Kashi - 1 books and stories free download online pdf in Marathi

काशी - 1

प्रकरण १

  रात्रीची वेळ होती. सतीश सर, मनोज, राम आणि राजू ड्राइव्हर असे चौघे जण गाडीने आश्रम कडे परतीचा प्रवास करत होते. सतीश सर म्हणजे काशी आश्रमाचे संस्थापक आणि बाकी जण हे त्यांचे सहकारी, रस्त्यावरील अनाथ मुले व वृद्ध यांना शोधून त्यांना आश्रम मध्ये आश्रय देण्यासाठी रोजच्याप्रमाणे बाहेर पडलेले होते. परताना खूप रात्र झालेली होती. अचानक सर म्हणाले " राजू जरा गाडी साईडला घे. तिथे अंधारात कोणीतरी बसलेलं दिसत आहे ---" सरांच्या म्हणण्याप्रमाणे राजुने गाडी रस्त्याच्या एका साईडला घेतली.     

   मनोज, राम, राजू व सर त्या बसलेल्या व्यक्तीकडे गेले. चादर गुंडाळून एक म्हातारी बसलेली होती. सरांकडे बघून आपला थरथरता हात चादरीतून बाहेर काढून पुढे केला. " मनोज, ही आजीबाई दिसते. काय हालत झाली आहे बघ, एवढ्या रात्री ही एकटी बसून काय करते---? सर म्हणाले.

  " आजी, तुम्ही इथे अंधारात काय करता---? तुम्हाला घर नाही का---? तुमचं नाव काय आहे---? " राजू त्या आजीसमोर बसून बोलत होता.

  " मला खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला असेल तर दे---"  आजी म्हणाली.

 

राजुने जाऊन गाडीतून बिस्किटाचा पुडा व पाण्याची बाटली आणली आणि आजीच्या हातात दिली. आजीने बिस्किटं खाऊन पाणी पिऊन निश्वास सोडला.   

   " आजी, तुझं नाव काय---? तुला कोणी नाही का---?"  सरांनी विचारले.

  " माझं नाव मंजुळा---मला कोणी नाही---आर जो पर्यंत माणसाचे हातपाय चालतात तोवर सगळे आपले असतात. हातपाय थंड पडले कि कोणी कोणाचे नसते. आकाश हेच माझे छत आणि  झाडाची सावली हीच माझी सोबतीण --- सांगायचं कोणाला---? आपलं नशीब समजून चूप बसायचं---" आजी म्हणाली.

  " आजी तुला कोणी असं एकटीला रस्त्यात टाकून दिले आहे का---? सरांनी आजीचा थरथरता हात हातात घेत म्हणाले.

आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. तसे सर म्हणाले " आजी रडू नकोस--- तुला कोणी नसेल तर माझ्या आश्रम मध्ये चल---तिथे तू आरामात राहशील---"

     " नगं--नगं  मी इथे आहे ती बरी आहे. उगाच तुला तरास कशा पायी---? तू माझ्यासाठी दया दाखवलीस हेच माझ्यासाठी खूप आहे. माझं सारं जीवन एकट्याने काढलं ---आता तर माझे किती दिस राहिलेत---?"आजी खोकत खोकत बोलत होती.

  " आजी तू आमच्या बरोबर चल---तिथे तुझ्यावर उपचार करूया----तिथे तू बरी होऊन जाशील---" असे म्हणून सरांनी तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि सरांनी मनोज व रामला सांगितले कि दोघांनी मिळून आजीला उचलून गाडीमध्ये बसवा. त्याप्रमाणे मनोज व रामने मिळून आजीला गाडीत बसविले. आजी बरोबर तिची चादर आणि तिच्या पिशवीत तिचा चष्मा आणि एक लुगडं एवढाच तिचा संसार होता. सरांनी आजीला धरून बसविली होती. आजीच्या अंगात काही त्राण दिसत नव्हते. आजीच्या अंगाला एकदम दुर्गंधी येत होती. आजीने जणू महिनाभर आघोळही केलेली नसावी. तिची स्थिती बघून सरांना एकदम आपल्या लहानपणाची आठवण झाली. एकेकाळी मी सुद्धा असाच रहात होतो. सरांनी दाखवलेली माया बघून आजीलाही आपल्या ज्ञानूची आठवण झाली. आजीच्या विचारात कधी आश्रम आला कळलेच नाही. तोपर्यंत आजी सरांच्या खांद्यावर डोकं टेकून झोपून गेली होती.

  " आजी उठ, आपलं काशी आश्रम आलं. मनोज व राम तुम्ही आजीला उचलून बाहेर बसवा. तोपर्यंत मी व्हील चेअर घेऊन येतो असे म्हणून सर व्हील चेअर आणायला गेले. " आर, तुम्ही मला इथे कुठे आणलायसा---? जागा तर लई चांगली दिसते कि---" 

    " आजी हा आपला आश्रम आहे. इथे तुम्ही चांगल्या होणार---आमचे सर खूप चांगले आहेत. ते तुमचा खूप सांभाळ करतील---" मनोज म्हणाला.

तेवढ्यात सर व एक नर्स खुर्ची घेऊन आले. आजीला खुर्चीत बसवून मनोजने व रामने खुर्ची ढकलून आजीला आश्रम मध्ये आणले. नर्सने लगेच आजीला आंघोळ घालण्यास आयाला सांगितले.  

  आजी आंघोळ करून एकदम फ्रेश झाली होती. पोटभर जेऊन दूध पिऊन झोपून गेली. 

सकाळी सकाळी सर उठून आजीची विचारपूस करायला आले. त्यांना बघून आजी खूप खुश दिसत होती. तिचा चेहरा बघून सरांना बरे वाटले. रात्री बघीतलेली आजी आणि आत्ता दिसणारी आजी यामध्ये खूप फरक दिसत होता.

  " काय मग आजी, आता इथे कसं वाटतंय---? आवडली नं ही जागा---? हा आहे आपला काशी आश्रम---" सर आजीच्या बाजूला बसत म्हणाले.

" आरं, ही काशी कोण हाय---? तुझी बायको हाय कि तुझी लेक हाय---? आजी हसत हसत म्हणाली.

परंतु आजीच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे टाळून म्हणाले " आजी चहा वगैरे घेतलास कि नाही---? काही खायला हवे तर बोलत जा---मागून घेत जा---"

"आरं तुझं नाव काय? तुला काय म्हणून हाक मारू---?"

" तू मला सर म्हणून हाक मार---इथे सगळे मला सर म्हणूनच बोलावतात---"

" तू किती माझी काळजी घेतोस---गेल्या जन्मी मी थोडं फार पुण्य केले होते म्हणून तू मला भेटलास---देवाचे लई उपकार हाईत बघ---"

" बरं ते जाऊदे---तू मला सांग कि तुझं कोणी आहे का---? तुझं गाव काय आहे---? तू अशी एकटी कशी पडलीस---कि तुला तुझ्या मुलाने टाकून दिली---? " सर एकावर एक प्रश्न विचारू लागले. परंतु आजी काही नं बोलता एकटक शून्य नजरेने बाहेर बघत राहिली. सरांच्या प्रश्नांनी आजीला आपले बालपणीचे दिवस आठवू लागले.    

   आम्ही झोपडपट्टीत राहणारी लहान मुलं, दिवसभर माय-बापूला मदत म्हणून दिवसभर मोलमजुरी करून संध्याकाळी एकत्र खेळत असत. शिकायची आवड असूनही गरीब परिस्थितीने शिकायला मिळत नव्हते. खेळायला सुद्धा मोकळे मैदान नसायचे. म्हणून झोपडपट्टीच्या गल्लीबोळातून गटाराच्या दुर्गंधीत लपाछपी खेळत असत. खेळताना गटाराच्या दुर्गंधीचे आम्हाला भान नसायचे. रोजच्या सवयीने ती दुर्गंधी आम्हाला अंगवळणी पडली होती. अंगावर फाटक्या-मळक्या कपड्याशिवाय काहीच नव्हते. सकाळी लवकर उठायचे आणि कधी चहा मिळाला तर मिळाला नाहीतर तसेच पाणी पिऊन माय-बापू बरोबर मोल मजुरीला बाहेर पडायचे. मी माय बरोबर जाऊन पाट्याला टाकी लावायचे काम शिकत होते. तर कधी फुगे विकायला बापू बरोबर जात असे. सर्व मुलांमध्ये मला ज्ञानू फार आवडत असे. कारण मला जशी शिकायची आवड होती तशीच ज्ञानूलाही शिकायची आवड होती. त्यामुळे आमची दोघांची खूप गट्टी जमायची. शाळेत जाणाऱ्या मुलांना बघून ज्ञानू नेहमी म्हणायचं कि " काशी आपण त्या मुलांसारखे शाळेत जाऊया का---? " तेव्हा त्याचे बोलणे ऐकून मला हसायला यायचे.

  " ज्ञानू, शाळेत जायला खूप पैसे लागतात. आपल्या माय-बापू कडे ते पैसे कुठे हायेत---? "

  " काशी, आपल्याला माय जे पैसे खायला देते ते आपण जमा करूया---ज्ञानू निरागसपणे बोलत असे आणि त्याने पैसे जमा करायला सुद्धा सुरवात केली होती. परंतु एक दिवस बापूला त्याचे पैसे माहित पडले आणि त्याने त्याची गपचूप दारू प्यायली. त्यावेळी ज्ञानू खूप रडला होता. मी माझ्या मळक्या फ्रॉकने त्याचे डोळे पुसून सांगितले कि " ज्ञानू, तू तुझे पैसे माझ्याजवळ दे, मी ते माझ्या मायकडे ठेवायला देईन. ती तुझे पैसे खर्च नाही करणार---"

  परंतु एक दिवस मला ताप आला होता तेव्हा मायने ते पैसे खर्च करून टाकले. ज्ञानू सुद्धा आपल्या बापू बरोबर जंगलातील लाकडं तोडून बाजारात विकायला जात असे. परंतु ज्ञानूला एकही पैसा देत नसे. अशाप्रकारे आमचे स्वप्नं स्वप्नच राहून गेले होते. अशाप्रकारे या परिस्थितीत मी आणि ज्ञानू हळू हळू मोठे होत होतो. परिस्थितीने आम्हाला समज फार आली होती. ज्ञानू आणि मी मनाने हळू हळू जवळ येत होतो. परंतु गरिबी अशी चीज आहे कि आपण त्या पुढे पूर्णपणे दबले जातो, आपल्या भावना दबल्या जातात, इच्छा दबल्या जातात. आपले बालपण कुस्करले जाते, हाती येतं ते फक्त रुक्ष जीवन---ज्ञानूचेही लाकडे विकून जीवन गुजराण होत होती. तरीसुद्धा शाळेत जाऊन शिकायचे त्याचे म्रुगजळाप्रमाणे दिसणारे एक मोठे स्वप्नं होते.ज्ञानू खूप हुशार होता. धंद्यातही तो खूप पटापट हिशोब करत असे. शाळेत जाणारी मुले दिसली कि तो एकटक त्यांच्या कडे बघत असे. कधी आम्हाला शिकायला मिळेल या आशेवर आम्ही जगत होतो.

  दारू पिऊन पिऊन ज्ञानूच्या बापूचे मयत झाले. त्यावेळी ज्ञानू खूप रडत होता.त्यावेळी मीच त्याला सावरले. मी सुद्धा त्यावेळी लहानच होते. तरीसुद्धा आपल्या मळक्या फ्रॉकने त्याचे डोळे पुसून त्याला रडू नको--रडू नको असे म्हणून त्याला रडायचे चूप केले. आमचे एकमेकांवरील प्रेम म्हणा किंवा जीव म्हणा यामध्ये बालिश भावना होती.तो रडला कि माझ्या डोळ्यात पाणी येई तर मी रडले कि त्याच्या डोळ्यात पाणी येई---