Tujhya Vina- Marathi Play - 12 books and stories free download online pdf in Marathi

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग १२

प्रसंग -१० शेवटचा स्थळ.. घराची गच्ची…

गच्चीवर खाण्या-पिण्यापासुन अगदी नाच-गाण्यापर्यंत जय्यत तयारी केली गेलेली आहे. केतन एका कोपर्‍यात उभा आहे, तर सुशांत आणि अनु एकत्रीतपणे आलेल्या पाहुण्यांना भेटत आहेत..

अनु चेहऱ्यावर उसने हसु आणुन सगळ्यांशी बोलते आहे. पण तिचं लक्ष सतत मान खाली घालुन उभ्या असलेल्या केतनकडे जाते आहे.
आजुबाजुच्या लोकांच अनुचं आणि सुशांतच कौतुक करणं चालु आहे.

आवाज १: ए सुशांत दा, मेहंदी बघ ना काय छान रंगली आहे अनु वहीनीची.. येना बघायला.. कित्ती छान दिसते आहे अनु वहीनीच्या हातावर..
आवाज २: सुशांतदा.. मेहंदीमध्ये तुझं नाव लिहीलं आहे बरं का.. बघ शोधुन सापडते आहे का.. असलं भारी लिहीलं आहे ना.. आय बेट्ट.. तुला सापडणारच नाही..
आवाज ३: ए अनु वहीनी.. ते जाऊ देत.. तु आता नाव घे..
अनु : एsss नाव काय घे? उग्गाच आपलं काहीही.. अजुन लग्न लागले नाहीये…. लग्नातच घेईन मी नाव..
आवाज ३: ए असं काय गं? घे की त्याला काय होतंय…
अनु : नाही.. नाही .. नाही….
आवाज ३: सुशांतदा.. बघ रे तुझी बायको आत्तापासुनच आमचं ऐकत नाहीये.. ये जरा इकडे…

तायडी : “ते काही नाही… अनु आज तुला उखाणा घ्यावाच लागेल.. मी आज्जीबात ऐकणार नाही ते.”

केतन अनुकडे बघतो.

अनु : अहो पण…
आई : अहो नाही आणि काहो नाही.. उखाणा घ्यायचा म्हणजे घ्यायचाच.
अनु : बरं… घेते.. (नाईलाजाने) “दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
……..

अनु एकवार पुन्हा केतनकडे बघते.. केतन काही क्षण तिच्याकडे बघतो आणि परत दुसरीकडे बघु लागतो.

तायडी : अगं थांबलीस का.. विसरलीस का उखाणा? पाठ करुन ठेव बरं.ह्यापुढे तुला आता सारखा घ्यावा लागणार आहे.
अनु : नाही नाही.. विसरले नाही.. आहे ना लक्षात..
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
सुशांतचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी
तायडी : व्वा.. अनु.. फारच छान.. सुशांत आता तुझा नंबर..
सुशांत : ए.. काय गं तायडे.. मला नाही असलं उखाणा बिखाणा येत..
तायडी : ते काही नाही.. तिने घेतला ना.. आता तुला घ्यावाच लागणार..

सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट होतो. केतनला हे सर्व असह्य होऊ लागते. तो मनाशी काही निर्णय घेतो आणि सगळ्यांच्या समोर येऊन उभा रहातो.

केतन : “सुशांत, आई, तायडे.. मला काही बोलायचे आहे..”

सर्वांच्या नजरा केतनकडे वळल्या..

केतन: सुशांत.. आठवतं..? मी आल्यावर काय म्हणालो होतो..? मला कोणी तरी एक मुलगी भेटली.. भारतीय.. आठवतं.. आणि तेंव्हाच मी माझा अमेरीकन मुलीचा विचार मनातुन काढुन टाकला…?
आई : “अरे वा वा.. छानच झालं की.. आणि काय रे.. आम्हाला आधी..”
केतन : (आईचे बोलणे मध्येच तोडत) “एक मिनीट आई.. प्लिज.. माझं बोलणं पुर्ण होऊ देत..

आई गप्प होऊन केतनचं बोलणं ऐकु लागतात.

केतन : (काही वेळ शांत राहुन मग) मला आज माझ्या मुर्खपणाची लाज वाटतेय आणि चिडही येते आहे. असो.. जे झाले ते झाले.. तर मी त्या मुलीच्या प्रेमात आकंठ बुडालो आहे.. आणि ति मुलगी सुध्दा माझ्यावर प्रेम करते..” (एकदा वळुन अनुकडे बघतो. अनु खाली मान घालुन उभी असते)
सुशांत : हो.. आठवते आहे मला.. पण त्यानंतर तु असंही म्हणला होतास की ते एक तात्पुर्ते आकर्षण होते आणि तुला अमेरीकन मुलीशीच लग्न करायचं आहे….

केतन वैतागुन सुशांतकडे बघतो.

सुशांत : बरं बरं बोल तु, नाही आम्ही मध्ये बोलत.. पण फक्त एक सांग, मग आता अडलेय कुठे? मी तर तुला तेंव्हाच फोन करं म्हणलं होतं
केतन : ‘..अडलं तर आहे सुशांतदा.. अडलं तर आहेच….आम्ही एकत्र असुनही एकत्र येऊ शकत नाही..
सुशांत : “अरे काय कोड्यात बोलतो आहेस.. निट सांग बरं..”
केतन : “..तेच सांगायला मी इथे उभा आहे..” (एक नजर अनुकडे टाकतो, ती अजुनही मान खाली घालुन उभी असते) “..ती मुलगी आज इथेच आपल्यात आहे..”

“कोण.. कोण??” सगळेजण इकडे तिकडे पाहु लागले..
केतन शांतपणे उभा असतो.

आई : अरे बोल ना केतन कोण मुलगी? असं कोड्यात नको बोलुस रे..
केतन: (एक दीर्घ श्वास घेउन) “अनु..!”

“काय?..” एकदमच सगळे ओरडतात. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह

सुशांत : (अतीशय चिडक्या स्वरात) “केतन तु काय बोलतो आहेस.. कळतेय का तुला?”
केतन : “हो सुशांतदा.. मला पुर्ण कळते आहे मी काय बोलतोय.. पण जेंव्हा अनु मला आवडली.. तेंव्हा मला खरंच माहीत नव्हते की हीच तुझी होणारी बायको आहे..

सुशांत : अरे पण..

केतन : (सुशांतचे बोलणं तोडत).. तसं असते ना सुशांतदा.. तर मी जराश्याही वाकड्या नजरेने तिच्याकडे पाहीले नसते.. पण जेंव्हा कळाले की तुझं अनुशीच लग्न होणार आहे, तेंव्हा खुप उशीर झाला होता.. मला माफ कर दा.. मला खरंच माफ करं.. माझं आणि अनुचं एकमेकांवर प्रेम आहे..”
सुशांत : अनु.. हे खरं आहे?

अनु काहीच बोलत नाही..
सगळ्यांच्या चेहर्यावर आश्चर्य, राग, चिंता पसरली होती.. केतन कुणाच्याच नजरेला नजर देउ शकत नव्हता.

केतन : (खाली बघुन) “सुशांतदा..पण मी तुझं लग्न मोडु इच्छीत नाही.. माझ्यापेक्षा जास्त अनुला तु ओळखतोस.. मला खात्री आहे.. तु अजुनही तितकेच अनुवर प्रेम करतोस.. आणि आयुष्यभर करत रहाशील..
पण.. पण त्याचवेळी आपल्यामध्ये कितीही प्रयत्न केला तरी संबंध पहील्यासारखे होणार नाहीत.. एकदा मनाच्या कोपऱयात अनुला प्रेमाचे स्थान दिल्यावर तिला कुठल्या हक्काने मी वहीनी म्हणु..?
…आणि म्हणुनच…. मी उद्याच अमेरीकेला परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.. कायमचा… माफ कर मला, पण मी तुमच्या लग्नाला नाही थांबु शकत…

लोकांची कुजबुज ऐकु येत रहाते.

केतन : दा.. मी तुझा.. अनुचा.. अपराधी आहे.. आणि म्हणुनच तुझा जो काही निर्णय असेल.. तु जी काही मला शिक्षा देशील ती मला मान्य आहे..
सुशांत : शिक्षा? अरे अक्षम्य गुन्हा गेला आहेस तु केतन.. तुला मी कोण शिक्षा देणार?
केतन : मला मान्य आहे माझी चुक सुशांतदा.. मान्य आहे मला.. पण मी म्हणालो ना.. मला खरंच कल्पना नव्हती अनुच तुझी होणारी बायको आहे ते.. चुका माणसाच्याच हातुन होतात ना? आता तुझंच बघ ना.. नाही नाही म्हणतोस पण हिम्मत असेल तर सगळ्यांसमोर मान्य कर त्या पार्वतीबद्दल… तुझ्या मनात सॉफ्ट कॉर्न आहे ना तिच्याबद्दल???

अनु : (हेल काढत रडायला लागते… डोळे पुसत पुसत..) सुशांत? काय ऐकते आहे मी हे? खरं आहे हे? प्लिज सांग सुशांत हे खोटं आहे… तुझं,, तुझं फक्त माझ्यावरच प्रेम आहे.. हो ना?
तायडी : ए काय रे दादा.. वहीनीला रडवलस ना..
सुशांत : अगं मी रडवलं का? हा केतन काहीही बोलेल आणि तुम्ही ऐकणार का त्याचं लगेच? (अनुला समजवणीच्या स्वरात) अनु.. अगं.. नाही .. म्हणजे हो.. म्हणजे.. हा केतन म्हणतोय तसं काही नाहीये (आणि मग केतनकडे बघत रागाने) काय बोलतो आहेस तु केतन? अक्कल आहे का तुला?

केतन : हो दादा.. तु काहीही म्हण.. पण तुला हे मान्यच करावं लागेल. मी असेन लहान तुझ्यापेक्षा वयाने, पण म्हणुन तुझं आणि पार्वतीचं काय चाललं आहे हे काय मला कळत नाही? हा सखाराम पण सांगेल.. विचार त्याला… काय रे सख्या…

सगळे वळुन सखारामकडे बघतात. सखाराम काही बोलायला तोंड उघडतो, पण सुशांतचा चिडका चेहरा बघुन परत गप्प बसतो.

सुशांत : कानफाड फोडेन केतन… एकदा बोल्लास्स.. परत बोल्लास तर याद राख… मी फक्त अनुवरच प्रेम केले आहे आणि तिच्याशीच लग्न करणार आहे कळलं?

इतक्यात स्लिव्ह-लेस ब्लाऊज, एकदम पार्टीवेअर साडी, केस मोकळे सोडलेले, समोर येते.

पार्वती : काय? काय म्हणालास केतन?

केतन आधी तिच्याकडे बघतच रहातो. प्रथम तो तिला ओळखतच नाही. मग ओळख पटल्यावर..

केतन : तु?? तु अशी.. म्हणजे.. अशी कशी???
पार्वती : तु असं म्हणुच कसं शकतोस केतन? माझा भाऊ सरांच्या ऑफीसमध्ये काम करतो.. त्याने हे ऐकलं तर त्याला काय वाटेल? सरांनी मोठ्या मनाने मला इथं काम दिलं.. त्याची परतफेड मी अशी करेन असे तुला वाटलं का?

केतन खाली मान घालुन उभा असतो.

अरे, सरांच अनुवर किती प्रेम आहे मला विचार. सारखं तिच्याबद्दलच बोलत असतात. ऑफीसमध्ये पण कित्तीवेळा तिच्याशीच फोनवर असतात. काय हो सर.. बरोबर बोलतेय ना मी? भाऊ सांगतो मला सगळं संध्याकाळी.

एव्हाना केतनची नजर इतरांकडे जाते.. मगाशी चिडलेले संतापलेले आजुबाजुचे लोकं आडुन आडुन हसत आहेत असं त्याच्या लक्षात येतं..
सगळेजण एकत्र जमलेले असतात. कुणी एकमेकांशी काहीतरी बोलत असते, तर कोणी स्वतःचे हासु दाबायचे प्रयत्न करत, तर कुणी अजुनकाही.. आणि अनु? मगाशी मान खाली घालुन दुःखी चेहरा करुन उभी असलेली अनु चक्क हसत होती.. त्याला काहीच कळंत नव्हते..

केतन : (बावचळुन) “काय झालं? मी काही चुकीचे बोललो का?”
यावर मात्र सगळे जण जोरजोरात हसु लागतात..केतनला अजुनही काही कळत नाही.. सुशांत तर खाली पडुन गडाबडा लोळायचाच बाकी होता.. शेवटी तो केतन जवळ येतो आणि..

सुशांत : ..शांत हो मित्रा..गोंधळुन जावु नकोस.. सांगतो सगळे सांगतो.. आधी सगळ्यांना शांत तर होऊ देत.
(थोडा वेळ गेल्यावर…) केतन, तुझ्या त्या अमेरीका आणि ब्लॉड पुराणाला आम्ही सगळे इतके कंटाळलो होतो.. मग तुला ताळ्यावर आणण्यासाठी आम्हाला हे नाटकं खेळावं लागलं.
केतन : (अजुनही गोंधळलेल्या स्वरात) “नाटक? कसलं नाटक..?”
सुशांत : “तुला मुलींचे फोटो पाठवुन आम्ही कंटाळलो होतो..
अनुच्या लग्नाचे बघत आहे कळल्यावर आमच्या डोक्यात प्रकाश पढला..
अनु.. तुझ्यासाठी अगदी अनुरुप होती. तुझा फोटो आम्ही तिला दाखवला, तिला फोटो आवडला आणि तिनेही तुला भेटायची, तुला जाणुन घ्यायची तयारी दर्शवली.. म्हणुन मग आम्ही माझ्या लग्नाचे हे नाटकं स्थापले..
अनु शांघाय वरुन परत यायची आणि तुझी तारीख आम्ही एकत्रच साधली. ट्रॅव्हल एजंट आपल्या ओळखीचाच होता. मग तुझी फ्लाईट शांघाय मार्गे असलेली बुक केली आणि तुझी आणि अनुची भेट ‘घडवुन’ आणली… हो.. घडवुन आणली…
पुढे घटना एकामागोमाग एक घडत गेल्या.. काही घडवुन आणलेल्या तर तर काही योगायोगाने..”

केतन : म्हणजे तुझं लग्न?
सुशांत : माझं लग्न? माझं लग्न तर झालं.. हिच्याशी.. (असं म्हणुन सुशांत पार्वतीला पुढे ओढतो..)

कोपर्‍यात बसलेला सख्या एकदम ताडकन उठुन उभा रहातो.

केतन : क. क.. काय? एका मोलकरणीशी लग्न केलंस तु?
सख्या नकळत ’हो ना..’ म्हणुन केतनच्या म्हणण्याला दुजोरा देतो.

सुशांत : नाही रे बाबा.. ही मोलकरीण नाही.. माझ्याच ऑफीसमध्ये कामाला आहे.
केतन आणी सख्या : (एकदमच) काsssssssय?
केतन : पण.. तु .. तु असं करुच कसं शकलास सुशांतदा.??. मी तुझ्या लग्नाला नसताना.. तु..तु लग्न केलंस? अरे तुझं लग्न म्हणुन मी सुट्टी टाकुन आलो ना मी इतक्या लांब.. आणि..
सुशांत : अरे हो.. हो.. शांत हो.. आमचं लग्न झालं असलं तरी ते अगदी साधं.. आपल्या आपल्यात रजीस्टर पध्दतीने झालं आहे. उद्या सर्वांसमक्ष वैदीक पध्दतीने आम्ही विवाहबध्द होणार आहोत.

केतन अजुनही गोंधळलेला असतो.

सुशांत : हे बघ.. मला अमेरीकेला जायचे आहे ना.. ही पण येणार आहे माझ्याबरोबर. मग तिचा व्हिसा लागेल ना डिपेंडंट.. त्यासाठी मॅरीज सर्टीफिकेट लागते. म्हणुन आम्ही रजीस्टर पध्दतीने लग्न करुन घेतले म्हणजे तिला व्हिसासाठी अप्लाय करता आले ना… अर्थात हे तुमच्या-आमच्यात.. इतर लोकांच्या दृष्टीने अजुनही आमचं लग्न उद्याच आहे रे बाबा…
केतन (स्वतःला सावरत) : “अरे पण का? का असा छळ केलात माझा..? विचार करुन करुन वेड लागले असते मला..!”
सुशांत : “ते तुझ्या आईला आणि तायडीला विचार.. आणी त्यांना तुझ्यासाठी मुली शोधुन वेड लागायला आणले होतेस त्याचे काय अं? मग त्यांनी मला त्यांचा विचार सांगीतला आणि तो मी आणि अनुने मिळुन आखला आणि व्यवस्थीत पार पाडला..”

केतनने नाटक्या रागाने अनुकडे बघतो… अनु लांबुनच हात जोडते आणि कानं पकडुन माफी मागते…

सखाराम : (केतनकडे येतो) केतनदादा.. मला माफ करा.. मला काय बी ह्यातलं ठाऊक नव्हतं.. म्या उगाच तुम्हास्नी त्रास दिला..
केतन : अरे तुझ्या त्रासाचं काय घेऊन बसलास.. नशीबानेच अशी थट्टा माझी मांडली होती.. तु तरी काय करु शकणार होतास त्यात…
सखाराम वळुन पार्वतीकडे बघतो. ’अर्रा रा नाक्क मुक्का’ चे गाण खराब झालेल्या कॅसेटसारखं हळु संथ गतीने खर्र.. खुर्र.. करत अर्धवट वाजते आणि बंद पडते.

सुशांत पार्वतीच्या गळ्यात हात टाकुन तो केतनकडे जातो.

मागे आता नविन गाणे वाजु लागते.. “खुश रहे तु सदा ये दुवा है मेरी..”
सख्या गळ्यातल्या कापडानं डोळे टिपतो आणि निराशेने मान वळुन दुसरीकडे जाऊन उभा रहातो.

सुशांत : (केतनला) अरे शाळेत असताना चड्डीत शी झाली पासुन ते अगदी अमेरीकेतील न्युड बार मध्ये केलेल्या मस्तीपर्यंत प्रत्येक गोष्ट शेअर केलीस ना तु माझ्याशी? एक भाऊ म्हणुन.. एक मित्र म्हणुन.. आणि एवढी मोठ्ठी गोष्ट तु लपवुन ठेवलीस तु माझ्यापासुन
केतन : सॉरी सुशांतदा….
सुशांत : (अनुला) “ओ.. ‘दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी’.. आता काय तिकडेच उभ्या रहाणार आहात? का तुमच्या होणाऱ्या खऱ्या नवऱ्याचा राग दुर करणार आहात?”

अनु हसते आणि केतनकडे जायला निघते.

तायडी : (केतनला) “उतरले ना भुत अमेरीकेचे? का बघायची आहे अजुनही अमेरीकेचीच मुलगी??. नाही म्हणजे तुला अजुनही सोनेरी केसांचीच हवी असेल तर हिचेच केस आपण कलर करु.. पण ती अमेरीकन नको रे बाबा..”

केतन नुसताच हसुन मान हलवतो.

आई : “मगं अनु नक्की समजु ना लग्न?

अनु लाजुन मान हलवते.

आई : उद्या येतीलच ना तुझे आई-बाबा? मग सांगुन टाकते त्यांना मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी पसंत आहे.. लवकरात लवकर लग्नाची तारीख काढुन टाकु.. काय?”

केतन अजुनही चिडुन दुसरीकडे कुठेतरी बघत असतो. अनु त्याच्यासमोर जाऊन उभी रहाते. केतन आपली मान दुसरीकडे वळवतो. अनु पुन्हा त्याच्या समोर जाऊन उभी रहाते आणि दोन्ही हातांनी आपले कान पकडते..

अनु : चिडलास? स्वॉरी ना…

केतन अजुनच चिडतो…

अनु : नको ना चिडुस अजुन.. प्लिज.. हे बघ कान पकडले मी.. खरंच सॉरी… होतं रे असं कधी कधी…

केतन लक्षच देत नाही…

अनु : थांब तु तसा ऐकायचा नाहीस.. (असं म्हणुन त्याला घट्ट मिठी मारते)

केतन अनुच्या मिठीतुन सोडवुन घ्यायचा थोडाफार प्रयत्न करतो, पण ते त्याला शक्य होत नाही. तो थोड्यावेळ हात खालीच ठेवुन शांत उभा राहतो आणि मग शेवटी तिला घट्ट मिठी मारतो…
सगळा परीवार हसण्यात बुडुन जातो………………….

[पडदा पडतो…]


[समाप्त]