kalat nakalat books and stories free download online pdf in Marathi

कळत नकळत...

रेवती एक चुणचुणीत मुलगी.. टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनीत कामाला होती.सतत तिला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी बोलावं लागे,त्यांना माहिती द्यावी लागे.
रेवती स्वतः छान कविता करत असे आणि लिहीतही असे अधूनमधून हौस म्हणून.तिचं हे कौशल्यही आॅफिसमधे माहिती होतं.
तिच्या सहज बोलण्यातून अनेक लोक प्रभावित होत.कंपनीची मंडळीही तिच्या या स्वभावावर कौशल्यावर खुश होती.
तिचा कंपनीतला सहकारी मकरंद.दोघांची विशेष गट्टी आणि छान मैत्री होती. रेवतीचं लग्न ठरलं होतं आशिषशी. रेवती आणि आशिषच्या लग्नाची तयारीही घरात जोरात सुरु होती. रेवती अक्षरशः स्वर्गात वावरत होती.
आशिषची कौटुंबिक स्थिती उत्तम.उच्च पदावर लहान वयात नोकरीला असल्याने आर्थिक सुबत्ताही होती. स्वतःचं घर,गाडी,आई वडील आणि हा एकुलता एक. रेवती खुश नसेल तर नवल.. ओळखीतून स्थळ आलं आणि लगेच पसंतीही झाली.
आॅफिसमधली तिची आणि मकरंदची मैत्री आशिषलाही माहिती होती.कधीतरी तो साशंक होई पण रेवती त्याला विश्वास देत असे की तो तिचा फक्त चांगला मित्र आहे.
रेवतीचं काम तिला अनेक लोकांशी जोडून ठेवणारं असे. रेवती लिहीते छान हे माहिती असल्याने कंपनीने तिला एक वेगळं काम सोपवलं... प्रत्येक पर्यटनस्थळाचा छोटा माहितीपट तयार करायचा होता आणि कंपनी तिथे काय दाखवते,सुविधा काय,ठिकाणाची वैशिष्ट्य काय असं सारं काही अवघ्या तीन मिनीटात गुंफायचं होतं....
काम मोठं होतं म्हटलं तर पण रेवती खुश झाली... कंपनीने सुदर्शन मीडियाकडे हे काम सोपवलं पण लेखनासाठी रेवती काम करेल असं पहिल्या मीटींगमधेच सांगितलं...
सुदर्शनकडून अभिरामला हे काम दिलं गेलं होतं आणि त्यामुळे अभिरामचा रेवतीशी कामानिमित्त अधिक संपर्क येऊ लागला...
रेवतीचा बोलघेवडा स्वभाव,उत्साह,मदत करण्याचा स्वाभाविक छंद यामुळे अभिराम आणि तीही एकमेकांशी कामानिमित्त अधिक संपर्कात राहू लागले...
घरी लग्नाची तयारी,आशिषला भेटणं,अभिरामसह काम,आणि कंपनीची रोजची कामं यात तिला मकरंदशी बोलायला वेळच कमी पडे. भेटही फार थोडा वेळ होई.पण तरी बंध घट्ट होते दोघांचे. मकरंद हे सगळं पाहत होता...
लग्नाची तारीख जवळ येत चालली होती.केळवणं,हाॅटेलिंग,खरेदी या सर्वात अभिराम तिला अधूनमधून व्यक्तिगत संदेशही आता पाठवू लागला.सुरूवातीला तिनेही मोकळा प्रतिसाद दिला सहजपणे... पण नंतर लक्षात आलं की हे जरा अती होतं आहे....
तिने न राहवून आशिषच्या कानावर घातलं... त्याने फार मनावर घेतलं नाहि.अग एकत्र काम करताना घडतात अशा गोष्टी,,. तू मला सांगितलस हे ठीक... पण मनावर घेऊ नकोस...
अभिराम कंपनीतही येत असे.भेटत असे... संदेशही येत होते.चारचौघात दाखवता न येणारी अस्वस्थता आणि असुरक्षितता मोकळ्या पण तरी निरागस मनाच्या रेवतीला बोचू लागली... मकरंद पाहत होता... पण आशिषला सांगितलं आहे हे... आता मकरंदला वेगळं सांगावं का? असा प्रश्न तिला पडला होता....
माहितीपट तयार होऊ लागले.कंपनीत सादरीकरण होऊ लागले. छानच जमलं होतं सगळं....
अजून एकदोन महत्वाच्या गोष्टींसाठी चित्रीकरणाची परवानगी घ्यायला आता रेवतीला कंपनीतर्फे अभिरामसह अधिकार्‍यांना भेटायला जाणं भाग होतं... तिला ते केवढं मोठं संकट वाटतं आहे हे तिचं तिलाच समजत होतं....
हो नाही करत एकदोनदा टाळलं पण जाणं अटळ आहे हे तिला लक्षात आलं... अस्वस्थ मनाने तिने आशिषला फोन केला.... अग काय हे रेवती,.. मला नं या गोष्टीचा कंटाळा आला आहे. दुर्लक्ष कर आणि काम करून ये जाऊन पटकन.किती विचार करता तुम्ही मुली.... चल ठेवतो मी फोन......
पण तिच्या मनात काय चालू आहे आणि तिला अभिरामबरोबर जायला का असुरक्षित वाटतं आहे हे तिला शब्दात मांडणंही कठीण वाटत होतं...
पियू तिची मैत्रीण.... पियूला हे तिने सांगितलं होतं पण ती तरी दुसरं काय सांगणार....
रेवती तू मोकळी आहेस गं पण जग विचित्र आहे... आपणच सांभाळून रहायला हवं... 
अग पण पियू ही माणसं सहज बोललेलंही किती चुकीच्या अर्थाने घेतात... मला नाही गं योग्य वाटत...
नाईलाजाने दहा वाजता तिने अभिरामला आॅफिसपाशी भेटायचं ठरवलं...
मी येतो बाईक घेऊन आपण एकत्र जाऊ....
तिने नकार दिला... मी कंपनीच्या गाडीने किंवा रेल्वेने येईन.आपण थेट तिथेच भेटू.
नंतर वेळ आहे का रेवती??? चहा तरी घेऊ..,
नाही अरे... मला परत आॅफिसला काम आहे....
उलघाल संपेना...
या सगळ्यात मकरंद कुठे होता???? मकरंद एका ज्येष्ठ नागरिकांच्या गटाला घेऊन सहलीला गेला होता कंपनीच्या..... फोन लागेल तरी का याचा???? शंका शंका,उलघाल....
योगायोगाने मीनिल भेटला तिला खालीच. अधिकारी यायला अजून अवकाश होता... मीनिलला दुसरीकडे त्याच इमारतीत काम होत... मीनिल मकरंदचा घट्ट मित्र. अभिराम अजून यायचा होता....
मीनिलच्या फोनवर अचानक मकरंदचा फोन वाजला.... कामासाठीच होता.पण मकरंदला कल्पना नसावी की मीनिल आणि रेवती सोबत असावेत.....
तिने बोलण्यावरून ताडलं आणि तो फोन सपल्याक्षणी तिला लक्षात आलं की मकरंद रेंजमधे आहे.तो पर्यटकांसह कामात असेल!गडबडीत असेल असा कुठलाही विचार न करता तिने त्याला फोन लावला..... काहीतरी बोलायचं निमित्त करून तिने बोलून घेतलं त्याच्याशी कारण तोही व्यस्त असणार याची तिला कल्पना होती.....
तिने फोन ठेवला आणि अभिराम समोर हजर झाला... 
तिला जाणवलं की आता तिला अचानक खूप सुरक्षित वाटतय,.., तिची भिती कुठच्याकुठे पळून गेली आहे.अभिरामच्या तथाकथित मूर्खपणाला प्रतिसाद न देता,,, न घाबरता किंवा संकोचता आपण आज त्याच्यासोबत वावरू शकू......
काम झालं... चहाही झाला....
निघते मी..... 
ती आॅफिसला पोहोचली आणि पियुला बिलगून रडायला लागली.... पियूलाही कळेना की काय झालं आहे....
पियू अग मला जो आधार आशिषशी बोलून मिळाला नाही तो मकरंदशी बोलून मिळाला.खरंतर मकरंदला हे माहितीही नाही पण आशिषला सगळं माहिती आहे... तरीही मकरंदचा केवळ आवाज ऐकून केवढं बळ मिळालं मला की मी अस्वस्थता दूर सारून अभिरामचा मूर्खपणा बाजूला ठेऊन त्याला भेटू शकले ...
एका प्रामाणिक स्रीचं मन कसं कुठे गुंतावं ग? आणि तिने नक्की कुठे आधार शोधावा गं???
मीनिललाही माहिती नसेल की तो भेटणं आणि त्यातून मकरंदशी बोलायची तरी शक्यता मला समजणं हे किती महत्वाचं होतं माझ्यासाठी!!!
केवळ शब्दांचा आधार... वस्तुस्थिती माहिती नसतानाचा... मैत्रीची आश्वासकता....
तुला खरं सांगू का पियु! आशिषला बहुधा हे कळणारच नाही आहे.तो माझ्या आयुष्याचा जोडीदार आहे आता.. मकरंदच्या आयुष्यातही येईलच नं कुणीतरी त्याची हक्काची... प्रेमाची जिवलग...
पण तरीही  त्याचा माझा हा बंध रेशमी आहे.... त्याला स्नेहाचा आणि खास करून विश्वासाच्या आधाराचा गोडवा आहे.... त्याच्या आणि माझ्याही नकळत.