Kasala ha Durawa! books and stories free download online pdf in Marathi

कसला हा दुरावा !

लग्न होऊन महिना झाला होता.घरामधील बऱ्यापैकी वर्दळ थांबली होती.रोहन हा तरी आता ही काहीसा अस्थाव्यस्थ वाटत होता.तो नववधू म्हणजे सारिकाशी पण अगदी मोजकेच शब्द बोलायचा.घरच्यांशी तसा दररोज प्रमाणे बोलायचा.पण त्याचा सारिका पासून चाललेला नजर चोरटेपणा तिला जाणवत होता .आणि ती स्वतःच्या मनाशीच आपले काही चुकले तर नाही असा विचार करून मनाशीच खात होती.तिला आता जेवण खाऊ वाटत नव्हते.पण घरच्यांना काही संशय येऊ नये म्हणुन ती तसेच दोन तीन घास गळ्याखाली घालत होती.आता काही तिला सहन होता होत नव्हतं.कारण किती दिवस हा खोटेपणा मिरवायचा आणि रोहन विचारण्याची तिला तर धाडस होत नव्हतं.कारण मी जर विचारलेच तर ते काय म्हणतील?
त्यामुळे ती निमूटपणे एकटी सहन करत होती.

नव लग्न झालेलं जोडपं असून सुद्धा बाहेर फिरण्यासाठी तर रोहनने नकारच दिला होता.हानीमून तर दूरची गोष्ट . त्यामुळे पाहिजेल तसा एकांत मिळाला नव्हता.आणि ही साधी पण मनमिळावू होती.घरच्यांशी अगदी हसून असायची पण त्या हसण्यामागे ही काही दुःख आहेत याची कल्पना सुद्धा कोणालाच नसावी.फक्त रोहनला सोडून!

रोहन आणि सारिकाच संसाराची सुरूवात महिन्यांपूर्वी झालेली.पण खऱ्या अर्थाने त्यांच्या मनात दुरावा तसाच असावा.कारण मन जुळण्यासाठी विचार, संवाद घडावा लागतो.तोच यांच्या दोघांत झाला नव्हता.आणि यांच्या लग्नाच म्हणाल तर ते पारंपारिक पध्दतीने झालं होतं.म्हणजेच अरेंज मॅरेज.लग्नावेळी सारिकालाही लग्नाविषयी ना रोहनला विश्वासात घेऊन हा सोहळा आयोजित केला नव्हता.कारण एक कांदेपोहेच्या जीवांवर हा विवाह झाला होता.आणि यामध्ये ना रोहनच्या ना सारिकेच्या होकाराचा विचार केला नव्हता.आईवडीलांना जे बरोबर वाटलं तेच त्यांनी केलं.

तसं सांगायच झाल तर रोहन हा अगदी रूबाबदार मुलगा.आणि एकदम स्मार्ट मुलगा म्हणाला असा होता. प्रत्येक गोष्ट तो नीट विचार करून करणारा मुलगा.घरी आईवडीलांना शेतामध्ये मदत करणारा .तसाच कॉलेजमध्ये नेहमी प्रत्येक खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेला विद्यार्थी होता.त्यामुळे प्रत्येक मुलींच्या मनामध्ये यांच्यासारखा किंवा हाच मिळावा म्हणुन स्पर्धा चाललेली असावी.

असाच तो नेहमी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करायचा आणि सर्व शिक्षकांना तो आता ओळखीचा झाला होता.अशीच एक श्रीमंत घरची मुलगी काजल ही त्या कॉलेज मध्ये शिकत होती.आणि तिलाही रोहन हा इतर मुलांपेक्षा वेगळा वाटला.आणि तो कालांतराने तिला तो आवडू लागला.पण त्यांच्याशी संवाद कसा साधायचा मग तिला मैत्रीणींनी एक कल्पना दिली ती अशी.तो दररोज वाचनालयात जातो.जर तु लवकर येऊन त्याला बोलण्याचा प्रयत्न केला तर कदाचित काही होऊ शकेल.मग तिनेही लवकर जाऊन त्याची वाट पाहिली.पहिल्या दिवशी काही बोलायची हिंमत त्याची झाली नाही.पण दुसऱ्या दिवशी मात्र ती बोलायचच म्हणुन गेली.आज पण असाच जातो की काय!मग घरी जाताना अभ्यासाला म्हणुन त्याची वही मागुन घेतली.आणि असा हळूहळू दोघांमध्ये संवाद सुरू झाला.आता काही दिवसांनी तो वाचनालयाच्या बाहेर तिची वाट पाहू लागला.आता ते कॅन्टीन मध्ये दोघे भेटू लागले.आणि काही दिवसांनी दोघांनाही एकमेकांवरील प्रेमाची जाणीव ही झाली.आता मात्र दोघेही एकमेकांशी संवाद साधण्यासाठी काही बहाणा करू लागले.आता सर्व मुलांना त्यांच्या त्या मैत्रीविषयी समजलं होतं.

असेच गुलाबी दिवस जात होते .आणि दोघांचाही बऱ्याअंशी संवाद चालू होता‌ परीक्षा आल्याने दोघेही फक्त एकमेकांना पाहून हसून दोघांची भेट टाळायचे.आणि निकाल झाल्यानंतर काजलच्या निकालामध्ये चांगले गुण मिळाले होते.कारण रोहनशी ती प्रत्येक गोष्ट त्याला सांगायची आणि तिचे कच्चे असणारे विषयाचा अभ्यास कसा करायचा याविषयी सुद्धा त्याने तिला काही क्लुप्त्या सांगितल्या होत्या आणि त्या तिच्या अभ्यासात काही आल्या.आणि तिच्या प्रगती मध्ये चांगली सुधारणा झाली होती.

थोड्या दिवसांनी ते पुन्हा भेटले आणि एकमेकांचे अभिनंदन केले.आता शेवटचं वर्ष होत त्यामुळे दोघांनाही अभ्यास नीट करायचा होता.आणि त्यामुळे दोघांची इच्छा असूनही दोघांना भेटता येण शक्य नव्हतं.

एकदा कॅन्टीनमध्ये दोघे भेटले .काजल तिच्या प्रेमाची मागणी केली . रोहनने अमान्य करायची कारणच नव्हतं.पण नंतर आपण नक्की बोलूया असं सांगून दोघे बाहेर पडले.त्यानंतर कॉलेजमध्ये बरंच काही घडलं . विविध स्पर्धा आणि त्यातील सहभाग हा रोहनचा अग्रेसर असायचा त्यामुळे दोघांची मुख भेट पण आता अशक्य झाली होती.आणि आता मात्र काजल रागावणे,त्याचा फोन न उचलणे , पुढून येताना दिसला तरी न पाहिल्यागत ती करू लागली होती.

नक्की काय चुकलं आहे हे समजायला रोहनला काही जागा नव्हती.एके दिवशी ती अशीच कॉलेज सुटल्यानंतर घरी जाताना त्यांने तिचा रस्ता अडवला तर ती अजूनच चिडली असावी.
त्याने विचारले,"अगं, नक्की काय झालंय किंवा माझं काही चुकलं आहे सांगशील का?"

ती काहीच बोलायला तयार नव्हती.पण ती सहज बोलून गेली,"आता तुच मला विचार काय झालं?"

"काय"

"बघा म्हणजे चुक करून किती सोपेपणा!"

"स्पष्ट बोलशील का?"

"मग ऐक , तुला तर काही वेळच नाही बोलायला!"

"अगं, कॉलेजच्या स्पर्धा चालू आहेत.शेवटच वर्ष असल्याने जास्त मेहनत घेऊन काॅलेजला बरीच बक्षीस मिळवून द्यायची आहेत!"

"म्हणुन विसरून जायचं का?"

"मी खरंच काय समजू शकलो नाही."

"मला वाटतंय माझी जायची वेळ झाली असावी,मी जाते!"

रोहनला हा गैरसमज आता मनाला खाऊ लागला होता .आता तर त्याने मैदानावर ही जायचं कमी केलं होतं.पण काजल काही दिसत नव्हती.

शेवटच्या वर्षांचा निकाल लागला त्यात रोहनला कमी गुण मिळाले होते.आता घरची वडीलांना ही आता शेती होत नव्हती.त्यामुळे वडीलांना घरीच मदत करावी .असं त्यांचं मत होतं .आणि आईही मागे कामासाठी जोर धरू लागली होती.आणि त्याला आता घरात थांबू वाटत नव्हतं.सगळीकडून मन एकदम उडाल होत.

कॉलेजला तो निकाल आणण्यासाठी गेला.तर त्याला काजल कुठेच दिसली नाही.शिक्षकही त्याला बरेच बोलले तुझ्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या.वाटल होत तू विद्यापीठात नंबर काढशील पण तू निराशी केलं.हे ऐकून त्याच मन खुप दुःख झालं होतं.पण आजतरी काजल भेटेल या आशेने तो तिची वाट पाहत बसला होता.पण ती कॉलेज सुटेपर्यंत दिसलीच नाही.

असाच महिना गेला असावा.

आता त्याला घरीच कॉलेज सोडून वडीलांना मदत करावी लागणार होती.गुण कमी आल्याने पुढील शिक्षणासाठी पैसे नव्हते.त्यामुळे शिक्षण थांबलच होत.

"मित्रा कडून समजलं की काजलच कोणत्या आमदारांच्या मुलाशी लग्न झालं आहे."आता मात्र तो पूर्णपणे खचून गेला होता.जिच्यावर मनापासून प्रेम केलं तिला एकदा पण विचारू वाटलं नाही का? नक्की काय चुकलं हे तरी सांगायच होत.ती पण तिला गरजेचं वाटल नाही का?

त्या दिवसापासून तो एकदम उदास बसायचा.सकाळी रानात जायचं आणि संध्याकाळी घरी यायचा. मित्रांशी पण संवाद बंद झाला होता.त्याची ही परिस्थिती पाहून घरचे पण हादरले होते.कारण इतका मनसोक्त राहणारा रोहन एकदम गुमसूम राहायला लागला होता.आता याच जर लग्न लावून दिलं तर हा सुधारले म्हणुन सारिकाशी त्याच लग्न लावून दिलं.


ही सारिका पण बरी शिकलेली होती.लहानपणीच आई गेल्याने आईची माया न मिळलेली अशी ही सारिका.लहानपणापासून वडीलांनी अगदी प्रेमळ सांभाळलेली होती.आणि रोहन चांगला शिकलेला आणि कष्टाळू पोरं म्हणुन दोघ संसार चांगला करतील म्हणुन दोघांच लग्न लावून दिलं.पण लग्नानंतर तसा फारसा बदल झाला नव्हता.पण सारिका आल्याने तो घरच्यांशी बोलायला तरी लागला होता.या दोघांना एकांत मिळाला म्हणुन आई-वडील दोघे वारीला गेले.


सकाळीच आई-वडील वारीला गेल्याने घर एकदम शांत होत.रोहन ही झोपाळ्यावर पेपर वाचत बसला होता.


"तिने विचारलं चहा आणू का?"


त्याने होकारार्थी मान हलवली.


तिने चहा दिला आणि तिचा दबलेला हुंदका अनावर झाला होता.न कळत तिच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या पायावर पडले.आणि त्यालाही पहिल्यांदाच तिच्या दुःखाची जाणीव झाली होती.अन् त्याच्या काळजात चर्र चर्र झालं होत.ती तशीच आत पळत गेली. त्याने विचार करायला सुरुवात केली.अरे ही माझ्यासाठी तिचं घर सोडून, सर्व नाती सोडून ती आपल्या घरी आली.फक्त प्रेमाच्या चार शब्द पण आपण तिला आतापर्यंत बोलू शकलो नाही.याची त्याला खंत वाटू लागली.ज्या मुलीवर आपण प्रेम केलं तिने आपला कसलाच विचार केला नाही.आणि हिची ना आपली काय ओळख.पण सकाळी अंथरूण काढण्यापासून ते रात्री झोपताना गोळ्या खाण्याची आठवण करेपर्यंत ती काळजी घ्यायची.अन् आपण तिला काय दिलं फक्त दुःख मी मलाच कधी माफ नाही करू शकणार.आणि तो तसाच ढसाढसा रडू लागला.


रोहनचा रडण्याचा आवाज ऐकून आपले अश्रू पुसून ती तशीच धावत बाहेर आली.अन् त्याला सावरू लागली.


"काहो रडताय.माझ काही चुकलं का?"


"नाही,मीच तुझा अपराधी आहे.मला जमलं तर माफ कर?"


"मला का लाजवताय,तुम्ही जर रडला तर मी कधीच मला माफ करू शकणार नाही! तुम्ही शांत व्हा.हे पाणी घ्या.मग बोला!"


"नाही आजपासून फक्त आई बाबांसाठी आणि तुझ्या साठी जगायचं बस्स झालं.चल आज मी तुला गरमागरम भजी तळून खायला घालणार आहे!"


तिला त्याच्या डोळ्यात प्रेम,आदर, पश्चात्ताप दिसत होता.


तीही त्याला रोखू शकली नाही.त्या भज्यासारखा ताजेपणा,मस्त सुरूवात त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली.त्या रात्री ते एकाच बेडवर बसून रात्रभर सर्व मनसोक्तपणे ते बोलले.कितीतरी दिवसातून रोहन मनसोक्त बोलला होता ‌.आणि त्याला त्याच्या हक्काचं माणूस मिळालं होतं.ज्याच्याशी तो सर्व काही सुखदुःख वाटून घेऊ शकत होता.


'असच बोलता बोलता त्यांचा मनातील दुरावा कधीच संपून गेला होता!'


✍️लेखक-राहुल पिसाळ (रांच)