Zunj in Marathi Short Stories by suresh kulkarni books and stories PDF | झुंज!

झुंज!

त्या लोकांनी त्यांचे सगळंच काढून घेतले. दोन्ही हातातल्या अंगठ्या, मनगटावरले घड्याळ, गळ्यातली सोन्याची साखळी, अंगावरचे कपडे सुद्धा सोडले नाहीत! इतकेच काय? पायातले बूट आणि पायमोजे सुद्धा काढून घेतले, आणि एक कफनी सारखा हिरवा झोळणा अंगावर घालायला दिला. तो झोळणा घालून त्यांनी, वॉशरूम मधल्या आरशात आपले प्रतिबिंब न्याहाळून पहिले.
'वा! भास्करराव, काय झकास दिसताय! विरळ तरी, पांढरे शुभ्र कुरळे केस, तशीच पंढरी हनुवटीपुरती दाढी, अंगावरचा हा हिरवा झोळणा, कमरेला एक कातडी पट्टा आणि त्याला लटकती तलवारच काय ती कमी! पायात गुढग्यापर्यन्त पट्ट्याने बांधलेले पायताण घातले कि, थेट ग्रीक योध्या सारखेच दिसाल! भारदस्त! काय करता? आलीय भोगासी --' भास्कररावं स्वतःशीच म्हणत, ICCU मधल्या त्यांच्या अलॉटेड बेडकडे ते निघाले.

आता ICCU मध्ये ऍडमिट व्हायचे म्हणजे, हे सगळे आलेच. किमान बहात्तर तास, आणि कमाल एखादा आठवडा, डॉक्टरमंडळी त्यांना स्थानबद्ध ठेवणार होती. आज, नाहीतर उद्या ते अँजिओग्राफी करणार, मग असलेल्या एखाद दुसऱ्या ब्लॉकमध्ये स्टेण्ट घालणार! म्हणताना म्हणाले 'काही निघाले नाहीतर, बहात्तर तासात डिस्चार्ज देऊ' म्हणून. पण तसे होणार नाही. तीनचार लाखाचा खड्डा नक्कीच!

स्वाती अचानक गेली, आणि वयाच्या पंचेचाळी पासून भास्कररावांना या हार्ट प्रोब्लेमची 'साथ' लाभली! वयाच्या साठी पर्यंत, त्यांची एक बायपास आणि एक प्लास्टी झाली होती. त्यात नव्याने डायबेटिज आणि बी.पी. यांनीही आपले अस्तित्व अधोरेखित करून ठेवले होते! त्यामुळे भास्कररावांनी हॉस्पिटलायझेशन नवीन नव्हते. तर्जनीला सेन्सॉर आणि दंडाला बी.पी.ची पट्टी मॉनिटरला जोडून, सिस्टर निघून गेली. भास्करराव थोडे स्तिरावले.
"शेजारच्या बेड वर कोण आहे? त्यांच्याकडे सकाळपासून कोणी भेटायला आले नाही! जरा विचित्र वाटले म्हणून विचारतोय." संध्याकाळी ब्लड सॅम्पल घेऊन जाणाऱ्या नर्सला त्यांनी विचारले.
"सर, त्यांच्या कडे कोणी येणार हि नाही! ते गेल्या दहा दिवसा पासून कोमात आहेत! सकाळी त्यांचा मुलगा काउंटरलाच चौकशी करून जातो!"
"बापरे, काय होणार त्यांचं?"
"येतील ना एखाद दिवशी शुद्धीवर! आम्ही खूप होपफ़ुल आहोत."
नर्स निघून गेल्या.
भास्करराव उगाच बेचैन झाले. काय भोग असतील, नाही? जीवन मरणाच्या सीमेरेषेवरला जीव. काय वाटत असेल त्याला? आपण जिवंत आहोत कि मेलोत? याची जाणीव तरी, आहे का नाही कोणास ठाऊक?!
०००
"दोन ब्लॉक्स होते. त्यांची प्लास्टी केलेली आहे.आता तुम्हाला कसलाही धोका नाही. विश्रांती घ्या. उजवा पाय मात्र आठ तास हलवू नका, कारण त्याच पायाच्या जांघेतून अँजिओप्लास्टी केलेली आहे, शिवाय तुम्हाला शुगर आहे. तेव्हा, टेक केयर!" डॉक्टरांनी भास्कररावांना कॅथलॅब मधून बेडवर आणून ठेवताना सांगितले.
"कसे आहेत, आमचे 'कोमावाले' शेजारी?" रात्री बेडपॅन घेऊन आलेल्या सिस्टरला त्यांनी विचारले.
"होते तसेच आहेत! प्रगती नसलीतरी, प्रकृतीत घसरण पण नाही. स्थिर आहेत."
कोण असेल तो कोमातला माणूस? काय काम करत होता, कोणास ठाऊक? पन्नाशीच्या आसपासचा, मघाशी ओझरता पाहिला तेव्हा, वाटला होता. संसाराच्या जवाबदाऱ्या अर्धवट राहिल्या असणार! बायको असेल काय त्याला? बहुतेक नसावीच! ती असती तर, त्याच्या बेडपाशी, जरी बसू दिले नसते तरी, ती बाहेर बसून राहिली असती! सकाळ - संध्याकाळच्या व्हिजिटिंग आवर्स मध्ये आलीच असती. आज स्वाती असती तर, आपल्या जवळ थांबलीच असती ना? भास्कररावांचा मधेच डोळा लागत होता, मधेच जाग येत होती. त्या 'कोमातल्या' माणसाबद्दल त्यांना, एक विचित्र सहानभूती वाटत होती. त्याला काही आपल्याकडून, मदत करता आली तर करावी, असेही मनात विचार येत होते. परमेश्वराचे किती उपकार आहेत आपल्यावर, असे काही आपल्या बाबतीत घडलेले नाही. पण समजा, आपण त्याच्या जागी असतो तर? काय वाटले असते आपल्याला? अर्धवट झोपेत त्यांच्या डोक्यात हेच विचार थैमान घालत होते. मग कधीतरी त्यांना झोप लागली.
०००
घनदाट जंगलातून वाट काढताना भास्कररावांनी खूप कष्ट पडत होते. उंचच उंच झाडांच्या दाटीत वेलींची जाळी चालण्यात अडथळे आणत होती. पायाखाली पालापाचोळ्याचा दमट खच पडलेला. त्यावर माजलेले ते रानटी गवत. चांगले कमरे इतके वाढलेले होते. त्या गवताच्या तालवारीसारख्या धारदार पात्यांचे ओरखडे, उघड्या हातापायावर उमटत होते. त्या ओरखड्याच्या नाजूक जखमेतून बारीक रक्ताचे थेंब बाहेर डोकावत होते. पण त्याकडे त्यांचे लक्षच नव्हते. कारण समोरचे दृश्यच इतकेच भयंकर होते.

एक काळ्या चमकदार पट्ट्याचा, पिवळा धम्मक वाघ, एका माणसावर झेप घेत होता! तो माणूस प्राणपणाने त्या वाघाशी झुंज देत होता. त्याची झेप चुकवत होता. तो निशस्त्र होता, हाती फक्त एक वाळलेली, झाडाची फांदी! आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या माणसाच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश हि नव्हता! आपण हि झुंज जिंकणारच, या आत्मविश्वासाची झलक त्याच्या देहबोलीतून दिसत होती. तरी त्या चपळ जनावराच्या ताकतीपुढे, त्याची चिकाटी कमी पडणार हे भास्कररावांनी स्पष्ट जाणवत होते. त्याला मदतीची गरज होती. या जंगलात केवळ आपणच त्याच्या मदतीला जाऊ शकतो. आणि त्याची आपणच मदत केली पाहिजे, त्यांच्या मनात हि जाणीव उफाळून आली!

पायाजवळ पडलेला एक जाडजूड दंडुका, त्यांनी हाती घेतला, आणि वाघाशी झुंजणाऱ्या त्या माणसाच्या मदतीला ते धावले. तो माणूस आता खूपच थकला होता. वाघ त्याचा फडश्या पडणार यात शंकाच नव्हती! आणि त्याच क्षणी भास्करावानी वाघाच्या मागील बाजूने जोरदार हल्ला केला. वाघ चवताळून मागे फिरला, तर त्या माणसाने वाघाच्या मानेवर, हातातल्या फांदीने जोरदार फटका मारला. भास्कररावांच्या येण्याने, त्या माणसाचे मनोधर्य वाढले होते. दोघांच्या आक्रमणाने वाघाने माघार घेतली, आणि एक लांब उडी मारून, तो पसार झाला. तो झुंजणारा माणूस खूप घाईत आपल्या मार्गाने निघून गेला. कोठेतरी त्याला तातडीने पोहचायचे असावे. तरी त्याने भास्कररावांकडे पाहून, एक गोड स्माईल केले.

भास्कररावांनी खूप घाम आला होता. त्यांनी तेथेच बसकण मारली. या वाघाच्या झुंजीत ते खूप थकले होते. त्यांनी कपाळावरला घाम पुसला. घशाला कोरड पडली होती आणि भूक पण लागली होती. काही तरी गोड खायला पाहिजे.! शुगर लेव्हल घसरत असल्याचे त्यांना जाणवू लागले. पण या जंगलात काय मिळणार? जसा वेळ पुढे सरकू लागला, तशी त्यांना ग्लानी येऊ लागली.
आणि ---
अचानक समोरच्या झुडपात, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झेप घेतली!
"वाचवाSSS !" त्यांनी किंचाळी फोडली!
खाड्कन त्यांचे डोळे उघडले! ते एक स्वप्न होते! भयानक स्वप्न! ते घामाने नखशिखान्त भिजले होते. त्याच्या आवाजाने नर्स धावत आली. तिने घोटभर पाणी पाजले, तेव्हा त्यांना थोडे बरे वाटले. त्यांनी 'खूप भूक लागली ' असल्याचे सांगितल्यावर, तिने एक बिस्कीट त्यांना खाऊ घातले. आणि चटकन रँडम शुगर चेक केली. फक्त पन्नास! ती हातातला गुल्कोमीटर घेऊन डॉक्टरांकडे धावली.
०००
भास्कररावांच्या शेजारच्या बेडवर आज खूप धावपळ दिसत होती. स्वतःच्या बेडवरुन उठून, काय झालाय ते पहाण्याची त्यांची तीव्र इच्छा झाली, पण त्यांना अशक्तपणामुळे उठावेना.
"शेजारी बरीच गडबड दिसतीयय. काही विशेष? आमचे 'कोमावाले ' शेजारी बरे आहेत ना?" त्यांनी ब्लड घेण्यासाठी आलेल्या नर्सला विचारले.
"ते बरे आहेत. कालरात्री ते अचानक शुद्धीवर आलेत! आणि त्यांची प्रकृती झपाट्याने सुधार आहे! चमत्कारच झालाय!"
सिस्टरचे पूर्ण वाक्य ऐकण्यापूर्वीच त्यांच्या पापण्या जडावल्या. अंगभर गुंगी पसरू लागली. हा खूप विचित्र अशक्तपणा होता. आपल्या शरीरात कोठेतरी एक कृष्णविवर तयार होत आहे, आणि त्यात आपली सर्व शक्ती ओढली जात आहे, असा त्यांना भास होत होता. ढासळती शुगर लेव्हल अजूनही स्थिरावत नव्हती, त्या मुळेहि कदाचित असे होत असावे.
०००
दोनच दिवसात तो 'कोमावाला ' शुद्धीवर येऊन, रिकव्हरही झाला होता. आज त्याला डिस्चार्जपण मिळणार असल्याचे भास्कररावांच्या कानावर आले होते. भास्कररावांची प्रकृती मात्र ढासळत होती. डॉक्टरांची देखरेख असूनही त्यांच्यात सुधारणा दिसत नव्हती.
घरचे कपडे अंगावर चढवून शेजारचा पेशंट आनंदाने घरी निघाला. त्याला समोरून जाताना पाहून, भास्कररावांना, आपणही असेच घरी जावे वाटू लागले. पण त्यांच्या अपेक्षे पेक्षा मुक्काम वाढण्याचीच लक्षणे दिसत होती. तो समोरून जाताना, क्षणभर त्याची आणि त्यांची नजरा - नजर झाली. भास्कररावांनी काहीतरी ओळखीचे वाटले. तो पेशंट चार पावले पुढे गेलेला परत फिरला.
"अरेच्या! तुम्ही? आणि या इथे? असे अनपेक्षित भेटाल असे वाटले नव्हते! त्या दिवशी तुम्ही अगदी वेळेवर धावून आलात! तुम्ही त्या क्षणी मदतीला आला नसतात तर, मी जगलोच नसतो! माझी शक्ती क्षीण झाली होती! अहो, त्या दिवशी घाईत तुमचे आभार पण मानायचे राहूनच गेले होते! तुम्ही दिसलात आणि ओळख पटली, तसा माघारी फिरलो. त्या वाघाच्या तावडीतून सोडवल्या बद्दल मी आजन्म तुमच्या ऋणात राहीन! खूप खूप आभार!" तो 'कोमावाला' आभार मानून गोड हसतं निघून गेला.
भास्करराव त्याच्या कडे डोळे विस्फारून पहातच राहिले. हा तोच वाघाशी झुंजणारा माणूस होता! त्यांचे विस्फारलेले डोळे एकाकी थकून गेले. पापण्या जडावल्या. डोळ्यासमोर अंधार पसरला. त्या अंधारात ते कृष्णविवर वेगाने वलयांकित होत होते. त्यांच्या सर्व जाणिवा, त्या वलयात लपेटल्या जात होत्या. ते खोल खोल ओढले जात होते!
०००
भास्कररावांच्या बेडजवळ डॉक्टरांनची फौज जमली होती. सर्वानुमते निर्णय पक्का झाला.
"तुमचे वडील कोमात गेले आहेत! विश्वास ठेवा, आम्ही आमचे प्रयत्न कमी पडू देणार नाहीत. उत्तम काळजी घेऊ. ते कदाचित काही तासात, किंवा काही दिवसात -----केव्हा शुद्धीवर येतील ते नक्की सांगता येणार नाही! तो वर आमचे प्रयत्न सुरूच राहतील. तुम्ही मात्र धीराने घ्या." भास्कररावांचा मुलगा रडवेला होऊन डॉक्टरांचा सल्ला एकात होता.
०००
जर तुम्हाला, त्यांच्या स्वप्नात जाण्याची परवानगी असती तर, भास्करराव चिकाटीने त्या वाघाशी झुंज देताना दिसले असते! कोणी तरी मदतीला येई पर्यंत त्यांना त्या जनावराला थोपवणे भागच आहे!!


सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

Rate & Review

Kalpana Shedbal

Kalpana Shedbal 3 years ago

Rushali

Rushali 3 years ago

Surekha

Surekha 3 years ago

Rajan Bhagat

Rajan Bhagat 3 years ago

Deepali Hande

Deepali Hande Matrubharti Verified 3 years ago

mastach