Prem ase hi - 3 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम असे ही (भाग 3)

मागील भागावरून पुढे...


" तिचे नाव आराध्या...." तो शांत पणे म्हणाला..त्याचे डोळे पुन्हा पाणावले.. काय माहित पण त्याची अवस्था बघून तिला पण वाईट वाटले.

" आम्ही दोघे कॉलेज ला एकत्र होतो.. सुरवातीला निखळ मैत्री होती. पुढे कधी आम्ही एकमेकात गुंतत गेलो कळलेच नाही.. कॉलेज संपले तरी आम्ही सोबत होतो.. मी पाहिले असा नव्हतो ग.. हे पिणे , रात्रीचे पार्ट्या वैगरे हे सगळे तिला विसरायला करावे लागते.. पियालो की कळतच नाही कधी झोप लागते.
खुप प्रेम करायचो ग मी तिच्यावर... "

" मग असे झाले तरी काय ? " आरतीने त्याची लिंक न तोडता त्याला बोलता ठेवत होती.

" गेली ती... माझ्या बरोबर लग्नाच्या आणाभाका घेऊन शेवटी आईवडिलांच्या मर्जीने लग्न करून मोकळी झाली... माझ्या बद्दल काहीच विचार केला नाही की तिच्या शिवाय माझे काय होईल... "
" जाताना म्हणाली मला विसरून जा.. आता तु सांग हे शक्य आहे... अग थोडी थोडकी नव्हे पाच वर्ष आम्ही सोबत होतो. सगळ्यांना वाटायचे की, हे लवकर लग्न करतील.. पण कसले काय ?" त्याने पुन्हा एकदा डोळे पुसले.
आरतीला त्याची कहाणी ऐकून खूप वाईट वाटले..पप्पा नी पण मी ह्यातून बाहेर पडावे , कामात गुंतून राहावे म्हणून मला इथे ठेवले आहे. पण माझे कामात लक्षच लागत नाही त्याला मी तरी काय करू ?
त्या दिवशी तुला मी कॉल चुकीने पाठवला नव्हता.. तर मुद्दाम पाठवला होता...

" काय ? " ती दचकलीच...

" हो... तुझे डोळे अगदी तिच्या सारखेच आहेत. मोठे टपोरे.. काळेभोर..." तिच्या चेहऱ्यावरून त्याच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसत नव्हता ते कळून येत होते. हा परत तर नाहीना आपल्या बरोबर फ्लॅटिंग करत तिच्या मनात शंका होती...

" थांब.." त्याने मोबाईल काढून तिला आराध्याचा एक फोटो दाखवला... आणी तो फोटो बघून तिला विश्वास बसला.ती दिसायला एकदम सुरेख होती. तिच्या समोर आरती म्हणजे काहीच नाही.. तिला स्वतःची जरा लाज वाटली.. अश्या मुली बरोबर असणारा मुलगा आपल्या मागे लागेल ? त्या दोघांच्या फोटोनी त्याचा सगळा मोबाईल भरला होता..

" छान आहे... " ती आपले म्हणायची म्हणून बोलली..

" पण काय उपयोग त्याचा...? मला तर एकटे टाकून गेली नां ? "

" अरे एव्हडे कशाला नाराज होतोस.. कोणीतरी दुसरी येईल आयुष्यात... "

" तु कधी प्रेम केलेस ? "

" काय ? "

" हो... तु कधी प्रेम केले आहेस का ? " त्याने पुन्हा आपल्या प्रत्येक शब्दावर जोर देत म्हंटले.

" नाही... "

" मग तुला कळणार नाही... "

" ह्म्म्म... " ती विचार करत होती हां तिच्यात खूपच गुंतला होता. अश्या मुलाला सोडून ती तरी खुश असेल...
आणी तेव्हड्यात त्यांचे जेवण आले.. म्हणून दोघांनी जेवायला सुरवात केली... जेवण जेऊन ते तेथून तिच्या घरी निघाले...

तिला त्यांनी अगदी दारा पर्यंत सोडले.. आई बाबा तिचीच वाट बघत होते. तिला आलेली बघून त्यांना हायसे वाटले..

" ये रे बाळा आता ये .. थोडा चहा तरी घेऊन जा..." आईने ममतेने म्हंटले...

" नको... आता फार उशीर झालाय... मला पण घरी जायचे आहे... "

" घे नां जराश्या चहाने काय होतेय... मी नाही का आता तुझ्या साठी एव्हडा वेळ थांबली... " आरतीने त्याला आठवण करून देत म्हंटले..

" बरं.. पण अगदी जरासा.. आताच जेवलोय..." आई चहा करायला गेली. आणी तो बाबा समोर बसला...

" तु हिच्या बरोबरच काम करतोस काय? किती वर्ष झाली ? आणी कंपनी कशी आहे ?" बाबांनी साधारण माहिती मिळवण्यासाठी विचारले.

" अहो बाबा त्यालाच काय विचारताय , त्यांच्याच कंपनी बद्दल... "

" म्हणजे... मला समजले नाही. " बाबांनी विचारले.

" अहो बाबा हे पटवर्धन सरांचे चिरंजीव आहेत.. मला कॉल पाठवला होता नां तो हाच.... करण... "

" आच्छा.... मग सोबत काम ? "

" हां तो पण आमच्या बरोबर काम करतो... "

" ह्म्म्म..." करण ने त्यांच्या सगळ्या खोलीवरून नजर फिरवली.. त्यांच्या साधारण परिस्थितीची कल्पना त्यावरून येत होती.. आपण चांगलेच केले की हिला कॉल पाठवला.. त्याने मनातल्या मनात विचार केला.. खरोखर हिला गरज होती.. नाहीतर सगळा पगार आपल्या कपड्यावर आणी मेकअप वर उडवणाऱ्या मुलीला हा जॉब भेटून काही उपयोग नव्हता.. जिला खरोखर गरज होती तिलाच हा जॉब मिळाला होता . त्याला समाधान वाटले..

चहा घेऊन करण परत निघाला.. आणी सरळ घरी आला. बऱ्याच दिवसांनी तो लवकर घरी आला होता. त्याच्या स्वतःचा स्वतंत्र फ्लॅट होता अंधेरी भागात... तर पप्पा आणी मम्मी... जुहू ला बंगल्यात राहत होते. आपल्या रात्री उशिरा येण्या जाण्यात अडथळा नको म्हणून त्याने आईच्या मागे लागून हा फ्लॅट घ्यायला लावला होता.. आता त्याला टोकणारे इथे कोणी नव्हते....

लवकर झोपल्यामुळे त्याला सकाळी लवकर जाग आली.. आपले सगळे आवरून तो शार्प दहा वाजता गेट वर पोचला... त्याला माहित नव्हते की आरती पण दहा वाजता येते ते... ती जास्त करून लेट येणारा माणूस होता त्यात काल उशीर झाला असल्यामुळे ती लवकर येईल अशी काही शक्यता नव्हती... पण दहा वाजता ती पण गेट वर आली..

" अरे तु ? ते पण चक्क अर्धा तास आधी ? आज सूर्य कोठून उगवला म्हणायचा...? " तिने गमतीने विचारले...

" हां..आता तु पण घे मज्जा... " तो म्हणाला... आणी दोघे आत जाऊ लागले..

" चहा घेणार...?" तिने विचारले...

" हो चल घेऊया... " दोघे आत कँटीन मध्ये शिरले.. आणी थोड्या वेळानी तिथे जुई आणी रीमा पण त्यांना जॉईन झाल्या... त्याला आज इथे बघून त्या पण चकित झाल्या. जुई आणी रीमा बरोबर त्याचे वागणे अगदी मोकळे होते... अगदी खुप घनिष्ट मैत्री असल्या सारखे... पण आरती बरोबर तो काहीशे सांभाळून वागत होता.. कारण एकदा तिने त्याला खूप ऐकवले होते... आणी परत एकदा ऐकण्याची त्याची इच्छा नव्हती..

त्या दिवशी दुपारी तिला पटवर्धन सरांनी आपल्या केबिन ला बोलावले..

" आरती मॅडम , मोठ्या साहेबांनी तुम्हाला बोलावले आहे. " प्युन सांगत आला. आणी तिचा चेहरा पडला... नक्कीच आपल्या हातून कालच्या फाईल्स मध्ये गडबड झाली असावी.. ती भयंकर घाबरली.. आपसूक तिची नजर करण वर गेली. तिची अवस्था बघता तो पटकन उठून तिच्या जवळ आला.

" काय झाले आरती ? बरं वाटत नाही का ? "

" सरांनी बोलावले आहे.. काल आपण चेक केलेल्या फाईल्स मध्ये काहीतरी गडबड झालीय असे मला वाटतेय... "

" छे... काल आपण कितीवेळ परत परत फाईल्स चेक केल्या.. जर एखादी चुक असती तर निश्चित आपल्या लक्षात आली असती... " त्याने पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले.

" नाहीरे काहींना काही घोळ असेलच त्या शिवाय का मला सरांनी बोलावले असेल ? "

" अहं... मला नाही वाटत... "

" मला तर खूप भीती वाटतेय..." ती थरथरत्या आवाजात म्हणाली.

" तु तुझे तर्क , अंदाज आधी बाजूला ठेव. कदाचित वेगळी काही गोष्ट असू शकते. बी पॉजिटीव्ह..." तिला धीर देत म्हणाला.. पण बोलताना स्वाभाविक पणे त्याचे हात तिच्या खांद्यावर आले... तसें अशी क्रिया करणे त्याच्या साठी सामान्य होते. पण ती मात्र जरा गडबडली.. कारण असे तिच्या सोबत कधी झाले नव्हते खासकरून तिच्या सोबत घडलेला प्रकार झाल्यावर तर नाहीच...
पण त्याच्या त्या स्पर्शात जादू होती.. तिला जरा धीर आला. वरून त्याचे आश्वासक बोलणे जरा बरे वाटले.. ती पूर्ण आत्मविश्वासाने सरांच्या केबिन ला गेली.

" मे आय कम इन सर...? "

" एस... मिस. आरती.... "
" मिस आरती तुमच्या कामावर मी खूप खुश आहे. तुमच्या कामावरील निष्ठा बघून मी असे ठरवले आहे की तुम्हाला इथे कायम करावे..." जास्त पल्हाळ न लावता पटवर्धन सर म्हणाले... आणी ती ऐकत बसली.. हा विचार तिच्या डोकयात अजिबात आला नव्हता.. कसा येणार? त्यांनी सहा महिने सांगितले होते.. आणी इथे तर पाच महिने झाल्यावरच तिला कन्फर्म करण्यात आले होते.

" थँक्यू सर.... थँक्यू... "

" असेच कामावर लक्ष द्या.. कालच्या फाईल्स वरील काम छान झाले होते.. मी स्वतः चेक केली.. एकही चूक आढळली नाही.. उशिरा काम करून ही आज तुम्ही पुन्हा वेळेवर आलात.. तुमचे कामाप्रती असलेले समर्पण बघून खरोखर आनंद झाला. तुम्हाला इथे कामाला ठेऊन मी कोणतीही चूक केलेली नाही... "

" थँक्यू सर... "

" या... आता तुम्ही... संध्याकाळी तुम्हाला लेटर मिळेल... काँग्रॅजुलेशन.... "

" थँक्यू सर... थँक्यू सर..." ती पुन्हा पुन्हा त्यांचे आभार मानत एकदम प्रफुल्लीत चेहऱ्याने त्यांच्या केबिन बाहेर आली... करण तिच्या येण्या कडेच डोळे लावून बसला होता.

" ह्म्म्म... जाताना ची तु आणी आता बाहेर आलेली तु दोघात खूप फरक आहे... " त्याने हळूच तिच्या जवळ जातं म्हंटले..

" मला कन्फर्म केले आहे..." ती म्हणाली...

" काय ? अरे वाह.... कॉंगर्जुलेशन..." रीमा आणी करण दोन बाजूने दोघे ओरडले..

" थँक्स... करण , तुझ्या मुळेच मला हा जॉब मिळाला आणी आता मी कायम पण झाली... "

" ह्म्म्म... पण तरीही तु मला अजून काही पार्टी दिलेली नाहीस...." तो निराश स्वरात म्हणाला.. त्याचा तो स्वर आणी अभिनय बघून तिला खरोखर हसायला आले. हां वाटतो तेव्हडा काही वाईट नाही. तिच्या मनात सहज विचार आला.

" बरं बाबा... तुला पण पार्टी देईन.. आय प्रॉमिस..." शेवटी तिने मान्य केले..

" मला पण.. म्हणजे अजून पण कोणी आहे का ?" त्याने गमतीने विचारले.. त्याचा रोख कुणीकडे आहे हे तिच्या अचूक लक्षात आले...

" ए.. गप्प.. रीमा आणी जुई आहेत नां...? त्यांच्या बद्दल बोलतेय मी..." ती डोळे वटारून त्याच्या कडे बघत म्हणाली... तिचे ते बघणे... एकदम आराध्या... त्याच्या मनात विचार आला...

असेच पुढे दिवस जातं होते... हळू हळू आरती त्या ऑफिस ला रमून गेली... तिच्या एका बाजूला ज्ञान आणी दुसऱ्या बाजूला विनोदाचा झरा होता मग ती बोर कशी होईल ? तिचे मस्त चालले होते.
त्याच्यात पण आता खूप बदल झाला होता. तो आता रोज कामावर अगदी वेळेवर यायचा.. सकाळी चौघे सोबत चहा , कॉफी घ्यायचे आणी वर यायचे.. कामात पण आता तो भरपूर लक्ष देत होता.. मुळात तो खूप हुशार , विनोदी होता पण आराध्या प्रकरणामुळे तो काहीसा भरकटला होता..
त्याच्या त्या बदलावर पटवर्धन सर लक्ष ठेऊन होते. शेवटी त्यांचा एकच्या एक मुलगा होता.. त्यामुळे लवकरच त्याला देशपांडेच्या हाताखाली.. घेण्यात आले..
आणी त्यामुळे त्याला स्वतंत्र केबिन देण्यात आली.. त्यामुळे आता तो आरतीच्या बाजूला बसत नव्हता ... ती जागा आता रिकामीच राहिली होती.. तो गेला पण आरतीला एकदम सुनेसुने जाणवू लागले..इथे लागल्या पासून त्याची बडबड , नवीन नवीन किस्से ऐकून तिची चांगलीच करमणूक झाली होती... पण आता तो नाही म्हंटल्यावर सगळे शांत झाले होते.. आता फक्त काम एके काम...

एके दिवशी आईने छान पुरणपोळ्या केल्या होत्या.. आणी त्याला पुरणपोळ्या खूप आवडतात असे तो एकदा बोलता-बोलता बोलला होता ते तिच्या लक्षात होते.. म्हणून तिने जास्तीच्या चार पुरणपोळ्या घेतल्या.. रीमा आणी त्याच्या साठी....

दुपारी लंच मध्ये तिने त्याला आपल्याबरोबर जेवायला बोलावले.. रीमा , ती आणी तो.. तिघेच जेवायला बसले.. ह्या आधीही तिघे कितीतरी वेळा असे सोबत जेवायला बसले होते. तो काही डब्बा आणत नसे.. ह्या दोघीच त्याच्या साठी डब्बा आणायच्या...

" अरे वाह... आज पुरणपोळी ? "

" ह्म्म्म... आईने बनवली होती . तुला आवडते म्हणून तुझ्या साठी पण घेऊन आली..." ती म्हणाली..

" मस्तच झालीय... वरून तुपाची धार असती तर अजून पण मज्जा आली असती.. " पहिला घास खाल्ल्या खाल्ल्या तो म्हणाला... तिघे गप्पा मारत जेवले...

रीमा डब्बा धुवायला गेली त्या संधीचा फायदा घेत आरतीने त्याला त्याच्या पार्टी बद्दल विचारले.. त्यावर तो हसला.. म्हणाला मी मस्करी करत होतो.. त्याची काही गरज नाही..

" बघ हां... मी आता पार्टी देतेय तर तूच नको म्हणतोस... नंतर म्हणशील की मला पार्टी दिली नाही... "

" अजिबात म्हणणार नाही.ओके.. आणी थँक्स फॉर पुरणपोळी... माझ्या साठी हीच पार्टी आहे... थँक्स... "
तो हसून म्हणाला.. आणी हात धुवायला निघून गेला.. असेच अजून काही दिवस गेले.. आणी अचानक करण कामावर यायचा बंद झाला.. तीन दिवस झाले तो कामाला येत नव्हता...
तिने देशपांडे सरांना विचारले.. तेव्हा तिला कळले की तो आजारी आहे.. ती काळजीत पडली.. तिने रीमाला विचारले की त्याच्या कडे जाऊन येऊया का ? पण रीमाला काही काम असल्याने येता येणे शक्य नव्हते.. म्हणून मग तीच एकटी त्याच्या घरी निघाली. देशपांडेनी तिला त्याचा पत्ता दिला होता. म्हणजे तसें काही अवघड नव्हते.... त्यात दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने कामाला येण्याचीही लगबग नव्हती...

ठरल्या प्रमाणे ती आईबाबांना सांगून त्याच्या अंधेरीच्या बिल्डिंग चा पत्ता शोधात शोधात त्याच्या घरासमोर उभी राहिली.. दोन चार वेळा बेल वाजवून पण त्याने दरवाजा उघडला नव्हता... म्हणून ती काहीशी विचारात पडली आणी तेव्हड्यात तिला आतून लॅच उघडल्याचा आवाज ऐकायला आला.

" अरे तु ? आज इकडे कशी ? " त्याने मलूल आवाजात विचारले. त्याचा चेहरा बघूनच कोणीही सांगू शकले असते की त्याला खूप अशक्तपणा आलाय.. पडलेला चेहरा.. चार दिवसाचे वाढलेले दाढीचे खुंट...खांदे पडलेले... अंगात एक मळका टी-शर्ट आणी खाली एक शॉर्ट पॅन्ट... त्याला त्या शॉर्ट पॅन्ट मध्ये बघून तिला जरा लाजल्या सारखे झाले... ती दरवाज्यातच उभी बघून तो मागे जायला वळलेला थांबला.. क्षणभरा नंतर ती का थांबली ते त्याच्या लक्षात आले..

ये तु बस.. मी कपडे बदलून येतो.. आणी दरवाजा लावून घे... तो सहज म्हणाला पण तिच्या अंगावर काटा आला.. पण शेवटी मनाचा हिईया करत ती आत आली आणी तिने दरवाजा लावून घेतला.. असा पण तो आजारी आहे.. अशक्त आहे त्याच्या पासून आपल्याला काही धोका नाही असे मनाला समजावत ती आत आली आणी सोफ्यावर बसली... त्याने आपले कपडे बदलले आणी तोंडावर पाणी वैगरे मारून तो बाहेर येऊन तिच्या समोर बसला....

" अरे तु कामाला येत नव्हतास म्हनुन देशपांडे सरांना विचारले तर ते म्हणाले की , तु आजारी आहेस म्हणून तुला बघायला आली होती.. त्यांनीच मला पत्ता दिला होता. "

" ह्म्म्म... दोन दिवस भयंकर ताप होता... काल पासून ताप नाही पण अशक्तपणा आलाय.. " तो काय झाले ते सांगू लागला..
" तु काय घेणार चहा की कॉफी ? "

" मला काही नको... आणी तुला जमणार तरी आहे का करायला ? आपल्या अवस्थे कडे बघ एकदा... "

" अग काही नाही बनवीन मी... तुझ्या सोबत मी पण पीईन जराशी... "

" तुला प्यायची आहे नां मग राहूदे... मीच बनवते तु नको कष्ट घेऊ..." ती उठली.. आणी किचन मध्ये गेली.. थोडीशी शोधाशोध केल्यावर तिला कॉफी , साखर सापडली.. दूध फ्रिज मध्ये होते... कॉफी गॅस वर ठेऊन तिने सहज म्हणून नजर टाकली.. बेसिन मध्ये एकही भांडे नव्हते.. डस्टबिन मध्ये ही काही नव्हते.. म्हणजे चार दिवस ह्याने काही खाल्ले की नाही ?

" ह्म्म्म... घे... " एक कप त्याला देत तिने म्हंटले..

" थँक्स... यार.. खूप गरज होती... "

" जेवतोस की नाही...? "

" फार नाही पण काही तरी खातो... "

" खरं..? "

" हो... "

" बेसिन मध्ये काही भांडी नाहीत.. डस्टबिन मध्ये काही रॅपर , कागद नाही.. मग हवेतून येते काय सगळे ? "
तिच्या बिनतोड प्रश्नावर त्याच्याकडे उत्तर नव्हते.. तो आपला नुसताच फिक्कट हसला..

" जेवण बनवायला तरी सामान आहे का घरात ? असेल तर मी जेवण बनवते आज... "

" अग कशाला ? तु इथे माझ्या प्रकृतीची चौकशी करायला आलीस की जेवण बनवायला..? "

" आली होती तुला बघायला पण तुझी अवस्था बघता तु धड जेवत नाहीस हे दिसतेच आहे.. अश्याने लवकर बरा कसा होशील ? मला सांग मी करते पटकन जेवण.. "

" सगळे किराणा आहे.. फक्त हिरवा मसाला नसेल.. "

" बरं.. तो मी घेऊन येते... "

" नको कशाला... मी सांगतो वॉचमन ला तो पटकन आणूंन देईल..." त्याने पटकन फोन लावून वॉचमन ला सूचना दिल्या...
आणी थोड्या वेळातच हिरवा मसाला टॉमेटो वैगरे घरपोच आले...

तिने भरभर हात चालवत.. मऊ भात आणी साधे वरण थोडेसे लोणचे , पापड असा बेत केला...

दुपारी तो चांगला जेवला.. चार दिवसात पाहिल्यादा त्याच्या पोटात काही पौष्टिक गेले होते.. नाहीतर बिस्किटे , मॅग्गी ह्यावर त्याची गुजराण चालू होती.. अंगात उठायची ताकत नसताना आणखीन काय होणार ?

" आरती ! थँक्स... आज तुझ्यामुळे चार घास तरी माझ्या पोटात गेले...आज जर आराध्या असती तर....." तो अचानक बोलून गेला... आणी मग स्वतःच चपापून गप्प बसला.. तिच्या ही ते लक्षात आले... तो खरोखर तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता.. त्याचे इतके प्रेम लाथाडून ती तरी आयुष्यात खुश असेल..? ती स्वतःच्या पतीत त्याला बघत नसेल ? फक्त आपल्या आई बाबाची मर्जी राखण्यासाठी दोन प्रेम करणारे दूर झाले होते आणी तीन जीवांच्या आयुष्याचा खेळ झाला असावा... एकाचे उदाहरणं तर समोरच होते..

" कसला विचार करतेस ? .... सॉरी पण अचानक मला आराध्या आठवली... असती तरी ती पण अशीच धावून आली असती.. सगळं तिनेच केले असते... अगदी जेवायला ही भरवले असते.. " तो असे म्हणाला.. आणी ती हसली...

" का हसलीस ? "

" मी काही भरवणार वैगरे नाही... "

" ए.. माझ्या म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता... मी आपला बोलताना सहज बोलून गेलो ...." तो ओशाळत म्हणाला..

मग त्यांच्यात खूप वेळ गप्पा चालू होत्या... जर आईचा फोन आला नसता तर तिला वेळेचे भानच राहिले नसते.. आज ती त्याला खऱ्या अर्थाने ओळखू लागली होती... तो दिसायला चांगला होता , वागण्यात मवाली वाटावा पण सभ्य होता... वेगवेगळे किस्से त्याच्या कडे भरलेले होते.. गप्पा गप्पात माणसांना हसवणे... त्यांना आपलेसे करून घेणे त्याच्या साठी अगदी सहज आणी सोपे होते...

" बर मी निघू आता.? खुप उशीर झाला आहे... खरतर आईला सांगून आले होते की तास दोन तासात परत येते... पण गप्पात बघ वेळ कसा गेला कळलेच नाही... चार तास होऊन गेले आहेत... "

" ह्म्म्म.... मला पण बरं वाटले.. चार दिवस एकटाच भूतां सारखा बसला होतो.... "

" लवकर बरा हो... आणी ये कामाला... ह्म्म्म... "

" हो.... बघतो एक दोन दिवस आराम करून येतो मी...."

आणी त्याचा निरोप घेऊन ती निघाली... आज तिला त्याचे एक वेगळे रुप पाहायला मिळाले....बऱ्याच दिवसातून तिला असा कोणी भेटला होता ज्याला तिच्यात नव्हे तर तिच्या मैत्रीत इंटरेस्ट होता... नाहीतर येता जाता गलिच्छ नजरेने बघणारे रोजच सापडत होते... ती समाधानाने आपल्या घरी निघाली.....


पुढील भाग लवकरच.....

© सर्वाधिकार लेखकाकडे..