Ahamsmi yodh - 6 in Marathi Adventure Stories by Shashank Tupe books and stories PDF | अहमस्मि योधः भाग - ६

अहमस्मि योधः भाग - ६

ठरल्याप्रमाणे समीर आणि दिग्या पान टपरी जवळ पोहोचतात..तिथे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दिग्याचा मित्र अनिल, जो हॉस्पिटल मध्ये वॉर्ड बॉय असतो तो त्यांचीच वाट बघत उभा होता..पटकन दोघं जाऊन त्याच्यासमोर उभे राहतात..

" चल..सांग लवकर काय माहिती मिळाली ??" - दिग्या उत्सुकतेने त्याला विचारतो..

" तसं त्याला मी आधी खूप वेळा पाहिलंय. त्याचं नाव धोंडीबा असं काहीतरी आहे..तू म्हणाला म्हणून मी चोरून त्याचे रिपोर्ट्स पाहिले..दोन वर्षांपूर्वी आमच्याच हॉस्पिटल मध्ये चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी झाली होती.. ( प्लास्टिक सर्जरी ही शल्यक्रिया आहे ज्यामध्ये मानवी शरीराचा जीर्णोद्धार, पुनर्रचना किंवा बदल यांचा समावेश आहे. ) अधून-मधून चेकअप साठी येत असतो तो.." - अनिल गंभीर स्वरात म्हणाला.

" अजुन काय माहित आहे..? " - समीरने अनिल ला विचारले.

" एक गोष्ट मात्र नक्की की डॉक्टरला मजबूत पैसे चारलेत त्याने हे प्रकरण दडवून ठेवण्यासाठी...आणि हो..पैसे घेऊन त्याच्या बरोबर एक दुसराच माणूस यायचा..त्याने नेहमी जॅकेट आणि डोक्यावर हॅट घातलेली असायची त्याचा चेहरा मी कधी पाहिला नाही...आज ही तो माणूस आला होता...पण आज दोघं घाईत दिसत होते.." - अनिल हलक्या आवाजात म्हणाला. त्याचा आवाज लक्ष वेधून घेणारा होता.

" अच्छा..तर हे सगळं चालू आहे.." स्तब्ध उभा असलेल्या समीरकडे वळून दिग्या म्हणाला.

" पण तुम्ही त्याची एवढी चौकशी का करताय..??" - अनिलने प्रश्न केला..

" काही नाही रे..थोडे लोचे झालेत..नंतर सांगतो तुला.." दिग्या अनिलला म्हणाला आणि खिश्यातून एक ५०० ची नोट काढून त्याला दिली."धन्यवाद मित्रा.. खूप मदत झाली तुझी.."

अनिलने पैसे घेतले आणि तो तिथून निघून गेला.
दिग्या पुन्हा समीरच्या समोर येऊन उभा राहिला..

" म्हणजे हा जो कोण धोंडीबा आहे तो दोन वर्षांपासून आमच्या घरात दत्तू काका म्हणून वावरतोय..आणि आम्हाला याचा काहीच थांगपत्ता नाही.. असा गप-गप असायचा.. खूप कमी बोलायचा..म्हणून कधी संशय ही आला नाही. आम्हा सगळ्यांना वाटायचं की आजोबा गेल्यामुळे मानसिक धक्का बसलाय दत्तू काकांना..पण हे खरं कारण आहे तर.." - समीरच्या आवाजात राग होता..

"समीर... तू शांत हो.." - दिग्या समीरच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.

" आता वेळ घालवून चालणार नाही.. आपण त्या धोंडीबाला गाठलं पाहिजे..दिग्या चल लवकर गाडी काढ.." समीर.

दोघं धावतच बाईक जवळ पोहोचले.. दिग्याने चावी लावून एक स्टार्टर दिला..आणि गाडी चालू झाली..समीरही गाडीवर बसला आणि दिग्याने पटापट गेअर टाकून गाडी पळवायला सुरू केली..
रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यावर इतर गाड्यांची गर्दी नव्हती..कुठल्याही गतिरोधकाला न जुमानता दिग्या भरधाव वेगाने बाईक पळवत होता..तिथून १५ मिनिटांवर असलेलं समीरचं घर अवघ्या ५-६ मिनिटात त्यांनी जवळ केलं. समीरचं घर आता दृष्टीक्षेपात आलं होतं..तेवढ्यात अचानक पुढच्या वळणावरून एक कार कर्कश हॉर्नचा आवाज करत वेगाने त्यांच्या दिशेने आली.. कारच्या हेडलाईटचा प्रकाश एकदम दिग्याच्या डोळ्यात गेला आणि त्याला काहीही दिसेनासं झालं.. क्षणभर डोळ्यासमोर एकदम अंधारी आली आणि त्याचा बाईक वरचा ताबा सुटला..आणि दोघं ही गाडी वरून खाली पडले..समीर स्वःला सावरत उठून उभा राहिला..आणि त्या जाणाऱ्या गाडी कडे बघून त्याला धक्काच बसला..दत्तू काकांचा चेहरा असलेला तो माणूस त्या गाडीत बसलेला त्याला दिसला..पण ती कार वेगाने पुढे निघाली..समीर काहीच करू शकला नाही.. तो फक्त त्या कार कडे पाहत होता अगदी असहाय , लाचार होऊन..
एक गोष्ट मात्र त्याच्या नजरेतून सुटली नाही ती म्हणजे गाडीचा नंबर " MH 08 AW 2323 " समीर क्षणभर तसाच उभा राहिला..त्याचा चेहरा कठोर दिसत होता. नजर खाली वळली होती. यावरून तो विचारात गढला असावा असं दिसत होतं..इतक्यात दिग्या ही कपडे झटकत उभा राहतो..

" काय झालं सम्या..? काय विचार करतोय..??" - दिग्या.

" दिग्या..अरे आपण यायच्या आधीच तो पळून गेला..आपल्या एक पाऊल पुढे आहे हा धोंडीबा.मी त्या गाडीत पाहिलं त्याला आणि ती गाडी ही या आधी पहिली आहे..सेंड ऑफ च्या दिवशी जो माणूस माझ्यावर नजर ठेऊन होता तो माणूस याच गाडीतून फरार झाला होता.. MH 08 AW... त्या दिवशी पूर्ण नंबर दिसला न्हवता. पण मला खात्री आहे ती हीच गाडी होती..आणि कदाचित तो नजर ठेवणारा माणूस ही धोंडीबाच असेल.."

ती गाडी आता नजरेआड झाली होती..समीर आणि दिग्या आता घरात जायला निघाले..तिथे त्यांना टॉमी भुंकत असल्याचं ऐकू आलं...आवाज आऊट हाऊस मधून येत होता..समीर पटकन तिकडे धावत गेला..आणि खिडकीतून पाहिलं तर टॉमी ला त्या खोलीत कोंडून ठेवलं होतं आणि बाहेरून दाराची कडी लावली होती..

" अनोळखी माणसं घरात आल्यावर टॉमीने नक्कीच त्यांच्यावर धाव घेतली असणार म्हणून त्याला इथे जबरदस्ती कोंडून ठेवलं.." - समीर.

" दत्तू काकांच्या चेहऱ्याचा पुरेपूर वापर करतोय हा माणूस.." - दिग्या.

आऊट हाऊस मध्ये असलेलं सगळं सामान अस्तव्यस्त पसरलेलं होतं.. कडी उघडताच टॉमी जोरात भुंकत गेट कडे धावत सुटला आणि पुन्हा मागे फिरून घरात पळाला समीर आणि दिग्या त्याच्या पाठोपाठ घरात गेले.. टॉमी आजोबांच्या खोलीत गेला..समीर आणि दिग्या तिथे पोहोचले तेव्हा समोरचे दृश्य पाहून दोघही थक्क झाले..

आजोबांची खोली पूर्णपणे खराब स्थितीत होती. सर्व फायली, कागदपत्रे इकडे तिकडे विखुरलेले होते. कपाटात ठेवलेल्या वस्तू येथे-तेथे टाकल्या गेल्या होत्या. असे दिसत होते की एखाद्या वस्तू चा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला होता..एखादी मौल्यवान वस्तू..म्हणून तर हा सगळा पसारा..!!

" हे नक्कीच त्या धोंडीबाच काम..!! मी सकाळी त्याला आजोबांच्या खोलीत पहिलं होतं तेव्हा ही तो काहीतरी शोधत होता.." - दिग्या वैतागून म्हणाला.

" असा काय असेल इथे.." - समीर गंभीर स्वरात म्हणाला..

तेवढ्यात टॉमीचा पुन्हा एकदा भुंकण्याचा आवाज आला.. या वेळेस दुसऱ्या मजल्या वरून.

" हा टॉमी वर काय करतोय.." - दिग्या.

"चल बघू.." - समीर.

टॉमी हा जर्मन शेफर्ड प्रजातीचा श्वान होता. या श्वानांची हुंगण्याची क्षमता इतर प्रजातींच्या श्वानांच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे ते हवा आणि जमिनीवरील कोणत्याही गोष्टीला चांगल्या प्रकारे हुंगु शकतात. टॉमीला नक्कीच काहीतरी सापडलं असेल म्हणून तो भुंकुन काहीतरी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असावा..

समीर आणि दिगंबर दोघं ही तिथे पोहोचतात..टॉमी एका खोलीच्या दरवाजा जवळ काहीतरी हुंगत होता..ती खोली आजोबांची स्टडी रूम होती..आजोबांच्या सगळ्या जुन्या गोष्टी व त्यांची अनेक पुस्तकं त्या खोलीत ठेवलेली होती. त्या खोलीचे दार भक्कम होते.जवळ गेल्यावर त्या खोलीचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला गेल्याच आढळून आलं..

" नक्कीच ती माणसं इथे ही येऊन गेली असणार..म्हणून टॉमी इथे पोहोचला.." - समीर.

" आता इथे काय सापडणार आहे त्या भामट्यांना.." - दिग्या.

" आई शप्पत..!! मी हे कसं विसरू शकतो..दिग्या आलोच मी.." समीरला अचानक चमकुन काहीतरी आठवलं आणि तो खाली त्याच्या खोलीत गेला आणि कपाटातून एक छोटीशी लोखंडी पेटी घेऊन पुन्हा वर आला. त्या पेटीच्या बारीक नक्षीकामाकडे बघून ती खूप जुनी आणि मौल्यवान असेल असा दिसत होतं..

" ही पेटी आजोबांनी शेवटचं गावाला जायच्या आधी मला दिली होती...यात दोन किल्ल्या आहेत आणि एक चांदीचं चिन्ह सुद्धा आहे. सूर्याच्या आकराचं.. कदाचित यातली एखादी किल्ली या कुलूपाची असेल..." - समीर ती समोरची पेटी उघडत दिग्याला म्हणाला..

त्या पेटीतील पहिली किल्ली ही दारावरच्या कुलुपाच्या आकाराने मोठी होती आणि त्यावर ही नक्षीकाम केलेले होते..पण दुसरी किल्ली मात्र अचूक त्याच कुलुपाची होती. दार उघडलं जातं..
अगदी दाराच्या समोरच कोळीने विणलेले घनदाट जाळे होते कारण आजोबा गेल्यानंतर या खोलीत कोणीही आलेलं नव्हतं. ते हातानेच बाजूला करत समीर आणि दिग्या खोलीत गेले..सगळीकडे धूळ पसरलेली होती..आत पुस्तकांचा एक समर्पित विभाग होता. एका कोपऱ्यात काही वैज्ञानिक उपकरणेही ठेवलेली होती. एक आराम खुर्ची. आणि एक जुन्या पद्धतीचे कपाट ज्याला एक भलं मोठं कुलूप होतं. पेटीतली दुसरी किल्ली ही नक्कीच त्याच कुलुपाची होती. बरेच दिवसांपासून उघडले नसल्याने कपटाचे दार पूर्णपणे जाम झाले होते.थोडा जोर लावल्यावर दार उगढलं. त्यात अजोबांची एक डायरी , काही कागदपत्रे होती आणि काही फोटो होते..

हे सारं समीर बारकाईने बघत असतो आणि दिग्या खोलीतल्या इतर गोष्टी बघत असतो. मग समीरला एकाएकी त्या कागदांच्या मध्ये काही जुनी कागदं दिसतात. पुढे वाकून तो बारकाईने पाहू लागला आणि कागदं पाहता पाहता त्याच्या सर्व अंगावरून एकामागून एक असे शहारे जायला लागले..ते कागद अगदी जंगलातल्या वाड्यात सापडलेल्या कागदा सारखच होते.. त्यावरही ब्राह्मी लिपीत काहीतरी लिहलेलं होतं..

" दिग्या..इकडे ये..!! " - समीर.

दिग्या तिथे येऊन बघतो तेव्हा त्याला ही आश्चर्य वाटतं.." चायला..हे तर सेम टू सेम आहे रे.." - दिग्या ते कागद हातात घेत म्हणतो.

समीरने ते फोटो हातात घेतले.एकुणात तीन फोटो होते. खूप जुने असल्यामुळे त्या फोटोंचा काही भाग अस्पष्ट दिसत होता. पहिला फोटो त्यांच्या कोकणातील वाड्याचा होता..त्यावर लाल शाहीच्या पेनाने वर्तुळाकार खुणा केल्या होत्या..दुसरा फोटो आजोबांचा. आणि तिसऱ्या फोटोत आजोबांच्या बाजूला एक इसम उभा होता. त्याने जाड कपड्याचे जॅकेट आणि डोक्यावर हॅट घातलेली..पण फोटो खराब झाल्यामुळे त्याचा चेहरा मात्र अस्पष्ट दिसत होता..

" सम्या..!! अरे हा तर तोच माणूस असेल..त्या रात्री आपल्याला दिसलेला तो..आणि अनिल ने सांगितलेलं त्याप्रमाणे हॉस्पिटल मध्ये धोंडीबा सोबत येणारा माणूस..!! " - दिग्या.

हो..बरोबर बोलतोस तू..! जाड कापडाचे जॅकेट आणि डोक्यावर हॅट..आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण याचा आणि आजोबांचा काय संबंध असेल..?? " - समीर.

" ती डायरी बघ त्यात काही सापडतं का.." - दिग्या.

समीर लगेच ते फोटो खाली ठेवून देतो आणि डायरी हातात घेऊन पानं चाळायला सुरुवात करतो पण त्यात विशेष असे काहीच सापडत नाही..काही पानांवर आडव्या उभ्या रेघोट्या आखलेल्या दिसत होत्या..यातून काहीच स्पष्ट होत नव्हतं...प्रत्येक पानावर एक बाण काढलेलं होतं ज्याचं टोख वरच्या बाजूला होतं..पण याचा अर्थ काय असेल..!!

" ही पेटी देऊन आजोबा गेले ते पुन्हा आलेच नाहीत..त्यांना नक्कीच या प्रकरणाचा सुगावा लागला असणार म्हणून तर कोणालाच संशय येऊ नये म्हणून ही पेटी माझ्याकडे देऊन गेले..पण तरीही प्रश्न उरतोच..आई - बाबांना न देता..त्यांनी मलाच का दिली ही पेटी..? आणि आजोबांचं आणि त्या फोटो मधील माणसाचं काय संबंध..? " - समीर गोंधळलेल्या नजरेने दिग्याकडे पाहत म्हणाला.

"हो ना.. सगळ्या गोष्टी अश्या गुंतून राहिल्यात..काहीच कळत नाहीये.." - दिग्या.

" आई-बाबांचा ही काही पत्ता नाही.. माझं तर डोकं भणभण करतंय.." समीर दोन्ही हात डोक्याला लावत म्हणाला.

" सम्या..तू चल खाली काहीतरी खाऊन घे..आज दिवसभर खूप धावपळ झाली आहे तुझी..आपण काढू काहीतरी मार्ग.." समीरच्या खांद्याला एक हलका स्पर्श करत दिग्या म्हणाला.

दोघं खाली जातात..फ्रेश होऊन हलकं असं काहीतरी खातात..आणि पुन्हा वर समीरच्या खोलीत येऊन बसतात..

गेल्या दोनतीन दिवसांतल्या अनेक आश्चर्यकारक घटनांचा विचार समीरच्या मनात येत होते..तो खुर्ची वर मागे रेलून छताकडे बघत बसला होता..आजचा दिवस विलक्षण घडामोडींचा होता..तेच विचार मनात येत राहणार हे नक्की..बऱ्याच वेळ समीर डोळे मिटून बसून राहिला..पण शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत होता..खूप उशीरा कधीतरी त्याला तिथेच खुर्चीवर बसल्या बसल्या झोप लागली..दिग्या ही बाजूच्या कॉटवर आडवा पडल्या पडल्या झोपला..

**************************************

सकाळच्या सोनेरी किरणांनी खोली उजळून निघाली..वातावरणातला तणाव निवळला होता.पावसाळ्याचे दिवस होते तरीही थोड्यावेळा साठी आकाश अगदी स्वच्छ असल्यानं उनही स्वच्छ होतं...खिडकीच्या पडद्यांमधून झिरपणारी कोवळी सूर्यकिरणं एकमेकांशी स्पर्धा करत खोलीत येऊ पाहत होती.. समीरला जाग आली तेव्हा साडे आठ वाजत आले होते..स्नान , कपडे सगळं आवरून तो खाली स्वयंपाकघरात आला..आणि चहा करायला घेतला..इतक्यात दिग्या ही खाली आला..

" गुड मॉर्निंग.. सम्या.." दिग्या हातांनी डोळे चोळत आणि मोठ्याने जांभई देत म्हणाला.

" काय गुड आहे ह्या मॉर्निंग मध्ये..? " - समीर दिग्या कडे बघून म्हणतो.." जा अवरून ये पटकन.. चाहा नाष्टा करून घेऊ..आणि येताना ते कालचे फोटो आणि ती कागदपत्रे पण घेऊन ये.."

पंधरा-वीस मिनटात दिग्या आवरून खाली येतो..आणि दोघं हॉल मध्ये बसून बोलत असतात.

" दिग्या..तुला एक लक्षात आलं का आजोबांनी ठेवलेला गावातील वाड्याचा फोटो..त्यावर लाल शाहीतले वर्तुळ.. रात्री दिसलेल्या गाडीचा क्रमांकाची सुरुवात MH 08.. म्हणजे गाडी रत्नागिरी परिसरातील असावी.. आणि आमचं गाव सुद्धा रत्नागिरीतच..!! आजोबांचा अपघात गावाला जातानाच झाला होता.. या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत.." - समीर गंभीर स्वरात म्हणाला.

" हे बघ..आपल्याला आत्ता काहीच कल्पना नाहीये की हा सगळा प्रकार काय आहे. आपल्याला शोध घ्यायला काहीतरी एक दिशा हवी..आपण हीच दिशा पकडून चालूयात..कदाचित पुढे गेल्यावर आपल्याला काही पुरावे मिळतील.." - दिग्या.

" आपल्याला निघायला हवं..आपल्याला कोकणात जावं लागणार..आमच्या गावाला.!! " - समीर.

अचानक समीरची नजर मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ पडलेल्या सावली वर पडते..कोणीतरी त्यांचं बोलणं चोरून ऐकत होतं का...? दारा जवळ जाऊन पाहिलं तर कोण..!! समोरच्या व्यक्तीचं तिथे असणं हे अगदीच अनपेक्षित होतं..!!

.....................................................................................................................................

क्रमशः

• तुम्हाला काय वाटतं कोण असेल दारात..??
• अजुन एक महत्त्वाची गोष्ट , समीरच्या आजोबांचा अपघात झाला होता की घडवून आणला होता..??


Rate & Review

Pakhi Karare

Pakhi Karare 3 years ago

Milind Narlya

Milind Narlya 3 years ago

vaishnavi

vaishnavi 3 years ago

Anil Kalambe

Anil Kalambe 3 years ago

AAA

AAA 3 years ago