Cut cut cut books and stories free download online pdf in Marathi

कट' ची कटकट


“मी त्यांचा विचार करायलाच हवा होता.असा कसा मी परस्पर निर्णय घेतला काहीच कळत नाहीये ग.... त्या दिवसापासून मन अस्वस्थ झाले आहे"

"अगं, पण तू तर म्हणाली होती ना की तुझ्या नवऱ्याला, मुलांना आणि इतर सर्वांना तुझा हा निर्णय खूप आवडला. मग आता काय घडले? नाराज झाले आहेत का सर्व?"

"तसे काही नाही ग, त्यांचा कोणाचाही काहीच प्रश्न नाहीये. पण मी असा निर्णय घेताना मला प्रिय असणाऱ्या माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींचा विचारच नाही केला याचे आता खूप वाईट वाटते."

" पण असे कोण आहे तुझ्या आयुष्यात की ज्यांची परवानगी घेणे तुला आवश्यक होते ते तरी सांग ना.... बघूया आपण अजूनही काही होऊ शकते का... त्यांना आपण समजावून सांगू या."

छे ग! आता सर्वकाही समजवण्याच्या पलीकडे गेलं आहे. ते कोणीच आता माझ्याकडे ढुंकूनही बघत नाहीये काय करावे तेच कळत नाहीये. खरं सांगू का, मी देखील त्यांचा खूप मोठा विश्वासघात केला आहे. त्याची खूप खंत मनाला लागली आहे. “

"तू ना माझा गोंधळ खूप वाढवत आहेस. तू आधी मला स्पष्टपणे सांग की तुला नक्की कोणाबद्दल बोलायचे आहे आणि कोणासाठी एवढे अपराधी आणि वाईट वाटत आहे... “

“ सांगते कशाला, आता त्यांना मी तुझ्यासमोरच आणते."
असे म्हणत तिने आपल्या कपाटातून विविध प्रकारच्या क्लिप्स, रबर बँड, अंबाडे, गंगावण असे सर्व काही तिने स्मिता समोर म्हणजे आपल्या जिवलग मैत्रिणी समोर आणून ठेवले. त्या सर्व वस्तूंना पाहून स्मिता खूप हैराण झाली.

"अगं, हे सर्व काय आहे? आणि असे माझ्या पुढ्यात का आणून ठेवलेस?” स्मिताने गोंधळून आपल्या मैत्रिणीला विचारले.

“अगं, ह्या सर्व वस्तू म्हणजे माझा जीव की प्राण आहेत. तुला माहिती आहे का, मी ह्या प्रत्येक वस्तूला नाव दिले आहे. ही गुलाबी क्लिप माझी पिंकी, निळी निलाक्षी, लाल क्लिप म्हणजे लाली, काळी रातकली, हिरवी म्हणजे लिफी, या खड्यांच्या क्लिपला मी नटवी म्हणते. शिवाय हे अंबाडे आहेत ना, यांनासुद्धा मी लक्ष्मीबाई, अक्का, बेबी, बबीता अशी नावे दिली आहेत. अगदी कुठून कुठून आणून मोठ्या हौसेने या सर्वांना मी जमा केले आणि अवघ्या वीस मिनिटांमध्ये त्यांना माझ्या आयुष्यातून काढून टाकले. त्यांचा थोडाही विचार केला नाही ग!!! आज अचानक ड्रॉवर उघडला तेव्हा माझा चेहरा पाहून त्यांचा कलकलाट सुरू झाला. ते जणू मला सांगत होते की तू आमचा केसांनी गळा कापलास. त्यांना बाहेर काढून मी खूप आंजारले गोंजारले. पण त्यांनी मला झिडकारले. माझ्या लाडक्या पिंकीने तर चिडून आपली तार मला जोरात टोचून बोटांना रक्तबंबाळ केलं. बरं, यांना सावरत नाही तोपर्यंत ती हौसेने शिवून घेतलेली माझी प्रासादिक नऊवारी साडी कपाटातून धप्पकन माझ्या डोक्यात येऊन आदळली. तिचा तर नुसता संताप संताप होत होता. वर मला म्हणते कशी, “ आता ह्या अवतारात मला नेसून मिरवणार आहेस का?..."

आपल्या मैत्रिणीला एवढं हिरमुसलेलं पाहून स्मिता परत समजावणीच्या सुरात म्हणाली, “ अगं, या निर्जीव वस्तूंसाठी तू इतकी का भावनिक होतेस? तू आता किती गोड दिसत आहेस हे जरा त्या आरशात डोकावून पहा म्हणजे तुझे हे हिरमुसलेपण आत्ता पळून जाईल.”

“मितू, तू प्लीज माझ्या ह्या प्रिय वस्तूंना निर्जीव म्हणून मला दुखवू नकोस. अगं, त्यांचा वापर करण्याच्या वेळी देखील मी त्यांच्याशी बोलते....
" आज, रातकलीला मी डोक्यावर बसवणार... मग निळी बबली रुसली की, तिला सांगणार तुला उद्या हं!!! ही नटवी तर नेहमीच माझ्यावर रागवलेली असते. तिचा तर माझ्यावर आरोप आहे की मी फक्त ती रातकली रोज रोज वापरते. मग सणावाराला मी नटविला डोक्यावर घेऊन शांत करते. अशी आमची खूप घट्ट मैत्री होती. पण या लूकपायी मी या सर्वांना गमावून बसले. हं, तू म्हणते तसं माझा हा लूक मला ही खूप आवडला होता. डोकं कसं अगदी हलकं हलकं झालं आणि स्वतःच स्वतःला आवडू लागले होते. पण या सर्वांना पाहिले आणि माझा मूडच ऑफ झाला."

“ अगं, तुझा जर या सर्व वस्तूंमध्ये इतका जीव होता तर मग तू बॉबकट करायलाच नको होता. नाहीतर प्रत्येकाची परवानगी घेऊन, माफी मागून पाऊल उचलायचे होते." स्मिताने गालातल्या गालात हसत टोमणा मारला.

" चेष्टा करतेस का तू पण माझी??? अगं घरातले सर्व मला असेच चिडवतात म्हणून मी तुझ्याशी मोकळेपणे बोलले तर तू देखील मला असं हिणवतेस??? एकतर तुला खोटं वाटेल पण माझ्या आयुष्यातून त्या कट झालेल्या केसांची पण मला खूपच आठवण होते. डोक्यावर हात फिरवला की हृदयात अगदी चर्रर्र होते. माझ्या हृदयावर दगड ठेवून कशी कात्री मारून घेताली हे माझे मलाच माहीत. तुम्हाला मात्र सर्व गंमत वाटते. म्हणून मी बोलत नव्हते." आता मात्र ती खरंच फुरंगटून बसली.

" नाही ग राणी, मी तुझी गंमत केली. तू ना, खरंच अफाट आहेस. किती जीव लावतेस सर्वांना!!! पण आता माझी एक गोष्ट ऐक, तू आता तुझ्या या बॉबकटच्या लूकचा आनंद घे. आधी केस खूप मोठे आणि विरळ आहेत म्हणून तुला कापायचे होते आणि आता कापलेत तरी नाराज आहेस... अग, जगण्याचा आनंद घ्यायला शिक आता'" स्मिताने तिची समजूत काढली.

" आनंद तर मी तसा प्रत्येक गोष्टींत घेत असते. पण ह्या सर्वांशी इतक्या दिवसांची असलेली घट्ट मैत्री तोडणे सोपे नाही आहे."

" अग, पण ज्या शरीराला नटवण्यासाठी हे सर्व सोपस्कार आपण करतो ते देखील एक दिवस आपली साथ सोडणार आहे. त्याच्यापुढे या सर्व गोष्टी अगदी किरकोळ आहेत. सो एन्जॉय एव्हरी मोमेंट.... आता एकेका गोष्टींतून जीव काढून टाकायचा, म्हणजे शरीर सोडून जाताना त्रास नाही होणार"

"मितू, अग किती छान सांगितलंस तू....या शरीराचा मोह सुटेल तेव्हा सुटेल पण आधी या प्राणप्रिय वस्तूंच्या मोहातून बाहेर यायला हवे." असे म्हणत तिने आपल्या लाली, पिंकी, नटवी, भुरी अशा सर्वांचे शेवटचे मुके घेतले आणि लक्ष्मीबाई, अक्काबाई, काशीबाई अशा सर्व अंबाड्यांना प्रेमाने कुरवाळून डब्यात व्यवस्थित ठेवून दिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कामाला येणाऱ्या सखूकडे तो डबा सुपूर्द केला.
एव्हढ्या सुंदर वस्तू पाहून सखूचा चेहेरा खुलला. खुश होत ती तिला म्हणाली," ताई हा हेअर कट लई भारी दिसतो बगा तुम्हाला."
सखूच्या आनंदाने ती देखील आनंदी झाली. त्यागातील
सुखाची अनुभूती तिने घेतली. आपण अटॅचमेंट कडून डिटॅचमेंटकडे जात आहोत या विचारांनी खुश होऊन तिने आपल्या बॉबकट वरून प्रेमाने हात फिरवला आणि स्वतःबद्दल खूप समाधानी झाली.
अर्थात फक्त तिची नऊवारी मात्र तिने परत कपाटात ठेवली. आपल्या या बॉब कटवर नऊवारी नेसून फ्युजन करू शकते. असा मनी निश्चय करून ती सर्व कन्फ्युजन मधून मुक्त झाली.

@मंजुषा देशपांडे, पुणे.