Liberation books and stories free download online pdf in Marathi

मुक्ती

ते उन्हाळ्याचे दिवस होते, आम्ही नुकतेच त्या गावात राहायला गेलो होतो. तसे आम्ही अगदी शहरातले नाही पण खेड्यातही राहण्याचा काही अनुभव न्हवता. त्या गावात नवे जीवन आणि नवीन माणसं भेटली. ते गावं फार मोठे नव्हते, त्याच्या पासून काही अंतरावर तालुक्याचे ठिकाण असल्याने त्या गावात कश्याची कमतरता मात्र मुळीच नव्हती. फक्त कामासाठी किंवा बाजारहाटा साठी थोडं दूर जावं लागायचं एवढा मात्र त्रास होता. प्रवासासाठी दिवसातून तीन वेळा बस वाहतूक होती, तरीही बरीच लोक पायी सुद्धा प्रवास करीत असत. आणि तशाही बैलगाड्याही कशान कशा कामासाठी ये जा करताना दिसायच्या त्यामुळे गाडी चुकलीच तरीही बैलगाडीची सवारी मिळायचीच.

आमच्या घरी आई-वडील, एक छोटा भाऊ आणि मी एव्हढेच. मी त्या गावात गेले तेंव्हा एकटीच असायचे, त्यामुळे थोडा विरंगुळा म्हणून आजूबाजूच्या परिसरात फिरायला मला खूप आवडायचं. त्या गावात डोंगराळ परंतु विरळ वस्ती होती, एक घर इथे तर दुसरे तिकडे. माझी काही गावातील लोकांशी ओळख झाली होती. गावातून बाहेर पडण्यासाठी एक कच्चा रस्ता होता. तो मूळ रस्त्याला भेटतो तिथे गावच्या पाटलांच घर होत, आणि त्याच्या शेजारी एक जून छोटस घर होत. त्या घराकडे पाहिलं की मला खूप भीती वाटायची. त्याला कारणही तसंच होत, गावात नेहमी भुताच्या गोष्टी निघत असत. लोकं सहा नंतर आपल्या मुलांना बाहेर पाठवत नसत. आठ नंतर तर मोठी माणसं सुध्दा निघत नसत. मी जेव्हा जेव्हा त्या घराच्या बाजूने जायचे तेंव्हा तिथे कमालीची शांतता भासत होती. कदाचित लोक याच जागेबद्दल चर्चा करत असतील असे मला वाटलं.

एके दिवशी अशीच संध्याकाळी फिरत असताना वाटेवरच्या घसरणीला एकदम माझा पाय सरकला. खाली खूप खोल दरी न्हवती, पण पडले असते तर हात किंवा पाय गमवावा लागला असता. मी पडणार तोच माझा हात कुणी तरी धरून खेचला. हे सारं एका क्षणात घडलं मला समजलच नाही की नेमकं काय घडतंय. मी सावरून पाहिलं तर माझ्या समोर एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा उभा होता. साधाच पेहराव व चार चौघांसारखाच वर्ण, पण त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं. त्याच्या चेहऱ्याकडे मी टक लावून पहातच राहिले . तेव्हड्यात जरा सांभाळून अस म्हणत तो निघून गेला. तो जाई प्रयत्न मी त्याच्या कडे तशीच पहात राहिले. घरी आल्यावर तो प्रसंग माझ्या नजरे आड होतच न्हवता. तो चेहरा मला काही तरी सांगतोय असंच वाटत होतं. त्याच विचारात मला कधी झोप लागली समजलच नाही. मी दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे संध्याकाळी फिरायला गेले, परत येताना वाटेत तोच मुलगा दिसला. त्याने माझ्याकडे बघून एक स्मितहास्य केले आणि तो निघाला. मी त्याला हाक मारली तेंव्हा तो थांबला. मी त्याच्या जवळ गेले तेंव्हा त्याच्या चेहेऱ्यावर मला विलक्षण भाव दिसले, डोळे पाणावलेले, चेहरा जसा लहान मुलांना हुंदका आला आहे आणि तो आता क्षणांत आपल्या भावनांना डोळ्यातून मार्ग मोकळा करून देईल असं वाटलं. मी त्याला त्याच नाव विचारले. संजू अस म्हणून तो थोडा सावरला. मग मी त्याला तू राहतो कुठे, करतो काय? असे अनेक प्रश्न विचारले. त्यावर त्याने मला सांगितले की, तो घरीच असतो आणि समोरच्या टेकडीवर त्याच घर आहे. मग मी त्याला अनेक गोष्टी विचारल्या त्यानेही उत्तरं दिली. शिकत का नाहीस त्यावर तो नुसता हसला आणि मला म्हणाला तू माझ्या घरी येशील का ? तसा तो माझ्या पेक्षा लहान पण तरीही त्याने मला एकेरी नावानेच बोलावले. मी पण मानेने होकार दिला. त्याने मला संध्याकाळीच घरी ये असे सांगितले, कारण दिवसा कोणीही घरी भेटणार नाही. मी त्याचा निरोप घेऊन घरी परतले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्याच्या घरी जायला निघाले. तिथे पोहोचेपर्यंत सहा वाजले होते. तो माझी वाटच पहात होता. त्याने मला त्याच्या घरी नेले, त्याच्या घरी खूप लोक होती. तो त्याचा भाऊ रवी, आणि आई. त्याला वडील न्हवते, पण वडिलांप्रमाणे मोठे काका होते. चुलत भावाचे लग्न होऊन त्याला तीन मूल होती. दोन मुलं आणि एक मुलगी पिंकी. पिंकी दहा वर्षाची होती तर ती मूल सात आठ वर्षाची असावीत. त्यांची आजी आणि एक चुलत बहीण होती, साधारण माझ्याच वयाची असावी पण ती आजारी असल्या सारखी वाटली. त्याच्या घरातील प्रत्येक माणसा जवळ माझी खूप छान ओळख झाली. ती माणसं खूपच प्रेमळ होती, त्यांनी माझे स्वागत अस केलं की मी त्या घरी अनोळखी आहे असे वाटले नाही. मी त्यांच्या चुलत दादा वहिनीला, दादा वहिनीच तर रवी व संजूला लहान भावा प्रमाणे समजू लागले. त्याच्या घरी मला गाईचे एक वासरू दिसले होते, पण गाय काही मला दिसली नाही. ते छोटं वासरू पडवीत बांधलं होत. घर तस लहान, कुडा म्हेढीच पण स्वच्छ होत. घराच्या मागे एक विहीर होती, आणि विहिरीच्या बाजूला एक सावरीच झाड होत.

मी निरोप घेऊन अंधार पडायच्या आतच घरी परतले. मी अधून-मधून त्या घरी नेहमी जाऊ लागले. त्या लोकांशी खूप छान ऋणानुबंध जोडले गेले. जणू ते घर माझंच घर, तो परिवार माझाच परिवार बनला होता. माझ्या व्यतिरिक्त आमच्या घरातील कोणीही त्यांच्याकडे कधीही गेले न्हवते. परंतु मी घरच्यांना संजू व त्याच्या परिवराबद्दल सांगितले होते. आणि त्यामुळे संजूला न भेटताच त्याला आणि त्याच्या घरच्यांना माझ्या घरी ओळखू लागले होते.

मी जवळच्या तालुका बँकेत नोकरी साठी अर्ज केला होता. आणि मुलाखतीसाठी मला बोलवलं होत. दुपारच्या गाडीने मला जावं लागणार होतं, म्हणून मी दीड च्या सुमारास घरा बाहेर पडले. जाताना अचानक मला संजूची आठवण आली, अजून गाडीला वेळ आहे म्हणून मी त्याला भेटून लगेच परत फिरेन ह्या हेतूने मी त्याच्या घरी गेले. परंतु त्याच्या घरी कोणीच न्हवते, मी हाक मारूनही पहिली पण कोणी उत्तर देत नाही म्हणून मी आत न जाता माघारी फिरले.

मला नोकरी मिळाली म्हणून मी खूप आनंदात होते. माझा हा आनंद आई-बाबांना सांगितल्यावर संजूच्या घरी पण सांगावा अस मला खूप वाटत होतं. म्हणून मी दुसऱ्या दिवशी पाच वाजता त्याच्या घरी गेले. सर्वाना ही आनंदाची बातमी सांगितली, पण उद्या मला लगेच जावं लागणार हे ऐकून सर्वांचेच चेहरे उतरले. मी दुपारीच निघणार होते पण संजूने मला खूप आग्रह केला, उद्या एक महत्त्वाचा दिवस आहे तेंव्हा तू हवं तर रात्रीच्या गाडीने जा. खूप विनवण्या केल्या नंतर मीही ते मान्य केले आणि संध्याकाळी जाताना तुला भेटायला येईन असे सांगून घरी परतले.

दुसऱ्या दिवशी माझी बस सहा वाजता होती, म्हणून मी पाच वाजताच संजूच्या घरी गेले. आणि पहाते तर काय सारे जण खूप घाईत होते. जो तो आपापली कामे करत होता. संजूच्या आईला बर वाटत न्हवत व काकू पाणी भरत होत्या. मग मी पण त्यांना मदत केली. इकड तीकडच्या गप्पा करताना मी सहजच विचारलं की सुनीता का रडत आहे? त्यावर संजूच्या आईने मला एक बाजूला घेऊन सांगितले की, सुनीताला एक मुलाने फसवले होते आणि त्याच दुःख तिला व पूर्ण परिवाराला भोगाव लागतंय. त्यामुळे ती नेहमी उदास व दुःखी असते. मी तिच्या जवळ जाऊन तिला समजावलं, झालं गेलं विसर आणि नवीन आयुष्य जगायला सुरुवात कर. तिला कदाचित माझं म्हणणं पटलं म्हणून तिने डोळे पुसून काकूंना पाणी भरण्यास मदत केली. मी असतानाच तिथे एक जोडपं आलं, संजूचे कोणी नातेवाईक होते, त्यांनी माझी चौकशी केली. तेंव्हा संजूने बहीण म्हणूनच माझी ओळख करून दिली. संजूच्या परिवराशी जे नात जुळलं होत, त्यामुळे आज कामा साठी बाहेर जाताना मला खूप रडावस वाटत होतं. मी तिथून निघताना सर्वांचे आशीर्वाद घेतले आणि जड पावलाने बाहेरच्या खोलीत आले, आणि अचानक मला काही तरी वेगळंच वाटू लागले. बाहेरून पुन्हा आत जाण्याची इच्छा होती पण पाउलच उठत न्हवतं. दादाची मुलं बाहेरून धावत आत गेली पण त्यांनी मला पाहिलं सुद्धा नाही, मी हाक मारली तर ती नुसतीच वळून हसली आणि निघून गेली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान मला दिसत होते. अचानक सारे शांत झाले, तहानलेला प्राण जसा तृप्त होतो तशी तृप्ती साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. मी बाहेर पाहिलं तर अंधार झाला होता. आणि मला उशीर झालाय हे समजलं तशी मी घाईने निघाले. पहाते तर काय साडे सहा वाजून गेले होते. आता बस ही निघून गेली असेल, पण तरीही मी बस थांब्या कडे चालतच होते. आणि त्या छोट्या पडीक घराजवळून जाताना अचानक एक बाई बोंबलत माझ्या अंगावर आली. क्षणभर काय करावे मला सुचेना माझे अर्धे प्राण निघून गेले होते. मी पूर्ण घामाघूम होऊन तिच्याकडे पहात होते. ती मात्र मला पाहून गप्प झाली. एकूणच हा प्रकार पाहून जवळच राहणारे पाटीलकाका धावत आले. मला घाबरलेल पाहून त्या बाईला ओरडले आणि मला धीर देत म्हणाले, त्यांची रोजची कटकट आहे, दिवसभर काम करतात आणि रात्री भांडत बसतात. तू नको घाबरुस, पण एवढ्या संध्याकाळी तू इथे काय करतेस? माझी बस सुटली हे सांगताच, तू सकाळीच जा आता गाडी नाही, असे पाटीलकाकांनी सांगितले, मलाही त्यांचे म्हणणे पटले. पाटीलकाका म्हणाले, मी सोडतो तुला घरी, थांब हा मी कंदिल व काठी घेऊन आलो. मी मागोमाग त्यांच्या घरी गेले, पाटील काकूंनी मला पाहताच माझी विचारपूस केली आणि माझ्या साठी चहा आणला. चहा घेत मी त्यांना विचारलं साऱ्या गावात भूताच घर म्हणतात ते हेच का? काकी म्हणाल्या नाही,हे ते घर नाही. ते पलीकडच्या टेकडीवर आहे. जाऊ नकोस हो तिकडे. पण मला कस समजणार नेमकं कोणतं घर ते, कारण टेकडीवर बरीच घर होती. मनात म्हणाले पाहू केंव्हातरी भुताच घर, आणि काका सोबत घरी निघाले.

मी परत आलेली पाहून आईला काळजी वाटली आणि त्यात पाटील काकांना सोबत पाहून तर ती पुरतीच घाबरली. मी तिला सगळं व्यवस्थित समजावले. आईने काकांचे आभार मानले. काका घरी जायला निघाले, परंतु जाता जाता.काकांनी भुताच्या घराचा उल्लेख केलाच. आणि म्हणाले गाईचे वासरू दिसते पण गाय दिसत नाही. ह्या उल्लेखाने माझ्या पायाखालून जमीनच सरकली. संजूच्या घरी पण मी फ़क्त गाईचे वासरू पाहिले होते गाय नाही पहिली कधी. आईच्या समोर मी पाटील काकांना काहीच विचारू शकत न्हवते. परंतु लगेच मी हा विचार माझ्या मनातून झटकून टाकला कारण संजू आणि त्याचा परिवार तिथे असताना ते घर भुताच कस असू शकतं? भुतावल नेहमी रिकाम्या ,पडीक घरात असते.

रात्रभर मला झोप लागली नाही, काही केल्या भुताच्या घराचा विचार माझ्या मनातून जात नव्हता. सकाळी कामाला जाणं तर दूरच पण कधी मी संजूच्या घरी जाते आणि त्याला त्या भुताच्या घरा बद्दल विचारते असे झाले होते. सकाळचा नाश्ता झाल्यावर मी आज कामाला जात नाही असं आईला सांगून लगेच संजूच्या घरी गेले.

संजूच्या घरी किमान दहाच्या सुमारास मी पोहोचले. संजू, संजू असा हाक मारतच मी घरात गेले. आतलं भयानक दृश्य पाहून मला खूप मोठा धक्का बसला. क्षणात मी जमिनीवर कोसळले, डोळे ताठरले आणि घशाला कोरड पडली. मनामध्ये अनेक प्रश्न आणि चलबिचल चालू होती. काहीच कळत नव्हते काय घडतंय ते. कारण त्यावेळी मी पाहिलं संजूचे घर पडीक होते. घरामध्ये खूप धूळ जणू वर्षानुवर्षे इथे कोणी फिरकले पण नसावे. भांडी सैरवैर पडलेली, कपडे जसेच्या तसे अडकवलेले व त्यावर वर धूळ साचली होती. जागोजागी कोळ्यांची जाळी होती. ओसरीवरचा झोपला तुटलेला होता. हे दृश्य पाहून काळजात चर्रर झालं. हळूहळू स्वतःला सावरून मी उभी राहिले. थोडी भानावर येताच मी घराच्या मागच्या बाजूला गेले. सावरीचे झाड जे काल मला बहरलेले दिसले होते ते आज मला सुकलेले दिसले. विहिरीत पाहिले तर गढूळ पाणी आणि बरीच घाण साचली होती. मला काय होतंय हे कलेचं ना. मला आता संजूच्या परिवाराला पुन्हा भेटता येणार नाही हे कळून चुकले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या घरात मी दहा ते बारा वेळा येऊन गेले होते, तिथे जमिनीवरच्या धुळीत आज माझ्या पावलांचे ठसे उमटले होते. ज्या विहिरीचे पाणी मी कालच भरले होते, त्या विहिरीवरचा रहाट तुटलेला होता. कालचे माझ्या समोर जिवंत दिसनारे चित्र आज मात्र भयाण आणि मृत वाटत होते. तशीच तिथे तासभर बसून मी खूप विचार केला, परंतु माझे मलाच काही समजत नव्हते. न राहून शेवटी मी जड अंतकरणाने घरी परतले.

पाहिलेला सारा प्रकार मी आईला सांगितला. ती पुरती घाबरून गेली, तिने लगेच बाबांना बोलवून घेतले व झालेला सारा प्रकार सांगितला.बाबा पण घाबरले. पाटीलकाका हे गावचे प्रमुख असल्याने त्यांना या घटने बद्दल नक्कीच माहिती असेल म्हणून बाबांनी त्यांना बोलावणे पाठवले. पाटील काकांना निरोप मिळताच ते तातडीने हजर झाले. झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितल्यावर ते ही एकदम हबकून खाली बसले. मग त्यांनी भुताच्या घरची खरी हकीकत सांगायला सुरुवात केली.

चार वर्षांपूर्वीची गोष्ट, संजूच्या घरात नंदनवन होते. गावातील सगळ्याच लोकांना त्यांचा हेवा वाटत असे. संजूचा परिवार साऱ्यांशी मिळून मिसळून रहात असे. साऱ्या गावा बरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध होते. घर लहान पण प्रत्येकाचे मन मोठे होते. कोणीच त्यांच्या दारातून खाली हात परतत नव्हते, पाहुणचार कसा करावा म्हणून सगळे त्यांच्या घराचे उदाहरण देत असत.

संजू व रवी शाळेत जात होते. सुनीता सातवी शिकली होती, कारण गावामध्ये सातवी पर्यंतच शाळा होती. दादा व काका शेती काम करत असत. त्यांच्या कडे काया नावाची गाय होती, तिला एक वासरू होते. संजूचे वडील शाळेवर मास्तर होते. आपल्या मुलांना त्यांनी योग्य तेच वळण आणि शिक्षण दिले होते. शिक्षकी पेशा व्यतिरिक्त त्यांना आयुर्वेदिक औषधांचे पण ज्ञान होते. त्या मुळे लोक दूर दुरून त्यांच्या कडे उपचारासाठी येत असत. त्यांच्या घरी पैशाची जरी श्रीमंती नव्हती तरी ते लोक समाधानी आणि सुखी होते. अशा सुखाच्या संसारावर दुःखाची काळी छटा येईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. पण सुखालाही ग्रहण लागते असेच काही त्यांच्या जीवनात घडले. सुनीताला जवळच्या गावातून एक स्थळ आले. मुलगा शिकलेला व शहरात कामाला असल्याने, घरच्यांनी लगेच होकार दिला. पण मुलाच्या घरच्यांनी सुनीताने आणखी काहीतरी शिकावे अशी इच्छा व्यक्त केली. म्हणून तिच्या वडिलांनी तिला शिवणकला शिकण्या साठी पाठवले. शिवणकाम शिकण्यासाठी सुनीता रोज सकाळी घरातून बाहेर पडायची ते दुपारच्या गाडीने परत यायची. एके दिवशी दुपार उलटू लागली तरी सुनीता काही घरी आली नाही. काकू खूप चिंतेत होत्या आणि संजूची आई त्यांचं सांत्वन करत होती. दुपारची आता संध्याकाळ झाली तरी सुनीता परतली नाही म्हणून घाबरलेल्या काकू रडायला लागल्या. तेवढ्यात संजूचे बाबा येताना त्यांना दिसले, काकूंनी त्यांना रडतच सगळे सांगितले. काकूंना धीर देत ते म्हणाले मी येतो बस स्थानकात जाऊन, चौकशी केल्यावर संजूच्या बाबांना समजलं की काही तरी खराबी झाल्यामुळं दुपारची गाडी आलीच नाही. मग सुनीता संध्याकालच्या गाडीने येईल, म्हणून ते तिथेच थांबले. गाडी आली आणि सुनीताही आली. ती खूप थकलेली होती, डोळे सुजलेले होते. बाबांनी कारण विचारले पण ती काहीच नाही बोलली. ती खूप शांत होती. आई व काकूने तिला पहाताच सुटकेचा श्वास सोडला, पण सुनिताने त्यांना पाहिल्यावर ती खाली कोसळलीच. अश्रुंचे सागर तिच्या डोळ्यातून वाहू लागले. तिचा आक्रोश ऐकूण सारे जमा झाले, खूप विचारणा केल्यावर तिने सांगितले. ती शिकवणी झाल्यावर घरी येण्यासाठी गाडीची वाट पहात होती, तेंव्हा समजलं की आज दुपारची गाडी येणारच नाही. वाटेत बैलगाडी मिळेल म्हणून ती चालत घरी यायला निघाली. बरीच दूर आली तरी तिला वाटेत एकही बैलगाडी दिसली नाही. आता ती पुरती घाबरली, पण खूप पुढे आल्या कारणाने तिने मागे जाण्या पेक्षा पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अचानक तिच्या मागून एक अनोळखी मुलगा आला. तिला एकटीला पाहून त्याने तिची छेड काढली. सुनीताने विरोध केला तेंव्हा त्याला राग आला आणि त्यांनी तिला अडबाजूला नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली. खूप प्रयत्न करूनही ती स्वतःला वाचवू शकली नाही.

हे सगळं ऐकूण तर तिच्या घरातील सगळेच निष्प्राण पाषाणा सारखे स्तब्ध झाले. काकूंच्या काळजाचे तुकडे होत होते. जणू काही आता सगळे संपले होते. तेवढ्यात तिथे काका आले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर उदासी आणि जो तो शून्यात हरवल्या सारख बसलाय हे पाहून त्यांनी विचारणा केली. संजूच्या बाबांनी त्यांना सगळे सांगितले, घडलेली हकीकत एकूण त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ते तसेच जमिनीवर कोसळले. एकुलत्या एक लाडाच्या लेकीचं आयुष्य उध्वस्त झालेलं कोणालाही पाहवत न्हवत. त्यांच्या सुखाला आता दुःखाचे ग्रहण लागले होते. संजूच्या घरातील सगळेच तणावाखाली जगत होते. संजूच्या बाबांचे शाळेत लक्ष लागत न्हवते. ह्याच दरम्यान शेजारच्या गावातील एका माणसाला खुप ताप आला होता, आणि त्याच्या औषधासाठी काही लोक त्यांच्या घरी आले होते. संजूच्या बाबांनी औषध दिलं खरं, पण घरातील तणावाच्या कारणाने त्यांच्या हातून चुकीचं औषध दिल गेलं. त्यामुळे त्या माणसाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू ला कारणीभूत ठरवून संजूच्या बाबांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक झाली. ते जामिनावर सुटले पण त्यांच्या मनावर एव्हढा परिणाम झाला, की त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ह्या सगळ्या गोष्टी गावात पसरायला वेळ लागला नाही, साऱ्या गावाने त्या घराला क्षणात वाळीत टाकले. त्यांच्या कडे येणे-जाणे किंवा कसल्याही प्रकारची देवाणघेवाण बंद केली. लहान मुले घराबाहेर पडली की लोकं त्यांना हाडहुड करू लागली. साऱ्यांचे जगणे कठीण झाले होते. एके दिवशी काया चुकून लोकांच्या शेतात गेली तेंव्हा त्या लोकांनी तिला बांधून ठेवलं. तिला सोडवून आणण्यासाठी संजूच्या घरच्यांकडे पैसे नव्हते. त्यामुळे दुधाविना कायाच वासरू तडफडून मेल. हे पाहून काकांना खूप मनस्ताप झाला आणि म्हणून त्यांनी जंगलातून विषारी पाने आणली व त्याचा रस काढून नकळत जेवणात मिसळला. घरातील सगळे ते विषारी जेवण जेवले. काका मागील दारात शून्यात नजर लावून बसले होते. इकडे त्याच वेळी त्यांच्याकडे काकांची बहीण आणि तिचे पती भेटायला आले होते. त्यांनीही तेच अन्न खाल्ले होते परंतु काकांना ह्याची कल्पना नव्हती. त्यांना जेव्हा हे समजले तेंव्हा त्यांना खूप पश्चाताप झाला आणि रडतच त्यांनी केलेला प्रकार सगळ्यांना सांगितला. सर्व लोक आक्रोश करू लागले, परंतु आता खूप उशीर झाला होता. एकेक जण जमिनीवर कोसळून तडफडू लागले. काही वेळाने तिथे सारं काही शांत झाले होते.

संजूच्या बाबांच्या शाळेतून एक शिपाई त्यांचा उरलेला पगार घेऊन त्यांच्या घरी आला. त्याने घरातील भयानक दृश्य पाहून तो गावात पळत सुटला. त्याने गावात आरडाओरडा करून सगळ्यांना जमवलं. सगळ्या गावा समोर त्याने पाहिलेली संपूर्ण हकीकत सांगितली. हे ऐकून सर्व गावकरी त्या घराकडे गेले. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून घराच्या बाजूला एक मोठा खड्डा खणला आणि त्यात ती सारी प्रेत पुरून टाकली.

त्या दिवसा पासून त्या घराकडे कोणीच फिरकले नाही. काही महिन्यांनंतर लोकांना त्या घरातून विचित्र आवाज येऊ लागले. तेंव्हा पासून सर्व गावकरी त्या घराला भूतांचे घर म्हणून लागले. त्या घरांमधून संध्याकाळी विचित्र आवाज यायचे आणि सकाळी बंद व्हायचे.

ही कथा एकूण मी खूप दुःखी झाले आणि असा प्रसंग कोणावरही ओढवू नये असे मला मनोमन वाटले. पण काही प्रश्नांची उत्तरे अजूनही मला मिळाली न्हवती. संजू माझ्या कडेच का बोलला? त्याचा परिवार मलाच का दिसला? त्याच्या घरी माझ्या जीवाला कसलाही धोका का झाला नाही? अखेर मलाच ह्या साऱ्या गोष्टी का दिसाव्यात?

पुढे पाटीलकाक म्हणाले, चार वर्षांपूर्वी ह्याच दिवशी त्या सगळ्यांचा मृत्यू झाला होता. तुला एव्हढे अनुभव मिळाल्या नंतरही तू त्या घरातून सुखरूप घरी परतलीस हे तूझं भाग्यच आणि पाटीलकाका त्यांच्या घरी गेले.

पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी होती आणि त्यासाठी मला पुन्हा एकदा संजूच्या घरी जावेच लागणार होते. त्याच दिवशी संध्याकाळी मी पुन्हा संजूच्या घरी गेले. संध्याकाळी संजू किंवा त्याच्या घरातील कोणी मला भेटतील का हे मला पहायचं होत. मी तिथे गेले, सर्व प्रकार समजूनही मला तिथे अजिबात भीती वाटत न्हवती. त्या घरातील कोणीच मला कसल्याही प्रकारचा त्रास देणार नाहीत याची मला पूर्ण खात्री होती. मी वाट पहात होते पण तिथे कोणीच आले नाही, किंवा कसला आवाजही आला नाही. तिथे निरव शांतता होती, मी तशीच खूप वेळ विचार करून शेवटी घरी परतले.

रात्री खूप वेळ झोप काही लागली नाही. पहाटे पहाटे डोळा लागला आणि स्वप्नात संजू आला. मला शोधतेस ना? असा प्रश्न विचारून माझ्याकडे निस्सीम हसत पहात होता. त्याच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज होत. खूप प्रसन्न होऊन तो माझ्याशी बोलत होता. तुझ्यामुळे मला आणि माझ्या परिवाराला मुक्ती मिळाली, आजवर आम्ही तडफडत होतो. जिवंतपणी कोणी आमच्याकडे पाहिले नाही आणि मृत्यू नंतरही आमच्यासाठी कोणी आश्रू ढाळले नाहीत. कुणालाही आमच्यावर दया आली नाही. मृत्यू नंतर आमची प्रेत जनावरांसारखी एकाच खड्ड्यात पुरून टाकली. म्हणून आमचे आत्मे तडफडत होते. परंतु आज तुझ्यामुळे आम्ही शांत झोपणार आहोत. कारण आमच्यावर तूच पहिल्यांदा विश्वास दाखवलास. आमच्या घरी आलीस, सर्वांसोबत मिसळलीस, साऱ्यांवर प्रेम केलस. जेंव्हा आम्ही ह्या जगात नाही हे समजल्यावरही तू न घाबरता आमच्या मृत्यू वर शोक व्यक्त केलास, आमच्या साठी अश्रू ढाळलेस. त्यामुळे आम्हाला आज मुक्ती मिळाली, आम्ही तुझे आभारी आहोत. आमच्यामुळे तुला जो काही त्रास झाला त्यासाठी एक लहान भाऊ म्हणून मला माफ कर. आता मी जातो, असं म्हणून तो नजरे आड दिसेनासा झाला. त्याला थांबवण्यासाठी मी संजू, संजू म्हणून ओरडू लागले आणी जोरात ओरडून एकदम उठून बसले. आई धावत येऊन विचारू लागली, काय झाले?

मी आईला स्वप्नात जे पाहिले जसेच्या तसे सांगितले. सकाळी आई- बाबा, मी आणि पाटीलकाका पुन्हा संजूच्या घरी गेलो. त्यांना ज्या ठिकाणी पुरले होते तिथे फुले वाहून मी माझे दुःख व्यक्त केले. त्यांच्या मृत्यूनंतरच्या बाराव्या दिवशी संजूच्या परिवाराचे श्राद्ध घालण्याचे मी पाटीलकाकांना सुचवले. त्यांनी गावाला एकत्र करून त्यांच्या समोर ही कल्पना मांडली. सर्वांच्या समर्थनाने बाराव्या दिवशी कार्य पूजा सम्पन्न झाली.

आज ह्या गोष्टीला एक वर्ष झाले. पुन्हा एकदा मला सारं काही आठवत आहे. मला संजूच्या परिवाराची आठवण येत आहे. तरीसुद्धा मी पण भरलेल्या डोळ्यांनी संजूचे आभार मानते. कारण त्यांच्या मुक्तीसाठी मी कारणीभूत ठरावी हे फक्त त्या संजूमुळे घडले होते. त्याच्या मुळे मी एक चांगले कार्य केल्याचे समाधान मला प्राप्त झाले. आपल्या साठी नाही तर दुसऱ्या साठीही जगावे असे ध्येय मनात निर्माण झाले. भरलेल्या डोळ्यांनी मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून माझ्या नव्या प्रवासाला निघाले.