shetkari Andolan 1847 books and stories free download online pdf in Marathi

शेतकरी आंदोलन १८४७ चे !

"सर चार्ल्स जॉन कॅनिंग ,गव्हर्नर ऑफ मुंबई प्रोव्हिन्स "--- सोनेरी अक्षरातली ती पाटी डेव्हिडसन ने वाचली आणि शिरस्तेदारला आपण सर कॅनिंगना भेटू इच्छितो म्हणून सांगितले .एक कडक सलाम करून शिरस्तेदार त्या ऑफीस मध्ये शिरला आणि काही सेकांदातच परत आला व डेव्हिडसन ला आदराने आत घेऊन गेला प्रशस्त चकचकीत पॉलीश केलेले सागवानी टेबलं , त्यावर सोनेरी टाक आणि दौत , सिगारची नक्षीदार लाकडी पेटी ,भिंतीवरील मुंबई आणि मडगाव बंदराची सोनेरी फ्रेम मधील भव्य पेंटिंग आणि मागे ब्रिटनच्या किंग एडवर्ड ७वे यांचे भव्य पेंटिंग .,गुबगुबीन गाद्या लावलेल्या प्रशस्त खुर्च्या ,भव्य उंच खिडक्या व त्यांना लावलेले मोहक पडदे ..हे सर्व वैभव पाहून डेव्हिड्सन हरखून गेला.तेवढ्यात सर जॉन कॅनिंगने प्रवेश केला डेव्हिडसन ने उभे राहून अभिवादन केले मग दोघांनी शेकहॅण्ड केला

"वेलकम टू इंडिया ,आणि मुंबईत आपले स्वागत असो."......---सर कॅनिंग

" थँक्स सर कॅनिंग,आपणास भेटून खूप आनंद झाला ."---डेव्हिड्सन

"इंग्लंडची हवा कशी आहे "---सर कॅनिंग

"काही विचारू नका ,एप्रिल महिन्यात सुद्धा यावर्षी थंडी होती ,दिवसेंदिवस थंडी लांबत चाललीये आणि वसंत ऋतू कमी होत चालला आहे"--डेव्हिड्सन

"आमच्या आजोबांच्या काळापासून मी हेच ऐकत आलोय !"-----लॉर्ड कॅनिंग

आणि मग दोघे खळखळून हासले.

मग डेव्हिडसनने खास स्कॉटलंडहून आणलेल्या व्हिस्की बॉटल आणि रस्त्यात विकत घेतलेल्या फ्रेंच वाईन च्या बॉटल्स अश्या अनेक वस्तू लॉर्ड कॅनिंगला दिल्या आणि त्याच्या चेहेऱ्यावरचे हसू आणखीनच खुलले .

"ओ माय गॉड़ ,आता मी आणि माझे कुटुंब तुमचे कायमचे ऋणी झाले!" लॉर्ड कॅनिंग

अनआणि दोघे परत एकदा खो खो हसले

आणि मग कॅनिंगने मुख्य विषयाला हात घातला .. त्याने सुरवात केली

"मिस्टर डेव्हिड्सन , बरोबर ३० वर्षांपूर्वी म्हणजे १८१८ साली हा मुंबई इलाखा पेशवा कडून कंपनी सरकार कडे पूर्ण ताब्यात आला .इतकी वर्षे आपण जुने मुघल दप्तर आणि काही ठिकाणी पेशवे दप्तर यांच्या आधारे रेव्हेन्यू आकारणी केली पण त्या,मध्ये अनेक प्रॉब्लेम आले .शेतकऱ्यांची नावे ,जमिनीचा आकार,जमीनींची प्रतवारी ,आणि त्यावरचा रेव्हेन्यू यात अनेक तक्रारी आणि घोटाळे आहेत. .देशी लोक काही ठिकाणी हाताने तर कधी काठीने जमीन मोजतात त्यामुळे मोजणारा बदलला कि आकार बदलतो!

आपल्याला आता नव्याने सर्वे संपूर्ण मुंबई इलाख्यात करायचा आहे ,त्यापैकी खान्देशसाठी तुमची नेमणूक आहे "---लॉर्ड कॅनिंग

"किती दिवसात हे काम, करायचे व किती माणसे आहेत कामाला ?"---डेव्हिड्सन

"३ वर्षे धरली आहेत ,सुरुवातीला ३ सर्वेयर, ३ सर्वे कामगार ,आणि सोबत ४ लोक खानसामा,सामान वाहतूक वगैरे कामासाठी आहेत.. हे सर्वेयर फक्त जुजबी इंग्रजी लिहू वाचू शकतात ,,,त्यांना सर्वे चे काम शिकवून तयार केले कि तुमच्या मागणी प्रमाणे आणखी कारकून भरती करू . तुम्ही किती लवकर लोकांना शिकवू शकता त्यावर किती वेळ लागेल ते ठरेल :...लॉर्ड कॅनिंग

"खान्देश किती मोठा डिस्ट्रिक्ट आहे?"...डेव्हिड्सन

"१० हजार चौरस माईल "... लॉर्ड कॅनिंग

"ओह माय गॉड " डेव्हिड्सन

"घाबरू नका ,यापैकी बराच भाग डोंगराळ व पडीक आहे.आत्ता आपल्याला फक्त पेरणीखालील भागाचा सर्वे व रेकॉर्ड तयार करायचा आहे व तोही इंग्लिशमध्ये "...लॉर्ड कॅनिंग

" मग आत्ता कुठल्या भाषेत आहे?"...डेव्हिड्सन

"काही पर्शिअन आणि काही मराठी मोडी लिपी आसा सर्व गोंधळ आहे "--लॉर्ड कॅनिंग

"देशी लोकांना इंग्लिश येते का?"---डेव्हिड्सन

"गेली २० वर्ष आम्ही अनेक शाळा काढून इंग्रजी शिकलेले कारकून तयार केले आहेत "...लॉर्ड कॅनिंग

"ओह "....डेव्हिड्सन

"त्यापैकी तीन कारकून तुम्हा;ला दिले आहेत "--आणि कॅनिंग ने शिरस्तेदारला खूण केल्याबरोबर तो तीन जणांना घेऊन आला . तिघांनी अदबीने नमस्कार केला .पांढरे धोतर,पांढरा अंगरखा व डोक्यावर लाल पगडी असे दोघे होते तर तिसरा संपूर्ण ब्रिटिश पोशाखात होता

" तुमची नावे सांगा "--कॅनिंग

" मी लक्ष्मण आबाजी "--पहिला

"मी द्वारकानाथ सखाराम"..--दुसरा

"मी कावसजी पेस्तनजी "---तिसरा

"ओ माय गॉड ...लक ...लाकस --लकाशु ...मी कसा उच्चर करू आता "--डेव्हिड्सन

कॅनिंग मोठ्याने हसला

"हि अगदी सोपी नावे आहेत ..तिकडे मद्रास प्रॉव्हिन्स मध्ये गेलात तर तुमची बोबडी वळेल "--कॅनिंग

"सर होईल सवय हळूहळू "--लक्ष्मण

"मला फक्त नाथ म्हणा !"--द्वारकानाथ

"कावसजी हे जरा सोपे आहे !"--डेव्हिड्सन

"चला तुम्ही लोक, उद्या निघायची तयारी करा ! पर्वा सकाळच्या कोचने निघा "--कॅनिंग

'मी आता आमच्या टीमला भेटतो व सर्व सामान चेक करून घेतो "--डेव्हिड्सन

"तिथे कलेक्टर एल्फिस्टन ना रिपोर्ट करा. ते व मेजर मॉरीस तुम्हाला सर्व मदत करतील "--कॅनिंग

" थँक्स युअर ऑनर "--डेव्हिड्सन

"माय प्लेझर "--कॅनिंग

नवीन वातावरणाची डेव्हिड्सन ला खूप मजा वाटली. त्याच्या अंदाजा पेक्षा सर्व खूप खेळीमेळीचे वातावरण होते .

पण पुढचे ६ दिवस मात्र त्याला आयुष्यातले सर्वात खडतर वाटले !मुंबईतल्या फोर्ट मधल्या ऑफिस पासून कल्याण पर्यंत कोच होता तो अगदी मायदेशाप्रमाणे आरामदायक होता ..पण कल्याण ते जुन्नर नाणेघाटातून घोड्यावर प्रवास होता .डेव्हिड्सन स्कॉटलंडचा रहिवासी असल्याने घाटात त्याला विशेष कठीण वाटलं नाही पण दुपार होताच डोक्यावर ऊन तापले आणि तो हैराण झाला . जुन्नर पासून धरणगाव पर्यंत परत कोच सर्व्हिस होती ..पण इथले घोडे छोटे होते आणि रस्ते भयंकर धुळीचे होते .. धरणगाव ते यावल हा शेवटचा टप्पा घोड्यावर होता पण त्याआधी एल्फिस्टन कलेक्टरना रिपोर्ट करायचे होते

.बाकी माणसे व सामान पुढे रवाना झाले ..डेव्हिड्सन कलेक्टरना भेटायला त्यांच्या ऑफिस मध्ये गेला. त्यांचे मूळ ऑफिस धुळ्याला होते पण ते नेहमी दौऱ्यावर फिरत असत .धरणगाव त्यांचे आवडते ठिकाण होते!

 

एल्फिस्टन खूप वयस्क आणि अभ्यासू माणूस दिसला .

"मिस्टर डेव्हिड्सन ,मागच्या काही दिवसात मी सर्वे बद्दल थोडी माहिती वाचली ."---एल्फिस्टन

"तुम्हाला नवीन सांगायला नकोच ,,प्रथम या तीन लोकांना घेऊन सुरुवात करायची व सर्व सुरळीत सुरु झाले कि आणखी माणसे भरती करायची असे लॉर्ड कॅनिंग ने सुचवले आहे .आपले काय मत आहे ?'--डेव्हिड्सन

"त्यांचा सल्ला योग्य आहे . इथे धुळे धरणगाव जळगाव इथल्या शाळेत फारशी मुले इंग्रजी शिकत नाहीत पण कोकणातून आणि पुण्याकडून आम्ही इंग्रजी शिकलेले कारकून भरती करू ..अगदी पाहिजे तेवढे ..खूप लोक सरकारी नोकरीस इच्छुक आहेत "---एल्फिस्टन

"थँक्यू सर काही सूचना ?"--डेव्हिड्सन

"तीन वर्ष्यापुर्वी कलेक्टर बेल ने सर्वे च्या ऑर्डर काढल्या ,पण लोक खुणेचे दगड मिळत नाहीं म्हणून नाराज होते त्यामुळे त्यावेळी सर्वे रद्द केला .आता जे कराल ते काळजीपूर्वक करा. काही अडचण आली तर लगेच माझ्याकडे धरणगावला मेसेंजर पाठवा आणि मेजर मॉरीस ना पण लगेच कळवा !"

"चला आता आपण लंच घेऊ"--एल्फिस्टन

मग दोघे इंग्लंडच्या आठवणी काढत जेवायला निघून गेले आणि बाकीचे बैलगाडीने निघाले. लंच झाल्यावर डेव्हिड्सन ;त्याचा कूक कम वाटाड्या उस्मान ,आणि तिघे कारकून असा तांडा निघाला . प्रत्येक ठिकाणी नदीला उतारे कुठे आहेत हे उस्मान ला पक्के माहित होते त्यामुळे दोन्ही नद्या बिनबोभाट पार केल्या . तापीचे थंड पाणी पायाला लागल्यावर डेव्हिड्सन ला खूप फ्रेश वाटू लागले आणि पुढे तासाभरातच यावल किल्याची तटबंदी दिसू लागली .बाजूला टुमदार यावल गाव पण होते, किल्ल्यात कामगार तांडा आधीच पोहोचला होता आणि त्यांनी तंबू ठोकून तयार ठेवले होते . गावची चुकार पोरे लांबून हे सर्व दृश्य बघत होती .सर्वजण स्थिरस्थावर झाले .उस्मानने तंबूसमोर खुर्ची आणि घडीचे टेबल मांडले आणि मग डेव्हिडसनने स्कॉटलंड हुन आणलेली स्कॉच व्हिस्की बाटली उघडली.ग्लास भरला आणि संथपणे पिणे सुरु केले. तिघे कारकून आपल्या तंबूकडे गेले आणि स्वयंपाकाच्या खटपटीला लागले ..खानसामा मुसलमान असल्याने त्यांना हाताने स्वयंपाक करणे भाग होते पण पेस्तनजी मात्र उस्मानच्या हातचे चिकन खायला उतावीळ झाला होता ..पेस्तनजीला स्कॉच चा मोह अनावर झाला होता पण मोठ्या साहेबाला स्वतः सांगणार कसे म्हणून तो इकडून तिकडे उगीच फेऱ्या मारत होता . शेवटी एकदाचा डेव्हिड्सन च्या नजरेत तो भरला

. "या पेस्तनजी थोडी व्हिस्की प्या म्हणजे बरे वाटेल."--डेव्हिड्सन .

पडत्या फळाची आज्ञा घेऊन पेस्तनजी तिथेच मांडी घालून बसला आणि मग एक तास त्याने त्याचे पूर्वज कसे पर्शिया मधून मुसलमानांच्या अत्याचाराला कंटाळून भारतात गुजराथ मध्ये आले आणि मग कसे मुंबईत श्रीमंत झाले याच्या कथा सांगितल्या . डेव्हिडसवला हि माहिती नवीन होती

." मग तुला मुसलमानांचे जेवण कसे चालते आणि ह्या दोघांना का चालत नाही?"--डेव्हिडसनला गहन प्रश्न पडला.. भारतातल्या जाती पाती हा मोठा कठीण प्रश्न मग पेस्तनजी पुढचा एक तास डेव्हिड्सन ला सांगत बसला . एव्हाना उस्मानने तंदुरी चिकन पुढ्यात आणून ठेवले होते आणि मग डेव्हिडसनला एव्हड्या भयंकर हवामानात इंग्रज लोक कसे आनंदात राहतात त्याचे रहस्य समजले . कुठे ते इंग्लंडमधले बेचव चिकन आणि कुठे हि चविष्ट भारतीय तंदुरी. .सर्वे संपताच परत जाण्याचा विचार बदलून डेव्हिडसनने पुढच्या वर्षी बायको व मुलीला भारतात आणण्याचा विचार पक्का केला आणि त्या विचारात तो झोपेच्या अधीन झाला. थंडी वाढली ,रातकिड्यांची किरकिर वाढली ,कुठून तरी घुबत ओरडले आणि क्षणभर डेव्हिडसनला आपण स्कॉटलंड मध्ये गेल्याचा भास झाला

यावलच्या किल्ल्यात आज अगदी भयाण शांतता होती!

 

दुसऱ्या दिवशी सगळे खूप उत्साहात होते .आजपासून सर्वे ची सुरुवात होणार होती. स्कॉटलंड ते लंडन कोच ,मग बोटीने मुंबई ,मग परत कोच ,मग घोडे असा सर्व प्रवास डेव्हिडसनला आठवला . सर्व टीम जमली आणि मग अचानक शे दीडशे "नेटिव्ह" लोकांचा जमाव मोठ्याने बोलत त्यांच्याकडे येऊ लागला .डेव्हिडसवला आश्चर्य वाटले . एव्हड्या लोकांचे काय काम? मग गावचे पाटील आणि कुलकर्णी पुढे येऊन काहीतरी सांगू ;लागले .लक्ष्मन आणि द्वारकानाथ दोघांना ते काय बोलतात ते मुळीच समजेना .ते अस्सल अहिराणीत मोठ्यामोठ्याने बोलत होते . मग लक्ष्मणने उस्मानला बोलावले .

"हुजूर ते म्हणताहेत इथे जमिनीच्या कोपऱ्यावर लावायला दगड मिळणार नाहीत आणि काम करायला मजूर पण मिळणार नाहीत!"--उस्मान

लक्ष्मणने इंग्रजीमध्ये समजावून सांगितले

"ठीक आहे उद्या मजूर आणा ,उद्या काम सुरु करू"--डेव्हिड्सन

तरी पण जमाव हलेना .मग उस्मानने काहीतरी हलक्या आवाजात सांगितल्यावर ते हळूहळू परत जाऊ लागले .पाटील व कुलकर्णी तिथेच उभे होते त्यांनी मग खरी माहिती सांगितली

लोकांचा मोजणीला विरोध होता त्यामुळे ते दगड नाहीत,मजूर नाहीत अशी करणे सांगत होते

"दुसऱ्या गावातून मजूर आणा पण सर्वे उद्या सुरु झालाच पाहिजे " –डेव्हिड्सन

 

मग सारा दिवस असाच इकडेतिकडे करण्यात गेला . लक्ष्मण आणि द्वारकानाथ अख्खा किल्ला फिरून आले .त्यांना सीताफळाची झाडे सापडली पण सर्व सीताफळे लोकांनी आधीच तोडून नेली होती. .शेवटी थोड्या चिंचा आणि आवळे यावर समाधान मानून ते तंबूत परत आले .आणि कोकणकडल्या गप्पा मारत बसले .दोघेही कोकणाबाहेर पाहिल्यान्दाच आले होते आणि नोकरीचा अनुभव पण पहिल्यांदाच घेत होते आणि त्यात हे विघ्न समोर उभे ठाकले होते!.दिवस असाच आळसात गेला ..रात्र पडली आणि रातकिडे,घुबडे वगैरे निशाचर परत आपल्या कामावर रुजू झाले .

सूर्य कासराभर वर आला,सर्वजण कामासाठी सज्ज झाले पण बाहेर लांब अंतरावर सर्वत्र कुजबुज आणि दबक्या सुरातले बोलणे ऐकू येऊ लागले . डेव्हिड्सन ने बाहेर येऊन पहिले तर सर्व बाजूनी माणसेच माणसे दिसत होती आणि त्यांचा हा गोंगाट त्याला ऐकू येत होता. डेव्हिड्सन बाहेर येताच घोषणा सुरु झाल्या

"सर्वे बंद करा "

"गोरा साहेब परत जा ,परत जा "

"दीन दीन "

हळूहळू काही लोक पुढे आले आणि हातवारे करून अहिराणी मध्ये काहीतरी ओरडू लागले व तंबूकडे बोट दाखवू लागले . उस्मान धावत आला

"या अल्ला ,क्या हुआ ?--उस्मान

"सर्वे आत्ते च्या आत्ते बन करा आन बठठे लोक अथन निंघा " --पहिला

" तंबू उखाडीसन फेकी द्यू आन सर्वासले मार खाना पाडीन "--दुसरा

उस्मान आणि पेस्तनजीने सर्व इंग्रजी मध्ये डेव्हिड्सन ला सांगिल्यावर तो धास्तावला .त्याच्याकडे एक पिस्तूल होते पण एव्हड्या जमावासमोर एक पिस्तूल कुचकामी होते .

"आम्ही ब्रिटिश सरकार चे नोकर आहोत आम्ही कलेक्टरना विचारून उत्तर सांगतो "--डेव्हिड्सन

पण तेव्ह्ड्याने लोकांचे समाधान होईना .लोक तिथे हातवारे करत व घोषणा देत उभे राहिले .. मग लोकांना शांत करून उस्मान आणि द्वारकानाथ घोड्यावरून धरणगावला रवाना झाले .

इकडे डेव्हिड्सन तंबूत येरझारा घालत बसला आणि लोक बाहेर बसून राहिले .सुदैवाने कोणी हिंसा करण्याच्या मनःस्थितीत नव्हता .जमाव आता भजने म्हणू लागला. बाकी लोक भाकरी खायला बसले पण कोणीच जाण्याचे नाव घेईना .

उस्मान आणि द्वारकानाथ फक्त दोनदा घोडयाना पाणी पाजायला थांबले आणि काही तासातच धरणगावला कलेक्टर ऑफिसात हजार झाले

"काय झाले द्वारकानाथ"--एल्फिस्टन

"युअर ऑनर दंगा होऊ शकतो दोन हजार लोक जमा झाले आहेत "--द्वारकानाथ

"कोणाला इंज्युरी ?"--एल्फिस्टन

"सर्व लोक ठीक पण लगेच तिथून निघावे लागेल "--द्वारकानाथ

"ठीक तुम्ही लोक यावल सोडून द्या व सावद्याकडे निघा. तिथे सिविल इंजिनिअर बेल साहेबाचा मुक्काम आहे त्यांच्या सोबत राहा "--एल्फिस्टन

तुमच्याबरोबर माझे असिस्टंट हॅवलॉक आणि बॉस्वेल पण येतील त्यांना इथली चांगली माहिती आहे "

 

मग चौघे घोडेस्वार जलद गतीने यावल कडे रवाना झाले

एल्फीस्टनने कर्नल मॉरिस ला बोलावणे पाठवले आणि सर्व परिस्थिती समजावून सांगितली . कर्नल मॉरिस ने भिल कोअर ला १ तासात तयार राहण्याची ऑर्डर दिली . रांगड्या भिल्ल लोकांमधून अनेक वर्षांपूर्वी मॉरिस ने भिल कोअर हि देशी रेजिमेंट बनवली होती आणि लहानमोठ्या कामासाठी ती खूप उपयोगी ठरली होती. भिल्लांची लहानसहान बंडे ,दोन गटातल्या मारामाऱ्या ,पेंढाऱ्यांचा बंदोबस्त ,दरोडेखोरांचा पाठलाग आणि बंदोबस्त अशी अनेक कामे भिल कोअर ने केली होती . अर्ध्या तासातच १५० सैनिकांची तुकडी कूच करण्यासाठी तयार झाली. अर्धी खाकी पॅन्ट , जाड चामडी बेल्ट ,कमरेला तलवार,उजव्या बाजूला जाड दांडू लटकावलेला ,डोक्यावर जाड खाकी टोपी ,छातीवर भिल कोअरचा एम्ब्लेम'अशी भिल कोअर मार्चसाठी तयार झाली. फक्त आणिबाणीमध्येच भिल कोरला बंदुका देत असत . देशी घोड्यावर स्वार रेजिमेंट धीम्या गतीने मार्च करत निघाली. लांब मिशातले ,काळेकभिन्न भिल्ल लोक बघून कोणालाही छातीत धडकी भरे .

भिल कोअर च्या मार्चचा धुराळा खाली बसला आणि त्यामागे पूना हॉर्स ची ७वि तुकडी ५० लोकांची होती ती पण निघाली. पांढरीं शुभ्र पॅन्ट, पांढरा शर्ट ,लाल चामड्याचा बेल्ट , डाव्या बाजूला तलवार लटकवलेली व उजव्या खांद्यावर रायफल लटकवलेली ,डोक्यावर हॅट ,छातीवर पुन्हा हॉर्स चा एम्ब्लेम ,,,असा सर्व थाट होता कारण हि तुकडी पूर्ण गोऱ्या लोकांची राखीव तुकडी होती .कोरेगावचे युद्ध,काबुल आणि कंदाहारची लढाई अश्या अनेक लढाया ७ व्या पूना हॉर्स रेजिमेंट ने जिंकल्या होत्या.. सहा फूट उंच,गोरेपान ,लांब नाकाचे, निळ्या डोळ्याचे हे धिप्पाड सैनिक आणि डोक्यावर स्टायलिश हॅट बघून कोणाच्याही हृदयात धडकी भरे ..आज मात्र त्यांना युद्ध करायचे नसून त्या भागाची माहिती आणि राखीव सैन्य अश्या दुहेरी उद्देशाने त्यांना बरोबर घेतले होते

.

"यावलले शेतकर्यासना दांगडो व्हयना "---रस्त्यातील गावात एकच बातमी वणव्या सारखी पसरली पण कोणी घर सोडण्याची हिम्मत केली नाही. बायाबापड्या आणि माणसे घराघरातून हा देखावा चुपचाप बघत बसले.

 

युनियन जॅक घेतलेला ध्वजधारक आणि पाठोपाठ दीडशे लोकांची तुकडी यावलच्या किल्ल्यात शिरली आणि त्याच्या आधीच अर्धेअधिक लोक घरी पळाले पण काही लोक अजूनही बसले होते .

मग हॅवलॉक ने करणा हातात घेऊन हिंदुस्थानी भाषेत बोलायला सुरुवात केली.

"सर्व लोकहो, सर्वे हे सरकारी काम आहे. त्यात अडथळा आणणे हा गुन्हा आहे . पण आत्ता एल्फिस्टन साहेबाच्या आदेशाप्रमाणे सर्वे बंद करण्यात येत आहे .तुम्ही सर्व आपल्या घरी जा "

मग उरलेले लोकही घरी गेले . कामगारांनी तंबू आवरला .सामान गाडीत चढवले व सावद्याकडे निघाले. सावद्याला इंजिनिअर बेल साहेबाचा मुक्काम होता तिथे सर्वानी जावे असे ठरले .डेव्हिड्सन , लक्ष्मण ,द्वारकानाथ उदास अंतःकरणाने घोड्यावर स्वार झाले .

सर्वांच्या मनात अनेक आशा आकांक्षा होत्या . उज्ज्वल भविष्य ,नोकरी ह्याची स्वप्न ह्यांचा आता चक्काचूर होणार काय अशी शंका येऊ लागली होती . विशेषतः डेव्हिड्सन एवढ्या दूर प्रवास करून आला आणि त्याच्यापुढे हे वाढून ठेवले असेल अशी पुसटशी कल्पना मनात आली नव्हती .

यावलचा किल्ला परत एकदा सुनसान झाला रातकिडे ,घुबडे आणि आता लांडगे यांचं साम्राज्य परत सुरु झालं .

यावल हुन सर्व टीम धास्तावलेल्या वातावरणात सावद्याला पोहोचली .पण त्याआधी बातमी पोहोचली होती .पंचक्रोशीत सर्वत्र घरोघरी चर्चा सुरु झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा गर्दी जमा होऊ लागली . प्रथम शंभर होती ती आता हजाराच्या वर पोहोचली मग जमावातून घोषणा ऐकू येऊ लागल्या . बेल साहेब अनुभवी होता त्यांते सर्वाना एका जागी जमवले आणि जमावाला त्यांचा पुढारी पाठवण्यास सांगितले. दहाबारा लोक मोठ्यामोठ्याने अहिराणी भाषेत बोलत पुढे झाली .

"नमस्कार साहेब बहादूर"--यावेळी म्होरक्या गावचा सर्वात चतुर माणूस बाळा चौधरी पुढे आला

'सलाम, बोला काय म्हणणे आहे ?'-- डेव्हिड्सन मोडक्या तोडक्या हिंदुस्थानी मध्ये बोलला

"आम्हन म्हंन्न एकच शे ,सर्वे बंद करा आन सर्वे लोक म्हमईले परत जा!"--बाळा चौधरी

द्वारकानाथ आणि उस्मानने इंग्रजी'मध्ये भाषांतर सांगितले . आता डेव्हिडसनच्या अंगात थोडे बाळ आले होते

"सर्वे सरकारी काम आहे तुम्ही बंद करू नका "--डेव्हिड्सन .

मग द्वारकानाथने समजावून सांगितल्यावर आणखी लोक मागाहून पुढे धावले आणि सर्वत्र झिंदाबाद झिंदाबाद सर्वे बंद सर्वे बंद : च्या घोषणा ऐकू येऊ लागल्या .. काही लोकांनी तंबूचे खांब उखडून टाकले .. सावद्याचे मामलेदार आणि महलकारी लोकांना समजवून सांगू लागले -- पण काही लोकांनी त्यांनाच बेदम मारहाण सुरु केली .कोणीतरी तंबूच्या खांबाने मामलेदाराला कपाळावर तडाखा दिला आणि मामलेदार बिचारा रक्तबंबाळ होऊन खाली पडला . महालकारी वाट फुटेल तिकडे पळत सुटला. डेव्हिड्सन ,बेल ,आणि इतरांनी ताबडतोब घोड्यांकडे धाव घेतली आणि घोड्यावर उड्या मारून जमावातून दूर गेले . जमाव अत्यानंदाने ओरडू लागला , असा बराच वेळ विजयाचा जल्लोष झाला आणि लोक हळूहळू घरी जाऊ लागले . सर्वे दुसऱ्यांदा बंद पाडण्यात त्यांना यश आले होते . आता परत काही दोनचार वर्षे सर्वे होत नाही असे सर्वांना वाटले असावे .. काही मायाळू लोकांनी माम्लेदारला घरी पोहोचवले आणि त्याच्यावर मलमपट्टी केली . सावद्यामध्ये रात्री उशिरापर्यंत लोक ठिकठिकाणी जमून एकच चर्चा करत होते .

"सर्वे बंद व्हयना"

"इंग्रज घाबरून पयी ग्यात "

 

इकडे डेव्हिड्सन आणि टीम रखडत धरणगावला पोहोचली आणि नवीन कलेक्टर मॅन्स्फील्ड ना सर्व परिस्थती समजावून सांगितली .. मॅन्सफिल्ड एक कडक शासनकर्ते होते . सरकारी कामात असा अडथळा आणणे त्यांनी ह्यापूर्वी कधीच खपवून घेतले नव्हते. प्रथम त्यांनी एक आदेश सर्व माम्लेदारना काढला कि सर्वे मध्ये अडथळे आणणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई केली जाईल. मॅन्सफिल्ड ने मग एक योजना तयार केली व एक दूत तातडीने मालेगावला पाठवला जास्त सैन्य मागवून घेतले .इकडे सगळ्या खान्देशात बातमी पसरली कि यावल आणि सावद्याला लोकांनी सर्वे टीम हाकलून लावली आणि सर्व इंग्रज निघून गेले .सगळीकडे जल्लोष सुरु झाला ..

यावल आणि सावद्यापाठोपाठ एरंडोलला काही लोकांनी बंड केले आणि मामलेदार कचेरीवर हल्ला केला . पण मामलेदाराने शिताफीने त्यांच्या म्होरक्याला कचेरीत डांबून ठेवले आणि स्वतः तातडीने धरणगावला गेला व मॅन्स्फील्ड ला सर्व परिस्थिती सांगितली .. त्याने तयार असलेले भिल कोअर चे पन्नास सैनिक घेऊन मामलेदाराला परत पाठवले . मामलेदार दिमाखात पन्नास लोकांना घेऊन गावात शिरला आणि कचेरीजवळच्या जमावाला हाकलून लावले व सभोवती सैनिकांच्या चौक्या बसवल्या . सर्वत्र शांतता झाली . तो दिवस तसाच शांततेत गेला आणि सकाळ उगवली . परत लोक जमू लागले आणि दोन तीन तासातच सर्व जमावाने सैनिकांना आणि चौक्यांना घेरून टाकले . सैनिक आत अडकून पडले. भिल कोअरकडे युद्ध असल्याशिवाय बंदुका नसत ,त्यांच्या दंडुक्यानं एवढा मोठा जमाव बिलकुल दाद देईना. मामलेदाराने आपली खास माणसे या गोधळात धरणगावला पाठवली आणि दोन तासातच कर्नल मॉरीस ने सर्व सैन्य जमवले.. मालेगावहून अड्वान्स तुकडी पोचली होती. १६वि नेटिव्ह रेजिमेंट ! मूळ राजकोटची पण गुजरात मध्ये शांतता असल्याने बरेच महिने मालेगावला होती . मुंबई इलाख्यात अजूनही पेशवाईच्या खाणाखुणा शिल्लक होत्या . त्यामुळे सतत लहानसहान बंडे होत .. १८४४ मध्ये यावलचे लालजी सखाराम चे बंड , पुढे वारखेड्याच्या राजपूत मन्साराम पाटलाचे बंड ,मालेगावचे अरबांचे बंड ,आणि भिल्लांची अनेक छोटी बंडें ,असे काहीतरी चालू असे.

कर्नल मॉरीस ने ह्यावेळी पक्का बंदोबस्त करण्याचे ठरवले होते . त्यामुळे सर्वात पुढे १६ वी नेटिव्ह रेजिमेंट चे ३०० सैनिक ,त्यामागे भिल कोअर चे १५० सैनिक, आणि त्यामागे पूना हॉर्स चे ५० गोरे सैनिक असा मोठा जमाव होता .. योजना सर्वाना समजावून सांगितली. प्रथम १६वी नेटिव्ह रेजिमेंट पुढे चारी दिशांनी नाकेबंदी करेल . कोणी बाहेर जाऊ लागला तर तात्काळ बेड्या ठोकेल ..शक्यतो कोणी फायर करू नका .पण बंदुकीच्या दस्त्याने दोनचार फटके जरूर हाणा . . भिल कोअर माझ्याबरोबर गावात येईल आणि जमावाला शांत करेल. पूना हॉर्स नेहेमीप्रमाणे रिझर्व मध्ये स्टॅण्डबाय राहील व गावाबाहेर थांबेल.

"कोणाला काही शंका"--कर्नल मॉरीस

"नो सर!" एकमुखाने उत्तर आले

" कूच करा "- कर्नल मॉरीस

सैन्य पोहोचेपर्यंत काही लोक पळाले पण चौक्या बसल्या आणि सर्व आत अडकून पडले. . भिल कोअर चे १५० सैनिक शिस्तबद्ध मार्च करत आले आले जमाव घाबरून पळापळ करू लागला . भिल कोअर थांबले .सर्वानी हातातले दंडुके उंचावले आणि एकाच गर्जना केली

"काली माता कि "

:जय "

सर्वानी एकाच स्वरात गर्जना केली आणि जमावाचे उरलेसुरले धैर्य गाळून पडले आणि घेराव सोडून सर्व रस्तोरस्ती धावत सुटले .

मामलेदार , महलकारी ,आसपासचे गावचे पाटील ,कुलकर्णी असा सर्व लवाजमा घेऊन ५० सैनिकांची तुकडी घरोघरी जाऊन तपास करू लागली.

जमावाला भडकवले कोणी., बाहेरून कोण आले ,सर्व तपास होऊन ४५ लोकांना मुसक्या बांधून कचेरी समोर बोलावण्यात आले .आणि मग सर्वाना चौकीवर जमवण्यात आले .. सर्वत्र भयाण शांतता पसरली . काहींना समज देऊन सोडून दिले ,, 2३ जणांना पुढील कारवाई साठी मुसक्या बांधून धरणगावला तुरुंगात पाठवले ,त्यांच्यावर खटला भरून मोठी शिक्षा होणार होती!

मग मॉरीस ने जनतेला घरी जाण्यास सांगितले व सर्व चौक्या पण हटवल्या . लोक घरोघरी पांगले आसपासच्या खेड्यातले लोक खाली मान घालून घरोघरी परतले . इंग्रजांचा रोष बऱ्याच दिवसांनी लोकांनी पहिला आणि सर्वजण धास्तावले.

एरंडोल ला शांतता झाली पण एवढ्यात बातमी आली कि सावदा व फैजपूर गाव पेटले . मोठा जमाव जमला आणि त्यांनी मामलेदार आणि महलकारी याना तुरुंगात डांबले .गावच्या चावडीवर सर्व लोक जमले आणि पंच मंडळी बसली . सर्वानुमते असे ठरले कि सर्वे होऊ द्यायचा नाही

"मरी जासुत पन सर्वे व्हनार नाय "

"लाठ्या काठ्या तलवारी घ्या आन लाल तोंड्यासले हाकला"

"सर्वे बंद सर्वे बंद "

सर्वत्र घोषणा येऊ लागल्या.

"दीन ,दीन ,अल्ला हो अकबर ,गनीम को काटो "

मुसलमान पण मागे नव्हते .. मग पंचायत बरखास्त झाली आणि लोक घरोघरी पांगले

सावदा आणि फैजपूर दोन्ही गावात खान्देशी लोकांचा अंमल सुरु झाला .. हि अपूर्व घटना बघण्यासाठी आसपासच्या गावातून लोक जमा झाले .. लाठ्या काठ्या घेऊन लोक मोकळ्या जागी ठाण मांडून बसले .गावातून सर्वाना भाकरी वाटण्यात आल्या

यावल चा अनुभव ताजा होता . लोकांनी सर्वे टीमला हा हा म्हणता पळवून लावले होते , आताही तसेच करायचा त्यांचा बेत होता . सर्वजण सर्वे टीम येण्याची वाट पाहू लागले

दिवस असाच गेला . दुसया दिवशी दुपारी गावाबाहेर बँड आणि बिगुल चा आवाज आला आणि सर्व जमाव चमकला . कर्नल मॉरीस ची भिल ब्रिगेड शिस्तबद्ध मार्च करत गावात शिरली . ५० गणवेशधारी सैनिक , तलवारी आणि दंडुके घेऊन आले आणि सर्वांच्या ह्रदयात धडकी भरली . त्यांच्या मागे १६ व्या नेटिव्ह रेजिमेंट चे पन्नास सैनिक ,ह्यांच्याकडे बंदुका पण होत्या शिस्तबद्ध पणे गावात शिरले व त्यांची संपूर्ण गावातून मार्चपास केला . घोषणा देणारे केव्हाच गप्प झाले होते .मैदानातले लोक चिडीचूप बसून राहिले. लालतोंड्या ऐवजी आपलेच काळे लोक तेही शस्त्रे घेऊन आलेले बघून सर्वांचा धीर खचला

कर्नल मॉरिस ने कुलपे तोडून बंदीजनांना मोकळे करण्याची ऑर्डर दिली.

घराघरातून शोध सुरु झाला.मामलेदार आणि महलकऱ्या ने फूस लावणारे पुढारी आणि घोषणा देणारे लोक बरोबर ओळखून काढले . एवढ्या हजार लोकांतून २० पुढारी बरोबर शोधून त्यांना मुसक्या बांधण्यात आल्या .. सर्व आरोपी हळूहळू चावडीवर जमवण्यात आले आणि ५० लोकांची तुकडी त्यांना घेऊन धरणगावला निघाली. सरकारी कामकाजात अडथळा आणण्याचा आरोप ठेऊन त्यांचा कलेक्टर मॅन्स्फील्ड समोर खटला चालणार होता . गावात स्मशान शांतता पसरली ,लोक गावोगावी परत गेले .

सैनिकांच्या तुकड्या फैजपूर कडे रवाना झाल्या. परत तीच कारवाई आणि आणखी २२ लोक मुसक्या बांधून धरणगाव कडे पायी चालवले .

अख्या खान्देशात स्मशान शांतता पसरली . इंग्रजांना ह्या संधीचा लगेच फायदा घ्यायचा होता. गावोगावी दवंड्या पिटू लागल्या कि चार दिवसानंतर फैजपूरला मॅन्स्फील्ड कलेक्टर जनता दरबार भरवणार आणि जनतेच्या सर्वेबद्दल च्या सर्व शंका कुशंका दूर करणार . गावचे पंच ,पाटील कुलकर्णी आणि प्रतिष्ठित माणसे मोठे शेतकरी सर्वांना हजार राहण्यास सांगितले.

फैजपूरला मोठा चौथरा उभारून त्यावर मॅन्स्फील्ड, डेव्हिड्सन आणि त्यांचे इतर लोक . शिवाय सर्वात महत्त्वाचा माणूस म्हणजे अहिराणी इंग्रजी आणि हिंदुस्थानी भाषा जाणणारा दुभाषा माणूस शेजारी अदबीने उभा होता .

मग मॅन्स्फील्ड उभा राहिला आणि इंग्रजी मधे बोलू लागला आणि मागाहून भाषांतर वाला अहिराणी मध्ये सांगू लागला

" शेतकरी व इतर प्रजाजनहो. इंग्लंडच्या राजाच्या कृपेने हे दैवी राज्य हिंदुस्थानी जनतेला लाभले आहे .आणि शेतकरी सुखी व्हावा म्हणून राजा आणि त्याचे सेवक आम्ही नेहमीच काम करत आलो आहोत. पेशवाई संपल्याला आज २५ वर्ष झाली ,,तेव्हाचे दुष्काळ, गरिबी आठवा ,आणि आजची सुखी परिस्थिती बघा . कोणीही आज उपाशी नाही सरकारकडे धान्य गोडाऊन भरलेले आहेत आणि केव्हाही दुष्काळ पडला तर कृपाळू सरकार तुम्हाला धान्य देण्यास तयार आहे. पेंढारी ,चोर, दरोडेखोर ,भिल्ल यांचा पूर्ण बंदोबस्त झाला आहे

मुसलमान काळात बादशाही काठीने जमीन मोजत ,नंतर पेशवाई काठीने मोजत ,त्यामध्ये तलाठी लोक खूप अफरातफर करत व शेतकऱ्यांवर अन्याय होई . कोणाची किती जमीन आहे त्याचे सरकारी रेकॉर्ड नीट नाही व शेतकऱ्यांची आपापसात भांडणे होतात. ह्या सर्वावर एकच उपाय आहे ,,तो म्हणजे इंग्रजी पद्धतीने जमीन मोजणी करणे.व पक्के रेकॉर्ड तयार करणे. आता सरकार इंग्रजी मशीन च्या साह्याने मोजणी करेल व त्याचे रेकॉर्ड प्रत्येक कचेरीत राहील व प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नावाचा शेतीचा उतारा मिळेल . कोणी शेजारी, किंवा गावगुंड आता तुमची जमीन घेऊ शकणार नाही. कोणी जबरदस्ती केली तर तुम्ही गावच्या पाटीलकडे तक्रार करा ,ती तक्रार माझ्याकडे येईल व तुम्हाला न्याय मिळेल . शेताच्या चारी बाजूला खुणेचे दगड सर्वे करताना लावतील ,ते कोणी हलवले तर पाटील त्याला मुसक्या बांधून माझ्यासमोर हजर करेल. आता कायद्याचे राज्य सुरु झाले आहे . त्यासाठी सर्वेला साहाय्य करा .,कोणाला काही तक्रार?"

"लोक सांगतात जमीन सरकारजमा व्हईन ?"

"नाही शेतकऱ्याचीच राहील. पुढे ५ वर्षांनी रेल्वे बांधायला काही ठिकाणी छोटा तुकडा घेऊ त्याचे पैसे तुम्हाला सरकार देईल"

"जिमिन खंडिसन सोनं काढणार म्हणतात लोक?"

"खान्देशात जमिनीच्या खाली सोन नाही ते जमिनीवर पिकात आहे आणि शेतकऱ्याच्या मालकीचे आहे "

लोकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या

"हबशी मजूर लाइसन इंग्रजी साहेब पीक घेणार म्हणतात"

"हबशी गुलाम बाळगण्यावर इंग्रज राज्यात आता बंदी आहे ,तुमच्या जमिनीत तुम्ही सोन पिकवा आणि सरकारी टॅक्स रुपयात भरा "

"आणखी काही शंका "

"नसेल तर आता आनंदाने घरी जा. सर्वे टीमला मदत करा. समक्ष हजर राहून आपल्या जमिनीच्या चार सीमा पक्क्या करा. "

मग दरबार बरखास्त झाला

दुसऱ्या दिवशी डेव्हिड्सन आणि टीम परत यावलच्या किल्ल्यात हजर झाली. ह्यावेळी थोडे अधिक सैनिक त्यांच्या बरोबर दिले होते

मोठ्या चोपडीत आबाजी नोंदी करू लागला ,तर द्वारकानाथ आणि पेस्तनजी चेन टाकून लांबी रुंदी मोजू लागले . लोक कुतूहलाने बघत होते .प्रत्यक्ष सर्वे बघून सर्वांना पटले कि ह्यात आपलाच फायदा आहे. खान्देश परत सुखी आणि शांत झाला. पुढे दहा वर्षांनी आगगाडी धावू लागली आणि घरोघरी बाया गाणी गाऊ लागल्या

"साहेबाचा पोऱ्या मोठा नकली रं , बिन बैलाची गाडी कशी हाकली र"

okepradeep@gmail.com