Jhunjharmachi - 2 books and stories free download online pdf in Marathi

झुंजारमाची - 2

२. झुंजार महाल
 

उजाडू लागलं तसं रानपाखरांचा चिवचिवाट, किलबिलाट वाढू लागला. पाऊस थांबला होता. तिघांनी माठातल्या पाण्यानं तोंडं धुतली. म्हातारबानं भिंतीवरच्या खुंटीवर अडकवलेल्या लोखंडी कंदीलात गाभाऱ्यातल्या बुधलीतलं तेल भरलं. कंदील पेटवत तो म्हणाला, "चला... या माझ्या मागून."

        वातावरणात चांगलंच गारवा होता. मारत्या, बहिर्जी हातावर हात चोळत उब मिळवण्याचा प्रयत्न करत होते. दोघेही म्हातारबाच्या मागे चालू लागले. मंदिराच्या मागे झाडाझुडपांनी गर्दी केली होती. पुढे आलेल्या वेली बाजूला सारत म्हातारबा आतमध्ये गायब झाला. पाठोपाठ दोघेही शिरले. समोर एक बारव होती. गुडघ्याएवढ्या उंच पायऱ्या उतरून खाली आले. डाव्या बाजूला मोकळ्या जागेमधून म्हातारबा वाकून आतमध्ये गेला. बारवचं  पाणी हात दीड हात खाली होतं. 

"म्हातारबा... एवढा पाऊस पडतुय पर पाणी वर कसं काय न्हाई आलं.?", मारत्याने विचारलं.

म्हातारबा किंचित हसला. काठीने एक दगड दाखवत म्हणाला, "न्हाई... कितीबी पाऊस झाला तरी बी पाणी त्येच्या वर काय येत न्हाई... आन कितीबी उन्हाळा असू द्या. पाणी कधीच तळ गाठत न्हाय..."

डाव्या हाताच्या दगडी भिंतीतला एक लाकडी दरवाजा उघडत म्हातारबा आतमध्ये शिरला.

"चला. रं... ह्येच हाय त्ये भुयार..."

मारत्या बहिर्जीच्या मागे जात म्हणाला, "तु व्हय म्होरं म्या यितु मागणं."

"हं...", बहिर्जी म्हातारबाच्या मागोमाग आतमध्ये शिरला. आतमध्ये मिट्ट काळोख. कंदिलाच्या प्रकाशात हळूहळू एकेक पाऊल टाकत म्हातारबा चालत होता. डोळयांना हळूहळू सवय झाली आणि थोडं थोडं दिसायला लागलं.

"पोरांनु हळू या रं..."

"व्हय..."

कितीतरी वेळ ते चालत होते. कुणीच काही बोलत नव्हतं. साधारण उंचीचा माणूस वाकून जाऊ शकेल एवढ्या आकाराचं ते भुयार. संपूर्ण दगडी चिऱ्यांचं बांधकाम. खाली दगडी फारसबंदीची वाट. मधून मधून पाणी झिरपत होतं. पण पाणी जाण्यासाठी एक बाजूने बोटभर मापाचा छोटासा पाट काढून दिला होता.त्यातून पाणी मागे वाहत जाऊन पुन्हा बारवंला मिळत होतं. वर डाव्या उजव्या बाजूला बऱ्याच अंतराने मुठीच्या आकाराची भोकं होती. काहींतून पाणी झिरपत होतं. तर काहींतून थोडासा प्रकाश डोकावत होता.

        घटका दीड घटका वेळ ते चालत होते. अचानक म्हातारबा थांबला. समोर वाट संपली होती. डाव्या बाजूच्या दिवळीत कंदील ठेवला. उजव्या बाजूला भिंतीत एक लोखंडी गोलाकार कडी होती. त्याने ते दोन्ही हातांनी धरून ओढलं. लोखंडाचा कसला तरी आवाज झाला. कंदील हातात घेतला आणि समोरच्या दगडी भिंतीवर हाताने जोरात दाब दिला. अचानक ते विलग होऊन आतमध्ये दरवाजा जावा तसं गेलं. लोखंडी कड्यांमध्ये बोटभर जाड असा तो दगडी दरवाजा होता. बंद केला तर कुणाच्याही लक्षात येणार नाही. बहिर्जी मारत्या दोघेही भयचकित होऊन पाहत होते.

"मर्दानु... चला हिथून फुडं आता तुम्हालाच जायचंय..." वर हात करत उंच उजेडाकडे दाखवत म्हणाला,

ते बघा त्या पातूर ह्या पायऱ्या हाईत. दमानं वर चढून जावा. तिथून फुडं खुबणीतली वाट हाय." 

बहिर्जी पुढे झाला. मारत्या म्हातारबाकडे बघत म्हणाला, "कंदील?"

"त्येची काय बी जरूर न्हाय."

"बरं...", म्हणत मारत्या बहिर्जी पाठोपाठ आतमध्ये शिरला.

गुडघाभर उंच पायऱ्या. वरच्या पायरीवर हात आणि खालच्या पायरीवर पाय ठेऊन वाकत जाता येईल एवढाच काय तो भुयारी मार्ग. कित्येक वर्षे वापरात नसल्यामुळे आणि झिरपणाऱ्या पाण्यामुळे पायऱ्यांवर शेवाळ साचलं होतं. हलक्या हाताचा किंवा पायाचा भार पडताच सटकत होतं. त्यामुळे काळजीपूर्वक हातपायांवर समतोल भर देऊन चढावं लागत होतं. हळूहळू शरीराला सवय झाली आणि दोघेही सरसर वानरावानी चढू लागले.उंचावरच्या उजेडाचा ठिपका आता क्षणाक्षणाला मोठा होऊ लागला.

        पायऱ्यांची चढण संपली. दोघेही आता एका मोकळ्या जागेत डोंगरच्या एका टप्प्यावर येऊन पोहोचले होते. घामानं चिंब झाले होते. पण वरून येणार वारा सुखावत होता. आजूबाजूला घनदाट झाडांची जाळी होती. अर्ध्यापेक्षा जास्त उंचीवर ती जागा होती. झाडाच्या बेचक्यातून निरखून पाहिलं तर इथून झुंजारमाचीच्या मधोमध असलेला बुरुज दिसत होता. सारा डोंगर आता अंगावरच येईल कि काय! असं वाटायचं. आणि खालचा परिसरही पाहता येत होता. पण वरून किंवा खालून जर पाहिलं तर हि जागा अजिबात लक्षात येणासारखी नव्हती. बाजूला कसलेही संरक्षक कठडे नव्हते. थोडा जरी झोक गेला, तरी खाली पडण्याची शक्यता होती.

       मारत्या फदकल घालून मटकन खाली बसला. उर धपापत होता. घामाघूम झाला होता. कमरेच्या पाण्याच्या पिशिवीचे दोर सोडून घटाघटा पाणी प्यायला.

"च्यायला घाम घाम झाला पार वर येई पातूर..."

"हं...", बहिर्जीने हुंकार भरला. बाजूला वर पर्यंत जाण्यासाठी खोबण्या केलेल्या होत्या. बहिर्जीने एकेका खोबणीत हात घालून हळूहळू वर येंगायला सुरुवात केली.

"आरं देवा... थांब कि रं...", मारत्या घाईगडबडीत उठत म्हणाला.

"चल रं. हिथं थांबून न्हाई भागायचं."

        दोघेही सावकाश पण सावधपणे खोबणींत हात पाय घालून वर येंगु लागले. पाचेक पुरुषभर उंच अंतर चढून गेल्यावर खडकात खोदलेल्या चौकोनी बोगद्या पाशी थांबले. वरच्या बाजूला एक गंडभेरुंड कोरलं होतं. नेहमी पाहण्यात येणाऱ्या चित्रापेक्षा हे काहीसं वेगळं होतं. दोघेही पायऱ्या चढून आतमध्ये आले. समोरचं दृश्य पाहून दोघेही आवाक झाले. मारत्या तर डोक्याला हात लावून मटकन खालीच बसला. दोघांनाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. झुंजारमाचीच्या पोटात असलेला झुंजारमहाल खरंच अस्थित्वात होता. आज्या पणजानं सांगितलेल्या झुंजारमहालाच्या गोष्टी अद्भुत, अविश्वसनीय वाटायच्या. पण खरंच हे अस्थित्वात होतं. आज ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होते. समोर वीसेक पावलं रुंद आणि तीसेक पावलं लांब असलेली मोकळी जागा. चहूबाजूंनी खडकाळ भिंतींनी बंदिस्त. ठिकठिकाणी जाळीदार गवाक्ष. ठराविक अंतरावर कोरीव खांब. सलग साताठ खांबांची रांग देवाच्या मूर्तीपर्यंत जाऊन पोहोचलेली होती. खांबांवर कमळ, स्वस्तिक, ओम अशा प्रकारचं आणि महाभारतातील प्रसंगांचं कोरीव काम केलेलं होतं. खांबांच्यावर गंधर्वांच्या मूर्ती कोरलेलं होत्या. जणू सगळा भार त्यांनी स्वतःच त्यांच्या खांद्यावर तोलून धरलेला आहे. खांबांच्या मधोमध वाघ, सिंह, हत्ती कुठे घोडा तर कुठे गाढव यांची चित्रे कोरलेली होती. प्रत्येक खांबाला स्पर्श करत ते वैभव पाहत दोघेही समोर चालत होते.

        समोर झुंजारमल देवाची पुरुषभर उंच कातळात घडवलेली रौद्ररूप प्रतिमा. गोष्टींमध्ये ऐकलेलं झुंजारमल देवाचं दर्शन आज सत्यात उतरलं होतं. देवाची मूर्ती पुरुषभर उंच आणि पिळदार देहाची. डाव्या हातात गोलाकार ढाल तर उजव्या हातात भली मोठी तलवार. डोक्यावर दोन शिंगाचं मुगुट. मधोमध कमलाकृती. मोठाले उग्र डोळे. पल्लेदार मिशा अगदी कानापर्यंत पोहोचलेल्या. लढाईच्या पावित्र्यात असलेली आणि विराग्नीने औतप्रोत भरलेली देवाची प्रतिमा पाहताच देहात नवा उत्साह यावा! रक्त सळसळावं! आणि पेटून उठावं! अशीच होती.

        उजव्या बाजूला एक छोटंसं जलकुंड होतं. पाणी झुळझुळत खाली वाहत होतं. दोघांनी तिथे हातपाय धुतले. पोटभर पाणी प्याले. देवासमोरची समई पिशवीतल्या चकमकीने पेटवली. देवासमोर डोकं टेकवून दोघेही नतमस्तक झाले. 

बहिर्जी म्हणाला, "झुंजारमल राया. आमच्या शिवबाराजांनी सवराज्याचं सपान पघितलंय. आन त्यापायी दिवसरात आमच्यासाठी आणि गोर गरीब माणसांसाठी राबत्यात. आमच्या परयत्नांना येश येऊ दे, राया..."

        देवाच्या उजव्या बाजूला एक लाकडी दरवाजा होता. दरवाज्याच्या वर कातळात कोरलेलं एक हत्तीचं चित्र. कडी कोयंडा पार गंजून गेलं होतं. मारत्याने जोर लावून उघडण्याचा प्रयत्न केला. पण छे! मारत्या आजूबाजूला काही मिळतंय का पाहू लागला. तो पर्यंत बहिर्जी दरवाजा न्याहाळत होता.

"सर. मागं हो. बघतुच कसं उघडत न्हाय त्ये."

        मारत्याच्या हातात मोठा दगड होता. कडीवर दोन चार वेळा ठोकलं. करकर करत कडी बाजूला केली. दरवाजा आतमध्ये लोटला. कुंद - मळकट वास नाकात घुसला. दोघांनी बाजूला होत डोक्याच्या मुंडाश्याचा शेव तोंडाला बांधला. आतमध्ये मिट्ट काळोख होता. देवाच्या समोरची जळती समई मारत्या घेऊन आला. समईच्या प्रकाशात खोली उजळू लागली. आजूबाजूचं दृश्य बघून दोघांची बोबडी वळायचीच बाकी होती. आ वासून आणि मोठाले डोळे करून ते पाहू लागले. हि खोली नसून शिलेखाना होता. शस्त्रागार! नाना प्रकारची शस्त्रे तिथं शिस्तीनं ठेवलेली होती. दगडी भिंतींवर खुंट्यांवर टांगलेली होती. खंडे - तलवारी, कट्यारी, जांभये, भाले - बरचे. नाना प्रकारचे तिर - कामठे. दांडपट्टे. दोघेही विस्फारल्या नजरेनं समोरचा शस्त्र खजिना पाहत पुढे पुढे जात होते. आजपर्यंत एवढं मोठं आणि विविध प्रकारची शस्त्रे बाप जन्मात त्यांनी पहिली नव्हती. पुढे पुढे सरकत असताना अचानक मारत्याचा पाय बाजूच्या दगडी कठड्याला अडकला पडलाच असता पण बहिर्जीने त्याला सावरलं. कठड्यावर पितळेची संदूक होती. दीड हात लांब. आतमध्ये नक्कीच काहीतरीमी मौल्यवान असल्याची दोघांना उत्सुकता लागली. समईच्या प्रकाशात बहिर्जी संदूक न्याहाळू लागला. पण कुठून कसे उघडायचे काही कळत नव्हते. संदुकीच्या वरच्या भागावर खालपासून ते वरपर्यंत विविच नक्षीकाम केलेली सर्पाकार आकृती होती. वर गंडभेरुंड. त्याच्या उजव्या बाजूच्या डोक्याचा डोळा थोडा मोठा होता. एकदम खाली डावीकडे वाघ तर उजवीकडे हत्तीचं चित्र होतं. त्याचा एक दात आतमध्ये गेल्यासारखं वाटत होतं. मधोमध एक कमळाकृती होती. तीत एखादी कळ असावी. दोघांनी ती संदूक आलटून पालटून पाहिली. उघडण्याचा खूप प्रयत्न केला. पण शक्य झालं नाही. बाजूला ठेवलेली हातोडी उचलत मारत्या म्हणाला,

"व्हय मागं... आता बगतुचं कसं न्हाई उघडत..."

त्याला बाजूला करत बहिर्जी म्हणाला, "आरं... काय करतूस? समदीकडं ताकत न्हाय उपेगाची. हि डोक्याचं काम हाय..."

"न्हाय... आता एक घाव आन दोन तुकडं... च्यायला... ", म्हणत मारत्याने हातोडी उगारली. झटकन पुढे होत बहिर्जीने त्याच्या हातातली हातोडी हिसकावून घेतली.

"आरं... थांब कि जरा...मला जरा येळ इचार करू दि..."

        बहिर्जी पुन्हा पुन्हा संदुकीवर चितारलेली चित्रे पाहू लागला. गंडभेरुंड, कमळ, हत्ती. चित्र नेहमीच्या पाहण्यात येणाऱ्या चित्रांपेक्षा जरा वेगळी होती. पण कुठेतरी नक्की पाहिल्या सारखी वाटत होती. आठवण्याचा प्रयत्न करू लागला. काहीतरी आठवल्यागत करत त्याने चुटकी वाजवली. झुंजारमहालामध्ये प्रवेश करण्याआधी चौकोनी बोगद्याच्या वर एक वेगळ्या प्रकारचं गंडभेरुंड होतं. उजव्या बाजूचा डोळा मोठा होता. त्याने तो बोटानं आतमध्ये दाबला. झपकन हत्तीचा एक दात बाहेर आला. तो हाच हत्ती, जो शास्त्रागारात येताना दरवाज्याच्या वर कोरलेला होता. आणि त्याचा एक दात गायब होता. त्याने तो दात आतमध्ये दाबला. तोच कमळाच्या आतमधली कळ बाहेर आली. बहिर्जी तो दाबणार तोच ती पटकन आतमध्ये गेली. ती आतमध्ये जाताच. गंडभेरूंडाचा डोळा वर आला. बहिर्जीने पुन्हा तीच कृती केली. पण कमळाची वर आलेली कळ दाबणार तोच पुन्हा तो आतमध्ये गेली. एकूण प्रकरण त्याच्या लक्षात आलं. हत्तीचा दात आतमध्ये दाबताच लगेच कमळाची कळ दाबायची होती. आणि पुढच्या वेळी नेमकं त्याने ते साधलं. संदुकीची वरची बाजू डाव्या हाताला वर आलेली दिसली. मारत्याने घाईनेच त्यात बोटांची नखे रुतवली आणि धरून उघडलं. आतमध्ये मखमली म्यानामध्ये नक्षीदार सोनेरी मूठ असलेली आणि सरळ पातं असलेली तलवार होती. सोनेरी मुठीला खाली वीतभर बाकदार सोनेरी गज. बहिर्जीने तलवार बाहेर काढली. म्यानातून खसकन बाहेर खेचली. तलवारीचं सरळ सोट हातभार लांब चाकाकतं पातं.समईच्या जातीचा प्रकाश आजूबाजूला फेकू लागलं. वजनाला खूपच हलकी होती. विशेष म्हणजे तलवारीचं पातं दोन्ही बाजूने धारदार होतं. मारत्याने एकवार तलवार हातात घेऊन पहिली. राज घराण्यातील राजे महाराजांची तलवार असावी, असं वाटत होतं.

"बहिर्जी... तरवार तर लय नामी हाय. आपुन ठेवायची का?"

"मारत्या... आपुन शिपाई गडी. एवढी भारीतली तरवार आपल्या काय कामाची."

"मला तर लय आवडली लगा."

"हं... पर, हि तरवार शिवबाराजेस्नीच शोभल बग..."

"व्हय लगा... राजास्नीच हि तरवार साजल बग..."

        बहिर्जीने ती तलवार कमरेला खोचली. ते सारं शस्त्र वैभव पाहून दोघेही हरकून गेले होते. तिथून पाय निघत नव्हता पण थांबून चालणार नव्हतं. मारत्या मात्र अजूनही तलवारींपाशी घुटमळत होता.

"बहिर्जी... म्या घिव का रं येक तरवार...?"

"मारत्या... ह्ये सारं आपलंच हाय. पर, आधी राजास्नी सांगाय पायजे."

"मंग मला तरवार कशी मिळंल???"

"त्ये माझ्याकडं लागलं... मंग तर झालं...."

"बरं... चल..."

        शस्त्रागाराचा दरवाजा व्यवस्थित बंद करून दोघेही देवाच्या मागून उजव्या बाजूच्या वर जाणाऱ्या पायऱ्यांवरून वर जाऊ लागले. कंदीलाचा प्रकाश आतमध्ये पडताच एक दोन वटवाघळं चीं चीं करत डोक्यावरून उडून बाहेर पडली. दोघेही पटकन खाली बसले. वटवाघळांच्या घाणीचा वास नाकात घुसताच डोक्याच्या मुंडाश्याचा शेव तोंडाला बांधला. वीसेक पायऱ्या चढून वर गेल्यावर दोघेही थांबले. समोर दरवाजा होता. मारत्याच्या हातात कंदील देत. बहिर्जी दरवाजाच्या कडी कोयंड्याशी झटू लागला. बराच वेळ प्रयत्न केल्यावर दरवाजाचा अडसर बाजूला झाला. दरवाजा आतमध्ये उघडला गेला. मारत्याने कंदील समोर धरला. पण समोर दगडमातीचा ढिगारा असल्यामुळे वर जायची वाट बंद होती.

"आता रं???", मारत्या म्हणाला.

"ह्ये हिथून काढणं लय अवघड हाय. वरूनच खांदून काढलं पायजे.", बहिर्जी सुस्कारा सोडत म्हणाला.

"बरं चल आता. हिथं थांबून काय उपेग न्हाय..."

दोघेही माघारी वळले. पायऱ्या उतरून खाली आले. देवाला पुन्हा एकदा नमस्कार केला. आल्यावाटेने भुयारातून माघारी पुन्हा देवीच्या मंदिरामध्ये आले. खांबाला टेकून म्हातारबा झोपला होता. दोघांची चाहूल लागताच त्याची झोप चाळवली.

"पोरांनु आलास व्हयं...?"

"हं..." बहिर्जीने हुंकार भरला.

"बरं वाट घावली नव्हं?"

"व्हय... पर वर जायचा दरवाजा पार बुजून गेलाय..."

"आता ते वर गेल्याशिवाय न्हाई काढता येणार..."

"हां... त्ये काम हुईल."

"आणखी एक राहिलं पगा. गडावर रहिमचाचा म्हणून एक कडवा बाच्छावाचा माणूस हाय. त्योच जरा तुम्हास्नी नडल. त्येचा बंदोबस्त करा फकस्त."

"आस्स. हं. बरं झालं म्हातारबा ह्ये सांगितलं त्ये. चला. आम्ही निगतु आता. राजास्नी भेटायला पायजे."

"बरं."

 दोघेही निघायला लागले.

"बहिर्जी. जरा. हिकडं यं.थांब जरा..."

म्हातारबा गाभाऱ्यात गेला. काही पळांत बाहेर आला. त्याच्या हातात काहीतरी होतं. बहिर्जीच्या समोर धरत म्हणाला,

"ह्ये घे... ह्येच काय उपेग हुईल का बग."

"काय हाय ह्ये?"

"माझा बा... गडावं देवाची पूजा करायला जायचा. देवाच्या पूजेत होतं हे. देवाच्या मंदिराचा काय तरी नकाशा आसंल. मला तर काय गडावं जाता आलं न्हाई. त्ये वर तोरणेश्वराच्या मंदिरात गेल्या बिगर न्हाई कळणार..."

"बरं.", तो तांब्याचा कोरलेला पात्र कमरेच्या पिशवीत टाकत बहिर्जी म्हणाला,
येतो आम्ही. आज पासून दोन दिसांनी गडावं भेटू. हे घ्या मोहोर. दरवाजावर असलेल्या रखवालदाराकडं द्या. म्हंजी वर येत येईल."

        पाऊस भुरभुरत होता. दोघेही डोक्यावर कोपऱ्या घेऊन झपझप वस्तीकडे चालू लागले. मारत्याच्या मावशीकडे न्याहारी करून दोघांनी घोड्यावर मांड ठोकली. घोडी शिवापूरच्या दिशेने दौडू लागली.

क्रमशः