Ti Ek Shaapita - 8 in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | ती एक शापिता! - 8

ती एक शापिता! - 8

ती एक शापिता!

(८)

नव्या विचाराने प्रेरित झालेला सुबोध 'योग्य' व्यक्तीचा शोध घेऊ लागला. सहचर्यात येणारांकडे, परिचितांकडे त्यादृष्टीने, त्या एकाच चष्म्याने पाहू लागला. सुरुवातीला त्याचं लक्ष वेधले ते साहेबांनी! त्याच्या लग्नाच्या वेळी साहेबांनी त्या दोघांना भेट म्हणून दिलेल्या अंगठ्याही आठवल्या. साहेबांनी स्वतःच अंगठी सुहासिनीच्या बोटात घातली होती म्हणजे त्यांनी... सुबोधच्या मनात विचारांनी गर्दी केली...

'सुहासिनीचे साहेबांशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या संबंधात मोकळेपणा, सहजता आहे. कोणताही संकोच नसल्यामुळे त्या दोघांमध्ये ते संबंध सहजपणे स्थापित होतील. त्यांना एकमेकांबद्दल जी आपुलकी आहे त्याचे रुपांतर शारीरिक आसक्तीमध्ये व्हायला वेळ लागणार नाही. सुहासिनीच्या मनात ते विचार नसतीलही परंतु साहेबांचे काय? बहुतेक अधिकारी हाताखाली काम करणाऱ्या स्त्रियांकडे त्याच नजरेने पाहतात. त्यांना वेगवेगळी प्रलोभने दाखवून स्वतःचा स्वार्थ साधतात, परंतु साहेबांनी स्वतःची ती भूक भागवताना, स्वतःची कामे काढण्यासाठी, स्वतःचे उखळ पांढरे करण्यासाठी सुहासिनीचा वापर करायचे ठरवले तर? ती वेश्या ठरणार नाही परंतु उच्च कॉलगर्ल ठरली तर? मला स्वतःसाठी तिचा उपयोग करायचा नाही परंतु साहेब महालोभी माणूस आहे. पैसे उकळण्यासाठी, अडकलेली कामे काढण्यासाठी तिचा उपयोग करणार नाहीत कशावरून? मला तिला त्या मार्गावर ढकलायचे नाही परंतु सामाजिक चौकटीत न बसणारे सुख तिला द्यायचे आहे परंतु ते देताना तिला आणि मलाही ती विशिष्ट बिरुदावली चिकटणार नाही याची काळजीही घ्यायची आहे. समाजाला अमान्य असणारे तसे संबंध दाराच्या आतच राहतील या दृष्टीने साहेब मात्र एकदम अयोग्य अशी व्यक्ती आहे तर मग कोण?...' तो तशा विचारात असतानाच निलेश त्याच्याजवळ येऊन म्हणाला,

"का रे, काय विचार करतोस?" निलेशच्या आवाजाने तो भानावर आला आणि त्याला उत्तर देण्यापेक्षा तो निलेशच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला आणि तो मनोमन आनंदला. तो मनातच म्हणाला, 'अरे, काखेत कळसा आणि गावाला वळसा! ती व्यक्ती माझ्याजवळच आहे. सुहाने नकार दिला असला तरी सुहासिनीचे आणि निलेशचे संबंध निश्चितच प्रस्थापित झाले आहेत. माझ्या पश्चात जे सुख ते दोघे लुटत आहेत तेच त्यांना राजरोसपणे लुटता आले तर? सध्या त्यांच्या संबंधात जी एक प्रकारची भीती आहे, अपराधीपणाची जी जाणीव आहे ती भीती, ती जाणीव नवीन संबंधात न राहता मोकळेपणाने येईल, बिनधास्तपणे ते अधिकाधिक समाधानी होतील. निलेशपेक्षा दुसरी कोणती योग्य असणार आहे?' सुबोध तसे पाहत असताना निलेशने विचारले,

"ऐ सुब्या, अरे, असे काय पाहतोस? ऐक. सावध हो. एक तारखेपासून आपलं विशेष ऑडिट आहे. काळजी घे. ज्या काय त्रुटी असतील त्या पूर्ण करून घे."

"होय, आता साऱ्या त्रुटीच दूर करायचा विचार करतोय..." सुबोध सहेतुक म्हणाला.

त्यादिवसापासून सुबोध कार्यालयीन कामे आटोपायला लागला. कामे जशी प्रचंड होती तशीच अफरातफर मोठ्या प्रमाणावर होती. अर्थात त्यात दोघा-तिघांचा वाटा असला तरीही सारी जिम्मेदारी साहेबांवर आणि त्यातही सुबोधवर अधिक होती. त्याचदिवशी साहेबांनी त्याला बोलावले आणि म्हणाले,

"सुबोध, ऑडिट पार्टी येतेय. काय करायचे?"

"नेहमीप्रमाणेच करा की. तुम्ही असताना मला काय काळजी?"

"तसे नाही हो. पण यावेळी स्पेशल ऑडिटर येतोय. ते येण्यापूर्वीच त्याची ख्याती पोहोचलीय."

"मग तर प्रश्नच मिटला की."

"त्याची ख्याती हावरट, खादाड अशी नाही."

"मग कशी आहे?"

"ते एकदम कडक, नियमांवर बोट ठेवून चालणारे आहेत. एक-एक रुपयाचा तंतोतंत हिशोब तपासणारे आहेत. एक वेळ हिशोब जुळवता येईल. पण..."

"पण काय?" सुबोधने विचारले.

"केलेल्या कामाची प्रत्यक्ष तपासणी करणे या प्रमुख हेतूने पथक येत आहे. पण त्यांचा जो प्रमुख आहे तो... तो... अस्सा आहे. त्याला 'ते' पाहिजे..." नाकाजवळ बोट नेत साहेब म्हणाले.

"मग त्याची तीही व्यवस्था करुया की. पैसे फेकले की, हवा तसा..."

"तसे सोपे नाही. त्याला एकदम घरगुती माल किंवा कॉलेजकन्या हवी असते."

"मग खरेच अवघड आहे." सुबोध म्हणाला.

"तुम्ही मनावर घ्याल तर प्रश्न तात्काळ सुटू शकतो अर्थात त्यासाठी तुम्ही सकारात्मक भूमिका..."

"म्हणजे? मी नाही समजलो?" सुबोधने असमंजसपणे विचारले.

"असे पहा, नाही तरी माझ्या माहितीनुसार चार-पाच कोटींची अफरातफर आहे आपली. त्यात तुमचा एकट्याचा वाटा अर्ध्यापेक्षा जास्त निश्चितच आहे. तेंव्हा... म्हणजे मी एक सुचवतो. त्यांच्या सेवेसाठी, त्यांना खुश करण्यासाठी सुहासिनी..."

"सा..हे..ब.." सुबोध ओरडला.

"असे ओरडू नका. थंड डोक्याने विचार करा. वाटल्यास माझा वाटाही मी तुम्हाला देतो. काम तरी का जास्त आहे? दोन-तीन वेळा..."

"असे आहे का? दोन तीन वेळेचाच प्रश्न आहे ना..." सुबोधचे ते शब्द साहेबांना सकारात्मक वाटले. तो तयार आहे असा अर्थ त्यांनी घेतला. ते आनंदाने म्हणाले,

" हो ना. तीन-चार वेळेसच..." त्यांना पूर्ण बोलू न देता सुबोध म्हणाला,

"मी काय म्हणतो, दोन-तीन वेळा त्यांना खुश करायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांना 'घरगुती' हवी आहे तर मग साहेब तुम्ही तुमच्या बायकोला..."

"सु..बो..ध.."

"का? आता का ओरडताय? मिरची लागली? माझी कमाई तेवढी दिसतेय पण तुम्ही मारलेला डल्ला त्याचे काय? काय हरकत आहे घरगुती म्हणून..."

"सुबोध, स्टॉप धीस नॉन्सेन्स! ईट ईज टू मच! तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे."

"तो कुठे मी नाकारतोय? तुम्ही अधिकारी, मी एक कारकून! तुम्ही केली तशी मी दलाली नाही करु शकणार."

"ऐका. मी ते म्हणत नाही. मी दोघांच्या शारीरिक समर्थतेबाबत बोलतोय. माझी पत्नी माझ्यापासून पूर्ण समाधानी आहे..."

"आणि माझी बायको?"

"माझ्याच तोंडून ऐकायचे आहे का? जगजाहीर असलेली गोष्ट का लपणार आहे? एखादेवेळी तरी तिला खऱ्या सुखाचे, मधाचे बोटूक चाखू द्या."

"ती काळजी तुम्ही करु नका. कदाचित तिला ते सुख मिळतही नसेल पण ती त्यासाठी हपापलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःच्या सामर्थ्याची अशी मिजास मिरवू नका. आम्ही दोघेही तुमच्या संपर्कात असल्यामुळे कदाचित तुम्हाला ते माहिती झाले असेल कारण स्वतःच्या बाबतीत मात्र तुम्ही असे छातीठोकपणे सांगू नका कारण पावित्र्यता ज्याची त्याला माहिती असते, तिचा असा ढिंढोरा पिटता येत नाही, ज्याला तुम्ही तुमच्या पत्नीचे समाधान म्हणता कदाचित तिने तो चेहऱ्यावर ओढलेला सुखाचा पदर असेल. तुम्ही इकडे पंधरा-पंधरा दिवस असता तेव्हा तिकडे तुमची पत्नी..."

"सु..बो..ध... जा. चालता हो. एक क्षण तुझ्याशी..."

"मला तरी तुमच्यासारख्या निर्लज्जाशी बोलायची कुठे इच्छा आहे?" असे म्हणत सुबोध बाहेर पडला. नाही म्हटले तरी दोघांच्या वाढलेल्या आवाजावरून आत काय चालले आहे ते सर्वांना समजले होते. तो बाहेर पडण्यापूर्वीच सुहासिनीने घरचा रस्ता धरला होता. त्यांचा 'संवाद' बाहेर सारेच ऐकत होते. साहेबांच्या दालनातून रागारागाने बाहेर पडलेला सुबोध कुणाला काही न सांगता, गडबडीत कपाटाला कुलूप लावून दाणदाण पावले टाकत घराच्या दिशेने निघाला. निलशने सुबोधला आवाज दिला आणि सुबोध थांबला. त्याच्या हाताला धरून निलेशने त्याला ओढतच हॉटेलमध्ये नेले.

"सुबोध, झाले गेले विसरून जा. साहेबांची ही वागणूक निंदनीय, अशोभनीय आहे. लवकर घरी जा. सुहासिनीला समजावून सांग. तिला रजेवर पाठव. काही दिवसांनंतर... ऑडिटनंतर साहेबांची बदली निश्चितच आहे. नवीन अधिकारी आले की, सारे सुरळीत होईल."

"ते होईल रे. पण या हलकटाने..."

"अरे, सुहासिनीच्या मोकळेपणाचा फायदा घेऊ पाहतोय." निलेश म्हणाला.

"अरे, हसणे, बोलणे मोकळे असले म्हणजे काय..."

"ते जाऊ देत. तू अगोदर घरी जा. तिलाही फार मोठा धक्का बसलाय. तिला सांभाळ. सायंकाळी मी अशोकला घेऊन येतो. जा." निलेश म्हणाला...

सुबोध घरी आला. पाहतो तर सुहासिनी पलंगावर उशीमध्ये डोकं खुपसून रडत होती. त्याही परिस्थितीत सुबोधला आठवले की, लग्नापूर्वी आणि लग्नानंतर सुहासिनीला त्याने फारसे रडताना पाहिले नव्हते. तसे पाहिले तर एका अर्थाने तिचा लैंगिक छळ होत असूनही कधी तिच्या डोळ्यात अश्रूंची दाटी झाली नव्हती. सुब सुहासिनीजवळ पोहोचला. तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाला,

"सुहा.. ऐ सुहा, अग सुहासिनी..."

त्याचा आवाज ऐकून अचानक सुहासिनी उठली. सुबोधची कॉलर धरत म्हणाली,

"का.. का.. नकार दिला? त्यांची ऑफर स्वीकारायची असती ना. तुम्हालाही मला दुसऱ्याच्या मिठीत पाहायचे डोहाळे लागलेच आहेत ना? मग अनायासे संधी चालून आलीय तर तुमचे अवसान का गळाले? पाय का माघारी फिरले?"

"सुहा, अग सुहा, असा वेडेपणा करू नको. अग, माझ्या आणि साहेबाच्या विचारात जमीन- आस्मानाचा फरक आहे."

"कशाचा फरक आहे नि काय? दोघांचा उद्देश, हेतू तर एकच आहे ना, माझ्यासाठी दुसऱ्याची मिठी!

शरीर माझे परंतु निर्णय तुमचा, मार्ग तुमचा. जा. जा. साहेबांना होकार द्या. आजवर दोघांनी मिळून करोडो गिळले आता माझ्या माध्यमातून अब्जावधी घशाखाली घाला..."

"सुहासिनी, थोडं ऐकून तर घे. असा आक्रस्ताळेपणा करू नको. अग, माझा जो विचार आहे, त्यात माझा यत्किंचितही स्वार्थ नाही. शरीरसंबंधाच्या बाबतीत तुझी होणारी परवड मला पाहवत नाही म्हणून मी तसा विचार करतोय. तुला ते नको असेल, मिळत असलेल्या सुखात तू समाधानी असशील तर..."

"माझं सुख कशात आहे ते ठरविण्याचा अधिकार मला देणार आहात का? का तुम्हाला वाटतंय म्हणून मी वेश्यालयाचा..."

"मला समजून घे, सुहा. माझा तसा विचार मुळीच नाही."

"कदाचित तसंही असेल. परंतु माझी स्थिती? माझ्या भावना? त्याचे काय? आणि सुखाची व्याख्या काय? तुला का त्या प्रसंगी सुख मिळणार आहे? कुणाच्या मिठीत कशाला? साहेबांनी फक्त 'तो' पर्याय सुचविला तर तुम्ही आकाश पाताळ एक केले. खरेच त्यावेळी मला तुमचा केवढा अभिमान वाटला म्हणून सांगू? वाटलं तिथंच थांबावं, तुमचं कधी न पाहिलेलं रुप पाहावं, ह्रदयात साठवावं, तुमचे शब्द ऐकावेत परंतु त्याचवेळी इतरांच्या नजरा मला नग्न करु पाहत होत्या. जे शब्द तुम्हाला ऐकवले नाहीत ते तुम्हीच वास्तवात आणू पाहताय? माझे ते रुप तुम्हाला बघवेल?"

"नाही, सुहा नाही. मी पाहिलेल्या रुपात आणि त्या रुपात खूप फरक आहे गं. आज.. आज सकाळीच मी माझ्या योजनेसाठी.. तुझ्या संदर्भात साहेबाचा एक क्षण... एकच क्षण विचार केला परंतु माझ्या कल्पनेतल्या पुरुषाच्या रुपात आणि साहेबाच्या रुपात मला फार मोठा फरक जाणवला. मी तो विचार सोडून दिला आणि काही वेळातच साहेबांचे ते रुप माझ्यासमोर आले."

"आई...आई.. तू आज मला न्यायला का नाही आलीस?" निलेशसोबत आलेला तीन वर्षांचा अशोक सुहासिनीला बिलगत म्हणाला.

"आई, तू का रडतेस गं?" सुहासिनीच्या डोळ्यातील पाणी पाहून अशोकने विचारले. वातावरणातील तणाव निवळावा म्हणून निलेश म्हणाला,

"सुबोध, अरे, पोरगं हुशार आहे रे. खरं तर त्याचं बालवाडीचे वय परंतु या गावात ती व्यवस्थाच नाही. कार्यालयातून आलात की, कुणी एक जण त्याच्याकडे लक्ष देत रहा. आमच्या लक्ष्मीसारखं सुहासिनीचे नाही. तिला अशोकला शिकवायला जड जाणार नाही. सुबोध, चल. येतोस का बाहेर?" निलेशने विचारले आणि सुबोध बाहेर जाण्यासाठी निघालेला पाह सुहासिनी म्हणाली,

"लवकर या. मी स्वयंपाक करते. निलेश, तुम्हीसुद्धा जेवून जा."

"नको. नको. मी घरीच जाणार आहे. लक्ष्मी वाट पाहते. आता तिलाही शहराचं वारं लागलंय. स्त्रीमुक्तीचा जयघोष करु लागलीय." निलेश म्हणाला तसे सारेच खळखळून हसले. वातावरण बरेच बदलले. तशाच मोकळ्या वातावरणात ते दोघे बाहेर पडले...

नंतरचा पंधरा दिवसांचा काळ कसा गेला ते कुणालाच समजले नाही. सुहासिनी रजेवर असली तरीही सुबोधचा बराचसा वेळ कार्यालयीन कामातच जात असे. आकडेमोड करताना त्याचा जीव त्रस्त होत असे. साहेबांनी रजेवर जाण्याचे ठरवले परंतु वरिष्ठांनी परवानगी दिली नाही. वातावरण कसे साशंक होते. त्या कार्यालयात झालेला आणि पर्यायाने साहेबांनी केलेला भ्रष्टाचार उजेडात आणण्याचा जणू वरिष्ठांनी चंग बांधला होता. जसजसा ऑडिटर येण्याचा दिवस जवळ येत होता तसतशी सुबोधची घाई वाढली होती. आकडेवारी जुळवताना त्याला एक भीती वाटत होती की, आपण केलेला आकड्यांचा खेळ त्यांना समजला तर? पैशाचे काही नाही ते भरता येतील पण बदनामीचे काय? त्याचा स्वतःचा भ्रष्टाचार उघडकीस आला तर? पूर्वीप्रमाणे त्याला हात झटकता येणार नव्हते. पूर्वी तो भ्रष्टाचाराच्या एका रुपयाचाही कानकोंडा नसे. परंतु यावेळी तो हिस्सेदार होता. साहेबांनीच त्याला भ्रष्टाचाराच्या महासागरात पोहायला, हातपाय मारायला शिकवलं होतं. पैसा भरला तरी इज्जत जाणार होती...

साहेबांनी ऑडिटपूर्वी कार्यालयीन कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी 'ज्याचं त्यानं पाहून घ्यावं' असे स्पष्टपणे सांगितले. सर्वांचेच हात बरबटलेले होते. अनेकांचा तसा सरळ संबंध नव्हता. कुणावर काही शेकणार नव्हते. प्रश्न होता, साहेब आणि सुबोधचा! त्यांच्यासाठी कोण नसतं झेंगट लावून घेणार होते?

येणार... येणार.. असे गाजत असलेले तपासणीस एकदाचे पोहोचले. आल्याबरोबर त्यांनी सरळ तपासणी सुरू केली. त्यांच्या एका बाजूला सुबोध आणि त्याच्याशेजारी साहेब बसले होते. दोघांचे चेहरे उतरलेले, काळवंडलेले होते. भविष्याची चाहूल जणू दोघांनाही लागली होती. करड्या नजरेने तो अधिकारी चाणाक्ष जाळे आकड्याच्या सागरात फेकत होता आणि प्रत्येकवेळी आकडा गळाला लागताच एका विशिष्ट अंदाजात भुवया उंचावून, 'हूं...हूं.. असे आहे तर.' असे म्हणत डाव्या हाताने चष्मा वर करायचा आणि उजव्या हाताने काही आकडे जवळच्या कागदावर लिहायचा. नंतर त्या दोघांकडे पाहायचा. त्यांच्या त्या न्यायमूर्तींप्रमाणे भासणाऱ्या करड्या नजरेला नजर द्यायची हिंमत दोघांमध्ये नसल्यामुळे ते पटकन नजर वळवायचे.

"असा एकंदरीत खेळ आहे तर? बराच माल कमावलेला दिसतोय. आं..आं.. काहीच वाटले नाही? अहो, देश तिकडे जागतिक बँकेकडे वारंवार हात पसरतोय आणि त्याच कर्जाऊ पैशातून तुम्ही तुमच्या बँका भरत आहात. ईट ईज व्हेरी बॅड! तुम्हाला..."

"साहेब, जाऊ द्या ना. घ्या ना, मिटवून. नेहमीपेक्षा पर्सेंटेज वाढवून देतो..." सुबोधचे साहेब जाळं टाकत म्हणाले.

"का..य? मला लाच देता? लाज नाही वाटत? थांबा. तुम्ही मला याठिकाणी नको आहात..." असे म्हणत त्यांनी स्वतःजवळ असलेल्या लॅपटॉपवर एक पत्र तयार केले. त्याची प्रत काढून त्यावर स्वाक्षरी केली. तो कागद त्यांच्याकडे देत म्हणाले,

"हे घ्या. तुम्ही आजच्या आज हेडऑफीसला हजर व्हा..." पाठोपाठ सुबोधकडे बघत म्हणाले,

"तुम्ही सकाळी या. तुमचाही निर्णय लागेल."

सुबोध आणि त्याचे साहेब दोघेही बाहेर येताच साहेब म्हणाले, "घ्या. आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेतलात ना?"

"तुम्ही तरी दुसरे काय पाडून घेतलेत पायावर? पैसे खाताना..."

"ते नाही म्हणत मी. पैसा पचविताही आला असता आणि आणखी मिळविताही आला असता. परंतु तुमच्यासारखे महामुर्ख..."

"व्वा! साहेब, व्वा! ठीक आहे, मी महामुर्ख! पण तुम्ही तरी महामुर्ख ठरु नका. अजूनही वेळ गेली नाही. साहेबांना घेऊन स्वतःच्या घरी जा. त्यांचा चांगला पाहुणचार करा. कदाचित तुम्ही वाचाल.." एका नाकपुडीवर बोट ठेवत सुबोध म्हणाला तसे साहेब तणतणत निघून गेले. सुबोध एक विचार करीत पुन्हा कार्यालयात आलेला पाहून तपासणीस शांतपणे म्हणाले,

"मि. सुबोध, मी तुमच्याबद्दल साशंक आहे, द्विधा आहे."

"साहेब, मला माझी बाजू मांडण्याची एक संधी मिळावी. मी खोटे नाही बोलणार. हवं तर कार्यालयात कुणालाही विचारा. मी पण अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत होतो..."

"मग काय झाले?" तपासणीसांनी विचारले. तसे सुबोधने त्यांना सारे सारे ऐकवले. अगदी सुहासिनीबाबतचा साहेबांनी ठेवलेला प्रस्तावही सांगितला. ते ऐकून ते म्हणाले,

"अस्सं आहे काय? मला बदनाम करतात काय?"

"साहेब, माफ करा. कृपया मला अडकवू नका. माझ्या वाट्याला आलेला पै न पै मी भरायला तयार आहे. अगदी शपथेवर सांगतो. मला सांभाळून घ्या. मी संसारी माणूस आहे. पूर्ण आयुष्य आहे..."

"पैस खाताना हा विचार का आला नाही?"

"नाही. साहेब, नाही. आपण म्हणत असाल तर कमावलेला सारा पैसा तुमच्या पायावर घालीन पण मला वाचवा."

"मिस्टर सुबोध, तुम्ही म्हणताय तर... महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जे सांगताय ते तुमच्यासोबत काम केलेल्या एका अधिकाऱ्याने... पाटीलसाहेबांनी तुमच्याबाबत.. तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल सारे सांगितले होते. ठीक आहे. असे करा..." म्हणत साहेबांनी हलकेच एक आकडा लिहून तो कागद सुबोधकडे सरकवला. सुबोधने त्याच रात्री ती रक्कम साहेबांच्या हवाली केली. सारे प्रकरण मिटले. त्या अधिकाऱ्यांनी सुबोध निर्दोष असल्याचे मत नोंदवून त्याची सुटका केली आणि त्याच्या साहेबांना बडतर्फ करण्याची शिफारस केली.

पंधरा दिवसांनी सुबोधच्या साहेबांच्या बदलीचे आदेश आले. वरिष्ठ कार्यालयात साहेबांनी बराच चंदा वाटून बडतर्फीऐवजी बदली करून घेतली अशी चर्चा करण्यात आली. 'लाथ मारावी नि गादी मिळावी' अशी अवस्था साहेबांची झाली. बदलीही अशा ठिकाणी करण्यात आली की, तो एक आदिवासी जिल्हा होता. विशेष योजनांची त्या जिल्ह्यात रेलचेल होती. सुबोध निर्दोष ठरला तरीही त्याची बदली दीडशे किलोमीटर अंतरावर एका गावी झाली. सुहासिनी मात्र रजेनंतर पुन्हा हजर झाली मात्र कार्यालयातील सर्वांचीच तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली होती...

*****