Stupid dialogue. books and stories free download online pdf in Marathi

ओथंबलेले संवाद.

ओथंबलेले संवाद : डॉ अनिल कुलकर्णी.
आज संवाद इतके दुस्तर झाले आहेत की, कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. मायेचं अस्तर गळून पडलं की संवाद दुस्तर होतात. पुर्व एकत्रकुटुंब पद्धतीमध्ये धाकाने संवाद होत नसतं. आता यंत्राने होत नाहीत.
संवाद होण्यासाठी सहवास आवश्यक आहे. सहवास नसतानाही दूर अंतरावरूनही संवाद साधता येतो.प.नेहरूंनी जेल मधुन आपल्या मुलीशी संवाद साधला,भावनिक पोषण केले.कुठे गेली ती पत्रे,माणसांना हसवणारी,रडवणारी,घडवणारी? संवादासाठी माणसे उपलब्ध नसतील व मनाची दारे उघडी असतील तर संवाद निर्जीव वस्तूशीही होतो. महाभारत, रामायण,ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, यामधून संस्काराचे, संवादाचे संक्रमण चालू आहे. काही गोष्टींना मरण नाही. मृत्यूनंतरही त्यांचा कर्तुत्वामुळे माणसे जिवंत असतात, कारण त्यांचा संवाद चालूच असतो. संवाद आहेत, म्हणूनच परंपरा,संस्कार चालू आहेत. संस्कार दृकश्राव्य माध्यमातून व्यक्तीच्या अनुपस्थितीत सुद्धा संवाद साधला जातो. हे संवाद प्रेरणा,उमेद, देतात,जगण्याची उमेद देतात. संवाद साधत नसतील तर, निसर्गाला जवळ करायला हवं., प्राण्यांशी, कधी कधी निर्जीव वस्तूशी ही आपण संवाद साधतो. रितेपण घालवण्यासाठी संवाद हवाच.मनाशी व मनाचा ,आंतरिक मनाशी संवाद हवा.
संवादाने नात्यांची गुंफण होते, नाते समृद्ध होतात, व्यक्तीमत्वे बहरतात, मनाचे भावनिक पोषण होते. नात्यामध्ये विश्वास व पारदर्शकता असेल तर संवाद मनमोकळेपणाने होतात.मानवी मन संवादाला आसुसलेले असत. बधीर झालेल मन संवाद साधू शकत नाही. त्यासाठी मनाची खिडकी उघडी हवी. एकमेकांची भाषा न समजणारे संवाद साधू शकतात. शब्दांच्या पलीकडे कळण्याची , इच्छा हवी .क्षमता हवी.शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्याही पलीकडले. ही सुद्धा संवादाची च भाषा होय.घरातले सजीवांचे गोतावळे कमी झाले. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धती आली. माणसे कमी झाली, संवाद कमी झाले. पूर्वीच्यागाण्यांनी, चित्रपटांनी एका पिढीला पोसले,घडवले, संवादा शिवाय आस्वाद घेता येत नाही.गाण्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आज्जीचं गोष्ट सांगणं, आईचा प्रेमळ हात, ही संवाद साधण्याची माध्यमे होती . आजची गाणी संवाद बंद करणारी आहेत.तरुण स्वतःमध्येच मग्न असतात.
काही संवाद स्वार्थासाठी असतात. राजकारण्याचे संवाद निवडणुकीपुरते असतात. वासनेसाठी केलेला शारीर संवाद शरीरापासून मनापर्यंत जात नाही. संवादासाठी माणसांनी एकमेकासाठी वेळ देणं, जवळ बसून विचारपूस करणे आवश्यक आहे, पण आज कोणास कोणासाठीही, कुणाला वेळच नाही. लोकं इतकी स्वमग्न झाली आहेत की स्वतःच्या वर्तुळात राहणे त्यांना आवडत आहे.
संघर्षाशी,झगडल्याने, संवाद साधल्याने नवीन जगण्याची प्रेरणा मिळू शकते. संघर्षाशी पळ काढल्यास निराशा, दुःख आत्महत्या यांना जवळ करावे लागते. एकाच छताखाली असून संवाद नसणे ही दुःखदायक, क्लेशदायक गोष्ट आहे. नाते घट्ट टिकवण्यासाठी संवादासारखेकाही नाही. उंबरठ्याच्या आत व बाहेरही संवाद होत नाहीत, कारण घराला उंबरठे उरले नाहीत. कुटुंबाच संवादहिन होणे समाजाला महागात पडणार आहे. उठल्यापासून वर्तमानपत्र, मोबाईल तुम्हाला तोंड उघडण्याची संधीच देत नाहीत. शरीराला भौतिक चोचले हवेत तर मनाला नैतिक चोचले पाहिजेत. शरीराला कुरवाळता येत, पण मनाला कुरवाळायला संवादच हवेत.
संवाद स्वतःच्या मनाशी साधता यायला हवा. संवाद स्वतःशी करायचाअसेल तर स्वतःवर प्रेम करायला हव. आजच्या यांत्रिक युगात माणसांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही. संवादाने विकृतीचं साचलेपण राहात नाही,मनमोकळे होते. मनातल्या विचारांना विसर्ग हवा, त्यासाठी संवादा सारखे उत्तम माध्यम नाही. यंत्राशी संवाद साधणे आपल्या हातात आहे,पण आपल्याशी संवाद साधण यंत्राच्या हातात नाही.निर्जीव समूह संपर्काच्या सानिध्यात आजची पिढी पोसली जाते. घरातली माणसे एकमेकांचा तिरस्कार करू लागली, दुर्लक्ष करू लागली, त्यांची तुलना करू लागली. माणसापेक्षा स्वतःला यंत्रात गुंतवू लागली, आणि संवाद येथेच खुंटले. माणसे स्वकेंद्रित, एकलकोंडी व्हायला लागली. व्यक्तिमत्वे दुभांगायला लागली .व्यक्तिमत्वाचा गुलमोहर करायचा की निवडुंग हे संवादाच्या खतपाण्यावर अवलंबून असते. संवादाने आयुष्य नंदनवन करायचं की वाळवंट हे आपल्या स्वतःच्या हातात आहे. नैतिकते मधून संवाद साधता येतो,भौतिक ते मधून नाही. अध्यात्म नैतिकतेने संवाद साधायला शिकवते,भौतिकतेने नाही. यंत्राचा संवाद एकतर्फी असतो. जगण्याशी संवाद हवा तसा, मृत्यूशीही संवाद हवा. नात्याला संवादाचं अस्तर असल्याशिवाय जगण्यासाठी उब मिळत नाही. तंत्रज्ञानाच्या साह्याने माणसाने पृथ्वीवरून ,चंद्रावर संवाद साधला, पण घरातल्या घरात संवाद नाही?
मिळूनी साऱ्याजणी सारखा संवाद साधता यायला हवा, तो,ती व ते यांच्या पलीकडे.तरच संवादाचा घाट दुस्तर वाट णार नाही. संवाद सामाजिक स्वास्थ्य टिकण्यासाठी उत्तम मात्रा आहे.

.