मास्टरमाईंड (भाग-५)

“शिंदे, त्या हत्याराबाबत अधीक काही माहीती हाती लागली का?” पवार डॉक्टरांनी शवविच्छेदनानंतर दिलेल्या अहवालावरुन खुनासाठी वापरण्यात आलेल्या सुर्‍याचे एक अंदाजपंचे चित्र रेखाटण्यात आले होते त्याकडे पाहात म्हणाले. ९ इंच लांब, एका बाजुने खाचा असलेला, सुर्‍याच्या एका बाजुला नक्षीकाम तर दुसऱ्या बाजुला दोन सिंहांचे चित्र कोरलेला आणि सुर्‍याच्या टोकाच्या थोड्या अलीकडे एक छोटासा बाक असलेला असा विचीत्र आकाराचा तो सुरा होता.

“म्हणजे शिंदे असं बघा!! अश्या प्रकारचा सुरा कोणाकडे असु शकतो? खाटीक, चिकनवाला, भंगारवाला, हॉटेलवाला??? कोण अश्याप्रकारचा विचीत्र चाकु बाळगत असेल? बरं ते जाऊ देत, गावात त्या रात्रीनंतर कोण कोण नविन आलं आहे तपासलेत का तुम्ही?”

“हो साहेब. म्हणजे गावाकडच्या जमीनीबद्दल काही चर्चा करायला नानासाहेबांकडे ४-५ लोकं येऊन गेली, भैय्यासाहेबांकडे तर लोकांचे येणे जाणे असतेच बाकी इतर किरकोळ वगळता तसं कोण आलं नाही साहेब..” डोकं खाजवत शिंदे म्हणाले.. “हाsss ते डिटेक्टीव्ह जॉन आले बघा अनिताताईंचा खुन व्हायच्या अगोदर..” अचानक सुचलं तसं शिंदेंनी आधीच्या वाक्यात हे वाक्य मिसळलं.

“डिटेक्टीव्ह जॉन!!, मला काय तो माणुस बरोबर वाटला नाही. च्यायला कुठुन अचानक येतो काय? खुनाबद्दलची माहीती मागतो काय?.. “, पवार विचार करत म्हणाले.

“पण साहेब, त्यांचे पेपर सगळे बघीतले ना तुम्ही? गव्हर्मेंटचेच आहेत ना?” शिंदे

“अहो शिंदे, असले छप्पन्न पेपर बाहेर बनवुन मिळतात. कश्यावरुन ते खरे आहेत? शिंदे एक काम करा, घेउन या त्याला उद्या इकडे, जरा निट चौकशी करायला हवी त्याची”, पवार जागेवरुन उठत म्हणाले.

*************

जॉन बाल्कनीमध्ये मावळत्या सुर्याकडे बघत बसला होता. खिश्यातुन सिगारेटचे एक पाकीट काढुन त्याने आतमध्ये नजर टाकली. शेवटची चार सिगारेट्स उरली होती त्याने एक दीर्घ उसासा घेतला आणि पाकीट परत बंद करुन खिश्यात ठेवुन दिले. मग तो शांतपणे उठला आणि खोलीमध्ये गेला. त्याने स्वतःसाठी एक कॉफी बनवुन घेतली आणि परत बाल्कनीमध्ये येऊन बसला. कॉफीचे दोन कडक घोट घश्याखाली जाउनही त्याची सिगारेटची तल्लफ जाईना, शेवटी त्याने एक सिगारेट शिलगावली आणि एक मोठ्ठा झुरका मारुन तो खुर्चीत रेलुन बसला.

दिवसांगणीक ह्या खुनांची माहीती दुरवर पसरत होती. बर्‍याच दिवसांत चर्चायला काही नविन घडामोडी नसल्याने मिडीयाने तशी फालतु असुनही ही केस उचलुन धरली होती.

’तरवडे गांव मै सन्नाटा’
’तरवडे गांव मै मौत का दरींदा’
’तरवडे गांव हुआ पागल खुनीका शिकार’

ह्या आणी अश्या अनेक ’ब्रेकींग न्युज’ झळकत होत्या आणि तरवडे गावाचे नाव शहरो शहरी पसरवत होत्या.

’ह्या केसला अशीच प्रसिध्दी मिळो..’ जॉन स्वतःशीच विचार करत होता.. ’.. त्यासाठी अजुन एक-दोन खुन पडले तरीही हरकत नाही..’ ह्या केसच्या प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार होऊन आपल्या पदरी थोडी प्रसिध्दी मिळाली तर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करता येईल..’

सिगारेटच्या धुराची वलय आकाश्यात सोडत तो बुडणाऱ्या दिनकराकडे बघत होता. इन्स्पेक्टर पवारांकडुन अधीक माहीती मिळाल्याखेरीज कामात प्रगती फारशी होणार नाही हे तो जाणुन होता.

त्यांच्याकडुन माहीती काढायची म्हणजे त्याला आधी गाजर दाखवायल हवे. आपले सहकार्य उपयुक्त आहे ह्याची त्याला जाणीव झाली तर कदाचीत तो माहीती देऊ करेल असा एक पुसटसा विचार त्याच्या मनामध्ये चमकुन गेला.

विचार करता करता जॉनचे मन भुतकाळात शिरले..

जॉन डॉलीच्या एअर-कंडीशन्ड बेडरुममध्ये छताकडे तोंड करुन पहुडला होता. त्याच्या हातावर डोके ठेवुन डॉली शेजारी झोपली होती. तिच्या गोऱ्यापान उघड्या पाठीवरुन तिचे लांबसडक काळेभोर केस ओघळत होते. हाताला रग लागली तशी झोपेतच जॉनने हळुवारपणे आपला हात तिच्या डोक्याखालुन काढुन घेतला.

जॉनच्या हालचालीने डॉलीने अर्धवट डोळे उघडले. जॉनबरोबर बिछान्यात घालवलेले गेले दोन तास तिच्यासाठी सुखाचा परमोच्च बिंदु होता. तिने कौतुकाने एकवार जॉनकडे बघीतले. जॉन गाढ झोपेत होता. जॉनला जागे करुन पुन्हा एकदा त्या सुखाच्या हिंदोळ्यावर झुलण्याची एक तिव्र इच्छा डॉलीच्या मनामध्ये चमकुन गेली. परंतु कष्टाने तिने तो विचार बाजुला सारला. पांघरुण बाजुला सारुन ती वॉर्डरोबच्या मोठ्या आरश्यासमोर स्वतःचे रुप पहात उभी राहीली. तिच्या ह्या कमनीय बांध्यावर, तिच्या मोहक हास्यावर, गालावरील खळीवर, चेहऱ्यावरील निरागसतेवर, लांबसडक केसांवर अनेक जण भाळलेले होते. परंतु डॉलीला भावले होते ते जॉनचे रांगडे रुप. खुरटी वाढलेली दाढी, राट केस, मजबुत मनगट आणि आत्मविश्वासी चेहरा.

दुपारच्या त्या टळटळीत उन्हात बाहेर पडण्यापेक्षा घरीच मस्त पिझ्झा मागवुन बिअरचे पेग रिचवत जॉनला बिलगुन एखादा सिनेमा बघण्याचा डॉलीचा विचार होता.

डॉलीने फिक्कट गुलाबी रंगाच्या रिबीनने आपले केस बांधले, खोलीमध्ये इतस्ततः पसरलेले आपले कपडे तिने उचलले आणि गरम पाण्याच्या शॉवरखाली आंघोळीसाठी ती बाथरुममध्ये पळाली.

तासाभराने ती बाहेर आली तेंव्हा कपडे करणार्‍या जॉनला पाहुन तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

“कुठे चाललास जॉन?”

“येतो मी एक-दोन तासांत जाऊन. मिसेस पारकरांचा फोन आला होता. त्यांना त्यांच्या कामाचे रिपोर्ट्स हवे आहेत आत्ताच.”

“पण जॉन…!”

“डॉली.. तुला माहीती आहे ना ती म्हातारी किती कटकटी आहे! आधीच एक तर क्लायंट्स कमी माझे, आहेत त्यांना तरी सांभाळायला हवे ना!”

“पण जॉन!! तु हे सर्व सोडुन देऊन एखादे ऑफीस का नाही जॉईन करत? आय रीअली लव्ह यु जॉन, ऍन्ड आय वॉट टु गेट मॅरीड विथ यु!”

“डॉली.. प्लिज.. आत्ता नको…”

“जॉन.. मला माहीती आहे डिटेक्टीव्ह जॉब्स तुला आवडतात. पण मग तु थॉमसन एजन्सी जॉईन कर ना. त्यांचा क्लायंट बेस सुध्दा मोठ्ठा आहे. रेग्युलर पैसे तरी मिळतील..”

“कोण? तो खत्रुड थॉमसन? डॉली प्लिज. तुझ्या ह्या फालतु कल्पना तुझ्याकडेच ठेव. माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये कृपया मध्ये-मध्ये करु नकोस”

“जॉन?? तुझे लाईफ?? तुझे लाईफ ते माझे लाईफ़ नाही?”

“मला तसे नव्हते म्हणायचे डॉली..”

“जॉन.. मला वाटते आपले ह्याच विषयावरुन खुप वेळा भांडणं झाली आहेत, आणि ह्यापुढेही होत रहातील. जॉन तुला एक काही तरी निवडावे लागेल..”

“डॉली.. प्लिज आत्ता नको, मला कामं आहेत, संध्याकाळी बोलु.”

“नाही जॉन, संध्याकाळी नाही. आत्ताच..”

“ठिक आहे तर डॉली.. मी माझे प्रोफेशन कुणासाठीही सोडु नाही शकत..” एक दीर्घ उसासा घेउन जॉन म्हणाला आणि स्तब्ध उभ्या असलेल्या डॉलीला ओलांडुन तो घराबाहेर पडला.

हताशपणे डॉली मागे फिरली आणि आवरण्यासाठी वार्डरोबसमोरील आरश्यासमोर उभी राहीली. परंतु डबडबलेल्या डोळ्यांमुळे तिला आपले आरश्यातील प्रतिबिंब सुध्दा धुसर दिसत होते. गालांवरुन ओघळणाऱ्या गरम स्पर्शाच्या आश्रुंना थांबवण्याचा आज्जीब्बात प्रयत्न नं करता डॉलीने स्वतःला सोफ्यामध्ये झोकुन दिले….

…. हातातल्या संपत आलेल्या सिगारेटचा हाताला चटका बसला तसा जॉन भानावर आला… “डॉली.. येस्स!!, डॉली ह्या कामात आपल्याला मदत करु शकेल..” हातातले सिगारेट फेकुन देऊन

जॉन जागेवरुन उठला..

*******

 

“पवारसाहेब तुमचे हे फॅक्स मशीन जरा वापरु का? नाही म्हणजे ह्या सुर्‍याबद्दलची अधीक माहीती मिळवण्यासाठीच करतो आहे.”, पवारांच्या उत्तराची फारशी वाट न बघता जॉन ने ते हातातले सुर्‍याचे चित्र फॅक्स मशीनमध्ये सरकवले. चित्राच्या एका बाजुला ‘अधिक माहीती हवी आहे’ असे शेजारच्या अर्धवट तुटलेल्या पेन्सीलने रखडले आणि त्याने तो कागद डॉलीला फॅक्स केला.

गावची पंचायत, तुरळक पत्रकार, काही नविन बातमी नसल्याने जुने मुडदे खोदुन ‘ब्रेकींग न्युज’ करणाऱ्या चॅनल्सचे काही दिवटे ह्यांच्या प्रश्नांनी इ.पवार वैतागुन गेले होते. नविन माहीतीचा काहीच स्त्रोत हाती लागत नव्हता आणि त्याच वेळेस जॉनने त्यांची भेट घेऊन त्याला सापडलेल्या काही पुराव्यांची माहीती दिली होती. त्यांना तो त्या ठिकाणी घेऊन गेला होता आणि शेतात उमटलेले टायरचे निशाण आणि त्यावरुन बांधलेला तर्क सांगीतला होता.

अर्थात ती माहीती फार उपयुक्त होती अश्यातला भाग नाही, आणि ह्यावरुन फार काही सुगावा लागतही नव्हता, परंतु निदान ह्या इतर मंडळींना तात्पुर्ते का होईना द्यायला पवारांना खाद्य मिळाले होते. तात्पुर्ते त्यांची तोंड बंद झाली होती. आणि त्यामुळे पवारांनीही त्यांच्याकडील काही माहीती जॉनला दिली होती.

खुनाच्या झालेल्या जखमांवरुन तंत्रज्ञांनी एका सुर्‍याचे चित्र बनवले होते आणि काही माहीतींपैकीच एक म्हणुन पवारांनी ते चित्र जॉनला दाखवले होते.

गेल्या ३ महिन्यांपासुन डॉली जॉनबरोबर नव्हती. पण हा फॅक्स तिला मिळताच ती आपल्याला नक्की मदत करेल हा ठाम विश्वास जॉनला होता.

ह्या चित्राच्या सहाय्याने डॉली इंटरनेटवरुन ह्या सुर्‍याबद्दलची अधीक माहीती मिळवु शकेल असे त्याला वाटत होते. आणि त्यामुळेच फारसा विचारं नं करता त्याने तो कागद डॉलीला पाठवला होता.

***********

***