I am a maid - 4 books and stories free download online pdf in Marathi

मी एक मोलकरीण - 4

( भाग 4 )

मी खुप उत्साहित होते. आमच्या गावामध्ये माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. मला आता कोणी चिडवण्याच्या दृष्टिने बघत नव्हते तर अभिमानाने ओळखत होते. आई ला खूपच बरं वाटायचं जेव्हा लोक आईला माझी आई म्हणून ओळखली लागले. आता मदन हि तिसरी मध्ये जाणार होता आणि मी अकरावी मध्ये ! आई आणि मी ब-यापैकी तयार होतो. मदनचं तर शाळेमध्ये प्रवेश व्यवस्थित झाला होता. फक्त मला एक चांगल्या कॉलेजची गरज होती म्हणून मी सरांची मदत घेण्याचे ठरवले. सरांनी माझ्यासाठी कॉलेज बद्दल चोकशी केली. सरांच्या म्हणण्यानुसार मी विज्ञान शाखेतून प्रवेश घ्यावे. त्यांनी तसे आईला बोलून ही दाखवले. माझ्या भविष्याचा विचार करून आईने हि होकार दिला.पण मला दुस-या गावामध्ये कॉलेजला जावं लागणार होत. आई मला घेऊन एकदा कॉलेज बघण्यासाठी गेली. आमच्या गावापासून अर्धातास अंतरावर कॉलेज होते. आईला तर कॉलेज आवडलेलं आणि फी तर आम्ही दोघी मिळून भरणार म्हणून त्याचं हि काही चिंता नव्हती पण आईला चिंता होती माझ्या येण्या जाण्याची! तिच्या डोक्यामध्ये जे चाललं होतं ते मी ओळखलं. आणि मीच पुढे होवून बोलले आई काळजी नको करूस, मी करेल सर्व व्यवस्थित! मैत्रिणी होतील ना, त्या असतील सोबत मला ! असं मी तिला आणि स्वतःला हि समजावत होते. मला आणि आईला ईतक माहित होत, मोठ होण्यासाठी हे सर्व सहन करावे लागेल. अडथळे तर येणारच, ते पार करावे लागणार!

शेवटी आई तयार झाली पण तिच्या मनात सुमाचा विषय अजूनही होता म्हणून ती माझ्या बाबतीत जास्त सावध असायची. पण आता शिक्षण आणि भविष्य या दोन गोष्टीसाठी आई तयार झाली होती. मी ही आनंदी होते पण आता नवीन जबाबदारी आली होती. माझ्या आणि आईच्या बचती मधून आम्ही माझं अॅडमिशन केलं. मी मराठी माध्यम मधून होते मग आता विज्ञान शाखेतून शिकणे मला कठीण जाणार होतं. बाकी विद्यार्थांसारखं मी क्लास लावू शकत नव्हते, ईतकी फी मला परवडली नसती. पण ज्या सरांनी मला मार्ग दाखवला होता त्यांनी मला मदतीची आस हि लावली होती.

मी पुन्हा सरांना भेटण्यासाठी गेले. क्लास नाहि लावला तर मला मदत लागणार म्हणून ! सरांना मदत करणार का ? हे विचारल्यावर सरांनी हास्यास्पद बघितले कारण त्यांच्यासाठी मी त्यांच्या मुली सारखी होते, ते नेहमी मला मदत करायला तयार असणारच आणि मी हे विचारलं ! सर म्हणाले मी स्वतः सर्व शिकवेल अजून काही मदत लागली तर आवर्जून कधीही माग. माझं सर्व मनावरचं ओझं हलकं झालं होत. माझं दोन दिवसांनी कॉलेज सुरू झाले. मी ज्यांना अर्धातास जाताना चालत गेले, सात वाजता कॉलेज मध्ये पहिला लेक्चर होता. सात ते बारा मध्ये तीन लेक्चर झाले. पहिलाच दिवस होता, मैत्रिणीची नावें सोडून काहिच समजल नव्हतं. पण बरं वाटलं होत कारण सर्व मुली आणि मुल चांगले होते आणि काही येण्या जाण्यासाठी सोबत होते. असं पहिला दिवस तरी उत्तम होता.

दुस-या दिवसापासून मी सकाळी पाच वाजता उठायचे, नंतर सात ते बारा कॉलेज मग एक वाजता मी सरांच्या घरी काम आणि अभ्यास दोन्ही करायचे, सर काम कमी आणि अभ्यास जास्त करून घेत असत नंतर चार ला दुस-या एका घरी काम करायला जायचे आणि शेवटी सर्व संपवून मी सहा वाजता घरी जात असे. थोडी आवरा आवर करून मी सात ला अभ्यास करायला बसत असे. कॉलेज मध्ये जे शिकवल होत ते सर्व आठवत नसे पण सरांनी शिकवलेल आठवायचं मग त्याचा सराव मी करायचे. आईला मदतीसाठी विचारायचे पण तिलाच आवडत नसे, ती अभ्यासच कर अस बोलायची. मग मी पण अजून लक्ष देऊन अभ्यास करायचे.

असं मी पूर्ण स्वतःला मग्न केलं होतं. मला कधी खेळावसं वाटत नव्हतं. मी खेळण, बागडणं कधीच विसरले होते. आता मला फक्त आईची परिस्थिति बदलायची होती आणि तिचे स्वप्न पूर्ण करायचे होते.मी सकाळी पाच ते रात्री दहा स्वतःला एकदम व्यस्त करून ठेवलं.

आता कठीण कठीण विषय समोर येत होते. काही कळत नव्हतं. शिक्षकांसोबत ओळख ही नव्हती म्हणून काही विचारायला भिती वाटायची, बाकीच्यांना सर्व कळत असेल आणि मी एकटीनेच विचारलं तर सर मला ओरडणार असं वाटायचं.या भितीमूळे मला अभ्यासाचा कंटाळा येत होता, मी अभ्यासापासून दूर चालले होते हे सर्व माझ्यातील बदल सर बघत होते. एकदा मी कॉलेज वरून सरांकडे कामासाठी गेले आणि कामच करत बसले. सर मला अभ्यास करण्यासाठी आवाज देत होते मी त्यांना टाळत होते हे त्यांना समजत होतं. ते माझ्या जवळ आले आणि विचारू लागले, " बाळा काय झालयं, आवाज का नाहि घेत, माझं काही चुकलं का ?" त्यांच ईतक प्रेमळ बोलण ऐकून मी रडायला लागले आणि मला अभ्यास नाहि करायचं, कॉलेजला नाहि जायचं अस बोलू लागले. सरांना हे सर्व बघून, ऐकून धक्का बसला. ते क्षणभरासाठी घाबरले त्यांना वाटलं संपल सर्व ! थोडा वेळ सर्व शांत होत. नंतर सरांनी मला पुन्हा विचारलं, नक्की काय कारण आहे ? मला आता सर्व सांगावं लागलं. मी सांगितले की "मला काही कळत नाही, सर्व डोक्याच्या वरून जातयं. शिक्षकांना दुसरे कोणी विचारत नाहि, मी कसं विचारणार ? याचा अर्थ मला एकटीलाच कळत नसेल '! सर हसायला लागले म्हणाले, ' ईतक्या छोट्याशा कारणाने तु सर्व सोडून देणार ? विसरलीस का जेव्हा आईला सर्व सोडून जावसं वाटत होते तेव्हा कोणासाठी थांबली असेल, आईने गाव कोणासाठी बदलला ? आई ईतके दिवसरात्र काम कोणासाठी करते आणि हे सर्व जाऊदे, आई नको बोलत असताना तिला समजावून दुस-या गावामध्ये कॉलेजला अॅडमिशन कोणी आणि का घेतले ? बस्स ! या सर्व प्रश्नांची उत्तर दे आणि तुझं काय ठरलयं ते सांग !' हे सर्व ऐकल्यावर मी खरचं शुध्दीवर आले होते. असं वाटलं कुठेतरी रस्ता भरकटले होते आता कोणीतरी पुन्हा योग्य मार्गावर आणून सोडलं.

मी सरांमध्ये माझे बाबा बघत होते, जर आज माझे बाबा असते तर कदाचित असे असते.मी सरांची माफी मागितली त्यांनी स्विकारली नाहि कारण त्यांच्यासाठी हि चुकी नव्हतीच. त्यांनी पुन्हा मला घरकाम बंद करायला लावले आणि आता फक्त कॉलेज आणि अभ्यास ईतकच करायच अस सांगितले. ते मला त्यांचा खुप वेळ देऊ लागले अस करून मी अकरावी कशीबशी उत्तीर्ण झाले. सरांनी बारावी सुद्धा मीच करून घेणार अशी ऑर्डर आईला दिली, आई सरांसमोर कधीच काही बोलायची नाहि, ती त्यांचा आदर करायची.आता मला हि विषयांची ओळख झाली होती, म्हणून लवकर कळत असे, तसेच आता कॉलेज मधील शिक्षक ही ओळखीचे झाले होते. मी त्यांची मदत घ्यायचे. मी स्वतःहून जास्त अभ्यास करायचे आता मला सोपे वाटू लागले. सरांनी ऑक्टोबर पर्यंतच सर्व धडे मला शिकवले आणि आता सर्व पाठांतर हि करायला लावले. माझा उत्साह आणि सरांची मेहनत वाढत जात होती. कधी डिसेंबर आला कळलचं नाहि. सर्व व्यवस्थित चालु होत त्यामध्येच मला ताप आला. आई मला डॉक्टर कडे घेवून गेली, त्यांनी काही औषधे दिली. मला थोड बर वाटलं. पण घरी आल्यावर ताप पुन्हा वाढला, मला थंडी लागत होती, चक्कर येत होती. आई आणि मदन दोघेही घाबरून गेले, मदनने लगेच सरांना बोलवलं. सर आले आणि मला पुन्हा डॉक्टर कडे घेवून गेले आता त्यांनी मला अॅडमिट केल. काही टेस्ट हि केल्या आणि त्यामध्ये आम्हाला समजलं की मला टाइफायड ताप आहे

.नीट होण्यासाठी दोन आठवडे तरी जाणार.आता आई आणि सर दोघेही चिंतेत कारण दोन आठवड्यानंतरच परीक्षा होती. मी अशी अंथरूणावर निपचित पडून काहीतरी बडबडत होते,शुद्ध ही नव्हती. आणि यांना शुध्द असून बेशुद्ध झाले होते, फक्त माझ्यामुळे !