Vachak in Marathi Moral Stories by suresh kulkarni books and stories PDF | वाचक!

Featured Books
  • Wheshat he Wheshat - 2

         وحشت ہی وحشت قسط نمبر (2)   تایا ابو جو کبھی اس کے لیے...

  • Wheshat he Wheshat - 1

    Wheshat he Wheshat - Ek Inteqami Safar
    ترکی کی ٹھٹھورتی ہوئی...

  • مرد بننے کا تاوان

    ناول: بے گناہ مجرمباب اول: ایک ادھورا وجودفیصل ایک ایسے گھر...

  • مرد بننے کا تاوان

    ناول: بے گناہ مجرمباب اول: ایک ادھورا وجودرضوان ایک ایسے گھر...

  • صبح سویرے

    رجحان ہم ہمت کے ساتھ زندگی کا سفر طے کر رہے ہیں۔ کندھے سے کن...

Categories
Share

वाचक!

To be or not to be?---- ए लेखक? एकच सवाल! कुणाला? तर आधी आमुच्याच मनाला, आणि मग तुम्हा वाचकांना! कस आहे मित्रांनॊ, एक माझा अजून 'मी'च आहे. 'मी'चा आदरणीय 'आम्ही' कोणी होवू देईल असे वाटत नाही, म्हणून या लेखा पुरता माझी मला मी 'आम्ही' करून घेतलाय. दुसरे लेखाची सुरवात मुद्दाम इंग्रजीत केली, हल्ली हे खूप गरजेचं झालाय. 'मायन्या पेक्षा मथळ्याच महत्व असते!' हि आमच्या गुरुची शिकवण. (गुरु?- -पु.ल. दुसरं कोण?) त्यात आम्ही 'इंग्रजी' हि, पदरची (फटका का असेना! शेवटी तो आमचाच पदर फटका असणारच कि!) भर घातलीय. लेखन, कितीही भुक्कड करा, शीर्षक मात्र इंग्रजीतच पाहिजे! त्या शिवाय लोक वाचत नाहीत म्हणे. पण आम्ही कडवे मराठी लेखक! इंग्रजी मथळ्याची हिम्मत होईना हो! (आता हे तुमच्या पाशी कबूल करतो. कारणं तुम्ही आपलेच आहेत. नाही का?) म्हणून मग म्हटलं मथळा राहू दे डोक्यावर, आपण या लेखा पुरती सुरवात इंग्रजीत करू, असा मनाचा 'हिय्या!' केला आणि त्याचा परिणाम काय झालाय? तुम्ही पहातच आहेत. अहो, तुम्ही येथवर वाचत आलातच कि!

तर हा सवाल करण्याचे एकमेव कारण म्हणजे, एकदा का तुम्ही, 'कसे आहेत? रोज वाचतायना?' या आमच्या प्रश्नाला, 'हो SSS य !' असे कोरसमध्ये उत्तर दिले कि, आम्ही लिहायला मोकळे! 'वाचकच' नसतील तर आम्ही काय आणि कां म्हणून लिहायचे? ( पण खरे सांगू? कोणीच लेखक वाचकान साठी लिहीत नाही! ते आपला उकळणारा उन्माद कागदावर सांडून ठेवतात! विचारायला गेले तर -आम्ही आमच्या प्रतिभे प्रमाणे व्यक्त होतो! हे उर्मट उत्तर वाचकाच्या थोबाडावर फेकून देतील आणि कसबा -किंवा- कोणत्यातरी पेठेच्या, अंधाऱ्या बोळीत पायातील सपातानी, स्वतःच्याच धोतरावर चिखल उडवत बेदरकार पणे निघून जातील!---चिखलासाठी पावसाळ्याची गरज नाही! फुटक्या गटारात काम भागते! अस्तु. --- पण, मी नाही हो त्यातला! तुम्हाला माहीतच आहे म्हणा! )

जेव्हा 'मुख-पुस्तकावरी'(याला हल्ली मराठीत फेसबुक म्हणण्याचा प्रघात आहे!) 'लाईक' न देऊन, आमुची लायकी दाखवायला, वाचकांनी सुरवात केली, तेव्हा आम्ही हबकलो. भिडे खातर येणारे बदाम सुद्धा बंद होऊ लागले! मग मात्र वाचकांना -तुला पाहतो रे! -म्हणण्याची पाळी आली. मुळात 'वाचक' म्हणजे कोण? आणि काय? तसेच त्यांचे प्रकार कोणते? हे पहाणे आमच्या साठी अगत्याचे होऊन बसले.

'वाचक' या शब्दाचा अर्थ आम्ही धुंडाळायला गेलो, तर भलतेच हाती येऊ लागले. पुरुषवाचक-स्त्रीवाचक- अवाचक-जातीवाचक (या शब्दाचा भयंकर वचक आहे, फट म्हणता ब्रम्हहत्या होऊ शकते! ) -कथावाचक-कविता वाचक (येथे मात्र आम्ही भ्रमित झालो.कथा वाचत येत. कविता गेय प्रकार, मग कविता कशी वाचतात? पण हल्लीच्या सहज सुचलेल्या कविता समजायला सोडाच, पण गायला सुद्धा क्लिष्टच! बरे आहे त्या वाचल्याच जातात ते! तसेही आम्ही कवितेच्या नादी लागत नाही. (आमच्या बापाने, त्यांची तंबाखू चोरून खाताना, एक थोरली मुस्काटात मारून 'कोणताही नाद वाईट!' हा, स्वतः बार भरताना दिलेला पाठ आम्ही विसरलो नाहीत! तेव्हापासून 'नाद ' केला तरी, कोणाला समजणार नाही याची आम्ही काळजी घेतो!) हे 'वाचक'प्रकरण आमुच्या दुबळ्या कुवतीला पेलवेना! मग मात्र आम्ही, लिहलेले वाचणारा तो 'वाचक', हा आमुचाच बाळबोध अर्थ काढला आणि अश्या वाचकांचे (आमच्याच अनुभवाने) प्रकार पडले! ह्या पडलेल्या प्रकारातुन, त्यातल्या त्यात घडीव, ठोकर, ढोबळ प्रकार गोळा करून तुमच्या साठी घेऊन आलो आहोत! पहा काही परिचित आहेत का? एखादा वाण तुमच्या पसंतीस येतो का?

या संगणक विश्वाच्या आधी, जेव्हा शाळेत काळ्या फळ्यावर पांढऱ्या अक्षरात शिकवलं जायचं (हल्ली शिक्षण क्षेत्रात फळे पांढरे पडल्याचे समजते.खरे का ?') तेव्हा कागदावर छापलेले पुस्तके -काही विद्वान त्याला साहित्य म्हणत-लोक वाचत असत. तेव्हाचे वाचक मिळेल ते, मिळेल त्या ठिकाणी वाचीत. तेव्हा प्रवास जवळच्या गावचे असलेतरी, दीर्घ पल्ल्याचे असत. रेल्वेत, एसटीत बसायला जागा पण मिळायची! तेव्हा हि पुस्तके कामी यायची. प्रवासासाठी अंडरवेयर बनियान, इतकेच 'पुस्तक' सोबत घेणे गरजेचे असायचे! हल्ली जसे हेल्मेट शिवाय पेट्रोल देत नाहीत, तसे तेव्हा पुस्तक दाखवल्या शिवाय रेल्वेत तिकीट देत नाहीत, असा आमचा परवा -परवा पर्यंत समज होता! लहानपणी एकदा आम्ही, आमच्या बंडूदादाला या संबंधी विचारले होते.
"तू गावाला जाताना पुस्तक का नेतोस?"
"प्रवासात वाचायला!"
"पण तुला कुठं वाचता येत? तू तर दर वर्षी तिसरीतच नापास होतोस!"
"चूप! गधड्या! मला वाचता येत नाही हे तुला अन मला माहित. समोरच्या प्रवाशाला ( कि प्रवाशीला?) काय माहित? त्यांना आपण कसे सुशिक्षित आणि रसिक आहोत, हे दाखवायचे असते! म्हणून तर सगळं सामान पिशवीत आणि पुस्तक मात्र हातात धरायचं असत, सहज दिसेल असं! समजलास?" तेव्हा समजले नव्हते. आता मात्र समजतंय, बंडूदादा 'लाईन मारायला' पुस्तक बाळगत असे! थोडक्यात काय तर असे दिखाऊ वाचक ठायी ठायी सापडत. पण रेल्वे 'वाचक ', हा एक प्रस्तापित वर्ग आहे. त्या शिवाय का रेल्वे स्टेशन बांधायच्या आधी, xxx बुक स्टॉल उभारलेला असतो! स्टेशन मुंबईचे असो कि मिरखेलचे यावर बुकस्टॉल मात्र हिंदी पुस्तकांचाच! 'रेल्वेस्टेशन आणि हिंदी भाषा' हा भाग विशाल आहे. 'विनोदी साहित्याच्या' Ph.D साठी हा विषय राखीव असल्याचे समजले. म्हणून तूर्तास आम्हीही त्याला कक्षे बाहेरच (येथे 'कक्षा'चा अर्थ हिंदीत घेतला तरी चालेल!) ठेवला आहे! असो. तर आपण कसे(?) व्यासंगी आहोत हे दाखवण्या साठी, हे प्रवासी वाचक बसून, उभाराहून, कशालाही टेकून, सामानाच्या अंधाऱ्या बर्थ वर, डोक्याखाली हातभार उंचीची ट्रंक घेऊन, वाचू शकतात! हे वाचक, बहुतेक वेळेस रंगीत चित्रांचे पुस्तके बाळगतात. सहाजिकच आहे याना वाचण्या पेक्षा 'पहाण्यात'च ज्यास्त रस असतो! अशा दिखावू वाचकांकडे पुस्तकांचा छान संग्रह असू शकतो, पण ते दाखवण्या साठीच, स्वतः वाचणार नाहीत! विचारलेच तर 'अहो, मी फार बिझी असतो. वाचनाची आवड खूप आहे, पण वेळच मिळत नाही!' उत्तर देतील. याना कर्मदरिद्री का म्हणू नये? हा सवाल आम्हास अनेकदा सतावतो.

आम्ही स्वतः धावत्या रेल्वेत वाचण्याचा प्रयत्न केला होता. रेल्वे रुळावरून उभी सरळ चालत होती. पण आमचा डब्बा मात्र आडवा हालत होता! चाळणीतल्या गव्हा सारखे हातातले पुस्तक आडवे आडवे हालत होते. वाचणे जमेना एका ओळीतील, शेजार शेजारचे शब्द एकमेकांना मिठ्या मारू लागले! पुस्तक बंद करून खिडकी बाहेरची पळती झाडे पाहू लागलो. तेव्हा कळले, आम्ही किती अनमोल आनंद गमावणार होतो! रेल्वेचा अनुभव आम्हास शहाणपण शिकवण्यास अमळ कमीच पडला असावा. आम्ही नेटाने धावत्या बस मध्ये वाचनाचा घाट (हो, तेव्हा बस पण घाटातूनच मार्गक्रमण करत होती!) घातला. रेल्वेचा डब्बा आडवा हालत होता, बसचा लाल डब्बा उभा थडथडत होता! पुस्तकातल्या खालच्या वरच्या ओळी, एकमेकात कुंडलिनी शक्ती प्रमाणे वेटोळे घालून बसू लागल्या! तरी चिकाटीने एक एक शब्दावर नजर स्थिर करण्याचा प्रयत्न केला! एका गचक्यात हातातले पुस्तक खिडकी बाहेर उडाले, म्हणून बचावलो. दोन दिवस डोळ्यांची बुबळे तिरळी होती!

एखाद्या निवांत ठिकाणी काही वाचावे म्हणून तुम्ही एखादे पुस्तक किंवा पेपर काढून डोळ्या पुढे धरलात की, मानेचा पंचेचाळीस अंशाचा कोन करून, जेव्हा शेजारचा वाचक तुमच्या हातातल्या पुस्तकाचे/पेपरचे मलपृष्ठ वाचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला 'बांडगुळ वाचक' समजावे! या लोकांना वाचनाची दांडगी हौस असते. फक्त वाचनाचे साहित्य मात्र 'फुकटचे' लागते. याना स्वतः विकत घेतलेले पुस्तक लाभत नसावे. हि मंडळी लायब्ररी सारखा खर्चिक शोक करत नाहीत. हात उसने आणलेले पुस्तक वाचून वाचून चोथा करतील, आपल्या 'परिवाराला आणि आप्त, इष्ट मित्रांना वाचायला देऊन, शेवटी हरवून टाकतील. विचारायला गेलात तर, 'सॉरी, तुमचं पुस्तक मस्त होत. पण आता कुठं ठेवलंय ते आठवत नाही बघा. वय झालाय ना, आताशा थोडीशी स्मरण शक्ती क्षीण झालियय! (येथे सुज्ञ पुस्तक मालक आपल्या विकत घेतलेल्या पुस्तकाचे श्राद्ध घालतो!) सापडलं कि देईन हो परत! बर, तुमच्या कडचे ' स्वामी!' परवा मी पाहिलंय! पुस्तकांच्या कपाटात वरच्या बाजूला आहे! ते देता का? चार दिवसात करीन परत. वाचायला काही नसले कि बेचैन होत बघा.!' म्हणत दुसरे पुस्तक उकळतील! हा ग्रह शेजारच्या गृहात असलातरी, तुमच्या पुस्तकावर याची कायम वक्रदृष्टी असते! याची 'शांती ' होत नाही! 'देत नाही!' या मंत्राचाच 'तोड'गा करावा लागतो!

बांडगुळ वाचकाचा एक पोटभेद आहे. याना पुस्तक दुसऱ्याचे हवे, ते दुसऱ्यानेच वाचावे, याना फक्त मतितार्थ कोणी तरी सांगावा लागतो. त्या उधारीच्या माहितीवर हा चार चौघात भाव खाणार! आम्ही असेच एकदा बोलता बोलता, विठ्ठल कामतांच्या 'इडली-ऑर्केड ---' पुस्तकातले उदाहरण सांगून गेलो. चार सहा दिवसांनी त्यांनी आम्हांसच ते उदाहरण दिले!. ' एस. आर. मानलं त्या विठ्ठल कामतला! हा गृहस्थ, कोणी याच्या हॉटेलातील पदार्थ, प्लेट मध्ये न खाता टाकून गेला तर, हा तो उष्टा पदार्थ चाखून बघायचा! का? तर चवीत काही गडबड तर नाही ना? याला म्हणतात गुणवते बद्दलची जागरूकता! काल रात्री पुस्तक हाती घेतलं ते संपवूनच उठलो! दोन वाजले रात्रीचे. पण इट वर्थ! तू जरूर वाच.' आता काय बोलावे?

अत्यंत गंभीर चेहऱ्याचे (आमच्या मराठवाड्यात असल्या चेहऱ्यांना 'खत्रूड' म्हणण्याची प्रथा आहे.), हे वाचक, आपण चुकून या दरिद्री भारतात जन्मलो, असा त्रासिक भाव चेहऱ्यावर घेऊन फिरत असतात. मुळात गावरानच असतात. कारण याचा जन्म वडगाव (ब्रु !!)च्या सरकारी दवाखान्यात झालेला असतो. एकदा का खेड्यातून शहरी हवेत आला कि, हा इंग्रजी होतो! शिक्षण इंग्लिश मेडीयम मध्ये. वाचन फक्त इंग्रजी! हि जमात मायबापाला सुद्धा मराठीत बोलत नाही. सिनिमे सुद्धा इंग्रजीच पाहतील! याना चार वाक्य इंग्रजीत, शास्त्र शुद्ध ना बोलता येतात कि ना लिहता येतात. तरी इतरांना हा 'कंट्री' समजायला लागतो. खरी गोची ती इंग्रजी प्रेमाची नाही, तर 'मराठी 'द्वेषाची आहे! इंग्रजी वाचनाचा देखावा असतो तो फक्त- आम्ही तुमच्यातले नाहीत- या अट्टाहासाचा. तरी ते नका का कळेना काही तरी वाचतात. हे महाभाग मराठी माणसापासून चार हात दूरच राहतात. (दोन हात त्यांनीच आंतर ठेवलेले असते, उरलेले दोन हात आम्हीच, आमच्या तर्फे ठेवतो. लात मारण्याची शक्यता असते, म्हणून हि काळजी!) असाच अजून एक वाचकांचा गट आहे. संस्कृत वाचक! हे जरी संस्कृत वाचक असले, तरी सुसंस्कृत असतीलच याची कोणी खात्री देऊ शकत नाही! वेद, गीता, उपनिषिद्ध, असली कुरण त्यांचा साठी राखीव असतात. याना पुत्र प्राप्ती झाली कि, 'अथर्व' नाव ठेवतील. आणि कन्या रत्न पदरी पडले तर 'ऋचा' ठेवतील! वेद आणि 'उपनिषिद्धाच्या पल्याड काहीच ज्ञान, विज्ञान नाही!' हे यांचे लाडके तत्व! काहीही सांगा. 'हे काय? पाच हजार वर्षांपूर्वीच, आमच्या ऋषींमुनींनी वेदात लिहून ठेवलंय!' असे म्हणून वादाचे कुंड पेटवतील.

"असेल हो ढीगभर तुमच्या वेदात! सामन्याला काय माहित?" आम्ही एकदा त्या कुंडात उडी घेतली.
"असेल नाही, आहेच! तुम्ही वाचत नाहीत. तुम्हाला पाश्चिमात्यांनी सागितल्यावरच कळत!"
"हेच तर, आम्ही म्हणतोय! तुम्ही का नाही, आम्हा सामन्यासाठी ते वेदाचे ज्ञान मराठीत आणत?"
"तुम्हाला गरज असेल, तर शिका संस्कृत आणि वाचा उपनिषिद्धे आणि वेद! मग या चर्चेसाठी!"
" पण तुम्हास दोन्ही भाषा अवगत आहेत, तेव्हा भाषांतर-----"
"हट! त्या भानगडीत आम्ही का पडावं?" त्यांनी शेवटची आहुती टाकून यज्ञाची सांगता केली! यांचे वाचन दांडगे असते, फक्त विग्रह करून अर्थ लागत नाही आणि म्हणून तो सांगता येत नाही, इतकेच. वाचनाबद्दल शंकाच नको. अश्या प्रायव्हेट लिमिटेड वाचकांशी आम्हीच जमवून घेणे जाणो!

आमचे एक जेष्ठ स्नेही आहेत. रा.रा. संभाजीराव हे 'अखंड वाचक '! हा बाबा नेहमीच वाचत असतो. प्रत्यविधीला तोंडात तंबाकू आणि तोंडासमोर वर्तमान पत्र, हे टमारेतल्या पाण्या पेक्षा महत्वाचे असते! जेवताना सुद्धा पुस्तक हातात घेऊन वाचत वाचत जेवतो. (जेवत, जेवत वाचले तर असो!). एकदा तर बायकोने वाण सामानाची यादी, विसरून राहू नये म्हणून ताटा शेजारी ठेवली होती, तर, याने वाचण्याच्या नादात ती वरणात बुडवून खाल्ली होती! आम्ही त्यांना त्यांच्या बाल्यावस्थे पासून पहातोय, हा असाच नादाळलेला! आता इतका भयंकर वाचक म्हणजे, याच्या घरात पुस्तकांचे भांडार असेल असा समाज कोणासही होईल. पण याच्या घरात केवळ तिनच पुस्तके आहेत, दासबोध -ले. रामदास स्वामी, ज्ञानेश्वरी -ले. ज्ञानेश्वर कुलकर्णी, आणि खुनी काळापहाड!-ले. बाबुराव अर्नाळकर! तुम्ही म्हणाल, हे कसे? तर परमेश्वर दयाळू आहे. याना काय वाचले ते लक्षात रहात नाही. पुन्हा पुन्हा तेच तेच पुस्तक नव्या जोमाने वाचतात! हे एकच जातिवंत, जिवंत, आणि प्रतिनिधात्मक उदाहरण देऊन, आम्ही पुढील प्रकारा कडे वळतो.

असे वळून पहातो, तो 'न विसरणारे वाचक' दत्त म्हणून समोर उभे ठाकले! हे महाराज कधीच काहीच विसरत नाहीत! एकदा वाचले कि काळ्या पथरावरली रेघ!(यांचा वर्ण काळाच आहे, पण त्याचा येथे काहीही समंध नाही!) याला अपवाद फक्त शालेय क्रमिक पुस्तके होती! पन्नास मार्कांची जेमतेम बेगमी व्हायची! एकदा का शाळा सुटली (कायमची!) कि यांनी वाचनाचा सपाटाच लावला. सकाळी उठल्यापासून, कचऱ्यातून कागद -प्लास्टिक वस्तू गोळा करणाऱ्या बाया प्रमाणे हे आपल्या , स्मरणशक्तीच्या थैल्यात मिळेल ती वाचन माहिती भरून घेऊ लागले! आम्हास त्याचा एकदा अनुभव आला,तो असा.
" काय? रत्नाकर मतकरींच्या कथा वाचता का नाही?" त्यांनी विचारले.
"अं, हो, बऱ्याच वाचल्या आहेत." आम्ही अभिमानाने सत्य तेच सांगितले.
" 'शनचरी' कशी वाटली?"
"शनचरी?"
" मतकरीचं 'निर्मनुष्य' पुस्तक वाचल्याचं आठवतंय का?"
"हो तर, मी वाचलंय ते! "
"मग? त्यातल्याच सातेचाळिसाव्या पृष्ठावर हि कथा आहे!" आमच्या टाळूवर, एकदा नातवाने व्हानिला आईस्क्रीमचा अख्खा कप उपडा केला होता, तेव्हा असेच गार वाटले होते! स्मरणशक्ती -स्मरणशक्ती म्हणतात ती हीच!

'न विसरणारे वाचक' जेव्हा क्रूर होऊ लागतात तेव्हा, त्यांना 'ऑडिटर वाचक' म्हणावे. हे फक्त वाचलेच लक्षात ठेवत नाहीत, तर त्यातल्या चुका हुडकून काढतात! यांच्या नजरेतून चूक सुटूच शकत नाही! हे चुका हुडकण्यासाठीच वाचन करत असतात! हुडकेनात का चुका काही बिघडत नाही, पण हे त्याचा जाहीर पंचनामा करतात! एखाद्या तपस्व्याला जसा चराचरात परमेश्वर दिसतो, तसे याना सगळीकडे चुकाच चुका दिसायला लागतात! हे कसल्याच लिखाणाला चांगले म्हणत नाहीत. स्वतः कवडीचीही लिखाण न करता, फक्त टीकेचे झोड उठवण्यात याना आसुरी आनंद मिळतो! का माहित नाही. यांच्या हातून 'वा! काय मस्त लिहलंय! मजा आली वाचताना!' असा शेरा फक्त लाईट बिलाला किंवा डिक्शनरीलाच मिळू शकतो!


काहीही वाचणारा एक थोर वाचक पंथ आहे. या पंथातले वाचक, देशस्था सारखे सोशिक असतात. 'उतणार नाही, मातणार नाही, हाती घेतलेले पुस्तक वाचल्या शिवाय टाकणार नाही!' हा वसा त्यांनी वाचायला येऊ लागल्या पासून घेतलेला असतो. कोठे प्रौढी नाही, कोठे गर्व नाही, कि कोठे प्रदर्शन नाही. गुपचूप वाचन करतील, आनंद घेतील, जमेल तितका तो वाटतील, आणि आवडलेले लेखन आवडल्याचं सांगतील. आम्हा लेखकांसाठी हे दीपस्तंभच असतात. आम्ही या दूरवरच्या मिणमिणत्या उजेडाकडे नजर लावून लिखाणाचे वल्हे मारत असतो! 'भिऊ नकोस, लिहीत रहा, मी वाचीत राहीन!' म्हणून आश्वस्थ करत असतात! सुख दुःख समान मानणाऱ्या एखाद्या तपासाव्याप्रमाणे, हा कशालाच अमंगळ मानीत नाही. हा सारखा वाचतच असतो. रामायण म्हणत नाही, महाभारत म्हणत नाही, कथा म्हणत नाही, कादंबरी म्हणत नाही, हा कविता पण वाचून टाकतो! तुम्हास आश्चर्य वाटेल, पण याने त्या कुठल्याश्या 'पीठ' विजेत्या लेखकाचे साहित्य (?) पण वाचून टाकले म्हणे!! ('टाकले' या शब्दाचा जो तुमच्या मनात अर्थ घोळतोय तो मात्र येथ नाही!) हे, सामान्य (खरे तर असामान्य ) वाचका, तू असाच अधाश्या सारखा वाचत रहा! तुझ्या वाचनानेच, तुला आणि आम्हाला बळ मिळते! तुजला त्रिवार वंदन! हे, परमेश्वरा, माझ्या, या वाचकाचे डोळे नेहमी शाबूत ठेव! हेची आमुचे मागणे! ओम शांती!

घोड्याचे नशीब फुटले कि ते टांग्याला जाते, आणि लेखकाचे नशीब फुटले कि, त्याला 'मूळ वाचक' लाभतो! 'मूळ वाचक' हा, विशेषतः रहस्य कथा लेखकांसाठी एक शापच आहे! 'मूळ वाचक' हि संकल्पना, आम्ही मुळापासून समजावून सांगण्याचा यथा शक्ती प्रयत्न करणार आहोत. आपल्याला 'त ' वरून 'ताक भात' समजते, हे या वाचकाचे लाडके तत्व! विश्वात फक्त आपणच ज्ञानी, बाकीचे नालायक आणि मूर्ख! स्वतः ला लेखक म्हणवणारा हा, असे काय लिहणार आहे? जे आपण जाणत नाही! हि या वाचकाची मानसिक बैठक असते आणि तो याच बैठकीत बसून वाचतो! ( काही जण स्वतःस शहाणे समजतात, तर काही जण समोरच्याला मूर्ख समजतात!). हा बिलिंदर तुमच्या लेखनाची पहिली दोन वाक्य वाचील, साधारण विषयांची कल्पना आली, कि थेट शेवटल्या परिच्छेदाचे चार दोन शब्द! समाप्त! कथेतली लय, लिखाणातला गोडवा, लेखनाची नजाकत, कथेचं ते पॅराशूट सारखं अलगद लँडिंग ----चुलीत घाला! हा समाप्त मारून मोकळा! याला या गोष्टीच काही देणं घेणं नाही. हा चट लेखाच्या लंगोटीलाच हात घालणार! वर 'कशाला असे बेक्कार लिहतात देव जाणे?' हा शेरा! पुस्तकाच्या पहिल्या पानावर 'न वाचलेले बरे! लेखकाने असे लिह्ण्यापेक्षा, जुन्या पुस्तकाचे दुकान काढावे!' हा सही निशी शेरा!

'सारी खुदाई एक तरफ और जोरू का भाई एक तरफ ', हिंदी माजी अशी एक म्हण प्रचिलित आहे. या नुसार 'सारी लिखाई एक तरफ और 'भाई' कि लिखाई एक तरफ ', अशी परिस्थिती पु.ल.देशपांडेंनी करून टाकलीय. त्यांचा एक भरीव असा वाचक वर्ग ( वर्ग कसला आख्खी शाळाच म्हणाना!) आहे. मराठी वाचकात रामायण, महाभारत वाचणाऱ्या पेक्षा, पु.ल. वाचणारे अधिक सापडतील. आमच्या साठी ते मॉडेल लेखक आहेत. त्यांच्या वाचकाचे रेकॉर्ड अजून कोणी मोडलेले नाही. जर आम्ही मरणोपरांत स्वर्गात गेलो (ती शक्यता कमीच आहे म्हणा!, पण let us hope for better, अशी आम्ही आमच्या मनाची समजूत घालतो.) आणि भाईंची गाठ पडली तर, एक प्रश्न आम्ही त्यांना विचारणार आहोत. ' भाई, का इतके सारे लिहून गेलात? भूतलावरील भावी विनोदी लेखकांसाठी काही सोडावे, असे तुम्हास नाही वाटले का? पोटतिडकीने बिचाऱ्यानी काहीही लिहले तरी -पु.ल.ची सर, याला नाही!-हेच त्यांना ऐकावे लागते! तुम्ही सगळंच लिहून त्यांची पंचाईत करून ठेवलीय! आता तुम्हीच काही तरी त्यांना मार्ग दाखवा!'

उपरोकत चर्चिलेले सारे प्रकार 'छापील' वाचन संस्कृतीत जन्माला आलेले. त्यात या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या वाचकांची भर पडली आणि पहाता पहाता स्थिरावली सुद्धा. घरच्या चिंचेने आंबले दात अन इव्हायानी पाठवला आंबट भात, अशी परिथिती झाली. या ई SSS संस्कृतीने एका दगडात दोन पक्षी मारले. एक लेखक आणि दुसरा प्रकाशक! या वाचकांची चवच निराळी. याना शीळ पाक वाचायला नाही आवडत, रोज ताज नसलं तरी गरमागरम हवं असत. याला इटुकलं, पिटुकला, चिटुकलं वाचायला आवडत. हजार पाचशे शब्दांची पोस्ट मोठ्या कष्टाने वाचतील. आधीचा वाचक पुस्तकाच्या पानात आपले वाचन मोजायचा, हा शब्दात मोजतो! या वाचनातल्या 'काटकसरीने' आम्ही लेखक मात्र बेजार झालोयत, पण शरणांगती नाही पत्करलेली! आम्ही कादंबरीच्या कथा केल्या, कथेच्या लघुकथा केली, आतातर लघुकथांच्या 'अलक ' झाल्यात! कवितांनी सुद्धा भर्जरी नऊ वार सोडून 'चारोळ्या'च्या चड्ड्या घालायला सुरवात केलीय! काळाचा महिमा, दुसरे काय? आवडी पेक्षा सवड मोठी होते, तेव्हा असच व्हायचं! असो.

एक काळ होता महाराजे, खानदानी वाचकांचा. मस्त गादीवरल्या लोडाला टेकून, कधी घनदाट झाडाच्या सावलीत, तर कधी खिडकीच्या, किंग साईझ शहाबादी फरशीच्या ओट्यावर बसून पुस्तक वाचन व्हायचं. कुरड्या आणि आमरसाच दुपारचं जेवण अंगावर आलेलं असायचं. तोंडातल्या पानाच्या मुखरसाला, जाफरानी जर्दा गंध प्रदान करायचा अन हातातले पुस्तक मनाला धुंद करायचे. दिवे लागण झालेली कळायची नाही! संध्याकाळचा गावाबाहेरच्या मारोतीच्या देवळा पर्यंत फेर फटका, रात्रीचे जेवण झाले कि, उशाला कंदील ठेवून पुन्हा वाचन व्हायचे. अजून फक्त एकच पान !-- एकच पान असे करत करत, एक तर पुस्तक संपायचं किंवा रात्र तरी! अश्या जागवलेल्या रात्री आजही आमुच्या मनात जाग्या आहेत!

गेले ते दिन गेले. हे कळतंय तरी, 'ते' परतावेत असे वाटते. आणि ते परत येतील अशी भाबडी आशा पण आहे! कारण हल्लीची तरुण पिढी पुन्हा वाचनाकडे आकर्षित होत आहे! मग तसेच गुंतून राहणारे वाचक असतील आणि तसेच गुंतवून ठेवणारे लेखक पण आवतरतील! पुन्हा ते मंतरलेले विश्व उभे राहील!

कोणाशी दुखावण्याचा,वा कुणाच्या शेपटीवर पाय देणे हा या आमुच्या लेखनाचा उद्देश नाही. उद्देश फक्त घडीभराची करमणूक! इतकाच! जर कोणास चटका बसला असेल तर क्षमस्व!


सु र कुलकर्णी ---- आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.