मी एक पुरुष books and stories free download online pdf in Marathi

मी एक पुरुष


मी एक पुरुष. माझा जन्म पुरुष योनीत झाला आणि समाज मला पुरुष म्हणून ओळखू लागला. मी लहानाचा मोठा होऊ लागलो. समाज मला माझ्या कामाची जाणीव करून देऊ लागली. हे काम तुझे नाही, तू हे काम करू नये, अश्या प्रकारचे सल्ले देऊ लागले. त्यामुळे माझी काय काय कामे आहेत ? मी काय करावे ? हे मला कळु लागले. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी संपूर्ण घर डोक्यावर घेऊ लागलो. चॉकलेट, बिस्कीट किंवा हव्या असलेल्या वस्तुची मागणी रडून का होईना पूर्ण करून घेऊ लागलो. तरी सुध्दा मला प्रसाद म्हणजे मार मिळत नव्हता कारण घराचा मीच एकमेव कुलदीपक होतो. माझ्यशिवाय वंश कसे पुढे जाईल ? दिवसभर खेळ खेळणे, उडया मारणे, इतरांशी वाद करणे, भांडण करणे यातच मी पूर्ण वेळ घालवायचो. शाळेचा अभ्यास पूर्ण न केल्यामुळे शिक्षकांची छडी खाणे ही सर्व कामे मी शालेय जीवनात अगदी नेटाने पूर्ण केली. मुलींच्या कामाला अजिबात हात लावायचे नाही अशी शपथ घेतली होती. म्हणून वेळ प्रसंगी उपाशी झोपलो पण मुलींच्या कामाला कधीही हात लावला नाही. माझे वय वाढू लागले तसा मी आत्ता मोठा झालो. घरातील लोकांचे माझ्यावरील प्रेम हळू हळू कमी होत आहे असे दिसू लागले. पूर्वी मला जे मागितले ते मिळायचे ती माझी मागणी आत्ता सर्रास फेटाळली जाऊ लागली. रडत बसण्यापेक्षा मला माझ्यासाठी व घरासाठी पैसे कमाविणे गरजेचे वाटू लागले. मी वयात आल्यानंतर माझे दोनाचे चार हात झाले. सोज्वळ दिसणाऱ्या पत्नीने माझ्या जीवनात गृहप्रवेश केला येथूनच माझ्या दुसऱ्या जीवनास प्रारंभ झाला. या पूर्वी मी घरातील सर्व सभासदावर सारखेच प्रेम करीत होतो, परंतु लग्न झाल्यावर घरातील व्यक्तीत विशेष करून आई, बहीण वर माझे प्रेम कमी झाले असा गोड गैरसमज करून घेऊन पत्नी सोबत त्यांचे मतभेद दिसू लागले. लेकी बोले सुने लागे असा काहीसा प्रकार माझ्या कानावर ऐकू येऊ लागला. मी फक्त पत्नीचे ऐकतो व तिच्या बोलण्यानुसार वागतो असे आरोप माझ्यावर होऊ लागले. मी आत्ता पूर्वीचा राहिलो नाही. आईचे ऐकावे तर पत्नी रागावते अन पत्नीचे ऐकावे तर आई नाराज होते. माझी स्थिती अडकित्यात सापडलेल्या सुपारीप्रमाणे झाली. मला ना माझी आई समजून घेते ना पत्नी. अश्या विपरीत स्थितीत मी करावे तरी काय ? मग काही गोष्टी मी नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे वाहे वारे या म्हणीप्रमाणे सोडून देत गेलो. जेंव्हा ही बाब हाताच्या बाहेर जाऊ लागली. त्यावेळेस मनात नसताना सुद्धा कुटुंबातून विभक्त होण्याचा निर्णय मनावर दगड ठेवून घ्यावा लागला. मग सुरु झाला येथून माझी तारेवरची कसरत. पूर्वी मला कुटुंबाकडे लक्ष द्यायची गरज नव्हती. पण आत्ता विशेष लक्ष द्यावे लागत होते. माझ्या मुलाना आजी-आजोबांच्या गोष्टी ऐकायला मिळत नव्हत्या. त्यांचे प्रेम मिळत नव्हते. विभक्त झाल्यावर पत्नी आनंदात राहते परंतु मी मात्र आतल्याआत ओल्या लाकडासारखा धूर सोडत जळत राहतो. ज्यांची झळ फक्त मलाच कळते आणि जाणवते. घर, नोकरी आणि मुलांचे सुखदुःख या चक्रातून माझे जीवन चालत चालतच राहते. परंतु मला कोणी ही समजून घेत नाहीत. स्त्रियांच्या हालअपेष्टा, त्यांना होणारा त्रास विविध वाहिन्या चॅनेलवरील मालिकेतून दाखविल्या जातात. म्हणून त्यांच्या विषयी प्रत्येकाच्या मनात कणव निर्माण होते. माझी आंतरिक व्यथा मात्र कोणालाच समजून पडत नाही, कोणत्याही वाहिन्या चॅनेलवर दाखविली जात नाही. त्यामुळे माझी कथा नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. मला कोणी समजून घेतले नाही तरी चालेल निदान जीवनभर साथ देणाऱ्या अर्धांगिनीने म्हणजे माझ्या बायकोने तरी समजून घेतले तर माझे पुरुष जन्म धन्य झाले असे समजेन.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769