Karunadevi - 5 books and stories free download online pdf in Marathi

करुणादेवी - 5

करुणादेवी

पांडुरंग सदाशिव साने

५. शिरीष व हेमा

शिरीष व हेमा ह्यांचे लग्न लागले. शिरीष आता प्रधान झाला होता. राहायला मोठा राजवाडा होता. सुखाला तोटा नव्हता. परंतु शिरीष सुखी होता का? आपला पती दुःखी आहे, ही गोष्ट हेमाच्या लक्षात आल्यावाचून राहीली नाही. प्रेमाला ताबडतोब सारे कळते. प्रमाचे क्ष किरण हृदयापर्यंत जाऊ पोचतात व तेथे काय चालले आहे ते त्यांना समजून येते. प्रेमाला जशी नाडी कळते, तशी जगात कुणालाही कळत नाही.हेमाने एके दिवशी पतीला सर्व विचारण्याचे ठरवले. घोड्याच्या गाडीतून दोघे फिरायला गेली होती. नदीकडील रस्त्याने गाडी जात होती. एके ठिकाणी गाडी थांबवून खाली उतरुन दोघे पायीच निघाली; परंतु कोणी बोलत नव्हते. ‘शिरीष, बोलत रे का नाहीस?’‘काय रोज उठून बोलायचे तरी?’‘तुला काही तरी दुःख आहे.’‘आणि ते काय आहे, ते मला माहीत आहे.’‘शिरीष, आपण आईबाबांना अंबरगावहून येथे आणू. ती येथे राहातील. त्यांना पुत्राचा उत्कर्ष पाहून अभिमान वाटेल. का नाही तू घेऊन येत?’‘हेमा, अडचणी आहेत. त्या तुला सांगता येत नाहीत. तू व मी खेड्यातच जाऊ, चल. तू आपल्या वडीलांना गळ घाल. नको ही प्रधानकी, मला माझ्या आईबापांकडे जाऊ दे, ती माझी वाट पाहात असतील, हेमा. तू दूर जाऊ नयेस असे ज्याप्रमाणे तुझ्या आईबापांस वाटते, तसे मी दूर जाऊ नये म्हणून माझ्या आईबापांस नसेल का वाटत? तू तुझ्या आईबापांची एकटी, तसा मीही माझ्या आईबापांचा एकुलता. तू काही कर; पित्याकडून राजाला गळ घालच. माझी प्रधानकी रद्द करव. मला मुक्त कर. मी येथे कैदी आहे, दुःखी आहे.’‘परंतु सासूबाईंना व मामंजींना इकडे का नाही आणीत...’

‘तिकडे माझे मित्र आहेत. प्रेमानंद आहे. आणि...’‘आणि कोण?’‘असे पुष्कळ मित्र आहेत. नको विचारू’‘मी विचारीन हो बाबांना.’‘विचार.’‘दोघे परतली. गाडीत बसून आपल्या निवासस्थानी आली, भोजन झाले आणि हेमा रात्री माहेरी गेली.’‘बाबा, शिरीष दुःखी आहेत.’‘कोणते दुःख?’‘ही प्रधानकी नको असे त्यांना वाटते. त्यांना खेड्यात जाऊन राहावे असे वाटते. त्यांचे वृद्ध आईबाप तिकडे आहेत.’‘त्यांना इकडे का नाही आणीत?’‘काही अडचणी आहेत.’‘कोणत्या?’‘त्या ते सांगत नाहीत.’‘हेमा तुलासुद्धा येथून जावे असे वाटते का?’‘शिरीषचे सुख ते माझे. येथून जाण्याने त्यांना सुख होत असेल, तर मीही जाईन. मी गेलेच पाहिजे.’‘मला सोडून जाणार?’‘बाबा, नदी पर्वताला व सागराला दोघांना कशी सुखवू शकेल? नदी सागराकडेच जायची. त्यातच तिची पूर्णता. ती डोंगराजवळ राहील तर तिचे जीवन होईल का विशाल?’‘हेमा, तुझ्या पित्याने इतकी वर्षे तुला वाढवले, ते का फुकट? तुझा पती तुला काल परवा मिळाला. त्याचे सुख ते एकदम तुझे सुख झाले! आणी मी? हेमा, तू नेहमी भेटावीस, दिसावीस म्हणून मी अधीर असतो. तू गेलीस तर मी दुःखी होईन.’

‘बाबा, तुम्हीही चला ना आमच्याबरोबर.’‘हेमा, कर्तव्ये अनेक असतात. कौटुंबिक कर्तव्ये तशी सामाजिक. मी जुना मंत्री आहे. एकदम कसा येऊ? आणि शिरीषने जाणेही योग्य नाही. राजाने त्याला प्रधान केले, ते का उगीच? प्रजेचे कल्याण नको का व्हायला? ज्याच्या ठिकाणी जो गुण आहे तो त्याने समाजासाठी दिला पाहिजे. हेमा, तू गेलीस तर मी दुःखी कष्टी होईन; परंतु मी येथेच राहीन. मोठे कर्तव्य करीत राहीन आणि शिरीषविषयी मी महाराजांस विचारणार नाही! शिरीषला प्रधानकीपासून मुक्त करा, असे मी कसे सांगू? हेमा, तू शिरीषची समजूत घाल. म्हणावे, वृद्धांना इकडे घेऊन ये, तसे नसेल करता येत तर इलाज नाही; परंतु प्रधानपद सोडून जाण्याचा हट्ट करु नकोस.’हेमा दुःखीकष्टी झाली. ती जायला निघाली.‘आता उशीर झाला आहे. हेमा, येथेच नीज.’‘शिरीष वाट पाहील.’‘अगं तू का कोठे रानात आहेस? इतकी काय एकमेकांची वेडी बनलीत?’‘बरे हो बाबा, येथे झोपते.’हेमा आज माहेरीच झोपली परंतु तिला झोप येईना. तिकडे शिरीषही तळमळत होता. आईबापाना कसे आणू? त्यांना आणायचे म्हणजे करुणेला नको का आणायला? माझे लग्न झाले आहे ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही. का बरे नाही सांगितली? मी हेमाला फसविले ; परंतु तिच्यावर माझे प्रेम आहे आणि करुणेवर का नाही? करुणेलाही मी विसरु शकत नाही. हेमा समोर असली, म्हणजे करुणा मनातून दूर होते; परंतु हेमा दूर जाताच करुणा सिंहासन पुन्हा बळकावते. करुणा तिकडे रडत असेल. कोण आहे तिला ?आई ना बाप. किती कोमल, प्रेमळ तिचे मन; परंतु ती कर्तव्य करीत असेल. माझ्या म्हाता-या आईबापांची सेवा करीत असेल. आणि मी ? काय करावे समजत नाही.

अंथरुणावर शिरीष तळमळत होता. पहाटे त्याला झोप लागली. बाहेर उजाडले. हेमा लवकर उठून घरी आली; परंतु शिरीष झोपलेलाच होता. ती शिरीषच्या बिछान्याजवळ उभी होती. पतीचे सुकलेले तोंड पाहून तिला वाईट वाटले. रात्रभर शिरीष तळमळत असेल असे तिने ताडले.

शिरीषने डोळे उघडले, तो समोर हेमा रडत होती.‘ये, हेमा, ये. ऱडू नको.’‘शिरीष, तू जोपर्यंत दुःखी आहेस, तोपर्यंत मी रडू नको तर काय करु ?’‘परंतु मी आजपासून हसायचे ठरविले आहे. तुला सुखी ठेवणे हे माझे कर्तव्य. आईबाबा तिकडे सुखात असतील. माझे मित्र त्यांची काळजी घेत असतील. बघतेस काय ? मी खरेच सांगत आहे.’‘शिरीष, माझ्यासाठी तुला त्रास.’‘परंतु तू स्वतःचे सर्वस्व मला दिले आहेस. माझ्यासाठी तू जगदंबेची प्रार्थना करीत असते. तुझ्या प्रेमाचा उतराई मला होऊ दे.’‘शिरीष, माझ्या प्रेमाचा तुला का बोजा वाटतो ? तुझ्यावर प्रेम केल्यावाचून मला राहावत नाही. तू मला सोडून गेलास, तरीही मी तुझ्यावर प्रेम करीन. माझे प्रेम मोबदल्याची अपेक्षा नाही करणार. शिरीष, माझ्या प्रेमाची फुले वाहायला तुझी मूर्ती मिळाली. मी कृतार्थ झाले.’‘उठू आता ?’‘झोप येत असेल तर पडून राहा.’‘प्रजेची सेवा करणा-याने निजता कामा नये. त्याने रात्रंदिवस जागृत राहिले पाहिजे. उठू दे मला.’शिरीष उठला. आज तो उल्हसित होता. दुपारी कचेरीत गेला. शिरीषचे मुखकमल प्रसन्न पाहून आदित्यनारायणास आनंद झाला.‘शिरीष, बरे आहे ना ?’‘आनंद आहे. आजपासून मी प्रजेच्या कामात सर्व शक्ती ओतणार आहे.’‘शाबास, असेच कर्तव्यपरायण व्हा.’शिरीष आता नेहमी आनंदी असे. त्याचे दुःख दूर झाले. हेमाही आनंदली. शिरीष का आईबापांना विसरला ? तो करुणेला का विसरला ? का शिरीषला वैभवाची चटक लागली ? का हेमासाठी तो वरवर हसत होता, परंतु अंतरी जळत होता ? काय होते खरे ?शिरीषची सर्वत्र वाहवा होऊ लागली. राजा यशोधराचे त्याच्यावर प्रेम जडले. राजधानीतील लोक शिरीषची मूर्ती दृष्टीस, पडताच प्रमाण करीत. पतीची कीर्ती ऐकून हेमाचे पोट भरुन येई.