Mallika books and stories free download online pdf in Marathi

मल्लिका

सुस्नात मल्लिका केस बांधून झर्‍याच्या बाहेर पडली.तिचा प्रसन्न चेहराच सांगत होता की आज काही विशेष दिवस आहे.
मल्लिका एक भिल्ल कन्या. लहानपणापासून जंगलातच लहानाची मोठी झालेली.भगवान शंकरावर तिचा फार  जीव! त्यांची आराधना करण्यात तिला आनंद वाटे. लहान असताना रानफुले आणि बेलाची पाने ती शंकराच्या पिंडीला वाही.कुणा एका वाटसरुने जंगलात एका दगडावर ती पिंड ठेवली होती. मल्लिकेच्या काकाने ती पाहिली आणि सर्व जमातीने मिळून भोळ्या सांबाला एका मंदिरात स्थापन केलं. महिनाभर राबून मातीचंच सुंदर शिवालय उभारलं. तेव्हापासून आपल्या भिल्ल जमातीचा उद्धार करणार्‍या शिवाची उपासना होऊ  लागली.
कुणी एक भला आश्रमीय त्या वाटेने जाताना एक रात्र देवळात विसावला.भिल्लांनी त्याचा सत्कार केला.रात्री त्या ऋषिने त्यांना महाशिवरात्रीची कथा सांगितली. अजाण भिल्लांची भाषा त्यांना येत नसली तर सांकेतीक खुणांनी त्यांनी कथा पोचवली!अजाणता शिवपिंडीवर बेलाची पाने वाहणारा भिल्ल आणि त्याची बदललेली मानसिकता ऐकून या भिल्लांनीही हा वसा घ्यायचं ठरवलं.
मल्लिकाला हा दिवस फार आवडे. जमातीतल्या सर्व स्त्रिया उत्साहाने तयारी करत.जैवविविधतेने समृद्ध जंगलात कशाचीच कमतरता नव्हती. ऋषींनी शिकवल्याप्रमाणे सर्व तयारी होत असे.
चंदनाचे खोड उगाळून भल्यामोठ्या दगडी पात्रात उटी उगाळली जाई.रानफुलांच्या माळांच्या माळा गुंफल्या जात. दारच्या गोठ्यातल्या गाईंचे दूध शिवाच्या स्नानासाठी एकत्र केले जाई.बेलाच्या पानांचा सडाच पडे.कोणताही मंत्र न जाणणारे रानटी भिल्ल मनापासून सेवा करीत.त्या दिवशी प्राणिहत्या होत नसे.सर्वजण कंदमुळे,रानफळे खात असत.दूध पीत असत.ती शंकराला पोचत नसेल तर नवल!
कपाळावर गंधाचा टिळा लावून शुभ्रवसना मल्लिका लांबसडक केसात रानफुले माळून शिवमंदिरात दाखल झाली. आपली घागर तिने पिंडीवर रिती केली.हात जोडले.
तितक्यात तिला वेदमंत्र कानावर पडले.ती चपापलीच. कुणी आश्रमीय युवक संथ स्पष्ट आवाजात यजुर्वेदातील रूद्रसूक्त पठण करीत होता. ती संकोचून मागे गेली.
घरी पोचली तो तिने पाहिलं की आई त्या आश्रमीय युवकासाठी शिधा बांधत होती.कोवळ्या रानफुलांची भाजी,मध,फळे असं सर्व बांधून तयार होत होतं.बेटा! मंदिरात एक आश्रमीय आले आहेत त्यांना हे नेऊन देशील? मला संध्याकाळच्या मंदिरातील पूजेची तयारी अन्य स्रियांसह करायची आहे! आणि हो संध्यासमयी कपिलेचे दूध काढून आणण्याचे कामही तुझेच आहे!
मल्लिका मंदिरात आली.युवकाला नमस्कार करून तिने सर्व साहित्य नम्रतेने त्यांना दिले.परस्परांची भाषा त्यांना समजणे अशक्य होते पण संकेतांनी ती समजली.
घनगंभीर मंत्रपठणाने मल्लिकेचा जीव भारून गेला.
संध्याकाळी सुरु झालेली शिवपूजा उत्तररात्री संपली.भिल्लांच्या अनघड आयुष्यात प्रथमच वेदांनी प्रवेश केला.त्यांना आणि त्यांच्या आयुष्याला नवा आयाम देण्याचे ऋषींनी ठरवले होते.त्याची ही पहिली पायरी होती.
मल्लिका काहीशी कासावीसही होती.येणार्‍या हुताशनीला तिचा विवाह वृद्ध भिल्ल प्रमुखाशी होणार होता!भिल्लांचा नियम तिचे वडील मोडू शकत नव्हते.तिची आईही व्यथित झाली होती.पण सुसस्वरूप कन्येचा मोह प्रमुखाला नाही पडला तर नवल!
आश्रमीय युवक दुसर्‍या दिवशी निघाला.सर्वांनी त्याचा निरोप घेतला.
मल्लिकेने शिवमंदिरात बसून शिवाची आराधना केली आणि त्यानंतर तिला एक कल्पना सुचली.
बाबा तुम्ही मला ऋषींच्या आश्रमात नेऊन सोडा.माझे मन ज्ञानाकडे धाव घेते आहे.प्रमुखाशी माझा विवाह व्हावा असे तुम्हालाही वाटत नाही न!
अवैदिकांना ज्ञान शिकवण्याचा ध्यास ऋषींना लागला आहे.मला जाऊ द्या नं बाबा!माझं आयुष्य सावरेल!माझ्याकडे पाहून अन्य भिल्लकन्या आणि पुत्रही ज्ञानाचे धडे गिरवतील.पशूंची हत्या करून जगणार्‍या आपल्याला एक नवी दिशा मिळेल!
भिल्लाने दोन दिवस विचार केला! विवाहाच्या तयारीची चौकशी प्रमुखाकडून होऊ लागली होतीच!
झोपलेल्या मल्लिकेचा चेहरा पाहून भिल्लाने जमातीविरूद्ध जाण्याचा निश्चय केला! त्याने लगेच तिला जागं केलं आणि क्षणाचाही विचार न करता तिला घेऊन तो बाहेर पडला!
रात्रभर चालून थकलेले जीव पहाटेच्या प्रसन्नवेळी ऋषींच्या आश्रमात पोचले. एक भिल्ल निःशस्रपणे एका युवतीला घेऊन आलेला पाहून आश्रमीय थोडे गोंधळलेच.स्नानासाठी गेलेले ऋषीवर्य तोपर्यंत पोहोचलेच.त्यांनी मल्लिकेला आश्रमातील युवतींच्या स्वाधीन केलं.आपल्या जमातीत काय वादळ उठणार आणि आपल्या पत्नीला कसे प्रश्न विचारून भंडावून सोडले जाणार याची कल्पना भिल्लाला होतीच आणि जंगलात तसेच घडले!
भिल्लाने खाणाखुणांनी ऋषींनी परिस्थितीची कल्पना दिली.आश्वस्त मनाने संघर्षाला तोंड देण्याची तयारी करूनच भिल्ल जड मनाने परतला.
मल्लिका आश्रमात स्थिरावली.काळाच्या पुढे विचार करणार्‍या ऋषींनी तिचेही उपनयन केले.अवैदिक मल्लिका वेदपठण करू लागली.त्याने तिचे आत्मबल आणि तेजही वाढत गेले.ती ऋषींच्या आश्रमात सुरक्षित होती तरी भिल्लप्रमुखाने तिच्या आईवडिलांना जंगलातून हद्दपार केले. त्यांनी दुर्‍सया जंगलाचा आश्रय घेतला.
कालांतराने ऋषींच्या आज्ञेने तिचा आश्रमातील क्षत्रिय युवकाशी विवाह संपन्न झाला.मल्लिकेचे आश्रमीय जीवन आता गृहिणीरूपात बदलले.तरीही तिचा अभ्यास सुरु राहिला.पतीकडेच तिने धनुर्विद्येचेही धडे घेतले.मल्लिकेच्या रूपाने एक भिल्लकन्या "वेदांची" आणि शस्रांचीही अधिकारी झाली.काही वर्षातच आपल्या छोट्या नचिकेताला पाठीशी बांधून धनुर्विद्या करताना आणि त्याला शेजारी झोपवून अन्य अवैदिक कन्यांना वेदांचे पठण शिकवणारी  मल्लिका इतिहासात अजरामर झाली आहे.