Bayko, Shopping aani mi books and stories free download online pdf in Marathi

बायको, शॉपिंग आणि मी

उद्धव भयवाळ 
औरंगाबाद 
  बायको, शॉपिंग आणि मी 
बायकोसोबत [अर्थात स्वत:च्या, गैरसमज नसावा म्हणून हा खुलासा] शॉपिंग करणे म्हणजे किती कठीण काम असते हे तमाम नवरेमंडळींना चांगलेच ठावूक आहे. नवरा म्हणवणाऱ्या जवळपास सर्वच महाभागांनी या शॉपिंगचा "चांगलाच" अनुभव घेतलेला असणार आहे यात मला तिळमात्र शंका नाही. मी तर खात्रीने सांगतो की, पूर्व जन्मीचे काहीतरी पाप केलेल्या पुरुषांच्या नशिबीच हे असले भोग येत असावेत. बायकोसोबत कुठल्याही प्रकारच्या शॉपिंगला जाणे हे महा कर्मकठीण, क्लिष्ट आणि क्लेशदायक काम असते असे माझे स्वानुभवाने ठाम मत बनले आहे. त्यातल्या त्यात एखाद्याला जर बायकोसोबत साड्यांच्या दुकानात खरेदीसाठी जाण्याचा प्रसंग आला तर त्या बिचाऱ्याची कंबक्ती आली म्हणून समजावे. 
बायकोसोबत शॉपिंगला जायचे म्हटले की, माझ्या पोटात गोळाच उठतो. माझे बायकोसोबत शॉपिंगला जाणे म्हणजे ती तरातरा पुढे अन् मी ओढ्ल्यागत अनिच्छेने तिच्या मागेमागे. माझ्या बाबतीत घडलेला एक प्रसंगच सांगतो. असेच एकदा आम्ही दोघांनी तिच्यासाठी साड्या खरेदी करण्यासाठी जाण्याचे ठरवले. {या ठिकाणी "आम्ही दोघांनी" याचा खरा अर्थ असा आहे की, नेहमी शॉपिंगचे तीच ठरविते आणि मी फक्त 'मम' म्हणून ती नेईल त्या दुकानात तिच्या मागेमागे जातो. या ठिकाणी एक वाक्य आठवले म्हणून सांगण्याचा मोह होतोय. कुठेतरी मी "फादर इज अ नॅचरल बँकर" असे इंग्रजी वाक्य वाचले होते. मुलांच्या हट्टापुढे हात टेकलेल्या कुण्यातरी अगतिक बापाचे ते वाक्य असावे. खरे तर ते वाक्य "हजबंड इज अ नॅचरल बँकर" असे असायला हवे, असे मला सतत वाटत असते. कारण बायकोसोबत दुकानात जायचे म्हटले की, नवऱ्याचा खिसा बराच गरम पाहिजे.} आम्ही एका कपड्यांच्या दुकानामध्ये शिरलो. तिथे गेल्यावर त्या दुकान मालकाने आमचे हसून स्वागत केले. नंतर साड्यांच्या सेक्शनमध्ये गेल्यावर तिथल्या सेल्समनने अगदी नम्रपणे आम्हाला बसण्यास सांगितले आणि कुठल्या प्रकारची साडी हवी ते विचारले. सौ.ने सांगितले, "असं करा, आधी कांजीवरममधली दाखवा. मग नंतर सांगते." त्या सेल्समनने चारपाच रंगांच्या कांजीवरम साड्या दाखवल्या. पण बाईसाहेबांना एक पसंत पडेल तर शपथ. मग एका रॅककडे बोट दाखवीत ती म्हणाली, "त्या रॅकमधली ती वरून तिसऱ्या लाईनमधली अबोली कलरची दिसतेय ना, ती साडी दाखवा." ती पसंत नाही पडली म्हणून 'ही दाखवा', 'ती दाखवा' असे करीत अनेक साड्या पाहून झाल्या. पण 'या साडीचा पदर खास नाही', 'त्या साडीचा पोत चांगला नाही' अन् 'त्या साडीचा रंग बरोबर वाटत नाही, फारच भडक वाटतोय' असे म्हणून एकही साडी पसंत केली नाही. तिचे "साडी पसंती पुराण" चालू असतांना मी आपला इतर ग्राहकांवरून सहज नजर फिरवू लागलो; तर खसकन माझा हात ओढून जवळजवळ ओरडलीच. "अहो, ही साडी बघा ना कशी वाटते ती? किती वेळची विचारतेय मी तुम्हाला? लक्ष कुठेय तुमचं?" मी तर दचकलोच. मग मी उगी आपलं तिने पुढ्यात टाकलेल्या साडीला हात लावून "अरे वा, छानच आहे" असं म्हटलो. पण ती साडीही  "क्वालिटीच्या मानाने भाव फारच वाटतो या साडीचा" असे म्हणून सौ.ने बाजूला टाकून दिली. प्रत्येक साडीमध्ये ती काही ना काही खोट काढीतच होती. अनेक वेळा असे झाल्यावर शेवटी, जवळपास दोन तासांमध्ये दहा वीस वेळा उठबस करून शंभरपेक्षा जास्त साड्या दाखवणाऱ्या सेल्समनचा अंत पहायचा म्हणून की काय, त्या सर्व साड्या पाहून झाल्यावर बाईसाहेब म्हणतात की, "इथे साड्या बरोबर दाखवत नाहीत. चला, दुसऱ्या दुकानात बघू या." तिचे हे शब्द नक्कीच त्या सेल्समनच्या काळजाला चिरीत गेले असतील याची मला खात्री आहे. कारण त्या सज्जन सेल्समनचा चेहरा खरकन् उतरलेला मी पाहिला. माझीही अवस्था काही वेगळी नव्हती. पण हे काहीच तिच्या गावीही नव्हते. निघतांना मी पुन्हा त्या सेल्समनकडे पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो हाताने खूण करून मलाच बोलावीत होता. बायको दुकानाच्या बाहेर पडते आहे हे पाहून मी पटकन त्या सेल्समनच्या जवळ गेलो. तर तो हळू आवाजात मला म्हणू लागला, " माफ करा साहेब, पण बाईसाहेबांना साडी घ्यायचीच नव्हती असेच दिसते. फक्त टाईमपास करायला त्या दुकानात आल्या होत्या असेच वाटले मला तरी. पण एक लक्षात ठेवा साहेब, त्या पुढच्या कापडदुकानात जर तुम्ही त्यांना घेऊन जाणार असाल तर तुम्ही दुकानाच्या बाहेरच थांबा. कारण बाईसाहेबांनी तिथेही असाच टाईमपास केला तर त्या दुकानाचा मालक पाणउताराच करील त्यांचा. मग तुमच्या सौ.सोबतच तुमचाही अपमान करील तो माणूस. कारण तो आमच्या मालकांसारखा सरळ स्वभावाचा नाही. तुम्ही भोळे वाटता म्हणून मी आपलेपणाचा हा सल्ला दिला. बाकी काही नाही." 
त्या सेल्समनच्याप्रती सहानुभूती व्यक्त करीत मग मीही त्याला म्हटलं," तुम्हाला बराच त्रास झाला साड्या दाखवण्याचा. त्यामुळे सॉरी म्हणतो मी तुम्हाला." तेव्हा तो म्हणाला, "आमचं सोडा हो, आम्हाला सवय असते अशा ग्राहकांची. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ." असा एकमेकांच्या सांत्वनाचा कार्यक्रम झाल्यावर मी तिथून बाहेर पडलो आणि सौ.ला विचारले,"आता पुढचा हुकुम काय?" तेव्हा ती म्हणाली, "आपला खूपच वेळ गेला इथे. पोटात कावळे ओरडायला लागले. आता घरीच जाऊ. परवा रविवारच आहे. तेव्हा पुन्हा दुसऱ्या एखाद्या दुकानात बघू साड्या." तिच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडताच मी तर मनातल्या मनात परमेश्वराचे खूप आभार मानले आणि "ब्याद टळली एकदाची" असे मनातल्या मनात म्हटलो. मला त्यावेळी किती आनंद झाला त्याचे मी वर्णन करू शकत नाही. "दिलमे लड्डू फुटना" म्हणजे काय असते ते मी अक्षरश: अनुभवले त्यावेळी.
असाच मागेसुद्धा एकदा मी बायकोसोबत साड्यांच्या दुकानात गेलो होतो. त्या दुकानात जवळजवळ अडीच तास घालविल्यानंतर आणि शंभरपेक्षा जास्त साड्या बघितल्यानंतर आमच्या बाईसाहेबांनी एकदाची एक साडी पसंत केली. त्यामुळे मी मनातल्या मनात "हुश्श" केले आणि तिला बरे वाटावे म्हणून म्हटले, "छान वाटतो हा हिरवा रंग. नाही का?" तेव्हा ती ताडकन म्हणाली, "इश्श, हा काही हिरवा रंग आहे का? हा तर पिस्ता कलर आहे. मला खूप आवडली ही साडी म्हणून पटकन पसंत केली." 
"पटकन?" {अर्थात हे मी मनातल्या मनात म्हणालो.}
सौ.ला एकदाची साडी पसंत पडली आणि माझी पायपीट वाचली म्हणून मी, आणि मनपसंत साडी मिळाल्यामुळे ती, असे आम्ही दोघेही अगदी खुशीत घरी आलो.
थोड्या वेळेनंतर सौ.ने शेजारच्या चित्रेकाकूंना हाक मारून आनंदाने ती साडी त्यांना दाखवली.
 "केवढ्याची आहे?" चित्रे काकूंचा प्रश्न.
"दोन हजार दोनशे रुपये." सौ.ने थाटात सांगितले.
काकूंनी साडी खालून, वरून निरखून बघितली आणि काकू म्हणाल्या,
" तू काही म्हण, पण किमतीच्या मानाने पोत काही बरोबर नाही या साडीचा; आणि हा रंगसुद्धा तुझ्या अंगावर उठून दिसणार नाही, उर्मिला. त्यापेक्षा लेमन कलर शोभला असता तुला." काकूंचे हे बोलणे ऐकून सौ.चा चेहरा खर्रकन उतरला. कारण चित्रेकाकूंवर माझ्या बायकोचा शंभर टक्के विश्वास. काकूंना साडी पसंत नाही म्हणजे साडीच चांगली नाही अशी तिची पक्की खात्री झाली. काकू तर त्यांचे मत देऊन निघून गेल्या. पण नंतर साडी बदलून आणण्यासाठी बायकोने माझा असा पिच्छा पुरवला म्हणता. खरे म्हणजे एकदा विकत आणलेली वस्तू परत करून,  बदलून आणायची म्हटले की मला घाम फुटतो. कारण या साऱ्या भानगडीमध्ये फार वेळ जातो. त्यात बायको जर सोबत असली तर मग विचारूच नका. अख्खा दिवसच जातो त्या दुकानात
ये, जा, करून आणि दुसरे म्हणजे त्या दुकानदाराला काय वाटेल याची मला सतत काळजी वाटत राहते. मी तिला म्हटले, "अगं, सात दिवसाच्या आत देतात बदलून. आपण उद्या परवा जाऊ आणि साडी बदलून आणू." पण कसचे काय नी कसचे काय. माझा हा बार फुसका निघाला आणि त्वरेने मला आल्यापावली बायकोसंगे त्या दुकानात परत जावे लागले. महत्प्रयासाने काकूंनी सांगितली तशी साडी मिळाली, सौ.ला पसंतही पडली आणि माझा जीव भांड्यात पडला. 
बायकोसोबतच्या माझ्या शॉपिंगच्या अशा सुरस आणि चमत्कारिक कथा भरपूर आहेत. एखाद्या मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्यावर तर विचारूच नका. माझ्या बायकोला जणू माहेरीच आल्यासारखे वाटते. जी वस्तू समोर दिसेल ती ट्रॉलीमध्ये टाकायची आणि ट्रॉली गच्च भरल्याशिवाय खरेदी थांबवायचीच नाही असेच जणू तिने ठरविलेले असते. मग त्यामध्ये खऱ्या गरजेच्या वस्तू किती आणि नुसता फापटपसारा किती याचे काही मोजमापच नसते. त्यामुळे मॉलमधल्या प्रत्येक खरेदीनंतर घरी गेल्यावर 'हे विसरलं' अन् 'ते विसरलं' असं म्हणून पश्चाताप करण्याची पाळी येते. त्याचप्रमाणे काही बिनकामाच्या वस्तूंची खरेदी झाली असे लक्षात आल्यावर  "या वस्तूंची काही गरज नव्हती. उगीचच आणल्या". असा सौ.ला साक्षात्कार होतो.
असाच एकदा मी बायकोच्या हट्टापायी तिच्यासोबत एका गृहोपयोगी आणि फॅन्सी वस्तूंच्या प्रदर्शनात गेलो तेव्हा तर गम्मतच झाली. त्या प्रदर्शनात एका स्टॉलच्या बाहेर "लसूण छिलण्याचे यंत्र, फक्त वीस रुपये " असा एक बोर्ड लावलेला होता. कुतूहल म्हणून आम्ही तिथे गेलो तर एक आठ इंच लांबीची आणि चार इंच परिघाची रबरी नळी हातात घेऊन त्याच्या आतमध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून तो दुकानदार जोरजोराने रगडत होता आणि तोंडाने म्हणत होता, "लसूण छिलण्याचे यंत्र फक्त वीस रुपये". ती एक साधी नळी होती. त्यात यंत्र वगैरे काहीही नव्हते. पण सौ.ला त्याचेही खूप अप्रूप वाटले आणि माझी इच्छा नसतांनाही ते "यंत्र" आम्हाला विकत घ्यावे लागले.
आमच्या कॉलनीमध्ये अनेक फेरीवाले अधूनमधून येत असतात. एखादा फेरीवाला काही वस्तू विकण्यासाठी आमच्या कॉलनीत आला रे आला की, त्याचा आवाज बरोब्बर माझ्या बायकोला ऐकू येतो. मग काय, त्याच्याकडून काहीतरी वस्तू माझ्या बायकोने विकत घेतलीच म्हणून समजा. मग ती वस्तू कितीही महाग पडली तरी चालेल. थोडक्यात काय तर दारावर येणाऱ्या एकाही फेरीवाल्याला ती रिक्तहस्ते परत पाठवित नाही. अशावेळी जर मी तिच्या लक्षात आणून दिले की, "जी अमुक एक वस्तू तू फेरीवाल्याकडून विकत घेतलीस तिचा इतका भावच नाही. त्या फेरीवाल्याने ती वस्तू जास्त किमतीमध्ये तुझ्या माथी मारली आणि तुझी फसवणूक केली." तर तिचे उत्तर ठरलेले असते. ते म्हणजे, "आपल्या घरापर्यंत ती वस्तू आयती चालून येते तर ती थोडीबहुत महाग तर पडणारच." आता बोला. 
आणखी जास्त काही बोलायला गेलो तर "माझं मेलीचं तुम्हाला काहीच पटत नाही." असे म्हणून ती आरडाओरडा करून सारे घर डोक्यावर घेणार आणि शेवटी अश्रू नावाचे ब्रह्मास्त्र काढणार. तिच्या त्या ब्रह्मास्त्राला मी खूप घाबरतो. त्यामुळे कपाळाला हात मारून घेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नसतो. 
तुम्हाला मी खोटे सांगत नाही. कधीकधी तर असा विचार माझ्या मनात येतो की, या अशा बाईशी माझे लग्नच का झाले? आणि त्याच्याही पुढे जाऊन कधी कधी असा टोकाचा विचार येतो की, मी जन्मालाच का आलो? या बाईशीच माझी जोडी परमेश्वराला लावायची होती तर मी जन्मलोच नसतो तर किती बरे झाले असते. पण म्हणतात ना, आलीया भोगासी असावे सादर. दुसरे काय!!
पण इतके सारे असले तरी, वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी ती जेव्हा श्रद्धेने आणि भक्तीभावाने वडाच्या झाडाला फेऱ्या मारतांना "जन्मोजन्मी मला हाच पती मिळू दे" असे निरागसपणे म्हणते तेव्हा मात्र मलाही परमेश्वराला प्रार्थना करावीशी वाटते की, पुढच्या जन्मी मला हीच पत्नी मिळू दे. कारण "तेढी है पर मेरी है."
**************


     उद्धव भयवाळ 
     १९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी 
     गादिया विहार रोड 
     शहानूरवाडी 
     औरंगाबाद ४३१००५ 
     मोबाईल: ८८८८९२५४८८
           email: ukbhaiwal@gmail.com