Masanwadi books and stories free download online pdf in Marathi

मसनवाडी

९४ सालच्या मे महिन्यातली ही गोष्ट. मला अजूनही व्यवस्थित आठवतय. मुंबईवरून सकाळी ७ वाजता मी नंदुरबारची एसटी पकडली. एसटी नंदुरबारला पोहोचायला संध्याकाळचे ६ वाजणार होते. जवळपास १० - ११ तास एसटीत बसायचं म्हणजे मला आताच अवघडल्यासारखं वाटत होतं. एसटी लागल्या लागल्या फटकन चढून खिडकीशेजारची जागा पकडून बसलो खरा पण एस टी सुरू व्हायलाच एक तास गेला. इंजिनमध्ये कसलातरी बिघाड झाला होता . तो दुरुस्त करून एसटी निघू पर्यंत ८ वाजून गेले. तेवढ्या वेळात मी संपूर्ण वर्तमानपत्र चाळून काढलं. त्यानंतर खिडकीतून बाहेर बघ, इकडं बघ तिकडं बघ असं करण्यात वेळ गेला. प्रवास सुरु होऊन अजून एक तास पण नव्हता झाला आणि मी आत्ताच बोअर झालो होतो अजून साधारण दहा तास तरी लागणार होते पोहोचायला. तसं मला नंदुरबारला नव्हतं जायचं, नंदुरबारच्या चाळीस एक किलोमीटर अलीकडेच खडशी नावाच्या गावात उतरायचं होतं. माझी मावशी राहते तिथे.

नुकतंच मावशीच्या यजमानांचं निधन झालं होतं. म्हणून भेटायला चाललो होतो. मला तर भेटायची काही गरज वाटत नव्हती. पण आईने जबरदस्तीने पाठवलं. मावशीचं आणि आमचं १०-१२ वर्षांपासून गावाकडच्या शेतावरून भांडण चालू होतं.

माझे आजोबा म्हणजे आईचे वडील वारले त्यावेळेस वाटणीवरून दोघी बहिणींमध्ये वाद सुरू झाला. आजोबाला फक्त दोन मुली. एक मुलगाही होता पण तो लहानपणीच वारला. गेल्या १० वर्षात तर दोघींनी संभाषण पण केलं नव्हतं. कधी कोणाच्या कार्यक्रमात समोरासमोर आल्याच तर एकतर भांडणं तरी व्हायची नाहीतर नाकं मुरडून तिथून दोघी निघून जायच्या. आशा भांडकुदळ मावशीचा नवरा काही दिवसांपूर्वी मेला, हे आम्हाला दुसऱ्या नातेवाईकाकडून समजलं. मला पण नेमकी आत्ताच २ -३ दिवस सुट्टी भेटली होती, म्हटलं मस्त आराम करावं तर आई म्हटली मावशीच्या घरी जाऊन ये. काही का असेना, एक दिवस जाऊन ये. नतंर परत कोणी आपल्याला नावं ठेवायला नको. आणि नाईलाजाने मी निघालो.

मावशी राहायची ते खडशी गाव अगदी छोटंसं होतं. गाव कसलं ३०-४० घरांची वस्ती होती. आजूबाजूला पडीक माळरान, शेती आणि मध्ये हे गाव. खडशी पासून पुढं चाळीस एक किलोमीटरवर नंदुरबार होतं. तिथं हायवेला दर काही किलोमीटर वर छोट्या छोट्या वाड्या - वस्त्या लागत होत्या. खडशी त्यातलंच एक. मावशीच्या घरी जायचं म्हणजे दहा तासांचा एसटीचा कंटाळवाणा प्रवास मग तासाभराची पायपीट. ६-७ तरी नक्कीच वाजणार होते पोहोचायला. मला तर आत्ताच नकोसं वाटत होतं.

एसटी भोरगावत थांबली तेव्हा एक विचित्र माणूस गाडीत चढला आणि माझ्याच शेजारी येऊन बसला. वय ४५ -५० च्या आसपास. फाटका शर्ट, तुटकी चप्पल, खांद्याला अडकवलेली एक शबनम, आणि अंगाला येणार वास यावरूनच तो फुल्ल पिलेला होता हे उघड कळत होते. वाढलेली दाढी, लाल जड डोळे, आणि मातीत माखलेले कपडे. त्याच्याकडं बघुशीपण वाटेना. त्या शबनममध्ये पण बहुतेक दारुच्याच बाटल्या होत्या कारण बॅग खाली ठेवताना खण खण आवाज आला. आधीच माझा प्रवास कंटाळवाणा होता आता त्रासदायक पण होणार होता. ही कसली सोबत दिली रे देवा, कोणीतरी दुसरा चांगला व्यक्ती असता तर गप्पा तरी मारता आल्या असत्या.

याच विचारात मी असताना मला माझ्या बॅगेतल्या पुस्तकांची आठवण झाली. पेपर विकत घेताना स्टँडवर मी दोन पुस्तकं विकत घेतली होती. कसलं पुस्तक आहे म्हणून फक्त बघितलं तर दुकानदाराने ती दोन पुस्तकं गळ्यातच मारली. मला वाचनाचा छंद वगैरे होता असं काही नाही. पण १० तास गाडीत करणार तरी काय? ९०चा काळ तो, त्यावेळेस आतासारखे मोबाईल नव्हते. कसलं पुस्तक आहे बघूया तरी. म्हणून मी बॅगेतून पुस्तकं काढली. एकावर नाव होतं 'सावधान!' दुसऱ्यावर होतं 'अनोळखी दिशा'. खाली मोठ्या अक्षरात नाव लिहलेलं होतं - 'नारायण धारप'. कोण नारायण धारप काय माहिती? १२वीला असे पर्यंतच काय तो माझा आणि पुस्तकांचा संबध आला होता. १२वी झाल्यानंतर जे मिल मध्ये चिकटलो ते आज १० वर्ष झाली अजून तिथंच आहे. कधी एखादी सुट्टी भेटली तर आई मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला इकडे तिकडे घेऊन जायची. आता सलग ३ दिवस सुट्टी भेटली म्हटलं मस्त आराम करावं तर आई म्हटली मावशीकडे जाऊन ये.

दोन्ही पुस्तकं हातात घेऊन मी त्यांचं कव्हर न्याहाळू लागलो. कव्हर वरून तर भयकथा वाटत होती. मी एकवेळ शेजारच्या बेवड्याकडे पाहिले तो मस्त घोरत पडला होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी त्यातलंच एक पुस्तक निवडलं 'अनोळखी दिशा' आणि वाचायला लागलो. वाचता वाचता मी त्यात एवढा रममाण झालो की ३ तास कसे गेले कळलेच नाही. एसटीतील आवाज, इतर प्रवासी,तो बेवडा मला कशाचंच भान नव्हतं मी त्या पुस्तकातल्या पात्रांचं आयुष्य अनुभवण्यात गुंग झालो होतो.

"कसलं भारी आहे राव. याआधी का नाही एखादं पुस्तक वाचलं." मी पुढची कथा वाचायला सुरुवात करणार तोच गाडी काठारला पोहोचली. गाडी इथे थोडा वेळ थांबते म्हणून मी लगेचच जेवण उरकून घेतलं. फ्रेश वगैरे होऊन परत आपल्या सीटवर येऊन बसलो. एसटी सुरू झाल्यावर ५-१० मिनिटांनी मी पुन्हा पुढची कथा वाचायला सुरुवात केली. कधी एकदा पुस्तक वाचून संपवतो असं झालं होतं. थोड्यावेळाने मी ते पुस्तक ठेवून दुसरं पुस्तक काढलं. तसं माझं अजून पहिलंच पुस्तक पूर्ण वाचून नव्हतं झालं पण दुसऱ्या पुस्तकात काय आहे याचीही मला उत्सुकता होती. मी पुन्हा पुस्तक वाचण्यात दंग झालो.

भानावर आलो तेव्हा एसटी रोडच्या कडेला उभी होती, निम्मी अर्धी माणसं खाली उतरून एसटी भोवती पांगली होती. इंजिन मधून घर घर आवाज आणि धूर येत होता. सकाळचाच प्रॉब्लेम झाला होता. कंडक्टर आणि ड्रायव्हर ते दुरुस्त करायचा प्रयत्न करत होते. अखेर शेजारच्या डेपोतून मेकॅनिक येऊन गाडी दुरुस्त करून पुन्हा मार्गस्थ व्हायला 2 तास गेले. 5.30 वाजले होते. खरतर आता एसटी बोरफाट्याला पोहोचली पाहिजे होती पण अजून तिने कशाळ पण क्रॉस नव्हतं केलेलं. तसं मला काही फिकीर नव्हती. मला आज एक नवा सोबती भेटला होता, तो माझ्या हातात हात घालून माझ्या पुढ्यात बसला होता. 'सावधान' मुखपृष्ठावरचं नाव मी पुन्हा एकदा वाचलं आणि अर्धवट राहिलेली कथा वाचण्यास सुरवात केली.

बोरफाट्यावर उतरलो तेव्हा ८ वाजून गेले होते. गाडी ३ तास लेट पोहोचली होती. फाट्यावर उतरून मी आजूबाजूला नजर टाकली माझ्याबरोबर ४-५ प्रवासी फक्त उतरले. उतरताच २-३ जण झप झप पावलं टाकत बोरगावच्या दिशेने निघून गेले. तर एकजण जवळच्या झाडामागं ठेवलेली सायकल हाणत रोडने सरळ निघून गेला. बहुदा पुढल्या एखाद्या वाडीत राहत असावा. बहुतेक कामावरून परतला असावा. तिथली बरीचशी लोक तालुक्याच्या गावात कामाला जात.

माझ्या मागोमाग तो बेवडाही उतरला. संध्याकाळी गाडी बंद पडली तेव्हा बरेचजण खाली उतरले होते तेव्हा याने परत ढोसली होती आणि आता सकाळ पेक्षा जास्त झोकांड्या देत चालत होता. आता आशा अवस्थेत हा घरी कसा जाणार? याचं घर कुठं असेल? याचा मी विचार करू लागलो. त्याचवेळेस मला कुठं जायचय, आणि तिथं मी कसा जाणार हा विचार माझ्या डोक्यात शिरला. लहानपणी ३-४ वेळेला आईबरोबर मावशीच्या घरी आलो होतो आणि त्यांनतर साधारण ७-८ वर्षांपूर्वी एकटा आलो होतो, पण ते भरदिवसा आणि त्यावेळेस एक गावकरीच भेटला होता एसटीत त्याच्यासोबत गावात आलो होतो. मीही इतका मुर्ख, कंडक्टरला विचारायचं, किमान उतरल्या उतरल्या तरी कोणालातरी विचारायचं. पण माझ्या डोक्यात तीच दोन पुस्तकं फिरत होती - सावधान, अनोळखी दिशा.

एसटी गेली तसा सगळा रस्ता निर्मनुष्य झाला. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. रस्त्यावर आता फक्त आम्ही दोघेच होतो. मी आणि रस्त्याकडला दगडाशेजारी आडवा पडलेला तो बेवडा. आता रस्ता विचारायचा तरी कोणाला? तसा मला बऱ्यापैकी रस्ता आठवत होता. आईनेही सांगितलेलंच होतं. बोरफाट्यावर उतरलं की बोरगावला जाणाऱ्या रस्त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला एक कच्चा रस्ता लागतो, रस्त्यानं गेलं की २-४ शेती ओलांडली की जरा उंचवट्यावर माळरान लागतं. सरळ रस्त्याने माळरान पार करायचं विसएक मिनिटात उतार लागतो. उतार संपताच नदी. नदीवरचा पूल ओलांडला की लगेच गावातली घरं दिसायला लागतात. सरळच तर रस्ता होता. फक्त तो कच्चा रस्ता पकडून ठेवायचा तो बरोबर आपल्याला खडशी गावात पोहोचवतो. एकदा गावात पोहोचलं की मारुतीचं मंदिर शोधून काढायचं. त्याच्याच मागे कुठेतरी मावशीचं घर होतं. जरी नाही सापडलं तरी एकदा गावात पोहोचलं की कोणीही सांगेल.

कोणाची मदत मिळण्याची अपेक्षा नव्हती. बोरगावातून मुंबईकडे जाणारी एसटी फाट्यावर थांबते तेव्हा काही लोकं उतरतात. पण आता ती एसटी कधी जाते काही माहिती नव्हते. मी घड्याळात पाहिलं ८.१३ झाले होते आता थांबण्यात काहीच अर्थ नव्हता. त्या बेवड्याला उगाचच दोन शिव्या हासडून मी रोड क्रॉस केला. माझ्या शिव्यांचा त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला. त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली होती.

मी बॅटरीच्या उजेडात त्या कच्च्या रस्त्याने चालू लागलो. चांगली नवी, मोठी जडशीळ बॅटरी. एखाद्याच्या डोक्यात घातली तर नक्कीच ती व्यक्ती चक्कर येऊन पडेल. आत निप्पोचे ३-३ मोठे सेल. त्यामुळे भरपूर प्रकाश पडत होता. त्या अंधारात ती बॅटरी म्हणजे माझ्यासाठी भवानी तलवारच होती. तसा सगळीकडे चंद्राचा बऱ्यापैकी प्रकाश पडला होता, वाट जर पायाखालची असती तर तेवढा उजेडही पुरेसा झाला असता. मी झपझप पावलं टाकत निघालो. पाचएक मिनिटांनी मागच्या रस्त्यावरून एक एसटी गेल्यासारखी आवाज आला. पण बहुदा ती फाट्यावर थांबली नव्हती. निदान तसा आवाज तरी नव्हता आला. पण आता मागेफिरून कोणी आहे का ते पाहण्यात काहीच अर्थ नव्हता. तिथे कोणीच नसतं तर माझी फुकटची पायपीट झाली असती. आधीच उशीर झाला होता म्हणून मी सरळ आपल्या रस्त्यानं निघालो.

१५ मिनिटातच शेती ओलांडून माळरानाच्या पायवाटेला लागलो. आजूबाजूला बॅटरी मारली त्या उजेडात ते उघडं बोडकं माळरान एकदम भकास वाटत होतं. नाही म्हणायला काही काही अंतरावर बोरी बाभळीची झाडं, छोटी खुरटी झुडपं आणि क्वचित एखाद्या ठिकाणी मोठं झाड पण होतं. बाकी नुसतं उजाड माळरान. माळरान सुरू झाल्यापासून रातकिड्यांचा आवाज चालू झाला होता. वारा वाहिला की कुठंसा पडलेला पाला पाचोळा सळसळ करत जागा बदलायचा. माझ्या माझ्याच धुंदीत मी मोठाल्या ढांगा टाकत निघालो होतो. कानावर रातकिड्यांचा किर्रर्रर्र आवाज आणि वाऱ्याचा सुं -सुं आवाज सतत पडत होता. काही वेळाने त्या कीर्राटामध्ये मला थोडा वेगळा आवाज जाणवला. जरासा कानोसा घेतला तर पाठीमागून तो आवाज येत होता. मी बॅटरी मारून पाहिलं, कोणी नव्हतं. जरा दूरवर उजेड मारला आणि मला 'ती' दिसली. मी उडालोच. दीड - दोनशे फुटांवर लाल साडी घातलेली बाई बघून माझी बोबडीच वळली. त्या उजेडात ती साडी लालभडक चमकत होती. भीतीचा मला पहिल्यांदा अनुभव आला. या वेळेस अश्या निर्जनस्थळी एक बाई काय करतेय या विचाराने माझं डोकं व्यापलं. काही का असेना आपलं आपण निघावं म्हणून आणखी मोठ्या मोठ्या ढांगा टाकत मी वेगाने चालू लागलो. माझ्या मनात वेगवेगळे विचार यायला लागले. गाडीत वाचलेली पुस्तकं आणि त्यातली पात्रं डोळ्यासमोर येऊ लागली. हे पण तसलंच काहीतरी असलं तर......

"छे !! असलं काही नसतं. ती भयकथा वाचल्याचा हा परिणाम आहे." मी माझ्या मनाला समजावलं आणि सरळ चालू लागलो. पण मनातली शंका काही गप्प बसू देईना. बघूया तरी काय प्रकार आहे म्हणून मी थांबलो आणि परत एकदा बॅटरी मागे फिरवली. यावेळेस मी जरा नीट न्याहाळलं. ती एकटीच नव्हती, तिच्या बरोबर हाफ चड्डी घातलेला ९-१० वर्षांचा एक लुकडं सुकडं पोरगं होतं. बहुतेक तिचा मुलगा असणार. मी पटपट पुढे आल्याने तीही जवळपास धावतच येत होती. तशातच तो मुलगा कशाततरी पाय अडकून पडला. त्यावर तिने पहिल्यांदा त्याला एक धपाटा घातला अन हाताला धरून त्याला घेऊन पटपट चालू लागली.

ते सर्व बघून मला हायसं वाटलं. काही विचित्र प्रकार नक्कीच नव्हता. गावातच राहणारी कोणी तरी असावी. मी उगाचच काहीतरी विचार करत होतो. बॅटरी तिच्या दिशेला मारून मी तिथेच उभा राहिलो. थोडं जवळ आल्यावर तिने चालण्याचा वेग हळू केला. मी त्या दोघांचेही पाय नीट बघितले, सरळच होते. उरली सुरली शंका पण दूर झाल्यावर मी एकदम निर्धास्त झालो. बाई तिशीच्या घरातली होती. नाकी डोळी चांगली होती. डोक्यावर पदर घेऊन ती हळूहळू चालत होती. तिच्या एका हातात वेताच्या दोन पाट्या होत्या. बहुदा बोरगावत भाजी विकायला गेली असणार.

वीसएक फुटांवर आल्यावर ती जवळपास थांबलीच. तिला माझा आधार पाहिजे होता पण माझ्यापासून तिने सुरक्षित अंतरही ठेवले होते. मनात काय ते समजून घेऊन मी पुढं बघून पुन्हा चालू लागलो. मागं एकवार नजर फिरवून मी विचारलं, "काय गावात चाललंय का?"
"हं" मागून फक्त एक बारीक किनरा आवाज आला.
"माळवं विकता वाटतं."
"हं" पुन्हा तेवढाच प्रतिसाद.

मी पुन्हा समोर बघून चालू लागलो. असं सारखं मागं बघणं
मला बरं वाटत नव्हतं. म्हणून मी पुढं बघतच विचारलं, "एवढ्या रात्रीपर्यंत विकता?"
"न्हाय. संध्याकाळ पतूरच. सांच्याला घरी येते. आज यष्टी चुकली, मागाहून येणाऱ्या यष्टीला पण उशीर झाला."
"अच्छा अच्छा." मी समोर बघतच बोललो. मी थोड्या मध्यम गतीनेच चाललो होतो. लवकरात लवकर गावात पोहोचायचं तर होतंच पण तिलाही त्या वेगाने चालता आलं पाहिजे ना. थोडा वेळ शांततेत तसेच चाललो. ती काही बोलेना मग मीच मागे वळून बोललो.
"काय रे बाळा काय नाव तुझं?"
ते पोरगं गप्पच. आपल्या आईकडे बघू लागलं.
"रमेश नाव हाय त्याचं" हातातली पाटी दुसऱ्या हातात घेत ती म्हणाली, "तो लय बुजरा हाय. असं परक्याशी लगेच बोलत नाय."
"असं होय." मी पुन्हा पुढं बघत चालू लागलो. पुन्हा आम्ही शांतच. तो रात किड्यांचा किर्रर्र आवाज आणि वाऱ्याचा सुळसुळाट घुमायला लागला. त्यात आमच्या चपलांचा पटाक पटाक आवाज तेवढा येत होता. थोडं लक्ष दिलं तर तिच्या पैंजनाचा एक हलकासा आवाजपण त्यात मिसळत होता आणि मध्येच तीने पाटी या हातातून त्या हातात घेतली की होणाऱ्या बांगड्यांचा आवाज बाकी सगळ्या आवाजांवर मात करत होता.

"कोणी आलं नाही तुम्हाला घ्यायला? एकट्याच यायला लागलाय तुम्ही?" मला ती शांतता आणि तो किर्रराट सहन झाला नाही म्हणून मी पुन्हा बोललो.
"नवऱ्याला बैलाने मारलंय, तो हाथरुणातच हाय. सासऱ्याला रातचं दिसत नाय. पण त्यांना सवय हाय. मी काय पयल्यांदाच नाय चालले अशी एकटी."
"अच्छा अच्छा." मला जरा नवलच वाटलं.
"दर वक्ताला कोण ना कोण असतंच गावात जाणारं, आणि वाट पण पायाखालचीच हाय. त्यामुळं काय वाटत नाय." तिनं आणखीन माहिती पुरवली.
मला वाटलं ती माझ्याबद्दल विचारले. कोण? कुठून? वगैरे पण तिने काहीच विचारलं नाही मग मीच म्हटलं आपणच सांगावं.
"मी मुंबईहून आलोय. इथे मावशीकडे चाललोय".
"हं"
"सावित्री डांगे. तुम्ही ओळखता का त्यांना?"
"कुणाला?"
"सावित्री डांगे...... त्यांचे यजमान अण्णा डांगे काही दिवसांपूर्वीच वारले."
"नीटसं म्हायती नाय पण समशानच्या पलीकडं कोणीतरी डांगे म्हणून राहतात."
"स्मशानाच्या पलीकडे?" मी मनातच आठवू लागलो पण त्यांच्या घराच्या आसपास कुठेही स्मशान नव्हतं. गावच्या मध्यवर्ती भागात एक मारुती मंदिर होतं त्याच्याच मागे कुठेतरी मावशीचं घर होतं. तरी २-३मिनिटं पुन्हा पुन्हा आठवून पाहिलं पण त्यांच्या घराच्या आसपास कुठे स्मशान असल्याचं आठवलं नाही. मी त्याच विचारात बुडालो होतो मग पुन्हा म्हणालो, "नाही हो मावशीच्या घराच्या आसपास कुठंच स्मशान नाही. त्यांचं घर मारुती मंदिराच्या मागच्या बाजूला कुठेतरी आहे. तुम्हाला मारुती मंदिर कुठे आहे ते माहितीये का?"
तिचा काहीच प्रतिसाद आला नाही. मी मागे वळून पाहिलं आणि माझं अवसनाच गळालं. मागे कुणीच नव्हतं. माझ्या शरीरातून बर्फासारखी थंड लाट गेली.
अरे हा काय मनाचा खेळ की आणखीन काही? मी बॅटरी मागे फिरवून पाहिलं. पहिल्यांदा मला समजलंच नाही पण थोडं दूर शंभरएक फुटांवर ते पोरगं एकटच माळरानाकड बघत उभं होतं. एकटच? त्याची आई कुठाय?? मी घाई घाईने बॅटरी त्याच्या अवती भवती फिरवली, इतक्यात एका झुडपामागून ती साडी सावरत उठली. अच्छा असं होतं तर. याचसाठी तिनं मला पुढं जाऊ दिलं. ती का मागे थांबली ते समजलं आणि माझा जीव भांड्यात पडला.
ती पुन्हा मुलाचा हात पकडून पटापट पावलं टाकत माझ्यापर्यंत आली. मी पुन्हा ते सुरक्षित अंतर ठेवून पुढं चालायला लागलो. दोन मिनिटांतच माझ्या मनाने काय अनुभव घेतला ते आठवून माझ्या पोटात परत गोळा आला. आपलं मन पण ना लगेचच टोकाचा विचार करतं. मनाचा खेळच विचित्र आहे. मी परत माझ्याच विचारात बुडालो. भानावर आलो ते तिच्या बांगड्यांच्या आवाजाने.

बराच वेळ झाला होता. मी घड्याळात पाहिलं ८.५७ झाले होते. एव्हाना नदीपर्यंत पोहोचलो पाहिजे होतो. बॅगेच्या साईड कप्प्यातून बाटली काढली आणि दोन घोट घेउन तिला विचारलं, "बराच वेळ झालाय, आतापर्यंत नदी लागली पाहिजे होती"
"अं?" मागून फक्त प्रश्नार्थक आवाज आला.
"नाय म्हटलं, नदी लागायला अजून किती वेळ आहे?"
"नदी?.....नदी तर पल्याड राहती."
तिच्या उत्तरावर मी जरा चक्रावलोच. मला चांगलं आठवत होतं की आम्ही नदी पूल पार करूनच गावात गेल्याचं. बहुदा हा दुसरा रस्ता असावा, तरी शंका दूर करण्यासाठी मी पुन्हा विचारलं, "अहो मला तर सांगितलं होतं की नदी पूल पार केल्यावरच खडशी गाव सुरू होतं."
"खडशी? कसलं खडशी? असल्या नावाचं कोणतंच गाव इथं आसपास न्हाई."
"क्काय?" मी गर्रकन मागे वळत जवळ जवळ ओरडलोच, "मग हा रस्ता जातो कुठं?"

बॅटरीचा झोत तिच्या अंगावर पडला होता तिची साडी परत लाल भडक चमकू लागली होती. माझ्या डोळ्याला डोळा भिडवीत अतिशय थंड स्वरात तिने उत्तर दिले, "मसनवाडीत."
आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली, तिची साडीच नाही तर तिचे डोळेही चमकत होते- लाल लाल. सर्रर्रकन माझ्या अंगावर काटा आला. मी बॅगेचा साईड कप्पा चापचला, घरातून निघताना आईने मंतरलेला लिंबू दिला होता खिशात ठेवण्यासाठी जो मी बॅगेच्या साईड कप्प्यात फेकून दिला होता. आता तिथं तो नव्हता मगाशी पाण्याची बाटली काढताना तो बहुतेक कुठेतरी पडला होता.
मी समोर पाहिले तिचा चेहरा एका बाजूने पूर्ण भाजलेला होता. ती माझ्याकडे बघून हसत होती. विलक्षण हास्य. मी पळायचा प्रयत्न केला पण अडखळत खाली पडलो. पायात त्राणच उरले नव्हते.

माझ्याकडे झेपावत तिने आपला हात पुढे केला. तिचा हात, ते १० फुटांचं अंतर पार करून माझ्या खांद्यावर पडला. थंड आणि लाकडा सारख्या हातावर २-२ इंच लांब केसं होती. त्या अमानवीय चेहऱ्यावर एक भयानक हास्य होतं. माझं सगळं अवसानच गळालं. मोठ्याने ओरडायचं होतं पण तोंडातून शब्दच फुटत नव्हता. देवाचं नाव घेतल्यावर भुतं घाबरतात पण मला साधं राम राम म्हणायचंही सुचत नव्हतं. शुद्ध हरपल्याप्रमाणे तिच्या डोळ्यात डोळे घालून मी तसाच थरथर कापत बसलो होतो. आता जे काही करणार ते तीच करणार होती. ती कधी माझ्यापासून २ फुटांवर आली ते कळलंच नाही. एवढ्या जवळून तर तिचा चेहरा भयानक हुन पलीकडे होता. त्या चेहऱ्याला चेहरा म्हणणं पण चुकीचं होतं. आता माझ्या दुसऱ्या खांद्यावरही तिचा केसाळ हात पडला होता. डोळ्यात डोळे घालून अतिशय हिडीस आवाजात ती म्हणाली, "चल. तुला आता मी मसनवाडीत घेऊन जाते."

असं म्हणून ती माझा खांदा हलवायला लागली. मग अजूनच जोरात हलवू लागली. दचकून मी जागा झालो. समोर कंडक्टर उभा होता. तो जवळ जवळ ओरडलाच, "काय झोप आहे राव तुमची.... किती वेळ झालं उठवतोय.....अजून थोडावेळ नसता उठला तर गाडी सरळ सोडली असती पुढं. 'बोरफाटा आल्यावर मला सांगा' असं म्हणून तुम्ही खुशाल झोपलात? ....अन माझ्या लक्षात नसतं आलं तर.....सरळ नंदुरबारलाच पोहोचला असता की." तो हे बोलत होता पण त्याच्यातलं एकही अक्षर माझ्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हतं. छाती अजुनपण धाड धाड करत होती. पुलावरून जाणाऱ्या रेल्वेसारखी. संपूर्ण शरीर घामाने चिंब झालं होतं. मी जिवंत आहे याची जाणीव व्हायलाच २ मिनिटे गेली. तो कंडक्टर आणि गाडीत उरलेले १०-१२ प्रवासी माझ्याकडंच बघत होते. "काय विचित्र ध्यान आहे." एकजण बोललं पण.

"अहो चला की. गाडीला उशीर होतोय." कंडक्टर खेकसलाच तसा भानावर येत मी पटकन बॅग घेतली, शेजारी ठेवलेली दोन्ही पुस्तकं उचलली आणि लोकांच्या नजरा चुकवत एसटीतुन खाली उतरलो. गाडी चालू होणार तोच तो बेवडा "ए डायव्हर थांब, मला बी उतरायचंय अस म्हणत उतरू लागला.
"मगासपासून काय झोपला होतास का रे?" असं म्हणून कंडक्टरने त्याला शिव्यांचा प्रसाद दिला. तसाच लटपटत तो खाली उतरला. अजून एक पाय पायरीवर असतानाच गाडी हलली आणि भेलकांडत तो रस्त्याकडला पडला.

आपण जिवंत आहोत आणि ते स्वप्न होतं यावर अजून माझा विश्वास बसत नव्हता. काय भयानक अनुभव होता, अजूनही छाती धड धड करत होती. बॅगेतून मी पहिल्यांदा बाटली काढली आणि घटा घटा घशात रिकामी केली. बाटली ठेवताना मला त्या लिंबूची आठवण झाली, चाचपून पाहिलं तर ते तिथंच होतं. मी पटकन तो लिंबू घेऊन शर्टाच्या खिशात ठेवला.

खांद्याला बॅग लटकली होती, उजव्या हातात बॅटरी अन डाव्या हातात ती दोन पुस्तकं. 'सावधान!', 'अनोळखी दिशा'. "छ्या रे बाबा. परत असली पुस्तकं नाही वाचायची." असं म्हणत मी ती पुस्तकं सरळ रस्त्याकडंला फेकून दिली. रुमालाने घाम टिपला अन निघालो.

तसा रस्ता मला माहिती होता तरी सुद्धा एकदा विचारून घ्यावा असा विचार केलता पण एसटीत झालेल्या गोंधळामुळे विचारायचं राहूनच गेलं. आता सव्वा आठ होऊन गेले होते, उगाच थांबून काही उपयोग नव्हता. तो बेवडा तसाच रस्त्याकडला पडला होता, त्याच्याकडं एकदा नजर टाकून मी झप झप पावलं टाकत निघालो. मनात उगाचच गाणी म्हणायचा प्रयत्न करत होतो. गाणी एवढ्यासाठीच की मनात तसले काही विचार येऊ नये. सर सर करत मी शेती पार केली आणि माळरानाच्या चढावर आलो. कसल्याही प्रकारचा विचार करायचा नाही असं म्हणत मी जवळ जवळ धावतच सुटलो. वारा सुं करून वाहत होता. रातकिडे ओरडत होते. मागून कोणी येत तर नाहीना याची सारखी भीती वाटत होती पण मागं वळायची हिंमत होत नव्हती. जेवढं अडवण्याचा प्रयत्न करू तेवढे जास्त विचार मनात गर्दी करत होते. खरच हे माळरान संपेल ना, नदी लागेल ना, गाव दिसल का? पण मुख्य प्रश्न 'मी सुखरूप मावशीच्या घरी पोहोचेल ना.

त्या भयाण शांततेत माझ्या चपलांचा तेवढा आवाज येत होता. मागून खरंच पालापाचोळ्याचा आवाज येतोय की आणखीन काही....? मला राहवेना. मी राम राम म्हणत मागं वळलो. मागं कोणीच नव्हतं. जरा हायसं वाटलं. पटापट पावलं उचलत मी निघालो. तोंडाने राम राम चालूच होतं. दर थोड्या वेळाने मागे बॅटरी मारायचो. १५-२० मिनिटांतच उतार लागला आणि समोर नदी दिसली. नदी दिसताच मी अक्षरशः पळत सुटलो. नदी पूल पार करताच २-३ झोपडी वजा घरं दिसली, त्याच्या पुढे जरा चांगली घरं लागली. एका घराच्या अंगणात खाटेवर एक म्हातारा झोपला होता. उन्हाळ्याचे दिवस त्यात बाहेर गार हव्याची झुळूक त्यामुळे शक्यतो गडी माणसं बाहेरच झोपली होती. कोणी खाटेवर, कोणी दारातल्या कट्ट्यावर तर कोणी अंगणात. पहाटे पहाटे लवकर उठत असल्याने सगळेच लवकर झोपत. मी घड्याळात पाहिलं ९.३० झाले होते.

मी मंदिर शोधायचा थोडा प्रयत्न केला पण मला काही सापडलं नाही. कशाला उगाचच वेळ वाया घालवायचा असा विचार करत मी शेजारच्याच घराच्या ओसरीवर एक पोरगं झोपलं होतं तसं ते अजून झोपी गेलं नव्हतं चुळबुळ करत होतं. मी त्याला उठवण्यासाठी हात लावताच ते "कोण? काय?" करत दचकून उठलं.
"माफ करा. मला डांगेंच्या घरी जायचंय. मी त्यांचा भाचा आहे, मुंबईहून आलोय."
"कुणाच्या घरी जायचंय?" डोळे चोळत ते पोरगं बोललं.
"अण्णा डांगेंच्या. त्यांचं घर कुठं आहे ते सांगता का?"
"डांगेंच्या व्हय. लय रातच्याला आला की पाव्हणं."
"हां ती गाडी जरा लेट झाली. ६ वाजता पोहचल म्हटलं तर आता १० वाजायला आलेत. अंधारामुळे मला रस्ता कळंना, तुम्ही त्यांचं घर कुठाय ते सांगितलं तर बरं होईल."
"अवो सांगायचं काय? पोचवतोच की." असं म्हणून त्याने ओसरी वरचा कंदील उचलला. त्याच्या या शब्दाने मला बराच धीर आला. त्याने काच वर करून कंदील पेटवला आणि म्हणाला "चला."
मी बॅटरी कडं इशारा करत म्हटलं "ही होती की."
"अवो पण तुमाला सोडून येताना मला उजेड नको का?"
"अरे एवढं चांदणं पडलंय की त्यात तुझ्या पायाखालचा रस्ता....तुला कशाला पाहिजे उजेड..... का भुतांना घाबरतोस" मी उगाचच त्याची फिरकी घेतली. आता आपण सुरक्षित आहोत हे समजल्यावर माझा मूळ मिश्किल स्वभाव रंगात आला होता.
"तसं नाय वो. पण वाटंत ईचू काटं काय बी असत्यात."
"बरं बरं असू दे..." मी हसतच त्याच्या बरोबर चालू लागलो.
माझ्या शर्टाच्या खिशाकडं इशारा करत तो म्हणाला, "पाव्हणं मला घाबरट म्हणता आणि मग तुमी का बरं खिशात लिंबू घेऊन फिरताय."
खिशाला आलेला गोलाकार फुगवटा बघून त्याने बरोबर ओळखलं होतं.
" नाय ते....." मला काय बोलावं ते सूचेना.
"पण खरं सांगू का....या असल्या लिंबानी काय बी फरक पडत न्हाय......जर काय वंगाळ व्हायचं असलं तर झाल्याबिगर ऱ्हात नाई."
"नाव काय तुझं?" उगाच विषय बदलायचा म्हणून मी बोललो
"गिर्रा"
"गिर्रा?? अरे असलं कसलं नाव. गिरीश वगैरे काहीतरी असेल ना."
"न्हाय वो पाव्हणं आमच्या इथं असलीच नावं असत्यात."
"आणि मग शाळेत काय नाव लावतोस?"
"शाळत न्हाय जात."
"मग करतोस काय तू?"
"काय नाय. असंच दिवसभर हिकडं तिकडं हिंडतो" मग माझ्याकडे वळून बघत हसत म्हणाला, "खिशात लिंबु घिऊन फिरणाऱ्या अन वाट चुकलेल्यांना वाटंला लावतो". त्याच्या या टोमण्यावर मी गप्पच झालो. पोरगं जरा आगाउच होतं.

५ मिनिटं झाली तरी आम्ही चालतच होतो.
"अरे अजून किती लांब आहे. नक्की माहितीये ना तुला डांगेंचं घर."
"अवो तीस वर्ष झाली मी या गावात राहतोय, इथल्या एक एक दगडाला वळखतोय मी. तुमी काळजी करू नका बरोबर पोचवतो मी तुमाला."
मला हसू आलं. पोरगं खरंच जरा वाढीव होतं. "अरे अजून मिसरूड पण नीट फुटलं नाय तुला. जास्तीत जास्त १७-१८ वर्षांचा असशील अन तू तीस वर्षांपासून या खडशी गावात राहतोस होय रे. काय संगतोयस राव." मी पुन्हा त्याला डीवचलं.
अचानक तो थांबला आणि माझ्याकडं विचित्र नजरेने बघू लागला. आता याला काय झालं? त्याला विचारणार तेवढयात तो म्हणाला "खडशी? कसलं खडशी?.......ही तर मसनवाडी हाय."

"काय??" मी ओरडलोच. माझ्या अंगातून सगळी शक्तीच गेल्यासारखी झालं. सर्वांगात कापरं भरलं. त्या थरथरत्या हाताने बॅटरी पकडायचही मला जमेना. माझ्या हातून बॅटरी खाली पडली आणि घरंगळत त्याच्या पायापाशी गेली. बॅटरीच्या त्या प्रखर उजेडात मला फक्त दोन उलटे पाय दिसले."

त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर आता त्याचा चेहरा बदलला होता. तो मानवीय चेहरा नव्हताच. माझ्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला, "व्हय मसणवाडी. अन मी १७ वर्षांचा दिसतो कारण मी मेलो तवा १७ वर्षांचाच होतो".

मला दरदरून घाम फुटला, संपूर्ण अंग थरथर कापत होतं. पण कसं बसं मी स्वतःला सावरलं आणि मागं वळून जीव घेऊन पळत सुटलो. काही अंतरावर मला एक घर दिसलं. त्या घराच्या अंगणात खाटेवर एक माणूस झोपलेला होता. मी ओरडतच त्याच्याकडे गेलो. माझ्या ओरडण्याने तो जागा झाला आणि उठून बसत माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला. मी धापा टाकत त्याच्या जवळ आलो अन मदत मागण्यासाठी तोंड उघडलं पण तोंडातून काही शब्द फुटेना. कसा फुटणार? कारण त्याचे ही पाय उलटे होते. किंबहुना गावातल्या सगळ्याच लोकांचे पाय उलटे होते. आता आपलं सगळं संपलं हे माझ्या लक्षात आलं. एवढ्यात माझ्या डाव्या खांद्यावर थंड स्पर्श झाला. मी मागं वळलो. खांद्यावर गीर्राचा केसाळ हात पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर भयानक हास्य होतं. मी खूळ लागल्या सारखं फक्त त्याच्या लाल चमकणाऱ्या डोळ्यात पाहतच राहिलो. क्रूरपणे हसत तो म्हणाला, "मी म्हटलं व्हतं न्हवं, मी सगळ्यांना पोचवतो.....चल आता तुला बी पोचवतो." आणि त्याचा दुसरा हाथ माझ्या गळ्याभोवती पडला.

२५ वर्ष झाली या घटनेला, आजही ती रात्र आठवली की माझ्या अंगावर काटा येतो. पण मागचं सगळं विसरून आता मी नव्यानं सुरवात केली आहे. आता मी गिऱ्हाच्या शेजारच्या अंगणात झोपतो....... रोज नव्या सावजाची वाट बघत..... कधीतरी कोणीतरी वाट चुकून येतोच की या 'अनोळखी दिशेला'.

"मग......तुम्ही कधी येताय...... मसनवाडीला??"

- समाप्त -