Victims - 12 books and stories free download online pdf in Marathi

बळी - १२

बळी- १२
मीराताई द्विधा मनःस्थितीत होत्या.
रंजनाने केदारच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं खरं; पण त्यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता. सिद्धेश केदारचा जवळचा मित्र होता. घडलेला सगळा प्रकार मीराताईंनी त्याला सांगितला होता. फक्त रंजनाचे दागिने घरातून गायब झाले होते; हे मात्र त्याला माहीत नव्हतं. त्या स्वतःशी विचार करत असत, -- " जर केदारचं खरोखरच काही प्रेमप्रकरण असेल, तर सिद्धेशला नक्कीच माहीत असेल;" आणि त्याला परत-परत विचारत असत,
" केदार कधी कोणा मुलीविषयी बोलत होता का? त्याची कोणाशी विशेष जवळीक होती का?----- त्याने तुला कधी कोणाविषयी काही सांगितलं होतं का?----"
मीराताईंनी सिद्धेशला अनेक वेळा विचारलं; पण केदारचं चारित्र्य चांगलं होतं; या गोष्टीची हमी तो प्रत्येक वेळी देत असे.
" मी फक्त त्या दिवशी इथे आलो नाही; आणि एवढं रामायण घडलं; त्यानंतर माझा मित्र मला दिसला नाही! खूप आठवण येते त्याची! आम्ही मित्र होतोच; पण कामाच्या निमित्ताने दिवसभर एकत्र रहात होतो; मी काॅलेजपासून त्याला ओळखतो! असं काही असतं, तर माझ्या नजरेतून सुटणं शक्य नव्हतं! त्याच्याही विषयी जे काही बोललं जातंय ते मला पटत नाही! मला अजूनही वाटतं, की आपण पोलिसात कळवायला हवं! मला त्याचं असं अचानक् नाहीसं होणं संशयास्पद वाटतंय!" तो म्हणाला.
. प्रत्येकजण पोलीसांकडे जाऊन केदारचा शोध घेण्याचा सल्ला देत होता; पण पोलीस म्हटलं, की मीराताईंच्या पुढे हातात बेड्या घातलेला केदार दिसत होता. रंजनाने त्यांच्या मनात निर्माण केलेली भीती त्याच्या मनावरचा कबजा सोडत नव्हती.
" नको! त्याची गरज नाही! माझी खात्री अाहे, तो लवकरच घरी परत येईल!" त्या म्हणाल्या.
या अडचणीच्या काळात सिद्धेशने त्या घराला मदतीचा हात दिला. नकुलला आपल्याबरोबर घेऊन त्याला आपल्या कामाचे ट्रेनिंग देऊन त्याने बिझनेस चालू ठेवला. नकुल काॅम्प्यूटर इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असल्यामुळे त्याला काम शिकून घ्यायला फार त्रास झाला नाही. सिद्धेश दर महिन्याला मीराताईंना पैसे देत होता. केदारबरोबरच्या मैत्रीची बूज त्याने राखली होती! मीराताईंना त्याने मोठ्या मुलाप्रमाणे आधार दिला होता. त्यामुळे कीर्ती आणि नकुलचं शिक्षण व्यवस्थित चालू होतं.
**********
केदार हळू हळू बरा होत होता. डोक्यावरची जखम पूर्णपणे बरी झली होती.; पण तो कोण - कुठला हे खूप प्रयत्न करूनही त्याला आठवत नव्हतं. त्याची मानसिक स्थिती अतिशय वाईट झाली होती. पूर्वायुष्यातील आठवणी पूर्णपणे पुसून गेल्यामुळे त्याची अवस्था मिट्ट अंधारात चाचपडणा-या माणसासारखी झाली होती.
हे सर्व जाणून असलेल्या पटेल दांपत्याला त्याला "तू आता बरा झाला आहेस, इथून निघून जा--" असं सांगणं जिवावर आलं. त्याच्या मानसिक अवस्थेची जाणीव डाॅक्टर पटेलना होतीच; शिवाय त्यांना ह्या केसचा अभ्यासही करायचा होता. त्यांच्या ट्रीटमेंटखाली आलेली स्मृतीभ्रंशाची ही पहिलीच केस होती, त्यामुळे त्यांना केदारविषयी विशेष आस्था वाटत होती. त्यानी त्याला पूर्णपणे बरा झाल्यावरही डिस्चार्ज दिला नव्हता.
आता तो हाॅस्पिटलमध्ये थोडा फिरू लागला होता. तिथल्या स्टाफलाही त्याच्याविषयी करुणा वाटत होती. सगळे त्याच्याशी मित्रत्वाने आणि खेळीमेळीने वागत होते. त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांचा पेशंट मात्र सतत विचारात गढून गेलेला असे. केदारच्या प्रगतीकडे विशेष लक्ष ठेवून रिपोर्ट्स तयार करण्याची जबाबदारी डाॅक्टरसाहेबांनी निशावर सोपवली होती. आपल्याला दिलेली ड्युटी निशाने थोडी जास्तच मनावर घेतली होती.
निशा केदारकडे जवळचा मित्र असल्याप्रमाणे लक्ष देत होती. हाॅस्पिटलमध्ये असताना ती काही ना काही निमित्त काढून त्याच्याकडे जात होती --- त्याला हवं नको बघत होती. तो औषधे वेळेवर घेतो की नाही; हे पहात होती. त्याने औषध घ्यायला कंटाळा केला, तर त्याला रागावत होती. पण तिच्या रागावण्यात सुद्धा पेशंटविषयी काळजी बरोबरच त्याच्या विषयी मायासुद्धा होती. तिची केदारविषयीची ओढ इतर स्टाफच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिथल्या तिच्या मैत्रिणींनी तिला सावध करण्याचा प्रयत्नही केला होता
" जेव्हा बघावं तेव्हा तू त्या नवीन पेशंन्टच्या भोवती घुटमळत असतेस! तो कोण -- कुठला --- काही ठावठिकाणा नाही. त्याचं पूर्वायुष्य कसं होतं -- तो विवाहित आहे की अविवाहित --त्याचं शिक्षण-- आपल्याला काहीही माहीत नाही ; तू त्याच्यामध्ये स्वतःला जास्त गुंतवून घेऊ नको; नाहीतर पुढे जाऊन पश्चात्ताप करण्याची वेळ येईल! तुला खूप मानसिक त्रास होईल!" त्यांनी तिला समजावलं होतं.
"त्याच्या विषयी आपल्याला काही माहिती नाही; पण आता तो आपला पेशंट आहे; आणि पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे; हे तरी खरं आहे नं? तो बरा व्हावा म्हणून प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे; त्याला त्याचं कुटुंब परत मिळालं तर मला आनंदच होईल --- पश्चात्ताप नाही होणार! तुम्ही काळजी करू नका!" निशाने इतक्या स्वच्छ शब्दात आपले विचार मांडले होते; की त्यानंतर कोणी तिला काही सांगण्याचा प्रयत्न केला नाही. पण ती फक्त पेशंट म्हणून त्याच्याकडे बघत नव्हती, हे त्यांना स्पष्टपणे दिसत होतं.
*********

हाॅस्पिटलभोवती सुंदर बाग होती. एक दिवस निशा नाइट ड्यूटीवरून सकाळी घरी जाण्यासाठी निघाली,, तेव्हा केदार बागेत फिरत होता.
"खूप सुंदर बाग बाग आहे! इथे मी आलो, की मी हाॅस्पिटलमध्ये आहे, हे विसरून जातो! मन अगदी प्रसन्न होतं! इथे एक झोपाळा असता, तर आणखी छान झालं असतं!" केदार आज खूप चांगल्या मूडमध्ये होता.
" प्रमिला मॅडम या बागेकडे खास लक्ष देतात! खूप सुंदर फुलझाडं आणि वेली त्यांनी अनेक ठिकाणांवरून मागवल्या आहेत! हाॅस्पिटलमधल्या पेशंटच्या प्रकृतीत सुधारणा झाली, की ते सकाळ-संध्याकाळ संध्याकाळ बागेत फिरायला येतात, आणि आपण आजारी आहोत, हे विसरून जातात. मन प्रफुल्लित असलं की आजार झपाट्याने बरा होतो. तू सुद्धा आता किती प्रसन्न दिसतोयस्! ही या वातावरणाची किमया आहे!" निशा हसत म्हणाली.
काहीतरी विचार करून. ती पुढे म्हणाली,i
"तुला बागेत रहायला आवडतं; तर थोडं बागकाम करत जा! तुझा वेळही चांगला जाईल! मी प्रकाश सरांना सांगते; ते नक्कीच परमिशन देतील!" निशा म्हणाली.
"नको निशा! मला बागेत फिरायला आवडतं; पण बागकामाविषयी मला काहीही कळत नाही! काही चूक झाली, तर उगाच झाडांचं नुकसान होईल! पण जर माळीदादा मला शिकवणार असतील, तर मी त्यांना मदत नक्की करेन!" केदार म्हणाला.
"तुला पूर्वायुष्य आठवत नाही---- पण तुला बागकाम येत नाही; हे मात्र पक्कं माहीत आहे; हे कसं? तुला काय येतं, हेसुद्धा आम्हाला कळू दे की!" निशा हसत हसत म्हणाली. कदाचित् या बोलण्यातून त्याच्या भूतकाळाविषयी तो नकळत काही बोलेल; या अपेक्षेने ती त्याच्याकडे बघत होती.
यावर केदारने फक्त हसून तिच्याकडे पाहिलं; आणि म्हणाला,
"खरंच मला असं वाटतंय की मी घराभोवती सुंदर बागेत फिरलो आहे, झोपाळ्यावर बसलो आहे; पण बागकाम मात्र कधी केलं नाही!"
केदार खरं बोलत होता! त्याच्या बंगल्याभोवताली मीराताईंनी उभ्या केलेल्या सुंदर बागेत त्याने कधी काम केलं नव्हतं. सगळी देखरेख मीराताई करत असत. केदार वेळ मिळाला, की बागेत फिरत असे, किंवा मजेत तिथल्या झोपाळ्यावर झोके घेत असे. त्याच्या अंतःकरणात कुठेतरी ते चित्र कोरले गेलेले होते.
"तुला कोणतं काम आवडतं, हे आठवण्याचा प्रयत्न कर --- पण नको-- तू त्रास करून घेऊ नकोस! मला खात्री आहे --- तुला ते एक दिवस नक्कीच आठवेल! सध्या तू फक्त तब्येत सांभाळ! हळू हळू सगळं नीट होईल! मी निघते आता! उद्या भेटूया! काळजी घे!"
निशाच्या मनातली केदारविषयीची काळजी आणि आपलेपणा तिच्या स्वरात उतरला होता, आणि तिच्या गहि-या डोळ्यांनी केदारला बरंच काही सांगितलं होतं! तिच्या पाठमो-या आकृतीकडे बघत केदार मनात म्हणाला,
"हा जणू काही माझा पुनर्जन्म आहे आणि देवाच्या कृपेने ही प्रमिलाबेन आणि निशासारखी माया करणारी माणसं मला मिळाली आहेत--- निशा! तुझं मन मला कळतंय; पण मी तुला प्रतिसाद देऊ शकत नाही! जोपर्यंत माझं पूर्वायुष्य मला कळत नाही तोपर्यंत हेच योग्य आहे! पुढे जाऊन तुला दुःख होईल; असं कोणतंही पाऊल मी उचलणार नाही! माझं कुटुंब मला मिळालं, तर अनेक प्रश्रांची उत्तरं मला मिळतील! पण माझी माणसं अजून मला शोधत माझ्यापर्यंत का पोहोचत नाहीत? त्यांना माझी काळजी नाही का? कुठे असेल माझं कुटुंब? कुठे असतील माझी माणसं? की या जगात माझं कोणी नाही--- मी एकटा आहे?

******** contd.-- Part 13.