A Strange Thing - The Siren Calls - 10 books and stories free download online pdf in Marathi

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (10)

१०. दि ट्रुथ इज डिफ्रंट दॅन वी हॅव सीन सो फार -

"काय गंमत आहे बघ!" तो माझी विचाराची लिंक तोडत म्हणाला,
"हे सगळं घडलं, तेही अशा ठिकाणी जिथं सती मातेचं खूप महत्त्व आहे. नैनिताल, हे एकावन्न शक्तीपीठांपैकी एक! नैनी तलावातील हिरवं पाणी हे सतीच्या डोळ्यांचं प्रतीक आहे अस मानलं जातं. आपल्या पतीचा, शिवाचा आपल्याच पित्याकडून झालेला अपमान सहन न होऊन त्याच्याच यज्ञकुंडात उडी घेऊन तिनं स्वतःला भस्मिभूत करून घेतलं. भगवान शिवांनी दक्षला मारून त्याचं यज्ञ उधळून लावलं आणि तिच्या अस्थी घेऊन भ्रमिष्टासारखे ते ब्रह्मांडभर फिरू लागले. त्यांचा विषाद संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश करू नये म्हणून त्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढणं गरजेचं होतं आणि म्हणून भगवान विष्णूंनी सती मातेच्या देहावर सुदर्शन चालवलं आणि तिच्या शरीराचे तुकडे भारतवर्ष भर विखुरले. तिचे डोळे नैनिताल इथं पडले असं मानलं जातं. स्त्रीला प्रत्येक काळात त्रास सहन करावा लागला आहे..." तो गंभीर होत म्हणाला,
"पण स्त्री अबला नाही! तिनं नेहमीच प्रत्येक परिस्थितीचा धैर्यानं सामना केलाय. ती आदि आहे, तीच अपिरिमित शक्तीस्रोत आहे! ती पूजनीय आहे, ती वंदनीय आहे. स्त्री ही संसारदक्ष पार्वतीही आहे, आणि संसार संहारक काली सुद्धा तीच आहे!
"स्त्री कोणी उपभोग्य वस्तू नाही. तिचा माणूस म्हणून सम्मान झालाच पाहिजे. आणि जो कोणी तिची अवहेलना करेल त्याला मृत्यू शिवाय पर्याय नाही! रिस्पेक्ट हर ऑर शी विल डिस्ट्रॉय यू!" तो गूढ गहिऱ्या आवाजात म्हणाला.

आत्ता मला कळालं, की मिस्टर वाघ माझ्या आईला घाबरत नाही, तर तो तिचा असिमित आदर करतो. म्हणूनच तो कधी माझ्या आईच्या समोर येत नाही.
माझ्या विचारांचं चक्र दवडतच होतं. स्वतःशीच माझा संवाद चालू झाला होता...
'चाणक्य म्हणतात, की 'शिक्षक साधारण नसतो, प्रलय आणि निर्माण दोन्ही त्याच्या मांडीवर खेळत असतात'. स्त्रीला पण हीच संज्ञा लागू होत नाही काय?! असा विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला. नक्कीच होतो! शेवटी स्त्री ही देखील शिक्षकच! निर्माणाचा अधिकार तर निसर्गानं तिला आधीच दिलाय. म्हणून चाणक्य शुद्धा स्त्रीचा खूप आदर करतात, पण त्याचवेळी तेही तिच्या पासून सावध राहण्याचा सल्लाही देतात.'
'एक सुशील स्त्री घर संस्कारी करू शकते, तर दुराचारी स्त्री तेच घर धुळीला मिळवू शकते!'

आणि म्हणूनच मिस्टर वाघ एलिसला मिस सायरन म्हणाला होता. ग्रीक पुराणांत 'सायरन' नावाचे एक क्रिएचर आहे. ज्याचा चेहरा स्त्रीचा आहे आणि उरलेलं शरीर पक्षाचं. सायरन एका बेटावर राहतात व त्यांच्या बेटाजवळून कोणतं जहाज गेलं, तर सुमधूर संगीत वाजवून व गाणं म्हणून ते नावाड्यांना संमोहित करतात आणि त्यांचं जहाज त्यांना बेटावर आदळायला लावून समुद्रात बुडवून टाकतात.
'यांचा उल्लेख ओडिसी या ग्रीकच्या सर्वांत प्रसिद्ध पुराणात देखील आहे. ट्रॉयचं युद्ध जिंकून ओडिसीयस ग्रीकला परतताना त्याला दहा वर्षं लागली. याच प्रवासात सायरन यांच्या बेटाजवळून त्याला प्रवास करावा लागला होता. सायरन्सनी त्याला व त्याच्या साथीदारांना मोहित करण्यासाठी ट्रॉयवरील त्याच्या विजयाचे सूंदर कवण गायला सुरुवात केली, पण सायरन्स बद्दल आधीच माहीत असल्यानं ओडिसीयसनं याबद्दल आधीच दक्षता घेतली होती. त्यानं आपल्या साथीदारांना कानात मधमाशीचं मेण घालायला सांगितलं. त्याला मात्र सायरन्सचं गाणं ऐकायचं होतं. म्हणून त्यानं त्याच्या माणसांकडून स्वतःला जहाजाच्या खांबाला बांधून घेतलं. आणि सायरन्स त्याच्या ट्रॉयवरील विजयाचे व त्याच्या जगभरातील ज्ञानाविषयी करत असलेली स्तुती तो ऐकू लागला. त्याला त्या आवाजाच्या दिशेनं जाण्याचा मोह होत होता. तसा तो त्याला सोडण्याची विनंती त्याच्या माणसांना करू लागला, पण त्याच्या माणसांनी त्याला दरवेळेला अधिकच घट्ट बांधले. कारण त्याने आधी त्यांना तशी सूचना दिली होती. अशा प्रकारे ते सुखरूप सायरन्सच्या संकटातून बाहेर पडले.

मिस्टर वाघ गेल्यावर मी ओडिसीचा अभ्यास करत असताना एक विचार माझ्या मनाला चाटून गेला, की एलिसच्या प्रकरणात मिस्टर वाघ 'ओडिसीयस'च तर ठरला होता!
रोमन पुराणातही या सायरनचा उल्लेख आहे. पण जिथे ग्रीक मायथॉलिजी मध्ये त्यांचा देह पक्षाचा आहे, तिथे रोमन मायथॉलिजी मध्ये त्यांचे अर्धे अंग माशाचे आहे. त्यांना मर्मेड म्हणून ओळखलं जातं. या देखील आपल्या मधुर गाण्याने आणि सूंदर दिसण्याने नाविकांना संमोहून टाकतात, पण सायरन सारखं या त्यांचं जहाज नाविकांना बेटावर आदळायला लावून बुडवत नाहीत. तर त्या ते नाविक मरेपर्यंत त्यांना आपल्या बेटावरच ठेऊन घेतात. दोन्हींच्या पद्धती वेगळ्या असल्या, तरी ध्येय एकच, नाविकांची "अल्टिमेट डेथ"!

'एलिस तर दुसरं काय करत होती? तिच्या सौंदर्याने मोहून तिनं काही लोकांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं होतं... पण ती सायरन सारखी दुष्ट व क्रूर नव्हती. ती विनाकारण निष्पाप लोकांना मारत नव्हती. ती स्त्रियांवर वाईट नजर ठेवणाऱ्या नराधमांना शिक्षा करत होती...!'

मलाही नेहमी अस वाटतं, की खरंच जर ईश्वर असेल, तर त्याला त्याची 'स्त्री' ही निर्मिती खूप जवळची असणार हे नक्की! म्हणूनच तर निर्मितीचा त्याला असणारा अधिकार त्यानं स्त्रीलाही देऊ केला आहे...! स्त्री असणं स्त्रीसाठी सोहळा आहे. आणि स्त्रीच असणं हा समाजासाठी सोहळा आहे!"


"त्या लोकांचं काय झालं? ज्यांनी ओलिव्हियाशी गैरवर्तन केलं होतं?" मी प्रश्न केला. अजून काही प्रश्न अनुत्तरित होते. त्यांतील हा एक...
"एलिसनं त्या सगळ्यांना आधीच मुक्ती दिली होती." तो उत्तरला.
"म्हणजे त्या व्यक्तींबद्दल एलिसला माहिती होती?" मी आश्चर्याने विचारलं.
"नाही!" मिस्टर वाघ उत्तरला.
"मग?"
"अरे... तिनं सगळ्या ड्रग एडिकट्स व वुमनाईझर्सना संपवण्याचा निर्धार केला होता. आणि ते ती करत होती. त्यामुळे ओलिव्हियाचं शिलभंग करणाऱ्या लोकांबद्दल जाणून घेण्याची तिला गरजच नव्हती. सर्वच जण तिचे शिकार होणार होते!"
"आणि तुम्हीही तिला तेवढा वेळ दिलात!" मी नजर रोखत मिस्टर वाघकडे पाहत बोललो.
तसा तो हसला. म्हणाला,
"म्हणून मी म्हणतो, तुझ्या सारखा कोणीच मला ओळखत नाही. तुझ्यात मी स्वतःला पाहतो ते त्यासाठीच. तुझ्याकडूनच मी स्वतःला समजून घेतोय!"

खरं तर तो हे उलटं बोलला होता. उलट त्याच्या माध्यमातून मी स्वतःला पडताळत असतो. सत्याविषयीचं माझं मूल्यमापन मी याच्यामुळंच तर करण्याचा प्रयत्न करत असतो...

तो पुढं म्हणाला,
"खरं तर अनुषा माझा पाठलाग करत असतानाच ती माझ्या मागावर का आहे हे मला समजलं होतं. नैनिताल मधील सुसाईड इनसिडेंट्स न्यूज चॅनेल्स कव्हर करत होत्याच. त्यामुळं माझं लक्ष आधीपासून तिकडं लागलं होतं व त्या नुसार माझा तपासही त्या दिशेनं चालू झाला होता. जरी मी त्याच्या आधीच्या केसवर दुसऱ्या शहरात काम करत होतो, तरीही. माझ्या कॉन्टॅक्ट्स मधून मी आधीच सगळी परिस्तिथी समजून घेतली होती. पण अनुषा भेटल्यावर माझ्या इन्वेस्टीगेशन बद्दल तिला कळू न देता मी पुन्हा इन्वेस्टीगेशन मध्ये वेळ वाया घालवला, कारण एलिसला तिचं काम पूर्ण करण्यासाठी अजून वेळ मला तिला मिळवून द्यायचा होता!"

मिस्टर वाघ देत असलेलं स्पष्टीकरण ऐकून माझं डोकं अक्षरशः बधिर होत चाललं होतं. हे सगळं पचनी पडण्याच्या पलीकडचं होतं...

"एलिसला आधीच तुम्ही ओळखत होतात?"
माझा आता जास्तच गोंधळ होत चालला होता...
"नाही! आमची पहिली भेट नैनिताल मधलीच. अनुषासोबत इन्वेस्टीगेशन नंतरची."
"तरीही तुम्ही तिच्यासाठी हे एवढं सगळं केलंत?" मी विचारलं.
"तसं मी अनुषालाही मदत केलीच की! दोघीही माझ्यासाठी सारख्याच! दोघीही सत्यासाठी लढणाऱ्या. पण दोघींची तत्त्व वेगळी. मार्ग वेगळे. दोघी माझ्याशिवाय एकमेकांसमोर आल्या असत्या, तर दोघींमध्ये खूप मोठा संघर्ष झाला असता. त्यामुळं अनुषानं एकटीनं एलिसला शोधून काढलं असतं, तर तिच्या पासून एलिसला मोठा धोका होता. म्हणून एलिसला तिचं कार्य करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून अनुषाला मिसलीड करणं गरजेचं होतं. या प्रकरणात तिनं मला इनवोल्व्ह करून नाही घेतलं. मी तिला मला इनवोल्व्ह करण्यास भाग पाडलं!"
आता हे मिस्टर वाघचं जरा जास्तच होत होतं. तो असं कसं म्हणू शकतो, की त्यानं अनुषाला त्याच्याकडं येण्यास भाग पाडलं? हे कसं शक्य आहे...?
(नाही! पण शक्य आहे! मिस्टर वाघ आहे हा! याला काहीही शक्य आहे...)


"तुला विश्वास नाही. होय ना?" माझ्या डोळ्यांतील अविश्वास वाचून त्यानं मला विचारलं.
अविश्वास माझ्या चेहऱ्यावर त्याला स्पष्ट दिसत होताच.
"अनुषा एकटीच प्रायव्हेट इन्वेस्टीगेटर आहे नैतितालमध्ये. तिच्याकडे या संबंधी एखादी तरी केस जाणार हे मी ओळखून होतो. म्हणून मी माझ्या एनविस्टीगेशन प्रोफाईल संबंधी एक वेबसाईट तयार केली, जी अनुषाच्या मोबाईल व लॅपटॉप इंटरनेटवर ती सतत एक्सेस करत असलेल्या वेबसाईट्सवर फ्लॅश केली जात होती. माझ्या फ्लॅश केल्या जाणाऱ्या वेबसाईटवर माझ्या सगळ्या सॉल्व्ड् केसेसची माहिती होती. आपल्या इंटरेस्ट नुसार जाहिराती व वेबसाईट्स आपल्या नेटवर फ्लॅश होत असल्यानं तिला माझ्या योजनेचा संशय आला नाही. माझी वेबसाईट बघूनच ती मला शोधत आली. त्यामुळं, हा! माझ्याकडे मदतीसाठी येण्याचा निर्णय तिचा होता हे मात्र खरे. पण तिला माझ्यापर्यंत येण्यास मी भाग पाडलं!"
"म्हणजे तुम्ही अनुषाशी खोटं वागलात!" मी नाराजीनं म्हणालो.
माझं डोकं बधिर होत चाललं होतं...
"नाही! मी तिचा खूप आदर करतो. तिच्याशी मी खोटा कसा वागेन?! इन्वेस्टीगेशन तर मी खरंच केलं आणि तिला एलिसपर्यंत पण घेऊन गेलो. पण एक मात्र आहे! तिच्यासाठी हे युद्ध अजून संपलेलं नाही. तिथल्या ड्रग सप्लायर्स सोबत अजून तिला डील करायचं आहे. ऑफ कोर्स मी तिला मदत करणार आहे, पण ही तिची लढाई आहे. कारण तिनं आता जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे!"
"त्या एलिसला मदत करणाऱ्या पोलीस ऑफिसरचं काय केलंत?"
"तुला काय वाटतंय?" त्यानं मलाच प्रतीप्रश्न केला.
"मारलंत!"

हो! हा माझा मिस्टर वाघला प्रश्न नव्हता. स्टेटमेंटच होतं. कारण त्यानं तेच केलं असणार हे ओळखायला जास्त डोकं लावण्याची गरज नव्हती. पण यावर मिस्टर वाघचं स्पष्टीकरण झाल्याशिवाय हे प्रकरण पूर्ण कसं होईल...

"त्याला मरणं भागच होतं!" तो म्हणाला,
"तो काय न्याय्यबुद्धीनं थोडीच एलिसला मदत करत होता?! तो या बदल्यात त्याच्या वासनेची भूक भागवून घेत होता. काम झाल्यावर एलिसनं त्याला मारलंच असतं, पण म्हटलं देवभूमीत गेलो होतो, तर थोडं पुण्य आपण पण पदरी पडून घ्यावं. म्हणून मग मीच संपवलं त्याला!" तो कुत्सितपणे बोलला.
"आणि अनुषाला याबद्दल समजलं नाही?" माझी शंका अजून संपली नव्हती.
"नाही! कारण एक तर मी काय करतोय हे ती सोबत असून मी तिला समजू दिलं नाही. ती हुशार आहे. ती कधीही मला पकडू शकली असती. त्यामुळं मी अधिक सावध होतो. शिवाय केदार मेला त्यावेळी तिच्यासाठी मी नैनिताल मध्ये नव्हतोच. केदार रात्री मेला, पण त्या दिवशी सकाळी खुद्द अनुषा मला एअरपोर्टला ड्रॉप करायला आली होती. मी नैनिताल मध्ये नसल्याचे पुरावे व रेकॉर्ड्स मला तयार करावे लागणार होते. त्याआधी एलिसला पोलिसांच्या हवाली केल्यावर मी काही काळ रिलीफ म्हणून नैनिताल मध्ये राहिलो. दरम्यान माझी कार खराब झालीये असं दाखवून मी ती परत पाठवून दिली होती."
"पण ती कार तुमच्याकडं आलीच कशी?" मला हे समजलं नव्हतं. तो गेलेला तर अनुषा सोबत फ्लाईटनेच.
"नैनिताल मध्ये फिरायला आलेल्या एका धनाढ्य व्यक्तीकडून मी ती विकत घेतली होती."
त्याचं नांव तो सांगणार नाही मला माहित होतं. म्हणून मीही त्याला त्या धनाढ्य व्यक्तीचं नांव विचारलं नाही.
"ओह!" मी उद्गारलो,
"मग तुम्ही ती इकडं कशी पाठवलीत?"
"प्रायव्हेट जेटनं!" तो सहज म्हणाला.
"तुमचं प्रायव्हेट जेट आहे?" मला विश्वास बसत नव्हता.
"तुला माहीत नाही?"
"नाही" मी नाराजीनं म्हणालो,
"तुम्ही सांगितलंत कुठे?"
"सॉरी!" त्यावर तो एवढंच म्हणाला.
"मग अनुषाला पण हे माहीत झालंच नसणार?" मी विचारलं.
"तिला माहीत असतं, तर मला फ्लाईट रेकॉर्ड्सचा घाट घालता आला आता का? माझी कार एअरपोर्ट पर्यंत हेवी वेहीकल मधून गेली. त्यामुळं तिला हेच वाटलं, की ही कार आपल्या शहरापर्यंत बाय रोडच आलीए."
"ब्रिलीयन्ट! पण एक विचारू? तुमचा नक्की व्यवसाय काय आहे?" मी विचारलं.
"सांगेन कधी तरी." म्हणून त्याने विषयाला बगल दिली. पण कधी तरी सांगेल तो. शब्दाचा पक्का आहे. पण तशी परिस्थिती आल्याशिवाय तो सांगणार नाही हे नक्की!

आणि विमानानं तिच्यासमोर मी आपल्या शहरात परतलो. नंतर लगेच बाय हेलिकॉप्टर, अगेन नैनिताल!"
"एवढा खर्च फक्त एका व्यक्तीला मारण्यासाठी! का?" मला तर काही सुचतच नव्हतं.
"सूरज!" एखाद्या व्यक्तीला जागं करण्यासाठी जशी हाक मारतात तशी त्यानं मला हाक मारली. म्हणाला,
"काम महत्त्वाचं रे. ते करत असताना खर्च किती होतो ते महत्त्वाचं नाही!"
त्याच्या या उत्तरावर मी अवाक् होतो. आता या पुढं काय बोलणार?!
"मग केदारला मारलंत कसं?" मला विचारल्या शिवाय राहवलं नाही.