Kalya books and stories free download online pdf in Marathi

कळ्या

कळ्या
माळीकाका नेहमीप्रमाणे बागेत काम करत होते. ती सवयीप्रमाणे उठून गॅलरीत आली आणि छानसा आळस देता देता तिचं लक्ष काकांकडे गेलं. तिच्या बालपणापासून माळीकाका त्यांच्याकडे कामाला होते.
ती अगदी छोटी असताना बागेतल्या हिरवळीवर रांगायची तेव्हापासून माळीकाका तिला आवडतात.
धोतर नेसलेले,अंगात सदरा, कपाळी गंध आणि बुक्का,गळ्यात तुळशीची माळ.
रोज घरात यायचे तेच बागेतली फुलं घेऊन फुलदाणीत ठेवायला.ही रांगता रांगता पायात आली की तिलाही उचलून घ्यायचे हातात. आजीला आवडायचं नाही पण आई बाबा कौतुकाने पहायचे.
माळीकाका बागेला पाणी घालायचे, गवत कापायचे, झाडांना नीट कापून आकार द्यायचे, हिरवळीवर पडलेली वाळकी पानं काढून स्वच्छता करायचे. झाडावरची फुलं अलगद काढून परडीत ठेवायचे. आजी  मात्र बागेत येऊन स्वतःच्या हाताने पूजेसाठी फुलं तोडून न्यायची....
आईला फुलदाणीत सजवायला हवी असलेली फुलं काकाच नेऊन द्यायचे.
डवरलेल्या बागेत पक्षीही यायचे छान...
दिवस सरत होते. रीमा मोठी होत होती. आता शाळेत जाताना दोन वेण्यांवर आई हौसेने दारच्या बागेतल्या सूगंधी फूलांचा  गजरा घालून द्यायची.
सोनटक्का, गुलाब, कवठीचाफा अशी छान छान फुलं शाळेतल्या बाईंसाठीही ती घेऊन जायची हौसेने.
माळीकाकांच्या घरात कोण कोण होतं हे मात्र तिला कधीच कळलं नाही. ते एकटेच असतात असं तिला समजलं थोडं मोठ्ठं झाल्यावर.
माळीकाका दरवर्षी एकदाच सुट्टी घ्यायचे. आषाढी वारीला जायचे. आईने त्यावेळी त्यांना पैसे देताना रीमाने एक दोनदा पाहिलं होतं.
रीमाबेबी छान मोठी होईल,माझ्या विठ्ठलाचे आशीर्वाद आहेत तिला!
रीमा मोठी झाली तशी बागही वाढू लागली,बहरू लागली!
आता काॅलेजात जाणार्‍या रीमाला रोज माळीकाका हातात फुलांचा सुंदर गुच्छ द्यायचे. 
रविवारी सकाळी रीमा काकांबरोबर बागेत वावरायची. शाळेत असताना नव्हता उत्साह तिला पण काॅलेजात फुलपंखी दिवसात मात्र तिला बागेत वावरायला आवडू लागलं. रोपांची निगराणी,पाणी घालणं,नवी रोपं तयार करणं हे रीमा शिकली!
आता रीमाच्या आयुष्याच्या बागेतही एक भुंगा रुंजी घालू लागला होता.
अभ्यास,काॅलेजचे कार्यक्रम, नाचाचा क्लास आणि कार्यक्रम, मित्र मैत्रिणींचे वाढदिवस या सगळ्या गदारोळात हा विशेष मित्रही आला. अजूनही रोज माळीकाका गुच्छ घेऊन सकाळी दारात येत रीमाच्या स्वागताला.
माळीकाका हळूहळू थकत चालले होते. पण उत्साहाने बागेत वावरत होते. रीमाला एक-दोनदा त्या मित्राबरोबर येताना त्यांनी पाहिलंही होतं.
 होता होता दिवस सरले. माळीकाका अजून थकले. थोडे आजारीही झाले.
हाॅस्पिटलमधे असताना रीमाच्या आई बाबांनी त्यांचा खर्च केला आणि रीमालाही त्यांना भेटावंसं वाटल्यावर आवर्जून भेटायलाही जाऊ दिलं त्यांनी.घरचाच घटक होते नं माळीकाका!
बाग या दरम्यान सुकली.रीमा काकांकडून शिकली होती त्याप्रमाणे वेळात वेळ काढून बागेकडे लक्ष देऊ लागली.ती बाग उजाड होऊ नये म्हणून जीवापलीकडे  सांभाळू लागली! काॅलेजलाही न जाता,मित्रालाही न भेटता बागेतल्या झाडांची काळजी करण्यातच तिला रस वाटू लागला.
काका बरे होउन येण्याची वाट ती पाहत होती पण काका गेले...
आई बाबा आणि रीमाला अतीव दुःख झालं.सर्व पुढची व्यवस्था बाबांनीच केली!!
एक  दिवस रीमाचा मित्र घरी आला आणि तिच्या घराजवळच्या एका इमारतीतल्या आऊटहाऊसमधे तिला घेऊन गेला...
अरे हे तर माळीकाकांचं घर आहे.पण आता ते इथे नाहीत... रीमाला हुंदका फुटला....
तो रीमाला म्हणाला" मला तू खूप आवडतेस आणि आपण शिक्षण आणि नोकरी असे स्थिर झालो की लग्नही करू. पण मला एक वास्तव तुला सांगायचय आज".
रीमा विचारात पडली.काकांच्सा आथवणीतून बाहेर येताना फिला त्रास होत होता पण मित्राने तिला घरात नेलं...
माळीकाका आणि काकू... ब्लॅक अँड व्हाईट एकमेव फोटो!! लग्नातला!! 
पण काकूंना कधी पाहिलंच नाही रे मी!!!
" कशी पाहणार तू??? तुला जन्म दिला आणि इस्पितळातच गेल्या".
काय????? काकू????? मला ????? जन्म??????
अरे काय बोलतो आहेस मूर्खासारखं!!!!
हो रीमा.तू माळीकाकांची आणि काकूंची मुलगी आहेस!!!
ते तुझे आई वडील... जन्मदाते...
तुझ्या आई बाबांना लग्नानंतर पाच वर्ष मूल झालं नाही.आजी फार त्रास द्यायला लागली. लग्नाच्या आधीपासूनच तुझे बाबा तुमच्या बंछल्यात कामाला यायचे आणि संध्याकाळी उदबत्त्या वळायच्या कारखान्यात जायचे.
तुझा जन्म झाला आणि आई गेली... काकांना प्रश्न पडला की लेकराचं काय आता??? 
तुझ्या आजीने आई बाबांना समजावलं आणि माळीकाकांना विश्वासात घेऊन तुला कायदेशीर दत्तक घेतलं.
तू सधन घरात गेलीस आणि कामानिमित्त ते रोज तुला भेटत राहिले.
पण हे गुपित गुपितच राहिलं....
तुला रोज फूलं,गुच्छ देताना त्यांच्यातला जन्मदाताही सुखावत असेलच नं!!! निर्धास्त झाले ते आणि तुझ्या भविष्याची काळजीही मिटली त्यांची!!!
तुझा त्यांचा नुसता सहवासच नाही तर रक्ताचं नातं होतं म्हणूनच तुला त्यांच्याबद्दल इतकी आत्मीयता वाटते. 
त्यांची कळी दुसर्‍याच्या हसर्‍या फुलत्या बागेत उमलली, त्यांचं रोपटं दुसर्‍या मातीत रूजलं पण म्हणून त्यांनी त्या बागेतल्या कळ्यांवरही तितकीच माया केली. पानाफुलांच्या जोडीने तुझ्यावरही माया करीत राहिलेच आणि ती आवड तुझ्याही मनात रुजवली....
रीमा आता अनाथाश्रमांच्या परिसरात बागा फूलवते. तिथल्या मुलामूलींना आर्थिक मदत देण्यापेक्षा आपल्या जोडीदाराच्या आणि आईवडिलांच्या मदतीने अनाथाश्रमातील विश्वस्तांशी बोलून प्रशिक्षित माळ्यांना नेमून बागा फुलवते. 
त्या बागेतली फुलं भरभरून ओंजळी आश्रमातल्या देवाला वाहण्यापेक्षा अनाथ मुलामुलींच्या ओंजळी त्यांनी भरून टाकते, त्या कळ्यांची दुसर्‍या दिवशी फुलं होतात..