Assassination of Monkeys books and stories free download online pdf in Marathi

माकडहत्या

आज पुन्हा कामावर जायला निघताना उशीर झाला, रेल्वेस्टेशनला पोचलो एकदाचा, मला मुंबईच्या दिशेने जायचं होतं…प्लॅटफॉर्म क्रंमाक एक वर येणारी रेल्वेगाडीसुदधा उशीराने होती. घडयाळात नऊ पस्तीस वाजले होते, अजून नऊ वीसची स्लो लोकल गाडी आली नव्हती, सगळा प्लॅटफॉर्म प्रवाशांनी भरत चालला होता, इतक्यात उदघोषणा झाली प्लॅटफॉर्म क्रंमाक तीनवर जलद लोकल गाडी थोडयाच वेळात येत असल्याची, याशिवाय कोणत्याही क्षणी स्लो लोकल पण क्रंमाक एकवर येणार होती…. काय करावं कळत नव्हतं ?…. फास्ट लोकलने गेलो काय आणि स्लो लोकलने गेलो काय, विशेष काही फरक पडणार नव्हता, शेवटी मग वरच्या पूलावर जाऊन उभा राहलो तिथूंन येणारी रेल्वेगाडी दिसते, म्हटलं जी कुठली पहिली गाडी येईल तिने जाऊ, पूलावर पण तेवढीच तोबा गर्दी. पूलावर एवढयासाठीच लोक उभी होती जेणेकरुन त्या दूरवर पसरलेल्या रेल्वेलाईनवरुन येणारी पहिली गाडी कोणती येते हे पाहता यावी आणि मग पटकन त्यादिशेला जाता यावं, थोडावेळ वाट पाहिली मग मी पण गेलो वरती पूलावर…. समोरुन कोणती गाडी पहिली येणारं हे पाहण्यासाठी, त्या पूलावरुन समोर अंदाजे एक किलोमीटरवरचं सहज दिसायचं….. जवळ जवळ आठ ते नऊ रेल्वेलाईन…. मुंबईकडून येणा-या रेल्वेगाडया येणं आता बंद झालं होतं…. काय प्रॉब्लेम होता काय जाणे? पण रेल्वेगाडी काही येतं नव्हती… त्या एक किलोमीटरच्या पटटयाकडे सगळ्यांचीच नजर लागून राहिली होती, इथं घडयाळाचा काटा देखील पुढे सरकत होता, पावणेदहा वाजत आले…. समोर पाहण्यापलीकडे काही गंत्यतर नव्हतं….त्या पूलासमोरुन दिसायचे ते ठराविक अंतरावर रोवलेले विजेचे खांब… त्या सगळ्यापाशी खतरनाक आणि हाडयाच्या आणि सांगाडयाच्या चित्राच्या साहाय्याने लिहलेले ठळक पच्चीवीस हजार व्होलटचा कंरट असलेले बोर्ड….”खतरा है” सांगणारे. ओळखीच्या एखादया रोजच्या ठिकाणी नुसतचं रोज जातं-येतं असलो तरी पण आणि तरी देखील, कधीही न थांबल्यामुळे, एखादया ठराविक दिवशी जास्त काळ तिथं घालावला की मग आजूबाजूचा परिसर वेगळा वाटू लागतो… तसा इथं या पूलापाशी येऊन वाटू लागलं, केवळ रेल्वेलाईनमुळे प्रत्येक उपनगराचा भाग पश्चिम आणि पूर्व असा विभागला जातो, इथं पूर्वला मोठमोठालें मळे होते, खाडीचा भाग जवळ होता, पूर्वी या भागात मिठागर होती आता ती आहेत का नाहीत काही माहित नाही, बाकी मानवीवस्ती फारच कमी, अजून इथं मोठामोठाले टॉवर कसे उभे नाही राहिलेत याबदल आश्चर्य वाटत आलयं, हा भाग एकदमच शांत…. आणि पश्चिम भाग म्हणजे नुसता माणसांचा आणि माणसाचाचं गलबलाट… मात्र या पश्चिमेस जसं आत-आत जावं तर मग डोंगराळ भाग आणि त्यांच्यापलीकडे जंगलभाग, तलाव वैगेरे…. तिकडे काय ती शांतता…. इथं हया स्टेशनपरिसरात गजबजहाटात अपवाद फक्त हा रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एकच्या शेवटच्या टोकावरचा हा नजदीकचा भाग…एक बंद पडलेला कारखाना..जो अगदीच या स्टेशनच्या शेवटच्या टोकाला… तिथं कोणी सहसा जात नाही…. पण या पूलावर उभं राहलं की दिसतं हे सगळं….एकदमच भकास…. पण यात रमायला इतरदिवशी वेळ नसतो…. आज नाईलाजाने का होईना इथं उभं राहावं लागतं होतं आणि हे सगळं नजरेस पडत होतं…. आता नऊ पच्चावन्न झाले… अजून आणखी लोक त्या पूलावर आले… माझी नजर वापस त्या भकास बंद पडलेल्या कारखान्याकडे गेली… पाहतो तर काय काही माकडं तिथं जमा झाली होती…. ती एकेठिकाणाहून दुसरीकडे जायच्या तयारीत होती… एकदम झुंडीतच बाहेर पडली….कुठून आली काही पत्ता नाही…. पार तिथूंन जंगलातून तर आली नसतील ना…ती बहुतेक इथंल्या भागात पसरण्यासाठी आली होती….. काय कुणास ठाऊक ? …… का इथं ती स्थायिक झाली होती ? …. नाही…ती कुठेतरी जायच्या तयारीत होती…. मघास पासून गाडीच्या ‘लेट येण्याचा’ सुरु असलेला विषय थोडा का होईना या माकडांवर येऊन ठेपला. “जंगलातूनच आली असणारं….”, “कुठूंन म्हणजे काय…, अहो बोरवली संजय गांधी नॅशनल पार्कवरुनच आली असणारं…” अजून एक जण आपला ठोकताळा माडंत होता…. “इथूनं काय लांब नाय ते… ते आपल्याला रस्त्यावरुन जाताना भोवाडा पडतो लांबलंचक म्हणून हे दूर वाटत असेल…”, “पण हयांना काय नुसता उडया मारत यायचं…”, “इथं माणसाच्या वस्तीत आले की काय ठेवतं नायं जागेवर…” तरी ही चर्चा काही साधारण होती कारण त्यापुढे जे काही होणारं होतं ते फार भयावह आणि काळीज पिळवटून टाकणारं होतं… किती ही झालं तरी ती माकडंच…त्यांची समज तरी काय असणारं.. झालं ही तेच…आता ती माकडं ती रेल्वेलाईन…. हो आठ पदरी… ओलांडत जाणार होती…त्याचं काही आपआपासात चाललं होतं…आता बहुतेक सगळी माणसं त्यांच्याकडे बघू लागली…. जर ही माकडं वरुन त्या विजेच्या खांबावरुन गेली तर हमखास विजेच्या शॉकने मरणार…आणि खालून गेली आणि त्याचवेळी जर ट्रेन आली तर तीच्या खाली येऊन मरुन जातील…आता त्यात खूपजण त्यांची ती अवस्था लक्षात आल्यामुळे हळहळत होते… खूप जण त्या पुलावरुन दुरुनच त्यांना पांगवायचं बघत होती… कोण आणि कसं ऐकणार हा प्रश्नच होता… मी नुसताच त्यातल्या निम्म्याहून अधिक लोकांसारखं काहीच प्रतिक्रिया न देता पाहत बसलो होतो….आता त्यांची एकूण संख्या तेरा होती…त्यांनी बहुतेक ठरवून पलीकडे जायचं ठरवलं… व्हिडिओ गेम वैगेरे खेळताना एखादया स्टेपमध्ये कुणालातरी मारलं की आपण हरतो पण काही वाटतं नाही…पण इथं नियतीच्या गेममध्ये हरलात की मग पुन्हा चान्स नाही….ही तर माकडं होती….यातला एक जण जास्तच चपळ होता तो लगबगीने विजेंच्या खांबाच्या टोकावर चढला आणि त्यांने पलीकडे उडी मारली… ती बसलीच विजेच्या तारेला… एखादयाने मोठयांने रश्शी बॉम्ब फोडावा तसा आवाज आला…. जसा तो तारेला टच झाला तोच उडाला… तो माकडं ब-याच उच्चीवरुन खाली कोसळला…. अजूनही बाकीच्यां माकडांना काही कळत नव्हतं…. तरीदेखील एकजण तसाच उंचावर चढला, उडया मारत होता….. दोन ठिंकाणी बरोबर अगदी खांब्यालाच बिलगणा-या उडया मारल्या…. पण तिसरी उडी थेट विजेच्या तारेवर… मागचा तो कानाला दणके देणारा आवाज पुन्हा आला…. ती दोन्ही माकडं थंडगार झाली….म्हणजे मेली… पडली ती रुळाच्या मधल्या जागेतच… लोकांना हे सगळं पाहण्याशिवाय दुसरं गंत्यतर नव्हतं…. हे सगळं बघितल्यावर बाकीच्यांनी मग थोंडावेळ थांबण पसंत केलं… तरी एक जण वरुन जात खांब्याच्यावरती जाऊन बसला…. अजून तो उडी मारत नव्हता… बाकी त्या दोघा मेलेल्या माकडांकडे पाहायला त्यांच्यापैकीच चारजण आले…. बाकीच्या सा-यांनी पलीकडे जाण्यासाठी खालून रेल्वेलाईनवरुन जायचां निर्णय घेतला… ती चार माकडं तिथंच त्या दोन माकडांपाशी होती… ती अशी का पडली त्यांना कळत नव्हतं… .इतक्यात पूलावरच्या त्या सगळ्या माणसांना आता दोन ट्रेन येताना दिसत होता…तिथं असलेल्या लोकांचा विषयच बदला… कुठली गाडी पहिली कुठल्या प्लॅटफॉर्मला येते यांची कुजबूज सुरु झाली. काही जण अंदाज करत त्या त्या प्लॅटफॉर्मपाशी येऊन थबकले होते, मी आणि बरेच जण अजूनपण त्या पलीकडे जायला निघाल्याला माकडाचं काय होणारं याविषयी विचार करत होतो….ज्या रुळावर ती दोन माकडं मरुन पडलीयतं तिथून काही समोरुन ट्रेन येणारं नव्हती…. पण जी इंथून पलीकडे रेल्वेरुळ ओलांडून जायला निघाली त्यांच काय? आता मी काही ट्रेन पकडणार नव्हतो… तशी ही फारच भरुन आलेली असणारं… आत शिरणं ही मुश्कील असणारं.. त्यापेक्षा दुस-या… पुढच्या येणा-या ट्रेनने जाऊ… आता मला तिथूंन जीव वाचवून किती जण जाणारं यांची उत्सुकता होती… मला तिथं मरुन पडलेल्या माकडाचं अजूनहीं काही वाटत नव्हतं… दया, दुःख, वैषम्य वैगेरे काही नाही… माझी नजर आता त्या पलीकडे जाणा-यासाठी निघालेल्या माकडाकडे होती, ती आता तिथूंन निघाली, सध्यातरी ती एक नंबर प्लॅटफॉमच्या रुळापाशी नव्हती… मी रिलॅक्स होतो… आता प्लॅटफॉम क्रंमाक एकच्या दिशेने ट्रेन येताना दिसली, ट्रेन आली….त्या पूलापाशी समोर जिथं ती मेलेली दोन माकडं आणि चार त्यांना बघणारी माकडं ज्या रुळांपाशी होती तिथूंनच मुबंईहून आलेली ट्रेंन जाणार होती त्या पूलावरुन पाठमो-या बाजूने हे सगळं होणार होतं…ती ट्रेन जाणारं होती…. हो जाणारं होती….मला एकदमच कळालं….बघता बघता ट्रेन त्यांच्याजवळ आली…. पहिल्यादां अशी मरणं एकामागोमाग मी डोळयासमोरुन बघतं होतो…काही अवकाश झाला…आणि बघतो तर काय तर तिथं नुसताच रक्ताचा सडा दिसत होता…ती माकडं आता माकडं राहिली नव्हती…त्यांची लक्तर दाही दिशेला पसरली होती….सगळं मांस इकडें तिकडे पसंरल होतं…डोळयात आता पाणी आलं…काहीनी हे सगळं मोबाईलच्या कॅमेरात कैद करणं सुरु केलं….ती तेरा होती..आता सात राहिली…त्यातली सहा रुळावर होती एक अजून त्या विजेच्या खांबावर होतं….ते आता तिथं आले जिथं त्या मेलेल्या माकडांच्या शेपटया होत्या. आणि फक्त मुंडक उरलं होतं… यांना मरण काय असतं कळतं असेल काय? ही जर इथंच शोक करत बसली तर? डार्विन म्हणतो की हेच आपले पूर्वज…मग हे जरुर भावना समजण्याइतके विकसित झालेले असणारं…काही नसलं तरी काहीतरी गमवलाचं त्यांच्या चेह-यावर दिसत होतं….पण अजूनही भयानक होणं बाकी होतं…. आता समोर मुंबईला जाणारी फास्ट लोकल रेल्वेगाडी तिस्-या प्लॅटफॉर्मच्या दिशेने येतं होती आणि ती बाकीची पाच माकड चालत चालली होती त्या रेल्वेट्रॅकवरुन…. एक माकड अजून ही त्या खांबापाशीच होतं…. तो का तिथं थांबल होतं कोण जाणे….. झालं मी ठरवलं हयाचं ही आता तसचं मघाच्या त्या माकडासारखं होणारं…. सकाळी सकाळी हे असलं काही बघायला भेटेल असं वाटलं नव्हतं….. ही पण माकडं तशीच गाडी खाली येतील….. काय करावं?…. आपल्या हातात तर काहीच नाही… जे चालयं ते बघतं बसायचं…

हो तुम्ही जो कयास खरा ठरला ती नाही वाचली, मेली सगळी, तशीच रुळाखाली येऊन…..पण नियतीच्या मनात अजून काहीतरी भयानक होणं बाकी होतं…. आता तिथं त्या पूलासमोर छिन्नविछन्न माकडाचें तुकडे पडले होते…. हे सगळं निमूटपणे बघत निसटण्याचं मी मन बनवलं, बघेल कुणी तरी आणि सांगेल स्टेशनमास्तराला…. आता जाऊ कामाला आधीच लेट झालोय…दहा दहा झाले होते…. राहून राहून वाटत होतं ते तिथं एकट राहयलेल्या एका माकडाबदल…. मी पाठमोरा होतो…सतत त्यांच्याकडे बघत होतो…आता त्यांने पण तसंच मरुन जावं त्यांच्यासारखं, राहायलं काय होतं त्याचं तिथं…काही मिनिटाच्या वेळात निष्पाप जीव गेलेत….. माणसं म्हणून एक बरं आहे तुम्ही किती निर्दयी आहात हे तुम्ही मस्तपैकी लपवू शकता…. अरे फक्त माकडंच मेलीत ना…इथं अशी रोज हजारो माणसं मरतात….. आज माकडं मेलीत…त्यात काय एव्हडं….. पण अजून भयावह व्हायचं होतं… काय होईल… आता अजून एक रेल्वेगाडी येताना दिसत होती…प्लॅटफॉर्म क्रंमाक एकच्या दिशेने येत होती… आता मला पण कामावर जायचं होतं, मी एकवार त्या माकडाकडं नजर टाकली आणि लगबगीने खाली उतरत एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आलो…..तो खांब दिसतो का बघत होतो….. ते माकड नजरेस पडत का ते बघत होतो…आता तुम्हालां काय वाटेल….मी कामावर पोचलो असेन… दुस-या दिवशी बघितलं असेन…त्या दिवशी मग ट्रेन वेळेवर असतील….सगळं जगाच्या दृष्टीने करेक्ट चाललेलं असेलं….…पण कुणाचं तरी जग हिरावलेलं असेलं….….कुणाची तरी मायेची माणसं दिंगतरास गेली असतीलं…. आपल्याला म्हणजे तुम्हाला-मला सोयरसुतक असं काही उरलं नसेल… कारण आपण माणसं असतो…. तर असं काही होणार नाही… आणि असं काही होत नाही….ते एकटं माकड बदला घेतं…कुणाचा काय विचारता… आपला…. माणसांचा… सगळं काही ओरबाडत आपण सगळ्याचं असलेलं फक्त आपलं करु पाहत आहोत… तर तुम्ही म्हणाल, काय केलं त्या माकडाने… हो उरलेल्या एका माकडाने….

दुस-या दिवशीचा न्यूजपेपर वाचला…. कळालं… पाच-सहा जण मेले… आणि शंभरऐक जण जखमी झाले होते… काय केलं त्या माकडाने… तो त्या खांब्याला लटकलेला असताना… घुसला मोटरमनच्या कॅबिनमध्ये आणि चांगला पेचून काढला… चामडी सोलली… नखांनी… मोटरमन बावचळला… चुकला तो… काय झालं काय ठाऊक…गाडी… जोरात आदळल्यासारखी झाली… फलाटाच्या पुढेच जाऊन थांबली…गाडीचा पुढचा भाग चेपला चांगला… खुपजण पडले खालती….. बाकी तुम्ही तुमचं ठरवा… काय काय झालं असेल….नंतर लोकांचा उद्रेक झाला…सरकारने माकड मारण्याचे आदेश दिले… तो एक जिंवत राहलेला माकड… लोकांनी त्यांचा पाठलाग करत करत ठेचून ठेचून मारला… अजून…. काय होणार…. अख्खी माकडांची जमात नष्ट करण्याची सुपारी दिली गेली…. होईल अंमलबजावणी लवकरच…. सरकारी आश्वासन आहे काही सांगता यांयच नाही….

-लेखनवाला