Sparsh - 16 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - अनोखे रूप हे (भाग 16)

आज नित्याला अनुने भेटायला बोलावलं होतं त्यामुळे तिने सकाळी लवकरच उठून स्वयंपाक आवरून घेतला होता ..आईचा तोंडाचा पट्टा तसाच सुरू होता पण तिच्याकडे दुर्लक्ष करत ती तयार होऊन साडे दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडली ..अनुने तिला बाहेर एका हॉटेल मध्ये ठीक 11 वाजता बोलावले होते ..त्यामुळे घाई करत करत ती तिथे पोहोचली ..तशी अनु फार उशिरा येत असे पण नित्या पोहोचताच तिच्या लक्षात आलं की आज अनु तिच्या आधीच तिथे पोहोचली आहे ..अनुला पाहताच नित्याने तिला मिठीत घेतले ..पण आज का कळेना अनु खुश नव्हती ..नित्याला ते जाणवलं पण ती काहीच बोलली नाही ..अनु काहीच ऑर्डर देत नाही हे पाहून नित्यानेच वडापाव आणि कॉफीची ऑर्डर दिली..नित्या कॉफी घेऊच लागली की अनु म्हणाली , " नित्या तू जॉबबद्दल विचारलं होतस ना तर मी आपल्या ताईशी बोलली अजबआणि ती म्हणाली की तिच्याकडे जॉब आहे ..सो आता तू तिथे जाऊन जॉब करू शकतेस .."

इतकी आनंदाची बातमी अनुने उदास मनाने दिली होती याकडे नित्याच त्याकडे लक्ष गेलं होत ..आपल्याला आता जॉब मिळेल या गोष्टीने आनंद आनंद झाला असतानाही नित्याने तो आपल्या चेहऱ्यावर येऊ दिला नाही ..नित्याला समजत होत की अनुला काहीतरी झालं आहे त्यामुळे तिच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली , " अनु मला कळतंय काहीतरी झालं आहे ..नाही तर सदैव आनंदी असणारी तू अशी उदास ? ..काय झालं सांग ना ..अनु काळजी वाटते यार तुझी ..आपण आजपर्यंत कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवली नाही मग आज तू काय लपवते आहेस ..प्लिज सांग ना ?"

नित्या तिला विनंती करत होती पण ती बराच वेळ काहीच बोलली नाही ..नित्याला तिचा राग येऊ लागला आणि ती तिला सोडून जाणार तेवढ्यात अनु तिचा हात पकडून चेअरवर बसवत म्हणाली , " सॉरी डिअर बस सांगते ..तुला माहिती आहे ना मयूर ..किती प्रेम करायचा तो माझ्यावर !! ..जेव्हा मी त्याला काडीचाही भाव देत नव्हते त्यावेळी सुद्धा त्याने प्रयत्न सोडले नाही आणि शेवटी मी त्याला होकार दिला ..मला प्रेम त्याच्या रूपाने जगायला मिळाले ..दिवस जाऊ लागले आणि आम्ही एकमेकांसोबत घट्ट जोडल्या गेलो ..आयुष्यभराची स्वप्ने बघितली पण .."

नित्या अनुला तोडत म्हणाली , " पण काय ? "

अनु हसत म्हणाली , " ते सर्व खोट होत ..तो मला काही दिवसांपूर्वी आपल्या आईला भेटायला घेऊन गेला होता ..त्याच्या आईने मी फक्त जाड असल्याने मला स्वीकारण्यास नकार दिला ..मी ते सर्व उघड्या डोळ्याने पाहत होते ..मला वाटलं होतं मयूर आपल्या आईला समजवणार पण अस काहीच झालं नाही ..मी काही वेळ त्याच्या उत्तराची वाट पाहत होते पण तो काहीच बोलला नाही आणि मी त्याला कायमच सोडून झाले ..त्याला माझं वजन जास्त महत्त्वाचं होत की माझं प्रेम ग ..किती रडले त्याच्यासाठी पण तो परत आला नाही ..कुठे चुकले ग मी प्रेमात ? "

अनु रडत होती हे पाहून नित्या तिच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन तिला शांत करू लागली ..तिला मिठीत घेतलं ..थोड्या वेळ शांत झाल्यावर नित्या म्हणाली , " चूक आपलीच आहे ग की आपण त्यांच्यावर विश्वास टाकतो ..पुरुष लग्नाची वेळ आली की बघ कसा सोडून जातो ..प्रेम करताना त्यांना घरच्यांची आठवण येत नाही पण लग्नाची वेळ आल्यावर मात्र ते फक्त घरच्यांचं एकतात ..तेव्हा अशा लोकांसाठी रडून काहीही फायदा नाही ..विसर त्याला ..तुला त्याच्यापेक्षाहि सुंदर पार्टनर मिळेल बघ "

नित्या बोलून गेली ..पुढच्याच क्षणी अनु आपल्या चेहऱ्यावर हात घेत म्हणाली , " मिळेल काय मिळाला म्हण ? आईने एक स्थळ बघितलं आहे ..जॉब आहे मस्त आणि दिसायला पण सुंदर आहे शिवाय त्याने पसंदी पण दर्शवली आहे सो आता काहीच दिवसात आमची सगाई पण आहे..आता कोण मयूरची आठवण काढणार , मी तर माझ्या भविष्याच्या विचाराने खुश आहे .."

नित्या क्षणभर श्वास घेत म्हणाली , " अनु तू खरंच खुश आहेस ना ? "

आणि अनु चेहऱ्यावर खोट हसू आणत म्हणाली , " अफकोर्स डिअर खूप म्हणजे खूप खुश आहे तेव्हाच तर त्याला होकार दिला ना ..."

नित्याला तिच्या मनातलं कळून चुकलं होत पण ती काहीच बोलली नाही ..त्यानंतर अनु नित्याच्या विषयावर बोलत होती आणि नित्या पुन्हा भावनिक झाली होती पण नित्याने तिला त्यावर बोलण्यास मनाई केली ..आज खूप दिवसांनी त्या इतकं मनमोकळं बोलल्या होत्या ..ते येऊन दोन तास झाले होते ..अनुने घड्याळाकडे बघितले आणि म्हणाली , " सॉरी डिअर होणाऱ्या नवर्याला पण भेटायला जायच आहे ..मला निघायला हवं .."

ती नित्याला मिठी मारत गडबडीत जाऊ लागली ..काही पावले समोर गेलीच होती की अनु मागे येत म्हणाली , " सॉरी मी विसरलेच ..हा घे ताईचा नंबर ..मी तिला तुझ्याबद्दल सर्व सांगितलं आहे सो घरच्यांशी बोलून निघून जा तिकडे "

तिने नित्याच्या गालाची पप्पी घेतली आणि हवेसारखी गायब झाली ..नित्याही तिच्या मागेच घराकडे जायला निघाली ..रस्त्यातून जाताना ती सतत ताईच्या नंबरकडे पाहत होती ..ताईचा नंबर बघून ती मनातून सुखावली होती ..कारण ही जॉब म्हणजे तिच्या स्वप्नांना नवीन पंख होते .ज्या पंखानी ती पुन्हा एकदा उडू शकणार होती ..विशेष म्हणजे ही जॉब लागल्याने ती आपल्या मुलीला आपल्याकडे परत आणू शकणार होती त्यामुळे तिला दुप्पट आनंद झाला होता ..आपली मुलगी आपल्यासोबत असेल या विचाराने ती मनातून सुखावली गेली होती ..


अनुने जॉबबद्दल संगीतल्यापासून नित्या खूपच खुश होती ..रस्त्यावर चालतानादेखील तिच्या आनंदाला पारावर नव्हता..तिला केव्हा एकदा ताईला फोन करते अस झालं होत ..घडी घडीला तिची उत्सुकता वाढत होती आणि न राहवता तिने ताईला कॉल केला ..समोरून फोन उचलला गेला , " हॅलो मी विद्या ..आपण कोण बोलत आहात ? "

नित्या अडखळत बोलून गेली , " ताई मी नित्या.. ..आणि बोलली असेल ना तुम्हाला जॉबबद्दल .."

ताई थोडं हसत म्हणाली , " नित्या तू आहेस होय ..नवीन नंबर वरून कॉल केलास ना म्हणून ओळखल नाही ..किती दिवसांनी बोलणं होतंय तुझ्यासोबत .छान वाटत आहे ..अनुने सर्व काही सांगितलं तुझ्याबद्दल ..मग मी माझ्या नवऱ्याशी बोलले तर तो म्हणाला की आपल्या फर्म मध्ये देखरेख निरीक्षक म्हणून तुला काम देता येईल ..तुला मी चांगलं ओळ्खते म्हणून तू आमच्या सोबत राहू शकतेस म्हणजे तुला कसलही टेन्शन राहणार नाही ..सॅलरी आता 10 हजार देऊ म्हणाला नंतर वाढवेल नाही वाढवली तर मी आहे बघतेच त्याला ..तुला चालेल ना ? "

नित्याच्या मनात लाडू फुटू लागले होते कारण त्या काळात 10 हजार खूप होते शिवाय राहायला घर मिळेल म्हणून ती जास्तच हॅपी झाली होती ..ती प्रसन्न मनाने म्हणाली , " ताई काहीच प्रॉब्लेम नाही ..तुम्ही असताना मला काहीच प्रॉब्लेम होणार नाहीत हे माहीत आहे .."

विद्या उसासा घेत म्हणाली , " हँ बर झालं बाबा तू ऑफर स्वीकारली नाही तर आमची छोटी माझ्यावर ओरडलीच असती .."

दोघेही हसू लागल्या ..पुन्हा विद्याच म्हणाली , " नित्या पण आताच येऊ नको ..अनुची सगाई आहे महिना भरात तेव्हा आम्हीही येऊ तिकडे ..तेव्हा आमच्या सोबतच येशील नाशिकला .."

अनुचि सगाई एकूण नित्या फारच खुश झाली होती ..तिला आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता ..तिने जॉब साठी होकार कळविला ..त्यानंतर दोघात इकड- तिकडच्या गप्पा झाल्या आणि सगाईला भेटू सांगत ताईने फोन ठेवला ..आज आपल्याला नवीन जीवन मिळेल म्हणून नित्या खुश दिसत होती आणि आपला आनंद सावरत ती घरी पोहोचली ..

घरी पोहोचता - पोहोचताच तिला घरच्याना सर्व काही सांगायचं होत पण त्यांना वेळेवर शॉक देऊ या विचाराने तिने त्यांना नौकरिबद्दल काहीच सांगितलं नाही ..परंतु आल्या - आलीच ती आपले कागदपत्र शोधू लागली होती ..घरच्याना ती काय करते आहे याबद्दल उत्सुकता लागली होती पण तिला सरळ - सरळ कुणी काहीच विचारलं नाही ..तिने आपले संपूर्ण कागदपत्र शोधून काढले आणि एक एक कागद नीट चेक करत होती ..तिच्या लक्षात आलं की लग्नाच्या भानगडीत आपण टी. सी. काढली नाही ..त्यामुळे सर्व कागदपत्र व्यवस्थित ठेवून दिले ..आता फक्त टीसी आणली की तीच स्वप्न पूर्ण होणार होत ..

-------

दुसऱ्या दिवसापासून सर्व काही बदललं होत ..नित्या नेहमीच खुश राहू लागली ..आई तिच्यावर कितीही ओरडली तरी ती तिला टाकून उत्तर देत नसे ..उलट हसून ती उत्तर देणे टाळू लागली ..पण एकदा बोलता - बोलता तिच्या तोंडून निघून गेल की मी इथे काही दिवसच राहणार आहे तेव्हा सर्व तिच्याकडे पाहू लागले होते ..नित्याही आपण काय बोलून गेलो याचा विचार करत होती पण तिने विषय वळविला आणि काही झालंच नाही अस भासवू लागली ..अलीकडे नित्याने कोपऱ्यात बसून राहून सोडून दिलं होतं आणि मुक्तपणे वावरू लागली होती ..तिने कॉलेजमधून टीसी देखील काढून आणली होती आता फक्त वाट होती ती अनुच्या सगाईची ...

पुन्हा पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेला होता ..नित्या त्या घरातून बाहेर निघण्यासाठी एक एक क्षण वाट पाहु लागली होती ... तिचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आता जेमतेम दिवसच बाकी होते .

ती 16 मार्चची रात्र होती..रात्रीचे सुमारे 10 वाजले होते ..नित्या बाहेर गार वारा खात बसली होती ..घरात नित्याचा फोन दोन वेळा वाजून गेला होता पण तिला कुठलाही आवाज आला नाही ..तिसऱ्यांदा फोन वाजला तेव्हा तिच्या छोट्या भावाने फोन आणून तिला दिला ..वर विद्या ताईच नाव दिसताच तू खुश झाली आणि त्याच आनंदांत म्हणाली , " बोला ताई , कशा आहात ? "

समोरून विद्या ताईच्या रडण्याचा आवाज येऊ लागला होता ..विद्या ताई रडत असताना केवळ नित्या नित्या म्हणू लागली ..ताई रडताना पाहून नित्या जरा घाबरलीच ..काय झालं ते माहिती करावं म्हणून नित्या पुढे म्हणाली , " काय झालं ताई ..बोला ना मला फार भीती वाटत आहे ..तुम्ही रडत का आहात ? "

समोरून रडण्याचा आवाज आणखीच जोरात येऊ लागला आणि विद्या अडखळत बोलून गेली , " नित्या ..अनुने ..? "

ताई पुढे काही बोलणार तेवढ्यात नित्या तिचे शब्द तोडत म्हणाली , " अनुच काय ताई ..? प्लिज सांगा न माझ मन फार घाबरत आहे .."

विद्या क्षणाचाही विलंब न घेता म्हणाली , " अग नित्या आता आपल्यात राहिली नाही ..तिने सायंकाळी गळ्याला फास लावून घेतला ..आईने मला आताच कळविल.."

नित्या हे सर्व एकूण खालीच पडली..तिचा भाऊ बाहेरून धावत आला आणि ताईला खाली पडलेलं पकडून त्याने तिला वर बसविले ..खाली पडल्यामुळे तिचा फोन कुठंतरी हरवला होता पण फोनमधून ताईचा आवाज मात्र येत होता ..तिने फोन शोधत पुन्हा कानावर धरला ..कसतरी सावरत नित्याने तिला विचारलं , " पण ताई हे अचानक कस काय केलं तिने ..कालपर्यंत तर खूप खुश होती ..काल तर बराच वेळ बोलणं झालं आमचं मग आज अचानक अस का वागली ती ? "

विद्या लांब श्वास घेत म्हणाली , " बाबा सांगत होते की ते खरेदी करायला बाहेर गेले होते .त्यांनी तिलाही सोबत यायला सांगितलं होतं पण तिने तब्येत बरी नाही म्हणून येण्याच टाळलं ..बाबा रात्री घरी परतले तेव्हा अनुने गळफास लावून घेतला होता ..मला जस माहिती झालं तसच तुला सांगितलं ..आम्हीही आताच निघतो आहे ..तू उद्या ये सरळ घरी .."

ताईने घाई घाईतच फोन खाली ठेवला ..इकडे नित्याची अवस्था आणखीच खराब झाली होती ..तिला काय करू नि काय नको अस झालं होत ..शॉकमुळे तिचे अश्रू मनात घर करून बसले होते ..अचानक तिच्या डोळ्यांनी तिला वाट करून दिली आणि ती जोराने रडू लागली ..सर्वाना तिला आवरण कठीण झालं होतं ..ती रात्रीच अनुकडे जाण्याचा हट्ट करत होती पण घरच्यांनी तिला जाऊ दिल नाही ..पण तिला आता घरात राहवेना ..अंधार वाढू लागला नि सर्व झोपी गेले तर नित्याला केव्हा एकदाचा दिवस निघतो आणि अनुला पाहते अस वाटत होतं ..ती अनुच्या विचाराने रात्रभर झोपली नव्हती तर डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते ..

सकाळ होतच नाही तर नित्या अनुच्या घराकडे निघाली ..अनुच्या घरी जायला साधारणतः तासभर लागणार होता ..तिने रोडवर येऊन टॅक्सी केली ..तरीही तीच मन काही जागेवर नव्हतं ..ती चालकाला लवकरात लवकर चालवा अस सांगत होती ..काही क्षण थांबली की पून्हा चालकाला विनंती करत होती ..त्यालाही कळून चुकलं होत की काहीतरी गंभीर गोष्ट आहे म्हणून तोही शक्यतो लवकरात लवकर गाडी चालवत होता ..शेवटी टॅक्सी पोहोचली ..तिने त्याला पैसे दिले आणि गाडीतून उतरली ..अनुच घर दोन गल्ली सोडून होत त्यामुळे ती जवळपास धावतच तिच्या घराकडे जाऊ लागली ..सुमारे 10 मिनिट ती धावतच होती ..धावल्यामुळे तिला दम लागला होता तरीही ती थांबली नव्हती आणि सरळ घरासमोर पोहोचली ..घरातून रडण्याचा आवाज येत होता ..आजूबाजूला गर्दी होती ...गर्दी सावरत ती पटांगणात पोहोचली पण तिथे अनु नव्हती ..बाजूला विद्या , तिची आई जोराने रडत होत्या ..नित्याला पाहून विद्या तिला पकडून रडू लागली ..नित्यालाही आता राहवलं नाही आणि तीही जोराने रडू लागली ..हळूहळू नातेवाईक येऊ लागले होते ..तर अनुला 11 वाजता हॉस्पिटलमधून आणणार होते ..विद्याला सांभाळणं नित्याला कठीण जात होतं कारण नित्याही मनातून पूर्णतः खचली होती ..बराच वेळ नित्याने विद्याला धरून ठेवलं होतं ..

अकरा वाजले आणि सायरन वाजवत रुग्णवाहिका घरासमोर आली ..रुग्णवाहिकेचा आवाज एकून सर्व लोक गर्दी करू लागले ..गाडी आली आणि त्यातून काही लोकांनी स्ट्रेचरवर तिला आणलं ..आणि आतापर्यंत शांत असलेले सर्व आणखी जोराने रडू लागले ..विद्याला आणि तिच्या आईला तर सांभाळणं कठीणच झालं होतं ..विद्या अनुच्या शरीरावर पडून रडत होती पण नित्याने तिला कसतरी सावरून धरलं होत ..तशीच काही अवस्था तिच्या बाबांचीही झाली होती ..अनुला समोर पाहून तिची आई म्हणत होती , " बाळ अनु तुला सांगितलं होतं ना आम्ही तुझ्यासोबत आहोत मग त्या मुलाने तुला सोडलं म्हणून ती आम्हाला इतकी मोठी शिक्षा का दिलीस ..सांग ना ह्यात आमची काय चूक ? ..तो तर आता मस्त जगणार आहे पण आम्ही कसे जगू .."

तिच्या घरच्याना आवरण अगदीच कठीण झालं होतं ..सर्वाना रात्रीच कॉल गेला असल्याने 12 पर्यंत सर्वच आले होते ..इकडे सर्वांचं रडणं सुरू होत तर दुसरीकडे तिचे अंतिम संस्कार करता यावे म्हणून तिला नेण्याची तयारी सुरू झाली ..तिला आणून तासभरच झाला होता ..की लोकांनी तिला सजवून नेण्यास सुरुवात केली ..तिच्या आईला सांभाळणं कठीण झालं होतं ..विद्याचीही तीच अवस्था होती पण ताईला सांभाळता यावं म्हणून तिने आज स्वताला खंबीर करून घेतलं होतं ..काहीच क्षणात " राम नाम सत्य है " म्हणत तीच पार्थिव अंतिम टप्प्याकडे जाऊ लागलं ..प्रत्येक व्यक्ती खांदा देऊन आपलं कर्तव्य पूर्ण करत होता ..तीच पार्थिव गाडीत ठेवलं आणि सर्वच गाडी करून शांतीधामकडे जाऊ लागले ..सुमारे पाऊण तासाने गाडी शांती धाम वर पोहोचली ..आणि काही क्षणात अनु देवाघरी पोहोचली ..सर्व लोक घरी परतू लागले होते ..नित्यानेही विद्या ताईला सोबत घरी आणलं होतं ..विद्याला सांभाळायला तिची राहायची इच्छा होती पण स्वतः ताईने जायला सांगितलं म्हणून नित्या घरी आली होती ..

नित्या घरी परतली तेव्हा 5 वाजले होते ..सर्वात प्रथम तिने अंगावर 2 बालटी थंड पाणी ओतले ..त्या पाण्यातून जणू तिने सर्व अश्रू वाहून घेतले होते ..तिला घरच्यानि जेवायला सांगितले होते पण तिने आज जेवणाला हात पण लावला नव्हता ..विद्या ताईला फोन करून त्यांची चौकशी केली आणि ती बेडवर पडली ..रात्र सरु लागली आणि नित्याचे डोळे आणखीच पाणावू लागले ..आतापर्यंत स्वतःला रोखून ठेवलेल्या नित्याने शेवटी अश्रू मोकळे केले आणि मनातल्या मनात म्हणाली , " अनु का केलंस ग हे सर्व ? ..फक्त मयूर साठी ..तुला काका - काकू। ,ताई , माझा अजिबात विचार नाही आला का ग ? ..अनु तूच होतीस जी मला नेहमी समजवत आली होतीस की सर्व काही नीट होईल पण तूच अस पाऊल उचलल ..अनु तुला मी माझ्या फॅमिलीपेक्षा जास्त मानलं ..तू माझा जीव होतीस आणि आता तूच मला सोडून गेलीस मग सांग ना तुझ्याविना कशी राहू मी ..तुझ्याविना आयुष्याची नवीन सुरुवात कशी करू ..तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात होत तरी कोण ग आणि तू स्वार्थी बनून हे जग सोडून गेलीस ..का केलंस तू अस अनु ? का ? अनु उत्तर दे तुला माझी शपथ ..प्लिज बोल ना ग अनु ..का मयूरसाठी आम्हाला सोडून गेलीस ..बोल ना ग ..आणि हेही सांग की मी तुझ्याशिवाय कस राहू ..बोल ना ? "

अनुच्या जाण्याने नित्या फारच हळवी झाली होती ..अनु नित्याच्या सतत सोबत राहत असे तेव्हा तिच्याविना जगणं याबद्दल ती विचार करु शकत नव्हती..हे सर्व कमी होत की काय तिच्या आयुष्यात एक आणखी वादळ येणार होत ..ज्याची तिला चाहूलही लागली नव्हती ..आणि कदाचित त्या वादळात ती सर्व काही गमावून बसणार होती ..


क्रमशः ...