Mastermind - 2 books and stories free download online pdf in Marathi

मास्टरमाईंड (भाग-२)

इस्पेक्टर पवार, तरवडे गावामध्ये प्रमुख पोलीस निरीक्षक म्हणुन कार्यरत होते. काही किरकोळ गुन्हे वगळता तरवडे गाव तसे शांतच होते त्यामुळे पवारांवर कामाचा असा बोजा कधीच आला नव्हता.

त्या दिवशी सुध्दा घरचा चिकन-करीचा बेत ओरपुन निद्रास्त झाले होते तेंव्हाच त्यांना पोलीस स्टेशनमधुन गुन्हाची बातमी देणारा फोन आला होता आणि चरफडतच रात्रीच्या गारठ्यात ड्युटीचे कपडे अंगावर चढवुन ते घराबाहेर पडले होते.

हॉटेलचा परीसर पोलीसांच्या गाड्या, ऍम्ब्युलन्स, बाईट्स मिळवण्यासाठी आलेले पत्रकारांच्या गर्दीने गजबजुन गेला होता. खोलीमध्ये इन्स्पेक्तर पवार पंचनामा करत होते. १५ वर्षाच्या त्यांच्या काराकिर्दीत इतका क्रुर गुन्हा त्यांनी पाहीला नव्हता. फोटोग्राफर्स ने गुन्ह्याचे फोटो काढले.

“चव्हाण, ठसे मिळाले का काही?” पवार

“सर, लॉज आहे हा, अनेक लोकांचे ठसे मिळाले आहेत, गुन्हेगाराचे असे ठसे अजुन तरी निट नाही सांगता येणार”, चव्हाण

“हम्म, बर त्या काऊंटर वरच्या लोकांची उलट तपासणी घेतलीत का?”, पवार

“हो साहेब. त्याने रुमच्या किल्या ह्या बाई कडेच दिल्या होत्या. तो झोपेत असल्याने तिच्याबरोबर असलेल्या माणसाचे वर्णन तो निटसे सांगु नाही शकला”, चव्हाण

“बरं, एक सांगा, गुन्हा उघड होण्याच्या आधी कुणी त्या इसमाला बाहेर जाताना पाहीले का? म्हणजे लॉजमधल्या इतर कोणी?” पवार

“नाही साहेब, कोणीच नाही. आम्ही इथे आल्यावर लॉज लगेच सिल केला त्यानंतर कोणी बाहेर गेले नाही. म्हणजे गुन्हेगार आधीच बाहेर निघुन गेला असणार”, चव्हाण

“बस मधले प्रवासी, ड्रायव्हर, कंडक्टर कोणी तरी त्याला पाहीले असेल?” पवार

“म्हणजे तसे अंधुक अंधुक वर्णन आहे आपल्याकडे उद्या त्यावर्णनावरुन एक चित्र बनवुन घेऊ. पण ‘त्याला’ पहाताच ओळखु शकेल असे तरी सध्या कोणी नाही”, चव्हाण

“बरं, ही गाडी जेथुन सुटते तिथे चौकशी करा. तिकीट काढताना, बस मध्ये चढताना कुणी पाहीलं असेल”, पवार

“साहेब, तो माणुस मध्येच बसला होता गाडीमध्ये”, चव्हाण

“मध्येच?? म्हणजे?”, कपाळावर आठ्या आणत पवार म्हणाले

“मध्येच म्हणजे साहेब, ड्रायव्हर म्हणाला तारापुर एक्झीटला त्याला रस्त्याच्या कडेला एक बंद पडलेली गाडी दिसली आणि त्यापाशी उभ्या असलेल्या इसमाने लिफ्ट मागीतली. हाच तो माणुस”, चव्हाण.

“अहो चव्हाण, मग हे तुम्ही आधी सांगायचंत ना! आत्ताच्या आत्ता कुणाला तरी तिकडे पाठवुन द्या. ति कार अजुनही तिथेच असेल तर काही तरी पुरावा मिळेल. ड्रायव्हरकडुन त्या गाडीचे काही वर्णन, म्हणजे रंग, कुठल्या मेकची गाडी होती वगैरे माहीती गोळा करा” पवार हायपर होत म्हणाले

“हो साहेब, सावंत लगेच गाडी घेऊन गेले आहेत त्या एक्झीटपाशी.”, चव्हाण

“आजुबाजुला काही वस्ती आहे तेथे चौकशी करा, रात्री अपरात्री कोणी कुणाला जाताना बघीतले का? आणि आपल्या गावात नविन आलेल्या इसमांची कसुन चौकशी करा. ते कुठुन आले, कुणाबरोबर आले, त्याचे पुरावे सगळी माहीती निट गोळा करा.”, पवार

“हो साहेब”, असं म्हणुन चव्हाण इतर गोष्टी करायला निघुन गेले.

“शिंदे, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवुन द्या आणि खुनाआधी मयतेवर बलात्कार झाला असेल तर तसे पंचनाम्यामधे नमुद करा. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आणि बाकीचे पेपर सकाळी मी यायच्या आत टेबलावर ठेवा” असं म्हणत इन्स्पेक्टर पवार बाहेर पडले.

बाहेर दोन हवालदार जमलेल्या पत्रकारांना आतमध्ये जाण्यापासुन रोखत होते. बॉडी बाहेर आणताच पत्रकारांनी एकच गर्दी केली परंतु त्यांना फारशी माहीती मिळु शकली नाही.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला शेतामध्ये लपुन उभा राहुन ‘तो’ सर्व काही बघत होता. पोलीसांच्या गाड्या, ऍम्बुलन्स गेलेल्या त्याने पाहील्या. दोन मिनीटं त्याने स्वतःशीच विचार केला आणि मग अंधारलेल्या शेतातुन वाट काढत तो सुध्दा चालायला लागला.

*********************

आपल्या खोलीवजा कार्यालयातील एका मळक्या खुर्चीवर डिटेक्टीव्ह जॉन विचार करत बसला होता. दाढीची खुंट वाढलेली, मळके-चुरगळलेले कपडे घातलेल्या त्याच्याकडे बघुन गुप्तहेरीसाठी काम घेऊन आलेला एखादं-दुसरा क्लायंटही निघुन जात होता. कार्यालयाचा पुर्ण बोजवारा उडाला होता. टेबलावर आणि इतरत्र संपलेल्या सिगारेट्सची थोटक विखुरली होती. एका कोपरात कात्रणांसाठी अर्धवट कापलेल्या वर्तमानपत्र, मासीकांचा गठ्ठा साठला होता. अनेक दिवस साफ-सफाई न केल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते.

जॉनची डिटेक्टीव्ह कंपनी चालु करण्याची कल्पना पुर्ण फसली होती. सुरुवातीला आलेले काही क्लायंट्स वगळता नंतर त्याला म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. काही तुरळकं कामं खोळंबली होती. पण घटस्फोटाच्या केस साठी पुरावे गोळा करणे, कुणा धनाधीशाच्या मुलीवर लक्ष ठेवणे, संशयीत पतीच्या पत्नीवर पाळत ठेवणे असली कंटाळवाणी कामं करुन जॉन पुरता कंटाळुन गेला होता. त्याच्या बुध्दीला चालना देणारी, त्याचा कस पहाणारी आणि त्याच वेळेला योग्य पैसा मिळवुन देणारी एखादी केस त्याला हवी होती जी त्याला मिळत नव्हती.

टेबलावर देणेकरी, बिलांची चळत पडली होती. जॉन ने एकवार निराशेने त्या सर्वांवरुन नजर फिरवली. आपलेही एखादे पॉश ऑफीस असावे, आपले डिक्टेशन घेण्यासाठी, अपॉंटमेन्ट्स ठरवण्यासाठी एखादी सेक्रेटरी असावी, दिमतीला थोडे फार लोकं, कार-ड्रायव्हर अशी काहीशी त्याची स्वप्न अजुन तरी पुर्णत्वाला आलेली नव्हती.

जॉनने पॅंटच्या खिश्यात हात घालुन शिल्लक असलेल्या पैश्यांकडे नजर टाकली. दहा रुपायांची एक नोट आणि काही चिल्लर शिल्लक होते. ‘चहा की सिगारेट?’ जॉनने विचार केला. शेवटी एक सिगारेट ओढुन उरलेले पैसे उद्यासाठी ठेवावेत या विचाराने तो लाकडी जिना उतरुन खाली आला.

कोपर्य़ावरच्या पान-ठेल्याकडुन त्याने एक सिगारेट विकत घेतली. त्या पानवाल्या भैय्याला जॉनबद्दल नेहमी कुतुहल वाटायचे आणि जॉन सुध्दा उगाचच काहीतरी कथा बनवुन आपल्या गुप्तहेर असण्याचा छाप त्याच्यावर मारण्याचा प्रयत्न करायचा.

“क्या जॉन भाय.. कैसा चल रहा है आपका काम?”, सिगारेट देता देता पानवाल्याने विचारले

“ठिक चल रहा है, वैसे आजकल एक बहोत इंपोर्टंन्ट केस पे काम कर रहा हु.. थोडा बिझी हु”, जॉन ने उगाचच एक थाप मारली

“अरे छोडीये वो केस, आप वो केस क्यु नही हात मै लेते.. अपने बाजुवाले गांव है नं तरवडे वहां पे एक लडकी का खुन हुआ है”

“कौनसा केस?”, चेह़यावर काही भाव नं आणता त्याने प्रतिप्रश्न केला

“अरे वही.. तरवडे गाव का केस.. एक लडकीका लॉज मै किसीने कतल कर दिया. लगता है कोई सरफिरा किलर है. इ देखीये” असं म्हणुन त्याने आपल्याकडच्या एका पेपरमध्ये आलेली ती बातमी जॉनला दाखवली.

जॉनने आपल्या तिक्ष नजरांनी पटापट सर्व गोष्टी वाचुन काढल्या आणि तो पेपर परत करत म्हणाला..”अरे छोडो यार, क्या ऐसे छोटे छोटे केसेस लेनेका, मै तो कुछ बडे चिझ पै काम करने वाला हुं”, पुन्हा एकदा थाप मारुन जॉन तेथुन निघुन गेला.

कार्यालयात आल्यावर त्याने आपली सिगारेट पेटवली. एक दोन दीर्घ कश मारल्यावर तो विचार करु लागला –

“काय करावं? तसंही काम काहीच नाही. नुसतं बसुन बुध्दीवर गंज चढत चालला आहे. त्यापेक्षा तिथे काही हाती लागलं तर थोडीफार प्रसिध्दी तरी मिळेल”, उरलेली सिगारेट संपवुन जॉन कार्यालयाला कुलुप लावुन बाहेर पडला.

सर्व प्रथम तो ‘मोफत वाचनालयात’ मध्ये गेला. तेथील एक दोन दिवसांतल्या वर्तमानपत्रांच्या गठ्यातुन त्याने ‘तरवडे’ गावातील केसबद्दल बातम्या देणारी सर्व वर्तमानपत्रं बाजुला काढली आणि मग एका कोपऱयात बसुन त्याने एक एक करत सर्व बातम्या वाचुन काढल्या. त्याचे डोक प्रत्येक गोष्ट बारकाईने वाचत होते आणि हात निवडक गोष्टींची माहीती जवळच्या वहीमध्ये नोंदवत होते.

रात्री उशीरापर्यंत थांबुन त्याने हवी असलेली सर्व माहीती गोळा केली आणि तो घरी परतला.

आल्या आल्या त्याने कपाटातुन काही बऱ्यापैकी चांगले कपडे काढुन एका सुटकेस मध्ये भरले. वापरुन वापरुन झिजलेल्या रेझरने खरडुन खरडुन पुन्हा एकदा शेव केली. मग स्वच्छ आंघोळ केली आणि तो आरश्यासमोर उभा राहीला.

उत्साहाने आणि आत्मविश्वासाने भरलेल्या चेहऱ्याचा एक नविनच जॉन त्याला आरश्यात पहावयास मिळाला. ‘हीच शेवटची संधी आहे’, त्याने मनाशी विचार केला. ह्या वेळेस जर काम जमले नाही तर मात्र उत्साहाने चालु केलेली ही डिटेक्टीव्ह कंपनी बंद करण्यावाचुन त्याच्यापुढे कुठलाच पर्याय उरला नव्हता.

त्याने खोलीत एकवार नजर टाकली. शोकेसवर त्याचा बिलं नं भरल्याने बंद स्थितीत असलेला मोबाईल पडला होता. ‘मोबाईल हॅन्डसेट विकुन काही दिवस पुरतील एवढे पैसे जमतील’, त्याने असा विचार करत तो मोबाइल खिश्यात टाकला आणि आपली कपड्यांची बॅग घेऊन तो घराबाहेर पडला.

[क्रमशः]