lgnaadhi afair books and stories free download online pdf in Marathi

लग्नाआधीच अफेर्स








पहाटे तो तिच्या खूप आधी उठला होता . कॉफीचा दरवळ घरभर पसरला होता .

भांडण म्हणजे आपल्या जीवनप्रवासात काल्पनिक असा एक मैलाचा दगडच असतो . आपण भांडण करून सहज तर मोकळे होवू शकत नाही . एकतर खोल चिंतनात बुडून जातो नाहीतर त्यापासून नवीन सुरवात तरी करतोच .

त्या दोघांतही रात्री असच कडक्याच भांडण झालं होतं . किचन मध्ये कॉफीच्या दरवळत्या सुगंधासह भांड्याच्या आदळआपट केल्याचा आवाज बेडरूममध्ये झोपलेल्या अर्पिताच्या कानामध्ये घुमत होता . त्याच आवाजाने तिला जाग आली .

पहाटे पहाटे ही काय आदळआपट लावली सुयोगने म्हणून तिने चकार दुर्लक्ष करत बेसिंग गाठलं . हातात ब्रश घेतला आणि आरश्या समोर उभी राहून ती ब्रश करू लागली .

" निघा आता सकाळ झाली ... " तातकळत सुयोगचा पाठीमागून तिला आवाज आला .

तशीच मागे वळून ती म्हणाली ,

" हं .... "

तो चिडून म्हणाला ,

" इथून चालतं व्हायचं .... . "

त्याला असं वागून काय मिळतंय , हे त्याला सांगून काही समजणार होतं का ?

पण ती लगेच उतरली , " अरे पण , लग्नाची बायको आहे मी तुझी . असं वाऱ्यावर सोडल्या सारखं इथून निघ काय म्हणतोस . लग्न झालं त्या दिवसापासून मी आईबाबासाठी परकी झाली आहे माझं सर्वस्व त्यागून ह्या घरात गृहप्रवेश केला मी . जेवढं तुझं ह्या घरावर हक्क आहे तेवढंच माझं ही ... "

तो हसला आणि पटल्यासारखी मान हलवत म्हणाला ,

" तू खुशाल रहा इथे पण एकटी मीच जातो , तुझ्यासोबत एका छताखाली मी नाही राहू शकणार . "

सततच्या वादाला कंटाळून अर्पिता म्हणाली , " नको , मी जाईल कुठेही निघून ... "

तीच सामान घेऊन ती खाली उतरली . उतरताना वर एक कटाक्षाने बघितलं तिला वाटलं सुयोग गॅलरीत उभा तरी राहील आपण जाता ना , पण तो तिला निरोप द्यायला देखील आला नाही .

त्या वाढलेल्या सामनासकट ती गाडीत चढली . आणि तिचा एकटीचा प्रवास चालू झाला .

ड्रायव्हरने लागलीच विचारले .

कुठे जायचय तुम्हाला ?

आता ह्या अनोळखी शहरात तीच ओळखीचं कोणीच नव्हतं जायचं कुठे ? तिलाच प्रश्न पडला .

थोडा विचार करत ती म्हणाली ,

" समोरच्याच चौकात सोडून द्या ! "

जेमतेम सकाळचे आठ वाजले होते . तेवढं सामान गाडी मधून उतरवत ती रस्त्याच्या कडेला उभी होती . समोर एक हॉटेल तिच्या नजरेस पडलं . आपण फार काळ ह्या हॉटेल मध्ये राहू शकत नाही पण एक दिवस नक्कीच थांबता येईल म्हणून तिने एका दिवसासाठी एक रूम बुक केली . सामान नेऊन ठेवलं . आणि जवळच असलेल्या एका कॉलनीमध्ये ती रूम शोधायला बाहेर पडली .

उपाश्या पोटी तिला एकटेपण खात होतं . कॉलनीतील प्रत्येक घराच्या भिंतीला लागलेल्या प्लेटस ती बघत होती . " किरायाने घर देणे आहे . " म्हणून .

एका दोन घरचा प्लेट्स वाचून तिने दार थोटावलं पण निराशाच पदरी पडली . तिला एकटीला रूम द्यायला कोणीच तयार होतं नव्हतं .

ज्या घरावर प्लेटस लावलेली नव्हती अश्या घरी आता आपण विचारायचं . म्हणून एका टुमदार बंगल्यात ती शिरली .

एवढा मोठा बंगला असून इथे कोणी सेक्युरिटी नाही की आजूबाजूला माणसाची गर्दी नाही . किती निरव शांतता होती .

दारा समोर जाताच तिने चार पाच वेळा डोरबेल वाजवली . काहीच प्रतिसाद मिळत नाही आहे . असं बघून ती माघारी वळली एवढ्यात दार खोलल्याचा तिला आवाज आला .

जबरदस्तीने चेहऱ्यावर खोटं हसू आणणारी , नजर झुकलेली , मणक्यातून वाकलेली , पांढरेशुभ्र सोनेरी लटा असलेले केस मोकळे सोडलेली सत्तरी ओलांडलेली स्त्री अर्पिताच्या समोर दारात उभी होती .

" हॅलो , मी अर्पिता मला इथे भाड्याने एखादी रूम राहायला मिळेल का ? "

ती अर्पिताला आत घेत म्हणाली ,

" मिळेल पण पेंगेस्ट म्हणून .... " तिने हसतच चालेल म्हटलं .

" ह्या घरात मी एकटीच रहाते , पतीचं निधन झालं मला मुलं बाळ नाही . तू माझी मुलगी समजूनच ह्या घरात रहा . "

सहजच समोर फ्रेममध्ये लावलेल्या कुटूंबाकडे तिची नजर गेली . तो फोटो तिला आकर्षित करून घेत होता . आपसूकच तिची पाऊले त्या फ्रेमकडे वळली . त्या फ्रेमकडे बघून ती म्हणाली ,

" तुमचं कुटूंब तर फार मोठं दिसतंय , तरी एवढ्या मोठ्या घरात पती निधनानंतर तुम्ही एकट्या कशा ? "

तिने ऐकून आधी न ऐकल्यासारखे केले . अर्पिताने तिच्या जवळ जाऊन बसत परत तोच प्रश्न विचारला .

" एका निर्मनुष्य बेटावर एक रात्र घालवून बघ , एकटेपणा उपभोगताना नाती कशी आपल्या पासून कोसो दूर जातात ह्याचा प्रत्यय येईल तुला . "

ह्याचा प्रत्यय आताच आपण अनुभवतो आहे असं म्हणत ती त्या वयोवृद्ध स्त्रीला म्हणाली ,

" मी तुम्हाला काय म्हटलेलं आवडेल , तुम्हाला कोणत्या नावाने बोलू ? "

" मोनोमॉय ... " ती उद्गारली .

अर्पिता ठीक आहे लवकरच मी हॉटेलमध्ये सामान ठेवलेलं आहे ते घेऊन परत येते म्हणत निघाली .

त्याच दिवशी सामान घेऊन सायंकाळी ती मोनोमॉयच्या बंगल्यात रहायला आली . आता रहाण्याची काळजी तिची मिटली . आता ती नोकरीच्या शोधार्थ होती . तसं अर्पिताच बऱ्या पैकी इंग्लिश चांगलं होतं . लग्नाआधी तीच एमबीए झालं होतं काही काळ तिने नोकरी केली असल्याने तिला चांगलाच अनुभव होता . आपल्याला जॉब लवकरच मिळो ह्या प्रतीक्षेत ती होती .

कुपव्हे सारख्या पॅरिस मधील मोठ्या शहरात मोनोमॉय सारखी जवळची आपलंसं करून घेणारी मायेची माणसं ह्या जगात अजूनही आहे म्हणून आपला टिकाव आहे असं तिच्या भावुक मनाला वाटून गेलं .

मोनोमॉय तिच्यासाठी कांद्याचं सूप बनवतं होती . आता आपण काय करावं म्हणून हातात कॉफीचा मग घेऊन ती कॉफी पित खिडकीशी जाऊन बसली .

लग्न होऊन पाच महिने पूर्ण झाले नव्हते . आपण आपल्या नवऱ्याला आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगून काय चूक केली ? मान्य आहे सुयोगचं लग्नाआधी एकही अफेर्स नव्हतं पण मीही त्याचा सारखं असावं हे तो कसं काय गृहीत धरून चालू शकतो . मी त्याला वेड्यासारखी सारंच सांगत बसले माझं सात वर्षाच प्रेम पण माझ्या प्रेमाचा शेवट मला सुयोगला कधीच कळू द्यायचा नाही . कळणारही नाही का म्हणून कळावं त्याला तसही तो प्रेमाच्या विरोधात आहे . माझ्या कालच्या वागण्याला साहसी समजत मी पोरकटपणा केला . जगात कोणताच नवरा बायकोच लग्नाआधीच अफेर्स खपवून घ्यायला तयार नसतो का ? शेवटी अरेंज मॅरेज म्हटलं तर दोघांपैकी कोणीतरी शहाण असावं . मी घेतली होती समजूत पण त्याला माझं तिथे रहाणंच पसंद नव्हतं ... बायकोचं लग्नाआधीच पितळ उघड पडल म्हणजे नवऱ्याला तिच्यासोबत एका छताखाली राहणंही नकोच वाटतं . माझ्याच जागी तो असता तर . मी खपवून घेतलं असतं . का तर बायकोला खपवून घेणं भागच पडतं . शेवटी संसार सुखाचा प्रश्न ना !

माझी मी पुन्हा कोण्या पुरुषात अडकलेली सापडते आहे , असं मला वाटेपर्यंत मी पुन्हा हरवले होते त्याच्यात .. छे ! नीरजच्या जाण्याने खचून गेले होते मी .

आता आपण लग्न नाही करायचं एकट्यानेच जगायचं म्हणून ठरवलं होतं पण शेवटी घरच्यांच्या मनाचा विचार राखून लग्न करून पस्तावलेच . वाटलं सुयोग तरी समजून घेईल मला .

काश आज नीरज जवळ जाऊन धाय मोकळून रडता आलं असतं तर ....

आकाशात दिसणाऱ्या चंद्राकडे बघत ती त्याच्याशीच मनाने संवाद साधायला लागली .

" बाळ , कसला एवढा विचार करतेस ? " मोनोमॉयचा तो थरथरता आवाज ऐकून ती खडबडून जागी झाली आपल्या चक्रव्यूहातुन .

" काही नाही ... बस्स ना ! झालं पण तुझं सूप तयार . "

हातातल्या सूपचा डिश टेबलवर ठेवत मोनोमॉय अर्पिता जवळ गेली .

तिच्या डोक्यावर हात ठेवत हळूवार केसांना कुरवाळत म्हणाली ,

" काय झालं सांग तरी , मनात असा गाळ साचून ठेवू नये माणसाने . "

" मोनोमॉय , आयुष्यात कधीच चांगलं का घडतं नसावं ? "

अर्पिताकडे नजर फिरवून ती म्हणाली ," आयुष्यात खुपदा चांगलं घडतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत वाईट प्रसंगांना अधिकच अंगिकारतो . "

ती हे खरयं मोनोमॉय असं म्हणतच मोनोमॉय तिला म्हणाली ,

" बेटा , भविष्याची चिंता करून तू तुझा आज गमावू नको . वर्तमान जग उद्या काय होईल ते त्या ईश्वरावर सोडून दे . एवढंच सांगते आता स्वतः जबाबदार आणि प्रयत्नशील रहा तुझा येणारा काळ नक्कीच चांगला असेल . असं कधीच खचून जाऊ नये . "

केपच्या नेहमीच्या सकाळीसारखीच आजचीही सकाळ होती . अर्पिताने घराच्या बाहेर पाय काढला जॉब शोधायला . सूर्य प्रखरपणे उघडतंच ढग दाटून आले . स्वच्छ निळं आकाश आता काळ पांढर झालं . निसर्ग माणसांपेक्षा दीडपटीने शांत आहे म्हणतं अर्पिता आपल्या कामाला लागली . अर्धा एक तास ते ऑफिसमध्ये जाऊन जॉब बद्दल विचारपूस करू लागली शेवटी तिला यश आलेच . दोन मोठया कंपनीने तिला जॉबचे आश्वासन दिलं तर एका कंपनीने तिला तिचं कॉलिफिकेशन बघून उद्यापासून जॉईन करायला सांगितले .

खूप मुसळधार पाऊस आता कोसळणार म्हणून जीवाचा आटापिटा करत ती वेगाने चालू लागली . एवढ्यात त्या कंपनीच्या बाहेर पडताच ती सुयोगला दिसली . पण बघून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या गाडीचा गेर बद्दलवत तो विरुद्ध दिशेने ऑफिसमध्ये जायला निघाला .

हवेतला गारवा जरा वाढला . एक काळी पिवळी जीप अर्पिता समोर येऊन थांबली . त्या जीपमध्ये बसून ती घर पर्यंत पोहचली तरी पाऊस पडला नाही . ती निर्विकार नजरेने अवकाशाकडे बघत म्हणाली ,

" आज जाणवतंय स्वतः च अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी केलेली धडपड ... नाहीतर मी मृगजळामागे सारखी धावत होती . "

सुयोगला रात्री घरात आल्यावर एकटं एकटं वाटायचं . खरं तर आपल्याला मत्सराने ग्रासलं होतं ह्याची त्याला पुरती जाणीव झाली होती . तो अर्पिताचा प्रियकर जो कोणी असेल त्याचा आपण इंडिया मध्ये जाऊन शोध घ्यायाच पाहिजे . त्यांनी अर्पिताला का सोडले ह्याचा जाब विचारायला . हे सुयोगच्या कल्पनेतले मनोरे पण तो वास्तव्यापासून दूर होता .

आपल्याच विचारात मग्न असलेल्या सुयोगला दोघांनी घालवलेल्या पाच महिन्यातल्या दहा संध्याकाळ आठवल्या आणि ती शेवटची संध्याकाळ ज्या दिवशी अर्पिता त्याला आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगत होती .

सात वर्षे प्रेमपाषात अडकलेल्या अर्पिताने स्वतःवर वासनेचे शिंतोडे उडवून घेतले नाही . की कधी तिचा आपल्या पहिल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध आला नाही . ह्याचा त्याचा मनात विचार येताच तो कमालीचा निर्विकार मुद्रेने स्वतः मधल्या पुरुषाला हाक देऊ लागला होता .

नीरजला भेटण्यासाठी तो इंडियात आला . आपण जर अर्पिताच्या घरी जाऊन नीरज बद्दल विचारलं तर त्यांना शंका निर्माण होईल अर्पिताला मी सोडले म्हणून . काय करावं म्हणून त्याने नीरजच्या ठिकाणाचा कुठून कुठून शोध घेत तो त्यांच्या घरी जाऊन पोहोचला पण घरी गेल्यावर समजलं त्याच्या घरी कोणीच रहात नसल्याने . तो हतबल होऊन आपल्या घरी न जाता त्याच रात्रीची फ्लाईट पकडून पॅरिसला रवाना झाला .

सुयोगने तर मनाशी खूणगाठ बांधली आज नीरज नाही मिळाला तरी मी त्याला शोधून काढील त्याला तो गुंता सोडवायचा होता . अर्पिता आणि आपल्यात मतभेद निर्माण झाले ते आपल्या मुळेच पण अर्पिताला नीरजने का सोडले असावे ? ह्या विचारात त्याला रात्र रात्र झोप लागत नव्हती . आपल्याला अर्पिता सोबत लग्नगाठ बांधून कोणीतरी त्याची फसगत केल्यासारखं वाटू लागलं . पण अर्पिताचा कोणता दोष होता . तिच्यातला दोषच त्याला दिसतं नव्हता . आपण अर्पिता सोबत वाईट वागलो का , की योग्य समजत नव्हते .

पुढील काही महिने शांत गेले . अर्पिता आपल्या नव्या जॉब मध्ये रुळली . तिला सोबत मोनोमॉय होती . पण सुयोगचा एक एक दिवस नीरजचा शोधार्थ जायचा . काहीच त्याच्या हाती लागत नव्हत .

एकदिवस त्याने पुस्तकांची आलमारी साफ करायला काढली . त्या आलमारीत अर्पिताच्या पुस्तकांसोबतच चार , पाच भरलेल्या डायऱ्या मिळाल्या .

त्या सर्व डायरीच्या पहिल्या पेज वर त्याला टू अर्पिता असे लिहून दिसलेलं आढळताच त्याच्या लक्षात आले . ह्या सर्व डायरीज तिला नीरजने भेट दिलेल्या होत्या . त्या डायरी त्याने बाजूला ठेवून सर्व पसारा आवराआवर करतं फ्रेश होतं डायरी वाचायला सुरुवात केली .

आतापर्यतची तीस चाळीस पान उलटून गेल्यावर त्याच्या लक्षात आलं . अर्पिता आणि नीरज कधीच वेगळे होऊ न शकणारे होते . मग वेगळे कसे झाले . नीरजने तिला अकरावीत असताना केलेलं फस्ट प्रपोज . त्याच्या प्रेमाचा अर्पिताने केलेला स्वीकार . कॉलेज मध्ये नावाजलेलं अर्पिता आणि निरजच्या पहिल्या वहिल्या प्रेमाचा स्तुतिशूल्य विसर कधी कुणाला पडणार नाही तेव्हाचे किस्से . फॅन्सी गोष्टी ऐकाव्यात तसा डायरीच्या प्रत्येक पानात अर्पिताने आपल्या प्रेमाचा सखोल दावा केला होता . अगदी त्याने केलेल्या प्रपोज पासून पुढची पाच वर्षे त्याच्या सोबत घालवलेला काळ तिने डायरीत अधोरेखित करून ठेवला होता .

त्याने पंधरा दिवस जसा वेळ मिळेल तसा ऑफिसमध्ये , ऑफिसमधून घरी आल्यावर रात्री उशिरापर्यंत जागून त्या डायरी वाचून काढल्या .

डायरी वाचतांना कित्येकदा कडू गोड आठवणीने सुयोगचे डोळे पानावून यायचे , तर कधी काही प्रसंगाने तो खळखळून हसायचा .

अर्पिताने जे काही वर वर सांगितलं त्याही पेक्षा अधिक अर्पिताच निरागस रूप त्याला डायरीच्या प्रत्येक पानांत झळकत होतं .

कधीच कुणाच्या प्रेमात न पडलेल्या सुयोगला आता नीरजच्या प्रेमाचा हेवा वाटू लागला .

कोणी एवढं जीवापाड एखाद्यावर कसं काय प्रेम करू शकतं ? हा प्रश्न त्याला सारखा छळत होता .

अर्पिताने जे घडलं ते सारं काही ह्या डायरीत कोरून ठेवलं होतं . चार भिंतीच्या आत नीरज आणि अर्पिताच प्रेम कधीच बांधील नव्हतं . ती दोघेही निसर्गप्रेमी . खुल्या आसमंतात वावरणारी . एवढ्या वर्षात अर्पिताला नीरजने कोणत्याच सिनेमा बघायला नेण्याचा , शरीराचे चाळे पूर्ण करण्याचा उल्लेख केला नव्हता . तरी देखील ह्याच प्रेम निस्वार्थ स्वच्छदी आपण समजत होतो त्या पेक्षा अधिक पवित्र होतं ह्याची खात्री पटल्यावर सुयोगला स्वतःच्या शंका कुशंकाची कीव आली .

नीरजच डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं तो ते स्वप्न पूर्ण करण्यात गुंतला होता . पण त्याने आपल्या स्वप्नाला जागत अर्पिताचा कधीच विसर पडू दिला नाही . अर्पिताने एमबीए करण्याचं ठरवलं होतं . दोघेही आपल्या करीअरची वाट निवडून त्या वाटेने मार्गक्रमण करतं होते . दोघांनाही यश आलं . त्या पाचवर्षाचा काळात देखील दोघांचं प्रेम होतं तसचं ताज टवटवीत होतं .

एकूणच सुयोगला दोघांच्या प्रेमाबद्दल आदर्श वाटू लागला . सुयोगच्या चार डायऱ्या वाचून झाल्या होत्या आता त्याने पाचवी डायरी वाचायला हातात घेतली .

अर्पिताने लिहिलेल्या त्या ओळी तो वाचता झाला .

नीरज आणि माझं शिक्षण पूर्ण झालं होतं . नीरजने संधी साधून माझ्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला . पण लग्नाला घिस्टघाई करू नकोस म्हणून प्रस्ताव तर मी स्वीकारला लग्न वर्षभरानंतर करू आधी मला जॉब करू दे म्हणून नीरजकडे गळ घातली . नीरजनेही आनंदाने माझ्या निर्णयाचा स्वीकार केला .

सर्व काही व्यवस्थित चालू होतं आमच्यात . एक दिवस अचानक रात्री दीड वाजता मी झोपेत असतांना फोन खणानला . एवढ्या रात्री नीरजच्या फोनवरून अनोळखी पुरूषी आवाज आला .

" तुम्ही नीरजच्या कोण ? "

क्षणभर स्तबध रहात मी काही बोलणारं एवढ्यात पलीकडून जी बातमी कानावर पडली त्या बातमीने मी तुटून गेले . क्षणभरासाठी जग संपल्यासारखं झालं . मी तडक घराच्या बाहेर पडले . दहा वाजता नीरज मला बोलून गेला की आज मी नाईट ड्युटीवर नाही . आज घरीच आहे . उद्या मला तुला भेटल्यावर काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे एवढंच तो माझ्याशी बोलला . तेच आमचं शेवटचं बोलणं झालं ...

नीरजला त्या दिवशी सुट्टी होती तरी रात्री बारा वाजता एका इमर्जन्सी केससाठी हॉस्पिटलमधून कॉल आला . तो हॉस्पिटलमध्ये गेला . ऑपरेशन आटोपून तो घरी यायला निघाला आणि .... पुढचं वाचताच क्षणी सुयोगला अश्रू अनावर झाले . त्याने डायरी वाचणं थांबवलं .

त्याने घट्ट डोळे मिटून घेतले . कसलं तरी दुःख त्या डोळ्यांना बोचत होतं . नियतीने किती हा घनघोर वार केला त्याच्यावर . त्याच्या काळजातून नीरज हा शब्द ओठावर येत डोळ्यातून अश्रुधारा वहायला लागल्या . त्याला हे जग क्षणभरासाठी भयाण वाटू लागलं . एवढ्यात त्याचा मनात अर्पिताचा विचार आला . अर्पिता कुठे असेल ह्या वेळेस कशी असेल ?? आपण तिला समजून न घेता तिच्या प्रेमाचा तिरस्कार करत तिला घालवून दिले . किती मोठा गुन्हेगार ठरलो मी तिचा आणि ती . तिने तर आपल्या प्रेमाला गमवलं . आज कदाचित नीरज असता तर ती माझी झालीही नसती . माझ्या एवढं दुःख तिला कोणी दिलं नसेल . मला तिला माफी मागायला पाहिजे पण ती आपल्याला माफ करेल का ?

त्याने खिडकीच्या बाहेर नजर टाकली . बाहेर दाट धुक्याचा थर पसरला होता . शुभ्र पांढरा रंग वातावरणात सळमिसळीत झाला होता . रात्रभर डायरी वाचतं डोळ्यावर त्याच्या झापड होती . पण सुयोगचे पाय तीव्रतेने घराबाहेर पडण्यासाठी धडपडत होते . पायात चप्पल घालून तो शेवटी गाडीत बसलाच . रस्त्याच्या कडेला बर्फाच्छादित साम्राज्य विस्तारलेलं . ओलसर रस्त्यावरून पायदळ वाट तुडवत जावं असं त्याला न राहून वाटलं , आपलेच हात आपल्याला दिसू नये एवढं दाट धुकं अवतीभवती पसरलेलं होतं . एवढ्या मोठ्या शहरात अर्पिताला कुठे शोधू आपण . त्याचा डोक्यात लगेच प्रकाश पडला . त्या दिवशी ती एका कंपनी मधून बाहेर पडताना आपल्याला दिसली होती . आणि एकदोनदा ती त्याचं कंपनीकडे दिसली देखील पण आपण तेव्हा दुर्लक्ष केलं . ती त्या कंपनीत नोकरी तर करत नसावी ? गाडी त्याने सरळ त्या कंपनीच्या दिशेने नेली .

तो दहा पर्यंत त्याच रस्त्यावर तिची वाट बघत बसला पण ती काही आली नाही . आपण आत ऑफिसमध्ये जाऊन बघावं का असा त्याच्या मनात विचार डोकावला पण ती इथे नोकरी नसेलच करत तर तिथे जाण्याला काय अर्थ ? एवढ्यात त्याला त्याच्या ऑफिस मधून महत्वाच्या मिटींगसाठी कॉल आला . त्याला जावंच लागले . ऑफिसवर्क आटोपून तो सायंकाळी साडेसहा वाजता परत त्याचं कंपनी समोर जाऊन उभा राहिला त्याने ठरवलं आत जाऊन तिथे ह्या नावाचं कोणी आहे का विचारावं . अर्पिता त्याच ऑफिसमध्ये काम करते अस त्याला आत मध्ये गेल्यावर कळताच तो खूप खुश झाला पण ती आज ऑफिसला आली नाही असं एम्प्लॉयने त्याला सांगितलं . तिचा राहत्या घराचा अड्रेस नोट आहे का तो असल्यास तात्काळ त्याने देण्यात यावा अशी विनंती केली . त्याला अड्रेस मिळाला त्या पत्त्यावर त्याने जायचं ठरवलं .

सुयोगमुळे आपण आपल्या आयुष्यातल्या कमतरतेचा आपण शोध घेतला . त्यानेच आपल्याला नवी दिशा , नवा मार्ग दाखवला असं मनोमन म्हणत अर्पिताच्या गालावरून त्याच्यासाठी कृतज्ञतेचे अश्रू ओघळू लागले होते .

आजपर्यंत चार महिने ती त्याच्या सोबत होते आज आता एकटीच बेटाच्या शेजारी जिथे समुद्र आणि खाडी एकत्र मिळतात अश्या ठिकाणी उभी होती . समुद्र खवळत होता , लाटा उसळत जोर जोराने भिडत होत्या . पांढरा शुभ्र फेस सर्वत्र पसरत चालला होता . मोठ्या मोठ्या मध्यस्थी असलेल्या दगडाला जाऊन लाटा आपटत होत्या . आणि हे सर्व दृश्य न्याहाळत अर्पिता शांत उभी होती . केवढे स्थित्यंतर आहे ना ह्या जगण्यात आधी जमीनिशी तग धरून बसलेला समुद्राचा भाग नंतर केवळ वाळू ....

तिने खाली वाकून थोडी वाळू हातात घेतली आणि त्या कणांना तिच्या हाताच्या फटीतून निसटू दिलं ... जणू हातातून आपण आपला भूतकाळ घालवतो आहे असं तिला आल्हादायक वाटतं होतं ..

सुयोग दिलेल्या माहितीनुसार त्या बंगल्यात जाऊन पोहचला . तिथे जाताच त्याला मोनोमॉय कडून समजले ती बाहेर समुद्र किनाऱ्यावर गेली आहे .

त्याने गाडी सरळ समुद्रकिनारी न्यायचा निर्णय घेतला . गाडी बाजूला पार्क करून तो थिजलेल्या गारठलेल्या किनाऱ्यावर उतरला . दिसत काहीच नव्हतं , पण लाटांचा आवाज येत होता .

तो हळूच एका दगडापर्यत गेला . अर्पिताच्या पाठमोऱ्या आकृतीला त्याने ओळखले होते . पूर्णपणे एकटी होती ती . तेवढ्यात मागून आपल्या शेजारी पडलेल्या पुरुषी आकृतीला बघून ती दचकलेच मागे वळणार एवढ्यात तिला सुयोगने आवाज दिला ,

" अर्पिता .... "

सुयोगचा आवाज ऐकून तिला स्वप्नात त्याने आवाज द्यावा तसा भास झाला .

" तू इथे .... तुला कसं माहिती मी इथे आहे ? "

" तुझ्या ऑफिस मध्ये गेलो होतो तिथून तुझा पत्ता मिळवला , घरी गेलो तिथे कळलं तू इकडे आहे . "

ती चेहऱ्यावर हलकं स्मित आणतं म्हणाली ,

" हो .... मी कितीतरी वेळा एकांत घालवायला येथे येतं असते , इकडे आल्यापासून . "

तो स्तब्धपणे नुसताच उभा होता . किती वेळ कोण जाणे !

त्याच्या मनाची द्विधा अवस्था झाली होती . तिला सॉरी तरी कोणत्या तोंडाने बोलावं त्याने . आधीच तो तिला नकळत खूप दुखावून गेला होता .

शांततेचा भंग करत अर्पिता त्याला म्हणाली , " पण तू एवढा अस्वस्थ का दिसतो आहेस . कुठलीच गोष्ट सहजपणे समोर येत नाही रे सुयोग ह्या खवळणाऱ्या समुद्राकडे बघतो आहे .. आपलं जीवनही असचं भरती आहोटीच्या लाटा सारखं आहे . कधी खूप शांतता तर कधी रोद्र रूप धारण करणार . सतत निरंतर काहींना काही घडण्यातून आपण जगत असतो . जगण्याचे नवे आयाम शिकत असतो ... "

त्याच्या डोळ्यांतून नकळत अश्रू ओघळू लागले . त्या अश्रूंना तो लपवू शकतं नव्हता . त्याच्या बोलण्यातून शेवटी निघालंच

" मी नीरजचा खूप शोध घेतला इंडिया मध्ये गेलो होतो त्याला शोधायला . पण त्याच्या घरी कोणीच नव्हतं . तरी मनात खूणगाठ बांधली त्याला शोधून काढणारंच ... एक सांगू अर्पिता माझा सर्व इगो लयाला गेला गं तुझ्या लिहिलेल्या त्या पाचही डायऱ्या वाचून ... कदाचित सत्य सांगणं आणि ते पचवणं खूप जड जातं ते तुलाही सांगता नसतं आलं . मला जेव्हा कळलं नीरज ह्या दुनियेतच नाही तेव्हा स्वतःच्या असल्या खुळचट वागणुकीची चीड आली . माणूस कधीकधी स्वतः च्या अहंकारात अंध होतो अगं .... जसा मी . पण नीरज त्याचं तर आता काही अस्तित्व नसूनही तो मला खूप काही शिकवून गेला . "

तिला त्या डायऱ्या कधीच कुणाच्या हातेली लागू द्ययाच्या नव्हत्या , " अरे , मी डायऱ्या तिथेच विसरून आली . आणि एवढे दिवस झाले बघ डायऱ्या बद्दल डोक्यात विचारही आला नाही . मला तुला हे सत्य कधीच सांगायचं नव्हतं सुयोग ... नीरजच अस्तित्व ह्या जगातून नाहीस झालं आहे हे समजून जगणं आधी तर मला खूप अवघड गेलं . हळूहळू मी त्या घटनेतून बाहेर पडले . परत त्या घटनेचे पडसाद माझ्या मनावर बिंबवायचे नाही असं समजून मी जगायला सुरुवात केली . सामानाची आवराआवर करतांना त्या डायऱ्या जिथे मी अलमारीत एका कोपऱ्यात काढून ठेवल्या होत्या तुझ्या हाताला लागणार नाही अश्या बघ त्या तिथेच सोडून आले .... "

डायरीच्या माध्यमातून सुयोगला जे सत्य कळलं त्यामुळे तिला आणखीच अवखडल्या सारखं वाटू लागलं .

" तुझी तेव्हा काय हालअपेष्टा झाली असेल हे मी समजू शकतो , तरी मी खुप दुखावले ग तुला ... नियतीने असा घात केला आणि मीही तुला समजून घेऊ शकलो नाही . "

ते दोघे पुढे चालत राहिले . पुढे खूप शंख शिंपले विखुरलेले होते .

दोघांमधील शांतता एकमेकांना अधिकच जवळ आणत होती . तेवढ्यात सुयोग अर्पिताच हात हातात घेऊन म्हणाला ,

" तुला आठवतंय मी तुझ्यात किती खुश होतो , जेव्हा मला तू तुझ्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितलं तेव्हापासून तुझ्याबद्दल मनात तिरस्कार केला . तू निघून गेल्या नंतरही मी खुश नव्हतो . या एकटं राहण्याने अनेक गोष्टी जास्तच स्पष्ट झाल्या तुझं महत्व अधिकच कळू लागलं . उगाच माझा टोकाचा निर्णय आणि हटवादीपणा मला आयुष्यात काहीच देऊन गेला नाही . मला आता फार मागे जायचं आहे . आपल्या लग्नात ज्या आणाभाका घेतल्या त्या अनुभवायच्या आहेत . आयुष्यातली सगळी आव्हानं आपण दोघेही झेलू . खरचं साधं आयुष्य जगणंही एकट्याला अवघड वाटतंय ग ... "

त्याचं बोलणं ऐकून अर्पिताला आतातरी आपण एकटे नसल्याची जाणीव झाली .

प्रत्येक लग्नात उतार - चढाव येतातच . काही खटके उडतातच . त्यावर मात करत जोडीदाराला समजून घेता आलं पाहिजे . तेव्हाच तर सहजीवन सोबतीने घालवता येईल . आता दोघांनी एकत्र राहायचं ठरवलं .

तोही आता तिच्या वळणावर उभा होता . पूर्णत्वाच्या प्रवासाने जायला .

जुन्या स्मृतींना विसरून शांत समुद्राकाठी निशब्द रात्री एक नवीन स्नेहबंध जुळून आला होता .

समाप्त

---------------------------------

my website - komalpmankar.com

follow me on blog - komal1997mankar.blogspot.com