Forward books and stories free download online pdf in Marathi

फॉरवर्ड

"फॉरवर्ड"

(कन्सेप्ट - संदीप चिपरे,
स्क्रिनप्ले & डायलॉग्स - सूरज गाताडे)

FADE IN:
1) INT. BAR - DAY
(एक व्यक्ती, दाढीची खुरटे वाढलेली. बराच सावळा. डोळे लाल. कपडे अस्ताव्यस्तच, बिअर खरेदी करून बाहेर घेऊन जाते...)
1 A) EXT. BAR
(त्याचा मित्र रंग-वेष बराचसा त्या व्यक्ती सारखाच. बाईकवर रेडीच असतो. बार मधून बाहेर आलेली व्यक्ती बाईकवर असलेल्या मित्राला बाटली हँड ओव्हर करते व मागे बसते. मित्र बाईकच्या हँडलला असलेल्या पिशवीत ती बाटली ठेवून देतो व आपल्या तोंडात असलेली सिगरेट मागील व्यक्तीला देतो. सिगरेटचे भपके घेत असतानाच तोच त्या व्यक्तीची कशावर तरी नजर पडते व तंद्री लागणारे त्याचे डोळे किलकिले होतात. काही तरी आठवण्यासाठी कपाळावर आठ्या आणत ती व्यक्ती विचार करते. मित्र बाईकला किक मारत असतो. व्यक्ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला थांबवते. मित्र मागे त्याच्याकडे पाहतो. खुणेनेच "काय" म्हणून विचारतो. व्यक्ती त्याला समोरील दिशेने पाहण्यास खुणावते. मित्र पाहतो, समोरून एक युफॉर्म घातलेला, पाठी दप्तर असलेला लहान शाळकरी मुलगा आपल्याच मस्तीत खेळत, लहान दगडाला ठेचकाळत व हातातली वॉटरबॅग गोल फिरवत चालत येत असतो. मित्राला त्याला नेमकं काय सांगायचं आहे ते समजत नाही. तो पुन्हा काय म्हणून विचारतो. व्यक्ती मग खिशातून मोबाईल काढून त्याला काही तरी दाखवते. मग मित्राचा देखील नूर बदलतो व चेहऱ्यावर काही तरी गवसल्याचं स्मित त्याच्या चेहऱ्यावर उमटतं. मागील व्यक्ती घाईने उतरू लागते. पण मित्र त्याचा हात धरत त्याला आडवतो. मानेने नाही म्हणतो. तो मुलगा जवळ येईपर्यंत वाट पाहिली जाते. बाईक मुलगा येतोय त्या दिशेने वळवली जाते आणि जेव्हा तो त्यांच्यापासून अपोसिट डिरेक्शनने पास होत असतो, तेव्हा एखाद्या चावी दिलेल्या खेळण्याला अलगद मध्येच उचलावे तसे त्या मुलाला उचलले जाते. त्याला दोघांच्या मध्ये बसवले जाते. मुलाने दंगा, आरडाओरडा करू नये म्हणून आपल्या खिशातील च्युईंग-गम काढून त्याच्या हातात व्यक्ती टेकवते. मुलगा पण मग त्या च्युईंग-गमला थोडं पुढं-मागं करून पाहतो व वेस्टन काढून लगेच तोंडात टाकतो. मित्र लगेच गाडीला किक करतो. आधी खूपदा प्रयत्न केला असल्याने गाडी गरम झालेली असते. यावेळी एकाच फटक्यात गाडी चालू होते. आणि ती भर्रकन समोरचा रस्ता धरते.)
(गाडी बाजारहाट करत असलेल्या एका बाईच्या जवळून पास होते. ती त्या मुलाला ओळखते. पण हे लोक तिच्या ओळखीचे नसतात. ती पटकन आपला फोन काढते. घाईत नंबर शोधते व फोन कानाला लावते. फोन कनेक्ट होऊन पलिकडून कोणीतरी तो उचलतोस्तोवर तिचा जीव घाबरा झालेला असतो. पलिकडून फोन उचलला जातो. पण हॅलोची वाट न पाहता ती अधीरतेने बोलते...)
बाई: अहो तुमचा चिंटू किडनॅप झालाय...कुणीतरी दोघंजणं आत्ताच त्याला उचलून घेऊन गेले...
कट टू:
1 B) INT. AJOBA'S HOME - LIVING ROOM - DAY
(आई त्या बाईचं बोलणं मोबाईलवर ऐकते आहे. तिला धक्काच बसतो.)
आई: काय???
(आजोबा देखील लिव्हिंग रूममध्ये पेपर वाचत बसलेले असतात. आईची अचानक झालेली मोठी प्रतिक्रिया त्यांचं लक्ष वेधून घेते.)
आजोबा: काय झालं अनिता? ओरडलीस का?
(आई आजोबांकडे वळली.)
आई: (अधीरतेने, कसं बोलावं ते तिला सुचत नाही, तरी सांगणं भाग आहे हे लक्षात घेऊन) बाबा... आपला चिंटू...
(पण पुढं तिला बोलवत नाही. एकवटलेलं बळ गळून पडतं. हातात असलेला पेपर आजोबांनी मांडीवर ठेवला.)
आजोबा: (मुद्रा सचिंत) बोल अनिता... बाळा काय झालं...? सांग पटकन!
आई: (रडत) माझ्या मुलाच्याच बाबतीत हे असं सारखं काय होतंय काही समजत नाही... हे पण नेमके गावी गेलेत!
आजोबा: (अधीर व अधिक चिंतित होत) असं कोड्यात बोलू नको बाळा. काय झालंय ते नीट सांग.
आई: फडतरे काकूंच्या फोन आला होता... त्यांनी चिंटूला कोणीतरी पळवून नेलेलं पाहिलं...
(आजोबा दचकून उठतात. मांडीवर असलेला पेपर खाली जमिनीवर पडतो. पाने विस्कटतात.)
आजोबा: (गडबडीने) तू... तू काही काळजी करू नको बाळा... मी आत्ताच पोलीस स्टेशनला जातो.
आई: (अधिरपणे ) मी पण येते!
आजोबा: नको! तू घरीच थांब. घर बंद करून घे. कोणी खात्रीचं आल्याशिवाय उघडू नको. मी जातोय पोलिसांकडे! तू... तू मात्र काही वेड-वाकडं डोक्यात घेऊन घराबाहेर पडू नको!
(वाक्य पूर्ण होतं न होतं तोच आजोबा घाईने तेथून तडख निघतात. पेपर उचलायचं भान देखील त्यांना नसतं.)
(आई चिंतित भाव चेहऱ्यावर घेऊन उभी असते. डोळे अश्रूंनी डबडबले. काहीवेळ तसाच जातो. आणि मग तिला आजोबांनी दिलेली सूचना आठवते व ती मुख्य दरवाजा बंद करून घेते व खिडक्यांकडे जाते...)
कट टू:

2) INT. POLICE STATION - DAY
(पोलिसांचे रुटीन चालू आहे. सगळे कामात व्यस्त. अशातच एक खूपच टेंस्ड् असे आजोबा स्वतःला सावरत स्टेशनमध्ये प्रवेशतात. एका हवलादराची त्यांच्यावर नजर पडते. मग त्यांच्याकडे जाऊन तो त्यांना आधार देतो व सब-इन्स्पेक्टरच्या डेस्कपाशी घेऊन येतो. आजोबांना बसण्यास मदत करतो. आजोबा कुर्त्याच्या खिशातून रुमाल काढून आधी कपाळावर जमा झालेला घाम टिपतात. त्यांची अवस्था पाहून सब-इन्स्पेक्टर त्यांना पाणी पिण्यास देतो. आजोबा एक-दोन घोट घेतात व काचेचा ग्लास जागी ठेवतात. थोडावेळ आजोबांना स्थिर होण्यास देऊन मग...)
सब-इन्स्पेक्टर: काय झालं काका... टेन्शन घेऊ नका बोला.
(सब-इन्स्पेक्टरने इनसिस्ट केल्यावर आजोबा कसं सांगावं यासाठी काहीवेळ मनातल्या मनात शब्द गोळा करतात व सांगू लागतात...)
आजोबा: काय आहे ना साहेब... माझा नातू चिंटू... म्हणजे चिंतन मदन राजमाने... वय पाच. तो महिना झालं शाळेलाच जाऊ शकत नाही आहे...
सब-इन्स्पेक्टर: (आश्चर्यचकित होतो) शाळेत जाऊ शकत नाही म्हणजे?
आजोबा: म्हणजे... तो शाळेतच काय, पण घरा बाहेर पण पडू शकत नाही आहे. तो जेव्हा केव्हा घराबाहेर पडतो, कोणी ना कोणी त्याला उचलून घेऊन जातो... हा त्याचा फोटो...
(मोबाईलमधील चिंतनचा फोटो सब-इन्स्पेक्टरला दाखवतात.)
सब-इन्स्पेक्टर: उचलून घेऊन जातात? कोण?
आजोबा: बरेच लोक...
सब-इन्स्पेक्टर: आजोबा काय ते नीट सांगा.
(आजोबा बोलायला तोंड उघडणार, तोच त्यांच्या मोबाईलची रिंग वाजते. आजोबा मोबाईल खिशातून काढून पाहतात.)
सब-इन्स्पेक्टर: कोण आहे?
INSERT: MOBILE - "UNKNOWN NUMBER"
आजोबा: (O.S.) अनोळखी नंबर आहे....
सब-इन्स्पेक्टर: घ्या! स्पीकरवर टाका.
(आजोबा मानेने हो म्हणत कॉल उचलून स्पीकर ऑन करतात.)
व्यक्ती: (V.O.) तुमचं पोरगं आमच्याकडं हाय. पैशे तयार ठेवा.
(सब-इन्स्पेक्टरचे डोळे चमकतात. तो लगेच समोरील नोटपॅडवर काहीतरी लिहितो व ते आजोबांकडे फिरवतो. आजोबा डोळ्यांनीच ते वाचतात. व मोबाईलमध्ये बोलतात...)
आजोबा: (मोबाईलमध्ये) कोण?
व्यक्ती: (V.O.) भेटल्यावर कळेलच की.
(ऐकून सब-इन्स्पेक्टर पुन्हा काही खरडतो व आजोबांकडे फिरवतो. आजोबा वाचतात.)
आजोबा: (मोबाईलमध्ये) कुठं भेटूया?
व्यक्ती: (V.O.) लोकेशन पाठवतो व्हॉट्सऍपवर. आणि ते पोलिसांचा झमेला करू नका. पोरगं भेटंल तुम्हाला. आमचं पैशे तयार घिऊन या म्हणजे झालं.
(सब-इन्स्पेक्टर पुन्हा काही खरडतो व आजोबांकडे फिरवतो. आजोबा वाचतात.)
आजोबा: (मोबाईलमध्ये) किती?
व्यक्ती: (V.O.) तुम्हाला माहीत हाय की आजोबा. वेळ घालवू नका. लवकर या.
(पलिकडून फोन कट होतो.)
सब-इन्स्पेक्टर: यांचा आधी पण फोन आला होता?
(आजोबा तोंडानेच "क्ट्च!" असा आवाज करतात.)
सब-इन्स्पेक्टर: मग तो माणूस असा का म्हणाला, की तुम्हाला माहीत आहे...
(आणि अचानक ट्यूब पेटल्यासारखं आजोबांना काहीतरी क्लिक होतं! एवढ्यात मेसेज टोन वाजते. लोकेशन आलेले असते. सब-इन्स्पेक्टर आजोबांच्या हातून मोबाईल घेतात व ते लोकेशन हवालदाराच्या मोबाईलला सेंड करतात.)
सब-इन्स्पेक्टर: (हवालदाराला) मुलाचा फोटो, लोकेशन आणि नंबर तुम्हाला पाठवला आहे. कोण आहे त्या हरामखोराला घेऊन या!
हवालदार: होय साहेब.
(म्हणत हवालदार खिशातून मोबाईल काढत बाहेर पळतात.)
आजोबा: (तोंडातल्या तोंडात पुटपुटतात) चाळीस हजार...
सब-इन्स्पेक्टर: अं? काय?
(आजोबा चपापतात. टेन्शनमध्ये येऊन मानेनेच "थोडं थांबा" म्हणतात...)
डिसॉल्व्ह टू:
SUPER IMPOSE - "अर्ध्या तासानंतर..."
(आजोबा सब-इन्स्पेक्टर समोरच बसून असतात. सब-इन्स्पेक्टर त्याच्या दुसऱ्या कामात व्यग्र असतो. इतक्यात मुलाला उचललेली ती व्यक्ती धाडकन आत येऊन आदळते. आजोबा व सब-इन्स्पेक्टर त्याला पाहून मग दरवाजाकडे नजर टाकतात. हवालदार मुलाला काखेत घेऊन त्या व्यक्तीच्या मित्राला ढकलत आत येतात. मुलगा अजूनही च्युईंग-गम चघळत असतो. आजोबा व सब-इन्स्पेक्टर उभारतात. आजोबाचे संमिश्र एक्सप्रेशन. हवालदार मुलाला खाली सोडतात.)
मुलगा: (आनंदनाने मोठ्याने) आजोबा...!
(मुलगा पळत येऊन आजोबांना बिलगतो. आजोबा त्याला उचलून घेतात. कवटाळतात.)
आजोबा: बाळा!
(पण यांच्या भरत-मिलापामध्ये खंड टाकत सब-इन्स्पेक्टर त्या दोघांकडे जातात व त्यांना दोन-दोन ठोके टाकतात.)
सब-इन्स्पेक्टर: किडनॅपिंग करू वाटतंय व्हय रे! हं?
(अजून तुंबलणार इतक्यात...)
आजोबा: साहेब! बास करा. ते किडनॅपर नाहीत.
(सब-इन्स्पेक्टर थांबतो.)
सब-इन्स्पेक्टर: तुम्हाला काय माहीत?
व्यक्ती: (घाबरली आहे) व्हय साहेब. आम्ही किडनॅप न्हाय केलं पोराला...
(त्याला मारायला साहेबाला पुन्हा चान्स भेटतो.)
सब-इन्स्पेक्टर: (मारत) ईचारलंय? कुणी ईचारलंय तुला? सांगंल तवाच बोलायचं!
हवालदार: साहेब हा खोटं बोलतोय. पोराला घेऊन हेच उभारले होते. मी यांच्याकडं जाण्याआधी मिसकॉल देऊन कन्फर्म पण केलंय!
सब-इन्स्पेक्टर: इशय संपला!
(सब-इन्स्पेक्टर पुन्हा हात साफ करू लागतो.)
व्यक्तीचा मित्र: (रडत) नाही सायेब. आमी तर तेला परत घरी पोचवत हुतो...
(त्याच्याकडे वळून सब-इन्स्पेक्टर त्याला तुडवू लागतो...)
सब-इन्स्पेक्टर: खोटं! खोटं बोलतंय.
(त्याचवेळी व्यक्ती गडबडीने खिशातून मोबाईल काढतो व व्हॉट्सऍप ओपन करून सब-इन्स्पेक्टरला दाखवू लागतो.)
व्यक्ती: नाय साहेब. हे... हे बघा...
(सब-इन्स्पेक्टर झिटिने त्याच्याकडे वळतो.)
सब-इन्स्पेक्टर: काय हाय?
(म्हणत त्याच्या हातून मोबाईल हिसकावून घेतो... आणि मजकूर वाचून स्तब्ध होतो. वैतागणे भुवया उंचावल्या जातात. तो आपल्या खुर्चीवर येऊन बसतो. आजोबा देखील त्याच्याकडे वळून मुलाला मांडीवर घेऊन बसतात.)
आजोबा: हेच सांगायचं होतं...
सब-इन्स्पेक्टर: मग कधी सांगणार होतात? यांचा हाफ मर्डर झाल्यावर?
आजोबा: (खजीलपणे) माफ करा... (त्या दोघांकडे वळतात. सुजलेले ते अगदीच बिचाऱ्यासारखे रडत कोंबडा होऊन बसलेले असतात. आजोबा त्यांना) माफ करा हं!...
व्यक्ती: (विचित्र रडत) हॅ! (रडणं चालूच राहतं...)
(यावरून व्यक्तीला आजोबांची माफी मंजूर नाही हे समजतं. आजोबा मग 'याच्या वर आपण काही करू शकत नाही' या विचाराने सब-इन्स्पेक्टरकडे वळतात. सब-इन्स्पेक्टर आजोबांच्या खुलास्याची वाटच बघत असतो...)
सब-इन्स्पेक्टर: हं! बोला!
आजोबा: (संकोचत) तुम्ही पाहिलेला मेसेज माझ्या मुलाकडून सगळ्या ग्रुप्सवर पाठवला गेलेला. लोकांकडून पुढं सरकत सरकत यांच्यापर्यंत पोहोचला असेल...
फ्लॅशबॅक टू:

3) INT. KINDERGARTEN SCHOOL - DAY
(शाळा सुटली आहे. पाठीला दप्तरं अडकवलेली, लहान मुलं एकमेकाला वॉटरबॅग्सनी मारत खेळत आहेत. यात हा मुलगा चिंतन देखील आहे. त्याला अचानक बाथरूमला येतं. तो टाइम्प्लिज घेऊन बाथरूममध्ये शिरतो. आतून दार लावून घेतो. त्याच्या मागून त्याच्या सोबत खेळणारी मुलं आलेली असतात. एक खोडकर मुलगा हसत तोंडावर बोट ठेऊन बाहेरून कडी लावतो. बाकीची मुलं समजतात, की हा आपल्याला गप्प बसण्याचा इशारा आहे. मग तेही हातांनी तोंड दाबून हसू लागतात. कडी लावणारा मुलगा हसतच सोबतच्या मुलांना बाहेर चलण्याचा इशारा करतो. मुलं तोंड दाबून हसतच बाहेर पळत सुटतात. आतून दार ठोठावलं जाऊ लागतं...
कट टू:
4) INT. AJOBA'S HOME - NIGHT
(काळजीने मुलाचे वडील सर्वांना फोन लावत आहेत. आई काळजीने सोफ्यावर बसून आहे. आजोबा वडिलांच्या जवळ येतात.)
वडील: (मोबाईलमध्ये) हो थँक्स!
(वडील फोन ठेवतात.)
आजोबा: काही कळालं का रे?
वडील: कुणाकडंच नाही. शाळेतल्या शिपायाने सगळे वर्ग पण पालथे घातले, पण नाही सापडला.
आजोबा: (काळजीत) कुठं गेला असंल हा पोरगा...
वडील: (काळजी व वैतागाणे) तेच तर कळत नाही!
आजोबा: पोलिसांत जाऊया?
वडील: चोवीस तास झाल्याशिवाय ते तक्रार घेणार नाहीत. (आणि काही तरी सुचतं) एक करू शकतो!
आजोबा: काय?
वडील: थांबा!
(लगबगीने खुर्चीवर बसतात व व्हॉट्सऍप मेसेज टाईप करतात.)
INSERT: MOBILE - मेसेज मध्ये मुलाची माहिती, त्याचा फोटो, आजोबांचा नंबर, व शोधून देणाऱ्यास बक्षीस रक्कम ₹ 10,000/-. मेसेज सेंड करतात.
वडील: (मोबाईलमध्येच इतर ठिकाणी मेसेज सेंड करत जवळ येऊन उभारलेल्या आजोबांना) व्हॉट्सऍप गुप्सना मेसेज पाठवला आहे. बघू उद्या पर्यंत सापडतोय का. (आजोबांकडे बघतो) बाबा, तुमचा नंबर टाकला आहे. तुम्हाला सहसा कुणाचा फोन येत नाही त्यामुळे तो फोन फ्रीच असतो. आपल्याला ते बरं पडेल. कुणाला चिंटू सापडला, की ते तुमच्या मोबाईलवर फोन करतील.
आजोबा: होय.
(वडील व आजोबा यांचा हा संवाद चालू असतानाच आई मात्र तिरिमिरीत उठून बाहेर चालू लागते. ते जाणवून वडील तिला हाक मारतात...)
वडील: अनिता! कुठं जातीयेस?
आई: (थांबते पण मागे पाहत नाही. ती वैतागानेच बोलते) तुम्ही बसा वाट बघत; मी जाऊन शोधते माझ्या मुलाला!
आजोबा: हे काय बोलतेस अनिता?
(वडील आजोबांना 'मी तिला समजावतो' अशा अर्थाने शांत होण्यास हात करतात व उठून आईकडे जातात.)
वडील: आणि जाऊन शोधणार कुठं आहेस?
आई: (वडिलांच्या नजरेला नजर न देता) माहीत नाही! पण घरात बसणं मला शक्य नाही!
वडील: आणि तुला वाटतं आम्हाला शक्य आहे?
आई: (कठोर आवाजात) मला माहित नाही!
आजोबा: (आईकडे येतात) हे बघ बाळा, विजय म्हणतोय तसं सकाळपर्यंत थांबू , मग जाऊ ना पोलिसांकडे. आणि तू काळजी करू नको. आपला चिंटू नक्की सापडेल. तू... तू आत जा. जरा रेस्ट घे. जा.
(आई वडिलांकडे रागावलेली नजर टाकून आत निघून जाते.)
बॅक टू:
PRESENT DAY
5) INT. POLICE STATION - DAY
(इतर काही स्टाफ आजूबाजूला जमलेला असतो. सगळे लक्षपूर्वक ऐकत असतात.)
सब-इन्स्पेक्टर: पुढं!
आजोबा: सगळी रात्र काळजीत गेली. सकाळी आठ वाजता हा घरी आला. कळालं, की हा बाथरूममध्ये बंद झाला होता. बाहेरून कडी लावली होती. सकाळी सफाई कामगार बाथरूम साफ करत असताना त्याला तिथं आत हा झोपलेला आढळला. तोच मग याला घरी सोडून गेला...
सब-इन्स्पेक्टर: मग? हा शाळेला न जाण्याचं कारण?
आजोबा: तेच जे आज झालं. हा बाहेर पडला, की कोणी ना कोणी याला हरवलेला समजून रस्त्यातून उचलून घरी घेऊन येतो व हट्टून पैसे घेऊन जातो. मेसेज बघितलेल्या लोकांनी तो पुढे-पुढे पाठवला होता. असा सगळीकडं तो पसरला. अजूनही तो फिरतो आहे... यांच्यापर्यंत पण हा मेसेज असाच पोहोचला असेल...
(खुलासा झाल्यावर काही वेळ सगळेच शांत... अगदी टाचणी पडली तरी त्याचा आवाज होईल असे...)
(आणि अचानक सगळ्यांचा हास्याचा स्फोट होतो.... सब-इन्स्पेक्टर मागे रेलून हसू लागतो. तशात त्याचा तोल जातो. तो मागे पडणार इतक्यात स्वतः हसणारा हवालदार पुढे होऊन त्याची खुर्ची सावरतो. सब-इन्स्पेक्टर हसायचं थांबून सावरून उभारतो. दरम्यान सगळे शांत झालेले असतात. पण सब-इन्स्पेक्टरला पुन्हा हसू आवरत नाही व थुंकीचा फवारा उडवत तो पुन्हा उधळतो... हे पाहून सगळे पुन्हा सुरू होतात. मुलाला उचललेली व्यक्ती व त्याचा मित्र देखील सुजलेली तोंडं आणि त्यांच्या वेदना सहन करत हसत असतात. मधेच कण्हत असतात. आजोबा आणि मुलाला मात्र कळत नाही की यात हसण्यासारखं एवढं काय आहे?)
सब-इन्स्पेक्टर: (सावरून बसत) असं चाळीस हजार होय... (पुन्हा हसतो.)
आजोबा: काय झालं? काही चुकलंय का साहेब?
(सब-इन्स्पेक्टर स्वतःचं हसू आवरत बोलतो...)
सब-इन्स्पेक्टर: अहो सगळंच चुकलंय!
आजोबा: (गोंधळून) म्हणजे?
सब-इन्स्पेक्टर: या क्राईम पेट्रोलनं सगळ्यांची डोकी फिरवल्यात. सगळ्यांना एकदमच डिटेक्टिव्ह करून सोडल्यात.
(पोलीस स्टाफ पुन्हा हसतो. आजोबांचा गोंधळला चेहरा पाहून सब-इन्स्पेक्टर पुढं बोलतो...)
सब-इन्स्पेक्टर: आपल्या सारख्या शिकलेल्या लोकांनी तरी असं करू नये. अहो, जर कोण हरवलं आहे अशी शंका वाटली, तर लगेच पोलिसांना इंफॉर्म करावं. हे 24 तास वगैरे असं काही नसतं. अहो 24 तासांत माणसाबरोबर काहीही होऊ शकतं! उलट जेवढ्या लवकर एखादी व्यक्ती हरवली आहे हे आम्हाला समजेल, तेवढे त्या व्यक्तीला शोधण्याची, वाचवण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे माणूस हरवल्याची माहिती जेवढ्या लवकर आम्हाला समजेल तेवढं चांगलं असतं.
आजोबा: सॉरी साहेब.
सब-इन्स्पेक्टर: दुसरी गोष्ट; (हातातील त्या व्यक्तीचा मोबाईल नाचवत) ही जी काही डोकेदुखी आहे, ती तुम्ही स्वतः ओढवून घेतली आहे. मुलाचा शोध घ्यायला तुम्ही मेसेज सेंट केलेत इथपर्यंत ठीक होतं. पण तो मिळाल्यावर तो मिळाल्याचा मेसेज देखील तुम्ही स्प्रेड करायला हवा होतात!
आजोबा: मग? आता काय करू...?
(सब-इन्स्पेक्टर पुन्हा हसू लागतो.)
सब-इन्स्पेक्टर: हा सापडल्याची बातमी व्हॉट्सऍप करा. ही बातमी पण होऊ द्या व्हायरल...!
(शेवटचं वाक्य सब-इन्स्पेक्टर मानेला झटका देत बोलतो. पोलीस स्टाफ पुन्हा मोठ्याने हसू लागतो... आजोबा अधिकच खजील होतात... व स्मित करतात.)
FADE OUT:
व्हॉइस ओव्हर: हे असं आपल्या सोबत पण होऊ शकतं... किंवा आपल्यामुळे कुणाला तरी असा त्रास होऊ शकतो. म्हणून सोशल मीडियावर आपण जास्त विसंबून राहू नये. त्याचा उपयोग नक्कीच आहे. पण कोणती बातमी खरी आहे, कोणती ताजी आहे याची पडताळणी आधी करावी. आपण काय फॉरवर्ड करतो याची शाहनिशा करून मगच ते पुढं पाठवावं...
(हे शब्द ब्लॅक बॅकग्राऊंडवर देखील आवाजासोबत उमटतात...)
END CREDITS ON BLACK BACKGROUND...
सब-इन्स्पेक्टर: (V.O.) काका, या आता. आणि सांगितलंय त्याची कळजी घ्या. जवळच्या लोकांना पण सांगा. खरी माहिती घेऊन मगच फॉरवर्ड करत जा म्हणावं.
आजोबा: (V.O.) होय साहेब. धन्यवाद. चल बाळ. (पुढील आजोबा व मुलगा बोललेल्या वाक्यांचा आवाज कमी कमी होत जातो. यावरून समजतं, की आजोबा मुळा घेऊन दूर जात आहेत...) आणि हे च्युईंग-गम बाहेर कचरापेटीत थुकायचं. कितीदा सांगितलं आहे. असलं काही खायचं नाही. कुठून घेतलंस?
मुलगा: (V.O.) पोलीस काका मारत असलेल्या काकांनी दिलं.
(पुढील सर्व संवाद नॉर्मल आवाजात...)
व्यक्ती: (V.O.) साहेब आमचे दहा हजार...
(मारल्याचा आवाज... व्यक्ती व त्याच्या मित्राचा ओरडण्याचा आवाज...)
व्यक्ती: (V.O.) नाही. नाही नकोत. पैशे नकोत...
(आणि पुन्हा मारल्याचा व त्याचा पुन्हा ओरडण्याचा आवाज...)
सब-इन्स्पेक्टर: (V.O.) आणि काय रे; लहान मुलाला चिंगम खायला देता... भोपाडीच्यांनो!
(पुन्हा मारल्याचा, ओरडल्याचा आवाज...)
हवालदार (V.O.) साहेब यांचं करायचं काय? सोडून देऊ?
सब-इन्स्पेक्टर: (V.O.) पाहुणचार घेऊ देत जरा. दिवसाढवळ्या आणि बारक्या पोरासमोर दारू पितात सुत्ताळीचे!

समाप्त!!!

सदर कथा ही 'फॉरवर्ड' या नांवाने शॉर्टफिल्म स्वरूपात संदीप चिपरे प्रोडक्शन्स अंतर्गत निर्मित केली गेली आहे.