kalachi choukat books and stories free download online pdf in Marathi

काळाची चौकट

"जिवंत नाही सोडणार मी त्याला." हॉस्पिटलच्या बेडवर बसून विजय ओरडत होता. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता, डोळ्यात आग पेटली होती, ओठ थरथरत होते आणि डोळ्यासमोर एकसारखे तेच दृश्य तरळत होते.

ओलाचिंब रस्ता, त्यावरून बेधडक आणि बेलगाम जाणारी एक लाल कार, रस्त्यावर जमा झालेली बघ्यांची गर्दी आणि रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली 'ती'.

आज सहा महिन्यानंतर तो कोमातून उठला आणि त्याने पहिलाच प्रश्न केला "मी कोण आहे ?" कितीही प्रयत्न केला तरी त्याला स्वतःबद्दल काहीच आठवेना. तो डोक्याला ताण देऊन भूतकाळात डोकावण्याचा प्रयत्न करू लागला आणि अचानक त्याला 'ते' दृश्य दिसले. त्याच्याच घरासमोर पडलेल्या त्याच्या बायकोचा तो निश्चल आणि दिनवाणा चेहरा अजूनही त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता. ते दृश्य आठवताच त्याच्या डोक्यात एक तीव्र कळ उठली आणी तो पुन्हा ओरडला. "जिवंत नाही सोडणार मी त्याला."

विजय खामकर. वय वर्षे ३२. एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ. Time and Space, Antimatter, Multiverse वर त्याने लिहलेले प्रबंध जगप्रसिद्ध होते. तरुण वयातच प्रतिष्टेचा Science Globe Award, Abel award, wolf award जिंकणारा, स्ट्रिंग थेअरीवर ग्राउंडब्रेकिंग रिसर्च करून वैज्ञानिक जगतात खळबळ माजवणारा, २०व्या वर्षीच पी.एच.डी . पूर्ण करणारा आणि अवघ्या १८व्या वर्षी इंग्लंडच्या एडिनबर्ग विद्यापीठात रिसर्च साठी निवडला गेलेला असा विजय खामकर एक अविश्वनीय प्रॉडिजी.

देवाच्या कृपेने त्याला प्रचंड बुद्धिमत्ता मिळाली होती. त्यावर त्याने घेतलेले कष्टही अपरिमित होते. शिवाय त्याची चिकाटी, जिद्द आणि ध्येय साध्य होत नाही तो पर्यंत अथक परिश्रम करण्याची तयारी या त्याच्या वृत्तीमुळेच तो आज एवढ्या उंचीवर येऊन पोहोचला होता. याच गुणांमुळे त्याच्या जीवनाचा आलेख एवढा भर भर वाढला होता.

पण या आलेखाची सुरवात मात्र खूपच खडतर होती. देवानं त्याला जेवढं भरभरून दिलं तेवढंच त्याच्याकडून हिरावूनही घेतलं. त्याचे वडील वारले तेव्हा तो अवघ्या ७ वर्षांचा होता. काकाने त्यांच्या वाटेच्या शेतावर आणि घरावर कब्जा केला. आईने या एकुलत्या एका मुलाला मोठ्या कष्टाने शिकवले. त्याच्या शिक्षणातली प्रगती बघून शिक्षकच त्याला मदत करु लागले. त्याने स्वतःनेही अनेक शिष्यवृत्ती मिळवून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवला आणि १८व्या वर्षीच एडिनबर्ग विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळवून तो इंग्लडमध्ये दाखल झाला आणि तिथूनच त्याच्या यशाचा आलेख खऱ्या अर्थाने चढू लागला.

वयाची एकवीशी ओलांडायच्या आतच त्याला सर्व काही मिळालं - प्रेम, पैसा, प्रसिद्धी. यातलं प्रेम तर २१च्याही खूप आधी मिळालं. 'प्रणिता' त्याच्या आयुष्यात आली तेव्हा तो फक्त १७वर्षांचा होता......तर ती १६ वर्षांची. दोघांची नजरानजर ऍडमिशनच्या लाईन मध्ये उभे असताना झाली. फरक फक्त्त एवढाच होता कि ती ११वी सायन्सच्या लाईनमध्ये उभी होती तर तो पोस्ट ग्रॅज्युएशनच्या. त्याची प्रचंड बुद्धिमत्ता पाहून शाळेने त्याला कायदेशीररित्या बढती दिली त्यामुळे ५वी नंतर डायरेक्ट ८वी मग १०वी, १२वी, एस. वाय. ,टी. वाय. अश्या उड्या घेत तो १७व्या वर्षीच MSc Physics च्या ऍडमिशन लाईन मध्ये पोहोचला होता.

दोघे फक्त एकच वर्ष सोबत होते पण त्या एका वर्षातच त्यांच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. पुढील शिक्षणासाठी तो इंग्लड मध्ये दाखल झाला आणि त्यांची सोबत तुटली. इतकी वर्षे तो इंग्लंडमध्ये राहिला पण त्या दोन व्यक्तींना तो कधीच विसरला नाही. एक म्हणजे त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी, त्याच्या सुख दुःखात त्याची साथ देणारी त्याची प्रेयसी 'प्रणिता' आणि दुसरी अर्थातच त्याची 'आई'.

भारतात परतल्यावर काही वर्षांनी त्याने प्रणिताला लग्नाची मागणी घातली. तिने अर्थातच होकार दिला. लग्नाची तारीख ठरली. सर्व तयारी सुरु झाली पण त्याच्या मनात काय आले काय माहित? लग्नाच्या दोन आठवडे अगोदर अचानक तो इंग्लडला निघून गेला. गेला तो गेलाच. २ वर्षानंतर भारतात परतला ते अँटी मॅटरचा प्रबंध घेऊनच. नंतर दोघांचं लग्न झालं. त्याच्या कुटुंबात आलेल्या या नव्या सभासदामुळे तो खुप आनंदात होता. त्याला प्रिय असणाऱ्या दोन्ही व्यक्ती आता त्याच्यासोबत होत्या. सर्वकाही सुरळीत चालू होतं. पण हा आनंद त्याला फारकाळ उपभोगता नाही आला. लग्न होऊन १ वर्षही उलटलं नव्हतं कि त्याची आई त्याला सोडून गेली.

आईचं दुःख पचवून तो पुन्हा संसाराला लागतो न लागतो तोच ऐके दिवशी विपरीत घडलं. कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेली प्रणिता घरातून बाहेर जात असताना अचानक कुठूनशी एक लाल कार आदळत, आपटत, पन्नास ठिकाणी धडकत आणि नागमोडी वळणं घेत आली आणि तिला फरफटत घेऊन गेली. सर्वात वाईट म्हणजे तिला फरफटत नेताना तो स्वतः डोळ्याने पाहत होता पण काहीच करू शकला नव्हता. त्या गाडीमुळे त्याच्याही डोक्याला जबर मार बसला होता. त्याने कारचा नंबर प्लेट पाहण्याचा प्रयत्न केला पण भोवळ येऊन पडण्यापूर्वी त्याला फक्त बेधडक जाणारी ती लाल कार, त्याच्याच घरासमोर पडलेली त्याची बायको आणि नंतर जमा झालेली बघ्यांची गर्दी एवढंच दिसलं.

कोमातून बाहेर आल्यावर त्याला एवढी एकच गोष्ट आठवत होती. हळू हळू त्याला स्वतःबद्दल एक एक गोष्ट आठवू लागली. स्वतःचाच अँटी मॅटरचा प्रबंध वाचून त्याला तो लिहीतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. कसं लग्नाच्या दोन आठवडे अगोदर तो इंग्लंड मध्ये आला होता आणि प्रणिताची आठवण येऊन तिची भेट घ्यायला वारंवार तो भारतात यायचा. हळू हळू त्याच्या इतर आठवणी ही जाग्या झाल्या. बऱ्याचश्या त्याला त्याच्या मित्रांनी सांगितल्या.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळून त्याला तीन महिने झाले होते तरी अजून तो पूर्ण स्थिरावला नव्हता. त्याचं कशातच मन लागत नव्हतं. त्याला प्रत्येकवेळी तेच दृश्य दिसायचं. रात्री अपरात्री अचानक उठून तो ओरडायचा "जिवंत नाही सोडणार मी त्याला".

ते दृश्य आठवताच त्याचं डोकं भडके. प्रणीताला उडवून न थांबताच गेलेल्या त्या कारवाल्याचा राग त्याच्या डोक्यात बसला होता. त्याच्या समोर आता एकच ध्येय होतं 'त्या कारवाल्याला पकडून त्याला शिक्षा करायची' . पण कसं ? ते त्याला समजेना. ही घटना घडली तेव्हा कॉलनीतला तो रस्ता तर अगदी सामसूम होता. त्या घटनेचे साक्षीदार फक्त दोघचं होते. एक 'ती' जी आता कधीच काही बोलू शकणार नव्हती. आणि एक 'तो' ज्याला कारच्या रंगापलीकडे काहीच आठवत नव्हतं. लोकांची गर्दी खूप उशीरा जमली. पोलिसांकडेही काहीच माहिती नव्हती. 'आता त्या नालायकाला शोधायचं कसं?' याच विचारात तो रात्र रात्र जागवू लागला. दिवसें दिवस त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती ढासळू लागली.

त्याची ही अवस्था राजेशला बघवत नव्हती. राजेश त्याचा कॉलेजमधला मित्र. कॉलेजमध्ये असताना खूप वैताग आला किंवा बोअर झाले की विजय आणि राजेश दोघंही राजेशच्या जुन्या हिरोहोंडा वरून दूर कुठेतरी भटकून यायचे. त्यांची ही सवय पुढेही तशीच चालू राहिली फक्त राजेशच्या हिरोहोंडा ऐवजी विजयची 'बी एम डब्ल्यू' एवढाच काय तो फरक पडला होता.

विजयला या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी राजेशने कोकणाचा बेत आखला जेणेकरून ३ -४ दिवस बाहेर जातील आणि विजयच्या डोक्यातील विचारांचं जळमट तरी निघून जाईल. तत्पूर्वी त्याने विजयच्या बी एम डब्ल्यू ला गॅरेज मधून नीटनेटकी करून घेतली. गेल्या ९ -१० महिन्यांपासून बिचारीने फक्त कावळ्या चिमण्यांनी टपावर केलेली कला कुसरच बघितली होती. राजेशने तिला रंगरंगोटी करून एकदम चकचकीत नव्यासारखी करून घेतली.

त्या चार दिवसांच्या ट्रिपने विजय वर थोडा फरक पडला पण फक्त काही दिवसांपुरताच. आठवडाभरानंतर तो पुन्हा त्याच विचारात डुंबून गेला. ते द्रुश्य आणि बदला घ्यायचा विचार त्याला सतावू लागले.

एके दिवशी विजयच्या डोक्यातलं काहूर खूपच वाढलं आणि त्यातून सुटका करण्यासाठी त्याने एकट्यानेच बाहेर ड्रायव्हिंगला जायचा विचार केला. त्याने गॅरेजचा दरवाजा उघडला. समोर त्याची प्रिय पांढरी बी. एम. डब्ल्यू. उभी होती. कारचा दरवाजा उघडून तो ड्रायव्हींग सीटवर बसला. तब्बल ९ महिन्यांनंतर तो ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. कोकणांत सगळीकडे राजेशनेच ड्रायव्हिंग केले होते. त्याने हलकेच स्टेअरिंगवरून हात फिरवला. त्याला थोडे वेगळेच वाटू लागले. ड्रायव्हिंगसाठी निघाला होता खरा पण त्याला आता बाहेर जाउशी वाटेना. सीटवर डोकं ठेऊन तो आपल्याच विचारात गुंग झाला. पाहता पाहता त्याला झोप लागली. आणि झोपेतच त्याचं मन भूतकाळात चक्कर मारून आलं.

"शक्यच नाही."
"का?"
"काळ तुला असे करूच देणार नाही. ती चौकट कोणी मोडूच शकणार नाही."
"का नाही?" विजय थोडा वैतागलेलाच होता, "आणि एक मिनिट. कसली चौकट?"
"काळाची चौकट." आपल्या शब्दावर जोर देत प्रणिता म्हणाली, "प्रत्येक गोष्टीला काही नियम असतात. काळाचेही स्वतःचे काही नियम आहेत. तीच काळाची चौकट ."
"तू एका वैज्ञानिकाला काळाचे नियम शिकवत आहेस?"
"हो." आपलं हसू दाबत ती म्हणाली, "कारण तू फक्त भौतिकद्रुष्ट्याच याचा विचार करत आहेस."
"माझ्या मते काळ हे भौतिकशास्त्रातच मोडतं. त्याचा विचार भौतिकदृष्ट्याच करावा लागेल.....की आणखीन नवीन कोणतं शास्त्र शोधून काढलस तू?". त्याच्या या टोमण्यावरून तो आता वैतागलाय हे प्रणिताला समजलं. आणि तिला आणखीन हसू आलं. तरी तिने आपला मुद्दा सोडला नाही.
"नवीन नाही …पण एक शास्त्र आहे".
"कोणतं?" विजयने उत्सुकतेने विचारलं.
"अध्यात्म.... तु जर या बाजूनेही विचार केलास तर कदाचित तुला काळाची चौकट समजू शकेल."
अध्यात्माचा विषय आल्यावर विजय चिडला. तो अगदीच नास्तिक नव्हता पण देवावर त्याचा फारसा विश्वास नव्हता.
त्याला असं चिडलेला पाहून तिला आणखीनच हसू येत होतं.

त्यांची नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायची. इनफॅक्ट, चर्चा कमी अन वाद विवादच जास्त व्हायचा. आणि असा वाद सुरु झाला की तास तासभर तो चालायचा. आज त्यांच्या वादाचा विषय होता 'ग्रँडफादर पॅराडॉक्स'.
ग्रँडफादर पॅराडॉक्स वैज्ञानिक जगतातील एक अनाकलनीय तर्क आहे. समजा एखादा व्यक्ती टाईम ट्रॅव्हल करून जर भूतकाळात गेला. आणि त्याने आपल्या आजोबांना त्यांचा जन्म झाल्या झाल्या मारले तर काय होईल?
जर त्या व्यक्तीच्या आजोबांचा मृत्यू जन्मल्यावर लगेचच झाला तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या वडिलांचाही जन्म झाला नाही. आणी वडीलांचा जन्म झाला नाही याचा अर्थ त्याचाही जन्म झाला नाही. आता जो जन्मलाच नाही तो टाईम ट्रॅव्हल करून भूतकाळात कसा जाणार? आणि आपल्याच आजोबांना कसा मारणार? या दोन परस्पर विरोधी घटनांचा मेळ बसत नव्हता, याच विषयावर त्यांच्यात वाद चालू होता तर त्याची बायको म्हणते हे शक्य नाही..... काळ असं होऊच देणार नाही.

एम. फिल. एस्ट्रोफिजिक्स असलेली प्रणिता जेव्हा निसर्ग, अध्यात्म, देव असल्या विषयांवर बोलायची त्यावेळेस त्याला तिचा राग यायचा. दैव किंवा नशीब यापेक्षा तो स्वतःच्या कर्तुत्वाला जास्त महत्व द्यायचा. आणि याच शब्दांचा वापर प्रणिता कुठेना कुठे प्रत्येकवेळेस करायचीच. आताही ती बोलत होती कि "काळाची चौकट कोणी मोडूच शकत नाही. जर कोणी प्रयत्न केला तर काळ त्यालाच आपल्या चौकटीत सामावून घेईल."

तिच्या या असल्या कल्पनांना कसा छेद देता येईल याचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. नुसता वाद विवाद करून हे होणं शक्य नव्हतं त्यासाठी काहीतरी चमत्कारच करणं जरुरीचं होत. आणि अचानक त्याच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. जर time travel खरंच शक्य झालं तर आपण याच वेळेस इथंच प्रगट होऊ आणि त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे आणि पराभवाचे भाव आपण टिपू. कदाचित त्याच वेळेस तिच्या डोक्यातून या कल्पना निघून जातील. अशी कल्पना त्याच्या मनात आली पण ती त्याने लगेचच झटकून टाकली. स्वप्नांच्या दुनियेत वावरणाऱ्यांपैकी तो नव्हताच तर ती सत्यात उतरवण्यावर त्याचा भर असायचा.
त्याने पुन्हा आपलं लक्ष चर्चेकडे वळवलं आणि तो म्हणाला, "तुला खरंच असे वाटते कि असल्या काही कल्पना प्रत्यक्षात असतील म्हणून." त्याच्या बोलण्यातून त्याची नाराजी उघड दिसत होती. आणि ते पाहून प्रणिता आणखीच हसू लागली. नेहमी त्याच्या प्रत्येक प्रश्नाला आपल्या कल्पकतेने प्रत्युत्तर करणारी ती आज नुसती हसतच होती. शेवटी तो म्हणालाच, "नक्की काय झालय तुला? सकाळपासून नुसती हसतच आहेस.
यावर ती पुन्हा खळखळून हसली आणि लाडिक होत त्याच्या जवळ येऊन म्हणाली, "आता तो paradox राहू दे आणि तुझ्या paradox चा विचार कर."
"म्हणजे?"
"म्हणजे तुझ्या नोट्सच्या चिंध्या करायला तुझा स्वतःचा paradox येत आहे."
"म्हणजे?" विजय आणखीच बुचकळ्यात पडला. मोठी मोठी गणितं चुटकीत सोडवणारा तो, त्याला या कोड्याचं काही उलगडा होईना. तो पुन्हा म्हणाला, "अगं काय बोलतेयस नीट सांग ना जरा."
"अरे वेड्या" आणखीन लाडात येऊन ती म्हणाली, "आता आपल्या दोघात तिसरा येणार आहे. तु बाप बनणार आहेस."

दोन क्षण विजय शांतच बसला. ती अचानक असा काहीतरी बॉम्ब टाकेल याची त्याने कल्पनाच केली नव्हती. आणि अचानक करंट लागल्यासारखा तो उठला आणि घरभर नाचत सुटला. त्याने तिला जवळ ओढून घेतले आणि कडकडून मिठी मारली.
"कधी कळलं हे."
"आज सकाळीच."
"यु.... हु ...." तो जोरात ओरडत म्हणाला, "आज पूर्ण दिवस आपण सेलिब्रेट करायचं."
"अरे पण आत्ता ११ वाजता माझं लेक्चर आहे."
"ते काही नाही. आज पूर्ण दिवस काहीच काम करायचं नाही."

त्याचा मूड ऑफ करायला तिचं मन होईना, तिनेही लगेच होकार दिला. इतक्यात जोरात गारांसह पाऊस सुरु झाला. त्याची प्रिय बी एम डब्ल्यू बाहेर रस्त्यावरच उभी होती. हातातली नोट्सची डायरी बंद करून तो गाडी गॅरेज मध्ये लावण्यासाठी उठला पण ती म्हटली, "थांब. मी लावते. माझी scooty पण आत लावायची आहे. तू तुझं काम कर." असं म्हणून ती दोन्ही गाड्यांच्या चाव्या घेऊन बाहेर गेली पण अचानक कुठूनशी ती दळभद्री गाडी आली आणि तिला फरफटत घेऊन गेली.

"पॉम ...... " अचानक झालेल्या आवाजामुळे त्याची तंद्री भंग पावली. झोपेत त्याचं डोकं स्टिअरिंग वर पडलं होतं.
या आठवणीने तो आणखीनच बेचैन झाला. त्या कारवाल्याचा राग तर शतपटीने वाढला. शिवाय तो स्वतःवरही चिडला. "तिच्या ऐवजी मी का नाही गेलो गाडी लावायला. का जाऊ दिलं मी तिला." असं म्हणून त्याने रागानेच डाव्या हाताची मूठ डॅशबोर्डवर आपटली त्यासरशी ग्लोव्जबॉक्स उघडला गेला. त्यानं रागानेच आपटून तो बंद केला पण त्याचं लॉक सिस्टम कमजोर झाल्याने ते पुन्हा उघडलं आणि त्यातून एक हिरव्या रंगाची डायरी बाजूच्या सीटवर पडली. ती डायरी त्याने उघडून पाहिली. आत नाव वगैरे काहीच नव्हतं आणि त्यात बरीच आकडेमोड केलेली होती त्याने २-३ पाने उलटली आणि आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले. त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं, " हे खरंच शक्य आहे का?" त्याने स्वतःलाच विचारले.

त्याने फटकन ती डायरी खिशात टाकली आणि आपली रूम गाठली. आणि ती व्यवस्थित वाचण्यास सुरवात केली. प्रत्येक पानागणिक त्याचा विश्वास वाढू लागला. डायरीतील गोष्ट जर खरी ठरली तर त्याची सगळी दुनियाच बदलणार होती. सगळी दुःखं सुखात पालटणार होती. सगळी दुनिया त्याच्या पायाशी लोळण घेणार होती. आणि का नाही घेणार? कारण त्या डायरीत टाइम मशीनचा फॉर्मुला होता.

पुढील आठवडाभर त्याने त्या डायरीतील एकूण एक ओळ तपासून पाहिली. प्रत्येक गोष्ट १० -१० वेळा चेक करून पहिली. खरंच तो फॉर्मुला परफेक्टली लॉजिकल होता.
कशातच काहीच चूक वाटत नव्हती. त्या डायरीच्या सहाय्याने टाइम मशीन बनवणे शक्य वाटत होते. फक्त हे प्रत्यक्ष करून पाहणे तेवढे बाकी होते. आणि त्यासाठी खूप पैशांची आवश्यकता होती. पैशांसाठी काय करावं? या विचारात असतानाच त्याच्या डोक्यात प्रश्न आला आणि चमकून तो स्वतःशीच म्हणाला, "एक मिनिट, पण ही डायरी आहे कोणाची?" डायरी सापडल्यापासून तो इतका भारावून गेला होता कि या गोष्टीचा विचारच त्याला शिवला नव्हता.

त्याने आठवण्याचा प्रयत्न करून पहिला पण डायरी संदर्भात त्याला काहीच आठवेना. त्याने स्वतःचे आणि डायरीतील अक्षर जुळवून पहिले. त्याचं अक्षर सुंदर आणि सुटसुटीत होते. तर डायरीतले अक्षर एकदम गचाळ आणि गिचमिड होतं. हे अक्षर कुणाचं असावं तो विचारातच होता कि त्याला अचानक राजेशची आठवण झाली. राजेशचं अक्षर खरंच गचाळ होतं. शिवाय त्याला डायरी लिहायचीही सवय होती. राजेशच्या घरी सेम असल्याच अनेक डायऱ्या असल्याचं त्याने पाहिलं होतं. राजेश सुद्धा एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होता. विजयच्या मनात कडीला कडी गुंफत गेली आणि सर्व कहाणी त्याच्या समोर उलगडत गेली.
"तरीच संपूर्ण कोकण ट्रीपमध्ये राजेश फक्त टाइम अँड स्पेस च्या प्रबंधाविषयीच गप्पा मारत होता. "तो स्वतःशीच म्हणाला त्याला खात्री पटली कि हा फॉर्मुला राजेशचाच आहे. पण आता तो त्याच्या हाती लागला होता.

"सॉरी राजेश. मला तुझं श्रेय चोरायचं नाही पण मला आता या डायरीची खूप गरज आहे. माझ्या आयुष्यात झालेली एक चूक मला सुधारायाची आहे. त्यानंतर तो फॉर्मुला मी जसाच्या तसा तुझ्या हवाली करेन." विजय स्वतःशीच बोलत होता. त्याने टाइम मशीन बनवण्याचं पक्के केले.

सगळ्यात प्रथम त्याला गरज होती भरपूर पैशांची. त्याच्याकडं बक्कळ पैसा होता. पण तोही अपुरा पडत होता. त्याने सर्व महागड्या वस्तू , मौल्यवान पेंटिंग्स विकुन पैसे जोडले, तरीही अजून पैसे कमीच पडत होते शेवटी त्याने त्याचा राहता बंगला विकला. त्याबदल्यात त्याला बरेच पैसे मिळाले. आता तो त्याच्या प्रोजेक्टवर काम करू शकत होता.
या प्रोजेक्ट मध्ये सक्सेस किती मिळेल याची त्याला काहीच खात्री नव्हती. तो फक्त अंधारात एक उडी मारत होता. उडी व्यवस्थित बसली तर सर्वच आनंदी आनंद होणार होता. नाहीतर तो बरबाद होणार होता.

त्याने बंगला विकला पण एका अटीवर कि त्या बंगल्यात काही महिने तोच राहणार. असं करण्यामागे दोन कारणे होती. एक म्हणजे या प्रोजेक्ट साठी त्याला भरपूर जागा लागणार होती. आणि दुसरं राजेशला कोणताही सुगावा लागू नये म्हणून. त्यानं सर्व वस्तू विकल्या असल्या तरी त्याची प्रिय पांढरी बी एम डब्ल्यू अजूनही त्याच्याच मालकीची होती. प्रोजेक्ट साठी त्याला तिची गरज होती. हिच बी एम डब्ल्यू त्याचा पूर्ण भूतकाळ बदलणार होती.

त्याने सर्व तयारी केली. बॅकयार्ड मध्ये तो रात्रं दिवस या प्रोजेक्ट वर काम करू लागला. सर्व प्रथम त्याने जेट इंजिन आणि टर्बो खरेदी केले. आणि ते बी.एम.डब्ल्यू. च्या टपावर फिक्स केले. जेट इंजिनच्या खाली, टपाच्या दोन्ही बाजूला कोलॅप्सेबल विंग्स अटॅच केले. टर्बोच्या मागच्या बाजूला इन्फ्रा लाईट बीमर फिक्स केले. संपूर्ण डॅश बोर्ड बदलून त्यावर टचस्क्रीन्स लावले. जुनं स्टेअरींग बदलून त्याऐवजी छोटं पण पॉवरफुल स्टेअरींग अटॅच केलं त्याच्या शेजारी सुपर कंसोल जोडले.

पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 'डायमेन्शन अल्टरनेटर'. जे त्याने फॉर्म्युलाचा वापर करून बनवले होते. हेच ते यंत्र होते जे त्याला भूतकाळात घेउन जाणार होते. मानव त्रिमितीय सृष्टीत राहतो तर काळ म्हणजे चौथी मिती, जी आपण अनुभव तर करतो पण तिला बदलू शकत नाही. ५व्या किंवा त्यापुढील कोणत्याही मितितील जीव मात्र काळामध्ये मागे पुढे जाऊ शकतो, त्याला बदलू शकतो. 'डायमेन्शन अल्टरनेटर' याच तत्वावर काम करत होते. डायमेन्शन अल्टरनेटर त्याला ५व्या मितीत घेउन जाणार होते. मग ५व्या मितितुन तो भूतकाळात मागे जाणार होता. काळामध्ये हव्या त्या ठिकाणी पोहोचल्यावर तो पुन्हा आपल्या त्रिमितीय सृष्टीत परतणार होता. त्या ५ फूट बाय २ फुटांच्या नळकांड्याने त्याच्या कारची मागची पूर्ण सीट अडवली होती.

तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर अखेर त्याची बी.एम.डब्ल्यू टाइम मशीन मध्ये रुपातंरित झाली. आता फक्त ती काम करते कि नाही एवढंच चेक करायचं होतं. राजेश इंग्लडला गेल्यामुळे त्याला सर्व काम बिनबोभाट पूर्ण करता आलं. त्याची टाईम मशीन कम फ्लायिंग कार तिच्या पहिल्या टेस्टसाठी एकदम सज्ज होती. तिला टेस्ट करायची विजयला खूप घाई झाली होती, तरीही विजय चार दिवस थांबला. कारण चार दिवसांनी राजेश भारतात परतणार होता. त्याला न भेटताच जाणे विजयला थोडं कृतघ्न पणाचं वाटलं. राजेशमुळेच तर हे शक्य झाले होते. त्याला एकदा थँक्स म्हणून मगच तो निघणार होता. शिवाय न जाणो आपण पुन्हा राजेशला केव्हा भेटू? भेटू कि नाही?

तो भूतकाळात जाण्यासाठी अधीर झाला होता. ते चार दिवस त्याला चार वर्षांसारखे भासत होते. अखेर तो दिवस उजाडला आणि राजेश त्याच्या घरी परतला. राजेश घरी पोहोचतो न पोहोचतो तोच विजय दारात हजर. त्याला पाहून राजेश जरा चपापलाच, इतक्या लवकर विजय त्याला भेटायला येईल याची त्याला कल्पना नव्हती. त्याला पाहताच राजेश म्हणाला, "अरे विजय, तुझ्यासाठी मी एक खास गिफ्ट आणलीये इंग्लडलवरून". विजयला सध्या तरी कोणत्याच गिफ्ट मध्ये इंटरेस्ट नव्हता. त्याला लवकरात लवकर घरी पोहोचून आपल्या कारमध्ये शिरायचं होतं.

राजेशने आपल्या बॅगेमधून एक पिशवी काढून त्यातून एक डायरी काढली. तो डायरी घेऊन विजयकडे येतच होता कि त्याचा हात लागून ती पिशवी पडली. त्यातून ४-५ डायऱ्या जमिनीवर पडल्या, सर्व डायर्‍या एकसारख्याच हिरव्या रंगाच्या होत्या. त्याची रोजनिशी तर विजयच्याच समोर उपडी होऊन पडली. ती झटकन बंद करत राजेशने सगळ्या डायऱ्या बॅगेत ठेऊन दिल्या आणि तसलीच एक डायरी विजयच्या हातात ठेवत तो म्हणाला, "डॉकटर स्टीफन हॉकिंग्स यांच्या एका अनपब्लिश्ड रिसर्चचे हे काही नोट्स आहेत. तू इंग्लडला नाही येऊ शकला म्हणून मी खास तुझ्यासाठी ही आणली आहे. 'time and space' तुझा आवडता विषय. यावरच हा रिसर्च होता. एकदा बघ तुला खूप फायदा होईल. "
"थँक्स."
"त्यात कसलं आलय थँक्स एक डायरीच तर आहे."
विजय खरतर दुसऱ्याच डायरीबद्दल थँक्स म्हणाला होता. पण हे सध्यातरी तो राजेशला सांगू शकत नव्हता. राजेश विजयला बसण्यास सांगून फ्रेश व्हायला गेला. विजय लागलीच मागे फिरला.

घरी गेल्या गेल्या तो बीएमडब्ल्यू मध्ये शिरला. त्याने ती कार शहरापासून थोडी दूर एका सुमसान रोडवर आणली. तो एक ब्रिटिश कालीन ब्रिज होता. तो ब्रिज खचला म्हणून सरकारने त्याच्या शेजारीच नवा ब्रिज बांधला होता. आणि जुना ब्रिज रहदारीसाठी बंद केला होता. आधीच हेरून ठेवलेल्या त्या ब्रिजवर विजयने गाडी उभी केली. दोन क्षणासाठी तो थांबला मग गाडीची चावी फिरवली गिअर बदलला आणि अक्सिलेटरवर पाय दिला त्यासरशी ती गाडी धुराचं एक लोट सोडत स्टार्ट झाली. जेट इंजिनचं वजन कदाचीत तिला पेलवत नसावं. गाडी हळू हळू वेग पकडू लागली, थोड्याच वेळात तिने २००चा स्पीड पकडला. आता तो ब्रिज संपणार इतक्यात विजयने विंग्स ओपन केले, बिमर स्टार्ट केला. त्यासरशी त्याची कार हवेत झेपावली. त्याची नजर आता टाइमरवर होती. भूतकाळात जाऊन तो काहीही करू शकत होता. सर्व गोष्टी त्याला हव्या तश्या बदलू शकत होता. संपूर्ण इतिहासच बदलू शकत होता. "आईन्स्टाईन, न्यूटन यांच्या ऐवजी स्वतःचं नाव लावू शकत होता. पण त्याने स्वतःशीच प्रामाणिक राहायचा निश्चय केला. भूतकाळात जाऊन फक्त एकच गोष्ट बदलायची, प्रणीताचा जीव वाचवायचा आणि त्या लाल कार वाल्याला बदड बदड बदडायचा. बास मग तो या टाइम मशीनचा वापर पुन्हा करणार नव्हता. मनात हा विचार पक्का करून त्याने टाइमरवर तारीख टाकली - ०१ जुलै २०१५ आणि वेळ टाकली सकाळी १० वाजताची. प्रणिताचं लेक्चर ११ वाजता होतं म्हणजे ही घटना १०. ३० च्या आसपास घडलेली असणार. त्याने टायमर सेट केला आणि बोट ON बटनावर ठेवलं. त्याला थोडं घाबरल्यासाखं वाटत होतं. त्याच्या ३ महिन्याच्या मेहनतीचं फळ, त्याचं सर्वस पणाला लावण्याचं फळ त्या एका बटनावर डिपेंड होतं. त्यानं त्याच्याच नकळत देवाचे नाव घेतले आणि बटन दाबले त्यासरशी कार जवळपास प्रकाशाच्या वेगाने उडू लागली, आणि तो खऱ्या अर्थाने टाइम ट्रॅव्हल करू लागला. प्रकाशाच्या वेगाने उडत असूनही त्याची कार एकाच जागी स्थिर होती, कारण त्याचा प्रवास स्थळातून नाही तर काळातून होत होता. पृथ्वीवर सर्व क्रिया त्याला उलट होताना दिसू लागल्या. पिकांनी भरलेली शेतं कमी कमी होऊन पुन्हा शेती नांगरलेल्या अवस्थेत दिसू लागली. झाडं झुडपं लहान लहान होत चालली. नदी उलटी वाहताना दिसू लागली. या गोष्टींचा निदान त्याला बोध तरी होत होता. बारीक सारीक गोष्टी किंवा सामान्य जीवन तर अजिबातच दिसत नव्हतं. कसं दिसणार? दर १०-१२ सेकंदाला एक दिवस या वेगाने तो मागे चालला होता. काही समजायच्या आतच सर्व घटना डोळ्यासमोरून झर्रकन निघून जात होत्या.

त्याने टाइमरवर एक नजर टाकली आणि तो चपापला, "काय योगयोगाची गोष्ट आहे. याकडं माझं लक्षचं नव्हतं." तो स्वतःशीच म्हणाला. त्याला जिथे जायचं होतं ती तारीख होती ०१/०७/२०१५, १०.०० am आणि आताची तारीख होती ०१/०७/२०१६, १०.०० am. या योगायोगाचं त्याला थोडं आश्चर्य वाटलं आणि तो पुन्हा चपापला आपण कधी पासून दैव आणि योगायोग असले शब्द वापरायला लागलो. खरंच सगळं विचित्र वाटत होतं.

त्याने हातातल्या घड्याळावर नजर टाकली टाइम ट्रॅव्हल सुरु करून त्याला फक्त अर्धा तास झाला होता. अजून साधारण तेवढाच वेळ लागणार होता. प्रचंड वेगाने जात असल्याने त्याची कार जबरदस्त व्हायब्रेट होत होती. घड्याळातली वेळ पाहतानाही त्याला मुश्किल पडत होतं.

अचानक त्याला राजेशने दिलेल्या गिफ्टची आठवण झाली. तसा त्या गिफ्टचं त्याला आता काहीच उपयोग नव्हता. पण आहे काय त्यात ते तरी बघावं म्हणून त्याने कोटाच्या खिशातली डायरी बाहेर काढली आणि उघडली. पाहिलं पान, दुसरं पान, तिसरं पान ...... पाहतो तर सगळी डायरी कोरीच. राजेशने चुकून नोट्सच्या डायरी ऐवजी कोरीच डायरी त्याला दिली होती. स्वतःशीच हसत त्याने ती डायरी ठेवण्यासाठी ग्लोव्हज बॉक्स उघडला तर त्याला आतमध्ये जुनी 'टाइम मशीनचा' फॉर्मुला असलेली डायरी दिसली. त्याने ती डायरी उचलली पण गेल्या तीन महिन्यात तिचे एवढे हाल झाले होते, एवढ्या वेळा ती वापरली गेली होती कि तिचं एक एक पान सुटं होऊन गळायला लागलं होती. बरीचशी पानं फाटायला आली होती. हि खरंतर राजेशची अमानत आहे आणि ती त्याला जशीच्या तशी परत मिळायला पाहीजे. एकही पान फाटून किंवा त्यातला फॉर्म्युला हरवून चालणार नाही.
'आता काय करावं?' तो विचारात पडला. त्याने घड्याळाकडे नजर टाकली. अजून त्याला पोहोचायला २५मिनिटे बाकी होती. त्याने लगेचच ती जुनी डायरी मांडीवर ठेवली, खिशातला पेन काढला आणि त्या जुन्या डायरीतील फॉर्मुला या नव्या कोऱ्या डायरीत उतरवून घेऊ लागला.
टाइम मशीन प्रचंड हादरे देत होती तरीही जमेल तशी लिहून त्याने ती पूर्ण केली. अक्षर अतिशय गचाळ आलं होतं पण कमीत कमी आता त्याचा वापर तरी करता आला असता आणि तीच महत्वाची गोष्ट होती. त्याने ग्लोव्ज बॉक्स उघडला आणि नवी डायरी तिथे ठेऊन दिली तर जुनी डायरी कोटाच्या खिशात टाकली. इतक्यात टाइमरवर बीप बीप वाजू लागले. तो त्याच्या गंतव्य स्थानी पोहोचला होता. त्याने खिडकीतुन बाहेर नजर टाकली. आकाशात काळे ढग दाटून आले होते. हवेत चांगलाच गारवा होता. बाहेर थोडं अंधारून आल्यासारखं झालं होतं. तो काळात एक वर्ष मागे आला होता पण अजूनही त्याच ब्रिज वर होता. त्याने गाडी त्याच्या घराच्या दिशेने वळवली. त्याला त्याचं डोकं जरा जड जड वाटू लागलं. छातीवर दाब दिल्यासारखा आणि चक्कर आल्यासारखी वाटत होती. वातावरणाचा परिणाम कि टाइम मशीनच्या वेगाचा कि आणखीन काही कोण जाणे. त्याला अस्वस्थ वाटत होतं. पण आता वेळ दवडून चालणार नव्हतं त्याला लवकरात लवकर त्याच्या घरापाशी पोहोचायचं होतं. त्याने गाडीचा वेग वाढवला. कार त्याच्या कॉलनीजवळ आली. दुर्बिणीतून त्याला त्याचं घर दिसत होतं. घरासमोर रस्त्यावर लावलेली त्याची पांढरी बीएमडब्ल्यू स्पष्ट दिसत होती. त्याच वेळेस तो मागच्या रस्त्यावर पण लक्ष ठेवून होता.
त्याने आता उंची कमी केली पण भरकन खाली आल्याने त्याला गरगरल्यासारखे वाटू लागले, कान तर जवळ जवळ बंदच झाले होते. त्याने वेग कमी केला आणि हळू हळू खाली उतरू लागला. त्याच वेळेस विजेचा गडगडाट होऊन पाऊस सुरु झाला. कारच्या टपावर जोरात काहीतरी आदळल्यासाखं आवाज येऊ लागला. जणू कोणी तरी त्याच्या गाडीची मोडतोड करतोय. "गारांचा आवाज एवढा मोठा?" त्याला आश्चर्य वाटले. काय होतंय ते त्याला कळेना त्याचं डोकं तर आता खूपच चढलं आणि त्याला गरगरल्या सारखं व्हायला लागलं.

तो दोन्ही हातांनी डोकं घट्ट धरून डोकं स्थिर करण्याच्या प्रयत्न करत होता. त्याचवेळेस त्याची नजर रस्त्यावर उभ्या असलेल्या त्याच्या बी.एम.डब्ल्यू वर गेली. त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.हे खरंच आहे कि भास? रस्त्यावरची त्याची कार हळूहळू हवेत विरून चालली होती जणू काही धुळीचीच बनलेली होती. त्याला प्रणिताचे शब्द आठवले "काळाची चौकट". ती म्हणालीच होती, "काळाची चौकट कुणी मोडूच शकत नाही. जर कुणी तसा प्रयत्न केला तर काळ त्यालाच आपल्या चौकटीत सामावून घेईल". किती करेक्ट बोलली होती ती. खरंच त्याची भूतकाळातली बी.एम.डब्ल्यू त्याच्या भविष्यकाळातल्या बी.एम.डब्ल्यू मध्ये विलीन होत होती. त्याच्या रूमच्या दिशेनेही थोडी धूळ उडत येऊन त्याच्या कोटाच्या आत गेली. कोटाच्या खिशात त्याने हात घातला तर त्याच्या हाताला टाइम मशीनच्या फॉर्म्युलाची जुनी डायरी लागली. भूतकाळातली डायरी भविष्यकाळातल्या डायरीत विलीन झाली होती. "पण ....ही... तर ....राजेशची डायरी..." आणि त्याचवेळेस त्याला आठवले. ती डायरी राजेशची नव्हतीच ती त्याची स्वतःचीच डायरी होती. तो टाइम मशीनचा फॉर्मुला त्याचा स्वतःचाच होता. प्रणिता गाडी लावण्यासाठी खाली गेली त्याचवेळेस त्याने डायरीत अखेरची ओळ लिहून ती पूर्ण केली होती. या फॉर्मुलाचा वापर करून आपण टाइम मशीन बनवून याच वेळेस इथं प्रगट व्हायचं आणि प्रणिताचं 'काळाची चौकट', 'दैव', 'योगायोग' असल्या खुळचट कल्पना पुराव्यासकट खोडून काढायचं असं त्यानं त्या वेळेस योजलं होतं. पण तिचंच म्हणणं किती योग्य होतं याची त्याला आता प्रचिती येत होती. भूतकाळातल्या सर्व वस्तू त्यांच्या भविष्यकाळातल्या प्रतिरूपात विलीन होत होत्या. आधी गाडी मग डायरी....


"एक मिनिट...." विजय स्वतःशीच बोलला. त्याने घाई घाईने दुर्बिणीतून त्याच्या रूममध्ये पाहिलं. त्याचा संशय खरा ठरला. प्रणिता गाडी लावण्यासाठी खाली गेली त्यावेळेस तो खिडकी शेजारच्या टेबलवर डायरी वाचत बसला होता. आता तिथे फक्त धुळीसारखं काहीतरी होतं जे त्याच्याच दिशेने उडत येत होते. भूतकाळातील 'तो' भविष्यकाळातल्या 'त्याच्या' मध्ये विरून चालला होता. म्हणूनच त्याला अस्वस्थ आणि जड जड वाटत होतं. त्याला सर्व उलगडा झाला.

त्याने आसपास नजर टाकली. प्रणिता गेट उघडून बाहेर आली होती. त्याने मागच्या काचेतून पहिले तर एक लालसर गाडी त्याच्या घराच्याच दिशेकडे येत होती. भीतीची एक लहर सरसर करत त्याच्या अंगातून गेली. एवढ्या जवळ येऊन तिला परत गमावायचं नव्हतं. त्या लाल गाडीच्या आधी त्याला प्रणितापाशी पोहोचायचं होतं. त्याने गाडीचा वेग वाढवण्यासाठी ऍक्सिलरेटर वर पाय दिला. गाडी गचका देऊन काहीच मीटर पुढं गेली आणि अचानक खाली येऊ लागली. काय होतंय ते त्याला कळेना, गाडी का अचानक खाली येतेय? त्याने त्याच्या सुपर कन्सोल वर नजर टाकली तर सुपर कन्सोलच गायब होता. त्याच्या ऐवजी जुनी डॅशबोर्ड आणि जुनंच स्टिअरिंग होतं. भूतकाळातली गाडी भविष्यकाळातल्या गाडीत नुसतीच विलीन नव्हती झाली तर तिने तिचे मूळ रूप धारण केलं होत. ज्यामुळे गाडीवर बसवलेले विंग्स, टर्बो, आणि सर्व मॉडिफिकेशन गायब झाले होते. गाडी वेगाने खाली येत होती. काय होतंय ते त्याला समजेना. डोक्यात जबरदस्त कळ येऊ लागली होती. आत्ता दोन क्षणापुर्वी मी टेबलवर बसलो होतो आणि अचानक हे कुठं आलो? कसा आलो? त्याला काहीच कळेना. त्याच्या भविष्यकाळातल्या स्मृतीही विरून त्यांची जागा भूतकाळातल्या स्मृतींनी घेतली होती. गाडी वेगाने खाली येत होती. खाली एका बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. तिथे आधारासाठी लावलेले बांबूचे खांब तोडत गाडी मातीच्या ढिगावर पडली. नशीब एवढंच कि त्यावेळेस तिथे कोणीही कामगार नव्हते. एवढ्या उंचावरून पडून सुद्धा गाडी चालूच होती. त्याने ब्रेक मारायचा प्रयत्न केला पण ब्रेक काही काम करत नव्हते. समोर येईल ते उडवत गाडी चालली होती. त्याने भरभर स्टिअरिंग डावीकडे उजवीकडे फिरवले तरी सुद्धा गाडी सिमेंटची पोती, रंगाचे मोठाले डबे, वाळू, दगडी, विटा उडवतच चालली होती. त्याने कशीबशी गाडी रस्त्यावर आणली आणि पुन्हा ब्रेक मारू लागला. पण सगळं व्यर्थ. गाडी काही केल्या थांबायला तयार नव्हती. अखेर त्याने गाडीतून उडी मारण्यासाठी दरवाजा उघडला इतक्यात धाडकन काहीतरी त्याच्या गाडीवर आदळले आणि त्या धक्क्याने तो बाहेर उडून पडला. तो एवढ्या जोरात पडला कि त्याची हाड न हाड खिळखिळी झाली, त्याच्या डोक्याला जबर मार लागला अन डोळ्यासमोर अंधारी आली. हे स्वप्न आहे कि प्रत्यक्षात घडतंय हेही त्याला कळेना सर्व जग त्याच्याभोवती गरगर फिरु लागलं, त्याला भोवळ येऊ लागली. भोवळ येऊन पडण्यापूर्वी त्याने पहिले कि एक लाल कार त्याच्या बायकोला फरफटत घेऊन गेली. आणि तो अचेत होऊन जमिनीवर पडला.

तोपर्यंत त्याची ती प्रिय पांढरी बी.एम.डब्ल्यू जी रंगाचे डबे सांडल्याने मागून पूर्ण लाल दिसत होती ती बरीच पुढे जाऊन एका झाडाला धडकून बंद पडली. थोड्या वेळाने दोघांभोवती बरीच गर्दी जमली.

राजेशला ही गोष्ट कळून तो तिथे पोहोचू पर्यंत खूप उशीर झाला होता. प्रणिताने कधीच प्राण सोडला होता. विजयला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्यावर राजेशने त्याची बी.एम.डब्ल्यू शोधून ती पुन्हा त्याच्या पार्किंग गॅरेज मध्ये लावली. आणि संपूर्ण घराला टाळा लावून टाकला. गाडीची हालत पाहताच राजेशला समजलं कि विजयच्याच हातून त्याच्या बायकोचा ऐक्सीडेंट झालेला आहे. पण हे विजयला कळलं तर त्याला प्रचंड धक्का बसेल म्हणून त्याने ही गोष्ट विजय शुद्धीवर आल्यानंतरही त्याच्या पासून लपवून ठेवली. याचसाठी राजेशने कोकण ट्रिप पुर्वी सर्व गाडी गॅरेजमधून दुरुस्त करून घेतली होती, तेही विजयच्या नकळत. विजयला ऍडमिट करुन राजेश आता तो शुद्धीवर यायची वाट पाहत बसला होता.

विजय शुद्धीवर आला पण तब्बल सहा महिन्यांनी. शुद्धीवर आल्यावर त्याने पहिलाच प्रश्न केला. "मी कोण आहे?" कितीही प्रयत्न केला तरी त्याला स्वतःबद्दल काहीच आठवेना. तो डोक्याला ताण देऊन भूतकाळात डोकावण्याचा प्रयत्न करू लागला. आणि अचानक त्याला ते द्रुश्य दिसले.
'ओलाचिंब रस्ता, त्यावरून बेधडक आणि बेलगाम जाणारी एक लाल कार, रस्त्यावर जमा झालेली बघ्यांची गर्दी आणि रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली 'ती'.
ते द्रुश्य दिसताच त्याच्या डोक्यात एक तीव्र कळ उठली आणि तो जोरात ओरडला "जिवंत नाही सोडणार मी त्याला."

- समाप्त -

© कुमार सोनवणे
(या कथेचे सर्व हक्क हे लेखकाकडे आहेत. लेखकाच्या लिखित परवानगीशिवाय ही कथा पुनःमुद्रित केल्यास अथवा इतर कुठेही या कथेचा पुर्णतः अथवा अंशतः वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)