AGENT - X (2) books and stories free download online pdf in Marathi

AGENT - X (2)

२.

इन्स्पेक्टर मिलींद हजारेनं त्याच्या केबिन मध्ये येऊन आपली टोपी व काठी वैतागानं टेबलवर आदळली आणि त्यानं आपल्या खुर्चीत स्वतःला झोकून दिलं.
"सातवा खून!" घाम पुसत तो समोर बसलेल्या मिस्टर वाघला म्हणाला.
मिस्टर वाघ हजारे येण्याअगोदर एक अर्धा तास आधी येऊन मस्तपैकी कांदाभजी आणि चहाचा आस्वाद घेत बसला होता.
"सिरीयल किलर?" तोंडातली भजी चावत आणि चहाचा घुटका घेत त्यानं हजारेला विचारलं.
"वाटतंय तसंच. पण प्रत्येक खुनाचा पॅटर्न वेगळा आहे. म्हणून एकाच व्यक्तीनं सगळे खून केलेत असं समोर प्रथमदर्शनी तरी वाटत नाही, पण एकाच शहरात सलग खून होतायत म्हंटल्यावर ते कोणीतरी एकटाच किंवा एक टोळी करते आहे असंच वाटतं...!"
"कन्फ्युजिंग! हं?"
"येस!"
"मी तुमचं कन्फ्युजन दूर करतो! हे कोणीतरी एकच व्यक्ती करतीये!" म्हणत मिस्टर वाघनं चहाचा घोट घेतला.
"कशावरून?" हजारेनं सावध होत विचारलं.
"खून करण्याचे प्रकार वेगळे असले, तरी सर्वांना निर्घृणपणे मारण्यात आलंय! हा मुख्य धागा विसरताय तुम्ही!"
"एक्सलेंट! तुम्ही माहिती ठेवलीय म्हणायची तर याची!" हजारे खूष होत म्हणाला.
"माझी नजर सगळ्यांवर असते हजारे!" बेरकी नजर हजारेवर ठेवून मिस्टर वाघ त्याला म्हणाला.
"म्हणूनच हे प्रकरण हाताळण्यासाठी तुम्ही योग्य आहात! माझी खात्री होती. म्हणूनच तुम्हाला बोलावलंय."
"मी काय करू शकतो यात?" मिस्टर वाघनं त्याला विचारलं.
"मी तुम्हाला हायर करतोय ही केस सॉल्व्ह करण्यासाठी?!"
"म्हणजे काम मी करणार आणि वाहवा तुम्ही लुटणार?! माझा काय फायदा?" मिस्टर वाघनं दुसरी भजी उचलली.
"मी पे करीन तुम्हाला."
"असं?" मिस्टर वाघनं उपहासानं उच्चारलं,
"माझ्या फीचा अंदाज नाही बहुतेक तुम्हाला!" तो बोलला.
"तुम्ही बोला." हजारेनं ऑफर दिली.
हजारेच्या या बोलण्यावर मिस्टर वाघ हसला.
"सात खुनांमध्ये धन्वंतरी फार्मास्युटीकल कंपनीचे दोन बोर्ड मेंबर्स आहेत. एक सबइन्स्पेक्टर, एक पोलीस प्रोसिक्युटर, एक जर्नलिस्ट, आणि दोन सामान्य नागरिक मेलेत. म्हणजे ही एक हाय प्रोफाइल केस आहे. परहेड वीस लाखच्या हिशोबाने... एक कोटी चाळीस लाख आत्ताच झाले. आणि मी हे सरासरी धरतोय. नाही तर मी मृत व्यक्तीच्या स्टेटस प्रमाणं पैसे आकारतो. पण तुमच्यासाठी थोडं कन्सेशन. पुढे जर आणखी कोणी मेले, तर ती फी वेगळी. आणि गुन्हेगारासाठी पन्नास लाख वेगळे. एक पेक्षा जास्त असतील, तर परहेड पन्नास! जमेल?"
"हो!" क्षणाचाही वेळ न दवडता हजारे बोलून गेला.
तसा मिस्टर वाघ भजी चखळण्याचं थांबला आणि त्यानं रोखून हजारेकडं पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणी हसू त्याच्या चेहऱ्यावर तरळलं.
"खूप माल दाबलेला दिसतोय!" तो म्हणाला.
"त्याच्याशी तुम्हाला कर्तव्य नाही. तुमचं काम होतंय हे महत्त्वाचं!" हजारे स्मित करत मिस्टर वाघला म्हणाला.
मिस्टर वाघनं ब्रॉड स्माईल केलं आणि हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढं केला. हजारेनं विचार न करता लगेच हात मिळवला. आणि त्याच्या लक्षात आलं, की मिस्टर वाघचा हात तेलकट आहे. त्यानं हात बाजूला घेत रूमालाला आपला हात पुसला.
"जेव्हा आता आपण मित्र झालो आहोत, तर एक विचारू? चालेल?" चहाचा घोट घेत मिस्टर वाघनं हजारेला विचारलं.
"हो!"
"यात तुमचा फायदा काय?" मिस्टर वाघनं हजारेची संमती मिळताच प्रश्न केला.
"प्रमोशन!" हजारे खूष होत म्हणाला.
"म्हणजे अजून माल ओढायला मोकळे. आता खोऱ्याने ओढताय. नंतर मग काय जेसीबीच! म्हणूनच एवढे पैसे खर्च करायला तुम्ही तयार आहात!" मिस्टर वाघनं टोला त्याला लगावला.
मिस्टर वाघच्या या टिप्पणीवर हजारे जरा नाराज झाल्यासारखा वाटला.
"आय लाईक इट! तुम्ही खूप चांगली डील करताय. तुम्हाला माहिती आहे, माणूस चुकतो कुठं? तो रिस्क घेत नाही. अहो पण रिस्क घेतल्याशिवाय मोठं होता येत नाही हे लोकांना कळत नाही. तुम्हाला ते कळलंय. आय लाईक इट! आय रियली लाईक इट!" हजारेची नाराजी दूर करण्यासाठी मिस्टर वाघ म्हणाला.
मिस्टर वाघ असं बोलल्यानंतर हजारेच्या चेहऱ्यावरील भाव निवळले व तो पुन्हा नॉर्मल झाला. त्यानं केस फाईल व आतापर्यंत झालेल्या तपासाचा रिपोर्ट मिस्टर वाघ समोर ठेवला. मिस्टर वाघ तेलकट हातानेच ते चाळू लागला.
"पुढं?" हजारेनं विचारलं.
"समोसा, कचोरी मागवा! भजीनं पोट नाही भरलं." मिस्टर वाघ म्हणाला.
यावर हजारे मिस्टर वाघकडे पाहतच राहिला.
"काय?" मिस्टर वाघने काही समजले नाही अशा अविर्भावात विचारलं. म्हणाला,
"तुम्ही बोलावल्यावर नाश्ता न करताच आलोय... दुपार झालीये, पण इथं जेवणार कसं ना? म्हणून म्हंटलं नाश्ताच करावा..."
मिस्टर वाघच्या बोलण्यावर हजारे थोडा रागावून त्याच्याकडे पाहू लागला.
"मिच्च! रागावू नका. जेवायला पुन्हा कधी तरी येईन...!" मिस्टर वाघनं त्याला अजूनच चिडवलं.

मिस्टर वाघच्या या बोलण्यावर हजारे खवळलाच. असं असून मिस्टर वाघला त्याला नाराज करायचं नव्हतं. म्हणून त्यांनं आपला राग आवरण्याचा नाकाम प्रयत्न केला.

पण त्याला जी गोष्ट माहीत नव्हती, ती मला माहित आहे. मिस्टर वाघनं त्याला जेवणाचं दिलेलं वचन तो नक्की पूर्ण करणार! इन्स्पेक्टर मिलींद हजारेच्या तेराव्याचं जेवण जेवून...!

बोट दिलं, तर हा हातच खेचतोय असं पुटपुटत त्यानं हवालदाराला बोलावण्यासाठी रिंग दिली.
"सॉरी टू से, पण तुमच्या पोलीस स्टेशन कँटीनचं खाणं बकवास आहे. समोरच्या स्वीट मार्ट मधून मागवता येईल तर बघा..."
हवालदाराने आत येऊन सल्युट ठोकला.
"नारायण स्वीट मार्ट मधनं समोसा, कचोरी घेऊन या!"
हजारे बोलत असताना रागानं त्याच्या कानशीलावरील तट्ट फुगलेली शीर उडताना मिस्टर वाघ पाहत होता आणि त्याला हसू रोखता येत नव्हतं.
"बिलाचं जरा..." मिस्टर वाघ लटक्या संकोचान म्हणाला.
"हो!" म्हणत हजारे जवळजवळ किंचाळलाचं!

खाऊन झाल्यावर जाताना हजारेच्या केबिन मधील हजारे व त्याच्यातील संवादाचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट करायला हजारेला सांगायला मिस्टर वाघ विसरला नाही.