Victims - 15 books and stories free download online pdf in Marathi

बळी - १५

बळी १५
सकाळी उठल्यापासून केदारचं चित्त था-यावर नव्हतं.प्रमिलाबेननी त्याला हाक मारली; तीसुद्धा त्याला ऐकू गेली नाही.
"रजनी! आज तुझं लक्ष कुठे आहे? किती हाका मारल्या --- तुला ऐकू गेल्या नाहीत! " त्यांनी केदारला विचारलं.
केदारने रात्रीचं स्वप्न त्यांना सांगितलं.
"बहुतेक तुला पूर्वी घडलेल्या काही गोष्टी पुसट आठवू लागल्या आहेत! आपण डाॅ. श्रीकांतना भेटूया! त्यांना हे सगळं सांगणं आवश्यक आहे! तेच आपल्याला पुढे काय करायचं; हे मार्गदर्शन करतील!" त्या म्हणाल्या.
हा प्रोग्रेस डाॅक्टरना सांगणं आवश्यक होतं. त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये यापुढे ते काही बदल करण्याची शक्यता होती.
रजनी! तू आम्हाला प्रथम वरळी सी - फेसजवळच भेटलास! तुझ्याशी या गोष्टींचा नक्कीच काहीतरी संबंध आहे! तू पोहतोयस! असं तू स्वप्नात पाहिलंस! शाम आणि संदीपने तू समुद्रातून पोहत किना-याकडे येताना पाहिलं; आणि वाचवलं! कदाचित् तू पाहिलेली लग्नाची दृष्ये खरी असतील; तर तू विवाहित असणार! तुला काही आठवतंय का?"
हे विचारताना प्रमिलाबेन अपेक्षेने त्याच्याकडे पहात होत्या.
यावर रजनीकांत ऊर्फ केदार म्हणाला,
"मला माहीत नाही!! आणि ते तर स्वप्न होतं! मला कोणाचे चेहरे ओळखू येत नव्हते! त्या स्वप्नात सुसंगती नव्हती; त्यामुळे मला नीटसं आठवतही नाही! "
डाॅक्टर पटेल हे सगळं ऐकत होते. ते केदारला समजावत म्हणाले,
"आपल्याला खात्री करून घेतली पाहिजे! या कड्या जुळवून तुझ्या भुतकाळातील एखादा दुवा आपल्याला मिळू शकतो! तुला काॅम्प्यूटरचं ज्ञान उत्तम आहे; कारण -- कदाचित् काॅम्प्यूटर तुझ्या आयुष्याचा अंगवळणी पडलेला भाग होता! पण समुद्राच्या तुझ्या आठवणींमध्ये असं काही आहे, जे भीतिदायक आहे! तुझं सुप्त मन तुला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे! समुद्र पाहिल्यावर तू विचलित होतोस--- घाबरतोस--- तुझ्याबाबतीत कोणी घातपाताचा प्रयत्न तर केला नाही? ---- या सगळ्याचा शोध घ्यावा लागेल! "
केदारला स्वप्नातून बाहेर काढण्यासाठी ते पुढे म्हणाले,
"काळजी करू नकोस! हळू हळू सगळं काही स्पष्ट होईल! चित्त शांत ठेव; आणि रोजची कामे करत रहा! चल! तयार हो! आपल्याला हाॅस्पिटलला जायला उशीर होतोय!" डाॅक्टर वरकरणी हसत म्हणाले, पण त्यांचा चेहरा गंभीर होता.
डाॅक्टर पटेल त्या दिवशी डाॅक्टर श्रीकांतना भेटले. केदारच्या केसवर दोघानी बराच वेळ चर्चा केली. समुद्र आणि समुद्र पोहून पार करणं, या दोन गोष्टीमध्ये त्याच्या मेँदूच्या संवेदनांना चालना मिळत आहे, आणि हाच धागा पकडून त्याची स्मृती परत आणता येईल, यावर त्यांचं एकमत झालं. पण हे सगळं खूप जबाबदारीनं --- काळजीपूर्वक करावं लागणार होतं; कारण जर मेंदूवर ताण वाढला, तर आजार हाताबाहेर जाण्याची शक्यता होती. घाई करून चालणार नव्हतं!
********

त्या दिवशी त्याला हाॅस्पिटलमध्ये पोहोचायला थोडा उशीरच झाला. गेटजवळच माळीकाकांनी वर्दी दिली,
"तुमचा मित्र शाम तुम्हाला भेटायला आलाय! बराच वेळ झाला -- तो तुमची वाट बघतोय!"
शाम अाणि संदीप फक्त केदारला हाॅस्पिटलमध्ये पोचवायचं माणुसकीचं कर्तव्य करून थांबले नव्हते; तर आजारी असताना रोज त्याला भेटायला येत होते. नंतरही आठवड्यातून एकदा तरी केदारला भेटणं त्यांनी चालू ठेवलं होतं. दोघे केदारचे जिवलग मित्र झाले होते.
शाम आॅफिसमध्ये बसला होता.
"कुठे अाहेस यार? इथे आॅफिसमध्ये तुझ्या नावाचा जप चाललाय! तुझ्याशिवाय इथलं काम खोळंबलंय!" शाम हसत केदारला म्हणाला.
" तू इथेच बस! चहा घे! मी येतो पाच मिनिटात!" शामसाठी चहाची आॅर्डर देऊन केदार काॅम्प्यूटर रूमकडे गेला.
थोड्याच वेळात तो परत आला.
"इतक्या कमी वेळात तू प्राॅब्लेम हातावेगळा केलास? ग्रेट आहेस!" शाम आश्चर्याने म्हणाला.
"सिस्टीममध्ये लहानसा फाॅल्ट होता! ते जाऊ दे--- तू कशाला आला होतास?" केदारने विचारलं.
" आज विकली आॅफ होता; म्हणून तुला भेटायला आलो होतो! पण आता मात्र तुला एक काम सांगणार आहे!" शाम हसत म्हणाला.
"तू तर माझा लहान भाऊ आहेस! बोल! काय करू मी तुझ्यासाठी?" केदार तत्परतेने म्हणाला. त्याच्या बोलण्यात शामविषयीचं त्याला वाटणारं प्रेम ओतप्रोत भरलेलं होतं.
यावर शाम हसत म्हणाला,
"इथल्या स्टाफच्या बोलण्यावरून मला कळलं, की तू काॅम्प्यूटरमधला एक्स्पर्ट आहेस. हा काॅम्प्यूटरचा जमाना आहे! मुलांना शाळेतही विषय आहे; पण तिथे इतक्या मुलांमध्ये प्रॅक्टीस होऊ शकत नाही! म्हणून आम्ही आमच्या कोळीवाड्यातल्या मुलांसाठी काॅम्प्यूटर सेंटर काढायचं ठरवलंय! काॅम्प्यूटर खरेदीसुद्धा केले आहेत; पण अजून टीचरची व्यवस्था झाली नाही! ज्यांना विचारलं, ते खूप पैसे मागतात! आमची गावातल्या लोकांसाठी काम करणारी लहानशी -- सेवाभावी संस्था आहे-- एवढे पैसे कसे देणार? तू दर शनिवारी आणि रविवारी शिकवायला येशील का?"
"मी नक्की येईन! आठवड्यातून दोन दिवस मुलांमध्ये रमायला मला नक्कीच आवडेल. आणि मी शिकवण्याचे पैसे घेणार नाही! कारण मला मुलांच्या सहवासात खूप आनंद मिळणार आहे! पण प्रमिला मॅडम किंवा डाॅक्टरांना मात्र विचारावं लागेल! सध्या माझे गार्डियन तेच आहेत ---- काळजी करू नकोस --- ते नाही म्हणणार नाहीत; मला खात्री आहे!" केदार उत्साहाने म्हणाला.
तेवढ्यात हाॅस्पिटलमध्ये देखरेख करत -- स्टाफला सूचना देत प्रमिलाबेन तिथे आल्या. शामला बघून त्या त्या दोघांच्या जवळ आल्या,
"अरे! शाम ! कसा आहेस? भेटलास का मित्राला? बरं झालं तू आलास! हा आमचा रजनी -- तुझी आणि संदीपची नेहमी आठवण काढत असतो! हवं तर थोडा वेळ दोघे बाहेर फिरून या! केदारलाही जरा मोकळं वाटेल!" त्या हसत म्हणाल्या. बाहेरच्या जगात फक्त शाम आणि संदीप हे दोघेजण केदारच्या जवळचे मित्र होते. शामच्या सहवासात केदार मनमोकळेपणाने बोलेल त्याच्या मनावरचा थोडा हलका होईल; असा विचार त्या करत होत्या.
"मॅडम! बरं झालं तुम्ही भेटलात! मी आता तुमच्याकडेच येणार होतो! तुम्हाला एक विनंती करायची आहे; मी दर शनिवार आणि रविवारी रजनीकांतला आमच्या गावातल्या मुलांना काॅम्प्यूटर शिकवायला घेऊन गेलो, तर चालेल?" शामने पटकन् त्यांची परमिशन विचारली.
" हरकत नाही; पण आम्ही त्याला कुठेही एकटा सोडत नाही!" प्रमिलाबेन काळजीने म्हणाल्या.
" तुम्ही रविवारी लवकर निघता नं? त्याला शनिवारीही थोडं कन्सेशन द्या! मी दर शनिवारी आणि रविवारी दुपारी इथे येऊन माझ्या बाईकवरून त्याला घेऊन जाईन; आणि क्लास संपला, की तुमच्या बंगल्यावर सोडेन! मग तर चालेल ? " शाम म्हणाला.
यावर प्रमिलाबेननी संमतिदर्शक मान डोलावली.
पुढच्या शनिवारी दुपारी यायचं प्राॅमिस देऊन शाम निघाला.
केदार मनातून खुश झाला होता! त्याला बाहेरच्या जगात आणि नवीन वातावरणात आठवड्यातून दोन दिवस तरी मोकळेपणाने जगता येणार होते! मुलांच्या संगतीत वेळ चांगला जाणार होता!
********
केदारला आता भीतीदायक स्वप्नांबरोबरच भासही होऊ लागले होते. एका स्त्रीचं अस्तित्व आपल्या आजूबाजूला जाणवत होतं. आणि अनेक वेळा ती पाठमोरी- त्याच्या पासून दूर जात, हवेत विरून जात होती.
एकदा हाॅस्पिटलमध्ये चहा पीत होता; पण मनात विचार मात्र या विचित्र आभासांचे चालले होते. अचानक् निशाने पाठीमागे येऊन हाक मारली; आणि तो इतका घाबरला, की त्याचे हात थरथरू लागले! हातातला चहाचा कप खाली पडला!
निशाने विचारलं,
"रजनी! मी फक्त हाक मारली, तर तू एवढा घामाघुम का झालायस? मी भूत नाही! निशा आहे! पूर्वी किती जाॅली होतास रे! आपण किती छान गप्पा मारत होतो! तू तुझे सगळे विचार -- तुझं दुःख -- एकटेपण -- सगळं मला सांगत होतास! अाजकाल काय झालंय तुला? नीट बोलत नाहीस! सतत कसल्यातरी दडपणाखाली असतोस! काय प्राॅब्लेम आहे; मला नाही सांगणार?"
"काही नाही! तु अचानक् मागे येऊन हाक मारलीस, म्हणून जरा दचकलो!" केदारने विषय बदलला.
निशा तेथून निघाली; तेव्हा गंभीर दिसत होती.
ती प्रमिलाबेनच्या केबिनमध्ये गेली, आणि केदारचं बदललेलं वागणं त्याना सांगितलं.
"मॅडम! तुम्ही त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेव; असं बजावलं होतं, म्हणून हे सगळं तुमच्या कानावर घातलं! मला खरंच त्याची काळजी वाटते!" ती म्हणाली.
"त्याला बहुतेक त्याचं पूर्वायुष्य अंधुक आठवू लागलंय! त्याला आजकाल खूप भितीदायक स्वप्नं पडतात; त्यामुळे तो जरा तणावाखाली असतो." त्या म्हणाल्या. पण त्या हसून पुढे बोलू लागल्या,
"त्याला काही गोड स्वप्नंही पडतात; बरं का! आपण सप्तपदी घालतोय असं स्वप्न त्याला पडतं! कोणी स्त्री आपल्या अजून बाजूला आहे; गोड हसत आहे; असे भास त्याला होतात! बहुतेक तो विवाहित असावा; असं मला नक्की वाटतंय! तू त्याची चांगली मैत्रीण आहेस! हळु हळु त्याच्याशी बोलून काही माहिती मिळतेय का - ते बघ!"
निशाचा उतरलेला चेहरा आणि डोळ्यांत तरारलेलं पाणी प्रमिलाबेनच्या नजरेतून सुटलं नाही; पण तिचं मन रजनीमध्ये गुंतत चाललं आहे; हे त्यांना स्पष्ट दिसत होतं, वडीलकीच्या नात्याने तिला वेळेवर सत्य परिस्थितीची जाणीव करून देण्याची गरज होती.
********** contd. - part 16.