Mahalay sankalpna books and stories free download online pdf in Marathi

महालय संकल्पना

महालय संकल्पना

वाच. आर्या आशुतोष जोशी

भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशीला सार्वजनिक आणि काही कौटुंबिक गणपतींचे विसर्जन होते. अनंताची पूजा काही कुटुंबांमध्ये श्रद्धेने केली जाते. प्रौष्ठपदी पौर्णिमा गणेश विसर्जनाची धामधूम संपविते आणि दुस-या दिवशी सुरु होतो पितृपक्ष. भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काल हिंदू धर्म-परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. या महिन्यात सर्वसामान्यपणे शुभ कार्य करीत नाहीत, त्याविषयी बोलणी करीत नाहीत आणि खरेदीही करीत नाहीत !

मध्य प्रदेश आदी पौर्णिमान्त महिने पाळणऱ्या प्रदेशांत हा आश्विन महिन्यातील पहिला पंधररवडा असतो.. आपल्या नातेवाइकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, त्या नातेवाइकाचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. या पक्षात यमलोकातून पितर (आपले मृत पूर्वज) आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने, हा पक्ष (पंधरवडा) अशा पितृकार्याला योग्य समजला जातो. भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे. पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे.

वस्तुत: मध्ययुगात आश्विन शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्ष सुरु होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत. सातवाहन राजांनी आपल्यावर विजय मिळविल्यावर त्यांनी शालिवाहन शक सुरु केले जे चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरु होते. आपण आता चैत्र पाडव्याला हिंदू नववर्ष सुरु करतो, तथापि महालय काल आपण न बदलता तो भाद्रपदातच करतो हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे.

महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर. आपले दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांची पूजा या दिवसात केली जाते म्हणून हा काल शुभ मानला जात नाही !

भारतीय परंपरेत आपल्या दिवंगत पूर्वजांचे श्रद्धेने स्मरण-पूजन करण्याची प्रथा शतकानुशतके जोपासली गेली आहे. ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे असे याचे स्वरूप आहे. व्यक्तीच्या निधनानंतर १३ दिवसपर्यंत श्राद्धविधी केला जातो. दरवर्षी निधनतिथीला वर्षश्राद्ध केले जाते. असे असले तरी महालायात पितरांच्या पूजनाचे महत्व विशेष आहे.

महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन वगैरे विधी करावयाचे असतात. योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे सूर्य वृश्चिकराशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला महालय केला तरी चालतो. महालय श्राद्धात आपण आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण –पूजन पिंडरूपाने करतो. यामध्ये आपले दिवंगत आई- वडील, आजी, आजोबा, पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहिण, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या,सासू-सासरे, व्याही, विहीण अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतो. आपण विविध गुरूंकडून आयुष्याभर काही ना काही शिकत असतो, आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे असे आपले गुरु आणि शिष्य जे निधन पावले असतील त्यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त, आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते. याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तीना उद्देशून आपण हे श्राध्द करतो. अनेक लोकांवर निधनानंतर कोणताही संस्कार केला जात नाही. त्यांच्याप्रतीही आपण कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या नकळत झाडे तोडली जातात, कीड-मुंगी-कीटक आपल्या हातून नकळत मारले जातात. त्यांचीही आठवण आपण यावेळी करतो.सारांश,आपल्या जवळचे असोत वा दूरचे असोत, हे विश्वचि माझे घर या न्यायाने आपण सर्वच दिवंगत लोकांचे स्मरण महालय श्राद्धात करतो.

चालू वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध या पक्षातल्या चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना करतात.

अविधवा नवमी- भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी म्हणतात. या दिवशी अहेवपणी (नवरा जिवंत असताना) मृत झालेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सवाष्णीला भोजन घालण्याचा प्रघात आहे. गुजरातेत या नवमीला डोशी नवमी म्हणात.

सर्वपित्री अमावास्या-

भाद्रपद अमावास्येला मातामह श्राद्ध (वडिलांच्या आईचे श्राद्ध) असतेच, पण या शिवाय, या दिवशी ज्यांचा मृत्युदिन नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे.

जसे गणपती, गौरी यानिमित्ताने सर्व घर एकत्र येते त्याचप्रमाणे श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या एकत्र स्मरणाने आपल्याला आपला वंशवृक्ष समजतो. त्यानिमित्ताने आपण कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती करून घेतो. त्यांनी केलेली विशेष कामे, समाज व कुटुंबासाठीचे त्यांचे योगदान याबद्दल आपल्याला माहिती मिळते. त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीने आपलाही आत्मविश्वास वाढतो व आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून आपल्यालाही प्रेरणा मिळत राहते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या सामाजाची मदत घेत असतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञताही यानिमित्ताने व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळते. निसर्गातील पशु-पक्षी, झाडे यांचेही निसर्गचक्रात महत्वाचे स्थान असते. त्यांच्यामुळेही आपल्या नकळत का होईना आपण चांगल्या गुणवत्तेचे आयुष्य जगत असतो. त्यांच्याविषयी आपुलकी व्यक्त करण्याचे माध्यम म्हणूनही महालयाकडे पाहता येऊ शकेल.

आधुनिक काळातही असे अनुभवास येते की या काळात सोन्याची खरेदी, घराची खरेदी या गोष्टी करणे पितृपक्षात शक्यतो टाळले जाते. शुभकार्याची चर्चाही या काळात केली जात नाही. खरं म्हणजे आपले दिवंगत पूर्वज या काळात पृथ्वीलोकात येवून आपल्या सर्व गोष्टींचे अवलोकन करीत असतील तर आपल्या कार्याला त्यांचे आशीर्वाद लाभले आहेत असा विचार का करू नये ? ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे त्या आपल्या पूर्वजांचे आपल्या वंशजांसाठी आशीर्वाद असावेत असा सकारात्मक विचार आपण करायला हवा. श्राध्द म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. त्यामुळे पितृपक्षात सर्व दिवंगत पूर्वजांच्या सामूहिक स्मरणाची संधी अवश्य घ्यावी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.

..२..

***