चैत्र पाडवा

चैत्र पाडवा-नवीन वर्ष, नवा हर्ष

वाच. आर्या आ. जोशी

भारतीय संस्कृती उत्साहाने आणि चैतन्याने रसरसलेली आहे. या संस्कृतीचे एक अविभाज्य अंग म्हणजे उत्सवप्रियता. या उत्सवाच्या आनंदाची सुरुवात होते चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून. हा दिवस गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो.

ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला सर्व सृष्टी निर्माण केली असे आपली परंपरा मानते. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे. आन्ध्रभृत्य म्हणून लौकिक असलेल्या सातवाहन राजांनी त्यांच्या विजयानंतर शालिवाहन शक सुरु केले. त्याची नव्या वर्षाची सुरुवात याच दिवशी होते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली, तिला पहिले पद मिळाल्याने ती ‘प्रतिपदा’ म्हणून ओळखली जाते असे मानले जाते. या तिथीला ‘युगादी’ तिथी असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो. चैत्र प्रतिपदेला नवीन संवत्सर सुरु होते. संवत्सरे साठ आहेत. या वर्षी ‘हेमलंबी’ नावाचे संवत्सर सुरु होत आहे.

रामाने रावणावर विजय मिळवून तो अयोध्येला सीता आणि लक्ष्मणासह परत आला. या आनंदाने भारावून जाऊन अयोध्येच्या प्रजेने घरोघरी गुढ्या उभारून हा विजय साजरा केला असे मानले जाते. मध्ययुगात हा उत्सव राजा अथवा त्याच्या अधिका-याकडून साजरा केला जात असे. सात गावांचा अधिपती असलेली व्यक्तीही हा उत्सव संपन्न करीत असे. आता आपण घरोघरी हा उत्सव साजरा करतो.

या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून, देवपूजा झाल्यावर गुढी उभारली जाते. तिला ‘ब्रह्मध्वज ‘असेही म्हणतात. या गुढीचे पूजन करणे, कडूनिंबाची पाने खाणे, दुपारी मिष्टान्नभोजन करणे, उपाध्याय अथवा जाणत्या व्यक्तीकडून नवीन वर्षाचे पंचांग समजावून घेणे असा या दिवसाचा संकेत रूढ आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे. येत्या उन्हाळ्याची ही सामाजिक गरज ! हिवाळ्याचा आल्हाददायक काल संपून जीवांची काहिली करणारा उन्हाळा आता सुरु होतो. त्यामुळे शरीराला थंडावा देणा-या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असेच आहे.

भारताच्या विविध भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोकणी लोक याला ‘संवत्सर पाडवो’ असे म्हणतात. आंध्र प्रदेशात याला ‘युगादी’ म्हटले जाते. काश्मीर मध्ये ‘नवरेह’ या नावाने हा सण साजरा होतो. सिंधी लोक ‘चेटीचंद’ नावाने या उत्सवाला संबोधतात.

लोक -संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणा-या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.

गुढी म्हणजे ‘भगवा ध्वज’ अशी संकल्पना वारकरी संप्रदायात आहे. “ माझ्या जीवाची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी |” असे संतवचन आहे. त्यामुळे या दिवशी घरोघरी भारतीय संस्कृतीची ध्वजा अशी भगवी पताका लावून तिचे पूजन करण्याचाही विचार अवश्य स्वागतार्ह आहे.

अशा या नव्या वर्षाच्या आरंभी चांगले संकल्प करावेत, जे स्वत:च्या आणि समाजाच्याही विकासाला हातभार लावतील आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्नही नकी करावा. त्यासाठी उत्तमोत्तम शुभेच्छा !

***

***

Rate & Review

Verified icon

Machhindra Mali 4 weeks ago

Verified icon

Meghana 2 months ago

Verified icon

Sudhakar Katekar 2 months ago