Ahamsmi yodh - 3 books and stories free download online pdf in Marathi

अहमस्मि योध: भाग - ३

स्वतः ला सावरत समीर गाडीच्या बाहेर आला. अंधारात जी आकृती त्याच्या गाडी समोर तयार झाली होती ती आता नाहीशी झाली होती. समीरला दरदरून घाम फुटला होता.. सगळं एकदम अंधुक होतं आणि काही क्षणांनी थोडं फार दिसू लागतं. वयस्कर होते कोणीतरी पण तरीही ताठ उभे होते. छातीपर्यंत येणारी पांढरी झालेली दाढी आणि तितकेच लांब केस , बळकट स्नायू..गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि डोक्यावर भले मोठे शिवगंध रेखाटलेले... ७ ते ८ फूट उंचीचे ते अत्यंत तेजस्वी दिसत होते. त्यांनी सफेद रंगाचा पेहराव केला होता.

" समीर , ये आमच्या समोर येऊन उभा राहा.." - ती व्यक्ती म्हणाली.

" क...कोण..आहात तुम्ही..तुम्हाला माझा नाव कसं माहित..? " - समीर थरथरत्या आवाजात बोलला.

" घाबरु नकोस..आम्ही रुद्रस्वमी आहोत..आम्हीच तुला तो संदेश पाठवला होता..पण तू दुर्लक्ष केलंस.." - रुद्रास्वामी.

समीच्या चेहऱ्यावरील अनामिक भीती स्पष्ट वाचता येत होती.त्याची झालेली विमनस्क अवस्था रुद्रस्वामिनी टिपली होती. समीरच्या जवळ येऊन त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांचा हात खांद्यावर पडताच , समीरचे सैरभैर झालेले मन स्थिरावले.त्याला होणाऱ्या वेदना आता नाहीश्या झाल्या आणि तो उठून उभा राहिला.

समीर हात जोडून रुद्रस्वामिंच्या समोर उभा होता.
" स्वामी मला काहीच कळत नाहीये. तुम्ही मला भेटण्याचं कारण काय..? आपण तो संदेश मला का पाठवलात..? कृपा करून सगळ्या गोष्टींचा उलगडा करावा.." - समीर.

रुद्रस्वामिनी समीरचा हात पकडला आणि त्याला डोळे बंद करण्यास सांगितले. रुद्रस्वामिंनी मंत्रोच्चार करताच ते एका वेगळाच ठिकाणी पोहचले..समीरचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता... आजच्या पुढारलेल्या संगणकीय तंत्रज्ञानाच्या युगात.. असे अलौकिक चमत्कार तो स्वतः अनुभवत होता. तो एक कौलारू वाडा होता त्याचा गाभारा दगडांनी उभारलेला होता भिंतींवर विशिष्ट शैलीचे चित्र रेखाटलेले होते. अंगणात एक मोठी शंकराची पिंड स्थापन केलेली होती. आजूबाजूला उंच उंच झाडे , वेलीनी आच्छादलेले झुडुपे होती..वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा होती.

" समीर आता आम्ही तुला जे सांगणार आहोत ते लक्ष देऊन ऐक." - रुद्रस्वमी समीरच लक्ष वेधण्यासाठी म्हणाले.

" आम्हाला अंतर्ज्ञान प्राप्त झाले आहे की येत्या काळात एक विलक्षण अनर्थ होणार आहे. शत्रू कोण असेल कसा असेल हे आम्हाला देखील ठाऊक नाही..पण विधात्याने या संकटाशी दोन हात करण्यासाठी तुझी निवड केली आहे.."

रुद्रस्वामिनी एक कागद त्याच्या समोर केला आणि त्याला सांगितलं.." ही चंद्रदर्शिका आहे..यात एकूण २० चंद्र आहेत.आज पासून बरोबर १० व्या तिथीपासून एक अत्यंत विचित्र नक्षत्र आकार घेणार आहे. ग्रहांची स्थिती वाईट असेल. या काळात शत्रुची शक्ती उंचांक गाठेल. १० व्या तिथी पासून तुला अत्यंत सावध पणे पावलं उचलावी लागतील..काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील.. या चंद्रदर्शिकेतील शेवटचा चंद्र उगवण्या आधी तुला शत्रूचा पराभव करायचा आहे.."

" स्वामी..मी...तर एक सामान्य माणूस.. येणाऱ्या संकटचा मी कसा सामना करू शकतो.. - समीर प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहत म्हणाला ".

" नाही..तू सामान्य नाहीस..तुझा जन्म सूर्यवंशी कुळात झाला आहे.. तुझ्या पूर्वजांनी ही अनेक वाईट शक्तींचा समूळ नाश केला होता.ते धैर्य, शौर्य तुझ्यात ही आहेच.. आम्ही केवळ तुला योग्य मार्ग दाखवू शकतो..वाटेत येणाऱ्या संकटांवर तुला स्वतः मात करावी लागेल.तुला स्वतः ला सिद्ध करावं लागेल.रुद्रस्वमी समीरला म्हणाले.
" भांबावून जाऊ नकोस बाळा, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला वेळ आल्यावर मिळतील. भूतकाळात अनेक रहस्य दडलेले आहेत..झालेल्या गोष्टींचा आणि वर्तमानात घडत असलेल्या गोष्टींचा बारकाईने अवलोकन कर.. तो शंभु महादेव तुझ्या पाठीशी आहे..तू नक्कीच यशस्वी होशील.."

समीरने रुद्रस्वामिंना नमस्कार केला.स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेऊन त्याला आशीर्वाद दिला. समीरच्या अंगात एका वेगळ्याच ऊर्जेचा संचार होताना दिसत होता.
.
पुन्हा मंत्रोच्चार झाला.
.
.
.
दुसऱ्या दिवशी सकाळी समीरने डोळे उघडले तेव्हा तो त्याच्या घरी होता..त्याच्या खोलीत..रुद्रस्वामिंचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. त्याने दिगंबरला फोन करून घरी बोलावून घेतलं.सगळं आवरून तो नाश्ता करायला खाली आला.

" गुड मॉर्निंग आई...!! " - समीर.

" गुड मोर्निंग बेटा.. काल रात्री जास्तच उशीर झाला का.. मी फोन ट्राय करत होते..पण लागलाच नाही..! " - माधुरी.

" हो.. ते.. ते..जरा टायर पंक्चर झालेला..त्यामुळे उशीर झाला.. "- समीर.

माधुरी पुढे काही विचारणार तोच..

" बररर..काहीतरी खायला दे ना खूप भूक लागली आहे.." समीर टाळाटाळ करत म्हणाला.

" अच्छा..ठीक आहे आणते.. छान कांदेपोहे केलेत आज शेंगदाणे घालून तुला आवडतात तसे..." माधुरी किचन मधे निघून जाते.

समीर ची नजर अज्ञातात खिळलेली असते तो विचारात मग्न असतो..तेवढ्या दिग्या येतो..

" काय भाई..सगळं ठीक ना..?? " - दिग्या.

"अरे काही ठीक नाहिये........"
माधुरीला येताना बघून समीर बोलायचं थांबतो.

" अगदी योग्य वेळी आलास दिगंबर..चल तू पण गरमागरम पोहे खाऊन घे.." - माधुरी.

ट्रिंग......ट्रिंग......ट्रिंग.....ट्रिंग.....

टेलिफोनची रिंग वाजते..माधुरी फोन उचलते आणि बोलू लागते..समीर आणि दिगंबर नाश्ता करत असतात..दत्तू काका तिथेच साफ सफाई करत असतात.माधुरी फोन ठेऊन डायनिंग टेबल जवळ येते..

" समीर , तुझ्या अनिकेत दादाचा साखरपुडा आहे...आपल्याला परवा पुण्याला जायचयं..सम्याला यावच लागेल असा स्पष्ट आदेश दिलाय त्यानं.. " माधुरी आनंदाने समीरला सांगते..

" आई.. परवा..ते.. माझं..एक महत्त्वाचं प्रोजेक्ट सादर करायला कॉलेज मध्ये बोलावलंय प्राध्यापकांनी.."
"हो ना दिग्या.." समीरने डोळ्याने इशारा करून दिग्याला हो म्हणायला सांगितले..

" हो..हो..काकू..प्रोजेक्ट सादर करायचा आहे.. " - दिग्या भांबावून म्हणाला.

आई तू काळजी करू नकोस. मी अनिकेत दादाला फोन करून सांगेन नंतर..तू आणि बाबा जाऊन या..माझी चिंता करू नकोस..दत्तू काका आहेतच सोबत शिवाय दिग्या पण इथेच माझ्यासोबत थांबेल .. - समीर.

" हो..मी आहे समीर सोबत. टेन्शन नॉट.." दिग्या हसतच म्हणाला.

"अच्छा..ठीक आहे.. कॉलेज मधे बोलावलंय मग जावच लागणार.." - माधुरी.

नाश्ता संपवून दिग्या आणि समीर त्याच्या खोलीत जातात..

" सम्या..काय झालंय..खोटं का बोल्लास ? " - दिग्या.

"मला काय आनंद होत नाही खोटं बोलून.." - समीर वैतागाच्या भरात बोलला.

"सांगणार आहेस का काय झालंय ते.." दिग्या.

समीरने दिग्याला काल घडलेला वृत्तांत सांगण्यास सुरुवात केली. ते ऐकत असताना दिगंबरच्या चेहऱ्यावरचे भाव सतत बदलत होते. तो समीरकडे कपाळावर आठ्या आणून बघत होता.समीरचं बोलणं पूर्ण झालं.

"आईशप्पत..!! " दिगंबरने अश्चर्योद्गार काढला.
" माझं तर डोकं चालतच नाहीये.. रुद्रस्वामी , अज्ञात शत्रू , ग्रह - नक्षत्र... काय हे सगळं..."

" हेच खरं आहे.." - समीर.

" सम्या, आता पुढे काय करायचं ते सांग.. हा तुझा भाऊ नेहमी तुझ्या सोबत असेल..तू बोल फक्त.." दिग्या उत्साहाने म्हणाला.

" रुद्रस्वामी म्हणाले होते की अगदी छोट्या गोष्टींचे ही अवलोकन कर म्हणून..तुला आठवतंय आपण टॉमीच्या मागे जंगलात गेलो होतो..तो तलाव..आणि झाडीतून कोणीतरी पळून गेलेलं..आणि जंगलाच्या त्या निर्मनुष्य भागात सापडलेलं ते प्लास्टिक..हा योगायोग नाही.."- समीर गंभीर स्वरात म्हणाला.

थोडा वेळ थांबून समीर म्हणाला - " दिग्या, मला वाटतं आपण परत जंगलात त्या ठिकाणी जायला हवं..काही तरी सुगावा नक्की लागेल.."

" हो चल लगेच निघू.. टॉमी ला पण घे सोबत.."
- दिग्या.

मे महिन्याचं रखरखत ऊन..त्यात सूर्य डोक्यावर आला होता..समीर , दिगंबर आणि टॉमी..जंगलात चालत होते. समीरला ज्या ठिकाणी ते प्लास्टिक दिसलं होतं त्या ठिकाणी ते पोहोचले होते. पण साहजिकच २-३ महिने उलटून गेल्यामुले ते विशिष्ट ठिकाण तो ओळखू शकला नाही. म्हणून ते तलावाच्या दिशेने पुढे गेले. थोड्या वेळाने त्यांना मागून कोणीतरी चालत यायची चाहूल लागली...चालता चालता समीर तिरक्या डोळ्याने मागचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता..दिग्या ला त्याने पुढे चालत राहायला सांगितले..तो त्या व्यक्तीला त्यांचा पाठलाग करू देत होता.. आता ते तलावाच्या जवळ येऊन पोहोचले होते...समीर खाली बसला.. झुडपांच्या मागे काहीतरी हालचाल जाणवली.. लगेच त्याने झाडाच्या फांदी चा तुकडा त्या दिशेने फेकला..

"टॉमीऽऽऽ...गो..." - समीर जोरात म्हणाला..

टॉमी भुंकत त्या दिशेने पळाला..आणि तिकडून कोणीतरी मोठ्याने किंचाळल...किंचाळत राहिल...समीर आणि दिगंबर लगेच तिथे पोहोचले..अचानक टॉमी ने त्या व्यक्तीच्या अंगावर उडी घेतल्यामुळे तो त्याचा तोल सावरू शकला नाही आणि एकदम मागे कोसळला होता.टॉमी त्या व्यक्तीवर तुटून पडला होता. दिग्या ने पटकन जाऊन त्याला टॉमीपासून सोडवून आपल्या ताब्यात घेतले. भीतीपोटी तो माणूस थरथरत होता..

"कोण आहेस रे तू.." दिग्याने त्या माणसाला विचारले. पण या वर त्याने काहीच उत्तर दिले नाही..भूत बघितल्यासारखा सगळी कडे पाहत होता.

" आता बोलतोस की मी माझ्या भाषेत बोलतं करू तुला..." दिग्या रागाने म्हणाला.

" सांगतो..सांगतो..म्या गणपत हाय.. हितं रानाच्या खालच्या अंगाला वाडीवर रातूया.." गणपत कपड्यांवरची माती झटकत म्हणाला.

"तू आमचा पाठलाग का करत होतास..?" समीर.

" आवं..मला वाटलं तुमी त्या मोठ्या साहेबाची मानसं हायसा..म्हणून आलो हीतवर.."
"त्यानी मला पैकं बी दिलं.. म्हणले कोणाला कळता कामा नाय आम्ही हितं हाय ते..गेल्या महिन्यात पण आलं व्हतं हितं..ते सांगतील त्यो समान म्या त्यासनी पोचवत व्हतो..पण नंतर एकदम गायब झाले..दिसलं बी नाय.. "

" कोण साहेब..?? काय बोलतोय तू..?? " - समीर.

" नाव-गाव काय मला ठाव न्हाई..रानात लाकड गोळा करताना त्यांनी मला बघितलं व्हतं..मला लई पैकं दिलं आणि कामाला लावलं तवा पासून म्या त्यास्नी सामान पोचवित व्हतो... तिथं तलावापासून अर्ध्या मैलावर एक पडका वाडा हाय..लई जुना..तिथं ठेवतो सामान.." - गणपत.

" चल आम्हाला दाखव ती जागा.." - समीर.

" चला..माझ्या संगट.. दावतो.." - गणपत.

समीर , दिगंबर आणि टॉमी गणपतच्या मागे चालू लागले..जंगल अजून दाट होत चालले होते..चहू बाजूला अतिविशाल, प्रचंड विस्ताराचे वटवृक्ष होते. सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच. त्यांच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचत होत्या.जमिनीपर्यंत पोचलेल्या या पारंब्यांना खोडांचा आकार आला होता. अतिशय उंच झाडांमुळे फारच कमी सूर्यप्रकाश जमिनीला स्पर्शत होता.वातावरणातला गारवा ही वाढला होता.

"तो बघा वाडा.. तिथंच राहत व्हते ते साहेब.." गणपत बोट दाखवत म्हणाला.
समीर आणि दिगंबर ने वाड्याच्या आत प्रवेश केला..अगदी छोटासा वाडा होता पडझड झालेला.. ३-४ खोल्या होत्या..वाड्याचे छताचे भाग ही पूर्णपणे कोसळले होते...सगळीकडे नीट तपासून पाहिलं..पण तिथे कोणी राहत असेल असे काहीच पुरावे सापडले नाही..

" काय रे गणपत..खरं बोलतोयस का तू.." दिगंबर ने विचारलं.

" आईची आन घेऊन सांगतो दादा.. खरं हाय.."..गणपत गयावया करू लागला.

इकडे टॉमी सतत एका फरशीवर पाय आपटत होता..याचा शोध घेण्यासाठी समीर बाहेर आला..घाईघाईने येत असल्यामुळे समीर चा पाय घसरला..बाजूला एक जाड दोरी भिंतीच्या वरच्या भागात जोडलेली होती त्याच्या साहाय्याने तो उभा राहण्याचा प्रयत्न करत होता..अचानक ती फरशी थोडी बाजूला झाली..टॉमी लगेच तिथून बाजूला सरकला.. दिगंबर आणि गणपत ही तिथे आले.समीरने ती दोरी अजून थोडी खेचल्यावर ती फरशी पूर्ण एका बाजूला झाली.. तेथून तळघरात जाण्यासाठी पायऱ्या होत्या..आत गडद अंधार होता.. कश्याची ही पर्वा न करता टॉमी ने आत उडी मारली..

" तू इथेच थांब..आम्ही बघून येतो..काही अडचण वाटली तर लगेच आवाज दे.." - दिग्या ने गणपत ला बजावले...

समीरने मोबाईलची टॉर्च चालू केली आणि हळूहळू दोघे पायऱ्या उतरू लागले.. खोलीत फक्त टॉर्चचा प्रकाश होता.. चाचपत चाचपत समीरला लाईटचे स्विच सापडले..त्याने लाईट चालू केली.. आता खोलीत थोडा प्रकाश पडला होता... समीर आणि दिगंबर ने शोधाशोध चालू केली.. कागदं..वह्या.. सगळे पिंजून काढले..तेव्हा समीरला काही कागदांचे लखोटे डस्टबिन मधे फेकलेले दिसले..कोणतरी त्यांना जाळून टाकले होते..पण त्यातील काहीभाग शाबूत राहिला होता.नंतर त्यानं तो लखोटा हातात घेतला. उजेडासमोर धरला आणि अत्यंत बारकाईने बघितला..त्याच्या वरचे अक्षर वाचून समीरचे डोळे विस्फारले होते..त्याच्यावर त्याच्या आजोबांचे नाव होते...

" डाॅ. विश्र्वासराव लक्ष्मण देवधर.."

.....................................................................................................................................

क्रमशः