Lakshmi - 8 books and stories free download online pdf in Marathi

लक्ष्मी - 8

शेतीपेक्षा शिक्षण महत्वाचे

लक्ष्मीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मोहन शहरात आला. पहिल्यांदा त्याने भोसले सरांची भेट घेतली व त्याच्याशी चर्चा करून शहरातल्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचं निश्चित झालं. कॉलेजचा प्रश्न सुटला पण लक्ष्मीचा राहण्याचा आणि जेवण्याचा प्रश्न अजून सुटला नव्हता. भोसले सरांनी शहरात मुलींसाठी एक चांगले वसतिगृह असल्याचे सांगितले. काही वेळानंतर तिघेजण कॉलेजात गेले आणि लक्ष्मीची अकरावी सायन्समधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. तेथून त्यांनी मुलींच्या वसतिगृहाकडे गेले. तेथे सर्व विचारपूस केल्यावर मोहनला ते वसतिगृह लक्ष्मीसाठी योग्य वाटले. लक्ष्मी तेथे अगदी सुखरूप आणि सुरक्षित राहणार याची खात्री पटल्यावर तिचे नाव तेथील वसतिगृहात टाकण्यात आले. एकट्या मुलीला शहरात ठेवणे कोणत्याही पालकांसाठी एक काळजीचा विषय असतो, तसा मोहनचा देखील होता. लक्ष्मीला लागणारे वह्या, पुस्तके व इतर साहित्य खरेदी करून सायंकाळी ते दोघे घरी परतले. लक्ष्मीताईचे सर्व खरेदी केलेले साहित्य पाहून तिचा भाऊ राजू मोठ्याने रडू लागला. मला ही पाहिजे म्हणून हट्ट धरू लागला. राधाने कसे बसे त्याला समजावून गप्प केले. रात्रीचे जेवण उरकले, मोहन आपल्या जागेवर झोपण्यासाठी आडवा झाला. बराच वेळ झाला तरी त्याला झोप लागत नव्हती. त्याच्यासमोर लक्ष्मीच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा कुठून गोळा करायचं ? हा प्रश्न पडला होता. कॉलेजची फीस, वसतिगृहाची रक्कम आणि खाजगी ट्युशनवल्याची फीस हे सारं म्हटलं तरी दीड-दोन लाख तरी लागणार होते. उच्च शिक्षण घेणे हे गरिबांसाठी किती कठीण बाब आहे, याची त्याला जाणीव होऊ लागली. मी भरपूर कष्ट करेन आणि लक्ष्मीचं शिक्षण पूर्ण करेन, तिला कोणतीही समस्या येऊ देणार नाही असा निर्धार करून त्याच विचारात तो झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मीने आपल्या सामानाची बांधाबांध केली. आजोबांच्या फोटोला नमन केली. माईला दंडवत घातली. आई-बाबाच्या चरणाला स्पर्श केला. भाऊ राजूचा गोड पापा घेतली आणि आपल्या मार्गाला लागली. ती दूरवर जाई पर्यंत माय, आई आणि राजू तिला पाहत होते. ती डोळ्यासमोरून दिसेनाशी झाली तेंव्हा ते घरात परत आले. मोहनने तिला वसतिगृहात सोडला आणि आपल्या गावाकडे परत आला. त्यादिवशी मोहनला रात्रभर झोप लागली नाही. सतत त्याला लक्ष्मीचा चेहरा दृष्टीस पडत होता. पैशाची काही तरी जोड लावावीच लागेल. काय करता येईल ? या विचारात त्याला त्याचा मित्र संजूची आठवण आली. सकाळी उठल्यावर त्याने संजूचे घर गाठलं. त्याला सर्व कहाणी सांगितली. एखादं लाख रुपयांची मदत करण्याची विनंती त्याला केली. रक्कम जास्त आहे आणि पुन्हा त्याचा व्यवहाराचा प्रश्न असल्याने त्याने एका अटीवर पैसे देण्याचे कबुल केले. एका वर्षासाठी त्याची शेती संजूला द्यायची या करारावर दोघे सहमत झाले. मोहनला पैसे मिळाले म्हणून त्याची काळजी मिटली होती. आईला ही गोष्ट कळल्यावर आईने मोहनला म्हणाली, " त्याला शेती देऊन, तू काय करणार आहेस ?" यावर मोहन म्हणाला, " बघू काय करता येईल ते" असे म्हणून मोहन शहराकडे जाण्यास निघाला. कॉलेज आणि वसतिगृहाची फीस भरून टाकली आणि आता तो निश्चित झाला. लक्ष्मीच्या शिक्षणाची काळजी मिटली याचा त्याला आनंद झाला होता.
आता त्याच्याजवळ शेती नव्हती तर कोणते काम करावं ? हा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्याने आपल्याच शेतात मजुरी करण्याचा निर्धार केला. आपला मित्र संजूला भेटून शेतातच काम करू देण्याची विनंती केली. संजूने लगेच ती मान्य ही केली. मोहन आपल्याच शेतात एका मजुरासारखे काम करू लागला, राधा देखील त्याच्यासोबत काम करू लागली. या कामामुळे रोजच्या जेवण्याचा प्रश्न मिटत होता, त्यातच मोहन समाधानी होता. दुसऱ्या वर्षी देखील मोहनने पहिल्यासारखंच संजूला एका वर्षासाठी शेती दिली आणि मिळालेली रक्कम लक्ष्मीच्या शिक्षणासाठी खर्च केला. गावातील काही लोकं त्याच्या वागणुकीवर टीका करत होती. शेत गहाण ठेवून मुलीला एवढं शिकवून याला काय मिळणार, मुलगी तर परक्याची धन आहे, ती उद्या दुसऱ्याच्या घरी जाणार, पुन्हा लग्न करून देतांना हुंडा द्यावा लागतोच की, मग एवढं शिकवण्यापेक्षा लग्न लावून दिलं तर एक काळजी तरी मिटेल. अश्या अनेक चर्चेच्या गोष्टी त्याच्या कानावर येत होते. मात्र तो कोणत्याच गोष्टीकडे जास्त लक्ष न देता, आपल्या कामावर लक्ष देत असे. पाहता पाहता दोन वर्षे संपली. लक्ष्मी बारावीची परीक्षा देऊन घरी आली. राजूने आठवीची परीक्षा दिली होती.
उन्हाळ्याचे दिवस होते. सारेजण शेतात गेले होते. शेतातील आंब्याच्या झाडावरील आंब्याचा सुगंध सुटला होता. लक्ष्मीला आंबे खाण्याचा मोह सुटला. तशी ती धावतच आंब्याच्या झाडाकडे पळाली तेव्हा राजूने तिला अडवलं आणि म्हणाला, " दीदी, हा आता आपला आंबा नाही. हा तर संजू काकांचा आहे" यावर लक्ष्मी म्हणाली, " ते कसे काय, बाबांनी काय हा झाड विकला आहे का ? " त्यावर राजू म्हणाला, " मला माहित नाही, पण बाबा म्हणत होते की, आंब्याच्या झाडाकडे कोणी जाऊ नका, तो आता संजू काकांचा आहे म्हणून" लक्ष्मी धावतच मोहनकडे आली आणि म्हणाली, " बाबा, राजू काय म्हणतो, ते आंब्याचे झाड आपले नाही." यावर मोहन म्हणाला, " होय बाळा, ते आता संजू काकांचे आहे, एका वर्षासाठी आपण त्यांना शेत दिलो नाही का ?" लक्ष्मी नाराज होऊन म्हणाली, " शेत दिलं म्हणून काय झालं ? ते झाड देखील त्याचं होते का ?" हे सारं संजू दूरवरून ऐकत होता. त्याला राहवलं नाही, तो जवळ आला आणि म्हणाला," लक्ष्मी तुझं बरोबर आहे, मी फक्त तुमची शेती घेतली कसायला, ते आंब्याचे झाड तुमचंच आहे, जा मनसोक्त आंबे खा" असे म्हणतात राजू आणि लक्ष्मी आंब्याच्या झाडाकडे पळाले. पुढील महिन्यात त्यांचा शेतीचा करार संपणार होता.परत शेती देण्याचा विचार आहे का ? म्हणून संजूने मोहनला विचारले तेव्हा बारावीचा निकाल लागल्यावर पुढील विचार बघू असे मोहन म्हणाला. राजू आणि लक्ष्मीने पाडाला आलेली आंबे एका कापडात बांधून आणली. शेतात एक मोठे लिंबाचे झाड होते, त्या झाडाखाली बसून सर्वजण दुपारचे जेवण केले आणि सायंकाळी घरी आले.
दिवसामागून दिवस सरत होते. लक्ष्मीला निकालाची काळजी लागली होती. निकाल काय लागेल यावर तिचं पुढील शिक्षण अवलंबून होतं. मोहनची ईच्छा होती की लक्ष्मी डॉक्टर व्हावे, कारण तिच्यात ती गुणवत्ता होती. भोसले सर देखील म्हणायचे की, लक्ष्मी नक्की डॉक्टर होईल. लक्ष्मीला स्वतःला मात्र कधीच डॉक्टर व्हावे असे वाटत नव्हते. कारण ती काल परवा जेव्हा शेतात गेली तेव्हा तिला कळले की, आपल्या शिक्षणासाठी आई-बाबाने स्वतःच्या शेतात मजुरी केली. स्वतः च्या झाडाची आंबे खाता आले नाही. याची सल तिच्या मनाला बोचत होती. बारावीनंतरच्या वैद्यकीय किंवा अन्य कोणत्याही शिक्षणाला अजून खूप खर्च येणार होता. हा खर्च आपल्या बाबांना नक्की झेपणार नाही. त्यामुळे त्यांना शेती आता गहाण देऊन चालणार नाही तर विकावं लागणार, हे मात्र नक्की. शेती विकली तर काम कोठे करणार आणि पोटे कशी भरणार ? ती या विचाराने चिंताग्रस्त झाली होती पण तसे कोणाला जाणवू दिले नाही. ती देवाला मनोमन प्रार्थना करू लागली की देवा मला कमी मार्क पडू दे म्हणजे मी घरी राहून एखादा अभ्यासक्रम पूर्ण करू शकेन. मला जास्त मार्क पडले तर मी बाबांचा विरोध करू शकत नाही आणि बाबांना होणारा त्रास मला पाहवत नाही. देवा एवढी कृपा कर असे ती देवाकडे रोज प्रार्थना करू लागली. परीक्षेचा निकाल कधी लागतो याचीच काळजी दोघांना लागली होती.
क्रमशः

नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769