I am your Maharashtra ..... books and stories free download online pdf in Marathi

मी तुमचा महाराष्ट्र.....



मी महाराष्ट्र....!

होय तुमचा महाराष्ट्र....!! संतांची भूमी, प्राचीन इतिहास, पर्यटन लाभलेला महाराष्ट्र. इतकेच नव्हे तर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण पणास लाऊन माझ्यासाठी लढलेल्या त्या १०७ हुतात्म्यांच्या रक्ताच्या थेंबाने निर्माण झालेला महाराष्ट्र...!

मी आज तुम्हा सर्वांशी समर्थपणे बोलू शकतो. त्याचे कारणही तसेच, कित्येक शुर माझ्या निर्मितीसाठी झटलेत. शिवाजी, संभाजी इतकेच नव्हे तर, तळागाळातील प्रत्येक माणूस माझ्या अस्तित्वासाठी झटला आणि आजही आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून झटतच आहे. अशा या उदात्त बलिदानाचा मी नेहमीच ऋणी असेल.🙏

संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत गोरोबा कुंभार, संत तुकाराम अशा संतांची भूमी म्हणून मिळालेला मान असो किंवा पुरोगामित्वाचा मान असो, नेहमी तुमच्या त्या सांस्कृतिक वारसा जपण्याच्या अट्टहासामुळेच मिळणे शक्य झाले आहे.

स्वराज्य स्थापून मला अस्तित्व प्रदान करणाऱ्या शिवाजीचा उल्लेख करताना, मला आभाळही ठेंगणे वाटते. तर, त्याच माझ्या अस्तित्वाला टिकवण्यासाठी झटणाऱ्या शंभूच्या बलिदानाने माझे अंतःकरण तळमळते, आत्मा बैचेन होतो!

माझे अस्तित्व नेहमीच पवित्र ठेवणाऱ्या जलसंपदा मला लाभल्या. तसेच, त्या जलासंपदाचे साैंदर्य वाढवणारे पवित्र प्रार्थना स्थळही मला लाभले. त्यापैकीच विठोबाचे पंढरपूर, ज्योतिर्लिंगांपैकी पाच माझ्याच सहवासात असण्याचा मान मला मिळाला. इतकेच काय तर, अष्टविनायकांचा वारसा लाभलेला असा मी, सदैव सुखी - संपन्न असून, स्वतःस समृद्ध मानतो.

माझ्या संपूर्ण निर्मितीच्या टप्प्यात अनेकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. वेळोवेळी माझ्या अस्तित्वासाठी तुम्ही झटलात. मला एकटं वा परकं असण्याची भावना कधी मनात येऊ सुद्धा दिली नाहीत यासाठी प्रत्येकाचे आभार 🙏.

"मरावे पण कीर्ती रूपे उरावे" या उक्तीला साजेल अशी कामं करणारी माझी ती लेकरं, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, बाबासाहेब आंबेडकर व इतरही थोर आत्मे माझ्या अस्तित्वाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी झटले. त्यांच्या अस्तित्वाला, लोकांनी झुगारून जरी दिलं असलं तरी, ते मागे हटले नाहीत. स्त्रिया तसेच उपेक्षित गटांसाठी, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी संपूर्ण जीवन वेचले असे ते, प्रत्येकाच्या मनात घर करून बसले. आजही त्या माझ्या लेकरांचा वारसा पुढे नेला जात आहे. ही खात्री आहे, माझ्या अस्तित्वाच्या संरक्षणाची.

स्त्री - हितास्तव असलेले कायदे, तसेच प्रत्येक व्यक्तीस जीवन जगण्याचा हक्क देण्याइतपत आज तुम्ही कार्यरत असलेले बघून मन उत्साही होते. मला खात्री आहे येणाऱ्या काळात, तुम्ही मला आधुनिकतेची सांगड घालण्यात यशस्वी असाल.

माझी कीर्ती आज आर्थिक तसेच सामाजिक क्षेत्रात पुढारलेली असल्याचे श्रेय नक्कीच मी तुम्हाला देण्यास तत्पर आहे. कारण, आज वंचितातील - वंचित प्रवाहाच्या दिशेने वाहू लागला आहे.

स्त्रिया त्यांची उंची गाठू पाहत आहेत. त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा केवळ सहभाग नव्हे तर, त्या क्षेत्रात यशस्वी होऊन, त्यांच्या अस्तित्वाची जी खंत इतरांच्या मनात आजही बाळगली जाते, ती संपवण्यासाठी स्त्रिया कार्यरत आहेत.

अस्पृश्यांना आज मानाचं स्थान देण्यासाठी कायद्याची गरज भासणे ! मुळात ही बाब, तुमच्या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा अपमान करणारी आहे.

आज जे स्वतःच्या अहंकारासाठी हिंसा तसेच इतर आक्रमक पवित्रा घेताना मी बघतो त्यावेळी, मनात कुठेतरी माझ्या अस्तित्वासाठी झटणाऱ्या त्या हुतात्म्यांच्या बलिदानाला खिळ बसण्याची खंत मनात घर करून जाते.

आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो. पण, वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नसतो. त्याचसाठी स्वतःचे आयुष्य वाया घालवून तुम्ही जर का, "यशस्वी होऊ" असा आत्मविश्वास मनात बाळगत असाल तर, " नक्कीच तुम्ही सध्या तरी संपण्याच्या मार्गावर असल्याचे अंधारमय सत्य " मी, तुम्हाला सांगू इच्छितो.

मला, अर्थकारणाच्या सुखद अनुभवांच्या सहवासात जगण्याची संधी तुम्ही देता, त्यामुळेच आज तुमचा महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या अग्रेसर असल्याचे साध्य झाले आहे. सर्व राज्यांच्या तुलनेत मला हा मान मिळणे! हे केवळ तुमच्याच कर्तव्यदक्ष असण्यामुळे शक्य झाले आहे. पुढेही ते असेच असेल याची मला खात्री वजा विश्वास आहे.

स्त्रिया समाजाचे साैंदर्य तसेच भक्कम पाया असतात म्हणून, समाजकारण सोबतच राजकारणात, त्यांना समान संधी देण्यासाठी झटणे! हे जरी आजपर्यंत शक्य होऊ शकले नसेल तरी, इथून पुढे ते स्व: कर्तव्य माना. स्थानिक प्रशासनात ५०% आरक्षण देऊन त्यांच्यावर उपकाराची भावना न दाखवता, तो त्यांचा हक्क असल्याची जाण असूद्या. त्यांच्या निर्णय क्षमतेत त्या सक्षम होतील याची खात्री असू द्या. तर किंबहुना तेव्हाच, तुमचा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणवून घेण्यास सक्षम असेन.

प्रत्येकच नव - विचार व्यवहार्य किंवा अंमलात आणण्यासारखा नसतो व म्हणून, तुम्ही विचार प्रक्रिया थांबवून चालणार नाही.

"सुधाकर"कार आगरकरांनी, ' विचारसंघर्षाला का घाबरता?' असा सवाल केला होता. पण, आज विरोधाभास म्हणजे असा की, ' वादच नको ' हा पवित्रा प्रत्येक जण घेतो. मांडवली करूनच प्रश्न सोडवण्याकडे, प्रत्येकाचा कल आहे. लक्षात ठेवा, तुमचा महाराष्ट्र अशा वागण्याने पुरोगामी होणार नसून त्यामागे, थोर विचारांची देणगी जी, महापुरुषांनी मला देऊ केली. त्याची शिकवण अंगी बाळगणे गरजेचे आहे. परंतु, आज विचारवंताच्या शब्दांचे वजन कमी होत - होत त्याची सामाजिक उपयुक्तता संपणे! हेच खरे तर, समाजाला खिळखिळा करण्यामागील महत्त्वाचे कारण ठरताना मला दिसत आहे.

शासन पुरस्कृत विचारवंतांची यादी कितीही मोठी असली. तरी, शासन आणि सत्ताधाऱ्यांच्या मदतीवर त्यांचं अस्तित्व टिकून असल्याने सामाजिक जबाबदारी पार पाडण्याची क्षमता त्यांच्याकडे येणार तरी कुठून?

तुमच्या महाराष्ट्राला "गर्जा महाराष्ट्र माझा" म्हणवून घेण्याचा मान देणे तुमच्याच हातात आहे. तो मान, तुम्ही एक काळजीवाहू व्यक्ती म्हणूनच नव्हे तर, तुमच्याच महाराष्ट्राचा एक अविभाज्य घटक म्हणून, मिळवून दिला तर माझ्यापेक्षा आनंदी कुणीही नसेल.

निसर्गतः परिपूर्ण, सुसंस्कृत अशा विशेषणांनी नटलेला तुमचा हा महाराष्ट्र, निरोप घेतो!

निरोप घेतो त्या प्रत्येक व्यक्तीचा ज्याचा मनात आज व पुढेही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असण्याचा गर्व असेन.

निरोप घेतो त्यांचा, ज्या माहात्म्य शुर आत्म्यांनी महाराष्ट्राला पुरोगामित्वाचा मान मिळवून दिला.

निरोप घेतो त्या विचारांचा, ज्यांनी माझ्या स्वाभिमानाला न डगमगता सांभाळले.

निरोप घेतो व परततो लवकरच! कधीतरी तुमच्याशी अशाच संवादाची मजा चाखायला.🙏