Aaghat - Ek Pramkatha - 8 books and stories free download online pdf in Marathi

आघात - एक प्रेम कथा - 8

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(8)

‘सुरेश, आज सुमैयाचा मूड काही वेगळाच होता. ती मला या अवतारात कधीच दिसली नव्हती. ती खूपच भावूक झाल्यासारखी दिसत होती. मला वाटतंय घरामध्ये तिचं काही बिनसले असले. मला सारखं म्हणत होती.’’

‘‘तुला माझ्यापेक्षा मित्रांची जास्त फिकीर आहे. मला विसरू नको. माझी आठवण आली तर मला आठवत रहा. हे तिचं विचित्र बोलणं मला काहीच समजत नव्हतं.’’

माझं हे बोलणं सारे अगदी मन लावून ऐकत होते. हॉस्टेलजवळ आलं तसं आमचं बोलणं थांबलं, पाहतो तो जवळजवळ सगळे विद्यार्थी सुट्टीला गेले होती. आम्ही गडबडीने खोलीमध्ये गेलो. भरभर अर्ज करू लागलो. इतक्यात कांबळे सर आमच्या खोलीमध्ये आले.

‘‘अरे काय कुठे होता? इतका वेळ?’’

‘‘गावाकडं जायची गडबड दिसत नाही. कधी जायचा बेत आहे?’’ ‘‘चार वाजण्याच्या दरम्यान जाणार आहोत.’’

‘‘पेपर संपले का?’’

‘‘हो, संपले सर!’’

‘‘कसे गेले पेपर?’’

‘‘चांगले गेले सर.’’

सरांच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मीच देत होतो. अनिल, सुरेश, दिलीप तिघेही आवरा-आवरीच्या गडबडीत होते.

‘‘तिघांना गावी जायची मोठीच गडबड दिसतेय.’’ हसत हसत सर म्हणाले. मीही मित्रांकडे व सरांच्याकडे पाहत पाहत हसरा कटाक्ष टाकला.

‘‘काय रे, मी काय बोलतोय ते लक्षात येतंय का?’’

सरांचा करारी, मोठा आवाज जाताच तिघेही गोंधळून गेले. आवराआवरी जागच्या जागी थांबविली. आणि सरांकडे पाहू लागले.

‘‘ठीक आहे. आवरा.. आवरा...’’ म्हणाले आणि सर निघून गेले. सगळयांची आवराआवर संपली. सरांकडे अर्ज सोपवून आम्ही स्टँडकडे जावू लागलो. सुरेश साताऱ्याला तर संदिप रत्नागिरीला जाणार होता. तर मी आणि अनिल माळवाडीला जाणार होतो.

सुरेशच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी दिसत होती. तो काहीच बोलत नव्हता. तो कोणत्यातरी विचारात दिसत होता. गाडीची वाट पाहत आम्ही सारेजण स्टॅण्डवर थांबलो होतो.

‘‘सुरेश बोलत का नाहीस? काय विचार करतोयंस?’’

‘‘काही नाही. सहजच.’’

‘‘नाही सुरेश तुझ्या मनात काहीतरी चाललंय. तुझा चेहरा का आज असा पडलाय? मला सांगितल्याशिवाय मी इथून तुला जाऊ देणार नाही.’’

‘‘मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. तू सांगितलेल्या एका घटनेवरून माझ्या मनात वेगळाच विचार घुटमळतोय. तुला सांगितल्याशिवाय मला राहवणार नाही. त्या गोष्टीवरून मी खूप अस्वस्थ आहे. पण ही वेळ योग्य नाही. पत्राद्वारे तुला माझा मनातलं सांगितलं तरी चालेल का?’’

‘‘नको सुरेश असे अर्धवट बोलून माझा जीव टांगणीला लावू नको. मला आताच सांग.’’

‘‘ती गोष्ट सांगण्याची ही वेळ नाही. मी चारच दिवसात तुला पत्र पाठवून कळवेन.’’

अनिलने आणि संदिपनेही माझी समजूत काढली. मी राजी झालो. इतक्यात आमची गाडी लागली. सुरेशचा आणि संदिपचा मी आणि अनिलने निरोप घेतला. सुरेश काय सांगणार होता मला? त्याने का सांगितलं नाही? कोणती गोष्ट होती ती इतकी महत्त्वाची? या विचारातच गाव कधी आलं ते कळलंच नाही. पण गावात पोहचल्यानंतर तरी तो विचार थांबणार होता. सुरेशनं मला कोड्यात टाकलं होतं.गावी आलो होतो. आता दररोजचा दिनक्रम ठरलेलाच होता. शेताकडे जाणं, जनावरांना चारापाणी, मजुरीला जाणे, मजुरीच्या चार पैशांतून शिक्षणाचा खर्च भागविणे.

प्रत्येकजण गावात कौतुक करायचा. ‘‘पोरगं कष्टाळू हाय. नाव कमावलं, कामाच्या पैशातून शिक्षणाचा खर्च भागवतंय.’’ असं प्रत्येकजण म्हणायचा. मनाला बरं वाटायचं. आजीआजोबांसमोर माझं कोणीतरी कौतुक करायला लागलं की त्यांच्या डोळयात अश्रू यायचे.

‘‘पोराचा लय कष्टातून सांभाळ केलाय. बारकं असताना आईबाबा गेलं, पोर उघड्यावर पडलं. पण त्याला आईबाबाची उणीव कवा आम्ही भासू दिली नाही. आमची परिस्थिती एवढी गरिबीची असून सुध्दा घासातला घास घालून पोराला जतन केलया आणि त्याची जाण ठेवून पोरानंही कष्ट घेतलया, आम्हाला कवा दुखवलं नाही. स्वत:चं पोरगं आम्हाला एका शब्दानं बोलवत नाही. की

साधी चौकशी करीत नाही. तेचं तो वेगळा हाय. घरात मी आणि म्हातारी,पोराची आम्ही आशा सोडून दिलीया. त्यानं आम्हाला उघड्यावर पाडलं, पण आम्ही उघड्यावर येणार नाही. आम्ही अजून खंबीर हाय! आता एकच आस हाय डोळयाला नातवाचं चांगलं झालेलं बघायचंय आमाल, बीन आईबाचं पोर कोण हाय आमच्याशिवाय त्याला?’’

अशा रीतीनं कोणीही आपुलकीनं चौकशी करायला लागलं की आजोबा भरभरून सांगायचे.

गावी गेलो की आजी गोडधोड काहीतरी खायला करायची. पोरं माझं लय गुणाचं. त्या शहराच्या ठिकाणी शिस्तीत रहा. तब्येतीची काळजी घे. पोटाला खाईत जा. कुणाला दुखवू नको. हे आजीचे चार उपदेशपर शब्द असायचे.

तुझ्याशिवाय पोरा कोण हाय आमाला, तुझ्या आशेवरच चार दिसं जगतोय आम्ही. अशी आजी म्हणायची व रडायची. लेकानं दूर लोटण्याची खंत तिच्या मनात सलत राहायची. मी त्यांच्याविना अधांतरी ते माझ्याविना अधांतरी होते. आजीला वयोमानानुसार होत नव्हते. पण ती मजुरीला जायची कारण त्याच्याशिवाय घर चालणं कठीण. कारण त्यांचं पोरगं काहीच देत नव्हतं. तो बायकापोरांसह वेगळा होता. पण आजीआजोबांचं करारी मन त्यांच्या समोर झुकणारं नव्हतं. आजोबा सुद्धा ८० व्या वर्षी रानाची वाट चालत होते. तो ध्यास,ती आस मनाशी बाळगून नातू चार दिस सुखाचं घेऊन येईल. आमच्या जीवनातला अंधार असाच राहणार नाही. एक दिवस प्रकाशाचा किरण घेऊन नातू येईल.

हे त्यांचं चारचौघातलं बोलणं, त्यांचं या वयातील राबणं, झुंज देणं, माझ्याबद्दल प्रेम , करारी बाणा मला प्रेरणा द्यायचा. हे सगळं ऐकल्यावर मी अभ्यासाला लागायचो. होय, एक प्रकाशाचा किरण घेऊन जायचंय मला. जगाला दाखवून द्यायचंय. बीन आईबाचं पोरं उपकाराची जाणीव ठेवून काय करू शकतं ते. या जिद्दीने मी पेटून उठायचो. मलाही मग एक नवा प्रकाश किरण दिसायचा. तो माझ्या वाटा उजळणारा होता. आणि आजी-आजोबांना सुखवणारा होता. सुट्टी मजेत जात होती. सुट्टीच्या दिवशी मजूरीमधून जे मिळालेले पैसे असायचे त्यातले थोडे आजीआजोबांना देण्यासाठी गेलो की ते घ्यायचे नाहीत. म्हणायचे,

‘‘हे बघ पोरा, तुझा ह्यो पैसा आम्हाला नको. तू आमची फिकीर करू नकोस. तुझा शिक्षणाचा खर्च मोठा हाय! तुझं तुलाच ते चार पैसं ठेवं.

आमच्या पोटापाण्याची काळजी करू नकोस. आमचं हात-पाय घट्ट हायत तोपर्यंत.’’त्यांचं हे बोलणं ऐकून मनाला उभारी यायची. या वयातही ही लोक कुणाच्या चार पैशांची आशाअपेक्षा धरत नाहीत. या माया, ममतेने भरलेल्या मायमाऊलींनी मला नाकारलं नाही. नि:स्वार्थी मनानं त्यांनी माझा सांभाळ केला. कशाचीही अपेक्षा न करता. मी शहाणं व्हावं, नाव मिळवावं ही त्यांची मनो न इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करणं मी माझे कर्तव्य मानत होतो. त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलवून त्यांचं स्वप्न साकार झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला मला पाहायचा होता.

सुट्टी पडून जवळ जवळ महिना संपत आला होता. मनाला धास्ती वाटत होती. सुरेश मला जी गोष्ट सांगणार होता, ती काय असावी? त्यानं मला त्यावेळी का सांगितली नसावी? त्याचा त्यावेळचा चेहरा एवढा गंभीर का असावा? माझ्या हातून कोणती चूक तरी झाली नसेल ना? चारच दिवसांत पत्र पाठविणारा हा, महिना संपत आला तरीसुद्धा कसे काय पत्र पाठविले नसेल. नक्कीच त्याला ही गोष्ट मला सांगायची तर नसेल, की मला ही गोष्ट सांगण्याबाबत त्याच्या मनाची व्दिधा मन:स्थिती होत असेल हे आणि अनेक अशा प्रकारचे विचार मनात सतत घोळत होते. मन चिंतातूर झालं होतं.

तरीही मनाला विश्वास वाटत होता की नक्की येईल आपल्याला सुरेशचं पत्रं आणि खरोखरच मनाला वाटणारा विश्वास खरा ठरला. बरोबर सुट्टी सुरू होऊन २० दिवसानंतर ते पत्रं आलं होतं. पत्र येताच ते मी घाईगडबडीत घेतलं. आणि घराच्या पाठीमागे जाऊन घाईघाईने वाचू लागलो.

प्रिय प्रशांत...

प्रथम मला माफ कर. मी तुला सुट्टी पडल्यानंतर चारच दिवसात पत्र पाठवितो म्हटलं होतो पण काय करणार. तुला ही गोष्ट सांगावी की नको तू मनाला तर लावून घेणार नाहीस ना हे विचार मनात येत होते.

*****