Jhunjharmachi - 3 - Last Part in Marathi Thriller by Ishwar Trimbak Agam books and stories PDF | झुंजारमाची - 3 - अंतिम भाग

Featured Books
Share

झुंजारमाची - 3 - अंतिम भाग

३. हर हर महादेव
 

दुपारची वामकुक्षी झाली. थोडासा फलाहार करून शिवबाराजे बाजी पासकरांसोबत वाड्याच्या बाजूला असणाऱ्या बागेमध्ये गावकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकत होते.

घटका दोन घटकांत राजे मोकळे झाले. बहिर्जीने राजांची भेट घेतली. सारी हकीकत सांगितली. ती विलक्षण तलवार राजांसमोर पेश केली. तलवार पाहताच शिवबाराजे स्तिमित झाले. आई जगदंबेची कृपा आणि श्री झुंजारमल देवाचा आशीर्वादच मिळाला. राजांनी आतल्या देवघरात तलवारीचं पूजन केलं. बहिर्जीची पाठ थोपटली. रात्री सदरेवर खलबतं झाली. कोण कुठून आणि केव्हा हल्ला करणार ठरवलं गेलं. राजांनी सर्वांना सक्त ताकीत दिली. 'शक्यतो विना हत्यार काम झाले पाहिजे. जो कुणी हत्यार उगारेल तर गय करू नका. पण शक्यतो जीवानिशी कुणालाही मारणे नाही.'

"बहिर्जी गडावर कधी झेंडा फडकवायचा?"

"राजं. आजपासून दोन दिसांनी सकाळच्या वक्ताला. हत्यार बी चालवायची तोशीस पडणार न्हाई. हां फकस्त एक आडकाठी हाय पगा."

"हं बोल."

"गडावर रहिमचाचा म्हणून बाच्छावाचा माणूस हाय. लय वर्षांपासून गडावरच राहतूय. इमानी माणूस. त्येला जरा...", पुढे बहिर्जी अडखळला. राजांनी त्याच्या मनातलं नेमकं हेरलं. म्हणाले,

"हं. त्यांच्याशी बोलू आम्ही. त्याची काळजी नको करुस. आणखी कुणी?"

"न्हाय राजं. आणखी मंग कुणी न्हाय पगा."

"ठीक. आज आराम करा. उद्या सकाळी निघा मग..."

"न्हाय राजं. आज रातच्याला त्ये काम फत्ते करतु. म्हंजी कामच झालं."

"ठीक आहे. जे कराल ते काळजीने करा. आणि सावध असा."

"जी राजं. येतो."

राजांना मुजरा करत बहिर्जी, सुंदऱ्या, मारत्या आणि बाकीचे वाड्यातून बाहेर पडले. बागेतून बदलीची घोडी घेऊन तोरणागडाकडे दौडू लागले.

        किल्लेदाराशी झालेल्या सल्लामसलती नुसार दोन दिवसांनी सकाळच्या दुसऱ्या प्रहरी बाजी पासलकर, तान्हाजी समवेत शिवबाराजे गडावर निघणार होते. गडावर बिनीच्या दरवाज्यातून आत जाताच नौबत झडणार होती. किल्लेदाराने आधीच त्याची व्यवस्था केली होती. राणोजी आणि सुंदऱ्या यांनी दाखवलेल्या वाटेवरून नेतोजीराव त्यांच्या पाच पन्नास मावळ्यांच्या तुकडीसह बुधला माची काबीज करणार होते. तर झुंजार बुरुज बहिर्जी, मारत्या सोबत येसाजी कंक, संभाजी कोंढाळकर आणि पाच पंचवीस मावळे कब्ज्यात घेणार होते. बिनीच्या दरवाज्यातून नौबत झडताच दोन्ही माच्यांवरून एकच वेळी यलगार होणार होता. 

        ठरल्या दिवशी, ठरल्या वक्तानुसार सकाळी सकाळीच राजांचं घोडदळ वेल्हा गावात येऊन दाखल झालं. नेतोजीराव आणि येसाजी कंक अगोदरच आपापल्या जागी दबा धरून बसले होते. बहिर्जी, मारत्या उजडायच्या आधीच झुंजार महालामध्ये दाखल झाले होते. कळकीच्या मेटाच्या बाजूने दोर टाकून येसाजी आणि पंचवीस तीस मावळे वर चढून गेले. झुंजार माचीच्या मधल्या टप्प्यावर नौबतीकडे मारत्या कान लावून बसला होता. तर दुसरीकडे बुधला माचीवर झाडांच्या घोळक्यात एका झाडावर सुंदऱ्या वाट बघत होता.

        सकाळचा दुसरा प्रहर. पाऊस एव्हाना थांबला होता. आकाश तसं ढगाळच होतं. गडाच्या आसऱ्याने उगवलेली झाडं झुडपं पावसाच्या पाण्यानं स्वच्छ धुवून निघाली. हिरवीगार टवटवीत दिसू लागली. थंडगार वारा मंद मंद वाहत होता. राजांनी गड चढायला सुरुवात केली. बरोबर पंचवीस तीस मावळे. बिनी दरवाजापाशी राजांना पाहताच द्वाररक्षकाने दरवाजा उघडला. दरवाजावरच्या सज्जाकोटीतली नौबत ढणाणा वाजू लागली. साऱ्या आसमंतात आवाज घुमू लागला. काहीच पळांत झुंजार माचीच्या मधल्या टप्प्यावर मारत्याला आवाज ऐकायला आला. त्याने जीवखाऊन कर्णा फुंकला. त्याचा प्रतिध्वनी डोंगरांगामध्ये घुमला. आदल्या रात्री बहिर्जी आणि त्याच्या साथीदारांनी झुंजार माचीच्या मधल्या बुरुजाखालची वाट मोकळी केली होती. झाडाझुडपांनी गर्दी केल्यामुळे गडावरच्या कुणाच्याही लक्षात आलं नाही. खाली दबा धरून बसलेले मावळे वारुळातून मुंग्या बाहेर याव्यात तसे बुरुजाखालच्या गुहेतून भराभरा माचीवर प्रकट होऊ लागले. एका हातात भगवा झेंडा आणि दुसऱ्या हातात तलवार. अचानक वीस पंचवीस इसम झुंजार माचीवर कसे काय प्रकटले? म्हणून झुंजार बुरुजावर आणि मधल्या बुरुजावर नुकतेच येऊन स्थिरावलेले दोन चार पहारेकरी अचंभित झाले. हातातला भाला फेकून देऊन सगळ्यांनी शरणागती पत्करली. एक दोघे बोंबा ठोकत बालेकिल्ल्याकडे पळत सुटले. दुसरीकडे बुधला माचीवर सुंदऱ्याला इशारा मिळताच त्यानेंही कर्णा फुंकला. आवाज होताच, झाडीत लपलेलं सैन्य भगवे झेंडे फिरवू लागलं. 'हर हर म्हाद्येव' ची किलकारी ठोकत माचीवर पसरू लागलं. 'हे भगवं आग्या मोहोळ कुठून उपटलं?' म्हणून बुधला माचीवरच्या रक्षकांची तारांबळ उडाली. 'उगाच लढून फुकाफुकी जीव गमावण्यापेक्षा हत्यार टाकलेलं बरं!'

        बालेकिल्ल्याजवळ येताच राजांनी पहिल्याप्रथम मेंगाईदेवी आणि नतंर तोरणेश्वराचे दर्शन घेतले. तोपर्यंत बिनी दरवाजा आन कोकण दरवाजावरचं आदिलशाही निशाण खाली येऊन त्यावर भगवा झेंडा वाऱ्यावर फरफरू लागला. कित्येक दशकांची गुलामी मोडीत काढून सह्याद्रीच्या शिरपेचात मराठी निशाण डौलानं झळकू लागलं. दरवाज्यावरच्या नौबती झडू लागल्या. त्यात हर हर महादेवचा आवाज मिसळून गेला.

बाहेर काय गडबड उडाली आहे, म्हणून रहिमचाचा वाड्यातून बाहेर आले. सरदरेबाहेर भगवे निशाणधारी लोकांची गर्दी उसळली होती. कमरेची तलवार उपसली गेली. ताडताड पावलं टाकत चाचा सदर जवळ करू लागले. राजांच्या समोर बाजी पासलकर, जवळ किल्लेदार उभे होते. किल्लेदाराच्या रोखाने घोगऱ्या दमदार आवाजात चाचा ओरडले.

"क्या चल रहा है, ये?"

     किल्लेदाराचं लक्ष तिकडे गेलं. त्याने मान खाली घातली. चाचा आणखीनच भडकले. बाजी पासलकरांचा सामोरे येत म्हणाले,

"बाजीसाब. क्या चल रहा है? किलेपरका विजापूर परचम उतारकर, ये मरहट्टोंका झंडा!"

पाठीमागून धीमी पावलं टाकत राजे सामोरे आले.

"चाचा... शांत व्हा... किल्ला तुमचाच आहे."

"राजाजी आप?", राजांना पाहताच रहिमचाचा कमरेत किंचित झुकला.

"चाचा. हे भगवं निशाण आपल्या दौलतीचं. आपल्या मातीतल्या माणसांचं. या मातीसाठी सगळे एकत्र होऊन उभे राहू. दुसऱ्याची गुलामी कशाला?"

"मतलब... सरळ सरळ बगावत?"

"नाही चाचा... हा आपला मुलुख! आपण इथं घाम गाळणार आणि दुसरे त्याचं मोल घेणार! हे कुठवर चालणार! आपल्या हक्काचंच आपण घेतोय. यात बगावत कसली?"

"नहीं... विजापूर सल्तनत से बगावत. नामूमकिन!"

"ठीक. चाचा, मला सांगा. किती वर्षे झाली तुम्ही इकडे आहात?"

"क्यूँ?"

"सांगाल?"

 "हमारे बापजादे इधरही गुजरे | तबसे..."

"अच्छा... आणि जर तुम्हाला इथून कुणी निघून जायला सांगितलं तर... तर कुठे जाल?"

"कुठे क्या कुठे? इधर गांव में मेरा घर है| खेती है| मैं किधर जायेगा|"

"म्हणजे तुम्ही इथलेच. याच मातीशी तुमचं इमान. हो ना?"

राहीमचाचा आता काय म्हणणार याचा अंदाज घेण्यासाठी राजांनी नेमका प्रश्न टाकला. रहिमचाचा थोडंसं गडबडले.

"हां... इसी मिट्टी से हमारा इमान."

"मग झालं तर... आमचंही इमान याच मातीशी! मातीशी इमान असणारे सगळे एकच!"

"ऐसे कैसे? आप मरहट्टे| हम मुसलमान|"

"चाचा... मुसलमान काय किंवा हिंदू काय? किंवा आणखी कोणत्याही धर्माचे लोक! सगळी मानसंच ना? आपल्या राहण्या खाण्याच्या पद्धती वेगळ्या, पण सगळ्यांच्या गरजा सारख्याच! पद्धती वेगळ्या असल्या म्हणून त्यातला भाव बदलत नाही. गरज बदलत नाही."

"राजे. ये आप क्या बोल रहे है?"

"सच हि तो है चाचा |", राजे काही पावलं चालत रहिमचाचा जवळ आले. चाचा थोडंसं माग सरकले.

"चाचा. मला सांगा. मुसलमान का मतलब क्या है?"

"ये कैसा सवाल है?"

"बताईये |"

"जो सच्चा होता है | जिसका दिल पाक होता है और जो अपने मुल्क के लिए जान भी देने के लिये तैयार हो |", सांगायची इच्छा नसतानाही चाचा बोलून गेले.

"अगदी बरोबर. म्हणजे जो आपल्या मातीशी इमानी आहे तो मुसलमान. हो ना?"

आता चाचा पुरते गोंधळून गेले. राजांशी नजर न मिळवता दुसरीकडे बघत म्हणाले,

"हां... तो... फिर..."

"मग, आता मला सांगा. तुमचं इमान त्या दुर बसलेल्या विजापूरच्या बादशहासाठी? जो कधीही तुमच्याकडे लक्ष पुरवत नाही. काळजी करत नाही. तुम्ही जिवंत आहात कि मेले याची त्यांना फिकीर नाही. कि तुमचं इमान, या मातीसाठी? आपल्या माणसांसाठी? आपल्या मुलुखासाठी?"

शिवबाराजांच्या प्रश्नाने चाचा विचारात पडले. काय बोलावं, उत्तर द्यावं. काही सुचेना. मनाची चलबिचल वाढू लागली.

"चाचा. आम्ही सांगतो. आपलं इमान या मातीशी. या मुलखाशी. कुणीही यावं. जोर जबरदस्ती करावी. लुटालूट करावी. हुकूमत गाजवावी. आणि आपण आज याची तरी उद्या त्याची गुलामी करावी. हे कितपत योग्य? हि आपली माती. आपली माणसं. यांच्यासाठी जगावं अन याचसाठी मरावं. कशाला दुसऱ्याची लाचारी? कशाला कुणाची गुलामी?"

"राजे... पर विजापूर..."

"त्याची फिकीर करू नका चाचा. विजापूरला आम्ही खलिता पाठवणार आहोत. त्यांच्याच वतीनं किल्लाचा कारभार आम्ही पाहत आहे, असे कळवणार आहोत. आणि हो! किल्ला तुमच्याच कडे राहील. किल्ल्याची जबाबदारी तुमच्याचकडे असेल. फक्त इथून पुढे गडाचा कारभार आमच्या म्हणजे आपल्या अखत्यारीत राहील. मग आता मातीशी इमानी राहाल अशी शपथ घ्या. आणि तुमची निष्ठा आपल्या मुलुखासाठी, स्वराज्यासाठी असू द्या."

"जैसे आप चाहे राजे |"

गडावरच्या हशमांकडे एकवार पाहत राजे म्हणाले,

"नेतोजीकाका दोर सोडा त्यांचे."

"जी राजे."

राजे पुढे बोलू लागले.

"आमची तुमच्याशी काहीही दुष्मनी नाही. इच्छा असेल तर आमच्या लष्करात सामील होऊ शकता. नाहीतर ज्यांना जायचे असेल ते विजापुरास जाऊ शकता. तुम्हांस कसलीही तोशीस पडणार नाही."

        शिवबाराजेंचे विचार ऐकून रहिमचाचाचे डोळे भरून आले होते. 'एवढंसं पोर. पण आपल्या मातीसाठी. माणसांसाठी जीवावर उदार होऊन स्वराज्याच्या घाट बांधायचा म्हणतोय! जुलमी आणि अत्याचारी राजवट उलथवून लावण्यासाठी प्रयत्न करतोय!' तलवार हातांच्या तळव्यावर तोलून चाचा राजांसमोर झुकणार तोच राजांनी त्याच्या खांद्याला पकडलं अन छातीशी कवटाळलं.

"नाही चाचा. नाही. आम्ही हे सगळं करतो आहोत ते तुम्ही आम्हाला शरण येण्यासाठी नव्हे तर तुम्ही खंबीरपणे आमच्या पाठीशी उभं राहावं म्हणून. तुमचा आशीर्वाद आणि भक्कम साथ आम्हाला हवी. तरच आपलं स्वराज्य आपल्या पायावर उभं राहील. सारी रयत आनंदानं एका छताखाली नांदेल."

        रहिमचाचाला राजांनी दिलेलं आलिंगन पाहून आजूबाजूची मंडळी भारावून गेली होती. तोपर्यंत नेतोजी पालकरही मावळ्यांसह सदरेवर हजर झाले. राजांच्या सांगण्यावरून बुधला आणि झुंजार माचीवर गिरफ्तार केलेल्या पहारेकऱ्यांचे हात सोडले गेले.

"किल्लेदार काका. तानाजीरावांकडून रक्कम घ्या आणि लवकरात लवकर कामगार कामाला लावा. उद्याचा दिवस उजाडता गडाच्या दुरुस्तीचं काम चालू व्हायला हवं."

"जी राजे."

"आणखी एक महत्वाचं. कामाच्या बाबतीत दिरंगाई, बेफिकिरी, हरामखोरी, लबाडी खपवून घेतली जाणार नाही. सर्वांनी लक्षात असू द्या."

सर्वांनी एकसाथ सूर लावला.

"जी राजं."

गडाच्या बंदोबस्ताची जबाबदारी नेतोजीकाकांकडे सोपवण्यात आली. काही शिबंदीही ठेवली. रहिमचाचांना गडावरील अस्ताव्यस्त पडलेल्या तोफा, बंदुका, गरनाळे, शस्त्रे यांची व्यवस्था पाहण्यात सांगितलं. उद्या पर्यंत गडावर दारुगोळा उपलब्ध होण्याची व्यवस्था केली. शस्त्र न उगारता आणि रक्तही न सांडता तोरण्यासारखा बुलंद नी बळकट किल्ला स्वराज्यात सामील झाला.

बहिर्जी पुढे होत म्हणाला,

"राजं... त्ये...?"

बहिर्जीच्या बोलण्याचा रोख ओळखत राजे म्हणाले, "हां. चला. बाजीकाका, येसाजी, चला आमच्याबरोबर."

बालेकिल्ल्यावरचं टेपाड उतरून सर्वजण झुंजारमाचीच्या दिशेने चालू लागले. बहिर्जी पाठोपाठ सोबत आणखी पाच दहा मावळे झुंजारमाचीच्या मधल्या टप्प्यावरच्या बुरुजाखालून भुयारीमार्गाने खाली आले. झुंजारमाचीखाली दडलेला झुंजारमहाल पाहून सगळेच अचंभित झाले. हरकून गेले. राजांसह सगळ्यांनी झुंजारमल देवाला नमस्कार केला. बहिर्जीने राजांना शस्त्रागार दाखवला. बाहेर मावळ्यांना थांबवून राज्यांसह सगळे आतमध्ये गेले. आतले भले मोठे शस्त्रागार पाहून राजे आणखीनच चकित झाले. खुश झाले. सगळं शस्त्रवैभव डोळे दिपवून टाकणारं होतं. शिवाप्पा लव्हारला बोलावून राजांनी सगळ्या शस्त्रांची पाहणी करून अशाच प्रकारची शस्त्रे बनवण्यासाठी सांगितले. स्वराज्य स्थापनेसाठी भवानी देवीचा आशीर्वाद आणि झुंजारमल देवाची शस्त्र रुपी खंबीर साथ मिळाली होती. राजांनी बहिर्जीला आलिंगन दिले. झुंजारमहालाचा आणि शस्त्रागाराचा शोध लावला म्हणून सगळ्यांचे कौतुक केले.

राजांनी संपूर्ण गड फिरून पाहिला. गडाची अभेद्यता, उंची आणि प्रचंड मोठा विस्तार पाहून राजांनी गडाचे "प्रचंडगड" नामकरण केले. सगळ्यांचे निरोप घेतले. सायंकाळ होता होता राजांच पथक पुण्याकडे दौडू लागलं.

        रहिमचाचा आणि किल्लेदाराच्या ओळखीतल्या बांधकाम मजुरांना लगोलग बोलावून गडाच्या तटबंदीचे आणि पडझड झालेल्या वाड्यांचे, बुरुजांची कामं चालू झाली. एके दिवशी म्हातारबा गडावर प्रकटला. बहिर्जीला भेटला. म्हातारबा दिसताच बहिर्जीला त्या ताम्रपत्राची आठवण झाली. त्याने ते म्हातारबाच्या हाती दिलं. तोरणेश्वराच्या मंदिराच्या मंडपामध्ये उभं राहून म्हातारबा त्यावरचा नकाशा पाहू लागला. मंदिराबाहेरच्या तटबंदीमधे चार दिशांना चार दगडी खांब होते. खांबांच्या मधल्या भागात कमळाची नक्षी चितारलेली होती. पण एका खांबावर बाहेरच्या बाजूला मात्र बाणाची आकृती होती. त्यावर दहा आकडा आणि जोडूनच मनुष्याची पावलं कोरलेली होती. ताम्रपटावर चितारल्याप्रमाणे सगळं जुळून आलं होतं. खांबापासून दक्षिणेची तटबंदी जवळच होती.पूर्णतः ढासळलेली. खांबापासून बहिर्जी दहा पावलं त्या दिशेने चालत गेला. आजूबाजूच्या कामगारांना बोलावून तटबंदीचा पाया खोदायला सुरुवात केली. सुरुवातीला मोठमोठाले घडीव दगड बाहेर आले. पण नंतर मात्र एकसंघ एकावर एक पायऱ्यांची रचना असलेला भाग लागला. तो भाग सोडून खोऱ्याने आतमधील माती बाहेर काढायचं काम चालू झालं. तटबंदीच्या पायातून पायऱ्यांनी खाली जाणारा भुयारी मार्ग होता तो. मातीनं बुजुवून टाकलेला. सरतेशेवटी कुजून गेलेल्या दरवाजाची लाकडं बाहेर आली. आतमध्ये छोटीशी खोली होती. मांडीपर्यंत लागतील एवढे तांब्या पितळीचे हंडे एकाओळीत मांडलेली होती. हंडे बाहेर काढण्यात आले. तानाजीने एकाचं झाकण उघडून पाहिलं तर आश्चर्य! आतमध्ये शिगोगिक भरलेल्या सुवर्ण मोहऱ्या, दागदागिने, हिरे, मोती. अगणित गुप्त धन हाती लागलं होतं. बहिर्जीने लगोलग सुंदऱ्याला पुण्याकडे धाडून दिले. गडावरून खाली कुणालाही ही बातमी कळणार नाही याची व्यवस्था करण्यात आली. खाली जाण्याला आणि वर येण्याला बंदी केली गेली.

          दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या प्रहरी बाजी पासलकर, दादाजी नरसप्रभू, येसाजी, सगळी मंडळी राजांसह गडावर हजर झाली. तोरणेश्वर पावला होता. राजांनी मिळालेली संपत्ती. केंजळगड, रायरेश्वर आणि तोरणागडाच्या दुरस्तीच्या खर्चासाठी लावून दिली. काहीच दिवसांत समोरचा मुरुंबदेवाचा डोंगरही राजांनी अल्पशा प्रतिकराने कब्जात केला. सारा गड फिरून पाहिला. बचावाच्या आणि लढाईच्या दृष्टीने गड अगदी मोक्याचा होता. तोरणा गडावर मिळालेले धन गडाच्या बांधणीसाठी राजांनी तरतूद करून दिले.

विजापूर दरबारात राजांचा खलिता पावता झाला होता. पण आज न उद्या आपल्या बंडाव्याची खबर मिळणार आणि विजापुराहून मोठी फौज आपल्यावर आदळणार याची राजांना पुरेपूर जाण होती. त्या दृष्टीने तोरणा गड लवकरात लवकर बळकट करणं आवश्यक होतं. विजापुराहून येणारी फौज थेट पुण्यावर येणार आणि त्यांचा मार्ग शिरवळ - सासवड असणार. त्यामुळे येणारं आक्रमण बाहेरच्या बाहेरचं थोपवलं पाहिजे. राजांची आणि सोबतच थोरामोठ्यांची विचारचक्र फिरू लागली. चर्चा, मसलती झडू लागल्या. आणि मोहीम ठरली. किल्ले पुरंदर! येणारं आदिलशाही आक्रमण थोपवायचं असेल तर पुरंदरसारखा बलाढ्य किल्ला हवाच!

        आकाश भुरभुरत होतं. राजे झुंजार बुरुजावर उभे होते. गुलाबी रंगाचा जिरेटोप, अग्रावर टप्पोरे मोती लटकत होते. कमरेला भवानी तलवार जांभळ्या मखमखली म्यानात लटकत होती. बाजूला बहिर्जी, तानाजी, येसाजी उभे होते. मुरुंबदेवाच्या डोंगरावर उभारलेली तटबंदी आकार घेत होती. राजाचं लक्ष पूर्वेकडे लागलं होतं. समोर दिसणारा किल्ले पुरंदर खुणावत होता.

***** समाप्त *****

 

~ जय शिवराय ~