Lakshmi - 4 books and stories free download online pdf in Marathi

लक्ष्मी - 4

कादंबरी लक्ष्मी भाग - चौथा

मोहनचे लग्न

मोहनचे काम अगदी सुरळीत चालू होते. रोज सकाळी शहरात जाणे व सायंकाळी परत येणे. आईच्या हाताने तयार केलेला डबा सोबत असायचे. त्याला बाहेरचे खाण्याची अजिबात सवय नव्हती. साधी चहा पिण्याची सुद्धा लकब नव्हती बाकीच्या गोष्टी तर कोसो दूर होत्या. दुपारच्या वेळी दुकानातच आपला डबा खायचा आणि काम करायचं. त्याचे काम पाहून व्यापारी खूपच आनंदात होता. त्याला मोहनच्या स्वरूपात एक प्रामाणिक, मेहनती आणि कष्टाळू प्रधानजी लाभला होता. मोहनचे पाय दुकानाला लागल्यापासून त्याच्या व्यापारात देखील वृद्धी झाली होती. मोहनच्या भरवश्यावर तो व्यापारी दुसऱ्या गावात जाऊन आपला व्यवहार करू लागला. मोहनच्या मनात कधीही लालच किंवा लोभ निर्माण झाले नाही म्हणून तो तिथे टिकून काम करत होता. मोहनचे आता लग्नाचे वय झाले, म्हणून आई नेहमी त्याला लग्नाविषयी विचारायची पण मोहन त्याकडे दुर्लक्ष करायचा. आज आईने जेवतांना परत विषय काढली, " बाळ, आता किती दिवस असा विना लग्नाचा राहणार आहेस ? लग्न करून घे, म्हणजे मला ही सोबत होईल, मला एकटीला घर खायला येत आहे." यावर मोहनने फक्त मान हलविली आणि म्हणाला, " ठीक आहे, तुला सोबत होते म्हणून होकार देत आहे." हे ऐकून आईला अत्यानंद झाला. आता मुलींचा शोध घेणे आवश्यक आहे कारण मोहनने लग्नाला होकार दिलंय असे ती शेजाऱ्यापाजाऱ्यांना सांगितली. काही जणांनी स्थळ देखील सुचविले. त्यात एकाने भावाची मुलगी लग्नाला आलेली आहे, त्यालाच मागणी का करत नाहीस ? असे सुचविले.
तिच्या मनात देखील हे विचार चालू होतेच, पण भाऊ मानेल का ? आपल्या मोहनसाठी भावाची मुलगी उत्तम आहे असे तिला वाटू लागले. हा विचार तिने मोहनला सांगितली तेंव्हा मोहनने प्रथम नकारच दिला होता. कारण मामा एकवेळ होकार देईल पण मामीला हे नाते कधीच मान्य होणार नाही. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे बोलणे, येणे-जाणे सारेच बंद झाले होते. आता काय म्हणून जावे ? हा प्रश्न होता. तरी आईच्या हट्टापायी एके दिवशी ते दोघे मामाच्या गावी गेले. खूप दिवसांनी बहीण आपल्या घरी आल्याचे भावाला खूप आनंद झाला होता. चहा पाणी जेवण आटोपल्यावर आईने लग्नाचा विषय काढला आणि त्याच्या मुलीची मागणी केली. मामाच्या चेहऱ्यावर तसा आनंद झळकत होता मात्र माजघरात असलेल्या मामी मात्र लालबुंद झाली आणि आदळआपट करू लागली. मामीने मामाला आत बोलावून घेतलं. दोघांत काही तरी चर्चा झाली. विचार करून सांगतो असे बोलून मामाने बहिणीची आणि मोहनची पाठवणी केली. मोहनला।एव्हाना लक्षात आलं होतं की हे नाते जुळणार नाही. असेच काही दिवस निघून गेले आणि मामा एके दिवशी सकाळी सकाळी मोहनच्या घरी आला ते ही साखरपुड्याचे आमंत्रण घेऊन. परवाच्या दिवशी साखरपुडा आहे, तुम्ही यावे असा निरोप त्याने दिला. आई अगदी नाराज झाली होती पण चेहऱ्यावर कसलाही भाव न आणता ती म्हणाली, काय करतो मुलगा ? मामा म्हणाला, जावई शिक्षक आहे आणि महिना पंधरा वीस हजार रु. पगार आहे. बरे झाले सावित्रीचे भले झाले, आमच्या घरात तिला काही मनासारखं भेटलं नसतं, जे झालं ते चांगलं झालं असं आई म्हणाली. ते ऐकून मामाच्या डोळ्यांत पाणी आले. बरं जातो, या तुम्ही म्हणून मामा निघून गेला. मोहन हे सारं बाजूला बसून ऐकत होता. आईने आपल्या काळजावर किती मोठा दगड ठेवून बोलत होती, हे त्याला कळाले होते. लग्नाच्या विषयामुळे घरात जराशी शांतता होती. पाहुण्यांमध्ये मोहनच्या लग्नाची गोष्ट पसरली तशी काही स्थळ आले होते पण कोणत्या ना कोणत्या कारणाने जुळत नव्हते. मोहनकडे होतंच काय म्हणून, दोन एकर जमीन, छोटंसं घरटे आणि तुटपुंजी पगाराची खाजगी नोकरी. यामुळे कोणी वधुपिता मोहनला आपली मुलगी तयार होत नव्हते. यामुळे मोहनचह मनात न्यूनगंड निर्माण होऊ लागला होता. मागील काही दिवसांपासूनचे मोहनचे वर्तन पाहून त्याच्या मालकाने त्याला विचारले, " काय झालं मोहन, आजकाल तू पूर्वीसारखं दिसत नाहीस, नेहमी चिंताग्रस्त वाटतोस, काही समस्या असेल तर सांग मला" पण मोहनने काही नाही म्हणून उत्तर देण्याचे टाळत होता. एके दिवशी मालकाला मोहनची समस्या कळाली तेंव्हा त्याने मोहनला धीर दिला आणि म्हणाला, " माझ्या ओळखीचा एक व्यक्ती आहे, तुमच्याच जातीचा, त्याची मुलगी लग्नाची आहे, आपण विचारून पाहू" मोहनने आपली नुसती मान हलविली. मालकाने त्या ओळखीच्या व्यक्तीला मोहनच्या बाबतीत पूर्ण माहिती दिली आणि एके दिवशी ते मुलगी पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यांचे घर ही साधारण होते, मोहनला साजेशी मुलगी होती. आईला ती मुलगी पाहताक्षणी पसंद पडली. मोहनचा तर प्रश्नच नव्हता. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात साखरपुडा झाला. राधा तिचे नाव. दोन महिन्यात लग्नाची तारीख काढली. लग्न लावून देण्याची सारी जबाबदारी त्या व्यापाऱ्याने घेतली. गावात लग्न लावण्यापेक्षा शहरात मोठ्या धुमधडाक्यात मोहनचे लग्न लागले. अनेक पाहुणे, नातलग, मित्रमंडळी या लग्नाला उपस्थित होते. मामा-मामी, सावित्री आणि तिचा नवरा सारेच आले होते. मामी तर चक्क तोंडात बोटे टाकून एकटक मोहन आणि राधा यांच्याकडे पाहत होती. लग्नसोहळा संपन्न झाला. सारे आपापल्या गावाकडे गेले. मोहन, त्याची आई आणि नववधू राधा आपल्या घरी आले. बा च्या फोटोपुढे नतमस्तक झाले नंतर आईच्या पाया पडले. त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. राधा ही खूप चांगली आणि सोज्वळ स्वभावाची होती. गरीब घरातून आल्यामुळे तिला प्रत्येक गोष्टीची जाण होती. आईला त्रास होईल असे तिने कधीच वागले नाही. मोहनला देखील तिने कधी हट्ट धरून बंडावून सोडले नाही. आई आज मनोमनी खूप आनंदात होती. बरे झाले सावित्रीला सून म्हणून आणलं नाही असे तिला मनोमनी वाटत होतं कारण ती चांगल्या घरातली मुलगी होती, तिला या झोपडीत अस्वस्थ वाटले असते, ती टिकली असती की नाही माहीत नाही असे आईला मनात वाटत होते. दुपार झाली होती. आई नुकतेच जेवण करून पहुडली होती. तेवढ्यात राधाला काही तरी त्रास होत होता. उलट्या येत आहेत असं वाटू लागलं होतं पण बाहेर काही येत नव्हतं. तिला घाबरल्यासारखे झालं पण आईला कळलं की राधेला दिवस गेले आहेत. सायंकाळी मोहन घरी आल्यावर आईने सांगितलं की, राधाला उद्या दवाखान्यात घेऊन जा आणि एका चांगल्या डॉक्टरांना दाखव. राधाला दुपारी त्रास झाला हे मोहनला कळाले म्हणून सकाळीच तो राधाला घेऊन शहरात गेला. एका चांगल्या नामांकित डॉक्टर मॅडमला दाखविले. त्या मॅडमने मोहनला आनंदाची बातमी सांगितली तेंव्हा मोहनला खूप आनंद झाला. दोघे ही दवाखान्यातून घरी परत आले. आईला त्याने ही आनंदाची बातमी सांगितली तेंव्हा आई म्हणाली, " हो, मला कालच लक्षात आलं, पण दवाखाना केलेलं बरं म्हणून जा म्हटलं" बाप होणार या आनंदात तो स्वप्नात रंगून गेला आणि गाढ झोपी गेला.
क्रमश:

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769