स्वराज्यसूर्य शिवराय - 21

स्वराज्यसूर्य शिवराय

भाग एकविसावा

॥॥ जाऊ संताचिये द्वारी....॥॥

महाराष्ट्र ही संतांची भूमी! अनेक संतश्रेष्ठ या भूमीत होऊन गेले. त्यांनी धार्मिक जागृती तर केलीच परंतु सोबत राजकीय आणि देशप्रेम या संदर्भात जाणीव जागृतीचे महान काम केले. त्यासाठी कीर्तन, अभंग, दोहे, भजन, गवळणी, भारूड, प्रवचन अशा विविध प्रभावी माध्यमातून जनजागरणाचे फार मोठे कार्य संतांनी केले. शिवरायांच्या जीवनाचा अभ्यास करीत असताना शिवजन्मापूर्वीही अनेक संत या राज्यात होऊन गेले. त्यापैकी चक्रधर स्वामी, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज ह्या प्रमुख संतांचा उल्लेख आढळतो. शिवरायांचा जन्म  झाला त्यावेळी संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रात फार मोठे जनशिकवणीचे कार्य करीत होते. त्यांचे मूळ गाव पुण्याच्या जवळ असलेले देहू हे गाव! घरी शेती होती. किराणा दुकान होते परंतु तुकारामांचे मन संसारात रमत नव्हते. ते गावाजवळ असलेल्या डोंगरावर सातत्याने विठ्ठलाचे भजन, प्रार्थना करीत असत. तुकाराम महाराजांचे अभंग प्रसिद्ध आहेत ज्यातून त्यांनी विठ्ठलाला आळवताना, आराधना करताना जनतेला दया, क्षमा, शांती यांची शिकवण दिली. एक फार मोठा ठेवा दिला. आजीवन पुरेल अशी शिदोरी दिली. समतेचा उपदेश जनतेसमोर ठेवतांना तुकाराम महाराज म्हणतात,

'जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।

तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा '

सोप्या शब्दात मांडलेले हे तत्त्वज्ञान, वास्तवता घरोघर पोहोचली. त्यामुळे महाराजांचे अभंग प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाले. शिवरायांच्या कानावर तुकाराम महाराजांची कीर्ती गेली. त्यावेळी शिवरायांनी स्वराज्याची चळवळ सुरू केली होती. शिवरायांनी तुकाराम महाराजांची भेट घेतली. दर्शन घेतले. 'राजा उन्मत्त नसावा. तो संतांचे आशीर्वाद घेणारा असावा. नीतीने चालणारा असावा.' असे आचरण असलेले शिवराय आणि मोह,मोद,इच्छा, स्वार्थ, आकांक्षा यांचा त्याग केलेले संत तुकाराम ही भेट तशी अत्यंत महत्त्वाची! शिवरायांनी आणलेला नजराणा विनयाने नाकारून तुकाराम महाराज म्हणतात,

'मुंगी आणि राव। आम्हा सारखाची देव।गेला मोह आणि आशा। कळिकाळाचा हा फासा।सोने आणि माती। आम्हा समान हे चित्ती।तुका म्हणे आले। घरा वैकुंठ हे सावळे।।'

राजा,आम्हाला कशाचाही मोह नाही, कोणतीही आशा नाही.सोने काय नि माती काय आमच्यासाठी दोन्ही समानच.राजा, प्रभूचे स्मरण करता करता, त्याला आळवताना जनकल्याण व्हावे हीच आमची ईशचरणी प्रार्थना असते आणि राजे, तुम्ही हीच इच्छा पूर्ण करावी, हेच कार्य पुढे चालवावे असे आम्हाला वाटते.तोच आमच्यासाठी फार मोठा नजराणा असेल.' तुकोबांना स्वराज्यानिर्मितीची चिंता होती हे यावरुन लक्षात येईल. शिवराय काही वेळा तुकोबांच्या दर्शनाला गेले. त्यांची कीर्तने ऐकली. अभंगांचा लाभ घेतला. शिवरायांच्या मनावर या गोष्टींचा परिणाम झाला. त्यांनाही वाटले, आपणही तुकोबांप्रमाणे कीर्तन, भजनात आयुष्य व्यतीत करावे. ही गोष्ट तुकाराम महाराजांच्या लक्षात आली. त्यांनी शिवरायांना उपदेश केला. ते म्हणाले,

"राजा, तुम्ही जे स्वराज्य स्थापन करण्याचे महान कार्य हाती केले आहे. ते पूर्णत्वास न्या. आम्ही आमच्या कार्यातून रयतेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. त्यांचे अंतःकरण प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना पाप मार्गावर जाऊ देण्याची कोशीश करतो. आपण दोघेही जनतेसाठी आपापल्या परीने झटत राहून लोकांना सुपंथ दाखविण्यासाठी प्रयत्न करू.एक काम करा. महाराष्ट्रात रामदास स्वामी नावाचे संत जनजागरणाचे फार मोठे काम करत आहेत. त्यांचे दर्शन घ्या."  परंतु शिवरायांना तुकोबांचा उपदेश म्हणा, अंतरीचे बोल म्हणा जास्त काळ ऐकायला, अनुभवायला मिळाले नाही कारण शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न, जनतेचा उद्धार करण्याचे काम हाती घेऊन थोडा काळ लोटतो लोटतो तोच, शिवराय ऐन विशीत असताना संत तुकाराम महाराज वैकुंठगमन करते झाले. परंतु तुकाराम महाराजांनी शिवरायांना सांगितल्याप्रमाणे अजून एक खणखणीत संतवाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निनादू लागली. जे कार्य तुकाराम महाराजांनी आरंभ केले होते तेच कार्य संत रामदास यांनीही सुरु केले. त्यांची 'जय जय रघुवीर समर्थ!' ही घोषणा सर्वत्र दुमदुमत होती. समर्थ रामदास यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी असे होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला होता. लहानपणापासून ते बलोपासना करीत असत. ते प्रभू रामचंद्राचे भक्त होते. युवकांना ते बलोपासनेचे आणि व्यायामाचे महत्त्व पटवून देत . त्यांनी गावोगावी हनुमान मंदिराची स्थापना केली. बाराव्या वर्षी त्यांचे लग्न होत असताना 'शुभ मंगल सावधान...' हे मंगलाष्टक सुरु होताच 'सावधान' हा शब्द कानावर पडला आणि नारायण लग्न मंडप सोडून धावत सुटले. त्यांनी कठोर तपस्या केली ते युवकांना सांगत,'अकलेचा वापर करून शरीरबल वाढवा आणि स्वतंत्र व्हा.' त्यांचा असाही एक संदेश आहे की, ' सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे!' सोप्या आणि साध्या भाषेत दिलेला हा संदेश फार लोकप्रिय ठरत होता . समर्थ रामदासांच्या कार्याची महती ऐकून शिवरायांच्या मनातही समर्थांच्या भेटीला जावे, त्यांचा आशीर्वाद घ्यावा अशी इच्छा निर्माण झाली.

एकेदिवशी शिवराय आणि जिजाऊ बोलत बसलेले असताना जिजाऊ अचानक म्हणाल्या,"शिवबा, तू समर्थांच्या दर्शनासाठी जाण्याचे नेहमीच म्हणत असतो परंतु जात का नाहीस? सर्वत्र त्यांची ख्याती, कीर्ती ऐकायला मिळते. त्यांचे दर्शन घेतलेला प्रत्येकजण त्यांच्या कार्याची महती सांगत असतो. तुला तुकामाऊलीनेही रामदासांचे दर्शन घे असे सांगितले होते. जा. बरे लवकर.""आऊसाहेब, आमच्याही मनात तो विचार नेहमी घोळत असतो परंतु स्वराज्याच्या कामामुळे जाणे होतच नाही.लवकरच चाफळला जाऊन दर्शन घेतो." शिवरायांनी माँसाहेबाना शब्द दिला. तितक्यात एक चमत्कार घडला. प्रत्यक्ष भवानीमाता शिवरायांच्या स्वप्नात आली. शिवरायांना म्हणाली,"शिवबा, लवकरात लवकर रामदासांचे दर्शन घे. त्यांचे मार्गदर्शन, आशीर्वाद तुझ्यासाठी फायदेशीर ठरणार आहे."

प्रत्यक्ष माता भवानीची आज्ञा झाली म्हणल्यावर काय, शिवराय हातातील सारी कामे सोडून चाफळ मुक्कामी पोहोचले. परंतु समर्थ तिथे नव्हते. हे ऐकून शिवराय नाराज झाले. चौकशी केली असता असे समजले की, समर्थ रामदास एका ठिकाणी जास्त दिवस राहात नाहीत. सध्या रामदासांचा मुक्काम शिंगणवाडी येथे आहे. शिवरायांनी तातडीने शिंगणवाडी गाठली. तिथे समर्थ त्यांना भेटले. समर्थांचे ते तेजःपुंज रुप पाहून शिवराय आनंदले. मोठ्या भक्तीभावाने ते संत रामदास यांच्या चरणी लीन झाले. समर्थांनी शिवरायांना आशीर्वाद दिला. सोबत एक जपमाळ आणि नारळ दिला. शिवरायांनी ते मस्तकी लावून स्वीकार केला आणि म्हणाले,

"गुरूदेव, आपले दर्शन घ्यावे ही फार दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली. आशीर्वाद असू द्यावा."

" राजे, तुमच्या राज्यात आलो. कितीतरी दिवस झाले पण आज येणे केलेत. शिवबा, आम्हालाही तुमच्या भेटीची आस होतीच. लहान वयात तुम्ही घेतलेले कार्य, घेतलेली झेप पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. राजे, तुमचे घराणे म्हणजे शिवशंभोचे घराणे! तुम्ही प्रत्यक्ष शिवाचे वंशज आहात हे समजताच तुमच्या भेटीची इच्छा आम्हालाही होतीच. परंतु हर एक गोष्टीची वेळ ठरलेली असते. आज तो योग आला. परंतु आपण अचानक आलात कसे?"

"रघुवीर, आपल्या दर्शनासाठी आलो आहे." शिवराय म्हणाले. त्यांची आंतरिक इच्छा होती, समर्थांनी अनुग्रह द्यावा. समर्थांनी ती जाणली. शिवराय काही क्षणातच जवळच्या ओढ्यावर स्नान करून आले. समर्थांनी त्यांना बोध केला. गुरूमंत्र दिला. शिवरायांनी पुन्हा साष्टांग नमस्कार केला. रामदास महाराजांनी  श्रीफळ, मूठभर माती, दोन मुठी लीद आणि चार मुठी खडे शिवरायांना दिले. शिवरायांनी ते सारे मनोभावे स्वीकारले. आदरयुक्त अंतःकरणाने ती सारी सामग्री भाळी टेकवली. शिवराय आनंदले. त्यांचे मन तिथे रमले. त्यांना तिथे आत्मिक समाधान लाभले. तिथून जावे असे त्यांना वाटत नव्हते. शेवटी ते समर्थ रामदास स्वामींना म्हणाले,

"स्वामी, आंतरिक इच्छा होते आहे की, राजकारण, डावपेच, लढाया, शस्त्रास्त्रे सारे काही सोडून द्यावे. तुमची सेवा करावी. भक्ती, आध्यत्मिक मार्ग स्वीकारावा." ते ऐकून रामदास ठामपणे म्हणाले,"मुळीच नाही. हा तुमचा मार्ग नाही. तुमचा धर्म क्षत्रीय! तुम्ही त्याच मार्गाने गेले पाहिजे. रयत तुमच्याकडे आशेने बघते आहे. तिचे रक्षण करणे हे तुमचे आद्यकर्तव्य! ठरवून दिलेल्या कर्तव्याला प्रत्येकाने कोणत्याही परिस्थितीत निभावले पाहिजे, सामोरे गेले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे तुमचा जन्म त्याच हेतूने झाला आहे. जिजाऊ, भवानी माता, शिवशंकर या सर्वांची तीच इच्छा आहे." असे समर्थांनी शिवरायांना अत्यंत सुस्पष्ट, साध्या भाषेत राजधर्म आणि क्षात्रधर्माचे महत्त्व, कार्य, हेतू समजावून सांगितले. जणू उपदेश केला, गुरुमंत्र दिला. रामदास स्वामी आणि शिवराय यांची ही भेट वरवर गुरुशिष्य भेट वाटत असेल परंतु धर्मतेज आणि क्षात्रतेज समोरासमोर बसले होते. दोघांचाही आंतरिक संवाद कदाचित वेगळाच चालला असेल. तो त्या दोघांशिवाय तिसऱ्याला कसा काय समजणार? 'योगियाच्या खाणाखुणा योगीच जाणो.' त्याप्रमाणे दोन अंतःकरणात काय संवाद झाला असेल विशेषतः जेव्हा शिवरायांनी सारे काही सोडून समर्थांच्या सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा समर्थ नक्कीच म्हणाले असतील,  

" शिवबा, ऐक. लक्षपूर्वक ऐक. शिवबा, तू एक राजा आहेस. कर्तव्यनिष्ठ, परोपकारी असा राजा. तुझ्यासारख्या राजाजवळ काही महत्त्वाचे आणि आवश्यक असे गुण असायला हवेत. तू सर्वगुणसंपन्न आहेस, चारित्र्यवान आहेस, सुसंस्कारित आहेस. मी जे सांगणार आहे, ते सारे तुझ्याजवळ निश्चितच आहे. पण जे तुझ्याकडे आहे त्याची जाणीव करून देण्याचे काम मी करतो आहे. राजा म्हटला की, तो मुत्सद्दी हवा, धोरणी हवा. सावधपणे वागणारा हवा. राजाजवळ चिकाटी असली पाहिजे. चिवटपणा असला पाहिजे. कुणी आक्षेप घेतला,आरोप केला तर त्याचे सुस्पष्टपणे, प्रामाणिकपणे, सत्याची कास धरून खंडण करता आले पाहिजे. काही वेळा समोरच्या व्यक्तीचे लहानसहान कृत्य दुर्लक्षित केले पाहिजे. कठोरतेसोबत प्रसंगी क्षमाशील असावे. राजा मनकवडा असला पाहिजे. येणाऱ्या गरजूस काय हवे हे ओळखता आले पाहिजे. नीतिन्याय सोडून राज्यकारभार करू नये. जनतेला सातत्याने उपदेश करताना, 'शहाणे करावे सकळ जन' ही वृत्ती अंगिकृत केलेला असावा. राजा जनतेसाठी मारक नसून तारक असावा. धीरोदात्त स्वभावाचा असावा. संकट येताक्षणी विविध उपाययोजना करुन संकट निवारण करावे. प्रयत्न करता असंभव असे काही नसते हे कायम लक्षात ठेवावे. रयत आपल्यावर अवलंबून असते तीमध्ये फुट पाडू नये, पडू देऊ नये. येणाऱ्याचे दुःख, अडचण समजून ते निवारण करावे. कुणाला अपाय करणे गरजेचेच असेल, दुसरा कोणताही उपाय नसेल तर तो अपाय त्रयस्थाकडून करवून घ्यावा आणि त्याच्या लक्षात आणून द्यावे. आपण काय करतो हे कुणालाच त्यातल्या त्यात शत्रूला समजू देऊ नये.कारण असे काम गुपचूप केले की, ते यशस्वी होते. त्याची चर्चा झाली की, त्याचे महत्त्व कमी होते. प्रसंगी अडचणी निर्माण होतातकुणाला विनाकारण त्रास देण्याचा विचार कधीच करू नये. भीतीने पछाडलेल्या माणसाला गुपित सांगू नयेत. अशा भीतीग्रस्त माणसांना वेळोवेळी धीर देऊन त्याच्याकडून काम करून घ्यावे. चोरालाच भांडारप्रमुख करावे. त्याच्या चुका नजरेआड करुन त्याला हलके हलके शहाणे करावे. काट्याने काटा काढावा राजाने हे प्रमुख अस्त्र समजावे. कोणतेही काम यशस्वी व्हावे असे वाटत असेल, पूर्णत्वास जावे अशी इच्छा असेल तर ते काम करताना आळस, दिरंगाई अशा गोष्टींना कटाक्षाने दूर ठेवावे. 'जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला' हे कायम स्मरणात ठेवावे. धूर्त लोक जरूर सल्लागार असावेत परंतु अंतिम सुत्र, शेवटचा निर्णय आपला असावा. गुंड लोकांना पकडून त्यांची मस्ती उतरवावी. त्यांना दूर करु नये. योग्य वेळी त्यांचाही उपयोग करून घ्यावा. दुष्ट, दुर्जन यांना सांभाळून राजकारण करावे. त्यांना सज्जनासम वागवावे. त्यांचे दुर्गुण जगजाहीर केले तर मग ही माणसे आपल्या चांगल्या कामात अडथळे निर्माण करतात. शत्रू समोर दिसला की, शरीरात चैतन्य, त्वेष निर्माण झाले पाहिजे. बाहू स्फूरण पावले पाहिजेत. गुरगुर करणारापुढे तसाच गुरगुरणारा उभा करावा. मुर्खाच्या साथीला मुर्खच द्यावा. गलेलठ्ठ माणसाची टक्कर गलेलठ्ठाशीच लावावी. दांडग्याशी दांडगा, उर्मटाशी उर्मट, लुच्च्यासंगे लुच्चा अशाच जोड्या लावाव्यात कारण त्यामुळे न्यारेच रंग भरले जातात. मात्र हे करताना आपण नामानिराळे राहावे. समर्थ रामदास स्वामींनी केलेला मुक परंतु समर्थ उद्देश शिवरायांनाही पटला. समजला. त्यांना खात्री पटली, 'समर्थांचा हा उपदेश आपण करीत असलेल्या कार्यासाठी दिलेला आशीर्वाद आहे. आपण योग्य मार्गाने जात आहोत. आपले काहीही चुकत नाही. समर्थांसारख्या महापुरुषाचा, सत्पुरुषाचा आशिष आहे. आता थांबायचे नाही. मागे पाहायचे नाही. पुढेच जायचे. समोर आलेला गनीम ठोकून काढायचा.'

समर्थांचा आशीर्वाद घेऊन शिवराय गडावर पोहोचले. त्यांनी मोठ्या उत्साहाने जिजाऊंची भेट घेतली. समर्थांनी दिलेला प्रसाद त्यांनी माँसाहेबाच्या समोर ठेवला. माँसाहेबानी प्रसाद म्हणून मिळालेला सारा ऐवज पाहिला आणि विचारले,"शिवबा, प्रसाद? हा रे कोणता प्रसाद? यामागे समर्थांचा नक्कीच काहीतरी हेतू असेल. काय म्हणाले समर्थ?"

"समर्थांनी बराच उपदेश केला. प्रसादाचे म्हणाल तर कदाचित समर्थांचा हेतू असा असावा की, श्रीफळ आपल्या, स्वराज्याच्या कल्याणासाठी, माती म्हणजे पृथ्वी... स्वराज्य स्थापन व्हावे या हेतूने, खडे म्हणजे किल्ले  स्वराज्यात येतील आणि लीद म्हणजे आपल्याला विपुल अश्व...घोडे प्राप्त होतील. असा आशीर्वाद यामागे असू शकतो ."

"अगदी बरोबर आहे शिवबा तुझे. योगियाचे बोल, योगिराज जाणे." आऊसाहेब कौतुकाने म्हणाल्या.…

शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा अजून एक प्रसंग म्हणजे शिवरायांची अग्निपरीक्षा घेणारा असा. त्यावेळी समर्थ महाबळेश्वर येथे होते. त्यांना समजले की, शिवराय भेटीला येत आहेत. त्यांनी निश्चय केला, शिवबाची परीक्षा घेऊया. शिवराय महाबळेश्वरला येताच त्यांना समजले की, समर्थ जंगलात गेले आहेत. वेळ रात्रीची होती. शिवराय मशाल हाती घेऊन रानात शिरले. त्या भयाण वातावरणात शिवरायांच्या कानी कुणीतरी कण्हत असल्याचा आवाज आला. शिवराय त्या आवाजाच्या दिशेने निघाले. थोडे दूर जाताच मशालीच्या प्रकाशात त्यांना दिसले ते भयंकर होते. प्रत्यक्ष रामदास स्वामी त्या जंगलात जमिनीवर लोळत होते. जोराने कण्हत होते. रामरायाचा धावा करीत होते. शिवराय धावत त्यांच्याजवळ गेले. त्यांना उठवत काळजीने म्हणाले, "काय झाले महाराज? अशा घनदाट जंगलात, घनघोर अंधारात ..."

"शिवबा, राजा, माझ्या पोटात भयंकर कळा येत आहेत. त्यावर एकच औषध आहे ते म्हणजे वाघिणीचे दूध. तेच शोधायला जात...."

"हे काय भलतेच, अशा अवस्थेत तुम्ही जाणार तेही मी इथे असताना. थांबा मीच जातो.""नाही. राजे, नाही. काम अत्यंत अवघड आहे. वाघिणीचे दूध...नाही. तुमचा जीव...." समर्थांना थांबवून शिवराय निर्धाराने, ठामपणे म्हणाले,

"स्वामी, माझ्यासारखे शेकडो शिवाजी आपण निर्माण करू शकता. मग मी गुरुचरणी अर्पण झालो तर काय फरक पडणार. थांबा." असे हट्टाने म्हणत समर्थांच्या हातातले भांडे घेऊन शिवराय निघाले.वाघीणीचा शोध घेत असताना शिवरायांना एका ठिकाणी वाघाचे दोन बछडे दिसले. इथे जवळपास वाघीण असणार हे त्यांनी ओळखले. त्या पराक्रमी वीराच्या, स्वामींच्या शिष्याच्या मनात एक साधा विचारही आला नाही की, आपण वाघीणीचा सामना करणार आहोत. तिच्याकडे दुधाची याचना करणार आहोत. हे जीवावरही बेतू शकते. परंतु असा कोणताही विचार मनात येणारा राजा आपल्या पिलाजवळ आलेला पाहताच शेजारच्या गुहेत बसून पिलावर लक्ष ठेवणारी ती माता खवताळून, डरकाळी फोडत बाहेर आली. ती शिवरायांवर वार करणार तितक्यात हातातले भांडे दाखवत शिवराय तिला विनवणी करुन म्हणाले,

"हे माते, माफ कर. एक कृपा कर, माझ्या गुरुंचे पोट खूप दुखत आहे. त्यांना औषध म्हणून तुझे दुध हवे आहे. तेव्हा माझ्या भांड्यामध्ये थोडे दुध दे." त्या वाघीणीला ते बोल समजले की नाही कुणाला ठाऊक परंतु शिवरायांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तिचे मन द्रवले. ती वाघीण शिवरायांसमोर शांत उभी राहिली. शिवरायांनी तिचे दुध काढले.प्रत्यक्ष  वाघीणीचे दुध काढण्यासाठी वाघाचे काळीज लागते. ते शिवरायांजवळ होते म्हणून ते गुरुमाऊली समर्थांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तितक्यात रामदास स्वामी तिथे प्रकट झाले. दुधाचे भांडे हातात घेऊन ते प्राशन करुन प्रसन्न झालेले रामदास स्वामी म्हणाले,

"व्वा! राजे, तुम्ही कमाल केलीत. आज मी स्वतः जिजाऊ माऊलींचा पुत्र असल्याचा भास होत आहे...." असे म्हणत समर्थांनी शिवरायांना कवेत घेतले जणू थोरल्या बंधूने धाकट्या भावास प्रेमाने आलिंगन दिल्याप्रमाणे..... धन्य ते गुरु, धन्य तो शिष्य

नागेश सू. शेवाळकर

***

Rate & Review

Saurabh Dhuri 5 months ago

Sandhya Pande 5 months ago

भाग एकवीस

Sambhaji Thete 5 months ago

harihar gothwad 5 months ago

Vijay Jagdale 5 months ago