Bali - 26 in Marathi Novel Episodes by Amita a. Salvi books and stories PDF | बळी - २६

बळी - २६

बळी -- २६
रंजनाची किंकाळी ऐकून दिनेश धावत आला. तो असा ध्यानी- मनी नसताना दिसला; -- आणि आपल्याला ज्याने मारण्याचा प्रयत्न केला; त्या इसमाला त्या निर्जन स्थानावरील घरात रंजनाबरोबर बघून केदारचा संयम सुटला,
" हाच तो दिनेश! त्याला लगेच बेड्या घाला; नाहीतर तो रंजनाचंही काही बरं- वाईट करेल! त्या राक्षसाचा काहीच भरवंसा नाही! तुम्ही वाट कसली बघताय?" आपण कुठे आहोत; याचं भान त्याला राहिलं नव्हतं.
" आम्ही पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करतोय! या क्षणी तुझ्या साक्षीशिवाय आमच्याकडे त्याच्याविरूद्ध काहीही पुरावा नाही! गुन्हेगारावर आरोप सिद्ध करायचा असेल; तर भक्कम पुरावे लागतात! त्याच्या साथीदारांचीही नावं आपल्याला जाणून घ्यायची आहेत! आपल्याला त्याच्यावर नजर ठेवावी लागेल--- तू थोडा वेळ शांत रहा; आणि आम्हाला आमच्या कामात सहयोग दे!" जाधव म्हणाले!
पण केदार मात्र शांत होत नव्हता. तो त्यांचा हात झटकून घरात जाण्याचा प्रयत्न करत होता.
त्याचा आवाज घरात ऐकू जाऊ नये; म्हणून इ. दिवाकर आणि इ. जाधव त्याला ओढत खिडकीपासून दूर घेऊन गेले होते.
त्यांना आता भीती वाटू लागली होती!
"केदारचं मानसिक संतुलन बिघडलं तर काय करायचं ?"
त्यांनी निशाकडे पाहिलं. आणि हातानेच "काय करायचं?" विचारलं.
केदारची अवस्था बघून निशाचा चेहराही गंभीर झाला होता. पण त्यांना दिलासा देत ती म्हणाली,
"तो ठीक आहे! दिनेशला अचानक् -- आणि ते ही आपल्या पत्नीबरोबर बघून मनातून हादरला आहे! हळू हळू शांत होईल! काळजी करू नका! मी समजावते त्याला!" ती म्हणाली. तिने एक गोळी पर्समधल्या बाटलीतून काढली; आणि बळेच केदारला पाण्याबरोबर घ्यायला लावली.
तो हळू हळू शांत झाला; आणि बोलू लागला,
" बरं झालं आज आपण इथे आहोत! बिचारी रंजना! या दिनेशचा आमच्या घरावरच डोळा दिसतोय! ती या आडगावात येऊन राहिली; तिथेही तिला त्याने शोधून काढलं!" केदारच्या मनात अजूनही रंजनाविषयी काळजी होती.
त्याचा रंजनावर अजूनही कायम असलेला विश्वास बघून इ. जाधवांनी डोक्याला हात लावला होता. "याला विश्वास नाही; आंधळा विश्वास म्हणतात--- या केदारचे डोळे उघडणार कधी?" ते मनातून खूप चिडले होते.
"तुला कसं समजावू? -- केदार! थोडा विचार कर! --- रंजना स्वतः दरवाजा उघडत होती! सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवून बुद्धीचा निकष लावून सत्य पडताळून पहाण्याची वेळ आता आली आहे! किडनॅप झालेली व्यक्ती स्वतः चावीने दरवाजा उघडून घरात जात नाही; केदार! आतापर्यंत तू अर्धसत्य पाहिलं आहेस! जर पूर्ण सत्य माहीत करून घ्यायचं असेल, तर थोडा धीर धर! काळजी करू नकोस! तुझे गुन्हेगार आमच्या तावडीतून आज सुटणार नाहीत!" इ. दिवाकर केदारला न दुखवता सत्य परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत होते.
केदार आता गंभीर झाला होता. इ. दिवाकरांच्या बोलण्याचा मथितार्थ त्याला समजला होता.त्याला अचानक् लागलेल्या धक्क्याची तीव्रताही आता कमी झाली होती. तो आता सगळ्या प्रसंगांची साखळी जुळवण्याचा प्रयत्न करत होता! आता भावनांवर बुद्धीने ताबा मिळवला होता! डोळ्यांत पाणी होतं -- चेह-यावर दुःख होतं; पण आता विवेक जागृत झाला होता! रंजनाचं लग्न झल्यापासून खटकणारं दुराव्याचं वागणं आता त्याला आठवू लागलं होतं. आज आपण त्या दिवसासारखे एकटे नाहीत; तर पोलीस आपल्याबरोबर आहेत -- घाबरण्याचं कारण नाही हे लक्षात आल्यामुळे दिनेशला बघून त्याच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता आता कमी झाली होती. विचारात गढून गेल्यामुळे त्याचा आरडा-ओरडा आता कमी झाला होता.
खरा प्रकार आतापर्यंत निशाच्याही लक्षात येऊ लागला होता! आपण केदारचं भूत बघतोय, असं रंजनाला का वाटावं? म्हणजेच. तो जिवंत असू शकत नाही; याची तिला खात्री आहे; म्हणजेच --- दिनेशसारख्या मवाली मुलाबरोबर रहाता यावं; म्हणून रंजनाने केदारसारख्या सज्जन माणसाला फक्त फसवलं नव्हतं ; तर त्याच्या खुनाच्या कटातही ती सहभागी झाली होती! " केदारविषयी तिला आता अपार करुणा वाटू लागली होती! त्याच्या पाठीवर हात ठेवत ती म्हणाली,
"या पुढे तुला कल्पनाही नसेल; अशा गोष्टी तुला ऐकाव्या लागणार आहेत; सगळं ऐकताना आणि बघताना तुला तुझ्या मनावर ताबा ठेवावा लागेल! स्वतःचा तोल ढासळू देऊ नकोस! आणि जे सत्य दिसेल; ते मान्य कर! आपल्याशी कोणी कसं वागावं; हे आपल्या हातात नसतं; पण तुझं मन ताब्यात ठेवणं नक्कीच तुझ्या हातात आहे!" केदारने होकारार्थी मान हलवली आणि कडवट हसत म्हणाला,
"मी आता व्यवस्थित आहे! अज्ञानातलं सुख खूप झालं --- सत्य परिस्थितीला तोंड द्यायची माझी आता तयारी आहे!"
केदारला समजावून सांगण्याची निशाची पद्धत आणि तिच्या डोळ्यातल्या अश्रूंमधून त्याच्याविषयी दिसणारी वेदना बघून तिच्या मनातलं केदारविषयीचं प्रेम आता दिवाकरांपासून लपून राहिलं नव्हतं. ते हसत मनात म्हणाले, " केदार! खरं प्रेम-- खरी साथ अशी असते! -- तुला लवकरच उमजेल!"
*********
रंजनाला सोफ्यावर बसवून दिनेशने खोलीतला पंखा लावला आणि खिडकीही उघडली. खिडकीबाहेर उभे असलेले इ. दिवाकरांचे पोलीस साथीदार याच संधीची वाट बघत होते. आता त्यांना दोघांचं संभाषण व्यवस्थित ऐकू येत होतं. इतकंच नाही तर मोबाइलच्या कॅमे-यावर व्हिडिओ टेपिंगही चालू झालं होतं! रंजनाला थोडा मानसिक धक्का देण्यासाठीच त्यांनी केदारला झाडाखाली उभं केलं होतं. अनवधानाने त्याने घातलेल्या पांढ-या कपड्यांमुळे नाटकाला अधिकच रंग आला होता आणि त्यांचा प्लॅन यशस्वी झाला होता.
" तिकडे मी केदारचं भूत पाहिलं! किती भयानक् दिसत होता तो! तू त्याला पाहिलं असतंस; तर तूही घाबरला असतास! माझा सूड घेण्यासाठी तो आता माझ्या मागे लागणार! तो मला जिवंत सोडणार नाही!" हे सांगताना रंजनाचे डोळे खोलीभर वेड्यासारखे केदारची चाहूल घेत होते.
"तुला बहुतेक भास झाला! केदारला आपण कधीच संपवलंय! तो तुला कसा दिसेल? जराही घाबरू नको! भूत वगैरे काही नसतं! हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत." दिनेश तिला दिलासा देत म्हणाला.
"तू विश्वास ठेव अथवा नको ठेवूस !मी खरंच त्याला पाहिलं! " रंजनाची भीती अजूनही कमी झाली नव्हती. आता तिची ताठरलेली नजर घराच्या दरवाजाकडे होती.जणू काही कोणत्याही क्षणी केदारचॆ भूत तिथे येऊन उभे राहील, याची भिती तिला वाटत होती. तिच्या डोळ्यातली भीती बघून दिनेशने समोरचं दार बंद करून आतून कडी लावली.
इ. दिवाकर आणि इ. जाधव इतक्या वेळात केदार आणि निशाला बरोबर घेऊन मागच्या दाराकडे गेले होते. रंजना अचानक् इतक्या जोरात किंचाळली होती; की दिनेश दरवाजा उघडा ठेवून तिच्याकडे धावत गेला होता. उघड्या दारातून सगळे आत शिरले. अंधुक प्रकाशात त्यांनी पाहिलं, की तो बेडरूम होता. हाॅलला बेडरूम जोडलेला होता. हाॅलमधून किचनमध्ये जाण्यासाठीही एक दरवाजा होता. फक्त तीन खोल्यांचं ते छोटेखानी घर होतं. रंजना आणि दिनेशच्या बोलण्याचे आवाज हाॅलमधून स्पष्ट ऐकू येत होते. हाॅलमधून येणारी प्रकाशाची तिरीप सोडली, तर बेडरूममध्ये काळोख होता, शिवाय दिनेशचं पूर्ण लक्ष रंजनाकडे होतं; त्यामुळे बेडरूममधील हालचाली त्याच्या लक्षात येणं शक्य नव्हतं!
"मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. जरा शांत बस!" रंजनाला चिडखोर आवाजात सांगत दिनेश हाॅलला लागून असलेल्या स्वयंपाकघरात गेला.
त्यांनी डोकावून पाहिलं, की बैठकीच्या खोलीत रंजना एकटीच बसली होती. काही वेळातच दिनेश स्वयंपाकघरातून पाण्याचा तांब्या आणि पेला घेऊन आला. पेल्यात पाणी ओतून त्याने रंजनाला दिलं, आणि स्वतःही प्याला; जरा रागातच रंजनाशी बोलू लागला,
"तू माझा मूड घालवून टाकलास! आज मला नवीन गाडीचं सेलिब्रेशन लकरायचं होतं. पार्टीची सगळी तयारी मी करू ठेवली होती! तुला आवडतात म्हणून बटाटेवडे , कोल्ड-ड्रिंक सगळं आणलं होतं; पण तुला जिथे तिथे तुझा नवरा दिसतोय! तुला इथे येऊन रहाता यावं, आणि आपल्याला दूर रहावं लागू नये, म्हणून केदारला आपण संपवलं---- पण अजूनही तो आपल्याला सुखाने जगू देत नाही! हे किती दिवस चालणार? "
"तेच तर माझ्या मनाला टोचतंय! इतक्या सरळमार्गी माणसाचा आपण विनाकारण जीव घेतला! त्याने आपलं काय बिघडवलं होतं? आपल्या प्रेमाच्या आड माझे वडील आले होते --- केदारचा काय संबंध होता? " रंजनाला अजूनही केदार आपल्याला हाक मारतोय-- असा भास होत होता, आणि तिचं अंगावर शहारे येत होते.
******** contd. - Part.27

Rate & Review

Arohi

Arohi 7 months ago

Mandakini Mundi

Mandakini Mundi 8 months ago

Preeti Patil

Preeti Patil 10 months ago

Shubhangi Kadam

Shubhangi Kadam 10 months ago

sanjana kadam

sanjana kadam 10 months ago