Kashi - 7 books and stories free download online pdf in Marathi

काशी - 7

प्रकरण ७

   सरांना राजुने जेवण आणून दिले. जेवण करून सरांनी आश्रमाचा हिशोबाचा आढावा घेण्यास रजिस्टर हातात घेतले. परंतु मन हे भूतकाळातील घटनांकडे वेढू लागले होते. हळू हळू आठवणींचा वेढा मनाला जास्तच घट्ट घट्ट होऊ लागला. ते उठले आणि त्यांनी कपाटातून काशीच्या गळ्यातील तुटलेला आणि चिखलात पडलेला ताईत काढून त्याकडे एक टक बघत राहिले. अजूनही त्या ताईत वरचा चिखल सुकला असला तरी त्यातील आठवणी या ओल्या होत्या. काशीला तो चिखलात पडलेला ताईत नको होता. म्हणून मी माझ्या गळ्यातील ताईत तिच्या गळ्यात घालून तिचा ताईत मी माझ्या खिशात ठेवून दिला होता. त्याला काशीची आठवण म्हणून मी आजवर जपून ठेवला. आज मी काशीला दिलेला माझा ताईत काशीने सुद्धा मंगळसूत्र म्हणून जपून ठेवला आहे---काशीच्या जीवनात किती संघर्ष आले तरीसुद्धा ती तिच्या ज्ञानूला विसरली नाही.आज तिला माहित पडले कि तिचा ज्ञानू मीच आहे तर तिला किती आनंद होईल---त्या आनंदातच तिचा ज्ञानूसाठी अडकलेला जीव पटकन निघून जाण्याची शक्यता आहे.परंतु ते मला नको आहे---कारण तिची सोबत मला हवी आहे---"   

    मी तेरा वर्षाचा तर काशी बारा वर्षाची होती. बाल मजदुरीच्या वेढ्यातून सुटण्यासाठी आम्ही दोघं छगन मामाच्या तावडीतून हळूच पळून गेलो होतो. त्यावेळी आम्हा दोघांची ताटातूट झाली होती. काशी कोठीवर विकली गेली होती हे आज आजीच्या तोंडून समजले. परंतु मी गुंड लोकांच्या हाती पकडला गेलो. तेव्हा त्या बालमनाला काहीच माहित नव्हते.त्या गुंडांनी मला भीक मागायला लावले, पाकीट मारीचे काम करण्यास सांगितले, हे सर्व माझ्या मनाविरुद्ध होतं होते. तोंडातून शब्द काढला कि मला ते काठीने पायावर मारायचे. त्यावेळी माय-माय म्हणून रडण्याशिवाय दुसरा रस्ताच नव्हता. रात्रीचे एका पडक्या इमारतीमध्ये झोपण्याचा सहारा घ्यायचा. आंघोळीचा ठिकाणा नव्हता. खायला प्यायला पोटभर मिळत नव्हते. त्यातूनही मी काशीचा खूप शोध घेत होतो. त्या गुंड लोकांपासून पळून जाण्याचा प्रयत्नही करत होतो. परंतु मार मिळण्याखेरीज काही होतं नव्हते. मी पळून जाऊ नये म्हणून त्यांनी साकीनाका परिसरात चायनीज फ्राईज बनवण्याच्या कारखान्यात मला जुंपले. पहाटे पाच ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत हे काम सुरु असायचे. उकळत्या तेलातून मोठ्या जाळीने मी चायनीज फ्राईज काढत होतो. त्यामुळे उकळते तेल उडाल्याचे व्रण अंगावर दिसत होते. फ्राईज काढण्याची मोठी जाळी पायावर पडल्याने पायावर मोठी जखम सुद्धा झाली होती. त्यातून रक्तस्त्राव होतं होता. परंतु त्याच्यावर कोणी औषोधोपचार सुद्धा कोणी करत नव्हते. दिवसभर ढोरासारखे काम करून घेत होते. परंतु हातात तुटपुंजे पैसे हाती पडत होते. शाळेत जाऊन शिकून मोठा ऑफिसर बनण्याचे स्वप्न मनात होते.परंतु गरिबीने या बालमजदुरीच्या जाळ्यात अडकून गेलो होतो. माझे बालपणाचे शोषण होतं होते. रात्री थकलो म्हणून जबरदस्ती दारू पाजून मला झोपवत होते. हळू हळू बिडी ओढायची सवय लागली. तेवढाच डोक्याला आराम मिळत होता आणि थकवा दूर होतं होता. 

 परंतु माझी स्वप्न आठवणीत आले कि मी पुन्हा सावध होऊन स्वतःला सावरत होतो. बापूच्या दारूमुळे तर माझी अशी हालत झाली हे लक्षात येऊन मी दारू व बिडीची घृणाही करत असे. मला शिकायचे आहे---मोठे व्हायचे आहे---हे मनात घोळवत होतो.

   त्या अनुरोधाने मी हळू हळू पैसे जमा करून शाळेची पुस्तक जमा करण्याचा विचार करू लागलो. परंतु बाहेर जाणार कसे---? हा मोठा प्रश्न होता. तरीही शाळेचे वेड डोक्यातून जात नव्हते. हातात थोडेफार पैसे जमा झालेले होते. आता आपल्याला कसाही करून इथून पळ काढायला हवा.असं सतत विचार यायचा. एक दिवस कारखान्याचा सेठ कामानिमित्त गावी गेला होता. माझ्या बरोबरीने काम करणारे काम करून संध्याकाळी घरी जात असत. मी मात्र कारखान्यातच झोपत असे. नेहमी सेठ बाहेरून लॉक करून मला आतमध्ये झोपायला सांगायचा. परंतु ज्या दिवशी सेठ गावी गेला तेव्हा सेठने कारखान्याची चावी माझ्या हातात दिली. या गोष्टीची संधी साधून माझे कपडे घेऊन मी शटर लॉक करून चावी वोचमनकडे देऊन मिडिकल दुकानात औषध आणायला जातो असे सांगून तिथून पळ काढला. आजपर्यंत मी जेव्हा पळ काढतो तेव्हा कुठल्यातरी दुसऱ्या संकटात पडतो असा अनुभव असल्याने त्यावेळी मी खूप सावधतेने तिथून सावधतेने धावत निघालो. मनातून खूप भीतीही वाटतं होती. बाहेर तर पडलो परंतु आता जाणार कुठे---? बरोबर काशी सुद्धा नव्हती. असाच धावत धावत मी एका फुटपाथवर थांबलो. फुटपाथवर काही मजदूर, भिकारी असे झोपलेले  दिसले. त्यांच्यातच मी माझा टॉवेल अंथरून त्यावर झोपलो. सकाळी कचरेवाल्याच्या आवाजाने सगळे उठले. तसा मीही उठून बसलो. कचरावाला गेल्यावर थोड्यावेळाने विक्रीवाले येऊ लागले. प्रत्येकाने आपली आपली जागा घेऊन आपला माल काढून विक्री साठी दुकान सजवू लागले. मी एकटक सर्व विक्री वाल्यांकडे बघू लागलो. मी सुद्धा असा धंदा टाकला तर---? परंतु माल आणायला तेवढे पैसे कुठून आणणार---? तेवढ्यात एका पेपर विक्रेत्याने मला हटकले. 

 " ए , इथे उभे राहून काय करतोस---? " पेपरवाला म्हणाला.

 " काही नाही साब---मला काम हवे आहे---" मी म्हणालो.

 " तू या वयात काय करणार---? तुला तर आता शिकायला हवे---तू कुठे राहतोस---? " पेपरवाला म्हणाला.

 " काहीही काम चालेल---साब "

 " पेपर टाकायचे काम करशील कां---?

 " हा साहेब, मी सकाळी पेपर टाकीन आणि त्या पैशाने तुमच्याकडून पुस्तकं खरेदी करेन---साहेब , मला शिकायचे आहे---"

 " परंतु तू राहणार कुढे---? तुझे आई-बाप कुठे आहे---? "

मी त्याला माझी सर्व कहाणी सांगितली. ती ऐकून त्याला माझी दया आली.

 " तुला शिकायचे आहे नं , मग तू बालविकास आश्रममध्ये गेलास कि तुला शिकायला मिळेल. तिथे गरीब मुलांना शिक्षण देतात, खायला प्यायला मिळते, तुझी सर्व जबाबदारी ते घेतील--- " तेवढ्यात एक पोलीस पेपर घ्यायला आला. पोलिसाने माझ्या जवळ येऊन माझी सर्व विचापूस केली. माझी शिकायची इच्छा बघून त्याने माझी बालविकास आश्रममध्ये व्यवस्था केली. त्यावेळी मी खूप खुश होतो. त्यावेळी सुद्धा मला काशीची खूप आठवण आली. काशी असती तर तिला सुद्धा शिकायला मिळाले असते. आश्रममध्ये गेल्यावर तिथे एका सेविकाने माझी विचारपूस केली.

 " बाळा, तुझे नाव काय---? तू कुठे राहतोस---? तुझे आई-बाबा काय करतात---?

परंतु त्यांच्या प्रश्नाचे एकही उत्तर माझ्याकडे नव्हते. मला माझे पूर्ण नावही सांगता येत नव्हते कि माझ्या गावाचे नावही माहित नव्हते. म्हणून फॉर्म भरताना माझे नाव संतोष देसाई म्हणून रजिस्टर झाले. त्या दिवसापासून मला माझी नवीन जीवन मिळाले, नवीन नाव, नवीन ओळख मिळाली.

 महिन्या भरातच माझे जीवन बदलून गेले. अभ्यास करणे, स्वतःचे काम स्वतः करणे , सकाळी लवकर उठून आंघोळ करून नाश्ता करून सकाळी शाळेत जाणे, दुपारी रूमवर येऊन जेऊन गृहपाठ करणे, संध्याकाळी बागेत जाऊन मुलांबरोबर खेळणे, हा माझा दैनंदिन कार्यक्रमाचा मला सराव  झाला. मी मन लावून अभ्यास करत होतो. त्यामुळे क्लासमध्ये सुद्धा नेहमी पहिल्या नंबरने पास होतं होतो. सर्व टिचरचा मी आवडता व हुशार विद्यार्थी म्हणून प्रचलित झालो. माझे जीवन प्रगती पथावरून पुढे पुढे जात होते. मनातून मी त्या पेपर विक्रेत्याचे आभार मानत होतो. त्याने मला योग्य तो रस्ता दाखवला नसता तर माझेही जीवन मोलमजुरी करून संपून गेले असते. आज जो मी आहे तो पेपर विक्रेत्यांमुळे आणि बालविकास आश्रमामुळे आहे हे मी कधीही विसरू शकत नाही.