Santshrestha Mahila Part 12 books and stories free download online pdf in Marathi

संतश्रेष्ठ महिला भाग १२

संतश्रेष्ठ महिला भाग १२

यानंतर नाव येते ते राजस्थान मधील श्रेष्ठ संत मीराबाई यांचे
संत ज्ञानेश्वरांपासून ते गाडगेबाबांपर्यंत आपल्याकडे अनेक संत महात्मे होऊन गेले.
या सगळ्यांनी मराठीतील भक्तीसाहित्य समृद्ध केलेले आहे.
पण मराठी भाषेशिवाय इतर भाषातही
त्या त्या प्रांतातील संत महात्म्यांनी प्रचंड साहित्य निर्मीती केलेली आहे.
मग ते संत तुलसीदासांचे 'तुलसी रामायण' असो, सुरदासाचे काव्य असो, कबीर्-रहिमचे दोहे असोत
वा मीरेची पदे असोत.
या सगळ्यांनीच भारतीय संत साहीत्याला एका विलक्षण उंचीवर नेलेले आहे.
मात्र यापैकी संत कबीर आणि संत मीराबाई या दोघांचे आयुष्य अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे आहे .
कबीर अतिशय सामान्य घरात वाढले, त्यांच्यासमोरच्या समस्या वेगळ्या होत्या
तर मीरा राजघराण्यात जन्माला आलेली, तिच्या समस्या पुर्णपणे निराळ्या.
.. पण या दोघांमध्येही एक विलक्षण साम्य आहे ते म्हणजे अनन्यभक्ती !
इतर कुठल्याही शास्त्राला, धर्मकर्माला, कर्मकांडाच्या अवडंबराला गौणत्व देवुन स्वानुभुतीला पुजण्याची, स्वानुभुतीबद्दल असलेली अपार निष्ठेची भावना !
. मीराबाईंचा कार्यकाल अंदाजे १४९८-१५४७ असा मानला जातो.
तो मोघल साम्राज्याचा काळ होता.
‘मीराबाई ही मेवाड येथील रजपूत राजा रतनसिंह यांची मुलगी.
तिचा जन्म इ.स. १४९८ मध्ये झाला.
रतनसिंह मेडतिया (राजस्थान) येथील राठोड होते.
मीरेचा जन्म तिच्या वडिलांच्या जहागिरीतील चोकडी (कुकडी) गावी झाला.
बालपणी एका लग्नाची वरात पाहून ‘माझा विवाह कोणाशी होणार ?’ असे मीरेने आईस विचारले असता,
आईने कृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवून ‘हा तुझा पती’ असे सांगितले.
तेव्हापासून कृष्णाची प्रेमभक्ती तिच्या मनात उत्पन्न झाली.
बालपणीच मातृवियोग झाल्याने आजोबा राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले.
राव दूदाजी मोठे वैष्णवभक्त होते.
त्यांच्या भक्तीचा आणि धार्मिक वृत्तीचा खोल संस्कार मीरेवर झाला.
नृत्य, संगीत, साहित्यादी कला तिला चांगल्या अवगत होत्या .
संतसाहीत्य, आध्यात्मिक आणि पौराणिक साहीत्याशी तिचा चांगला परिचय होता
बालपणापासून ती कृष्णभक्तच होती.

तिला एका साधूने बालपणीच श्रीकृष्णाची मूर्ती दिली होती.
तिने त्या मुर्तीसमवेत स्वतःचे लग्न देखील लावले.
कृष्णप्रेमात ती इतकी बुडाली होती की जीवनातील सर्व गोष्टी तीला श्रीकृष्णापुढे नश्वर वाटत असत.
नंतर मीराबाईच्या जीवनात महात्मा रैदास (रविदास ) हे सद्गुरुरूपाने आले.
त्यांचा अनुग्रह मीराबाईला मिळाला होता

कालांतराने १५१६ मधे चितोडचा राजा राणा संग याचा थोरला राजपुत्र भोजराज यांच्याशी मीराबाईचा विवाह लहान वयातच करून देण्यात आला.
स्वतःचा विवाह कृष्णाशी झाला असल्याने तिला भोजराजशी झालेला विवाह मान्य नव्हता .
तरी देखील कुटूंबाच्या मान मर्यादेकरता तीने तो स्विकारला.
घरात मीरा कृष्णभक्ति शिवाय आणखीन कोणत्याही देवतेची पुजा मान्य करीत नसे.
त्यावेळेस अकबर असा एक मुस्लिम मुगल शासक होता जो प्रत्येक धर्माविषयी
जाणून घेण्यासाठी उत्साहित होता
खरेतर मुगल आणि मीराबाईच्या परिवाराचे आपसात वाकडे होते .

त्यामुळे मुगल सम्राट अकबराचे श्रीकृष्णाची अनन्य प्रेमिका मीराबाई हीला भेटणे मुश्किल होते .
सम्राट अकबर मीराबाईच्या भक्तिभावा मुळे इतका प्रभावित झाला होता की
तो एका भिकाऱ्याच्या वेशात मीराबाईला भेटायला गेला .
आणि तेव्हाच अकबराने मीराबाईची श्रीकृष्ण प्रेम रसात भिजलेली भावपूर्ण भजने , कीर्तने ऐकली
ती ऐकुन तो अक्षरशः मंत्रमुग्ध झाला व त्याने मीराबाईला एक अमुल्य हार भेट म्हणून दिला .

काही लोकांच्यामुळे मुगल सम्राट अकबर आणि मीराबाई भेटीची बातमी मेवाड़ मध्ये आगीप्रंमाणे पसरली त्यामुळे राजा भोजराजने मीराबाईला नदीत आत्महत्या कर असा आदेश दिला .

मीराबाईने आपल्या पतीच्या आदेशाचे पालन करीत नदीकडे प्रस्थान केले .
जेव्हा मीराबाई नदीत उडी मारायला गेली तेव्हा तिला श्री कृष्णाने साक्षात् दर्शन झाले !!
ज्यांनी फक्त तिचे प्राण वाचवले नाहीत तर राजमहाल सोडुन तिला वृंदावन येथे येऊन भक्ती करण्यास सांगितले .
त्यानंतर मीराबाई आपल्या काही भक्तांसोबत
श्री कृष्णाची तपोभूमी असलेल्या वृंदावन येथे गेली आणि
आपल्या आयुष्याचा जास्तीत जास्त काळ नंतर तिने तेथेच घालवला

नंतर मीराबाईचे पती राजा भोजराज यांना मीरेचा “समर्पित” भाव समजला .
जाणवले कि, मीराबाई एक “खरीखुरी” संत आहे
तिची कृष्ण भक्ति “निस्वार्थ” आहे.
तसेच तिचे श्री कृष्ण प्रेम अपार आणि निखळ आहे .
तिच्या भक्तिचा “सन्मान” करायला हवा आणि तिच्या कृष्ण भक्तिमध्ये आपणही
सहयोग द्यायला हवा .

तेव्हा ते मीराबाईला परत चित्तौड़ला आणण्या साठी वृन्दावन येथे पोचले.
त्यांनी मीराबाईची माफी मागितली ,आणि मीराबाईला तिच्या कृष्ण भक्तिमध्ये साथ देण्याचे वचन दिले .
त्यानंतर मीराबाई कशीतरी त्यांच्यासोबत परत चित्तौड़ला जायला तयार झाली .
पुढे दुर्दैवाने 1527 ला झालेल्या लढाईत भोजराजा मारले गेले .
त्यांना त्या संग्रामात वीरगती प्राप्त झाली.
अल्पकाळातच मीराबाईला वैधव्य प्राप्त झाले.
आता मीराबाईला सासरच्या लोकांनी त्रास द्यायला सुरवात केली .
पतीच्या मृत्यूच्या काही वर्षातच
मुगल साम्राज्याचा संस्थापक बाबर याच्याशी झालेल्या युद्धात तिचे वडील आणि सासरे मारले गेले.
वडील, सासरे, दीर रतनसिंह इत्यादींच्या एकामागून एक झालेल्या निधनांमुळे
तिची वैराग्यवृत्ती वाढत गेली व मन भक्तीतच अधिक रंगू लागले.
मीराबाईने या अशाश्वत आणि नश्वर जीवनाकडे पाठ फिरविली आणि कृष्णभक्तीत स्वतःला वाहुन घेतले.
आणि त्या वेळेपासून मीराबाई एखाद्या तपस्विनीसारखी राहू लागली.
ती रात्रंदिवस श्रीकृष्णाच्या चिंतनात निमग्न रहात असे.
कृष्णभक्तीत तल्लिन झालेल्या “ललिता” या गोपिकेचा आपण पुर्नजन्म आहोत असं मीराबाईंना वाटु लागले होते.

या दरम्यान अनेक भजनं आणि रचनांची निर्मीती मीराबाईंकडुन झाली.
विरह आणि विरक्तीने भरलेल्या त्यांच्या अनेक रचना आजही आपल्याला पहायला आणि ऐकायला मिळतात.
भोजराजाच्या मृत्यूनंतर त्याचा लहान भाऊ (भोजराजाचा सावत्र भाऊ)
राणा विक्रमादित्य सिंहासनी विराजमान झाला.
सुरूवातीला मीराबाईंची कृष्णभक्ति ही त्यांची वैयक्तिक बाब होती
पण पुढे पुढे त्या कृष्णभक्तीत तल्लीन होत रस्त्यांवर नाचु लागल्या.
ही बाब विक्रमादित्य राजाला मुळीच आवडत नसे .
तो चित्तोडचा त्यावेळी नव्यानेच राजा झाला होता.
राजघराण्यातील स्त्रीने सर्वांसमक्ष मंदीरात नाचावे, गावे
हे न आवडल्याने आणि मीराबाईची कृष्णभक्ती न रुचल्याने विक्रमादित्याने राजाने तिचा अतोनात छळ सुरु केला .
अंतःपुरवासिनी (पडदानशीन) राजपत्नीने असे वागणे तत्कालीन लोकांना सुद्धा रुचले नाही.
त्यामुळे राजाने बहीण उदाबाई हिच्याद्वारे पेटार्‍यातून एक साप मीराबाईकडे पाठवला
पण कृष्णभक्तीत रमलेल्या मीराबाईने पेटारा उघडून तो साप हसत हसत स्वतःच्या गळ्यात घातला.
त्याच क्षणी श्रीकृष्णाच्या कृपेने त्या सापाचे पुष्पहारात रूपांतर झाले.
हे वृत्त ऐकताच राजा अतिशय चिडला.

काही दिवसांनी मीराबाईसाठी राजाने त्याची बहिण उदाबाईच्या समवेत विषाचा प्याला पाठवला.
मीराबाईने श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर त्या विषाचा नैवेद्य दाखवून ते प्राशन केले.
तेव्हा भगवद्भावामुळे मीराबाईला ते विष अमृताप्रमाणे गोड लागले.
परंतु श्रीकृष्णाची मूर्ती विषाच्या प्रभावाने हिरवी दिसू लागली.
शेवटी अतिशय तगमग झालेल्या स्थितीत मीराबाईने श्रीकृष्णाला प्रार्थना केली,
‘हे कालियामर्दना, श्रीकृष्णा, मी विष प्राशन केल्यावर तुझा रंग का पालटला ?
या विषाचा तुझ्यावर परिणाम झाला, हे पाहून मला अतिशय दुःख होत आहे.
माझी ही तगमग तू लवकर पूर्ववत होऊन दूर कर.’
तत्क्षणीच ती कृष्णमूर्ती पूर्ववत दिसू लागली.

.
एकदा तर राजाने मीराबाई साठी काट्यांची सेज पाठवली
पण मीराबाई पर्यंत येईपर्यंत ती सेज फुलांची होऊन गेली .
राजाने मीराबाईला ठार मारण्याचे अनेकविध प्रयत्न केले
परंतु सर्वशक्तीमान श्रीकृष्णापुढे त्याचे काही चालले नाही.
श्रीकृष्णावाचून कशातही मीराबाईचे मन रमत नव्हते.
तिला श्रीकृष्णाविना रहाता येत नव्हते.
श्री कृष्ण की भक्ति मध्ये लीन असलेल्या मीराबाईने सासरच्या छळामुळे जगणे मुश्कील झाले होते
अशाच अवस्थेत त्यांनी
हिन्दी साहित्यातील महान कवि तुलसीदास
यांना सुद्धा पत्र लिहीले होते .

क्रमशः