद्धा देवाचीच देणगी आहे.’‘खरे आहे. मी एक क्षुद्र जीव आहे.’ ‘परंतु क्षुद्र देवही कोणाचा जीव आहे.’‘हो असेल.’‘मी जाते. आज रात्री राजधानीत दीपोत्सव आहे. तुम्ही रात्री पाहायला याल?’‘हृदयात अंधार असेल तर बाहेरचे दिवे काय कामाचे?’‘तुम्ही तुमच्या हृदयात दिवा लावा. जगात सर्वत्र प्रकाश असता तुम्ही स्वतःच्या हृदयाची दारे बंद का करता? आणि मग प्रकाश नाही म्हणून रडता का? आपणच दिवा विझवायचा व पुन्हा अंधार आहे म्हणून रडायचे, हे बरे नव्हे.’‘तुम्ही किती सुंदर बोलता? परंतु माझ्यासाठी नवस का केलात ते सांगा.’

‘तुम्हाला नाही त्याचे उत्तर देता येत?’‘नाही.’‘तिकडे पहिले आलेत; परंतु येथे हरलेत.’‘हो हरलो. सांगा ना, का केलात नवस?’‘तुम्हाला माहीत आहे. मी जाते. मैत्रिणी शोधीत येतील. आज रात्री या हो दीपोत्सव पाहायला. आमच्या घराजवळही या. आमच्या घरावरही आज शेकडो, हजारो दीप लागतील. तुम्ही तुमच्या हृदयातही लावा. माझ्या घराजवळ तरी लावा. लावाल ना?’‘बघेन.’‘मी जाते.’‘ती गेली. शिरीष तेथेच होता. रात्र झाली. आकाशात लाखो दीप लागले आणि मुक्तापूर राजधानीतही आज लाखो दीप पाजळत होते. वसतीगृहातील विदयार्थी दीप-शोभा पाहण्यासाठी हिंडत होते. आसपासच्या खेडेगावांतून हजारो स्त्रीपुरुष आले होते. मुक्तापूर राजधानींने हजारो हिंरेमाणकांच्या माळाच जणू काय गळयात घातल्या होत्या. सुंदर, प्रसन्न देखावा!’हेमा आपल्या प्रासादाच्या पाय-यांवर उभी होती. ती अलंकारांनी नटलेली होती. जणू देवतेप्रमाणे ती दिसत होती. गर्दी येत जात होती. हेमा कोणाची वाट पाहात होती?तो पाहा शिरीष आला. हा पाहा एक दिवा विझला. हेमा दिवा लावू लागली. परंतु दिवा लागेना. तिने शिरीषकडे पाहिले.‘शिरीष, ये. आपण दिवे लावू.’‘दे, मी लावतो.’शिरीषने दिवा लावला व जाऊ लागला.‘शिरीष, दिवा विझू नको हो देऊ. राजधानीतील दिवे उद्या दिसणार नाहीत, परंतु हृदयात लागलेला दिवा कधी विझू नये...’ ती म्हणाली.