Tu Hi re majha Mitwa - 8 books and stories free download online pdf in Marathi

तू_ही_रे_माझा_मितवा... - 8

#तू_ही_रे_माझा_मितवा...💖💖💖💖

#भाग_८

“ऋत्या हे स्वतःवर उपकार केल्यासारखं काय एवढंस जेवलीस गं आणि हजारवेळा फोन चेक केलास तरी काही बदल होणार नाहीये आता, तो तुझा मेसेज ही वाचणार नाही की स्वतःहून तुला फोन करणार नाही,त्यापेक्षा तू झोप बरं!” प्रिया ऋतूची अस्वस्थता जाणून होती.

“प्रियु अजूनही फोन बंद येतोय गं,खूप काळजी वाटतेय.” रडवेली होत ती म्हणाली.

“नको काळजी करू उद्या त्याला सरळ सॉरी म्हण आणि काही प्लॅन नको करायला आता, वाट पाहूया,तो जेव्हा बोलेले तेव्हा.” तनुसुद्धा तिला सल्ला देऊन आपण चूक केली ह्या विचारात होती.
“झोपा तुम्ही दोघीही,मी जरावेळ गॅलरीत बसते,बघते फोन लागतो का ते.”

ऋतू तिच्या आवडत्या खुर्चीवर विसावली.समोर वाऱ्याने हळुवार हलणाऱ्या गुलबक्षीच्या फुलांकडे बघून तिच्या डोळ्यात उगाच पाणी आलं,वेद्ला मुद्दाम त्रास दिल्याची,अपराधीपणाची भावना अजूनच सतावू लागली.

“वेद सॉरी! खूप खूप सॉरी रे...मला नव्हता तुला असा त्रास द्यायचा,पण कधी एकदाचं तू ‘प्रेम आहे’ हे मान्य करतोय असं झालंय मला.खूप बदलीय रे मी तुझ्या प्रेमात पडल्यापासून, बिनधास्त असणारी मी केव्हा एवढी हळवी झाले हे माझं मलाच कळलं नाही.तुझ्याशिवाय दुसरं काही सुचत पण तर नाही, तुझा वेळ,तुझं हसणं,चिडणं आणि आणि डिंपलसुद्धा सगळं सगळं फक्त माझ्यासाठी असावं असं वाटतं...खरं सांगू का खूप पझेसिव्ह झालेय तुझ्यासाठी,आताश्या तू सतत आसपास असावा असंच वाटतं,माझाच असावा असं वाटतं म्हणून असले बालिश उद्योग करत असते..पण तू आहेस ना मच्युअर्ड..मग का नाही समजून घेत? तुला एक दिवससुद्धा टाळणं किती अवघड आहे कळलंय मला. त्यादिवशी तू माझ्या पापण्यांवर हलकेच ओठ टेकवून निघून गेलास पण दोन क्षणांनी माझ्या झोपेला नजरबंदी केलीय आणि वर गुलाबी स्वप्नांचा पहारा...याची तुला शिक्षा नको का रे?"

तिचे डोळे भरून आले.त्याच्या सोबत घालवलेला एक एक क्षण डोळ्यातून उतरून गालावर विसावत होता.तिने शेवटचा एकदा फोन ट्राय केला अजूनही स्वीच ऑफ होता. उद्या सर्वात अगोदर ह्या बालिशपणाबद्दल त्याला सॉरी म्हणायचं आणि आता त्याला अजिबात त्रास द्यायचा नाही असं काहीबाही ठरवत, हताश होऊन झोपायला गेली.

******

आज ती ऑफिसला नेहमीपेक्षा खूप लवकर आली.गाडी पार्ककरून तिथेच त्याची वाट बघत उभी राहिली.त्याला बघायची आतुरता मिनिटागणिक वाढत होती. फ्लोरल व्हाईट शोर्ट कुर्ता,ब्लू डेनिम,हलकासा मेकअप करून अगदी त्याच्यासाठी म्हणून छान तयार होऊन आली होती. थोड्यावेळाने ऑफिसला येणाऱ्या गाड्यांची वर्दळ वाढली आणि पंचिंग टाइम झाला तरी अजून वेद आलेला नव्हता.ती जरा नाखुशीनेच वर गेली.पंचिंग करून थेट वेद्च्या सेक्शनकडे निघाली.’कदाचित त्याने गाडी आणली नसेल,कदाचित चिडलेला आहे म्हणून मला टाळून मुद्दाम दुसर्या विंग मधून आला असेल’ अश्या सगळ्या शक्यता विचारात घेऊन ती निघाली.वेद त्याच्या जागेवर नव्हता.त्याच्या क्युबिकला शेजारी बसणाऱ्या सौरभला तिने जरा चाचरत विचारलं-

“वेद आला नाही का अजून? की आउटडोर आहे आज?काही माहिती आहे?”

“त्याने आजची लिव्ह टाकलीये,मी आत्ताच शेडूलर बघितलं, त्याचं तसं काही ठरलं नव्हतं अक्चुली कारण आज एका स्क्रिप्टवर त्याचं प्रीचींग होतं..मे बी अर्जंसी असेल काही.आता दोन दिवस हॉलिडे,म्हणजे सलग तीन दिवसांची लंबी छुट्टी मारली हिरोने”

सौरभ ने हसत म्हटलं.ती ही उगाच माफक हसून थॅंक्यु म्हणून बाहेर आली. केव्हापासून होणारी घालमेल आता चेहऱ्यावर जाणवायला लागली. जय आणि रेवाशी तर नक्कीच त्याचं बोलणं झालं असेल म्हणून ती टी-सेक्शनला गेली. अपेक्षेप्रमाणे ते दोघेही तिथे होते.ती त्यांच्या समोर येऊन थांबली.

“एक्सक्यूज मी गाईज थोडं डिस्टर्ब करू का?” तिने जरा नरमाईने विचारलं.

“नको..” जय कुत्सितपणे हसत म्हणाला.ऋतूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला.

“जय काहीही काय बोलतोस? शांत बस.” रेवाने त्याला गप्प केलं.
जयकडे दुर्लक्ष करत ऋतू म्हणाली-

“रेवा कालपासून वेदशी CONTACT होत नाहीये.तुम्हाला माहित आहे का तो कुठे गेलाय,त्याने सुट्टी टाकलीये आजची?” ती घाईघाईने म्हणाली.

“काल घरी पोहचले तेव्हा त्याचा मेसेज होता आम्हाला की “उद्या सुट्टी टाकतोय काम आहे महत्वाचं”. मी ही रात्री फोन ट्राय केला होता स्वीचऑफ होता,मे बी स्क्रिप्ट संदर्भात असेल काही.” रेवा शांततेत म्हणाली.

“अच्छा! कुठे जाऊ शकतो तो असा फोन बंद करून?” तिची काळजी प्रत्येक वाक्यागणिक वाढतांना दिसत होती.

“हे साक्षात तुला माहित हवं ना? तिला काय विचारते.” त्याच्या मनातला कडवटपणा त्याच्या शब्दांमध्ये उतरत होता.

“हे बघ त्याचा मूड ठीक नसला ना की तो असाच फोन बंद ठेवतो.”

वेद्ला वर्षानुवर्षे ओळखत असल्याचा अविर्भाव आणत रेवा बोलली. रेवा वेद्शी दाखवत असलेल्या सलगीने ती कुठेतरी खोल खोल दुखावली गेली,ऋतूच्या गोड चेहऱ्यावरचा रंग उडालेला पाहून रेवा सुखावली.

“THANKS..” ऋतूने त्यांचा निरोप घेतला आणि ती जागेवर निघाली.तिचं आज कामात लक्ष लागत नव्हतं,अचानकपणे वेद समोर यावा एवढाच ध्यास तिच्या मानाने घेतला होता.एरव्ही कामात सहज निघून जाणारा दिवस आज अगदी जड पावलांनी पुढे जात होता.

लंचब्रेकला कॅन्टीनमध्ये जायची तिची अजिबात इच्छा नव्हती,बराच वेळ डेस्कवर डोकं टेकून तशीच बसून होती. डेस्कवर कुणीतरी नॉक केलेलं ऐकून तिने मान वर केली.समोर आरुष होता.

“हेलो, जेवली नाहीस का?” तो शेजारची खुर्ची ओढून तिच्यासमोर बसला.

“भूक नाहीये अक्चुली.” ती शक्य तेवढी नॉर्मल प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करत होती.

“काय आता वेदसोबत भांडण न होता चांगली केमेस्ट्री जुळतेय वाटतं” त्याच्या प्रश्नाचा रोख समजून ती बिचकली. तिने जरा रागात त्याच्याकडे बघितल्यावर सारवासारव करत तो म्हणाला.-“I MEAN कामाच्या बाबतीत चांगली केमेस्ट्री जुळतेय. रेवा त्याच्यासोबत असतांना कुठल्या इतर केमेस्ट्री बाबत मी बोलेन का?” त्याच्या बोलण्यातल्या खवचटपणाकडे दुर्लक्ष करत तिने शांतपणे त्याला एक स्माईल दिलं आणि ती डेस्कवरच्या फाइल्स उगाच चाळायला लागली.

“काय सध्या फार बिझी असतेस,मेसेजला रिप्लाय नसतो म्हणून म्हटलं स्वतः भेटावं,त्यात बेन्देवाडीच्या प्रोजेक्टमध्ये तर तुझं खूप कौतुक झालं.पर्सनली CONGRATS करावं म्हणून आलो.” त्याने हात पुढे केला तिने जरा नाखुशीने हात मिळवला,तो तसाच हात धरून ठेवायच्या प्रयत्नांत दिसल्याने तिने हात जरा खेचलाच.

“THANKS” ती जुजबी हसली.

“ok bye, take care” तो जाताजाता म्हणाला,उत्तरादाखल एक नाटकी स्माईल देऊन तिने पुन्हा फाईलमध्ये लक्ष घातलं.
तिचा हात आरुषच्या हातात असतांनाच लंच आटोपून,समोरून जय आणि रेवा येत होते.जयच्या बेरकी नजरेतून ते निसटलं नाही. तो रेवाला तिथेच जरा थांबवून म्हटला-

“बघ म्हणून ही साक्षात माझ्या डोक्यात जाते,आता एक दिवस वेद नाही तर लगेच आरुषच्या हातात हात घेऊन गप्पा करत बसली, मे बी हे दोघं लंचला बाहेर एकत्र जाऊन आलेत.नॉनसेन्स.”

“जय,खरंच यार वेद मूर्ख आहे,त्याला हे सांगितलं तरी पटणार नाही,ही नक्की फसवेल वेदला.” ती ही कुजबुजत म्हणाली.

कामाच्या घाईगडबडीत दिवस पुढे जात होता तर इतक्या गर्दीत असूनही खूप खूप एकटे आहोत आणि हा दिवस केव्हा संपतोय ह्या विचाराने ऋतू बैचेन होती.

ऑफिस सुटायच्या थोडावेळ अगोदर मात्र काहीतरी आठवल्यासारखी ती घाईघाईत एचआरकडे गेली आणि वेदचा फोन स्वीचऑफ येत असून त्याचा घरचा नंबर किंवा अल्टरनेट नंबर मिळेल का हे विचारून बघितलं.त्यानेही लगेच एक landline नंबर दिला,तो औरंगाबादचा होता,दिवसभर अस्वस्थ असलेल्या मनाला थोडा दिलासा मिळाला. “इतर कुणालाही माहित नसेल पण घरी नक्की माहित असेल तो कुठेय..” मनाला दिलासा देत ती थोडी शांत झाली.
ऑफिस सुटल्यावर लगबगीने ती पार्किंगमध्ये आली फोन करावा की नाही,काय बोलावं,काय विचारावं ह्या गोंधळात तिने नंबर डायल केला.
******

“दादू, मला अजूनही डाउट येतोय की तू काल इतक्या रात्री न सांगता असा अचानक कसा आलास आणि फोन बंद करून बसला आहेस.आई बाबा घरी नाहीय तोपर्यंत सांग लवकर. बॉस सीन क्या है?” वेदच्या हातात कॉफीचा कप देत आर्या म्हणाली.

“आरु गप ना..केव्हापासून त्रास देतेय...सीन वैगरे काय आणि” तो वैतागत म्हणाला.

“दादू कुणाशी भांडून आलाय बोल गपचूप.” त्याचा पिच्छा पुरवत ती म्हणाली.

“आज तू कम्पल्सरी फटके खाणार आहेस आरु” तो आवाज चढवत म्हणाला.

“ ये दिल दा मामला है..जरा समझा करो” ती मुद्दाम मोठ्याने गुणगुणत बसली.

तिच्याकडे रागाने एक उशी फेकत तो म्हणाला-“तू गेलीस आता ...”

ती उश्यांचा मारा चुकवायला म्हणून धावली तेवढ्यात LANDLINE ची रिंग वाजली म्हणून ती ओरडली-“दादू TIME PLEASE...नो चीटिंग,मला फोन घेऊ दे”

“हेल्लो..” आर्याने फोन घेतला.

“हेल्लो अं..इनामदारांच घर ना?” पलीकडून विचारणा झाली.

“हो,कोण हवंय आपल्याला.” आरु गोंधळात पडली.

“मी ऋतुजा, मिस्टर वेद यांची कलीग आहे,ACTUALLY त्यांचा मोबाईल कालपासून बंद येतोय आणि खूप महत्वाचं काम आहे,तुम्ही सांगू शकाल का ते कुठे आहेत किंवा मोबाईल बंद का आहे.” काय बोलायचं,कसं विचारायचं ह्या सगळ्या गोंधळात आवाजात कितीही सहजपणा आणायचा तिने प्रयत्न केला तरी काळजी लपत नव्हती.

“ऋतुजा, वेद दादा ना.....” ती काही बोलणार तसं वेदने फोन कट केला.सकाळपासून असलेली चेहऱ्यावरची मरगळ जाऊन छान हसू पसरलं आणि त्याने विचारलं-“कोण होतं पलीकडे?”

“ऋतुजा म्हणून तुझी कलीग होती कुणी..,काय झालं? कट का केलास ?” तिला काहीच कळत नव्हतं.

“कलीग वैगरे सोड वाहिनी आहे तुझी..” गालावरच्या खळ्या उजळून निघाल्या होत्या.

“काय सांगतो दादू... I Knew it! अच्छा म्हणजे राजे रागावून निघून आलेय तर.. मला फोटो दाखव आत्ताच्या आत्ता...” अगदी खुश होऊन ती म्हणाली.त्याने मोबाईल मधला तिचा एक फोटो आरुला दाखवला तशी ती अजूनच खुश झाली.

“ते सोड,सांगतो सगळं नंतर,मला माहितीय ती लगेचच पुन्हा फोन करेल तेव्हा की सांग ‘दादा घरीही आला नाहीये आणि डोंट वरी तो काही लिहित असेल तर चार चार दिवस फोन बंद ठेवतो’.कळलं?”

“का रे छळतोय तिला असं? मी खरं खरं सांगणार आहे.”

“आरु तुला शपथ आहे हं,सांगितलं तेवढं कर.”

त्याच बोलणं संपत नाही तोच पुन्हा फोनची रिंग वाजली.
“हेल्लो,कट झाला मघाशी फोन,तुम्ही काहीतरी सांगत होता.” ऋतुजा म्हणाली.

“अं..हो..मी आर्या बोलतेय त्याची यंगर सिस्टर,ते काय आहे ना दादा तर घरी नाही आला,आणि डोंट वरी तो फोन बंद ठेवतो चार चार दिवस स्क्रिप्ट लिहित असेल तर,काही महत्वाचं काम होत का? नाही म्हणजे मला काही कळलं तर मी सांगेन.” ती, वेद करत असलेल्या prompting ला अनुसरून बोलायचा प्रयत्न करत होती.

“त्याचा मित्राला किंवा रुममेटला विचारून मला सांगशील का तो कुठेय ते? माझा नंबर लिहून घे आणि मेसेज करून कळवलं तरी चालेल.” ती अधिकच काळजीत पडली होती.

“ हो दे नंबर,मी करेन तुला काही कळलं तर.” तिने नंबर दिला आर्याने लिहून घेतला.

“नक्की करशील ना? मी वाट बघतेय.”

“अं..हो आई बाबा घरी आले की विचारून सांगते ओके? काळजी करू नको.”

“हम्म..मी वाट बघतेय प्लिज नक्की सांग हं.” तिचा जडावलेला आवाज अर्याला समजला.

“तो नक्की ठीक असेल काळजी करू नको.I will call you back. bye”

“bye”.

आर्याने फोन ठेवून रागात,मारक्या नजरेने वेदकडे बघितलं.तो पायावर पाय ठेवून हसत आर्याच बोलणं ऐकत होता.तिने रागाने त्याला एक फटका मारला.ऋतूचा नंबर सेव्ह करून तिला “HELLO” मेसेज पिंग केला.

“आरु लागतंय ना..” तो ओरडला.

“दादू का त्रास देतोय तिला,ती किती पॅनिक झालीय माहितीय तुला,दोन मिनिट अजून बोलली असती ना तर रडली असती. का करतोय असं,काय झालंय? मला नाही आवडलं हे.”
ती रागात गाल फुगवून बसली.

“आरु लंबी स्टोरी है ये,फुरसत मै बताउंगा...आता ऐक तिला थोड्यावेळाने फोन करून सांग दादा घरी आलाय.तिने ही काही कमी छळलं नाहीये मला काल.”

“हलकट आहेस तू,आईला सांगते बघ, तुझ्या सुनेला त्रास देतोय ते” त्याला चिडवत ती म्हणाली.

तिचं बोलणं चालू असतांनाच त्याची आई घरात आली.हातातली पर्स बाजूला ठेवत म्हणाली-
“आर्या कुणाच्या सुनेला त्रास होतोय?”

वेद आईसाठी पाणी आणायला गेला.आईच्या गळ्यात हात टाकून ती म्हणाली.

“अगं,तुझ्या सुनेला..”

“काय्य..?” समोर पाणी घेऊन आलेल्या वेदकडे बघत ती म्हणाली.

“अगं म्हणजे हा मला असं मारत असतो येताजाता, मी आहे गं गरीब पण तुझी सून का मार खाईल तिला त्रास होईल ना.” हसू दाबत ती म्हणाली.

“आरु का गं छळतेस त्याला,मी तर छान सून आणणार आहे बघ.” वेद्कडे मायेने बघत ती म्हणाली.

“मासाहेब कष्ट घेऊ नये ती जबाबदारी पेलायला आम्ही समर्थ आहोत..”डोळे मिचकावून तो म्हणाला.

“लबाडा,कुणी असेल तर लवकर सांग नाहीतर आम्ही इकडे लोकांचे आमंत्रण स्वीकारायचो.” त्या जरा गोंधळून म्हणाल्या.
“आई खूप भूक लागलीय तू मला पटकन काहीतरी दे तुझ्या हातचं..काय लग्न वैगरे.” तो विषय बदलवत म्हणाला,

“हो हो मार मस्का आईला.” मागे हसू लपवत आर्या म्हणाली.
तिच्या ह्या वाक्यासरशी दोघांची पिलो फाईट पुन्हा चालू झाली.मुलांच्या दंग्याकडे हसून दुर्लक्ष करत त्या किचनमध्ये गेल्या.

******
ऋतूने आर्याचा नंबर सेव्ह तर केला होता आणि आता प्रत्येक नोटीफिकेशनला मोठ्या आशेने ती फोन चेक करत होती,तिची अस्वस्थता वाढत चालली होती.ती जरावेळ डोळे मिटून पडली.
“ऋतू तू हे जे वागतेय ना ते तुला पटतंय का? काल रात्री जेवली नाहीस,आत्ता स्वयंपाक काय करायचा विचारतेय तर जेवायचं नाहीये म्हणतेस आणि I am sure तू लंचसुद्धा केलं नसेल. उपाशी राहणं हे सोल्युशन नाहीये ह्या प्रॉब्लेमचं,मी सरळ घरी फोन करून काकूंना सांगणार आहे.”

कालपासून वेद्च्या विचाराने पार सुकून गेलेल्या ऋतूला प्रिया ओरडलीच.तिच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून प्रिया तिच्याजवळ गेली,तिचा डोळा लागला होता. फोन तिच्या हातातच होता.

“तने बघ हे वेडं कोकरू झोपून गेलं.चेहरा पार सुकून गेलाय,हे असं असतं,प्रेमात लोकं वेडी होतात ती अशी.” तिच्या केसांवरून हात फिरवत प्रिया बोलली.

तनुने तिच्या हातातून फोन काढून घेतला,ती तो टेबलावर ठेवणार तसा तो वाजला,ऋतूची झोपमोड नको म्हणून तिने तो सायलेंट केला,फोनवर “ved’s sis” असं नाव दिसल्यावर मात्र तिने तो पटकन उचलला.

“हेल्लो”

“हेल्लो ऋतुजा,दादा इकडे घरी आलाय,त्याचं काम चालूये म्हणून फोन बंद असणार आहे त्याचा आणि तुला जे ऑफिसवर्क बद्दल बोलायचं होतं ना ते तो ऑफिसला आल्यावर डिस्कस करू असं म्हटला आहे.” तिने पढवलेल्या पोपटासारखं एकादमात सांगून टाकलं.वेद तिथेच बसून होता, फोन स्पिकरवर होता.ऋतूची प्रतिक्रिया ऐकायला,त्याहीपेक्षा तिचा आवाज ऐकायला वेद ही तेवढाच बेचैन होता. काहीतरी मनात ठरवून तनु म्हणाली.-

“हेल्लो thanks dear for information ,मी तिची friend बोलतेय तनु,माझा प्लीज प्लीज एक महत्वाचा निरोप वेदला देशील का,मी माझा नम्बर तुला whatsapp करते, त्याला सांग की ऋतूला नको पण तनुला तरी फोन कर खूप महत्वाचं आहे. सांगशील ना?”

“हो...सांगते” आरुने कन्फ्युज होऊन फोन ठेऊन दिला.दुसऱ्या मिनिटला तिचा फोन वाजला,ऋतूच्या मोबाईलवरून तिने आर्याला स्वतःचा नंबर पाठवला. वेद ही विचारात पडला. त्याने तनुचा नंबर सेव्ह करून घेतला,बराच वेळ कॉल करू की नको,ऋतू मुद्दाम तनुला तर बोलायला लावत नसेल ना? तो ही गोंधळला,पण फार ताणून ठेवण्यात अर्थ नाही म्हणून थोड्यावेळाने त्याने तनुला फोन केला.

“Hello,तनु बोल काय झालं?” कोरडेपणाने त्याने विचारलं.

“वेद,काय झालंय तुम्हा दोघांना का असे वागतात रे,काय चालूये,जीव घेणार आहात का एकमेकांचा?” तनु रडवेली होऊन म्हणाली.

“ए..एक मिनिट तुझा आवाज असा का येतोय काय झालंय,ऋतू ठीक आहे ना?” तो प्रचंड अस्वस्थ झाला.

“तुझा फोन बंद येतोय,तू कुठेय हे कळत नाहीये म्हणून जेवायचंच सोडलंय तिने कालपासून. मुर्खाने एक घास खाल्ला नाहीये.आमचं ऐकत नाहीये,काल रात्री तर सारखी रडत होती. पार सुकून गेली एका दिवसात.काय भांडायचं ते समोर समोर भांडा ना राव...एकाला कन्फेस करायचं नाहीये एकाला कन्फेशन ऐकल्याशिवाय पुढे जायचं नाहीये....काय खेळ लावलाय?” तिचा आवाज वाढला.

“ तनू...see I am very sorry,ही मूर्ख असं काही करेल याचा मी विचारच केला नाही. You just take care of her…मी आत्ता निघतोय बारा साडेबारापर्यंत तिथे पोहचतो, u just take care…”

“यार वेद, आता तू वेडेपणा करू नको,धावपळ करत येऊ नको,तू फक्त तिच्याशी बोल आणि तिला जेवायला सांग.” त्याच्या ह्या stand ने ती अजूनच घाबरली.

“नाही,नको मला आता फार गिल्टी वाटतंय.मूर्ख आहे ग ती! मागच्यासारखी आजारी पडली म्हणजे?माझ्या लक्षात आलं नाही,ठीक आहे,आता बोलण्यात वेळ घालवायला नको,मी बाबांची फोरव्हीलर आणतोय काळजी करू नको.I always drive responsibly.. Don’t worry,थांबवू नको, आता मला फक्त तिला बघायचंय.”

त्याने फोन ठेवला.तनु डोक्याला हात मारून बसली.
“काय ग काय म्हणाला? इतकी का टेन्स दिसतेय?” प्रिया तिच्या चेहऱ्यावरची काळजी वाचत म्हणाली.

“अगं,काय बावळट आहेत ही दोघं,तो आता निघालाय औरंगाबादहून म्हणजे त्याला इथे यायला साडे बारा होणार,ऋतूला सांगितलं तर ती अजून कशी react होईल माहित नाही.”

दोघीही हतबुद्ध होऊन बसल्या,वेद आला तर जेवण तयार हवं म्हणून त्या उठल्या आणि स्वयंपाकाची तयारी करायला लागल्या. तनुने परमिशनसाठी बोलून घेतलं.मनावरचं दडपण खूप वाढलं होतं. ऋतुजा अजूनही झोपलेली होती.

******

“बाबा,मी गाडी घेऊन जातोय पुण्याला,नेक्स्ट वीकएंडला घेऊन येईल.” वेद बॅग खांद्याला लावत म्हणाला.
“ घेऊन जा, पण वेद जाणं खरचं गरजेचं आहे। का? सकाळी गेलं तर नाही चालणार का?असं एकदिवसासाठी का धावपळ करत येतोस रे” बाबा काळजीने म्हणाले.

“अरे,आता कुठे निघालास? उद्या जा की सकाळी सकाळी,रात्रीची नको बाबा गाडी चालवू.”सीमाताई काळजीने म्हणाल्या.

“आई,पहिल्यांदा जातोय का मी? मागच्यावेळी ९ वाजता गेलो होतोच ना,खूप महत्वाचं काम आहे ग आई.मी अगदी सावकाश जाईल काळजी नको करू.” आईला एक मिठी मारत तो म्हणाला.

“तुला भूक लागली होती ना? टिफिन देते तुला पोहचल्यावर खाऊन घे.” वेद ऐकणार नाही हे पाहून त्या लगबगीने किचनमध्ये गेल्या.

आरुने त्याला पाणी दिलं आणि त्याच्या कानात कुजबुजत म्हणाली-“दादू काय झालं वहिनीला? तिला त्रास देऊ नको ना रे.”

“तू गप्प बस आणि जरा आईला अजून काही सांगू नको, मी सांगेन बरोबर वेळ आल्यावर,कळलं ना?” तिचे गाल ओढत तो म्हणाला.

“हो रे,कळतं मला,लहान आहे का मी?”गाल चोळत ती म्हणाली.

“ओके..काळजी घे दोघांची.” तो हसत म्हणाला.

“नीट,सावकाश जा रे” ती काळजीने म्हणाली.

आईने दिलेला टिफिन व्यवस्थित ठेवत त्याने गाडीचं दार लावलं.
“जातांना डीझेल भरून घे रे आणि सावकाश जा,फोन कर पोह्चलास की” जमेल तश्या सूचना प्रत्येकाकडून येत होत्या.
त्याची गाडी बंगल्याबाहेर निघाली आणि हळूहळू दिसेनाशी झाली.तो गेलेल्या वाटेकडे तिघेही कितीतरी वेळ बघत उभे होते.

******

ऋतूला जाग आली तेव्हा तिला प्रचंड थकवा जाणवत होता. प्रिया,तनु स्वयंपाक उरकून शांत बसून होत्या.

“अरे तन्या,प्रियु इतक्या शांत शांत का आहेत?” डोळे चोळत ती म्हणाली.
“ऋत्या उठ चल,फ्रेश हो आणि थोडं खाऊन घे,तू खूप जीवाला घोर लावते यार.” प्रिया वैतागत म्हणाली.

“ प्रियु का गं चिडते आणि आज माझी स्वयंपाकाची टर्न असतांना का नाही उठवलं मला आणि मी काय घोर लावतेय जीवाला,मला नाहीये भूक,नाही होतं माझी इच्छा.” बेडवरून उठत ती म्हणाली, डोळ्यासमोर अंधारी येत असूनही ती हट्टाला पेटली होती.

“स्वयंपाक करायला काही STAMINA ठेवलाय का आपण MADAM? कालपासून काय चाललंय तुझं बघतोय आम्ही. प्रियु ह्या दोन मूर्खांना काय करायचं ते करू देत,आपण जेवून घेऊ” तनु चिडून बोलली.

“दोन मूर्खांना?” जाताजाता ऋतूने आश्चर्याने विचारलं.

“म्हणजे तो फोन न उचलणारा एक मूर्ख आणि एक तू.”ती जरा सावरत म्हणाली.

फोनचा विषय निघताच ती मागे फिरली आणि फोन शोधायला लागली.

“ओह्ह नो,आर्या फोन करणार होती,मी कसं विसरले.” तिने घाईघाईत फोन चेक केला,आर्याची कॉल हिस्टरी तनुने डिलीट केली होती.ती नाराज झाली.तिने फोन बेडवर फेकला.
तनु आणि प्रिया जेवण करून आवरून, गॅलरीत येऊन बसल्या,ऋतू पोटाशी पाय दुमडून तिच्या झोपाळ्यावर बसली होती.

“आता नाही का त्याचा फोन ट्राय करणार?” तनु तिला चिडवायला म्हणाली.

“नाही,जाऊ दे,ठीक असेल तो,त्याला काळजी नाही जराही.” तिचे पुन्हा डोळे भरून आले.

“आता रडू नको,पोटात काही नाहीये आणि सारखी रडतेय” प्रिया रागवत म्हणाली.

“इतकं चिडायचं का गं एखाद्याने,फोन बंद करून बसायचं दोन दोन दिवस..काय म्हणे तर स्क्रिप्ट लिहत असेल,हाच एकमेव महान लेखक आहे जगात ज्याला मोबाईलचा इतका त्रास होतो.”
डोळे पुसत ती म्हणाली.

“ये रुदाली, बस्स यार आता वेदपुराण, आपण movie बघायचा पीसीवर तुझा फेवरेट..?”

प्रियाला तिने हळूच डोळा मारला.

“ये हो आज ऋतूचा फेवरेट movie बघायचा.” प्रियाने री ओढली.
आता ह्या दोघींचा मूड खराब करायला नको म्हणून ऋतू ‘हो’ म्हटली.

“ओके! पण तू एक कप तरी दुध घ्यायला हवं.”

“ठीक आहे.” म्हणून ती किचनमध्ये गेली.

तनुने पीसी ऑन केला.

“बरं कुठला बघायचाय तुला सांग?”

“कहो ना प्यार है.” ती एकदम बोलून गेली आणि मग जीभ चावत तिने दोघींकडे बघितलं.

ही काही सुधारणार नाही म्हणून दोघींना खळखळून हसू आलं.
“बघ इथंही हेच आहे ऋत्याचं...कहो ना प्यार है म्हणे...अगं वेडाबाई प्यार आहे म्हणून तर इतक्या रात्री..” प्रिया बोलणार तोच तनुने तिचा हात दाबला.

“इतक्या रात्री काय..?” ऋतूने गोंधळून विचारलं.

“आमचं प्रेम आहे म्हणून इतक्या रात्री हा ऐतिहासिक काळातला पिक्चर बघतोय न तुझ्यासोबत.” तनु सावरत म्हणाली.

मुव्ही सुरु होता,रितिकच्या जागी वेदला इमजीन करत ऋतू स्वतःच लाजत होती.साधारण बाराच्या सुमारास तनुचा फोन वाजला.ती आतल्या बेडरूममध्ये गेली.

“हेल्लो तनु मी पोहचतोय एक १५ मिनिटांत,नक्की काही प्रोब्लेम नाही ना? तिला समोर बसवून जेवायला सांगेन आणि मग जाईन, एक अर्धा तास फक्त...is it ok?”- त्
यांच्या रूमवर यायला awkward होत असल्याने त्याला काही सुचत नव्हतं.
“वेद बिनधास्त ये, सोसायटीमध्ये तीन लिव्हीनचे कपल आहेत ऑलरेडी.तसा काही प्रोब्लेम नाहीये इथे.आपला फोन झाल्यावर मी लगेच परमिशन घेतली आणि खाली नाईट वाचमनला ही सांगून ठेवलंय.तो डीटेल्स मागेल,बायोमेट्रिक घेईल, ते देऊन एन्ट्री कर.Don’t worry.”

“Ok, आलोच,सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय..”

“आम्हाला? आम्ही तर झोपतोय...काय बोलायचं,भांडायचं ते तुमचं तुम्हीच बघा...” ती हसत म्हणाली.

“ओके...चल आलोच..”

तनु बाहेर आली,प्रियाला हळूच इशारा केला.
“ये यार खूप बोर होतंय,झोप येतेय..चल मी जाते झोपायला आत..”

“तुला मुव्ही बघायचाय तर बघ,आवाज आणि ह्या लाईटने मलापण इथे झोप येणार नाही तेव्हा मीसुद्धा जाते. ”

“ये काय यार,थोडा तर राहिलाय,थांबा न” ऋतू ने हट्टाने म्हणाली.
“ये नाही आणि अगं ऐक समोरच्या प्रेरणाचा फोन होता,काल घेतलेलं माझं चार्जर द्यायला येतेय ती तेवढं कलेक्ट कर प्लीज,मला फार झोप येतेय.”.

“चार्जर? आत्ता? इतक्या रात्री?,सोनं लागलंय का त्याला, what rubbish ?” ऋतू गोंधळली.

“माझं फेवरेट चार्जर आहे ते, कलेक्ट कर,इतकं पण करणार नाहीस का? मला खूप झोप आलीय यार.बाय,गुड नाईट.” तनु न प्रिया आत निघून गेल्या पाठोपाठ लॅचचा आवाज झाला.

“चार्जर पण फेवरेट असतं का ? काय मैत्रिणी आहे राव...इतरवेळी आतली बेडरूम आवडत नाही कुणाला,भांडणं होतात आत कोण झोपणार यावरून आणि आज मला ह्यांची गरज आहे तर ह्यांना झोप येतेय.काही कळतं की नाही? आणि चार्जर? मध्यरात्री? इतकं वियर्ड काय वागत आहे सगळे माझ्याशी.” तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी दाटलं.

जरा वेळाने बेल वाजली,ती दचकली.तिने आयहोलमधून बघायचा प्रयत्न केला पण निट दिसत नव्हतं.तिने धडधडत मेन दरवाजा उघडला.सेफ्टीडोअरच्या बाहेर वेद होता.ती गोंधळली आणि तिने दरवाजा पटकन बंद केला.

“मला वेदचे काय भास होत आहेत,प्रेरणा वेदसारखी का दिसतेय यार” तिचं हृदय दुप्पट वेगाने धडधडायला लागलं.पुन्हा बेल वाजली.थरथरत्या हातांनी तिने मेन दरवाजा हळूच उघडला, सेफ्टीडोअरच्या बाहेर उभा असलेला वेदच मग ग्रील समोर येत म्हणाला-

“दरवाजा उघड सोना मीच आहे.”

ती स्तब्ध झाली.हात अधिकच थरथरायला लागले.ओठ जणू कोरडे पडले होते.तिने दरवाजा उघडला.वेद आत आला तसं पुन्हा डोअर व्यवस्थितपणे लाऊन ती जागेवर खिळली.त्याने बॅग चेयरवर ठेवली. दोघेही समोरासमोर होते नजरेला नजर भिडवून.त्याच्या नजरेत प्रेम,काळजी एकवटली होती तर तिच्या डोळ्यात राग,गोंधळ,आश्चर्य,आनंद सगळंच..! बोलत कुणीच नव्हतं पण डोळे काम चोख बजावत होते.तिने मोठ्या क्लचने केस वर बांधले होते,काही विस्कटून डोळ्यांवर येत होते,अंगावर पोल्का डॉट्स पिंक टी आणि पायजमा.तो समोर होता,बराच वेळ गाडी चालवून येणारा थकवा चेहऱ्यावर जाणवत असला तरी तिला समोर पाहिल्यावरचं समधान,शांतता जाणवून येत होती.

“रागाने बघायचा काही विषय नाहीये. मी येणार हे तनुप्रियाला माहित होतं,आणि ALL THE WAY औरंगाबादहून DRIVE करून आलेलो आहे,फक्त तू न जेवायचा मूर्खपणा करतेय म्हणून” बोलायला सुरुवात करावी म्हणून तो बोलला.

ती दाराला टेकून अजूनही गोंधळून उभी होती आणि तो तिच्या जवळ येणार तोच तिच्या डोळ्यात पाणी दाटलं,जडावलेल्या आवाजात अन प्रचंड रागात ती बोलली-

“एकसुद्धा पाऊल माझ्याकडे टाकू नको वेद”

“ओके,तू शांत राहा,ओरडू नको,कूल डाऊन..प्लीज़” तो जागेवर थांबला.

“समजतो काय रे तू स्वतःला? मी काही तास काय तुला इग्नोर केलं तू तर अगदी इर्षेने बदला घेतलास.मी बालिश आहे मान्य आहे,सगळं,सगळं कळत असूनही इन्सिक्युर होते मी,तुला बोलतं करायचे फुलीश प्रयत्न करते,मी मूर्ख आहे असं समज,पण तू? तू काय केलंस? नेहमीपेक्षा जोरात गाडी घेऊन गेलास,फोन बंद करून बसलास.रात्री जेव्हा जाग येईल तेव्हा तू फोन चालू केला असेल का? हे चेक करत होते वेड्यासारखं.मधूनच काहीही विचार यायचे. अभयचा नंबर नाही,तुझ्या घरचा नंबर नाही,मी काय करायचं होतं सांग? ऑफिसला आले तर तू सुट्टी टाकलेली,मी सैरभैर झाले होते वेद.मी नाही अजून तुला पूर्ण ओळखत,तुला राग आल्यावर तू कसा वागू शकतो,कसा REACT होतो,काय करू शकतो, मला नव्हतं माहित.मी खूप घाबरले होते..पण तुला काय त्याचं? तुला मी दिला त्यापेक्षा जास्त त्रास देण्यात इंटरेस्ट होता.” ती मुसमुसत बोलत होती,तो समोर उभं राहून फक्त शांतपणे ऐकत होता.

“त्या आत झोपलेल्या दोघींना तर मी बघून घेईन,किती नाटकं करतात? आणि तुला रात्री DRIVE करत यायची गरज होती का? सर्वांना काळीजत टाकायचं ठरवलंच आहे का? बोल ना? मख्खासारखं काय उभा आहेस?

“ते मी तुला....”

“तू गप्प बस! बोलू नकोस. तू नेहमी मला रडवतोस,ट्रेनिंगमध्ये मी भांडायचे त्याचा बदला घेतोस,बरोबर ना? बोल ना,आता का गप्प उभा आहेस?”

“तेच सांगतोय..तू..”

“शांत बस!मला बोलायचं नाही ये तुझ्याशी...मी इतका वेळ बोलतेय तुला काहीच नाही त्याचं...कारण तुला माहितीये मी मूर्ख आहे,तुझ्यासाठी पझेसिव्ह आहे,मला काही सुचत नाही तुझ्याशिवाय... हो ना?

“ऐक ......................” आधीच थकलेला असल्याने त्याचा आवाज क्षीण झाला होता.

“ऐक काय ऐक..आता तुला समजलंय चूक कुणाची आहे ते...”

दोन दिवसाचा त्याचावरचा राग किती काढू आणि किती नको असं तिला झालेलं.

आता मात्र न राहवून तो बळजबरीने पुढे आला.अगदी जवळ येऊन तिच्या ओठांवर बोट टेकवलं-

“ SHUUUUUUUU,गप्प एकदम,गप्प्प...हो ठीक आहे चुकलं माझं..म्हणुन तर लगेच आलो ना,राहवलं गेलं नाही सोना तू इतकी डिस्टर्ब झालीये हे ऐकून. काल रात्री चिडून बसने घरी निघून गेलो.थोडा तुलाही त्रास द्यावा म्हणून फोन बंद ठेवला,मला नव्हतं माहित तू इतकं टेन्शन घेशील.तनुने तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा सकाळी निघण्याइतका ही पेशन्स राहिला नाही..आणि लगेच निघून आलो.तुला सरप्राईज द्यायला.”

“दूर हो,ह्याला सरप्राईज नाही शुद्ध मूर्खपणा म्हणतात...” तिने डोळे पुसले आणि दोन्ही हातांनी दूर ढकललं.तो थोडासा दूर झाला..त्याने कान पकडले,हळूच सॉरी म्हटलं.त्याचा तो क्युटसा चेहरा बघून खरतरं ती विरघळली पण नाटकीपणे तिने मानेनेच नकार दिला,डोळे पाणावले होते. त्याने हात पसरवले.

“come here”

तिच्या आसवांचा बांध फुटला तिने त्याला गच्च मिठी मारली.त्याच्या छातीवर डोकं ठेवून ती रडत राहिली.त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.हनुवटीला धरून तिचा चेहरा त्याच्या समोर केला.

“झालं रडून? बोलू जरा ?”

“नाही..!!” हातांचा वेढा अधिकच गच्च करत ती म्हणाली.
तिच्या गालावर आलेल्या केसांना त्याने हलकेच बाजूला केलं,तिच्या कपाळावर ओठ टेकवून हलकेच तिची मिठी सैल केली आणि खांद्याला धरून तिला समोर उभं केलं.

“आपण स्पेशली उद्या वेळ काढून अजून काही भांडायचं राहीलं असेल तर त्यासाठी भेटूया ,पण आता जेवून घे, मला सुद्धा खूप भूक लागली आहे,साडेपाच तास गाडी चालवून आलोय तुझ्यासोबत जेवायला.जा आणि एकच प्लेट आण आणि बॅग मधला टिफिन पण घे . ”

तिने ताट वाढलं, त्याने पहिला घास तिला भरवला.हे क्षण संपूच नये असं तिला वाटत होतं.

जेवण आटोपून तो जायला निघाला.

“नक्की जाऊ?” तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला.

“जा,उशीर होईल..” ती हात सोडवायचा प्रयत्न करत म्हणाली,तसं तिला जरा स्वतःकडे खेचत तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला-
“अजूनही कन्फेशन दिलं नाहीये तू किंवा मी”

“आता मला गरज नाहीये त्याची” तिने लाजून नजर चोरली.

“पण आत्ता मला एका गोष्टीची गरज आहे..”

“कुठल्या?”

“एक कॉफी प्लीज...!”

“अरे मग बस थोडा वेळ आण......” ती बोलता बोलता थांबली,त्याच्या बोलण्याचा अर्थ कळून ती बावरली,गोरीमोरी झाली. तिने त्याच्याकडे पाहिलं,तो गालात हसला,दोन खळ्यांनी त्याच्या हसण्याला अजूनच गोड बनवलं.

तिला हलकेच जवळ घेऊन त्याने तिच्या पापण्या मिटल्या आणि ओठ टेकवले आणि तिच्या कानाजवळ हलकेच म्हणाला-“ह्या नंतर ह्या डोळ्यांना असं रडून त्रास द्यायचा नाही,माझी अमानत आहे ही तुझ्याकडे,व्यवस्थित सांभाळायचं काय!!” ती लाजली.

आता ह्या क्षणाला असं दूर जायला दोघांच्याही जीवावर आलं होतं,पण तो निघाला.

आजच्या प्रवासात महिन्या अखेरीस येणाऱ्या लॉंग वीकएंडची आणि त्यात येणाऱ्या ऋतूच्या बर्थडेची आणि एका हटके कन्फेशनची सर्व तयारी झाली होती.

सरप्राईज तर मिळणार होतं ...पण कुणाला? आणि कसं?
वेद प्रेमाच्या सुंदर क्षणांच्या गोड धुंदीत रूमवर जायला निघाला.
एव्हाना आकाशात तोऱ्यात मिरवणारी चंद्रकोर अचानक एका काळ्याकुट्ट ढगाने झाकोळली गेली होती...!

क्रमशः

©हर्षदा