Rikamapan books and stories free download online pdf in Marathi

रिकामपण

#रिकामपण
"या या, खूप दिवसांनी येणं केलंत, खूप आनंद झाला माधवराव तुम्हाला भेटून !!"....
मी माधवरावांना अगत्याने सोफ्यावर बसायला सांगितलं. माधवराव आमच्या ऑफिस मधील सिनियर सहकारी होते. आठ नऊ वर्षांपूर्वी रिटायर झाले त्यानंतर आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो.
"सहज या बाजूला एका नातेवाईकांकडे आलो म्हटलं आज सुट्टीचा दिवस आहे. घरी असाल तर तुम्हाला भेटून जावं म्हणून आलो. "..... माधवरावानी उत्तर दिले.
" तुमचं घर छान वस्तीत व प्रशस्त आहे.वास्तुशांतीला ऑफिसच्या स्टाफ बरोबर आलो होतो. त्यावेळी नीट पाहता आलं नाही. ".....माधवराव आपुलकीने म्हणाले.
नंतर बराच वेळ आम्ही ऑफिसच्या गप्पा गोष्टी सांगत बसलो होतो. त्यांच्या वेळच्या सिनियर साहेब लोकांच्या हकीकती ते अगदी खुलवून सांगत होते. त्या दरम्यान पत्नीने त्यांना चहा, नाश्ता आणुन दिला. मुलं ही आमच्या सांगण्यावरून मधून कधीतरी येऊन थोडा वेळ त्यांना भेटून नमस्कार करून आत गेली. दीड एक तासानंतर ते जायला निघाले. त्यावेळी त्यांनी मुलांना बाहेर बोलवून " तुमच्या खाऊसाठी घ्या. " असं म्हणून प्रत्येकाला शंभर रुपये आम्ही ' नको नको ' म्हणत असताना देऊन गेले.
माधवराव गेल्यावर खूप वेळ त्यांच्या सहवासातील ऑफिसचे दिवस आठवत राहिलो. मी त्यावेळी पंचविशीतील तरुण होतो. नुकताच त्या ऑफिस मध्ये जुनिअर क्लार्क म्हणून नोकरीला लागलो होतो. माधवराव तेव्हा वयाने पंचेचाळीसच्या आसपास असलेले सिनियर हेड क्लार्क होते. कामाच्या बाबतीत ते शिस्तप्रिय आणि मोजकेच बोलणारे होते.दिसायला उमदे व्यक्तिमत्व असलेले माधवराव वागताना सर्वांशी अंतर राखून वागत. मी कामात नवीन असल्यामुळे बरेचदा चुकत असे. त्या वेळी ते कठोर पणे बोलून चूक सुधारण्याची सूचना करत असत.
सर्वांनी ऑफिसला वेळेत यावे यासाठी उशीर झाला की, जास्त रकमेचा दंड वसुल करुन पुन्हा जास्त वेळ काम करण्यासाठी ऑफिस मध्ये थांबायची शिक्षा मिळत असे. अशा वातावरणात सर्वंजण आपापले काम व्यवस्थित करत असत.खूप चांगलं शिस्तीचं वातावरण होते. दंडाची एकत्र रक्कम महिना अखेर सर्वांच्या पार्टी साठी वापरली जायची. मोठे साहेब पण त्यात सामील व्हायचे.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार्टी केली जायची. कधी जास्त रक्कम जमा असली तर जवळपास पिकनिक साठी पण आम्हाला नेले जायचे.
एक दिवस आम्ही सर्व जण नेहमीप्रमाणे वेळेत येऊन कामाला सुरवात केली होती.ऑफिस सकाळी दहा वाजता सुरु व्हायचं. साडेनऊ वाजल्यापासून कर्मचारी यायला सुरवात व्हायची. सर्वात मोठे साहेब साडे दहा वाजेपर्यंत ऑफिसला यायचे. माधवराव दहाला पाच दहा मिनिटं कमी असतानाच हजर राहून सर्वांना बरोबर घेऊन कामाची विभागणी करत असायचे.साडेदहा वाजून गेले. मोठे साहेब येऊन कामाला लागले. अकरा वाजून गेले तरी माधवराव आले नव्हते. नंतर लागोपाठ दोन दिवस ते आलेच नाहीत. त्यांनी रजा पण टाकली नव्हती. सर्व स्टाफ काळजीत पडला. असं अचानक काय झाले असेल त्यामुळे माधवराव ऑफिसला आले नाहीत. त्यावेळी टेलीफोन घरोघरी नव्हते. त्यामुळे त्यांच्या गैरहजर राहण्याचे कारण समजायला मार्ग नव्हता. त्यांच्या राहत्या घराच्या जवळच्या रस्त्याने ऑफिसमधील एकजण जा ये करत असत. मोठया साहेबांनी त्यांच्यावर माधवरावांची विचारपूस करून यायची जबाबदारी सोपवली.
दुसऱ्या दिवशी तो माणूस ऑफिसला आल्यावर माधवरावांची आई खूप आजारी असून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे हे समजले. आईला आजारपण अचानक आल्यामुळे त्यांना रजेचा अर्ज देता आला नाही. त्यांनी रजेचा अर्ज त्या माणसा बरोबर दिला होता. मोठे साहेब हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांच्या आईची विचारपूस करून आले होते.स्टाफच्या वतीने दोघेजण जाऊन भेटून आले.
काही दिवसांनी माधवराव ऑफिसला यायला लागले. पण पूर्वीचं त्यांचं उमदं व्यक्तिमत्व कुठे तरी हरवलं. ऑफिसचं काम मात्र यंत्रवत पणे सांभाळायचे. त्यातला निर्जीव पणा सर्वांना जाणवत होता. त्यांची तब्येत पण बरीच खालावली होती पूर्वीचं त्यांचं कडक बोलणे , शिस्तप्रिय स्वभाव कुठे हरवला काही समजेना. मोठया साहेबांनी दोनतीन वेळा केबिन मध्ये बोलवून काही पैशाचा प्रॉब्लेम आहे का, तब्येत ठीक नसेल तर काही दिवस रजा घेऊन विश्रांती घ्या असे सुचवले. सर्व स्टाफ पण त्यांची मनस्थिती ठीक नसल्याचे ओळखून जबाबदारीने काम सांभाळत होता.
हळूहळू सहासात महिन्यां नंतर माधवराव त्या मनस्थितीतून सावरले. ऑफिसच्या कामात मन घालून पूर्वी प्रमाणे सर्वाशी वागू लागले. एक दिवस त्यांनी ऑफिसच्या कँटीनमधून काही खाद्य पदार्थ व चहा कॉफी ची ऑर्डर देऊन मोठया साहेबांना व सर्व स्टाफला स्वतः आग्रह करून सर्वांना खायला घातले. त्यावेळी ते म्हणाले......
"आजची ही पार्टी माझ्या तर्फे आहे. एखाद्या कुटुंबा प्रमाणे आपण सर्वांनी माझ्या अडचणीच्या वेळी मला मदत केलीत. जिव्हाळा व आपुलकीने माझ्याशी वागलात. माझ्या नैराश्याने ग्रासलेल्या मनाला आपण सर्वांनी सावरलेत या बद्दल आपणा सर्वांचे जेव्हढे आभार मानावेत तेव्हढे थोडेच आहेत. बुडत्याला काडीचा आधार या म्हणी प्रमाणे तुम्हा सर्वांच्या आधाराने मी वाचलो...."
पार्टी संपल्यावर मोठे साहेब त्यांना म्हणाले, "तुम्ही स्वतः शिस्तप्रिय व काटेकोर पणे स्वतःच काम सांभाळणारे आहात. आम्ही सर्व जण फक्त निमित्त आहोत. तुमच्या मानसिक सामर्थ्याने तुम्ही या परिस्थितीतून बाहेर आलात. आपण सर्व इथे कित्येक वर्षें एकत्र काम करतो तेव्हा आपण कुटुंबातील सदस्य आहोत. आपल्या अडचणी योग्य वेळी सर्वांसमोर मांडल्या तर त्यातून मार्ग काढता येतो.एकमेकांना मदत म्हणा किंवा मानसिक आधार देऊ शकतो......"
यावर माधवराव म्हणाले, "अगदी खरं आहे. पण घरगुती गोष्टी ऑफिसमध्ये सांगायला संकोच वाटतो. निष्कारण चर्चेचा विषय होतो. आता माझंच बघा ना. मला किती तरी मानसिक त्रास सहन करावा लागला. अगदी कोंडी झाली होती. त्यातून कसा मार्ग काढावा हे मला अजून कळतं नाही.मला भाऊ बहीण नाही. मी एकुलता एक असल्यामुळे माझी वयस्कर आई माझ्याकडे असते. मी व माझी पत्नी आम्ही दोघेही ग्रामीण भागातील आहोत. वडील हयात होते तोवर आई वडील दोघेही गावीच असत. नंतर दोन वर्षे आई गावी राहिली. पण आता तिला वय झाल्यामुळे काम होत नाही. एकटे पणा मुळे थोडा मनावर परिणाम झाला. काही गोष्टींचे विस्मरण व्हायला लागले. तेव्हा माझ्या काकांच्या सांगण्यावरून तिला मी इकडे माझ्याजवळ घेऊन आलो.
मला तीन मुली आहेत. मुली अभ्यासू व कष्टाळू आहेत. शाळा सांभाळून घरात पत्नीला कामात मदत करतात. त्यांची आई काही विद्यार्थ्यांची ट्युशन घेते. त्यावेळी मोठया दोघीजणी तिला मदत करतात. माझी आई इकडे आल्यावर माझी पत्नी व मुली तिचं सर्व व्यवस्थित करायला लागल्या. सर्वांना ती इकडे राहायला आली त्याचा खूप आनंद झाला. सुरवातीला काही वर्षे ठीक चालले होते.आमची लहान मुलगी जी आता आठ वर्षाची आहे. माझी आई तिचं सर्व खूप प्रेमाने करायची. तिला आजीचा खूप लळा होता. आई आमच्या इथे चांगली आनंदी होती , बायकोआणि मुली तिची चांगली देखभाल करीत आहेत हे पाहून मला खूप समाधान वाटायचे.
पण काही वेळेला तुमच्या भाग्याला कुणाची नजर लागते असं म्हणतात.आई माझ्या चुलत भावाच्या घरी त्याच्या मुलाच्या बारशाला गावी गेली. त्या वेळी दोन आठवडे तिकडेच राहिली. त्यावेळी तिला तिथे कुणी काही बोलले काय की कुणी तिचे कान भरले का काय ते माहित नाही.तिकडून परत आल्यावर ती कुणाशी धड बोलेना. माझी सर्वात धाकटी मुलगी नेहमीप्रमाणे प्रेमाने 'आजी, आजी ' करत जवळ गेली तर तिला पूर्वी प्रमाणे जवळ घेतले नाही. आम्हाला काहीच समजेना. मी मुलींला व पत्नीला समजावून सांगितलं....
"तिची मनस्थिती ठीक नाही. गावी जाऊन आल्यामुळे तिला माझ्या वडिलांची आठवण येत असेल.तिला कुणी काही म्हणू नका आणि कुणी उलट बोलू नका..."
दिवसेंदिवस आईचं वागण बदलत गेलं. ती एकसारखी पत्नीला व मुलींना अगदी क्षुल्लक कारणावरून ओरडून बोलू लागली..... "गावाकडे बायका, मुली किती कामे करतात. प्रत्येक जण सकाळपासून रात्री पर्यंत पडेल ते काम करत असतो.शेतातली पण कामं करतात. मी स्वतः सकाळी सहाला उठले की रात्री नऊ पर्यंत माझी कामं सुरु असायची . इथे सगळ्यांची सकाळ आरामात सुरु होते. घरात सर्व कामाला बाई आहे तरी नुसता स्वैंपाक वेळेत होत नाही. या तिन्ही मुलींना पण कामाचं वळण लावलेलं नाही, ना आईचा धाक ना वडिलांचा....
अशा प्रकारचे टोचून व हिणवून बोलणे आईने सुरु केले.
मी आईला समजावून सांगितले, शहरातील कामं गावाकडील कामापेक्षा वेगळ्या प्रकारची असतात. आपल्या घरात सर्व व्यवस्थित चाललंय तुझी सून व नाती तुझ्यावर किती प्रेम करतात. तेव्हा तु कुणाला जास्त रागाने टोचून बोलत जाऊ नकोस. पण आई तेव्हढया पुरतं शांत बसायची. पुन्हा येरे माझ्या मागल्या प्रमाणे असं जवळ जवळ वर्षभर चाललं आहे . सगळी कौटुंबिक शांती जणू हरवली आहे. मुली घुम्या सारख्या रहात आहेत .पत्नीची धुसफूस चालते .
पत्नीला समजावून सांगितलं, "आईचं वय झालंय आता, तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस"..... तर तिचं म्हणणं असं की, '' तुम्ही आणि मुली दिवसभर घराबाहेर असता, मला एकटीला सर्व ताण सोसावा लागतो" .....
यात एकच जमेची बाजू म्हणजे आम्ही दोघेही मुलींना व्यवस्थित सांभाळतो.मुली पण अभ्यास नीट करत आहेत. त्यामुळे ती काळजी नाही . मध्यन्तरी आईची तब्येत खूप बिघडली होती. तिला आतापर्यन्त मधुमेह नव्हता. थोडा रक्तदाब होता त्याची गोळी सुरु होती. अचानक तिच्या रक्तातील साखर खूप वाढली आणि चक्कर येऊन सौम्य पक्षघाताचा झटका आला. तातडीने उपचार केले त्यामुळे जास्त त्रास नाही झाला. आता तिला डॉक्टरांनी जास्त बोलायला बंदी केली आहे. खाण्याचे पथ्य पण करायला सांगितलं आहे. त्यामुळे सध्या घरात शांतता आहे.तिच्या तब्येतीची काळजी घेतली जातआहे.परंतु मनात धास्ती वाटते की आई बरी झाल्यावर परत तशीच वागायला लागली तर? .... !!"
माधवरावांनी त्यांची घरगुती समस्या आम्हाला सविस्तर पणे सांगितली.आम्ही सर्वांनी त्यांना दिलासा दिला. आमच्या मोठ्या साहेबांनी माधवरावांच्या पाठीवर हात ठेऊन म्हटले, "खूप दिवसांनी मन मोकळे झाले तुमचे, माधवराव. आता मनातील सगळी धास्ती काढून टाकायची. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की,कधी कधी परिस्थिती आपल्या हाताबाहेर जायला लागली तर कठोर व्हायला लागते.तोच एकमेव रामबाण इलाज असतो.".......
त्या नंतर माधवराव पुर्वी प्रमाणे व्यवस्थित वागू लागले. चिंता, काळजीच्या रेषा चेहऱ्या वरून नाहीशा झाल्या. त्यांचे पूर्वीचे व्यक्तीमत्व त्यांना परत मिळालं. ऑफिसचं काम पूर्वीसारखं जोरात चालू झालं.मोठे साहेब रिलॅक्स झाले. आम्ही सर्व जण पूर्वीच्या शिस्तीत वागू लागलो. आम्हाला माधवरावांच्या विषयी मनात आदर व जिव्हाळा निर्माण झाला तो अजूनही आहे.
नंतर जवळपास वर्षाने एकदा अशाच एका ऑफिसाच्या कार्यक्रमाच्या वेळी सहज बोलताना माधवराव आम्हा सर्वांना म्हणाले होते......
"आईचं रिकामपण कमी व्हावं म्हणून आम्ही विचारपूर्वक तिला झेपतील इतक्या कामांची जबाबदारी तिच्यावर टाकायला सुरवात केली आहे . आम्ही सर्वांनी आता काही कामासाठी तिच्यावर अवलंबून राहायला सुरवात केली.आश्चर्य म्हणजे तिने सर्व कामे व जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्या. स्वतःच शिवणकाम स्वतः करू लागली. गावी अधून मधून जाऊन तिथली सर्व देखरेख ती करू लागली. आजूबाजूच्या समवयस्क महिलांच्या बरोबर बाहेर फिरणे व भजन कीर्तन, बाहेर गावी ट्रीपला जाणं यात तीने स्वतःला व्यस्त ठेवलं. त्यामुळे तिची तब्येत चांगली झाली आहे...."
आयुष्य भर सर्व कामे व जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळणाऱ्या माणसांना नंतरच्या आयुष्यात आलेलं रिकामपण सोसत नाही. त्यांची चिडचिड होते.सतत दुसऱ्यांशी तुलना करून नकारात्मक विचार करायची सवय लागते. त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनस्वास्थ्य बिघडते. कुटुंबातील माणसे त्यांच्यावर नाराज होऊन त्यांच्या कडे दुर्लक्ष करतात. यासाठी प्रत्येकाने सदैव स्वतःला झेपत असेल तेव्हढे काम कायम करत राहायला हवे. त्या मुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगलं राहायला मदत होईल.
©Vasanti Pharne

फोटो -गुगल, ( साभार )