Pahila Number books and stories free download online pdf in Marathi

पहिला नंबर

उद्धव भयवाळ
औरंगाबाद
पहिला नंबर
{ विनोदी कथा }
नेहमीप्रमाणे त्या दिवशी मी संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो. चहाच्या कपाऐवजी सौ.ने वर्तमानपत्र हातात देत ती धक्कादायक बातमी सांगितली. मीसुद्धा माझ्या डोळ्यांनी ती बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि चक्रावूनच गेलो. मनातल्या मनात वाडेकरांवर दात ओठ खाऊ लागलो.
धक्का देणारी ती बातमी अशी होती.
"भाग्यश्री सेव्हिंग स्कीमच्या पहिल्या सोडतीतील बक्षिस – एक टायटन रिस्टवॉच श्री वाडेकर यांना मिळाले."
अशा प्रकारच्या सेव्हिंग स्कीम्समध्ये पहिले बक्षिस पटकावण्याची वाडेकरांची ही पाचवी वेळ होती. आता मात्र मी खूपच अस्वस्थ झालो होतो. वाडेकर माझ्या परिचयाचे गृहस्थ होते. माझ्याप्रमाणेच तेही कुठल्याशा सरकारी नोकरीत होते.
एकदा काय झाले, आमच्या गावातील एका रेडिओ विक्रेत्याने एक स्कीम काढली. त्या स्कीमचे त्या दुकानदाराने शंभर सभासद केले. प्रत्येकाने दरमहा पन्नास रुपये भरायचे. असे एकूण दहा महिने पैसे भरायचे. या दहा महिन्यातील प्रत्येक महिन्यात एक सोडत काढली जाणार होती. जो भाग्यवान क्रमांक निघेल, त्याला पाचशे रुपये किमतीचा एक रेडिओ मिळणार होता. अशा प्रकारच्या स्कीममध्ये मी अद्याप भाग घेतलेला नसल्यामुळे आणि "एकदा आपले भाग्य आजमावून पाहू या" या सौ.च्या सततच्या धोशामुळे मी या स्कीमचा सभासद झालो.
पण कसचे काय नि कसचे काय!
त्या स्कीममधील पहिल्या सोडतीचे मानकरी ठरले ते वाडेकर. मी मनात म्हटलं, " कुणाचा तरी पहिला नंबर येणारच. त्यात वाडेकरांचा आला म्हणून काय बिघडलं?" पण मला मात्र त्या स्कीमचे सर्व पैसे चुकते झाल्यावरच म्हणजे एकूण दहा महिन्यांमध्ये पाचशे रुपये भरल्यानंतरच रेडिओ मिळाला.
त्यानंतर मात्र माझ्या मनात एक प्रकारची जिद्दच निर्माण झाली. अशी कोणतीही स्कीम असली की मी त्यात हटकून भाग घेऊ लागलो. पण प्रत्येक वेळी दैवाचे फासे उलटेच पडत होते. प्रत्येक स्कीममधील पहिल्या बक्षिसाचे मानकरी वाडेकरच ठरत होते; आणि मी मात्र पूर्ण पैसे भरल्याशिवाय कोणतीही वस्तू मिळवू शकत नव्हतो.
लोखंडी कपाटाची स्कीम झाली. भिंतीवरच्या घड्याळाची स्कीम झाली. स्टीलच्या भांड्यांची स्कीम झाली. पण प्रत्येकवेळी वाडेकर यांचा पहिला नंबर. अस्मादिकांचा मात्र प्रत्येकवेळी शेवटचाच नंबर लागत होता. यामुळे माझ्या मनात हळूहळू वाडेकरांविषयी द्वेषाची भावना मूळ धरू लागली. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, मला वाडेकरच दिसू लागले. ऑफिसमध्ये कामात माझे मन लागेना. घरीसुद्धा बायकोवर मी थोड्या थोड्या कारणांसाठी खेकसू लागलो. शेजाऱ्यांनी टी. व्ही. चा आवाज थोडा मोठा केला तरी तणतणू लागलो. माझ्या मनातील वाडेकरांविषयीचा सारा द्वेष लपवून आणि चेहऱ्यावर अगदी साळसूदपणाचा भाव आणून मी एकदा त्यांना म्हटलंदेखील, "अहो वाडेकरसाहेब, तुम्ही असं का करीत नाही?"
"कसं?" त्यांनी विचारलं.
"एक लाखाची विम्याची पॉलिसी घेऊन टाका तुम्ही." मी म्हटलं.
"कशासाठी?" त्यांनी विचारलं.
"म्हणजे विम्याचा पहिला हप्ता भरताच एक लाख रुपये मिळतील तुम्हाला." मी म्हटलं.
"ते कसं काय?' वाडेकरांनी विचारलं.
"अहो, कोणत्याही स्कीममध्ये तुमचा पहिलाच नंबर लागतो. तेव्हा विम्याचेही तसेच होईल!" मी म्हणालो.
माझ्या बोलण्यातील खोच लक्षात येऊनही त्यांनी माझे बोलणे हसण्यावारी नेले.
पुढे एक दिवस मी वर्तमानपत्रातली शेजारच्या शहरातील टायटन रिस्टवॉचच्या दुकानदाराची - भाग्यश्री सेव्हिंग स्किमची जाहिरात वाचली; आणि मला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. मी मनात म्हटलं, " बेट्या वाडेकर, गावातल्या गावात नंबर लावीत बैस. मी बघ आता शेजारच्या गावात सभासद होऊन पहिला नंबर पटकावतो की नाही!"
मी सौ.ला सर्व माहिती सांगितली; आणि ऑफिसला दांडी मारून शेजारच्या गावी गेलो. तेथील दुकानदाराकडून सर्व स्कीम समजून घेतल्यानंतर लगेच सभासद झालो.
पण, हाय रे दैवा, त्या स्कीमचाही निकाल आज हा असा लागला होता. वाडेकर त्या स्कीमचेही सभासद झाले होते आणि तेथेही त्यांनी पहिला नंबर पटकावला होता. यानंतर मात्र मी अशा स्कीममध्ये भाग घेणे सोडून दिले. कारण मला पक्के ठावूक झाले होते की, माझा नंबर पहिला येणे शक्यच नाही. पूर्ण पैसे चुकते झाल्यानंतरच कोणतीही वस्तू हाती पडते. त्यापेक्षा या भानगडीतच न पडणे बरे, असा शहाणपणाचा विचार मी केला. माझ्या मूर्खपणाच्या गोष्टी माझी सौ. इतरांना मोठ्या चवीने सांगत असते; आणि मला शहाणपणा शिकवत असते. पण आता मात्र मी सारा धीर एकवटून तिला ठणकावून {वगैरे, वगैरे} सांगितलं, " आजपर्यंत तुझ्या मूर्खपणामुळेच मी अशा स्कीममध्ये भाग घेत गेलो. आता इथून पुढे मात्र असल्या कोणत्याही स्कीममध्ये मी भाग घेणार नाही." आणि तेव्हापासून असल्या स्कीमचा मी नादच सोडला.
या सर्व गोष्टींना आता बरेच दिवस उलटून गेले. हळूहळू मी या सर्व स्कीम्स, वाडेकरांचा पहिला नंबर वगैरे सर्व विसरून गेलो; आणि पहिल्यासारखाच ऑफिसच्या कामात रममाण होऊ लागलो. घरी बायकोशी बरा बोलू लागलो. शेजाऱ्यांनी वाचायला म्हणून नेलेली माझी पुस्तके तिकडेच गडप केली तरी पहिल्याप्रमाणेच सुहास्य मुद्रेने मी त्यांना नवीन पुस्तके वाचायला देऊ लागलो.
असाच एक दिवस मी ऑफिसमधून संध्याकाळी घरी परत येत असतांना मला कुणीतरी हाक मारली म्हणून मी मागे वळून पाहिले तर आमच्या कॉलनीतील देशमुख दिसले. त्यांनीच मला हाक मारली होती. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला विचारले,
"फार घाईत दिसता तुम्ही. होय ना?"
"तसं काही नाही. आत्ताच ऑफिस संपलंय. घरी चाललोय." मी म्हटलं.
"घरी नंतर जा हो. मलाही तिकडेच जायचे आहे. त्याअगोदर मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. माझ्यासोबत या." देशमुख म्हणाले. देशमुख काय गंमत दाखवतात या कुतुहलामुळे मी त्यांच्या मागोमाग चालू लागलो. त्यांनी गावाच्या अगदी टोकाला असलेल्या अति सुसज्ज अशा फर्निचरच्या दुकानात मला नेले. दुकान अगदी नवीनच होते. स्टीलची कपाटे, रेफ्रिजरेटर्स, सोफा कम बेड्स, वॉशिंग मशीन्स वगैरे भारी वस्तूंचे ते दुकान होते. त्या दुकानदाराने आमचे हसतमुखाने स्वागत केले. दुकान नवीनच असल्याने गावात चांगला जम बसावा या दृष्टीने त्या दुकानदाराने रेफ्रिजरेटरची एक स्कीम सुरू केल्याचे मला तिथे कळले. चारशे रुपये महिन्याप्रमाणे एकूण चोवीस महिन्यांची ती योजना होती. दर महिन्यास एक सोडत काढून भाग्यवान क्रमांकास एक फ्रीज मिळणार होता. देशमुख आदल्या दिवशीच त्या स्कीमचे सभासद झाले होते; आणि मलाही सभासद होण्यासाठी आग्रह करीत होते.
अशा स्कीम्समधील माझा पूर्वानुभव आणि चारशे रुपये महिन्याचा हप्ता झेपेल किंवा नाही याविषयीची शंका, या गोष्टींमुळे मी त्या स्कीममध्ये भाग घेण्यास नाखूष होतो. पण देशमुखांनी मला "बचतीची सवय आणि फायदे" या विषयावर व्याख्यान देऊन त्या योजनेचा सभासद होण्यास भाग पडले. वाडेकरही त्या स्कीमचे सभासद असल्याचे समजले.
त्यानंतर मी त्या योजनेत सुरुवातीचे तीन महिने नियमित हप्ते भरले. पण पुढे हप्ता जाऊन उरलेल्या पगारात इतर खर्च भागविणे कठीण होऊ लागले. त्यामुळे एक दिवस मी त्या दुकानदाराकडे जाऊन सर्व परिस्थिती सांगून पुढचे हप्ते देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. तेव्हा तो म्हणाला,
"आपण आतापर्यंत भरलेले तीन हप्त्यांचे पैसे स्कीमच्या शेवटी म्हणजे चोवीस महिन्यांच्या शेवटी परत मिळतील." हे ऐकल्यानंतर "या निमित्ताने तरी आपली बाराशे रुपये गुंतून बचत झाली." या समाधानाने मी घरी परतलो. पुन्हा त्या दुकानाकडे फिरकलोच नाही.
मध्यंतरी बरेच दिवस माझी आणि वाडेकरांची भेट झालीच नाही. फ्रीजची स्कीम सुरू होऊन एव्हाना दीड पावणेदोन वर्षे झाली होती.
आणि एक दिवस अचानक मला वाडेकर भेटले. त्यांचा चेहरा अत्यंत रडवेला झाला होता. मला थांबवून ते सांगू लागले, "कुलकर्णीसाहेब, मी पुरा लुटला गेलो. माझं नशीबच फुटलं."
त्यांच्या तोंडून अशी वाक्ये ऐकून मी आश्चर्यचकित झालो. पहिल्या क्रमांकाचा नशीबवान म्हणून ओळखला जाणारा हा माणूस असे काय म्हणतोय ते मला कळेना. तेव्हा मी त्यांना विचारलं," अहो, झालं तरी काय असं?" तेव्हा ते सांगू लागले," रेफ्रिजरेटरच्या स्कीममध्ये जसे तुम्ही मेम्बर होते, तसा मीही होतो. पोटाला चिमटा घेऊन चारशे रुपया महिना मी त्या स्कीममध्ये भरीत होतो. तुम्ही आणि तुमच्याप्रमाणेच इतर सभासदही आर्थिक अडचण पुढे करून सुरुवातीपासूनच गळत गेले. हे मला समजले. पण रेफ्रिजरेटरच्या लोभापायी मी मात्र नेटाने त्या स्कीममध्ये पैसे भरीत होतो. काल मी त्या स्कीमचा एकविसावा हप्ता भरण्यासाठी म्हणून त्या दुकानात गेलो. पाहतो तर काय, त्या दुकानात फर्निचरचा लवलेशही नव्हता. सर्व वस्तू गायब. तो दुकानदारही गायब. चौकशी केली तेव्हा समजले की, तो दुकानदार सर्वांना चकवून रातोरात गाशा गुंडाळून पळून गेला. हे ऐकताच मला तर धक्काच बसला. सर्वांपेक्षा जास्त हप्ते मीच भरले होते. सर्वांपेक्षा जास्त मीच लुटला गेलो. माझी आठ हजारांची चोरीच झाली जणू."

वाडेकरांची ही हकीकत ऐकून माझे तीन हप्त्यांचे पैसे बुडाल्याचे दु:ख एकदम कमी झाले; आणि त्यांचे वीस हप्त्यांचे आठ हजार रुपये बुडाल्याचा मला मनातल्या मनात खूप आनंद झाला. त्यांच्या रडवेल्या चेहऱ्याकडे पाहात मी म्हटलं, "अहो वाडेकर, असे नाराज कशाला होत आहात? प्रत्येक स्कीममध्ये पहिला नंबर मिळवणारे तुम्ही. याही स्कीममध्ये तुमचाच पहिला नंबर आलाय."
वाडेकर म्हणाले, "तो कसा काय?"
"अहो वाडेकर, सर्वांपेक्षा जास्त पैसे तुमचेच बुडाले. पहिल्या क्रमांकाचे बळी तुम्हीच झालात. द्या टाळी."
असे म्हणून ही आनंदाची बातमी सौ.ला सांगण्यासाठी मी घराकडे धूम ठोकली.
*******


उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड
शहानूरवाडी
औरंगाबाद ४३१००५
मोबाईल: ८८८८९२५४८८
email: ukbhaiwal@gmail.com