Kashi - 3 books and stories free download online pdf in Marathi

काशी - 3

प्रकरण ३

   जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी ज्ञानूला, माय-बापूला आवाज देऊ लागले. मी कुठे आले आहे हे मला उमगत नव्हते. एका मऊ मऊ गादीवर मी झोपले होते. बाजूला पाच-सहा नटलेल्या बाया होत्या. परंतु त्यात मला घेऊन येणारी बाय नव्हती. ज्ञानू दिसत नाही म्हणून मी पुन्हा जोराने रडू लागले. तेवढ्यात एक जाडी अम्मा आली. तिने मला जवळ घेतले आणि मला कुरवाळू लागली. नंतर मला तिने दूध-बिस्कीट खायला दिले. मला मायची खूप आठवण येऊ लागली. म्हणून मी तिच्या कुशीत शिरून माय-माय म्हणून रडू लागली. " बेटा रोना नहीं--'तेरी माय नहीं तो क्या हुआ---मैं 'तेरी माय जैसी हूं ना---तू घाबरू नकोस---आता तू अंघोळ कर आणि हे नवे नवे कपडे घाल. असे म्हणून तिने मला तयार केले. सारे वातावरण मला वेगळेच वाटत होते.कुठे माझी झोपडी आणि कुठे हे मोठे घर---? त्यावेळी मला ते मोठे घरचं वाटत होते.   जागो जागी रंगीबेरंगी पडदे लटकत होते. सर्व बाया नटून थटून आपल्या आपल्या खिडकीतून बाहेर बघून हसत होत्या तर कोणी इशारे करत होत्या. मधेच कोणी जाडी अम्माला खायला पान बनवून देत होत्या. जाडी अम्मा म्हणजे शेवंता बाय.बापे लोक जात होते--येत होते. शेवंता बाय कडे पैसे देत होते आणि शेवंता बाय नोटांवर नोटा जमा करून आपल्या बटव्यात भरत होती. माझ्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीला हे सगळे विचित्र वाटत होते आणि तितकेच कुतुहुलही वाटत होते. परंतु मी जिथे राहते त्याला एक वेश्यांची कोठी म्हणतात हे त्या वयाला कळत नव्हते.

 हळू हळू मी काशीची मंजुळा झाली. मला मंजुळा म्हणून नवी ओळख मिळाली. मंजुळा नावाने मी डान्स शिकू लागले, मेकअप करू लागले, कसे बोलायचे, कसे मुरड्याचे याविषयी मला शेवंता बाय शिकवू लागली. सुरवातीला हे सर्व मी शिकायला तयार नव्हते. कारण मला शाळेत जायचे होते. शिकायचे होते. परंतु मला मारून मुटकून ते लोक जबरदस्ती करायचे. नाहीं ऐकले तर मारायचे. परंतु मार खाऊनही मी माझी जिद्द सोडत नव्हते. म्हणून मला माझ्या समाधानासाठी थोडेफार बाराखडी, उजळणी शिकवू लागले. माझी बोलण्याची भाषा हि थोडी थोडी सुधारू लागली. तिथे जे खाणं बघितले नव्हते ते मला मिळू लागले होते. रोज मिठाई खायला मिळत होती. नवे नवे कपडे मिळत होते.त्यामुळे त्या वयाला मला खूप ख़ुशी होत होती. परंतु हळू हळू मी मोठी होत गेले तसे मला समजू लागले कि चुकीच्या जागी अडकले गेले आहे. परंतु काहीच करू शकत नव्हते. ज्ञानूच्या, माय-बापूच्या आठवणीने रडू यायचे. त्यावेळी मी ज्ञानूचा जवळ असलेला ताईत घेऊन रडत बसायचे. 

  दिवसा मागून दिवस जाऊ लागले. तस तसे मला वेगवेगळे अनुभव येऊ लागले. मी कोण होते आणि आता कोण आहे या गोष्टीची जाणीव मला होऊ लागली होती. तिथे एका लता नावाच्या मुलीशी माझी मैत्री झाली होती. तिच्याकडून मी थोडेफार लिहा-वाचायचे शिकून घेतले होते. त्यामुळे चोरून चोरून पुस्तके वाचून  मला चांगली-वाईटाची समज आली होती. काशी आणि मंजुळाच्या जीवनातील झालेला केवढा मोठा बदल मला असह्य होत होता.या जगण्यापेक्षा झोपडपट्टीत राहून मजदुरी केलेली बरी या गोष्टीची समज आली होती. इथे सर्व माझ्यासारख्या अशिक्षित बाया म्हणजे गरिबीने पिडलेल्या, बालमजदुरीच्या सापळ्यातून बाहेर काढून जबरदस्तीने कोठीच्या सापळ्यात अडकून निर्जीव बाहुल्या बनल्या गेल्या होत्या.त्यांना शेवंता बाय नाचवत होती आणि दलालांचे खिसे भरले जात होते. त्यात माझ्यासारख्या अडाणी लहान मुली बळी पडत होत्या. लताला सुद्धा कामाच्या निमित्ताने फसवून मुंबईला आणून फसवले गेले होते. तेव्हा शिक्षणाचे महत्व समजून आले. शिक्षणाने आपण किती आत्मनिर्भर होतो. चांगल्या-वाईटाची पारख होते. परंतु हे शिक्षण आमच्या सारख्या गरिबांना कोण देणार---?त्या सर्व बाया शरीर असूनही मनाने मेलेल्या होत्या---प्रत्येकीची एक जिवंत कहाणी होती. तरी त्या हसत होत्या. त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे गळून गळून संपून गेले होते. मनात नसताना सुद्धा आपले शरीर उघडे करायचे, चेहऱ्यावर उसने हसू दाखवायचे आणि समोरच्याला रिझवुन त्याची शारीरिक भूक शांत करायची हाच जणू जीवन जगण्याचा उद्देश राहिलेला होता. परंतु त्या उद्देशात केवढी मोठी जखम लपलेली होती हे कोणीच जाणून घेऊ शकत नव्हते. आमच्यामुळेच शेवंताबाईला पैसा मिळत होता. त्या फक्त आणि फक्त पैशासाठीच ती माझ्यासारख्या त्या कठपुतळ्यांवर प्रेमाचा वर्षाव करत होती---"

  एवढं बोलेपर्यंत आजीला धाप लागलेली होती. " बाबारे , मी आता जरा झोपते---" असे म्हणून आजी पलंगावर आडवी झाली. सरही उठून आपल्या रूमवर गेले.

  आजीची कहाणी ऐकून सरांचे मन एकदम सुन्न झाल्यासारखे झाले होते. मी काय ऐकतो आहे---? ऐकलेले सारे फारच भयानक होते. काशीची आणि माझी ताटातूट झाल्यावर काशीने किती सोसलं आहे---परंतु पूर्णपणे काशीच आहे हि मनाला खात्री वाटत नाही. कुठे ती फ्रॉक घातलेली काशी आणि कुठे हि म्हातारी झालेली काशी---किती वर्ष लोटली. कसा मी विश्वास करू---? परंतु आजीने ज्या गोष्टी सांगितल्या त्या पूर्णपणे आमच्या लहानपणीच्या आहेत. त्या पुढचे मी काही सांगू शकत नाही---सरांचे मन स्वतःशीच उलटे सुलटे प्रश्न करत होते. 

  संध्याकाळी आजी चहा पीत व्हरांडयामध्ये बसली होती. " आता कसं वाटतंय आजी---?" सरांनी आजीजवळ जाऊन विचारले---"

  " हे सगळं अंग दुखतंय बाबा---" 

  " दाबून देऊ का---? " असे म्हणून ते स्वतः तिची पाठ दाबून देऊ लागले. " आजी तुला सगळी औषधं दिलेली आहेत कां---?

 " हो हो नर्सने सगळी औषधं दिली. डॉक्टरने थोडं बाहेर जाऊन बसायला सांगितले आहे. परंतु माझी कंबरच तुटली हाय नं---त्यामुळे ना चालता येत ना कि बसता येत---  अशी माझी हालत हाय--- तरी तू  मला इथे घेऊन आलास हे बरे---नाहीतर मी रस्त्यावरच मरून पडले असते. एकाच गोष्टीचे वाईट वाटते कि मरताना कोणी पाणी पाजायला नाही---माझा ज्ञानू असता तर माझी काळजी घेतली असती---" असे म्हणून आजीचे डोळे पाण्याने भरून आले. सारखं सारखं बोलून बोलून खोकल्याची ढास हि आली. थोडेसे चक्कर आल्यासारखे झाले म्हणून आजी पलंगावर आडवी झाली. सर लगेच उठून नर्सकडे गेले आणि आजीच्या रक्त तपासणीविषयी बोलू लागले.

 " हो हो, उद्या आजीची रक्त तपासणी आहेच. तसे डॉक्टरांनी लिहूनही दिले आहे---" नर्स म्हणाली.

  सर तसे काळजीतच पडले होते. आजीचे काही बरे वाईट व्हायला नको. तिची शेवटची इच्छा पूर्ण व्हायला हवी.तिचा ज्ञानू तिला परत मिळे पर्यंत ती जिवंत राहायला हवी---"आजी खोकल्याने अगदी हैराण झाली होती. दिवसेन दिवस अशक्त होत होती. तिचे खाणे-पिणे सुद्धा कमी कमी होत होते. त्यामुळे वारंवार तिला चक्करही येऊ लागली होती. दुसऱ्यादिवशी संध्याकाळी आजीचा रिपोर्ट आला. त्यात आजीला क्षय असल्याचे निदान झाले. 

 

 सर्वजण आजीची योग्य ती काळजी घेऊ लागले होते. तिची इंजेक्शन्स चालू झाली. डॉक्टर रोज येऊन आजीला तपासत होते. योग्य तो आहार दिला जात होता. हे सर्व जातीने स्वतः सर करत होते. संध्याकाळी रोज आजीला व्हील चेअर वरून बागेत फिरायला घेऊन जात असत. बागेतली शेवंतीची फुले गोळा करून आजीला देत असत.त्यामुळे आजी अगदी प्रसन्न दिसत होती. मनातल्या मनात आजी हसत असे. जणू कुठल्या आठवणीत रंगून जात असे. सरांनी केलेली सेवा बघून कधी कधी आजी आतल्या आत रडतही असे. हे सर अगदी ओळखून होते. परंतु आजीची पूर्ण कहाणी ऐकायला मिळत नाही तोपर्यंत सरांचा पूर्णपणे विश्वास होत नव्हता कि हि माझी हरवलेली काशीच आहे. सर फारच उदास झाले होते. भूतकाळातील आठवणी मनात थैमान घालत होत्या. मन बेचैन होत होते. तेवढ्यात ड्राइव्हर राजू आला. सरांना उदास असलेले बघून राजू म्हणाला. " आजी आल्यापासून तुम्ही बेचैन दिसता सर---"

 " नाही तसं काही नाही---बरं ते जाऊदे---तू कशाला आला होतास ते सांग---" सर विषय बदलत म्हणाले.

 " सर, ते आपले नाना सावंत तुम्हाला विचारत होते---"

 " हो---त्यांना सुद्धा मला भेटायचे आहे. आजी आल्यापासून मला हल्ली वेळच मिळत नाही. आजीची सेवा करण्यातच सारा वेळ निघून जातो. परंतु मनाला आनंदही मिळतो. आजीच्या गप्पा ऐकण्यात त्यात एक आपलेपणा वाटतो. बिचारीची जीवन कहाणी ऐकून मनाला दुःख होते. दुनियेत कसे कसे लोक जगत असतात. एकंदरीत सर्वच लोकं दुःखी आहेत. पैसेवाले सुद्धा आणि गरीब सुद्धा---फक्त दुःखाचे प्रकार वेगळे. आपले नाना सावंत बघा नं---त्यांची बायको मेली म्हणून ते दुःखी झाले तर त्या नंतर सुनेने त्यांचा छळ करून त्यांना रस्त्यावर सोडले. तेव्हा आपण त्यांना आपल्या आश्रमात आणले. हि आपली आजी सुद्धा कमरेतून मोडलेली, धड चालता येत नाही कि बसता येत नाही, अशा अवस्थेत तिला कोणी नाही. बिचारीला रस्त्यावर टाकून दिली होती. हि आपल्या आश्रमातील लहान मुलं बघा---गरिबीने गांजलेली, शिक्षण घेऊ शकत नाही कि जीवनाचे ध्येय बाळगू शकत नाही. अशीच रस्त्यावर भीक मागून पोट भरायचे नाहीतर बाल-मजदुरी करून आपले जीवन संपवायचे. राजू, या जीवनाला काही अर्थ आहे कां---जीवन जगण्याचा हक्क फक्त पैसेवाल्यानाच असतो कां---? राजू, हा अनुभव मी माझ्या लहानपणापासून अनुभवला आहे. गरिबी काय असते आणि गरीब मुलांची स्वप्न कशी धुळीला मिळतात---त्यांचे बालपण कसे हिरावले जाते---या चाकोरीतून बाहेर पडणं किती कठीण असते हे मी समजू शकतो. ज्या वयात खेळायचे, बागडायचे, स्वप्न बघायची, त्या वयात हि गरीब लहान मुलं, मजदुरी करून थकून भागून आल्यावर थकवा उतरविण्यासाठी  बिडी, सिगारेट, दारू पिऊन बेभान होऊन झोपायचं---सकाळी पुन्हा उठून मजदुरी करायला जायचे. त्यातून कुठे असणार फुरसत, कुठे असणार पैसा, कुठे असणार इच्छा, कुठे असणार जीवन जगण्याची ध्येयं---फक्त जीव आहे म्हणून जगायचे----परंतु त्या जगण्याला काही अर्थ आहे कां---? " सर भाव विवश होऊन बोलत होते.

  राजू सरांचे बोलणे ऐकून एकदम स्तब्ध झाला होता. काय बोलावे राजुला कळेनासे झाले. सरांच्या जीवनात काहीतरी गुह्य राज आहे. परंतु सरांनी कधीच आपले मन मोकळे केले नव्हते. सर फार मोठे मनाचे आहेत. त्यांनी आश्रमाला काशी हे नाव कां दिले या गोष्टीचे कारण आजपर्यंत कोणालाच कळले नव्हते. मात्र सर आश्रमातील प्रत्येकाशी प्रेमाने वागत असत. आज मला, मनोजला तसेच रामला सरांनीच आश्रय दिला. आम्ही तिघेही याच आश्रमात शिकलो आणि मोठे झालो. सरांचे आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत. सर सर्वात मोठे कार्य करत आहेत---अशा प्रकारचे विचार राजुच्या मनात घोळू लागले. 

 " राजू ,अरे कुठल्या विचारात गढून गेलास---चल, आपण नानांना भेटायला जाऊ. ते सुद्धा बिचारे एकटे बसून विचार करत बसतात. तरी आता त्यांनी स्वतःला बरेच सावरले आहे. सुरवातीला मुलाची वाट बघत बसायचे. आता मुलगा भेटायला येत नाही हे त्यांच्या अंगवळणी पडून गेले आहे. तसे बघितले तर त्यांच्या मुलाला तरी कुठे माहित आहे कि आपले वडील या काशी आश्रमात आहेत म्हणून---ज्या आई-बापाने जन्म दिला, मोठे केले, शिकवले,लायक बनविले त्या आई-बापाला हि मुलं रस्त्यात कशी सोडून देतात---? बापाचा पैसा हडप करतात आणि बाप कंगाल झाला कि त्यांची किंमत शून्य करून टाकतात. राजू, मी तर असेही उदा. ऐकले आहे कि मुलाने आई-बापाला अमेरिकेला घेऊन जातो असे म्हणून राहते घर विकून टाकले आणि आई-बापाला विमानतळावरच एकटे सोडून मुलगा पळून गेला. एक घरचा सहारा होता तो हि गेला आणि बिचारे दोघे रस्त्यावर फिरत राहिले. शेवटी काय करणार---? आश्रमाची वाट पकडायला लागली. असो हि दुनिया पैशाची लालची झालेली आहे आणि त्या लालच मध्ये आंधळी झाली आहे---" तेढ्यात समोरून नाना येताना दिसले. राजू निघून गेला आणि सर नानांशी बोलत राहिले.