Baburavanchya jhopechi chittarkatha books and stories free download online pdf in Marathi

बाबूरावांच्या झोपेची चित्तरकथा

उद्धव भयवाळ
औरंगाबाद
बाबूरावांच्या झोपेची चित्तरकथा
मध्यंतरी एका रविवारी सकाळी सकाळी माझे साहित्यिक मित्र बाबूराव माझ्याकडे आले. त्यांच्या डोळ्यांकडे पाहून मी समजून चुकलो की काल रात्री त्यांची झोप झालेली दिसत नाही आणि त्या झोपेबद्दलचे गाऱ्हाणे करण्यासाठीच ते माझ्याकडे आलेले असावेत. हे जाणूनच मी त्यांना विचारले, "काय झाले बाबूराव? आज सकाळी सकाळीच माझ्याकडे दौरा?"
तर ते म्हणाले," काही विचारू नका. माझ्या झोपेचं काल रात्री पुन्हा त्रांगडं झालं."
काय झालं असावं ते माझ्या लक्षात आलं. तरी मी त्यांना विचारलं," काय झालं?"
ते म्हणाले," तुम्हाला माहीत आहे की, आमच्या कॉलनीच्या पलीकडेच एक मंगल कार्यालय आहे."
मी म्हटलं, "हो. मला माहीत आहे. त्याचं काय?"
"तर तिथे आज एक लग्न आहे. त्या लग्नाच्या निमित्ताने त्या ठिकाणी काल 'संगीत रजनी' झाली. तिथे गाण्यांचा आणि वाद्यांचा धुमधडाका रात्री एक वाजेपर्यंत चालू होता. त्यामुळे मला झोप लागलीच नाही." ते सांगू लागले.
मी म्हटलं, "पण रात्री दहानंतर तर लाउडस्पीकरला परवानगी नाही. मग एक वाजेपर्यंत कसा काय चालू होता धूमधडाका?"
तर बाबूराव म्हणाले, " तेच तर सांगतोय. तिथे लाउडस्पीकरही नव्हता आणि गाणेही मंगल कार्यालयाच्या आतमध्ये चालू होते. तेही अगदी साधारण आवाजात. पण तुम्हाला माहीत आहे ना की, मला झोपेच्या सुरुवातीला थोडाही आवाज सहन होत नाही. माझ्या झोपेच्या सुरुवातीला थोडाही डिस्टर्ब झाला की रात्रभर माझी झोप बोंबललीच म्हणून समजा."
"हे मात्र खरे आहे. कारण तुमच्या न झालेल्या झोपेच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा यापूर्वीही तुम्ही मला पुष्कळ वेळा सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या झोपेचं खोबरं व्हायला छोटंसंही कारण पुरेसं असतं हे मला माहीत आहे. बरं तुम्ही काय सांगत होतात? " मी म्हणालो.
"तर झालं काय की, सुरुवातीलाच माझ्या झोपेवर त्या संगीत रजनीचं आक्रमण झाल्यामुळे मला तो कार्यक्रम संपला तरी नंतर झोप लागलीच नाही." बाबूरावांनी त्रस्त चेहऱ्याने सांगितले.
बाबूरावांच्या झोपेविषयी मला फार पूर्वीपासून माहीत होते आणि अधूनमधून त्यांना इतरांच्या त्रासामुळे झालेल्या जागरणाची कथा मी सहानुभूतीपूर्वक ऐकतो याची त्यांना पक्की खात्री असल्यामुळे ते कुणालाही सांगण्याअगोदर मलाच हे सारे सांगत असतात.
साधारणपणे तीस, पस्तीस वर्षांपूर्वी मी नोकरीच्या निमित्ताने पैठणला असतांना बाबूरावही कुठल्या तरी सरकारी कार्यालयात नोकरीला होते. तिथे असतांना एका कार्यक्रमात आमची भेट झाली. माझ्याप्रमाणेच त्यांनाही साहित्याची आवड आहे हे मला कळले आणि नंतर हळूहळू या ओळखीचे रूपांतर घट्ट मैत्रीमध्ये झाले. मी एखादी कविता किंवा कथा लिहिली तर त्यांना वाचून दाखवायचो. तसेच त्यांनीही काही लिहिले तर ते मला दाखवायचे. एखाद्या नियतकालिकाला किंवा दिवाळी अंकाला आम्ही दोघेही सोबतच साहित्य पाठवू लागलो.
आज आत्ता बाबूराव त्यांच्या झोपेबद्दल सांगत असतांना मला एकदम आठवले की, पैठणला असतांना त्यांनी एक विनोदी कथा लिहायला घेतली होती. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी कथा लिहायला सुरुवात करण्याच्या अगोदरच त्या कथेला शीर्षकही दिले होते { बाबूराव कथा लिहायला सुरुवात करण्याआधीच त्या कथेचे शीर्षक पक्के करून टाकायचे.} आणि त्यांच्या झोपेच्या त्रासाला अनुसरुन त्यांनी "माझ्या झोपेचे हजार दुश्मन" असेच शीर्षक त्या कथेला दिलेले होते. नंतर मात्र अर्धी अधिक कथा लिहून झाल्यावर तो कागद त्यांच्याकडून कुठेतरी गहाळ झाला आणि ती कथा पूर्ण करायची राहून गेली ती राहूनच गेली. त्याची खंतही त्यांनी माझ्याकडे त्यावेळी व्यक्त केली होती. पण ती कथा लिहायला घेतली तेव्हाच त्यांनी मला त्यांच्या झोपेची कर्मकहाणी सांगितली होती. त्या दिवसापासून मला त्यांच्या झोपेचे अनेक दुश्मन माहीत झाले होते आणि त्यांच्या झोपेच्या सवयीसुद्धा माहीत झाल्या होत्या. बाबूरावांना सुटीच्या दिवशी दुपारी जेवण झाल्यानंतर दीड ते दोन तास झोप हमखास हवी असायची. त्यात काही व्यत्यय आला की मात्र बाबूरावांचा लगेच मूड जायचा.
मागेही एकदा असेच सुटीच्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास बाबूराव माझ्या घरी आले. चहाची वेळ असल्यामुळे बाबूराव दिसताच मी सौ.ला त्यांचाही चहा करण्यास सांगितले. चहा घेत घेत मी त्यांना विचारले,
"काय बाबूराव, काय म्हणता? आज सुटी कारणी लावून दुपारी रट्टावून झोप घेतलेली दिसतेय." मी असे म्हणताच बाबूराव एकदम उसळून म्हणाले," कशाची झोप अन् कशाचं काय?"
"का? काय झालं?' मी विचारलं.
"तेच तर सांगायला आलो तुमच्याकडे. असं बघा, आमच्या सौ.ने आज मला आवडणारे चिंचगुळाचे मस्त आंबट वरण केले होते. त्यासोबत आळूच्या पानाच्या वड्यादेखील होत्या. मग काय विचारता! रोजच्यापेक्षा एक पोळी जास्तच खाल्ली. मग अशी पेंग आली म्हणता. लगेच पलंगावर आडवा झालो. पण कसचं काय अन् कसचं काय? झोपेच्या बाबतीत आमचं नशीबच फुटकं." बाबूराव पुढे सांगू लागले,
" जरा कुठे छानशी झोप लागायला लागली की आधी नाकात माशी गेली आणि नंतर मोटरसायकल गेली. मग काय! बोंबलली आमची झोप." हे त्यांचे वाक्य ऐकताच मला जोरात हसू आले. प्रयत्न करूनही मी माझे हसणे थांबवू शकलो नाही.
" आता तुम्हाला हसायला काय झाले?" बाबूरावांनी विचारले.
तेव्हा मी महत्प्रयासाने हसू थांबवीत त्यांना म्हटलं," बाबूराव नाकात माशी गेली हे मी समजू शकतो. पण नाकात मोटरसायकल कशी जाईल?"
" मी कधी म्हटलं की नाकात मोटरसायकल गेली? आधी नाकात माशी गेली म्हणून झोप मोडली आणि नंतर थोडी झोप लागते न लागते तोच समोरच्या रस्त्यावरून धाड धाड आवाज करीत मोटरसायकल गेली असं म्हणायचं होतं मला." ते म्हणाले.
"मग हे कधी सांगणार?" मी म्हणालो. त्यांच्या वाक्यातली गंमत त्यांच्या लक्षात आली आणि मग बाबूरावही मनमोकळेपणाने हसले.
अशाप्रकारे बाबूराव त्यांच्या झोपेविषयीच्या तक्रारी अधूनमधून मला सांगत असत. त्यांच्या झोपेच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेणारा मी एक हक्काचा श्रोता आणि सच्चा मित्र होतो. त्यामुळे अगदी आपलेपणाने ते मला सारे सांगत.
आमच्या गप्पा अशाच चालू असतांना मला त्यांच्या "माझ्या झोपेचे हजार दुश्मन" या अर्धवट राहिलेल्या कथेची आठवण झाली. म्हणून मी त्यांना म्हटलं," तुमची ती पैठणला लिहायला घेतलेली कथा तुम्ही आताही पूर्ण करू शकता. त्या कथेचा कागद हरवला म्हणून काय झाले? झोपेच्या तक्रारीविषयी अनेक प्रसंग अगदी जसेच्या तसे तुमच्या लक्षात आहेतच ना."
"तुम्ही म्हणता ते खरे आहे. आठवून आठवून लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि ती कथा पूर्ण करतोच. कुलकर्णीसाहेब, बरी आठवण झाली. तुम्हाला एक सांगायचेच राहिले."
ते सांगू लागले, "माझ्या झोपेच्या अनेक तक्रारी तुम्ही आतापर्यंत ऐकल्या. पण मी आता जे काही सांगणार आहे ते म्हणजे या सर्व गोष्टींवरचा कळसच आहे असे म्हटले तरी चालेल. मध्यंतरी एका साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून एका तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा योग आला. तुम्ही तेव्हा गावाला गेलेले असल्यामुळे तेव्हा तुमचा अन् माझा संपर्क होऊ शकला नाही. तर त्याचे झाले असे की, मी त्या साहित्य संमेलनाला वेळेआधीच पोचलो. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कविसंमेलन होणार होते. परंतु आधीचे कार्यक्रम लांबल्यामुळे रात्री नऊ ते अकरा असे ते कविसंमेलन झाले. त्या कविसंमेलनात माझे कवितावाचन छान झाले. श्रोत्यांकडून भरभरून दादही मिळाली. कविसंमेलन संपल्यानंतर झोपण्यासाठी आयोजकांनी व्यवस्था केलेल्या खोलीमध्ये मी आलो. त्या खोलीत चार पलंग टाकलेले होते. त्यावर अंथरूण, पांघरूण वगैरे व्यवस्थित होते. माझ्या रूममध्ये माझ्याच वयाचे इतर तीन सहभागी कवीसुद्धा झोपण्यासाठी आले. ते तिघेही एकाच शहरातून सोबतच साहित्यसंमेलनासाठी आलेले होते. ते तिघेही एकमेकांचे मित्रच होते. त्यांच्याशी थोड्या जुजबी गप्पा मारून मी झोपायच्या तयारीला लागलो.
अंथरुणाला पाठ लागेपर्यंत साडेअकरा वाजून गेले होते. चारपाच तासांचा प्रवास झाल्यामुळे मीही खूप थकलो होतो. कधी एकदा झोपतो असे मला झाले होते. तितक्यात त्या तिघांपैकी एका कवीला कविता वाचून दाखविण्याची हुक्की आली. मी डोळे मिटून पलंगावर निद्रादेवीची आराधना करीत असतांना त्याने मोठ्या आवाजात त्याच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकातील कवितांचे वाचन अन् भसाड्या आवाजात कविता गायन सुरू केले. त्याचे इतर दोन साथीदार त्याच्या कवितांना उत्स्फूर्तपणे दाद देत होते. मी मात्र झोपण्याचा प्रयत्न करीत होतो. मला वाटले, दोन तीन कवितांचे वाचन करून हे लोक झोपतील. पण कसचं काय, त्या कवीचा कवितावाचनाचा दणका चालूच होता. मला अशा वातावरणात झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. रात्रीचा दीड वाजून गेला होता. कविता वाचता वाचता पुस्तकाचे पुढचे पान उलटण्याच्या बेतात तो असतांना मी त्याला पटकन म्हणालो , "छान आहेत कविता. किती कविता वाचल्या? "
तो उत्साहाने म्हटला," छत्तीस".
मी विचारले, "पुस्तकात एकूण किती कविता आहेत?"
तो म्हणाला," शहाण्णव "
मी म्हणालो," उरलेल्या साठही वाचून टाका. तेवढ्याच कशाला ठेवता?"
बहुधा माझ्या बोलण्यातील खोच त्याच्या लक्षात आली असावी. त्याने त्याच्या मनगटावरील घड्याळाकडे पाहिले अन् म्हणाला, "बाप रे, दीड वाजून गेला. कवितेच्या नादात कळलेच नाही. पुरे आता."
असे म्हणून त्याने पुस्तक बंद केले आणि ते तिघेही झोपण्याच्या तयारीला लागले. मी मनात देवाचे आभार मानले अन् झोपण्यासाठी डोळे मिटून पडलो.
आणि पुढच्या पंधरा वीस मिनिटातच ते तिघेही निद्रेच्या अधीन होऊन चढाओढीने तारस्वरात घोरू लागले. अशा परिस्थितीत तर मला अजिबातच झोप लागणे शक्य नव्हते. कारण माझ्या झोपेचा सर्वांत मोठा दुष्मन म्हणजे माझ्या शेजारी घोरणारा माणूस. इथे तर तीन तीन जण घोरत होते. एखाद्या जंगलामध्ये तीन सिंहाची किंवा तीन वाघांची भांडणे होत असतांना ते मोठमोठ्या डरकाळ्या कशा फोडीत असतील याचे चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले. माझ्या मागील अनुभवांवरून मला दोन गोष्टींबद्दल माहीत होते. पहिली गोष्ट म्हणजे रात्री बेरात्री आपण रस्त्याने जात असतांना कुत्रा जर आपल्या अंगावर येऊन भुंकू लागला तर त्या कुत्र्याला ऐकू जाईल अशा आवाजात गाणे म्हणत पुढे पुढे चालत राहायचे, म्हणजे कुत्रा आपोआप शांत होतो आणि जागेवर गप्प बसतो; आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण झोपलेलो असतांना शेजारचा माणूस जर घोरत असला आणि आपल्या झोपेत विघ्न आणीत असला तर आपण जरा मोठ्या आवाजात खाकरायचे म्हणजे तो घोरणारा माणूस क्षणभर का होईना, तोंडातून फुस्स आवाज काढतो आणि काही काळापुरते त्याचे घोरणे बंद होते. तो प्रयोगही मी इथे करून पाहिला. पण चढाओढीने घोरणारे तिघे तिघे असल्यामुळे माझ्या खाकरण्यामुळे एखाद्याने फुस्स करून घोरण्यापासून क्षणभर विश्रांती घेतली तरी बाकीचे दोघे आणखी मोठ्याने घोरत असत. माझ्या या खाकरण्याचा मी त्या ठिकाणी पुष्कळ वेळा प्रयोग केला पण म्हणावा तसा उपयोग झाला नाही. उलट माझा घसा दुखायला सुरुवात झाली. मी मनात म्हटलं, 'यापेक्षा त्या कवीच्या उरलेल्या साठ कविता ऐकल्या असत्या तर बरे झाले असते. निदान तो कवी जेव्हा कविता गायचा तेव्हा त्या गायनाला अंगाई गीत समजून मला झोप तरी लागली असती.'
आता मला सांगा कुलकर्णीसाहेब, मी असे काय पाप केले की माझ्या झोपेवरच नेहमी संक्रांत येते?"
मी त्यांच्या या प्रश्नाचे काही उत्तर देणार इतक्यात त्यांचा मोबाईल खणखणला. तसे ते घाईतच उठले आणि "बायकोचा घरून एका महत्त्वाच्या कामासाठी फोन आहे. मी नंतर येतो. मग बोलू आपण." असे म्हणत ते निघून गेले.
"बाबूराव पुन्हा जेव्हा भेटायला येतील तेव्हा त्यांच्या न झालेल्या झोपेची कुठली बरं नवीन गोष्ट सांगतील?" असा माझ्या मनाशीच विचार करीत मीही माझ्या कामाला लागलो.
********************
उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड
शहानूरवाडी
औरंगाबाद ४३१००९
मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९
ईमेल : ukbhaiwal@gmail.com
Share

NEW REALESED